.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
श्रीगणेश लेखमालेची कल्पना वाचून डोक्यात पहिला विचार आला, तो म्हणजे सर्वात आवडीच्या छंदाबद्दल - वाचनाबद्दल काहीतरी लिहू या. पण काय लिहिणार..? आपले वाचन वल्ली-बॅटमॅनसारखे फोकस्ड नाही, सागर भंडारे, मृत्युंजय यांच्यासारखे चौफेर नाही, सुशींच्या पुस्तकांना वाहून घेतलेल्या अजिंक्य विश्वाससारखी आपल्यात चिकाटी नाही, इंग्लिश वाचनाकडे अजून फारसे बघितलेले नाही आणि कविता-शेरोशायरीचा गंध नाही.. त्यामुळे 'नक्की काय लिहिणार?' हा प्रश्न होताच.
भेळ खाल्ल्यानंतर भेळेचा कागद वाचणे, वाचनालयातून घरी चालत येताना रस्त्यावरून पुस्तक वाचत येणे (..आणि कशाला तरी धडकणे..!), वाचनालयातून काल रात्री आणलेली दोन पुस्तके रात्रीतून संपवून सकाळी लगेचच सुजलेल्या डोळ्यांसह ती पुस्तके बदलायला जाणे, अशा बहुतेक सर्व पुस्तकप्रेमींच्या पायवाटेवरून प्रवास सुरू झाला. यानंतर कॉलेजला असताना 'शतक शोधांचे' हे पुस्तक महाग असल्याने विकत घेणे शक्य होणार नाही असे लक्षात आल्यावर, सुमारे सहा-सात महिने रोज कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून ते पुस्तक एका भल्यामोठ्या डायरीत लिहून काढणे असे उद्योगही करून झाले.
एकदाचे पुण्यनगरीमध्ये आगमन झाले आणि आता संग्रहासाठी पुस्तके घ्यायलाच हवीत अशी काहीतरी जाणीव झाली. सुरुवातीची अनेक वर्षे विंचवाचे बिर्हाड सांभाळत कॉट बेसिसवर फिरताना कपड्यांची एक बॅग आणि अंथरूण-पांघरुणाची एक बॅग यांच्यामध्ये पुस्तकांची तिसरी बॅग कधी तयार झाली, ते कळलेच नाही
आचार्य अत्रेंनी पत्रकारांना दिलेला उपदेश 'मांजरासारखे दिसेल त्या भांड्यात तोंड घालीत जा..!' मी कसोशीने पाळत मिळेल ते वाचू लागलो. त्यातही चटक लागली ती आत्मचरित्राची! बर्याच दिग्गजांची आत्मचरित्रे वाचली. अनेकदा 'हे पुस्तक आपण वाचले नसते तर खूप काही हरवले असते' अशा भावनेपासून ते 'आपण हे पुस्तक का वाचले..??' अशा वैतागापर्यंत अनेक अनुभव जमा झाले.
या दरम्यान कधीतरी शोध लागला की, रद्दीच्या दुकानात माझ्या आवडीची बरीच पुस्तके असतात.
अत्यंत दुर्मीळ, छपाई बंद झालेली आणि अमूल्य अशी पुस्तके रद्दीच्या दुकानात अक्षरशः कवडीमोल भावाने विकत मिळू लागली आणि माझ्या तिसर्या बॅगेचा आकार वाढू लागला. त्या रद्दीवाल्याला त्याच्याकडे असलेल्या खजिन्याचे बर्याचदा काहीही सोयरसुतक नसते, हेही कळले. अर्थात सगळेच रद्दीवाले इतके भाबडे नसतात, पण आपल्याकडे असलेल्या पुस्तकाची खरी 'व्हॅल्यू' न ओळखणारे रद्दीवाले जास्त भेटले.
धन्य ते पुस्तके रद्दीत देणारे लोक आणि धन्य तो रद्दीवाला, जो पुस्तके किलोवर विकतो. :)
हे रद्दीवाला प्रकरण कळल्यानंतर एका नवीन प्रकार सुरू झाला - जमेल तेव्हा रद्दीची दुकाने अक्षरशः पालथी घालणे. धूळ, माती आणि अत्यंत कोंदट जागेत दोन तीन तास ठसकत - खोकत - शिंकत शोधाशोध केल्यानंतर एखादे असे पुस्तक मिळून जाते की बस्स.. अशी अनेक अमूल्य पुस्तके संग्रहात जमा झाली.
आत्मचरित्रे, चरित्रे, इतिहास, क्रिकेट, राजकारण, पत्रकार असे अनेक विषय आणि अशा विषयांवरील मला सर्वाधिक आवडणारी कॉफी टेबल बुक्स यांमुळे संग्रह वाढत गेला.. इतकी पुस्तके आपण जमा का करतो हा प्रश्न कधीही पडला नाही आणि त्सुंडोकु फेजमध्ये प्रवेश केला. ;)
पुस्तके फक्त विकत घेणे. वाचायला कधी जमेल माहीत नाही, पण पुस्तक हातचे सोडायचे नाही असा प्रकार सुरू झाला. यथावकाश बॅगांचा आकार आणि नंतर संख्या वाढत जाऊन घरामध्ये खास पुस्तकांसाठी कपाट करावयाची गरज भासू लागली. एक ट्रेकर मित्र, जो पोटापाण्यासाठी किचन ट्रॉली वगैरे बनवतो, त्याच्या मागे लागून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करेल असे डिझाईन मी स्वतः तयार केले. किचन ट्रॉलीचे मजबूत चॅनल आणि जड मेटल वापरून एका कप्प्यात ४० किलो पुस्तके बसतील असे १२ कप्प्यांचे भरभक्क्म रॅकही करून घेतले.
यादरम्यान जी काही पुस्तके जमवली, त्यात फारसा काही पॅटर्न वगैरे नव्हता. पण हळूहळू लक्षात आले की आपण अनवधानाने चरित्र-आत्मचरित्रे आणि त्यातही जुन्या जुन्या क्रिकेट खेळाडूंची आत्मचरित्रे जमा केली आहेत. ही पुस्तके कधी वाचली जातील कल्पना नाही; पण माझ्या पिढीचे, मागच्या पिढीचे, त्याच्यामागच्या पिढीचे शंभर-दीडशे क्रिकेटर कपाटात विराजमान झाले. एक पुस्तक तर १९०६ सालचे आहे, ज्यामध्ये त्या पूर्वीच्या इंग्लिश खेळाडूंची माहिती दिली आहे. माझ्याकडचे क्रिकेटचे सर्वात जुने पुस्तक १८९२ साली छापलेले आहे.
पुस्तके जमा करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. "माझ्याकडे हे संग्राह्य पुस्तक आहे, पण हे तुझ्याकडे व्यवस्थित राहील" अशा भावनेने पुस्तक देणारे मित्र, "माझ्या संग्रहातली वाचून झालेली पुस्तके बिनधास्त घेऊन जा" असे म्हणणारी लीमाऊजेट, "मी इथे इथे आहे आणि हे पुस्तक समोर आहे; तुला हवे आहे का..?" असे दिवसाच्या कोणत्याही वेळी फोनवणारे मित्र, असे जवळचे लोक, तर "तुम्हाला क्रिकेटची पुस्तके लागतात तर मी ती बाजूला काढून ठेवतो" असे सांगणारे पुस्तक दुकानदार, या सर्वांनी खूप खूप प्रोत्साहन दिले.
भटकंती सुरू असताना नवीन शहरात गेले की सर्वप्रथम भेट दिली जायची ती जुन्या पुस्तकांची दुकाने आणि कुंभारवाडा. (या मातीच्या वस्तूंबद्दल नंतर कधीतरी लिहीन.)
पुस्तकांचे वेगवेगळे प्रकार कळू लागले. एकाच पुस्तकाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या वाचण्यातली मजा कळाली. आयडॉल्स, सनी डेज आणि वन डे वंडर्स असे मिळून सुनील गावसकरचे ओम्निबस पुस्तक, 'एकच पुस्तक पण वेगवेगळ्या फाँटमध्ये' असे अनेक 'सारे प्रवासी घडीचे' किंवा भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके, पुलंच्या पंचाहत्तरीनिमित्त निघालेले 'पुलं ७५' किंवा पंडित भीमसेन जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेले 'स्वराधिराज' ही पुस्तके अक्षरशः फूटपाथवर मिळाली. अशाच एका भाग्याच्या क्षणी एका दुकानातल्या धुळकट कोपर्यात स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, स्मरणे गोनिदांची, कादंबरीमय शिवकालातल्या कांही सुट्या कादंबर्या, आणि आशक मस्त फकीर अशी भारी पुस्तके मिळाली. जेआरडी टाटा, होमी भाभा यांची पुस्तके घबाड मिळावीत अशी एकदमच मिळाली.
सध्याचा दौर सुरू आहे तो पुस्तके योग्य ठिकाणी भेट किंवा वाचायला देण्याचा. पूर्वी मी पुस्तकांच्या कपाटांना कुणाला हातही लावू देत नसे. सध्या यात थोडा बदल झाला आहे. अनेक चांगली चांगली पुस्तके ज्यांना माझ्यापेक्षा जास्त उपयोगी आहेत अशा मित्रांकडे दिली जात आहेत. आर.के. लक्ष्मण यांचे 'You Said it..!' असो, इस्रायलसंबंधी काही पुस्तके त्यातल्या जाणकाराला किंवा सैन्यासंबंधी पुस्तके एका निवृत्त अधिकार्याकडे अशी 'योग्य स्थळी' पडली की खरोखरी समाधान वाटते.
एकदा सहज पुस्तके चाळताना लक्षात आले की आपल्याकडे दिग्गजांनी सह्या केलेली खूप सारी पुस्तकेही आहेत. मूळ लेखकाने त्या त्या वाचकांना ही पुस्तके भेट दिली, मात्र आश्चर्यकारकरित्या हा ठेवा रद्दी / जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळाला.
..या श्रीमंतीबद्दल खूप खूप समाधान वाटते.
माझ्या संग्रहातली स्वाक्षरी केलेली अशी निवडक पुस्तके...
१) चित्रमय स्वगत आणि कान्होजी आंग्रे - पुलं देशपांडे
२) भावीण - कविवर्य बा.भ. बोरकर
हे पुस्तक मिळाले, तेव्हा रद्दीवाल्याने मला मोठ्या आढ्यतेने "ही पुस्तके ६० रुपये किलोवाली आहेत" असे सांगितले होते.
३) ओ.पी. नय्यर
हे पुस्तक चौराकाकांना वाचायला दिले होते. परत येताना मी घेईन त्यापेक्षा जास्त काळजी घेऊन आणि कव्हर घालून आले.
४) आर.के. लक्ष्मण.
आर.के. लक्ष्मण यांची भरपूर दुर्मीळ पुस्तके मला मिळाली आहेत, याबाबत मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. एका पुस्तकात जगातल्या अनेक दिग्गजांची रेखाचित्रे आणि त्याखाली त्यांच्या सह्या छापलेल्या आहेत, एका पुस्तकात मोठे जागतिक नेते, नंतर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महत्त्वाचे नेते, खेळाडू यांची रेखाचित्रे आहेत.
५) राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन - एकनाथजी रानडे
भारतभरातील सर्वांच्या मदतीने आणि आपल्या अजोड संगटन कार्याने विवेकानंद शिलास्मारकासाठी एकनाथजींनी अनेक वर्षे अविरत कष्ट केले. मात्र त्या कार्याची अप्रत्यक्ष सुरुवात या पुस्तकाने झाली.
विवेकानंद शिलास्मारक -
६) डॉ. रघुनाथ माशेलकर (मी स्वतः प्रत्यक्ष भेटून स्वाक्षरी करून घेतलेले हे एकमेव पुस्तक.)
७) प्रभाकर जोग
८) इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स - शरू रांगणेकर
या पुस्तकात आर.के. लक्ष्मण यांची विषयानुरूप अप्रतिम रेखाचित्रे आहेत. __/\__
९) प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
१०) आनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे (हे पुस्तक भेट मिळाले आहे)
११) स्मरणे गोनिदांची - वीणा देव
१२) बी.जी. शिर्के
हे पुस्तक फक्त स्वाक्षरीसहच नाही, तर आतल्या कव्हर लेटरसह मिळाले :)
१३) एका खेळियाने - दिलीप प्रभावळकर
१४) वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
या पुस्तकाच्या दोन प्रती आहेत. एक इंग्लिश आणि एक मराठी. इंग्लिश पुस्तकात सगळे रंगीत फोटो आहेत, तर मराठी पुस्तकात सगळे ब्लॅक अँड व्हाईट.
१५) नियतीला घडवताना... - डॉ. के.एच. संचेती
१६) नेहमी प्रेरणा देणारे, नीता गद्रे यांचे 'एका श्वासाचं अंतर'. (यांचे सुपुत्र म्हणजे आपले गवि)
(रसिक वाचकांच्या कृपेने माझ्याकडे आणखीही भरपूर स्वाक्षरीची पुस्तके आहेत. वरची यादी अगदी महत्त्वाच्या पुस्तकांची आहे)
**************************************************************
हे मी येथे का सांगत आहे..? अशी अनेक अमूल्य पुस्तके आपल्या भोवताली असतात. तुम्हीही मिळवू शकता, फक्त थोडे कष्ट आणि भरपूर चिकाटी हवी, बस्स..! :)
**************************************************************
प्रतिक्रिया
14 Sep 2016 - 9:27 am | स्रुजा
सहीच ! आत्मचरित्र मला ही वाचायला आवडतात. वॉल्ट डिझ्ने चं मिळालं तर जरुर वाचा.
14 Sep 2016 - 9:53 am | मुक्त विहारि
तुम्ही पण माझ्यासारखेच वाचनवेडे दिसता...
14 Sep 2016 - 9:54 am | प्रचेतस
बराच ठेवा आहे तुझ्याकडे.
14 Sep 2016 - 9:59 am | sagarpdy
तुमच्या दिवसाला 40 तास असतात काय हो ? सायकल, ट्रेक, पुस्तके, बुलेट, खादाडी आणि अजून काय-काय! कसं जमत ?
हे पाहण्यास आवडेल, सध्या पुस्तके ठेवायला जागा नाही म्हणून खरेदी बंद आहे.
14 Sep 2016 - 10:12 am | सुबोध खरे
हा आम्हाला माहित असलेल्या मोदकाचा एक अजून पैलू दिसतो आहे.
माझ्या कडे पण मोदकने दिलेली आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची पुस्तके आहेत आणि ती मी मोठ्या अभिमानाने दिवाणखान्यात समोर ठेवली आहेत. येणार जाणारा माणूस तुम्ही त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करेपर्यंत मोठ्या आनंदाने ती वाचतो. काही लोकांनी ती पुस्तके घरी नेण्यासाठी मागितली ( (मी अर्थातच त्याला नम्रपणे नकार दिला)
बाकी तुमच्या दिवसाला 40 तास असतात काय हो ? सायकल, ट्रेक, पुस्तके, बुलेट, खादाडी आणि अजून काय-काय! कसं जमत ? हे सागर रावांचे म्हणणे मला एकदम पटले. दवाखाना आणि मिपा हे सोडून आम्हाला वेळच मिळत नाही.
14 Sep 2016 - 10:09 am | माम्लेदारचा पन्खा
आधी सायकल... आता वाचन.....आम्हाला आरशात पहायला तरी तोंड राहूदे की राव !
14 Sep 2016 - 10:13 am | अरिंजय
मोदकदादा
__/|\__ __/|\__
14 Sep 2016 - 10:14 am | भ ट क्या खे ड वा ला
तुमचा संग्रह आणि छंद दोन्ही आवडले, आणि योग्य व्यक्तीना पुस्तक देण्यातला आनंद ही घेताय. हा बदल आवश्यक आहे.
14 Sep 2016 - 10:21 am | पैसा
इतक्या मोठमोठ्या लेखकांनी स्वाक्षर्या दिलेली पुस्तके रद्दीत टाकणार्यांचा लकडीपुलावर जाहीर सत्कार करावा म्हणते. त्यात साक्षात बाकीबाब नी श्रीपाद जोशींना आणि एकनाथजी रानडे यांनी बाबाराव भिडे यांना भेट दिलेली पुस्तके रद्दीत टाकलेली बघून तर भयानक धक्का बसला आहे.
14 Sep 2016 - 10:38 am | सस्नेह
मलापण धक्का बसला !
14 Sep 2016 - 2:51 pm | प्रीत-मोहर
+१११११११
आणि मोदका __/\__ हे घे.
तुझा संग्रह असच वाढत जावो आणि तो आम्हाला वाचण्यास मिळो ही भगवंताचरणी प्रार्थना
14 Sep 2016 - 4:01 pm | महासंग्राम
त्यांनी बहुदा लकडीपुलावरूनच घेतली असावी ती पुस्तके
14 Sep 2016 - 8:28 pm | खटपट्या
हेच म्हणतो
14 Sep 2016 - 10:35 am | इरसाल
बनवलेल्या कपाटाला कुलुपाची सोय आहे का ?
कपाट कुठे आतमधे दडवलेल्या स्वरुपात नाही ना ?
आवाज न होता पुस्तक काढुन घेता येते का?
तुम्ही पुस्तकांची लिस्ट बनवली आहे काय?
पुस्तक चोरीला गेल्याचे लक्षात येण्याची काही सोय केलीय काय ?
आणी सगळ्यात म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला तुम्ही पुस्तकांच्या खोलीत थोडा वेळापुरता एकटा सोडता काय ?
14 Sep 2016 - 11:45 am | चौकटराजा
आपण मोदकाच्या घरी गेलो तरी त्याची बारीक नजर आपल्यावर असते. पुस्तके कुलूपात नाहीत .पुस्तकाचे पान हलले तरी मोदकाला कानात कुरकुर व्हायची सवय आहे. त्यामुळे एका बाबतीत तुम्हाला खरेच अपार प्रेम असल्याशिवाय तो पुस्तक तुम्हाला
वाचायला देणार नाही. देताना अनेक करार मदार तुम्हाला करावे लागतील. आपल्या लेकरांसारखे पुस्तकाना काही माणसे जपतात
त्यातील हे एक रत्न आहे बरं !
14 Sep 2016 - 10:48 am | मृत्युन्जय
एवढ्या मोठ्या माणसांची स्वाक्षरी असलेली पुस्तके लोक रद्दीत टाकतात हे बघुन खरेच वाईट वाटले. एकुणच पुस्तके रद्दीत टाकणार्यांचा रागच येतो. स्वतःला जड झाली असतील तर ग्रंथालयाला दान द्या ना सरळ किंवा रद्दीच्या किंमतीत एखाद्या वाचनवेड्याला विका तो दुवा देइल.
पुस्तके मी देक्खील विकत घेतो पण माझ्याकडे हा असा खजिना नाही. लेखकाने स्वतः स्वाक्षरी केलेली पुस्तके म्हणजे पर्वणीच राव
15 Sep 2016 - 3:29 pm | इशा१२३
+१ अनमोल खजिना आहे तुमच्याकडे.छान लेख.
14 Sep 2016 - 1:27 pm | बोका-ए-आझम
तुम्ही दिलेली दोन पुस्तकं वाचून झाली की धाड घालावी म्हणतो!
14 Sep 2016 - 4:22 pm | टवाळ कार्टा
मला बोलव मदतीला, गोणी घेउन जाउ ;)
14 Sep 2016 - 1:28 pm | पद्मावति
क्या बात है!! मस्त लेख.
14 Sep 2016 - 2:29 pm | जयन्त बा शिम्पि
वाचनाची आवड मलाही आहे. बाळपणी व किशोर अवस्थेत मराठी व हिन्दी पुस्तकांचे वाचन झाले. वडिल प्राथमिक शिक्षक असल्याने घरुनच प्रोत्साहन असायचे. वय वाढत गेले आणि नौकरीस प्रारंभ केला तसे हिन्दी व इंग्रजी पुस्तकांचे वाचन वाढले.त्यातही उर्दु लिपी शिकून घेतल्याने शेरो-शायरी व इंग्रजी कादंबर्या वाचनात येवू लागल्या. आता तर काय, इंटरनेटमुळे ' अलिबाबाची गुहा ' सापडली आहे.खंत एकच आहे, इंग्रजी काव्य वाचनाकडे म्हणावी तशी नजर गेली नाही.त्यासाठी प्रयत्न करतो, पण आकलन शक्ती कमी पडत असेल कदाचित , त्यामुळे इंग्रजी काव्य-वाचनाचा आनंद व समाधान मिळत नाही.
14 Sep 2016 - 7:32 pm | अभिजीत अवलिया
सायकल चालवत चालवत पुस्तक वाचणारे मोदकराव नजरेसमोर आले.
चांगली पुस्तके वाचणे हा तर आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग असतो. पण जी लोक वस्तूच्या किमतीवरून तिचे महत्व ठरवतात त्यांना पुस्तके रद्दीत टाकायला काहीच वाटत नाही.
14 Sep 2016 - 7:36 pm | माणदेशी
मस्त पुस्तक संग्रह. सायकलिंग, वाचन.. तुस्सी ग्रेट हो मोदक भाऊ.....!! आम्हाला एक गोष्ट धड जमत नाही, तिथे तुम्ही एवढे छंद जोपासता.
14 Sep 2016 - 7:39 pm | पिलीयन रायडर
माझ्या रेझ्युममध्ये मी छंद - वाचन असम लिहीलं होतं. आणि एका इंटरव्ह्यु मध्ये तर "वाचन हा छंद आहे पण ते काय सगळेच करतात.." असंही सांगुन आले होते.. आता मात्र "वाचन" ह्या शब्दाची व्याख्या अगदी नी ट कळालेली आहे! सगळे करतात तो निव्वळ टाईमपास असतो.. हे जे काही आहे ते मोदक स्टाईल वाचन आहे! जे काही करणार ते एकदम डिट्टेल मध्ये! व्य व स्थि त!
काय तो व्यासंग! किती ते पुस्तकांना जीवापड जपणं..! रद्दीच्या दुकानांना धुंडाळणं काय.. स्वतः कपाट बनवुन घेणं काय!!
खरंच तुझ्या दिवसाला ४० तास आहेत ना?! खर्रर्र सांग!
21 Sep 2016 - 7:03 pm | स्मिता_१३
+१११११. ___/\_____
15 Sep 2016 - 8:40 am | जॅक डनियल्स
खुप सही छंद आहे. रद्दीच्या दुकाने पालथी घातली आहे पण माझ्यात तुमच्या एवढी सहनशक्ती नसल्यामुळे ते लवकरच सोडून दिले मी. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कष्टांचा अंदाज करू शकतो ...तुमच्या कष्टाला सलाम !
15 Sep 2016 - 11:26 am | मारवा
खिन्न अर्थातच यासाठी की इतक्या मोठ्या व्यक्तींनी स्वाक्षरी करुन दिलेली पुस्तके कृतघ्नपणे रद्दीत टाकणे ते व्यक्ती थोर आहेत म्हणूनच नाही तर कोणीही व्यक्ती जेव्हा एखाद्या जिव्हाळ्याने काहीही देत असेल त्यातही पुस्तकाप्रती देतांना स्वतःच्या पुस्तकाविषयी जी एक आपुलकी असते गुंतवणुक असते तितकी विकत घेऊन एखाद गिफ्ट देण्यातल्यापेक्षा नक्कीच कुठेतरी जास्त असते. एखादा फार प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवुन एखादी डिश खायला देतो, किंवा अस काहीतरी तेव्हा ते क्लोजर टु हार्ट असते. ते घेण्यासच नकार द्यावा मग त्यापेक्षा.
हे सर्व फार खिन्न करणार आहे हा प्रकार या अगोदर मीही अनुभवलेला आहे काही नावे तर अती धक्कादायका आहेत पण ते इथे मांडायला आवडणार नाही हे ही खरे.
मात्र त्याच बरोबर दुसरा भाग हा जो पुस्तकांवर प्रेम करणारा माणुस, त्यांना जीवापाड जपणारा माणुस, व ज्या आस्थेने इतरांनी अनास्थेने फेकुन दिलेली पुस्तक गोळा करत जाणारा माणुस. ही बाब हा "ऑदर साइड" फार प्रसन्न करणारी आहे
हॅट्स ऑफ टु यु सर !!
15 Sep 2016 - 12:02 pm | पुंबा
तंतोतंत हेच म्हणतो.. अशी पुस्तके रद्दीत गेली हे त्या व्यक्तीला कळंलं तर किती वाईट वाटेल याचा विचार न करू शकणारी व्यक्ती अशा भेटींना लायक नाही.
15 Sep 2016 - 12:49 pm | इनिगोय
'भेट मिळालेली पुस्तकं रद्दीत देणारे म्हणजे कृतघ्न' असा एक सूर जो प्रतिसादामध्ये लागला आहे, त्याबाबत जरा असहमत. उदाहरणार्थ, गोनीदांची स्मरणे हे पुस्तक २००० साली विणाताईंनी भेट दिलंय. तिथून ते ग्रंथसंग्रहालयात गेलेलं दिसतंय, कदाचित 'घरी न सांभाळता येण्याइतकी पुस्तकं जमल्याने/पुस्तकं जमवणारी व्यक्तीच हयात न राहिल्याने' किंवा अशाच कोणत्याही कारणाने असू शकेल..
आणि पुढे कदाचित ग्रंथसंग्रहालयाच्या एखाद्या निष्काळजी वाचकाकडून रद्दीत गेलं असू शकेल. असं असताना पुस्तकाची भेट स्वीकारणार्याला नकळताच दोष देण्यात काहीच अर्थ नाही..
परिचयाच्या एका मान्यवर लेखक जोडप्याला भेट म्हणून आलेली काही सह्या असलेली उत्तम पुस्तकं अशाच कारणांमुळे माझ्या संग्रही आली आहेत.
थोडक्यात सांगायचं, तर पुस्तक छापल्यापासून ते रद्दीच्या दुकानापर्यंतच्या त्याच्या प्रवासात किती थांबे आणि का येऊन गेलेत, याचा अंदाज केला तर "ही पुस्तकं रद्दीत का", ही बोच किंचित कमी होईल.
6 Oct 2016 - 7:40 pm | सही रे सई
अगदी माझ्या मनातलं बोल्लात. ज्या माणसाने त्या स्वाक्षरी जमवल्या असतील तो नक्कीच ती पुस्तकं रद्दीत जाऊ देणार नाही. पण वाचनाची आवड असलेला माणूस आपल्यात राहिला नाही आणि घरात बाकी कोणालाच आवड नसेल, तर नाईलाजाने अथवा अनवधानाने ती पुस्तक रद्दीत गेली असण्याची जास्त शक्यता आहे.
अर्थात अशा वेळी ती पुस्तक वाचनालयात नेऊन देण्याचा एक चांगला पर्याय आहेच.
पण का होईना, त्या पुस्तकांना मोदकरावांसारखा वाचन वेडा माणूस मालक म्हणून मिळाल्यावर खचितच आनंद होत असणार. होय, मला तरी वाटत त्या पुस्तकांना पण मन असणार, नक्कीच.
19 Sep 2016 - 2:12 pm | भटकीभिंगरी
खुप छान लेख आणि तुमचा छन्दही.
21 Sep 2016 - 2:05 am | पिशी अबोली
अगदी अगदी. माझ्याकडेही कधी तुमच्याइतकी पुस्तके गोळा व्हावीत अशी इच्छा करायची हिम्मत या एका साधर्म्यामुळे करावीशी वाटतेय.
झकास लेख!
21 Sep 2016 - 7:06 pm | एस
क्या बात है!
6 Oct 2016 - 7:50 pm | सही रे सई
भेळ खाल्ल्यानंतर भेळेचा कागद वाचणे, वाचनालयातून घरी चालत येताना रस्त्यावरून पुस्तक वाचत येणे (..आणि कशाला तरी धडकणे..!), वाचनालयातून काल रात्री आणलेली दोन पुस्तके रात्रीतून संपवून सकाळी लगेचच सुजलेल्या डोळ्यांसह ती पुस्तके बदलायला जाणे, अशा बहुतेक सर्व पुस्तकप्रेमींच्या पायवाटेवरून प्रवास सुरू झाला.
ही सुरवातीची वाक्य वाचल्यावर वाटल की जणू माझीच स्टोरी सांगतय की काय कोणी. वाचनाची इतकी भयंकर आवड आहे की आयुष्यातील पहिली (आणि शेवटची बर का) चोरी मी मित्राकडच्या आवडलेल्या आणि त्या दिवशी घरी निघावं लागल्यामुळे वाचायचे राहून गेले म्हणून केलेली पुस्तकाची. तेही वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी केलेली. अर्थात घरी आल्यावर आणि बाबांना कळल्यावर बेदम मार पडला आणि तसचं परत जाऊन पुस्तक न वाचता परत कराव लागल.
तुमचं रद्दीची दुकान पालथी घालून दुर्मिळ पुस्तक जमवण आणि त्यांची लेकरासारखी काळजी घेणं बाकी खासचं.
तुम्ही ती पुस्तक आता दुसर्यांना वाचायला पण देता त्यामुळे तुम्हाला भेटण आता मस्ट झालं आहे.