साकेगांवचे साकेश्वर मंदिर, चिखली जवळ, जिल्हा बुलढाणा

Parag Purandare's picture
Parag Purandare in भटकंती
24 May 2016 - 2:11 pm

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपासून अंदाजे १०/१२ कि.मी अंतरावर सातगांव आणि साकेगांव ही दोन अप्रतिम प्राचीन मंदिरे असलेली गावे आहेत. आज आपण त्यातल्या साकेगांवचे साकेश्वर मंदिर बघु.


साकेगांवाच्या पश्चिमेला गावाबाहेर एका टेकडीच्या पायथ्याजवळ हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या आजुबाजुला स्थानिक शेतक-यांची शेते आहेत. मंदिर शंकराचे असुन एका मोठ्या प्रांगणात आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराचा मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा प्लॅन आहे. मंदिराचा मंडप बंदिस्त असल्याने या मंडपाला आपण गुढमंडप असे म्हणु शकतो. मंदिर व मंदिराचे शिखर हे काळ्या पाषाणात बांधलेले असुन मंदिर गुढमंडपामुळे बंदिस्त दिसते.
या मंदिराचे सर्व सौंदर्य या मंदिराच्या कळसात एकवटले आहे. या शिखराचे अमलकापर्यंतचे सर्व भाग अजुनही व्यवस्थित जागेवरच आहेत. भूमिज शैलीचे इतके सुंदर व शाबुत (Intact) अवस्थेतले शिखर बघायला मिळणे हा फारच दुर्मिळ योग आहे. गर्भग्रुहावरील शिखर व त्याला जोडुन असलेल्या अंतराळावर या शिखराच्या शुकनासिकेचा भाग असुन त्या मधे समोरच्या व दोन्ही बाजूंवर तीन तीन स्तरांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मुखमंडपावर फांसणा शैलीसारखे शिखर आहे तर मंदिराच्या मंडपावर शिखर नाही व मंडपाचे छत वरुन सपाट आहे. मंदिराचे शिखर पुर्वी कधीतरी पडलेले होते पण ब्रिटीश राजवटीच्या काळात या मंदिराच्या कळसाची मंदिर परिसरातच पडलेले अवशेष वापरुन डागडुजी करण्यात आली. ही डागडुजी इतकी उत्तम पध्दतीने करण्यात आली की कधीकाळी मंदिराचे शिखर पडले होते व ते पुन्हा बांधण्यात आले असावे याची पुसटशी शंकाही आज आपल्याला येत नाही. मात्र Henry Cousins यांच्या Medieval Temples of Deccan या १९३१ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात वापरलेल्या फोटोंमध्ये या मंदिराचे शिखर पडलेले आहे.


मंदिराची बाह्यभिंत खुपच साधी आहे. भौमितीक नक्षिकामाचा एकच पट्टा संपूर्ण मंदिराच्या तिन्हीबाजूंच्या भिंतीवर आहे. गर्भग्रुहाच्या भिंतीवर बाहेरुन तीनही बाजुंना देवकोष्ठ आहेत. या देवकोष्ठांमधील नटराज शिव, महिषासुरमर्दिनी अशा देवतांच्या मूर्ती आहेत मात्र सध्या या मूर्तींची अवस्था फारच खराब आहे.


मंदिरात गावक-यांनी अजुनही विजेचे कनेक्शन घेतलेले नाही त्यामुळे मंदिरात कायमच अंधार असतो.
मंदिर आतुनही खुपच साधे आहे. मंडपातील रंगशीळेच्या कोप-यावरील चार खांब मात्र खुप कोरीव काम असलेले आहेत. प्रत्येक स्तंभावर घटपल्लव व भारवाहक किचक आहेत. एका खांबावर गणपती भारवाहक यक्षाच्या रुपात आहे. मंदिरचा मंडप नवरंग या प्रकारात मोडतो. मंदिराचे मध्यभागावरील म्हणजे रंगशिळेवरील छत ही खुपच सुंदर कोरीव काम असलेले आहे.



हे मंदिर एकदा पहायलाच हवे व या मंदिराच्या सोबतच विदर्भातली कोथळी, बार्शी टाकळी, सातगांव व लोणार अशी बुलढाण्यातील इतर ठिकाणेही बघता येतील. चिखलीमधे गांव मोठे असल्याने रहाण्याची सोय होउ शकते.

प्रतिक्रिया

छान व थोडक्यात ओळख. फोटो दिसत नाहीत.

चांदणे संदीप's picture

24 May 2016 - 3:47 pm | चांदणे संदीप

फ़ोटो छान... खांबाचा फ़ोटो लैच आवडला आहे!

ही डागडुजी इतकी उत्तम पध्दतीने करण्यात आली की कधीकाळी मंदिराचे शिखर पडले होते व ते पुन्हा बांधण्यात आले असावे याची पुसटशी शंकाही आज आपल्याला येत नाही. मात्र Henry Cousins यांच्या Medieval Temples of Deccan या १९३१ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात वापरलेल्या फोटोंमध्ये या मंदिराचे शिखर पडलेले आहे.

हे विशेष!

अजून येऊद्या!

हे चिखली गाव म्हणजे शेगावला जाताना लागते तेच का?

Sandy

बबन ताम्बे's picture

24 May 2016 - 3:59 pm | बबन ताम्बे

सँडींना कसे काय दिसले ?

चांदणे संदीप's picture

24 May 2016 - 4:43 pm | चांदणे संदीप

आता मी सराईत झालोय!
\o/ \o/ \o/

विशेष काही नाही... फोटोंच्या लिंका आहेत ना.... त्यांच्या पावलांचा मागोवा घेत घेत गेलो आणि फोटो सापडले!

Sandy

मुक्त विहारि's picture

24 May 2016 - 4:35 pm | मुक्त विहारि

वल्लींच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...

प्रचेतस's picture

24 May 2016 - 4:47 pm | प्रचेतस

माझाही गणेशा झालाय.
पुरंदरेंचं मंदिरांवरील प्रेम माहित आहे. धागे अजून सविस्तर आणि अधिक फोटोंसकट आले तर चालतील.

प्रसाद_१९८२'s picture

24 May 2016 - 5:07 pm | प्रसाद_१९८२

छान माहिती अजून सविस्तर लिहियाला हवे होते.

या दुव्यावर फोटो दिसतायत https://flic.kr/p/G99xj5