भारताचा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. सिक्किम असं एकमेव राज्य आहे ज्याची सरहद्द भारताच्या दुसर्या एकाच राज्याशी आहे. ओके, ओके! ही क्विझ प्रोग्रॅमसाठी तयारी नव्हे. वीस बावीस वर्षांपूर्वी सिक्किममध्ये पेलिंग आणि वर्सेला गेलो होतो. म्हटलं अनुभव शेअर करावेत.
इथून ट्रेननी कलकत्ता, मग रात्रभरच्या ट्रेन प्रवासानंतर सिलिगुडी. तिथून आठ तास बस प्रवास – पेलिंग. वाचूनच दमल्यासारखं होतं खरं पण प्रत्यक्षात तसं नाही. ग्रुपबरोबर गेलं की आपल्यासारखेच बोलघेवडे आणि बोलघेवड्या बरोबर असतात. प्रवास मजेत होतो. नवीन ओळखी. नवीन गप्पा. नवीन अनुभव.
सिक्किम अगदी हिरवं कंच्चं! लोक समाधानी. आयुष्याचा वेग धीमा. स्पीड ब्रेकर नसूनही. पण बदलाचा रेटा कालांतराने सगळीकडे पोहोचतोच. पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलायची ठरवली अन् हॉटेल्स उघडण्यासाठी करांत बरीच सूट जाहीर केली. झालं! रातोरात पेलिंगमध्ये चाळीस हॉटेल्स बांधली गेली! बांधकामाचे नियम शहरी नव्हते. गावठाणाचेच. त्यामुळे दोन इमारतींच्या मध्ये अमूक जागा मोकळी ठेवली पाहिजे वगैरे विचार करण्याची जरूरच नव्हती. हॉटेल तीन मजली. पण खिडकी उघडली की शेजारच्या हॉटेलच्या खिडकीच्या तावदानाला आपटायचीच पाळी! बाकीच्या शहरांमध्ये इकडचा एफ् एस् आय् तिकडे वापरायची परवानगी द्यायला सुरवात केल्यापासून शहरांचे काय राडे झाले आहेत आपण बघतोच आहोत. असो.
मात्र हिमालय ठिसूळ पर्वत असल्यामुळे तिथे लॅन्ड स्लाइडच्या घटना बर्याच वेळा घडतात. अशा ठिकाणी इतक्या चिकटून चिकटून इमारती म्हणजे अपघाताला आमंत्रणच. हे लक्षात आल्याबरोबर सरकारी निर्णयलंबक एकदम दुसर्या टोकाला गेला. सरकारनं कोठल्याही प्रकारच्या व्यापारी (कमर्शिअल) बांधकामावर बंदी घातली. त्यामुळे आता झालय असं की दुकान औषधालाही सापडत नाही. नुसती छत्री विकत घ्यायची असली तरी दुसर्या गावाला जावं लागतं.
पेलिंगमधून जगातलं तिसर्या नंबरचं शिखर ‘कांचनजंगा’ दिसतं. शाळेत असताना सरांनी आम्हाला बिनधास्त सांगितलं होतं की ‘कांचनजंगा’ हा ‘कांचनगंगा’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात शिखर सोनेरी दिसतं म्हणून ‘कांचन’. गंगेचं नाव घ्यायला कारण थोडंच लागतं? तर्कसदृष्य (लॉजिकल) कारणं लगेच पटतात. (त्याचप्रमाणे मर्फी ही रेडियो बनवणारी कंपनी महम्मद रफी याच्या मालकीची आहे त्यामुळे त्यांची इतकी गाणी रेडियोवर लागतात, आणि जाहिरातीतला तो गुटगुटीत मुलगा म्हणजे लहानपणीचा महम्मद रफीच. हे ही मला कित्येक वर्षं खरं वाटंत होतं).
सत्य मात्र जरा वेगळं आहे. स्थानिक भाषेत त्या शिखराचं नाव आहे ‘खांग चेंड झोंगा’. याचा अपभ्रंश ‘कांचनजंगा’. मात्र कोवळं उन शिखरावर पडण्याची गोष्ट अगदी खरी आहे. ही सर्वच उंच पर्वतांना लागू पडते. सूर्योदयापूर्वीचे सूर्यकिरण प्रथम शिखरांवर पडतात. बाकीची पर्वतराजी अजून अंधारलेलीच असते. पायथ्याशी दाट धुकं असतं. त्यातून बर्फानी आच्छादलेला महाप्रचंड त्रिकोनी पहाड, गुलाबी सोनेरी रंगानी न्हाऊन निघालेला, आकाशाला भिडलेला असतो. खालच्या धुक्यामुळे त्याचा जमिनीशी संबंध तुटून तो अधांतरी तरंगतोय असं वाटतं. त्याचं वर्णन करायला माझ्याकडे एकच शब्द आहे. अवर्णनीय! प्रत्येकानी एकदा तरी जाऊनच बघावं. माझ्यासारख्याच्या पॉकेट कॅमेर्यानं त्याचा फोटो घेणं म्हणजे त्याची अवहेलनाच!
इतक्या दूरवरूनही शिखराच्या बेसुमार उंचीची कल्पना येते. पहाटे उठून गच्चीवर गेलो. ज्या क्षणी शिखर दिसलं त्याच क्षणी मनात विचार आला, “त्या अमानुष उंचीवर गिर्यारोहक चढून गेले आहेत, आणि आजही जाताहेत!” शहाराच आला. स्थानिक लोकांच्या श्रद्धेला मान देऊन गिर्यारोहक अगदी शिखरावर पाय न ठेवता पन्नास मीटर लांबच थांबतात.
पहाटेची वेळ, अगदी स्वच्छ पण कचक्या थंड हवा, हातात गरमागरम वाफाळणारा मसाला चहा, समोर कांचनजंगा, आजूबाजूला मित्रमैत्रिणींचं टोळकं आणि टंगळमंगळ करायला पूर्ण दिवस मोकळा! अहाहा. स्वर्ग म्हणतात तो हाच! (नंतर माझं मत बदललं.)
पेलिंगला दोन दिवस वेळापत्रक नसलेली भटकंती केली. शरीरातला शहरी आंबटपणा पूर्णपणे निघून गेला. तिथून गेलो भार्शे र्होडोडेन्ड्रॉन अभयारण्यात. (र्होडोडेन्ड्रॉन ही एक प्रकारची फुलं आहेत.) तिथे पोहोचल्यावर मात्र असं वाटलं की पेलिंगमध्ये घालवलेले दोन दिवस म्हणजे वेळाचा अपव्ययच झाला. पेलिंगला दिलेली स्वर्गाची पदवी काढून ती भार्शेला दिली.
पहिली गोष्ट म्हणजे भार्शेहून दिसणारं कांचनजंगा अफलातूनच! खूपच जवळून आणि आता आजूबाजूच्या पर्वतरांगाही नजरेच्या टप्प्यात येतात. पॅनोरॅमिक व्ह्यू ज्याला आपण म्हणतो.
दुसरी गोष्ट म्हणजे खुद्द भार्शे अभयारण्य. मी असं ऐकलं की याचं मूळचं नाव ‘वार्से’ असं होतं. पण बंगाली जिभेला ‘व’ आणि ‘स’ यांचा उच्चार करता येत नसल्यामुळे स्थानिक नाव ‘भार्शे’. आता ‘भार्शे’ हेच नाव प्रचलित आहे. (मात्र ही केस मर्फी रेडियोचा मालकीसारखीही असू शकेल.)
र्होडोडेन्ड्रॉन ही एक फुलांची जात आहे. खरं सांगायचं तर फुलांचं अभयारण्य ही कल्पना तशी पांचटच. मात्र तिथे गेल्यावर माझं मत अजिबात बदललं. र्होडोडेन्ड्रॉन ९००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरच व्यवस्थित फुलतात. शंभरएक चौ. कि.मी. चं अभयारण्य – आत एकही गाव नाही, रस्ते नाहीत, वीज नाही. पर्यटकांसाठी एक लाकडी डॉर्मिटरी. बस्स. हिच्याबद्दल पुढे येईलच.
आपल्यापैकी बहुतेकांचा फुलांशी प्रत्यक्ष संबंध हा बागा, हरितगृह अथवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्टेजच्या मागच्या डेकोरेशनपुरता मर्यादित असतो. हॉलंडची ‘ट्यूलिप गार्डन्स’ अन् हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ बघितल्यावर माझी अशी कल्पना की फुलांमध्ये जे काही बघण्यासारखं आहे ते मी आता बघितलं. पण वार्से म्हणजे सगळ्यांचा बाप! मैलोगणती डोंगरदर्या फुलांनी नुसत्या आच्छादलेल्या. अडतीस प्रकारची र्होडोडेन्ड्रॉन. लाल, पांढरी, गुलाबी, सॅन्ड्स्टोनच्या रंगाची, लहान, मोठी, झुडुपं, झाडं, नुसती फुलंच फुलं. अस्वलं, बिबटे, चितळ, माऊस डियर भरपूर. शिवाय अत्यंत दुर्मिळ असा लाल पांडा. एखादा दिसावा अशी इच्छा होती. पण अपेक्षा नव्हती. त्याप्रमाणे दिसला नाहीच. चालताना मोठ्यानी बोलंत किंवा एकटं असलं तर गाणं म्हणत चालायचं, म्हणजे अस्वलं आपल्याला टाळू शकतात. आपल्यासारखा शहरवासी जंगलात आंधळा असल्यासारखाच असतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी दिसलीच तरी उशीराच दिसते. अस्वलांना आपण हजर असल्याची जाणीव वेळेतच करून दिली नाही तर परिणाम वाईट (आपल्यासाठी.)
कायम सगळं ओलं ओलं. प्रत्येक पृष्ठभागावर शेवाळं वाढलेलं. सारखी घसराघसरी. (तेव्हां पडलो तरी सहज उठू शकू अशा वयाचे होतो. आता काय होईल कोण जाणे.) न चुकता रोज पाऊस पडतो. कधीकधी मुसळधार – इतका की सट्कन् छोटेछोटे पण जबरदस्त वेगाने धावणारे ओढे तयार होतात. ते धावताहेत तोपर्यंत अजिबात हालचाल करता येत नाही. थंडी तर विसरून चालणारच नाही. चुकूनही स्वतःला ओलं होवू द्यायचं नाही. नाहीतर धडगत नाही. पुण्याच्या उकाड्यात आता ही कल्पनाच करवत नाही की आम्ही त्या थंडी अन् पावसाला नावं ठेवत होतो आणि सूर्यदर्शनाला आसुसलेले असायचो!
वर उल्लेख केलेली डॉर्मिटरी तळ + पहिला मजला अशी होती. एखाद्या बॅडमिंटन कोर्टापेक्षा लहान. मस्त उबदार. संपूर्णपणे लाकडाची बांधली असल्यामुळे आतमध्ये लाकडाचा सुखावणारा मंद असा गंध. तळमजल्यावर स्वयंपाकघर, जेवणाची जागा आणि स्वच्छतागृह. वरचा मजला झोपण्यासाठी. खोल्या वगैरे नाही. एक सरळसोट हॉल. दोन्ही टोकांना काचेच्या मोठ्या खिडक्या. जमीन मस्त गुळगुळीत पॉलिश केलेल्या लाकडाची. पलंग नाहीत. जमिनीवरच ओळीत लांब भिंतींलगत गाद्या घातलेल्या. डाव्या भिंतीशी बारा – पुरुषांसाठी, आणि उजव्या भिंतीशी चौदा – स्त्रियांसाठी.
असं वाटेल की ऑफिसात नेहमी बैठं काम करणारे लोक दिवसभर खांद्याला जड हॅवरसॅक लावून मैलोगणती भटकंती झाल्यावर रात्री थकून भागून लहान बाळांप्रमाणे गाढ झोपत असतील. नाही? अजिबात नाही! गाढ झोपतात खरे, पण बाळांसारखे नाही. असे घोरतात जणु त्यांची ती ऑफिशियल ड्यूटीच आहे. एकत्रित आवाजाची कल्पनाच केलेली बरी.
त्यात दोन प्रकार. एक संथ. लयबद्ध. घर्रर्रर्रर्रर्रर्र - घेतला श्वास, फस्स्स्स्स् - सोडला श्वास. यांचा त्रास नाही. त्या लयीनीच आपल्याला झोप लागते. दुसर्या प्रकारांना आम्ही AM/FM म्हणायचो. प्रचंड मॉड्यूलेशन. सारखा व्हॉल्यूम, फ्रीक्वेन्सी आणि इन्टर्वल बदलणार. अजिबात झोप लागू देत नाहीत. यांच्या बायकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. असे चार होते. आम्ही त्यांची स्थापना शेवटच्या चार गाद्यांवर केली. पण फारसा उपयोग झाला नाही. ते चौघे डाराडूर, आम्ही जागे. मी हातात एक छडीसारखी डहाळी घेतली, त्यांच्या कडे तोंड करून उभा राहिलो. ऑर्केस्ट्राचा कंडक्टर जसा आपल्या बॅटननी संगीताचं दिग्दर्शन करतो तसं त्यांच्या घोरण्याच्या आवाजानुसार ऍक्टिंग करायला सुरवात केली. भरपूर हशा पिकला. मुलं तर हसून हसून बेजार. वाद्यवृंद मात्र अजिबात बेफिकिर!
बटाटा सोडून तिथे काही स्थानिक नाही. स्वयंपाकाच्या गॅससकट सगळं बाहेरून पाठीवरून वाहून आणावं लागतं. तरी जेवण मस्त होतं.
'नथुला'ला जायचं ठरलं होतं. ही आपली चीनशी सरहद्द आहे. पण फार बर्फ पडल्यामुळे ज्या गाड्यांच्या टायरना लोखंडी साखळ्या लावलेल्या नव्हत्या त्यांना जायला मज्जाव होता. फक्त मिलिटरीच्या गाड्या जात होत्या. आमचा चान्स हुकला. मग बर्फात हुंदडलो. इतक्या उंचीवर नीट हुंदडता देखील येत नाही. लगेच धाप लागते.
त्या भागांत फिरताना एक विचार कायम मनांत घर करून असतो. आपल्या सैनिकांचा. आपण पर्यटक तिकडे वर्षाच्या अगदी सर्वोत्तम सीझनमध्ये जातो. प्रत्येक वस्तू आपल्यासाठी रेडीमेड असते. तरी देखील बर्यापैकी हालच होतात. बाकीच्या महिन्यांमध्ये नुसतं रहाणंच कठीण, वर बांधकाम करणं, ट्रेनिंग घेणं आणि त्याहूनही लढणं हे तर कल्पनातीतच आहे. आम्ही हा प्रश्न कित्येक जवानांना विचारला. उत्तरं दोन प्रकारची होती. एक म्हणजे – कोणाला तरी हे करायलाच हवं ना, आम्ही नसलो तर चिनी आणि पकिस्तानी येतील की, अन् दुसरं – आपण ही नोकरी पत्करल्यावर त्यातल्या अडचणींबद्दल कुरकुर करण्यात काय हशील आहे?
‘भारतीय नागरिकाचा, घास रोज अडतो ओठी ।
सैनिकहो तुमच्या साठी, सैनिकहो तुमच्या साठी ॥
या गाण्याची आठवण होते आणि भरून येतं. मला सैनिकांबद्दल प्रचंड आदर आहे. जरा कल्पना करा, चीन आणि पाकिस्तान अब्जावधी रुपये खर्च करून समोरच्या सैनिकाला कसं मारता येईल याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतंय हे माहीत असून ही करियर निवडायची म्हणजे कसलं वाघाचं काळीज लागत असेल !
परतताना दार्जीलिंगमार्गे आलो पण मुद्दामच दार्जीलिंगला बगल देऊन तिथून चाळीस कि.मी. वर जंगलात असलेल्या एका लॉजमध्ये राहिलो. पक्ष्यांचं नंदनवनच ते. माझं आणि शुभदाचं पक्ष्यांबद्दलचं अज्ञान अफाट आहे. तरी देखील तिथून निघेपर्यंत आमच्यातल्या पक्षिमित्रांच्या मदतीनी काही पक्षी आणि त्यांचे आवाज आम्हाला ओळखता येऊ लागले. (यांना ‘आवाज’ म्हणायचं नाही. ‘कॉल’ म्हणायचं. आम्ही ‘आवाज’ म्हटलं की पुढची पिढी गालातल्या गालात हसायची. पण आम्हाला काही ‘कॉल’ म्हणवायचं नाही. कारण आमच्या लहानपणी टॉयलेटला लागली की ‘कॉल आला आहे’ असं म्हणायची पद्धत होती.)
काही पक्षी फुलातल्या मधुसाठी येतात, काही फळांसाठी तर काही त्यावरच्या किड्यांसाठी. निसर्गाच्या रचनेत प्रत्येक प्राणीमात्राची, वनस्पतीची, इतकेच काय दगडांची देखील विशिष्ट अशी जागा आहे. अनेक वाद्यांचा जसा सुरेल फिलहार्मॉनिक ऑर्केस्ट्रा असतो तसा निसर्ग आहे. खरं तर मनुष्याची लायकी त्याचा डोअरमन होण्याची देखील नाही. मात्र आज आपण या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर होऊन बसलो आहोत. एक एक वाद्य बंद पडत चाललं आहे. मात्र आपल्या ते लक्षात देखील येत नाही कारण आपण कानांत बोळे कोंबून घेतले आहेत अन् डोळे मिटून घेतले आहेत. हळूहळू सगळंच संगीत बंद पडेल तेव्हां एखादेवेळेस आपले डोळे उघडतील, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल.
प्रतिक्रिया
3 May 2016 - 2:29 pm | विजय पुरोहित
आहा... झकास लेख. एका अगदी अपरिचित राज्याविषयी छान माहिती दिलीत. पण फोटो पाहिजे होते. जास्त प्रभावी वाटेल.
rhododendron या फुलांविषयी फास्टर फेणेच्या पुस्तकात वाचलं होतं लहानपणी. त्याची आठवण झाली.
चीन आणि पाकिस्तान अब्जावधी रुपये खर्च करून समोरच्या सैनिकाला कसं मारता येईल याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतंय हे माहीत असून ही करियर निवडायची म्हणजे कसलं वाघाचं काळीज लागत असेल ! +१११
3 May 2016 - 2:39 pm | उल्का
विचार मंथन युक्त अनुभव कथन एकदम सुरेख!
3 May 2016 - 2:54 pm | जव्हेरगंज
सुंदर!
फोटो टाकले असते तर अजून मजा आली असती !
3 May 2016 - 3:07 pm | मानसी१
सुरेख लेख. पण फोटो टाका प्लिज्.
3 May 2016 - 3:18 pm | बरखा
लेख छान आहे , पण फोटो टाकले तर अजुन आवडेल.
3 May 2016 - 3:27 pm | कंजूस
खासच.इनो घेऊन टाकतो.
3 May 2016 - 3:41 pm | नाखु
बोट धक्क्याला लावल्याचा राग दूर पळाला.. देशातच इतकी ठिकाणे आहेत की एका जन्मात नीट पहाता येणार नाहीत. सैनिकांबद्दल काय बोलणार?
ते आहेत म्हणून देश अभेद्य आहे, तुकड्यातुकड्यात वाटणीसाठी (राज्ये नाही/जात,धर्म या अर्थाने) जनता आणि राजकारणी अहोरात्र झटताहेत.
पंखा नाखु
3 May 2016 - 3:43 pm | यशोधरा
ताज्या हवेच्या झुळुकीसारखा लेख! धन्यवाद!
सध्या मिपावर अशा सहज सुंदर लेखांची गरज आहे.
3 May 2016 - 3:53 pm | एस
शेवटचा परिच्छेद खास आवडला. बाकी कंजूससाहेबांप्रमाणे आम्हीही इनो घेतलं आहे! :-)
3 May 2016 - 4:13 pm | संजय पाटिल
कंका आणि तुमच्या पेक्षा मैंयानां इनो ची जास्त गरज असावी असे वाटते..
3 May 2016 - 4:11 pm | मधुरा देशपांडे
फार सुंदर. आवडलं.
3 May 2016 - 4:11 pm | संजय पाटिल
छान लेख..
फोटो प्रतिसादात टाकता येतात का बघा..
3 May 2016 - 4:14 pm | प्रचेतस
नितांतसुंदर शैलीत लिहिलेलं प्रवासवर्णन. इतकं सुरेख की छायाचित्रांची गरजच नाही.
3 May 2016 - 4:18 pm | मृत्युन्जय
झक्क्कास लेख. फोटो असले असते तर अजुन बहार आली असती,
3 May 2016 - 4:29 pm | प्रमोद देर्देकर
अरे वा पुढील आठवड्यात १३ मे ला मी दार्जिलींग, आसाम असाच दौरा करणार आहे तुमचा लेख मार्ग्दर्शक ठरेल बहुतेक.
3 May 2016 - 4:42 pm | तुषार काळभोर
असा पहिला विचार मनात येऊन (मनातल्या मनात) नाक मुरडलं. पण तुमच्या लेखनाने फोटोंची उणीव भासू दिली नाही.
पेलींगमधून कांचनजुंगा असा काहीसा दिसत असेल नाही..
5 May 2016 - 7:02 pm | पुंबा
आहा!!
3 May 2016 - 4:51 pm | मुक्त विहारि
फोटो मात्र हवे होते.
3 May 2016 - 5:19 pm | मितान
सुंदर !!!
3 May 2016 - 5:30 pm | चिनार
छान लेख !!
काय सांगू राव , सिक्कीमला मधुचंद्रासाठी जाणार होतो. जायच्या एक दिवस आधी काही अपरिहार्य कारणामुळे
ट्रिप रद्द करावी लागली. पैश्याचे नुकसान तर झालेच वरून मनस्ताप ! त्यानंतर अजून तरी जाणे झाले नाही.
कोणीही सिक्कीमला जातंय असं कळलं की आई शप्पथ लय राग येतो !
कृ. ह. घ्या.
3 May 2016 - 5:37 pm | त्रिवेणी
आई शप्पत.मस्त धागा. मी चालले आहे या दहा तारखेला कालिम्पोंग,पेल्लिंग,गंगटोक आणि दार्जिलिंग.
सध्या नेटवर मिळेल ती माहिती वाचत आहे तर आता घरचाच् धागा आला.
3 May 2016 - 5:44 pm | अजया
मीही असंच वीस बावीस वर्षापूर्वीचं निरागस सुंदर सिक्किम बघितलंय.तुरळक हाॅटेल्स अप्रतिम निसर्ग.हिरवाई आणि हिमालय!
र्होडेडेंड्राॅनचे सरबत अतिशय छान लागते.रक्तदाबावर पण ते गुणकारी असते म्हणतात.तिथे मिळाले तर जरुर घ्या.नैनीतालला पण हे सरबत मिळते.आपल्याइकडे कधी पाहिले नाही.
3 May 2016 - 7:24 pm | नुस्त्या उचापती
विशेष बाब म्हणजे सिक्कीमचे राज्यपाल आपले मराठमोळे सातारा जिल्हयातील श्रीनिवास पाटिल आहेत .
3 May 2016 - 10:42 pm | पैसा
सुंदर लिहिलंय
3 May 2016 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखनशैलीतील अप्रतिम लेख !
फोटो टाकाच. सिक्कीम आणि फोटो शिवाय म्हणजे भौत जादती है भाय.
हा भागच पाहताक्षणी प्रेमात पडावा असा आहे. कॅलिंगपाँगला गेला होतात का ? निसर्गसौंदर्याचा खजिना आहे तो भाग !
खरं तर मनुष्याची लायकी त्याचा डोअरमन होण्याची देखील नाही. मात्र आज आपण या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर होऊन बसलो आहोत. एक एक वाद्य बंद पडत चाललं आहे. मात्र आपल्या ते लक्षात देखील येत नाही कारण आपण कानांत बोळे कोंबून घेतले आहेत अन् डोळे मिटून घेतले आहेत. हळूहळू सगळंच संगीत बंद पडेल तेव्हां एखादेवेळेस आपले डोळे उघडतील, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल.
याला १०० वेळा सहमती आणि लेखनासाठी टाळ्या !
4 May 2016 - 12:39 am | आनंदयात्री
लेख आवडला, शेवटचे ललित खासच!
4 May 2016 - 6:41 am | रेवती
क्या बात है! लेख आवडला.
4 May 2016 - 10:03 am | पियुशा
मस्त !
4 May 2016 - 11:34 am | स्वीट टॉकर
सर्वजण,
अतिशय धन्यवाद!
ज वळजवळ प्रत्येक प्रतिसादात फोटोंची मागणी आहे आणि मी फोटो न टाकण्याबद्दल अतिशय अतिशय दिलगीर आहे. पण इलाज नाही. माझ्याकडे एकही फोटो नाही. याचं कारण म्हणजे माझं फोटोंबद्दलच मत.
उत्तम फोटोग्राफर्स उजेड, सावली, रंग, एक्स्पोझर वगैरेचा अभ्यास करतात, आणि क्लासिक फोटो काढतात. ते उन्हापावसात आपल्या कॅमेर्याची उत्तम काळजी घेतात, त्यांचा कॅमेरा देखील चांगल्या प्रतीचा असतो. अशा सुरेख फोटोंची मजा माझ्यासारखे पामर घेतात.
पैलवानांनी कांचनजंगाचा सुरेख फोटो टाकला आहे. तसे माझ्याकडे दुर्दैवाने नाहीत.
मी काढलेले फोटो म्हणजे 'रेकॉर्ड स्नॅप्स'. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी ही मध्यवर्ती पात्रं. शांतपणे उभं राहिलं तर कांचनजंगालाही फोटोत जागा देतो. मिपावर टाकण्याच्या लायकीचे नाहीत.
शिवाय तेव्हां डिजिटल फोटोग्राफी नव्हती. मोजकेच फोटो घेतले जायचे. त्यामुळे 'आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला!' अशी स्थिती.
बोटीवरच्या नोकरीमुळे मी जरी चिकार भटकलो असलो तरी पर्यटनाबद्दलचं माझं मत जरा वेगळं आहे. पंधरा दिवसात त्याबद्दलचा लेख टाकीन.
कंजूस - इनो घेऊन टाकतो. याचा अर्थ काय?
चिनार - कोई बात नही. एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानी ट्रिप अरेंज करून सौंना सर्प्राइज द्या!
नाद खुळा - बोट धक्क्याला लावलेली नाही. 'बोटींवरच्या लोकांची व्यसनं' यावर लेखन चालू आहे. झालं की टाकीन.
4 May 2016 - 11:40 am | गामा पैलवान
स्वीटॉ, सिक्कीमचं प्रवासवर्णन वाचून जी जळजळ झालीये तिच्यावर उतारा म्हणून इनो घेताहेत ते. (बरोबर ना, कंजूस?)
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 4:22 pm | मेघना मन्दार
सुरेख लिखाण !!
4 May 2016 - 4:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्वीट टॉकर सर,
लेख लैच फर्मास झालाय! आमच्या सिक्किमच्या आठवणी ताज्या झाल्या बघा
आपली परवानगी असल्यास आपल्या ह्या हस्तटंकित ताजमहालास आम्ही २ चार फ़ोटो रूपी वीटा लावु इच्छितो
4 May 2016 - 5:17 pm | टुकुल
अतिशय सुंदर अनुभव आमच्या बरोबर शेयर केल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद.
--टुकुल
5 May 2016 - 9:44 am | स्वीट टॉकर
सोन्याबापू - नेकी और पूछ पूछ ! अगदी जरूर तुमचे फोटो टाका! तुमच्या सैनिकी जीवनात तुम्हाला तिथे राहाण्याची संधी मिळाली असेल ना?
सर्व मिपाकरांना जाहीर निमंत्रण आहे. तुमच्या फोटोंचे कायमच इथे स्वागत आहे.
5 May 2016 - 8:21 pm | आर्बि२३९९
पडत्या फळाची आज्ञा मानुन फोटो टाकत आहे… आजवर सिक्कीम ला दोन वेळा जाणे झाले आहे त्याचे काही फोटू :
सिक्कीम किंवा पुंर्ण नॉर्थ इस्ट फ़ारच सुंदर प्रदेश आहे पण काश्मीर,हिमाचल किंवा लदाख एवढे glmaour नाही आहे ही एक खंत मात्र आहे !
गुरुडोंग्मार लेक नॉर्थ सिक्कीम (१७८०० ft ):
लाचेन , नॉर्थ सिक्कीम:
कांचन जंगा ,पेल्लिंग :
नामची:
5 May 2016 - 5:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्वीटटॉकर सर, होय तिकडे होतो काही दिवस काही गंमत जम्मत फोटो आहेत ते जरा शोधून मग डकवतो इकडे! :)
5 May 2016 - 7:02 pm | पुंबा
सिक्किम आणि एकुनच पुर्व आणि ईशान्य भारताला भेट देणे हे माझे किती तरी दिवसांपासुनचे स्वप्न आहे. आपला हा धागा वाचताना ती सगळी भटकंती करतोय असा फील आला. धन्स. एक शंका म्हणजे सिक्किम आणि भुतान अशी ट्रीप करायची असल्यास किती दिवस लागतील?
5 May 2016 - 8:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
(गंगटोक शहराचे दृश्य गंगटोक रोपवे मधुन)
(शिस्त ही पहाड़ी जीवनाचा अविभाज्य भाग)
(आमच्या हापिस ला जायचा रस्ता)
(हे आमचं हापिस बिल्डिंग)
(हे हेड हापिस इथं किती तरी दशकात कोणीच गेलेलं नाही)
(हापिसातला आमचा फ्लोर)
(ह्याला काय म्हणावे? लॉबी म्हणू ब्वा हापिसची)
(आपल्याकडे दर काही अंतराला शेंदुर फासलेले दगड असतात त्याचे हे सिक्किमीज बंधू. थांग का , हा ध्वज जितके वेळ फड़फड़ करेल तितका जप तो बांधणाऱ्याच्या खात्यात जमा होतो म्हणतात)
5 May 2016 - 8:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार संपादक मंडळ! सारखे लाड करता तुम्ही लोकं आमचे ! उत्तम फोटो दिसायला किमान रेसोलुशन कसे एडजस्ट करावे हे एकदाच समजवुन सांगा न प्लीज परत तुम्हास तोषीस देणार नाही. आम्ही पडतो भिडस्त सारखे आपणा महानुभाव मंडळीला त्रास देणे बरे वाटत नाही
5 May 2016 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
"जातिच्या सुंदराला अजून काही फार लागत नाही" असेच मस्तं फोटो आहेत तुमचे. फक्त रूंदी कमी करून लेखनाच्या चौकटीत आणले आहेत, इतकेच !
मिपावर चित्रे टाकण्याची कृती या दुव्यातिल पायर्यांचा उपयोग केल्यास चित्रे चौकटीत योग्य रितीने बसातिल व उत्तम रिझॉल्युशनमध्ये दिसतिल.
5 May 2016 - 9:14 pm | कैलासवासी सोन्याबापु
खरंय अगदी ! तुम्ही तिथे एक शॉर्टकट सांगितला होतात तो म्हणजे नुसती फोटोची लिंक द्यायची अन रेसोलुशन मोकळे ठेवायचे :D :D मी तोच मार्ग चोखाळला :D :D अन हे फोटो मोठे झाले ! आता परत एकदा धागा वाचतो अन सुधरतो ! आभार परत एकदा :)
5 May 2016 - 10:19 pm | प्रीत-मोहर
सुंदर लेख स्वीट टॉकर काका
बापुसाहेब __/\__
एक कडकडीत सॅल्युट
6 May 2016 - 6:14 am | अर्धवटराव
हे असलं सगळं भारतातच असताना कशाला युरोपात जायचं भटकायला. जन्नत है भाई.
6 May 2016 - 10:08 am | स्वीट टॉकर
पैलवान, आर्बी आणि सोन्याबापू - तुमच्या फोटोंनी धागा अगदी worth झाला! सगळ्यांना धन्यवाद.
"हापिसातला आमचा फ्लोर" :)
हेड हापिसाच्या फोटोत कसला रोरावणार्या वार्याचा फील आहे !!!
सौरा - माझी माहिती फारच जुनी. त्यावर अवलंबून तुम्ही काहीही योजना आखणं धोक्याचं होईल. त्यामुळे माहितीऐवजी माझ्या शुभेच्छा तुम्हाला देतो. मात्र एक मी सुचवू इच्छितो. अशा ठिकाणी फक्त आपली फॅमिली किंवा मित्रांचा छोटासा ग्रुप करून जाण्यापेक्षा यातले जे जाणकार आहेत, उदा पुण्यात फॉलिएज, पग मार्क्स इत्यादी यांच्याबरोबर जावं. मुंबईला देखील असे बरेच ग्रुप्स असतील. हल्ली आंतरजालावर शोधणं सोपं आहे. एक म्हणजे ते तिथे पुन्हा पुन्हा गेलेले असतात आणि दुसरं म्हणजे आपल्या सारखीच आवड असणारे पण वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले निसर्गप्रेमी आपल्याला भेटतात त्यामुळे ट्रिपला जास्त मजा येते.
6 May 2016 - 11:57 am | पुंबा
आभारी आहे. अरे तुरे केलत तर अधिक आवडेल.. :-)
6 May 2016 - 10:28 am | कैलासवासी सोन्याबापु
स्वीट टॉकर सर, ते हेडहापीस म्हणजे कंचनजंगा (खांग चेंड झोंगा) आहे बरंका ७० च्या दशकात फू दोरजी तिकडे चढ़ाई करायला गेलते पण परत आलेले नाहीत अद्याप, बॉडी सुद्धा सापडली नाही, जातिवंत प्रस्तरारोहक अन गिर्यारोहक माणसाला यावी अशी शहादत आली असावी त्यांसी, ईश्वर अन गुरु रिम्पोछे त्यांच्या आत्म्यास शांती देवो, कंचनजंगा जगातले तीसरे उंच असेल पण चढ़ाईला एवेरेस्ट अन गॉडविन ऑस्टिन उर्फ़ के२ चा बाप आहे. अजुनही कोणी सर केलेला नाही कित्येक वर्षात पर्वतांचा देव नगारु नाराज होत असावा बहुदा त्याला मानवी पाय लागल्यामुळे.
6 May 2016 - 4:56 pm | स्वीट टॉकर
सौरा - मान्य! अरे तुरे.
सोन्याबापु - फु दोरजींबद्दल आंतरजालावर वाचून अचंबित झालो आणि वाईटही वाटलं. ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट?!!!!!!
अमानवीय फिटनेस लागत असेल! आणि आत्मविश्वासदेखील!
6 May 2016 - 7:02 pm | कवितानागेश
मस्त लेख.