✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

प
पुणे मुंग्रापं यांनी
Mon, 05/02/2016 - 11:25  ·  लेख
लेख
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री. बिंदुमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके (कार्यकर्त्यांचे बाबूजी), पत्रकार पां. वा. गाडगीळ, नगरसेवक मधु मंत्री अशा अनेकांचा समावेश होता. मुळात अशा अभिनव वितरण व्यवस्थेची कल्पना पुण्यात बिंदुमाधव जोशी यांनी सुमारे एक वर्षापूर्वी अंमलात आणलेली होती. या वितरण व्यवस्थेत काही पथ्ये सुरवातीपासून आजतागायत पाळली जात आहेत. उदा. शक्यतो छोट्या उत्पादकांकडून व ते न जमल्यास घाउक बाजारातून मालाच्या दर्जाशी तडजोड न करता खरेदी; कोठेही दुकान न काढता, सदस्यांकडून आगाऊ घेतलेल्या मागणीइतकीच खरेदी करून मालाचे वेळापत्रकानुसार नियमित वितरण; नफा घ्यायचा नाही पण तोटाही होऊ द्यायचा नाही; स्वदेशनिष्ठा, स्वावलम्बन, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्त भावना या ग्राहक चळवळीच्या तत्वांचे पालन इ. सुरवातीला दरमहा १० वस्तूंचे वितरण करणारी संस्था आज ९५ ते १०० वस्तूंचे आणि वर्षाकाठी ४५० ते ५०० विविध वस्तूंचे वितरण करते. मुंबई, पुणे, वसई -विरार, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरीपर्यंतचे सुमारे ३६००० ग्राहक या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. एप्रिल २०१२ पासून पुण्यामध्ये वितरणाचे काम सुरु झाले ते पाषाणमधील 'पुणे प्रारंभ ' या संघापासून ! किमान ११ सभासदांचा एक संघ असे ६५ संघ कोणत्याही जाहिरातिशिवाय आज पुण्यात वितरणात सहभागी झाले आहेत आणि सदस्य संख्या १२०० पर्यंत पोहोचली आहे. हा सर्व व्याप सांभाळण्यात विशेषतः वितरणासाठी करावयाच्या खरेदीत महिला कार्यकर्त्या आघाडीवर आहेत! वितरण हा संस्थेचा पाया असला तरी ग्राहकांना संघटित करण्याचे ते माध्यम असून ग्राहक, उत्पादक, व्यापारी या सर्वांचे हित साध्य करणारी सक्षम ग्राहक चळवळ बांधणे हे संस्थेचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी ग्राहक शिक्षण, ग्राहक संरक्षण, संघटन, संशोधन इ. विभाग विविध उपक्रम करीत असतात. शाळा/महाविद्यालये, सामाजिक संस्था अशा ठिकाणी शिबिरे, व्याख्याने, पथनाट्ये, वृत्तपत्रातील स्तंभ व प्रासंगिक लेखन, आकाशवाणी, दूरदर्शन वरील कार्यक्रम, 'ग्राहक तितुका मेळवावा' हे संस्थेचे मुखपत्र इ. विविध माध्यमांचा उपयोग ग्राहक प्रबोधनासाठी कार्यकर्ते करतात. तसेच जागृत ग्राहकांना आपल्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दहा मार्गदर्शक केंद्रे ठिकठिकाणी कार्यरत आहेत. बहुसंख्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मोहिमाही केल्या जातात. रिक्षांसाठी इलेक्ट्रोनिक मीटर्स बंधनकारक होणे किंवा अगदी ताजे उदाहरण द्यावायचे तर प्रस्तावित डाळ दर नियंत्रण कायदा हे मुंबई ग्राहक पंचायतीच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. ग्राहक संरक्षण कायद्याचा अधिक लाभ ग्राहकांना मिळावा म्हणून केलेल्या विविध प्रयत्नात लोहिया मशिन्स या कंपनीविरुद्ध संस्थेने केलेल्या व देशांतील सुमारे चार लाख ग्राहकांना रु.४० कोटी नुकसान भरपाई मिळवून देणाऱ्या तक्रारीने इतिहास घडवला आहे. याखेरीज अनुचित व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरुद्ध कारवाई, सणासुदीपूर्वी ग्राहक पेठांचे आयोजन, ग्राहक हक्कांना युनोची मान्यता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले कार्य इ. यशस्वी उपक्रमांचा वानगीदाखल उल्लेख करावासा वाटतो. गेल्या ४१ वर्षात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने केलेल्या कार्याचा आढावा या अनुदिनीच्या शब्द मर्यादेत घेणे अशक्य आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. गंगाधर गाडगीळ यांनी या कार्याचे वर्णन "मुंग्यांनी रचलेला मेरु पर्वत" या शब्दात केला यातच सर्व आले! संस्थेबद्दल अधिक जाणून घेण्याची किंवा ग्राहक हिताय ग्राहक सुखाय कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे. छाया वारंगे (खरेदी समिती प्रमुख व कार्याध्यक्षा पुणे विभाग) मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
3458 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

या मेरूपर्वताएवढ्या

एस
Mon, 05/02/2016 - 11:52 नवीन
या मेरूपर्वताएवढ्या कार्याबद्दल अभिनंदन. स्पृहणीय संघटन.
  • Log in or register to post comments

I would like to become member

NiluMP
Mon, 05/02/2016 - 18:57 नवीन
I would like to become member of मुंबई ग्राहक पंचायत, in mumbai. Could you pls gv me address and contact person name.
  • Log in or register to post comments

मुंबईत आपण कोणत्या भागात

पुणे मुंग्रापं
Tue, 05/03/2016 - 10:20 नवीन
मुंबईत आपण कोणत्या भागात राहता त्याप्रमाणे संपर्क कळविता येईल. मुंबई ग्राहक पंचायतीचे ग्राहक भवनात सर्व माहिती मिळू शकेल. Mumbai Grahak Panchayat Grahak Bhavan, Sant Dnyaneshwar Marg, Behind Cooper Hospital, Vile Parle (West), Mumbai 400 056, INDIA Contact : 022-26281839 / 022-26209319. Fax : 022-26250916. E-mail : mgpanchayat@yahoo.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

Thanks for reply

NiluMP
गुरुवार, 09/01/2016 - 22:42 नवीन
Thanks for reply
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुणे मुंग्रापं

टाळ्या!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 10:27 नवीन
टाळ्या!
  • Log in or register to post comments

चाळीस वर्षांपूर्वी मी एक

सुधारक
गुरुवार, 09/01/2016 - 21:29 नवीन
चाळीस वर्षांपूर्वी मी एक स्वयंसेवक म्हणून या चळवळीत सामील झालो होतो. तेव्हा आम्ही तरूण एक ट्रक घेऊन दाणा बंदर भागात जायचो. गहू, डाळी, साखर, तेल वगैरे सामान भरून दादरला बालमोहन शाळेत आणून वजन करून वेगवेगळ्या संघांना पोहोचवायचे काम करायचो. तेव्हा एका वेगळ्या दुनियेची ओळख झाली. या अनुभवाची शिदोरी पुढच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगी पडली.
  • Log in or register to post comments

मग माझ्या काही प्रश्नांची

आदूबाळ
गुरुवार, 09/01/2016 - 21:37 नवीन
मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकाल काय? बऱ्याच वेळा विचारूनही हा आयडी चालवणारे लोक काही उत्तरं देईना झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधारक

अनुत्तरित प्रश्न

नमकिन
Sat, 09/03/2016 - 10:26 नवीन
इथे जाहिरातबाजी होतेय. तळमळीने विचारलेल्या मार्गदर्शनपर प्रश्नांकडे दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मी रत्नागिरी संघात सभासद आहे

अनन्न्या
Fri, 09/02/2016 - 18:56 नवीन
मागणीपत्र ऑनलाईन भरण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत का? सध्या रत्नागिरीला रायगड वितरण केंद्रातून पुरवठा केला जातो. ऑनलाईन मागणीपत्राव्दारे रत्नागिरी विभाग मुंबई केंद्राशी जोडला जाऊ शकतो का? बय्राचदा मागणी केलेल्या वस्तू ज्या मुंबईतील सभासदाना उपलब्ध होतात, त्या न उरल्याने कॅन्सल होतात. त्यामुळे काही चांगल्या वस्तू आमच्यापर्यंत येत नाहीत. मुंबईस्थित नातलगांमुळे तीच वस्तू तिकडे मिळाल्याचे कळते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा