==========================================
भाग १ - प्रंबानन मंदिर संयुगे - जावा (इंडोनेशिया)
भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)
भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)
==========================================
भाग ४ - पशुपतीनाथ मंदिर, काठमांडू (नेपाळ)
नेपाळची राजधानी काठमांडू येथील श्री पशुपतीनाथ मंदिर हिंदूधर्मियांचे एक अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवाचा (पशुचा) स्वामी, भगवान पशुपतीनाथ (शिवशंकर) हे नेपाळचे राष्ट्रीय दैवत मानले जाते. पवित्र बागमती नदीच्या काठावर असणाऱ्या या मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आणि आश्रम आहेत. युनेस्कोने या मंदिर परिसराला जागतिक वारश्याचा (World Heritage Site) दर्जा प्रदान केला आहे. महाशिवरात्रीच्या वार्षिक महासोहळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक पशुपतीनाथ मंदिराला भेट देतात.
भारतात असणाऱ्या १२ ज्योतिर्लिंगांना भगवान शंकरांचे शरीर तर नेपाळमधील पशुपतीनाथाला मस्तक मानले जाते.
मंदिराचा इतिहास
मंदिर उभारणीच्या कालखंडाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी नेपाळ महात्म्य आणि हिमवतखंड या प्राचीन ग्रंथांमध्ये मंदिराचा उल्लेख आढळतो. यावरून अंदाज केल्यास ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी मंदिर अस्तित्वात असावे.
१५ व्या शतकादरम्यान पशुपतीनाथ मंदिर वाळवी लागून मोडकळीस आले होते. राजा सुपुष्प याने मंदिराचे पुनर्निर्माण केले. गेल्या अनेक शतकांमध्ये मंदिर परिसरात मुख्य मंदिराबरोबरच अनेक मंदिरे बांधली गेली. ११ व्या शतकातील श्री गुह्येश्वरी आणि राम मंदिरांचा यात समावेश होतो.
मंदिराच्या आख्यायिका
पशुपतीनाथ मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यात पुढील दोन आख्यायिका विशेष प्रसिध्द आहेत,
१. सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनु गाय चंद्रवन पर्वतातील एका गुहेत राहत असे. रोज सकाळी बाहेर जाऊन एका विशिष्ठ ठिकाणी ती आपल्या दुधाने अभिषेक करत असे. दहा हजार वर्षे हा नित्यक्रम चालू होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याजागी खोदले असता त्यांना तेथे शिवलिंग सापडले. तेच पुढे पशुपतीनाथ नावाने प्रसिध्द झाले.
२. देवलोक आणि कैलासाला कंटाळून भगवान शंकर एकदा बागमती नदीकाठच्या जंगलात काळवीटाच्या रुपात लपून बसले. देवलोकात काळजी पसरली. देवांनी भगवान शंकरांचा शोध सुरु केला. अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर त्यांना काळवीटाच्या रुपात लपून बसलेले भगवान शंकर सापडले. त्यांच्या शिंगांना धरून त्यांच्या मूळ रुपात आणण्याच्या प्रयत्नात एक शिंग तुटले. याच शिंगाची शिवलिंग म्हणून पूजा होऊ लागली आणि ते भगवान पशुपतीनाथ म्हणून प्रसिध्द झाले.
मंदिर परिसर
पशुपतीनाथ मंदिर परिसर २६४ हेक्टर जागेवर पसरला असून या परिसरात वैश्य आणि शैव परंपरांची ५१८ मंदिरे आहेत. यामध्ये खालील काही महत्वाच्या मंदिरांचा समावेश होतो,
- श्रीराम मंदिर
- गुह्येश्वरी मंदिर
- विराटस्वरूप मंदिर
- वासुकीनाथ मंदिर (देव आणि दानवांनी वासुकी नागाचा वापर समुद्रमंथना करता केला होता)
- उन्मत्त भैरव मंदिर (भैरव हा भगवान शंकरांचा अवतार मनाला जातो)
- सुर्यनारायण मंदिर
- कीर्तिमुख भैरव मंदिर
- हनुमान मदिर
- आणि १९७ इतर शिवलिंगे
मुख्य मंदिराचे स्थापत्य
पशुपतीनाथ मंदिराचे बांधकाम नेपाळी पॅगोडा पद्धतीचे असून मंदिरात सुरेख कोरीव काम असणाऱ्या लाकडाच्या तुळया आहेत. तांबे आणि सोन्याच्या पत्र्यांवर रेखीव काम असणारे छत दोन मजली आहे. मंदिराचा कळस सोन्याचा असून जमिनीपासून त्याची उंची सुमारे २४ मीटर आहे. मुख्य मजल्यावर मंदिराचा गाभारा असून तेथे शिवलिंग स्थापित केलेले आहे.
मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या भागावर भगवान शंकर, पार्वती, गणेश, राम-लक्ष्मण-सीता, इतर देवादिक आणि अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
पशुपतीनाथ शिवलिंग
मंदिरातील सुमारे १ मीटर उंचीच्या दगडी शिवलिंगावर पाच चेहरे कोरलेले आहेत. या चेहऱ्यांचे महत्व पुढील प्रमाणे आहे,
१. दक्षिण दिशा: भगवान शंकराच्या अघोर रूपाचे प्रतिक असणारा हा चेहरा दक्षिणेला असणाऱ्या रामेश्वारचे प्रतिक मानले जाते.
२. पूर्व दिशा: जटाधारी तत्पुरुषाचे हे मुख पूर्वेला असणाऱ्या जगन्नाथाचे प्रतिक मानले जाते.
३. उत्तर दिशा: अर्धनारीनटेश्वराचे हे मुख उत्तरेला असणाऱ्या बद्रिनाथाचे प्रतिक मानले जाते.
४. पश्चिम दिशा: वरुणरुपी भगवान शंकराचे हे मुख पश्चिमेला असणाऱ्या द्वारकाधीशाचे (कृष्ण) प्रतिक मानले जाते.
५. ऊर्ध्व दिशा: कळसाकडे पाहणारे पाचवे मुख भगवान पशुपातीनाथाचे मुख्य मुख मानले जाते.
या चेहेऱ्यांवर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची चिन्हे कोरलेली आहेत. उजव्या बाजूला रुद्राक्षाची माळ आणि डाव्या बाजूला कमंडलू ठेवलेला असतो. शिवलिंगावर चांदीचा नागही स्थापित केलेला असतो.
मंदिराचे पुजारी
भट
पशुपतीनाथ मंदिरात पौरोहित्य करण्यासाठी वेदशास्त्रांचे उत्तम ज्ञान असणाऱ्या द्रविडी ब्राह्मणांची भट म्हणून नियुक्ती केली जाते. हे ब्राह्मण मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून निवडले जातात. कोणत्याही एका कुटुंबाची मंदिरातील पौरोहीत्यावर मक्तेदारी नसते.
मंदिराचे राजगुरु भारतातून आलेल्या ब्राह्मणांची वेद आणि शिव आगमांच्या अभ्यासाबद्दल अतिशय कठीण अशी परीक्षा घेतात. यात उत्तीर्ण होणाऱ्या मोजक्या ब्राह्मणांची मंदिराचे भट म्हणून नियुक्ती केली जाते.
भारतातील ब्राह्मणांची भट म्हणून नियुक्ती करण्याची परंपरा शंकराचार्यांनी सुरु केली. निरनिराळ्या भागात राहणाऱ्या ब्राह्मण समाजामध्ये एकी घडवून आणण्यासाठी ही परंपरा शंकराचार्यांनी सुरू केली होती आणि ती आजही पाळली जात आहे.
भंडारी
अनेक वर्षांपूर्वी मंदिरात भट म्हणून नियुक्ती मिळालेल्या ब्राह्मणांसोबत त्याचे मदतनीस नेपाळमध्ये पोहोचले. कश्यप गोत्राचे आणि क्षत्रिय वंशाचे हे लोक नंतर भंडारी अथवा राजभंडारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिरातील भटांना नित्यकर्मांमध्ये मदत करणे, मंदिराच्या भांडाराचा (पैसे आणि इतर खजिना) हिशोब ठेवणे इत्यादी कामे मंदिराचे भंडारी करतात. मात्र त्यांना पूजा करणे अथवा शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी नसते.
मंदिर प्रवेश आणि दर्शन
पशुपतीनाथ मंदिराला चारही दिशांना चार दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असून तो बाराही महिने मंदीरप्रवेशाकरता वापरला जातो. इतर दरवाजे फक्त उत्सवादरम्यान उघडले जातात.
फक्त भारतीय आणि तिबेटी वंशाच्या हिंदू आणि बौद्धांनाच मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. इतर धर्मीय आणि हिंदू धर्म पाळणाऱ्या पाश्चिमात्य लोकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळत नाही. हिंदू पूर्वज असणाऱ्या भारतीय शीख आणि जैन धर्मियांना मंदिर परिसरात प्रवेश मिळू शकतो.
बाकी सर्व लोकांना बागमती नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उभे राहून मंदिर पाहता येते. आजूबाजूची इतर मंदिरे पाहण्याकरता या लोकांना $१० फी भरावी लागते.
पशुपतीनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या भटांखेरीज कोणालाही प्रवेश मिळत नाही. शिवलिंगाचे दर्शन गाभाऱ्या बाहेरूनच घ्यावे लागते.
शिवलिंगाला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त मुख्य पुरोहित आणि इतर ३ भटांना आहे. या ४ व्यक्तींशिवाय कोणीही मूर्तीला स्पर्श करू शकत नाही.
महाशिवरात्री उत्सव
महाशिवरात्र हा पशुपतीनाथ मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव असतो. महाशिवरात्रीला मंदिर २४ तास उघडे असते. रात्रीच्या वेळी संपूर्ण मंदिर साजूक तुपाच्या दिव्यांनी उजळून निघते. हे दिवे रात्रभर विझणार नाहीत याची खास काळजी घेतली जाते. भारत आणि नेपाळ मधून अनेक साधूही यावेळी पशुपतीनाथ मंदिरात येतात.
जगभरातून महाशिवरात्रीला सुमारे सात लाख भाविक येथे जमतात. बागमती मध्ये स्नान करून ते पशुपातीनाथाचे दर्शन घेण्याकरता कित्येक तास रांगेत उभे राहतात.
पशुपतीनाथ मंदिर आणि तेथील मृत्यूचे अस्तित्व
माणसाच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला पुढील जन्म मिळतो असे हिंदूधर्मीय मानतात. मनुष्य जन्म हा त्यात सर्वोत्तम पण मनुष्य योनीत जन्माला येणे फारच दुर्लभ मानले जाते. ज्या मनुष्याला बागमती नदीकाठी पशुपतीनाथ मंदिर परिसरात मृत्यू येतो त्याला त्याच्या कर्मांचा लेखाजोखा न होता पुढील जन्मी नक्कीच मनुष्य योनी प्राप्त होते असे नेपाळमधील हिंदू मानतात.
मरणासन्न अवस्थेतील लोकांना त्यांच्या मृत्युसमयी बागमती नदीकाठी आणून ठेवण्यासाठी मंदिर परिसरात अनेक खोल्या भाड्याने उपलब्ध आहेत. नेपाळमधील लोक आपल्या घरातील अशा मृत्युशैयेवरील माणसांना या खोल्यामध्ये आणून ठेवतात..
खोलीमधील माणसाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा शोक आणि बाहेर उघड्यावरच चिता रचून केले जाणारे अंत्यसंस्कार यासर्व गोष्टींमुळे मंदिर परिसरामध्ये मृत्यूचे भयाण वातावरण आणि एक प्रकारचा विचित्र दर्प कायमच असतो.
२००९ चा वाद
हिंदू मंदिरे आणि त्यांच्यावर होणारे हल्ले यांना फार मोठा इतिहास आहे. २००८ मध्ये नेपाळमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सरकार आले. या सरकारने पशुपतीनाथ मंदिराच्या मुख्य भटांना राजीनामा देण्यास भाग पाडले. कुठलीही पारंपारिक निवड प्रक्रिया पार न पाडता नेपाळ सरकारने आपल्या मर्जीच्या नेपाळी पुरोहितांची भट म्हणून नियुक्ती केली.
मंदिराच्या भंडारींनी याला आक्षेप घेऊन या नियुक्तीला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेली भटांची नियुक्ती रद्द केली. पण नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही.
नेपाळमधील जनतेने याविरुध्द मोठे आंदोलन उभारले. नेपाळच्या विरोधीपक्षांनीसुद्धा या आंदोलनाला पाठींबा दिला. शेवटी या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारने मंदिराच्या मूळ भटांची फेरनियुक्ती केली.
भारतातील इतर महत्वाच्या तीर्थक्षेत्रांप्रमाणेच नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी लाखो भारतीय पशुपतीनाथ मंदिराला भेट देतात आणि या मंदिराचे महत्व येणारी अनेक वर्षे असेच अबाधित राहील यात शंकाच नाही.
प्रतिक्रिया
24 Apr 2016 - 3:22 pm | १००मित्र
छान लिहिलंय.
एक संदर्भ आठवतोय. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या रेठरे हरणाक्ष ह्या गावी देखील एक पशुपातीनाथाचे देउळ आहे. हे काठमांडू सोडून केवळ दुसरेच देउळ आहे, असे येथील मंडळी म्हणतात. हे रेठरे म्हणजे पठ्ठे बापुरावंच खुद्द गाव !
24 Apr 2016 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चालली आहे लेखमाला.
बरीच चित्रे दिसत नाहीत. बहुतेक त्यांना "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही.
25 Apr 2016 - 7:48 am | एस
+१.
25 Apr 2016 - 7:59 pm | विद्यार्थी
चित्रांचे दुवे मोडले होते ते आता दुरुस्त केले आहेत.
26 Apr 2016 - 1:08 am | डॉ सुहास म्हात्रे
पहिली तीन चित्रे अजून दिसत नाहीत. त्यांनाही पब्लिक अॅक्सेस दिल्यास ती दिसतील.
26 Apr 2016 - 1:26 am | श्रीरंग_जोशी
मला थोड्या वेळापूर्वी सगळी चित्रे दिसली होती. आता रिफ्रेश केले असता पहिली तीन चित्रे पुन्हा गायबली.
26 Apr 2016 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता दिसताहेत पहिली तीन चित्रे. सुंदर आहेत !
25 Apr 2016 - 12:56 am | यश राज
भारतात पशुपातीनाथाचे एक मंदिर मध्यप्रदेशात मन्दसौर येथे शिवना नदिच्या काठी आहे.
25 Apr 2016 - 9:10 am | १००मित्र
ही माहिती रेथारेकारांना द्यायलाच हवी !
25 Apr 2016 - 8:52 pm | खटपट्या
पहीले काही फोटो दीसत नाहीत.
26 Apr 2016 - 10:01 am | विजय पुरोहित
अतिशय मस्त चालु आहे लेखमाला. माहिती आणि छायाचित्रे दोन्हीही अतिशय उत्तम दिली जात आहेत. याबद्दल अतिशय आभार.