व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग ३

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
6 Mar 2015 - 2:54 am

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १, भाग २

बुडापेस्टला जाण्यासाठी व्हिएन्नाच्या रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि गाडीची वाट बघत फलाटावर उभे होतो. आजूबाजूला मोजून एक दोन लोक. संचारबंदी लागू केल्यासारखे वाटत होते अगदी. कदाचित गाडी सुटायच्या वेळेवर येतील असे वाटले. पण ही संख्या काही वाढली नाही. पुन्हा एकदा 'हे राजधानीचे शहर असून इथे काहीच गर्दी कशी नाही, का नसेल, इत्यादीवर वायफळ चर्चा झाली. एरवी अशा पर्यटन स्थळी गर्दीचा त्रास होत असतो, इथे नाहीये म्हणून तेही वेगळे वाटत होते.

http://4.bp.blogspot.com/-ez-ruReoDNg/VPdpE5eYu0I/AAAAAAAAEWU/eM7gSBhsIzU/s1600/20150207_095233.jpg

http://2.bp.blogspot.com/-p8nVvjJdDG8/VPdpEnDVanI/AAAAAAAAEWQ/Jzs0BOS3bbs/s1600/20150207_095241.jpg

गाडी निघाली आणि थोड्याच वेळात हंगेरीत प्रवेश झाला. इथे जरा चार डोकी चढली आणि जोरजोरात गप्पा, खादाडी, लहान मुलांची पळापळी, भांडणं असे सुरु झाले. जर्मन भाषिक देशातून बाहेर पडल्याचे या लोकांमुळे जाणवू लागले. एकीकडे बाहेरच्या शेतांमध्ये दूरवर फक्त बर्फच बर्फ दिसत होता.

http://2.bp.blogspot.com/-k_5QpfEILSo/VPdp6qTt32I/AAAAAAAAEWo/Qq28QG79ywE/s1600/DSC_0207.jpg

http://4.bp.blogspot.com/-dufFa477WzA/VPdp7Wj0VCI/AAAAAAAAEWw/2uI2iPF883k/s1600/DSC_0208.jpg

बुडापेस्ट येण्याच्या अगदी दहा पंधरा मिनिटे आधी आता बॅग्स काढून ठेवू म्हणून उठलो आणि आमची बॅकपॅक दिसत नाही हे लक्षात आले. काही पैसे, बँकेची कार्ड्स, व्हिसा इत्यादी सगळे आमच्या जवळच ठेवले होते. पण एका पाऊच मध्ये पैसे, आमचे पासपोर्ट आणि घराच्या किल्ल्या हे नेमके त्या बॅकपॅक मध्ये होते. दोन मिनिटात डोळ्यासमोर काय काय येउन गेले. सगळा वेगळाच गोंधळ सुरु झाला. रेल्वे व्यवस्थापनाचा एक माणूस दिसला म्हणून त्याला विचारले. त्याने अजूनच उद्धटपणे हंगेरियन भाषेत काहीतरी उत्तर दिले. मग लोकांनी भाषांतराला मदत करत ते एक नाट्य सुरु झाले. आमची नजर गाडीत सगळ्या संशयित लोकांकडे, बॅग कडे लक्ष ठेवून होती. अख्ख्या गाडीत सगळीकडे शोधाशोध करून हाती काहीच लागले नाही. तोवर बुडापेस्ट स्थानक आले. खाली उतरलो आणि समोरच पोलीस दिसले. तुम्हाला इंग्रजी येतं का असे विचारल्यावर त्याने दुसऱ्या एका पोलिसाला हाक मारली. आम्ही काय घडले ते सांगितले. "तुम्ही थांबा मी येतोच" असे म्हणून हे मामा जे आत गेले, ते दहा मिनिटांनी परत आले. जेव्हा त्यांना विनंती केली की एकदा परत या ट्रेनमध्ये परत जाऊन बघून येतो, तेव्हा ते हो नाही करत अखेर तयार झाले. मग मी हंगेरियन पोलिस स्थानकात बसून एकीकडे त्यांच्या अगम्य भाषेतून काही समजतंय का याचा विचार करत आणि त्याहून त्रासदायक आता करायचे काय या प्रश्नावर डोके खात बसले होते. त्यांच्यापैकी ज्यांना ज्यांना आंग्ल भाषा येत होती, ते सगळे एकेक करून माझ्याकडे पुन्हा पुन्हा काय झाले, कसे झाले याची चौकशी करत होते आणि प्रत्येक नवीन प्रश्न माझ्या सहनशक्तीचा अंत बघत होता. दहा मिनिटात नवरा आला तो हातात बॅग घेऊनच. बॅग मधल्या आतल्या कप्प्यात आधी जिथे होते तिथेच पाऊच मध्ये पासपोर्ट, किल्ल्या हे तसेच होते आणि त्यातून पैसे सगळे काढून घेतले होते. पूर्व युरोपात इतर सगळीकडेच पाकीटमारी, चोर्या हे प्रमाण खूप जास्त आहे हे माहिती होते. यापूर्वीच्या प्रत्येक सहलीत सतर्क राहून सतत काळजी घेतली होती. पण तरीही विनाशकाले विपरीत बुद्धी. ती बॅकपॅक नेमकी त्याच दिवशी कशी वर ठेवली, बॅग आमच्यासमोरून कशी गेली, घाबरून आम्हाला काही सुचले नाही पण नंतर सापडली म्हणजे तिथेच कुणीतरी केले असणार, मग दिसले कसे नाही, असे असंख्य प्रश्न आणि "जर तर" डोके खात होते. पण मुख्य ते सगळे मिळाले यात समाधान मानण्यावाचून गत्यंतर नव्हते, अन्यथा काय काय करावे लागले असते याची आता कल्पना करवत नाही.

हताश होऊन बाहेर आलो. हंगेरीचे चलन आहे हंगेरियन फ्लोरिंट (Florint). मध्य युरोपीय देशांच्या तुलनेत हा देश आर्थिक दृष्ट्या गरीब आहे. साधारण १ युरो म्हणजे ३००-३५० हंगेरियन फ्लोरिंट. त्यामुळे सगळ्या किमती युरोच्या तुलनेत कमी असल्या तरी आकडे फार मोठे वाटतात. म्हणजे एक चहा किंवा कॉफी साधारण ४००-५०० फ्लोरिंटला. जवळच करन्सी एक्सचेंज बघून आधी चलन बदलून घेतले. नकाशे घेतले, मेट्रोचे तिकीट काढले आणि हॉटेलवर आलो. फ्रेश होऊन बाहेर पडलो आणि पहिले खायची सोय शोधली, पोटोबा शांत झाले आणि पहिले कुठे जावे यावर विचार करून बाहेर पडलो.

डोनाउ/डॅन्युब नदीच्या काठावर वसलेली ही हंगेरी देशाची राजधानी. 'हार्ट ऑफ युरोप', 'पर्ल ऑफ डॅन्युब", 'कॅपिटल ऑफ फ्रीडम' ही या शहराची विशेष ओळख. नदीच्या अल्याड "बुडा" आणि पल्याडला "पेस्ट" अशी ही दोन शहरे १७ नोव्हेंबर १८७३ पासून बुडापेस्ट म्हणून एकत्रितपणे ओळखली जातात. बुडा किल्ला, इतर काही इमारती, नदीचा परिसर, या दोन शहरांना जोडणारा प्रमुख चेन ब्रिज, पाप्रिका मार्केट ही बुडापेस्टची काही प्रमुख आकर्षणे. याबद्दल अधिक पुढच्या भागात येईलच. बुडापेस्टला पूर्वापार काळापासून लाभलेले गरम पाण्याचे झरे हे येथील अजून एक आकर्षण. यातील काही ठिकाणच्या पाण्यातील औषधी गुणधर्मामुळे पूर्वीपासून युरोपियन लोकांसाठी हे आवडते शहर होते. यातील काही झरे आजही अस्तित्वात आहेत परंतु बहुतेकांची जागा ही स्पा आणि रिसॉर्ट्स ने घेतली आहे. आता बुडापेस्ट 'कॅपिटल सिटी ऑफ स्पा अँड थर्मल बाथ' म्हणून ओळखले जाते.

तसेही दुपारचे ४ वाजले आहेत तर फार काही बघणे होणार नाही, म्हणून पहिले पाप्रिका मार्केट कडे मोर्चा वळवला. मेट्रोने जाताना पहिला फरक दिसला की प्रत्येक स्थानकावर तिकीट तपासनीस उभे होते. बरेच वेळा अशा ठिकाणी मशिन्स असतात किंवा मग क्वचित कधीतरी तपासले जाते. पण हंगेरीची स्थिती बघता हे आवश्यक वाटत होते. तिथे गेलो आणि मार्केट बंद दिसले. शनिवार म्हणून लवकर बंद होते म्हणे. आता भाजी मार्केटच्या वेळा बघून जाव्या असे काही डोक्यात आले नाही. दोन दिवस अजून हातात होते त्यामुळे नंतर परत यायचे ठरवले. आधीच सकाळपासून काही बऱ्या घटना घडत नव्हत्या, त्यात आता हेही बंद. मग आता नदीकिनारी फिरू असा विचार करून निघालो.

पहिले समोर दिसले ते पार्लमेंट. इमारतीच्या सभोवताल फिरत त्यावरील काम बघत बघत काही फोटो काढणे सुरु होते.

http://1.bp.blogspot.com/-I0JxReahj-E/VPi48HsmzZI/AAAAAAAAEXM/8sMHuy0bP3g/s1600/DSC_0222.jpg

http://2.bp.blogspot.com/-jFfeZNELow0/VPi478DqpMI/AAAAAAAAEXE/jGkFKPxMHSw/s1600/DSC_0224.jpg

http://2.bp.blogspot.com/-HHUv4z25CWc/VPi49L5BXjI/AAAAAAAAEXY/KzER34o4JAA/s1600/DSC_0226.jpg

आम्ही पेस्ट मध्ये होतो आणि दूरवर हे बुडा दिसत होते.

http://3.bp.blogspot.com/-N-CHP5xuvT4/VPi682imWSI/AAAAAAAAEXo/AWmYV0tHkwE/s1600/DSC_0238.jpg

http://1.bp.blogspot.com/-S9NjzdTvIl4/VPi68leNKLI/AAAAAAAAEXk/BkmrI0BnVQc/s1600/DSC_0239.jpg

नदीकाठाने फिरताना समोर हे दिसले आणि थबकलो.

http://4.bp.blogspot.com/-FvRvIV1bGq0/VPi7GqcIsII/AAAAAAAAEX0/zaVrB74IG_s/s1600/DSC_0231.jpg

याबद्दल वाचले होतेच फक्त नेमकी जागा माहिती नव्हती ती अशी अचानक समोर दिसली. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यू नागरिकांना नाझी काँसंट्रेशन कँप्स मध्ये जाण्यापासून वाचविण्याकरिता जे लोक सातत्याने कार्यरत होते, त्यांना ८ जानेवारी १९४५ च्या मध्यरात्री पकडून इथे उभे केले गेले. शूज काढायला सांगून नंतर पाठीमागून गोळ्या घातल्या गेल्या जेणेकरून मृतदेह नदीत कोसळतील आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातील. त्यांच्या स्मरणार्थ इथे आता ही कायमस्वरूपी पादत्राणे ठेवण्यात आली आहेत. अपार क्रूरतेच्या या घटना, अशा छोट्याशा पण अर्थपूर्ण स्मारकांतून खूप काही सांगून जातात. एकीकडे अंधार पडू लागल्याने समोरचा बुडा किल्ला आणि सगळेच शहर दिव्यांनी झगमगत होते आणि इथेच कायमस्वरूपी वसलेले हे इतिहासातील अंधार क्षण अंतर्मुख करणारे होते.

असेच चालत चालत दूरवर आलो. अंधार पडला तसतसे बुडापेस्ट दिव्यांच्या रोषणाईने चमकत होते.

http://1.bp.blogspot.com/-s_JcCWFkzQ4/VPi9GmkQNdI/AAAAAAAAEYE/cA0KG1b0Ywk/s1600/DSC_0260.jpg

http://4.bp.blogspot.com/-mjlbWgu0zy4/VPjAHzgtdeI/AAAAAAAAEYk/Oh5d-o7bgGg/s1600/DSC_0257.jpg

या पुलावरून चालत बुडा मध्ये आलो. या बाजूने दिसणारे दृश्य. हाच तो पूल जिथे 'हम दिल दे चुके सनम' चे शेवटचे दृश्य चित्रित झाले आहे. पुढच्या भागात याचे बुडा किल्ल्यावरून घेतलेले फोटो बघून खात्री होईल.

http://2.bp.blogspot.com/-rcJLNUaTySU/VPi9JTPue5I/AAAAAAAAEYY/y1_ULP-Vjmo/s1600/DSC_0270.jpg

आणि मग नदीच्या पलीकडून पार्लमेंटने लक्ष वेधून घेतले.

http://2.bp.blogspot.com/--EmsdtX1HMI/VPjAr5RPQVI/AAAAAAAAEY0/HOwpUAZ0tm0/s1600/DSC_0286.jpg

नदीवर वाऱ्याचा जोर अधिकच जाणवत होता. समोरचे दृश्य अप्रतिम असले तरीही फार काळ बाहेर थांबणे कठीण होऊ लागले. त्यामुळे हॉटेलवर परतायचे ठरवले. मनमोहक बुडापेस्टची पहिलीच झलक खूप आवडली होती. अजून दीड दिवस हातात होता, त्याबद्दल पुढील भागात.
क्रमशः

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2015 - 3:41 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम फोटोज (शेवटचे तीन विशेष आवडले). वर्णनशैली नेहमीप्रमाणेच उत्तम.
पासपोर्ट असलेली बॅग हरवून (प्रत्यक्षात चोरीला जाऊन) परत मिळाली हा नशिबाचाच भाग.

अवांतरः
आंतरराष्ट्रीय प्रवासात मी पासपोर्ट नेहमी जॅकेटच्या खिशात ठेवून त्याची चेन अथवा बटन व्यवस्थित बंद करतो. जेणे करून पासपोर्टसारखी महत्वाची गोष्ट हरवण्याची शक्यता कमी होईल. ही पद्धत उकाड्याचा त्रास होणार्‍यांनी वापरणे धोक्याचे आहे कारण वेटींग एरिया किंवा उपहारगृहात बसताना जॅकेट बाजुला काढून ठेवण्याची सवय असते.

दुसरा पर्याय म्हणजे कार्गो परिधान केली असल्यास व त्याच्या खिशाला व्यवस्थित बटन किंवा चेन असल्यास त्यामध्ये ठेवणेही सुरक्षित असु शकते. पण शेवटी सावध व दक्ष असणे हे सर्वाधिक महत्वाचे. याखेरीज एकत्र प्रवास करताना संपूर्ण कुटूंबाचे पासपोर्ट एकाच सदस्याकडे ठेऊ नये.

आंतरराष्ट्रीय प्रवासात, पासपोर्ट, व्हिसाचे वेगळे कागदपत्र असल्यास ते अन बोर्डिंग पासेस व रोख चलन व क्रेडिट कार्डस या गोष्टींना आपल्याला जपायचे आहे ही भावना प्रवास संपेपर्यंत असायला हवीच. याखेरीज हरवलेल्या इतर गोष्टी नंतर पुन्हा खरेदी केल्या जाऊ शकतात. पण या गोष्टी ऐन प्रवासात हरवल्यास अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते.

मधुरा देशपांडे's picture

6 Mar 2015 - 8:17 pm | मधुरा देशपांडे

उपयुक्त सूचना. याशिवाय माझा बाबांनी इथे फिरताना एक पाऊच घेतले होते जे गळ्यात अडकवता येते, त्यात पासपोर्ट आणि पैसे ठेवले होते आणि शर्ट किंवा स्वेटरच्या आतुन ते घातले. तो देखील एक चांगला पर्याय आहे.

आजवरच्या प्रवासात नेहमीच ही काळजी घेतली आहे. नेहमी लागणारी पण प्रवासात आवश्यक नसणारी कार्ड्स, कागदपत्रं ही आधीच घरी काढुन ठेवली होती. बाकी कार्ड्स पर्स्/कोट मध्येच होती. शिवाय वर्स्ट केस असे काही झालेच तर सगळे पैसे गेले असे होऊ नये म्हणुन थोडे पैसे पर्स मध्ये, काही नवर्‍याजवळ आणि थोडे या बॅगेत होते. पासपोर्ट आणि किल्ल्या जरी पाऊच मध्ये असल्या तरी ती बॅकपॅक कधीच वरच्या कप्प्यात ठेवली नव्हती. नेमकी यावेळी गडबड झाली.

तरीही प्राग मध्ये प्रचंड गर्दीत मेट्रोतुन पर्समधुन वॉलेट चोरले गेले होते, गर्दीच इतकी होती की काहीच करु शकलो नव्हतो. तेव्हा पैसे गेले नसले तरीही बँकेत कार्ड ब्लॉक करणे इत्यादीसाठी अडचणी आल्या होत्या. त्यात इथे सगळीकडे वेगळी भाषा. प्रत्येकाचे वेगळे नियम. त्यामुळे अशा वेळी लागणारी माहिती संक्षिप्त रुपात लिहुन तीही पर्समध्ये सोबत ठेवली होती. पण शेवटी व्हायचे ते असे झालेच. खाली केदार यांनी म्हटल्याप्रमाणे जर्मन भाषिक प्रदेशात थोडी बिन्धास्त राहायची सवय झालेली असते, तेही खरेच आहे. जर्मनीतील बहुतांशी जलद रेल्वेत सीसीटीव्ही असतात. त्यामुळे असे सहसा होत नाही.

आम्ही अर्थात अशाही केसेस वाचल्या होत्या की जर बॅग चोरली गेली आणि त्यात पैसे मिळाले नाही, तर पासपोर्ट किंवा अजुन असतील ती सगळी कागदपत्रं फाडुन कचर्‍यात फेकली गेली जी नंतर कधीतरी खूप उशीरा मिळाली. असे वाचल्यानंतर आमचे पैसे गेले पण निदान बाकीचे सामान मिळाले हेही बरे वाटु लागले.

रुपी's picture

6 Mar 2015 - 5:41 am | रुपी

फोटो नेहमीप्रमाणेच छान आणि वर्णनही..

चौकटराजा's picture

6 Mar 2015 - 6:12 am | चौकटराजा

वर्णन व फोटो चांगलेच आलेत. खास करून शेवटचे तीन लय भारी. पासपोर्ट व पैसे याना स्नानाखेरीज कोणत्याही परिस्थितीत आपल्या शरीरावरून हलवू नका असा सल्ला युरोप प्रवाशाना दिला जातो. तो खराच " शिरेसली " घ्यायला पायजेल.
@रंगा , समजा आपल्या पॅन्टला पुढे दोन खिसे करून घेतले .एकात नोटा व दुसर्‍यात पासपोर्ट व क्रे/डे कार्ड असे ठेवले ते ते चोरीस जाण्यासाठी चोराला काय करावे लागेल ?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 7:06 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

फोटो व त्यांचे वर्णन सुरेखच आहे. फोटोतील पूल बघितल्यावर हा कुठेतरी बघितल्यासारखा वाटला, तर तो शिनेमातला निघाला ;).
इतकी प्रेक्षणीय ठिकाणे असलेल्या जागी किती क्रूर गोष्टी घडलेल्या असतात हे वाचून अंतर्मुख झाले.
बाकी ते चोरी प्रकरण जरा काळजीत टाकणारे आहे बाई!

मस्त वर्णनं लिहुन आणि फोटो टाकून तु मला खर्चात टाकते आहेस,मधुरा.कुठे फेडशील हे पाप!! झकास दिसतंय बुडापेस्ट.जावंसं वाटतंय.

विशाखा पाटील's picture

6 Mar 2015 - 10:03 am | विशाखा पाटील

छान वर्णन.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 11:16 am | पॉइंट ब्लँक

छान प्रवास वर्णन आणि सुरेख फोटोज. शेवटचा फोटो सुंदर आलाय. थोडा टिल्ट आहे तो काढता येइल. :)

पिलीयन रायडर's picture

6 Mar 2015 - 1:17 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम फोटो!!!!

Mrunalini's picture

6 Mar 2015 - 8:08 pm | Mrunalini

मस्त मस्त.... एवढे बुडापेस्टला ३-४ वेळा जाउन आलो, पण अजुन काय ते शुज बघायचा मुहुर्त लागत नाहिये. आता पुढच्या वेळी खास त्यासाठी १ दिवस बाजुला काढु, तेव्हाच बघायला मिळेल. ;)

केदार-मिसळपाव's picture

6 Mar 2015 - 8:11 pm | केदार-मिसळपाव

पासपोर्ट आणि किल्या परत मिळाल्या म्हणजे नशिबच म्हणायचे.
बाकी जर्मन भाषिक प्रदेश सोडल्यावर हा अनुभव जवळपास प्रत्येकाला येतोच, कारण जर्मन भाषिक प्रदेशात एकदम बिनधास्त राहयची सवय लागलेली असते, त्यातल्या त्यात अशावेळी भारतीय लोक्स तर हमखास टार्गेट वर असतात.

बुडापेस्ट चे फोटो एकदम सुरेख.
दिव्यांच्या रोषणाईने चमकणारे बुडापेस्ट आणि तो पुल अगदीच दिलखेचक.

मधुरा देशपांडे's picture

6 Mar 2015 - 8:22 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार.
@पॉइंट ब्लँक, हो फोटोतला टिल्ट काढता येईल. पण थोडा कंटाळा आणि थोडा वेळेचा अभाव यामुळे राहिले.
@केदार-मिसळपाव, हो अगदी खरे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2015 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे सफर. फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम !

आधि अप्रतिम फोटो पाहिले.आता निवांत वाचते.

खेडूत's picture

7 Mar 2015 - 9:53 am | खेडूत

हाही भाग छान झालाय.
पूर्व युरोप पाहायचं राहून गेलंय. आता तिथे जाण्याची उत्सुकता वाढली आहे !
हल्ली युरोपात जर्मनीबाहेर कुठेही चोरांपासून सावध रहावे लागते.

पुभाप्र..

स्वाती राजेश's picture

7 Mar 2015 - 3:23 pm | स्वाती राजेश

व्वा.... काय मस्त वर्णन केलेस...आवड्ले.
फोटो सुद्धा अप्रतिम...

फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख आहेत. मस्त!

सुधीर कांदळकर's picture

14 Mar 2015 - 6:40 am | सुधीर कांदळकर

आवडले.

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2015 - 10:04 pm | स्वाती दिनेश

सफर आवडली.
तुझ्या बॅगपॅकचा किस्सा वाचताना रोमकहाणीची आठवण होणे अपरिहार्य होते.
स्वाती

सस्नेह's picture

16 Mar 2015 - 11:01 am | सस्नेह

आणि नेहमीप्रमाणे रसाळ वर्णनशैली.

नंदन's picture

16 Mar 2015 - 1:18 pm | नंदन

हाही भाग आवडला.

(आजच्याच 'न्यू यॉर्क टाईम्स'मध्येही डॅन्युबच्या काठावरील ज्युईश पाऊलखुणांवर लेख आला आहे.)

मितान's picture

17 Mar 2015 - 9:17 am | मितान

लेख आवडला. फोटो तर अतिशय सुंदर !
ती नदीकाठची पादत्राणे बघून जीव गलबलला !!!

बाकी स्वातीताईच्या रोमकहाणीतला अनुभव मी घेतलाय !

मस्त !छान झालेय प्रवासवर्णन ...फोटो हि सुंदर !!आधीचे हि भाग वाचलेत ...

मधुरा देशपांडे's picture

20 Mar 2015 - 3:14 am | मधुरा देशपांडे

सर्वांना परत धन्यवाद.
@नंदन, लेख वाचला. दुव्यासाठी धन्यवाद. :)

सुजल's picture

24 Apr 2016 - 10:53 pm | सुजल

छान वर्णन :)

स्वामिनी's picture

26 Apr 2016 - 12:38 pm | स्वामिनी

सुरेख प्रवासवर्णन आणि छान फोटो.

सप्तरंगी's picture

26 Apr 2016 - 4:19 pm | सप्तरंगी

छानच आहेत सगळेच लेख मधुरा , आमच्या upcoming बुडापेस्ट ट्रिप साठी तुझा लेखाचा नक्कीच उपयोग होईल. स्पा मध्ये गेला नाहीत का तुम्ही, तो पण मस्त अनुभव असेल. व्हिएन्ना चे वर्णन वाचून मलापण ती लांब केसांची सुंदर पण उदास राणी एलिझाबेथ आठवली...आम्हीही ते पाहून बेचैन झालो होतो.

वीणा३'s picture

27 Apr 2016 - 9:06 am | वीणा३

छान माहिती आणि फोटो.
तुमचा मागे एक जर्मन मधल्या स्त्री जीवनाची माहिती सांगणारा लेख वाचला होता, तो सुद्द्धा खूप आवडला होता.

स्वप्निल रेडकर's picture

27 Apr 2016 - 10:21 am | स्वप्निल रेडकर

घरबसल्या युरोपची ट्रीप करवून आणल्याबद्दल धन्यवाद !युरोप खरोखर देखण आहे. विशेष म्हणजे त्यांनी जुन्या वास्तू ज्या तऱ्हेने जतन केल्या आहेत .