body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
दोन वर्षांपूर्वी डिसेंबर मध्ये मोठ्या सुट्टीत 'ग्वाटेमालाला जाऊया का?' असं नवऱ्याने विचारलं तेव्हा मी या देशाचं नाव पहिल्यांदाच ऐकत होते. त्याने दाखवलेले सेमक चांपे (semuck champey) या जागेचे फोटो बघितले आणि बघता क्षणी ती जागा फार आवडली. ग्वाटेमालाबद्दल अजून थोडी माहिती वाचून मग आम्ही तिथे भटकायला जायचा आमचा बेत पक्का केला. सोबत १० महिन्यांची मुलगी असणार आणि तिच्यासाठी जरा नेहमीपेक्षा वेगळी तयारी या प्रवासासाठी करावी लागणार याचं थोडं टेन्शन आलं. पण मग तिला प्रवासाचा ताण नाही येणार अश्या बेताने आपण प्रवासाची आखणी करू असं ठरवून आम्ही ह्या अनुभवासाठी सिद्ध झालो.
आमची १८ दिवसांची सहल सुरू झाली ग्वाटेमालासिटी मधुन. ही ग्वाटेमालाची राजधानी आहे. या शहरात फक्त आम्ही येता - जाता एक एक दिवस थांबलो. ग्वाटेमाला सिटीला पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एका १६ सीटर बसने सेमक चांपेकडे जायला निघालो. बसमध्ये बसायला तशी अडचणच होती. मागच्या बाजूला दाटीवाटीने सर्वजण बसले होते. जवळजवळ सगळेचं परदेशी नागरीक होते. आमच्याकडे बाळ होते म्हणुन आम्हाला ड्रायव्हर शेजारची स्पेशल जागा मिळाली होती. ड्रायव्हरची सीट आणि त्याशेजारची सीट यामधल्या जागेत एक कामचलाऊ बसायची जागा केली होती, त्यावर माझा नवरा बसला. मी त्याच्याशेजारी जरा बऱ्यापैकी सीटवर मुलीला मांडीवर घेऊन बसले होते. ती खूश होती आणि कारसीट शिवाय प्रवास करत असल्यामुळे ह्या स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद लुटत होती.
साधारण ८ तास असा प्रवास करुन आम्ही संध्याकाळी लंकीन या सेमक चांपेजवळच्या गावात पोहोचलो. तिथे आम्हाला आमच्या 'युटोपिया' (Utopia) होस्टेलला घेऊन जाणारा पिक अप ट्रक येणार होता. तिथून पुढचा रस्ता म्हणजे गाडी जात होती म्हणुन रस्ता म्हणायचा असा भयानक होता. मांडीवरच्या बाळाला घट्ट धरून मी पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या बाजूच्या जागेत बसले होते. यावेळी माझ्या शेजारी मात्र एक अनोळखी मुलगी बसली होती. बसली म्हणजे बिचारी कशीतरी एका छोट्या फ़ळकुटावर टेकली होती. नवरा आणी इतर युटोपियाला जाणारे आमच्या सोबतचे प्रवासी मागे पिक-अपच्या हौद्यात तोल सावरून आणि आपापल्या बॅग्ज संभाळत उभे होते. प्रत्येक वळणावर आणि खड्ड्यातून गाडी गेली की कोणीतरी खाली पडेल असे वाटत होते. कसाबसा अर्ध्या पाऊण तासाने तो प्रवास संपला आणि आम्ही आमच्या हॉस्टेलला पोहोचलो. तो पर्यंत सगळीकडे अंधार आणि सामसुम झाली होती. दिवसभर प्रवासाने थकलो होतो त्यामुळे मिळेल ते खाउन आमच्या रूम मध्ये जाऊन पडलो. पिल्लू दुध पिऊन मस्त झोपून गेलं. आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार याची तिला काहीच काळजी नव्हती. सगळया प्रवासात ती मस्त एंजॉय करत होती आणि तिला मजेत बघून आम्हालाही छान वाटतं होतं. सकाळी उठलो आणि समोरचा नजारा बघून आदल्या दिवशीच्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळुन गेला.
महिंद्राचा पिक अप ट्रक
यूटोपिया हॉस्टेल
यूटोपिया हॉस्टेल इथली आमची रहाण्याची जागा
यूटोपियाला आम्ही ४ दिवस थांबणार होतो त्यामुळे आम्हाला कसली घाई नव्हती. इथून सेमक चांपेला जायची - यायची व्यवस्था हॉस्टेल मालकच करत होता. शिवाय तिकडे केव्ह टुर्स, नदीमध्ये ट्युबिंग अश्या गोष्टी होत्या त्यासाठीही होस्टेल मधून मुलं गाईड म्हणुन लोकांच्या सोबत जात होती. आम्ही केव्ह टुर करणार नसल्यामुळे जरा उशीराने निघायचे ठरवले. आम्ही यूटोपियाला पोहोचण्याआधी दोन दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे निळीशार असलेली नदी थोडी गढूळ झाली होती, पण पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे एक तजेला आला होता. वातावरण खूपच प्रसन्न झाले होते. आम्ही हॉस्टेल मालकाच्या पिक-अप ट्रक मधून सेमक चांपेला पोहोचलो. ही जागा ग्वाटेमालाच्या राष्ट्रीय राखीव जागांपैकी एक आहे. निळ्याश्यार पाण्याच्या टप्प्यांमध्ये विभागलेल्या 'काहाबान' नदीच्या प्रवाहात पोहण्यासाठी लोक खास करून इथे येतात. शिवाय नदीच्या पोटात गुहेसारखा नैसर्गिक बोगदाही आहे. पाणी कमी असताना तिथे आरामात जाता येते. या नदीच्याच बाजूने एक छोटा ट्रेक करून एका 'मिराडोर' म्हणजे व्हयु पॉईंटला जाता येते. आम्ही तो ट्रेक करून वर गेलो आणि तिथून दिसणारा नजारा असा होता.
सेमक चांपे परिसर
आम्हाला एक दिवसाच्या मोठ्या प्रवासानंतर थोडं निवांत रहायचं होतं त्यामुळे सेमक चांपे बघून आल्यानंतरचे दोन दिवस काहीच प्लॅन केला नव्हता. पुढचे दोन दिवस आम्ही युटोपियाच्या आजूबाजूला फिरलो. जवळचे सेमील गाव म्हणजे १५ -२० घरांची डोंगर उतारावर विखुरलेली वस्ती आणि एक छोटी शाळा एवढंच होतं. हॉस्टेल मालकाने जवळपास एक दोन जुने लाकडी झुलते पूल आहेत ते बघून येऊ शकता अशी माहिती दिली. त्यामुळे त्या पुलांचा शोध घेत एका अतिशय चिखलमय वाटेवर जाऊन अडकलो. हळु हळु त्यातून बाहेर पडुन शेवटी एकदाचे त्या पुलाजवळ पोहोचलो. पूल फारच जुना होता. दुसर्या बाजुला थोडीफार घरे होती. चांगले ट्रेकिंग शूज असल्यामुळे त्या चिखलातून कुठेही पडझड न होता सुखरूप बाहेर पडलो होतो. नशीबाने परत जायला दुसऱ्या बाजूने जरा चांगला रस्ता होता. त्यानंतर मग आडवाटेला कुठे गेलो नाही. हॉस्टेलच्या आजूबाजूलाच एवढं अप्रतीम निसर्ग सौदर्य विखुरलेलं होतं की आपण अजून कुठे जाऊन काही बघावं असं वाटलंही नाही.
युटोपियाहून सेमील गावाकडे जाणारा रस्ता
आमचा पुढचा प्रवासही मोठा होता. युटोपियाहुन निघून आम्हाला फ्लोरेसला (Flores) जायचे होते. जवळच्या लंकिन या गावपर्यंत आम्हाला सोडण्याची व्यवस्था आमच्या हॉस्टेल मालकाने केली होती. तिथून सकाळी ८ ला आम्ही मिनी बस घेतली आणि संध्याकाळी ५ ला फ्लोरेस ला पोहोचलो. अमेरीकेत सहजा सहजी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेले डायपर चेंजिंग स्टेशन्स या प्रवासात कुठेही उपलब्ध नव्हते. मी सोबत एक चेंजिंग मॅट घेतले होते त्यावरच मग जिथे जिथे बसचे विश्रांती थांबे होते तिथे बाळाचे डायपर चेंज केले. याबाबतीत टाळाटाळ न केल्यामुळे तिलाही पुर्ण प्रवासात कधीही डायपर रॅश किंवा इतर इन्फ़ेक्शनचा काही त्रास झाला नाही.
फ्लोरेसला आम्ही 'लॉस अमिगोज' नावाच्या हॉस्टेलमध्ये रहाणार होतो. हे हॉस्टेल गावाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे इथे युटोपियाच्या मानाने बराच गजबजाट होता. आमची प्रायव्हेट रूम होती त्यामुळे बाहेरच्या कोलाहलापासून आम्हाला जरा निवांतपणा मिळाला. हॉस्टेलमधूनच तिकाल (Tikal) या उत्खननात सापडलेल्या प्राचीन मायन राजधानीला भेट देण्यासाठी सफरीचे बुकिंग करण्याची सोय होती. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळची सूर्यास्त- सफर बुक केली.
तिकाल बघण्याची खूप उत्सुकता होती. तिकाल नॅशनल पार्क हि जागा रेन फॉरेस्ट मध्ये गुडूप झालेल्या अतिप्राचीन मायान बांधकामांनी भरलेली आहे. यातल्या अगदी मोजक्याच जागांचे आत्तापर्यंत उत्खनन झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाने इथे सर्व प्रथम उत्खनन सुरु केले आणि त्या उत्खननातून अमेरिकेतले (उत्तर, दक्षिण आणि मध्य) आतापर्यंतचे सगळ्यात उंच टेंपल पुन्हा दिसू लागले. ते तिकाल नॅशनल पार्कमध्ये टेम्पल ४ म्हणून प्रसिद्ध आहे. टेंपलच्या वरच्या भागापर्यंत जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांचा जीना करण्यात आला आहे. इथून नजर जाईल तिकडे फक्त जंगलच दिसते आणि मध्ये मध्ये दिसतात तिकाल टेंपल्स. इथल्या जंगलाची वाढ इतक्या झपाट्याने होते की जर व्यवस्थित निगा राखली गेली नाही तर पुन्हा काही वर्षात हि टेंपल्स झाडावेलींनी पूर्णपणे झाकून जातील.
दुसरा दिवस फ्लोरेस जवळच छोट्या पार्क मध्ये घालवला. तिसऱ्या दिवशी तिकाल सारख्याच असलेल्या पण जरा लांबच्या याक्षा (Yaxha) या ठिकाणी उत्खनानात सापडलेली पुरातन टेंपल बघायला गेलो. इथली टेंपल्स तिकालच्या मानाने कमी उंचीची आहेत. शिवाय इथे जायचा रस्ताही खडतर आहे त्यामुळेच की काय, इथे गर्दी कमी होती आणि आम्हाला निवांत फिरता आलं. इथूनही अप्रतिम सूर्यास्त पहायला मिळला.
याक्षा टेंपल्स
सूर्यास्त
पुढचा दिवस आमचा या ट्रिप मधला दहावा दिवस होता आणि आम्ही अजून एक मोठा प्रवास या दिवशी केला. फ्लोरेस मधून निघून आम्ही ग्वाटेमाला सिटी जवळच्या अॅण्टिग्वा (Antigua) या गावी आलो. हा प्रवास जवळ जवळ १० तासांचा होता. सकाळी १०:३० ला फ्लोरेस मधून निघून रात्री ९ ला आम्ही अॅण्टिग्वाला पोहोचलो. या प्रवासात पहिल्यांदाच आम्ही हॉटेल मध्ये रहाणार होतो. हे हॉटेल म्हणजे एक जुना वाडाच वाटतं होते. आपल्याकडे जुन्या वाड्यांना असतो तसा दिंडी दरवाजाही त्याला होता. हे हॉटेल गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात होते त्यामुळे इथून आम्हाला जिथे जिथे जायचे त्या सगळ्या ठिकाणी चालत जाणे सोयीस्कर होते. इथे काही मोठं आकर्षण बघण्याचा आमचा बेत नव्हता शहरात चालत जाण्यासारख्या ठिकाणी भटकणे आणि दोन दिवस निवांत एका ठिकाणी राहणे एवढाच आमचा उद्देश होता. वास्तुशिल्पासाठी प्रसिध्द असलेली काही चर्चेस या शहरात आहेत. आजूबाजूला भटकून आम्हीही जवळपासचे एक - दोन प्रसिद्ध चर्च पहिले.
अॅण्टिग्वा चर्च
आम्ही नाताळलाही अॅण्टिग्वामध्येच होतो. इथे त्या दिवशी आमच्या हॉटेल जवळच्या चर्चच्या आजूबाजूला जत्रे सारखी गर्दी होती. मदरमेरीच्या पुतळ्याची रस्त्यावरुन मिरवणुक चालली होती. आम्हीही रस्त्याच्या बाजूला उभे राहून या सगळ्याची मजा अनुभवली. एकंदरीत आपल्याकडे उत्सवांत असते तसेच उत्साही वातावरण तिथे त्यावेळी होते. या मिरवणुकीमुळे आमचा वेळ चांगला गेला आणि करमणूकही झाली.
आमचा पुढचा मुक्काम होता 'लेक-अतितलान' (Lake Atitlan) ह्या ग्वाटेमालातील अतिशय सुंदर लेकाच्या काठावर. इथे ह्या सरोवराच्या सभोवती वसलेल्या सातपैकी एका गावात सॅन पेद्रो (San Pedro) मध्ये. ही जागा म्हणजे प्रमुख ग्वाटेमालामधाल्या आकर्षणांपैकी एक आहे. या जलाशयाचे क्षेत्रफळ १३० स्क्वे. किमी असून सभोवतालच्या गावांमध्ये पर्यटकांसाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. यात स्पॅनिश शिकण्यापासुन ते योगा आणि मेडिटेशन शिकण्यापर्यंत बरेच काही आहे. शिवाय ह्या विस्तीर्ण तलावाकाठी राहुन तुम्ही त्याभोवतीच्या 'सिएरा माद्रे' पर्वतराजी मध्ये ट्रेकिंगही करू शकता किंवा आम्ही राहिलो तसे किनाऱ्यावरच्या एखाद्या गावात राहून निवांतपणाही अनुभवू शकता.
आम्ही राहिलो होतो ते 'हॉटेल सक्कारी' लेक अतितलानच्या अगदी काठावर होते. हॉटेलमधून दिसणारा लेक आणि आजूबाजूचा परिसर फारच सुंदर होता. या ठिकाणी दिवसभर काहीही न करता बसून राहिलो तरी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणाऱ्या वेगवेगळ्या बोटी, कयाकिंग करणारे पर्यटक, अधून-मधून पाण्यात सूर मारणारे पक्षी हे सगळे बघत वेळ कसा जातो ते कळतही नाही.
हॉटेल सक्कारी बाग
हॉटेलच्या आसपास खाण्याचेही बरेच पर्याय उपलब्ध होते. त्यापैकी एका ब्रिटिश तरुण चालवत असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये खूपच चविष्ट व्हेज बिर्याणी खायला मिळाली. अश्या अनपेक्षित ठिकाणी आपल्या ओळखीचा पदार्थ खायला मिळालं की त्याची चव अगदी अप्रतिम लागते. खूप दिवस भारतीय पद्धतीच जेवण न खाल्यामुळेही असेल पण ती बिर्याणी आम्हाला फारच छान लागली.
आम्ही सकाळ संध्याकाळ पोटपुजेच्या निमित्ताने बाहेर पडून गावात आजूबाजूला हिंडून येत होतो. एकदा असेच भटकत असताना एक स्थानिक आमच्याजवळ आला आणि त्याने माझ्या नवऱ्याला विचारले "तू ग्वाटेमालन आहेस का?" त्याने नाही म्हंटल्यावर तो म्हणे "मग तुझी बायको ग्वाटेमालन आहे का?" त्याने मीही ग्वाटेमालन नाही हे सांगितल्यावर तो आश्चर्यचकित झाला आणि मग आम्ही भारतीय आहोत हे सांगितल्यावर तो म्हणाला, की तुमच्याकडे बघुन तर तुम्ही ग्वाटेमालानच असाल असे वाटाले. पण आमच्या ह्या ग्वाटेमालन दिसण्याचा कोणत्याही दुकानात आम्हाला वस्तुंची किंमत कमी करून घेण्यात काहीही फायदा झाला नाही. आमच्या अगदीच कामचलाऊ स्पॅनिश बोलण्यामुळे लगेचच समोरच्याला आमचा खरा रंग कळून यायचा आणि मग वस्तूंच्या किमती पण वर जायच्या. रस्त्यात फिरताना बरेचदा लोक आम्हाला मुलीचं वय विचारायचे आणि मी गडबडीत 'दोसे मेसेस'(दहा महिने) च्या ऐवजी 'दोस मेसेस' (दोन महिने) असं सांगायचे आणि विचारणारा हे उत्तर ऐकून चक्रावून जायचा.
इथून एक दिवस 'लांचा' म्हणजे छोट्या बोट मधून जवळ असलेल्या 'सॅण्टिआगो' गावात जाऊन आलो. आम्ही राहत होतो त्या गावापेक्षा हे गाव खूपच बकाल होते. इथे 'सेंट मक्षिमॉन' चर्च बघण्यासारखे आहे असे वाचलेले होते म्हणुन ते बघायला गेलो तर तिथेही फारच उदासीन वातावरण होते चर्चची बाहेरून काही ठिकाणी पडझड झाली होती आणि एकंदरीतच सगळीकडे मरगळ पसरलेली होती. पण लांचा मधून येता जाता आजूबाजूच्या पर्वत्राजीचे आणि सुप्त ज्वालामुखी असलेल्या 'सॅन पेद्रो', 'व्होल्केन अतितलान' यांचे दर्शन फारच मनमोहक होते हीच काय ती जमेची बाजू.
बघता बघता आमचा निघण्याचा दिवस आला. परतीसाठी आम्ही पानाहाचेल (Panajachel) या गावातून ग्वाटेमालासिटीमध्ये जाण्यासाठी शटल बस घेतली. बससाठी वाट बघत असताना पानाहाचेलच्या बाजारात भटकलो. इथे स्थानिक लोकांच्या बरोबरीने बाहेरून येऊन इथे बस्तान बसवलेल्या 'हिप्पी' लोकांनी आपली दुकाने थाटली होती. हा भाग पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध असल्यामुळे छोट्या गोष्टींच्याही किमती बऱ्याच होत्या. आम्हाला आकर्षक असे फारसे काही न वाटल्याने खरेदीचा मोह सहजपणे टाळता आला.
दुपारी १२ च्या बसने इथे तिथे थांबे घेत - घेत संध्याकाळी ५ ला आम्हाला ग्वाटेमाला सिटीमध्ये पोहचवले. आम्ही पहिल्यादिवशी जिथे राहिलो त्याच 'दोस लुनास' या ब्रेड अॅन्ड ब्रेकफ़ास्ट ठिकाणी निघायच्या आधी एक दिवस येऊन राहिलो. आमच्या पुर्ण प्रवासाची हकीकत ऐकण्याची तिथल्या ओनर जोडप्याला खूपच उत्सुकता होती. इतक्या लहान बाळासोबत प्रवास करताना काही अडचण आली नाहीच, उलट बाळामुळे सगळीकडे लोक येऊन आमच्याशी बोलत होते आणि त्यामुळे आम्हाला लोकांमध्ये सहज मिसळण्याची संधी मिळाली. हे ऐकून त्यांना चांगले वाटले. एकंदरीत आम्हाला सगळीकडेच चांगला अनुभव आला. कुठेही लुबाडणूक किंवा गैरसोय झाली नाही आणि जिथे जिथे गेलो ती सगळी ठिकाणे आम्हाला मनापासून आवडली हे त्यांना सांगितल्यावर आपल्या देशाबद्दल अभिमान आणि एक प्रकाराचे समाधान यांचे मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर आणि कोणतीही अप्रिय घटना न घडता सहल पूर्ण झाल्याचे समाधान आमच्या चेहर्यावर पसरले.
पुढे मुलगी मोठी झाल्यावर जर म्हणाली की 'चला पुन्हा जाऊ ग्वाटेमालाला' तर आम्ही नक्की जाऊ अजून एकदा या वैविध्यतेने नटलेल्या देशाला भेट द्यायला.
इतर माहिती -
भौगोलिक स्थान: मध्य अमेरीका
चलन: केत्साल
मुख्य विमानतळ: ग्वाटेमालासिटी
व्हिजा: उत्तर अमेरिकेतून जाणाऱ्या भारतीयांकडे जर अमेरिकेचा व्हॅलिड वर्क व्हिजा / डिपेंडंट व्हिजा असेल तर ग्वाटेमालाचा व्हिजा घ्यावा लागत नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा व्हिजा लागला नाही.
प्रवास नियोजनासाठी माहिती स्त्रोत: लोन्ली प्लॅनेट - थॉर्न ट्री फोरम, ट्रिप अॅडवायजर
हॉटेल बुकिंग: स्वतंत्रपणे हॉटेल/हॉस्टेलच्या वेबसाईट वरून
खाद्यसंस्कृती:
येथील खाद्यसंस्कृतीवर माया संस्कृतीचा प्रभाव आहे. बीन्स, कॉर्न हे प्रमुख खाद्यपदार्थ आणि सोबतीने कुठलेतरी मांस.
मी थोडाफार मांसाहार करत असले तरी माझा नवरा शाकाहारी आहे आणि श्यक्यातो परगावी किंवा परदेशात गेल्यावर मीही शाकाहारीच जेवण खाणे पसंत करते. ग्वाटेमालामध्ये फिरताना शाकाहारी खाण्याचे पर्याय जरी कमी असले तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काही खायला मिळत होतेच. तिथे राईस आणि बिन्स सगळीकडे मिळतात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँकी सारखे रॅप होते. मोठ्या गावातल्या रेस्टॉरंटमध्ये क्रेप, पास्ता असल्या गोष्टी होत्या. शिवाय रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आम्हाला व्हेजीटेरिअन ऑप्शन सुचवा असे वेटरला विचारले तर तेही तिथले आपल्याला माहित नसलेले पदार्थ सुचवतात. एका ठिकाणी भाताबरोबर आपल्या मेथीच्या भाजीसारखी भाजीसुद्धा होती. सगळीकडे ताजी फळे मिळत असल्यामुळे बऱ्याचदा सकाळी नाष्ट्याला आम्ही फळेच खाल्ली. नविन गोष्टींचा अनुभव घेण्याची मनाची तयारी असेल तर खाण्यापिण्यातल्या थोड्याश्या गैरसोयीचे काहीच वाटतं नाही.
यूटोपिया हॉस्टेल्मधाला नाष्टा
फ्लोरेसमधले लंच
सॅन पेद्रो मधे डिनर
भाषा: स्पॅनिश
आमचा अनुभव - इथे छोट्या गावांमध्ये फिरताना तुम्हाला किमान थोडेफार प्राथमिक स्वरूपाचे स्पॅनिश येणे गरजेचे आहे असे मला तरी वाटले, त्यामुळे तुम्ही लोकांशी थोडंफार बोलू शकता. मला अगदी थोडेच शब्द माहित होते पण माझ्या नवऱ्याने ग्वाटेमालाला जाण्याआधी काही दिवसच बेसिक स्पॅनिशचा कोर्स केला होता त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. दुकानांमध्ये घासाघीस करण्यासाठी ,जेवणात काय हवे नको सांगायला आणि मुख्य म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांमध्ये थोडंफार मिसळुन संवाद सुरु करायला आम्हाला या गोष्टीचा चांगला उपयोग झाला. आम्ही तोडके-मोडके बोललो तरी लोकांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यामुळे भाषेचा अडसर फारसा जाणवला नाही.
समाप्त...!
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 10:28 pm | नूतन सावंत
सुरेख सफर ग्वाटेमालाची.प्रकाशचित्रेही सुरेख आहे.लेखनशैलीही सविस्तर माहिती देणारी आहे.
7 Mar 2016 - 10:34 pm | विवेकपटाईत
फोटो अप्रतिम. मी PMO असतानाची गोष्ट आहे, माझा एक सहकर्मी प्रधानमंत्री सोबत मेक्सिकोच्या सहलीहून परतला होता आणि भेटल्या वर म्हणाला, पटाईतजी वहां जाकर ऐसा लगा हि नहीं किसी दुसरे देश में है, ऐसा लगा कुम्भ मेले में बिछड़े भाई से मिल रहे हैं. तिथल्या पुरातन संस्कृतीचे अणि लोकांचे, कही फोटो टाकले तर आवडतील.
7 Mar 2016 - 10:45 pm | बाबा योगिराज
काय सुंदर सजवलाय लेख. मस्त.
फोटू आवडले. वर्णन आवडलं. थोडस लवकर आवरत घेतल्या सारख वाटलं.
बाकी अजून वाचायला आवडेल.
11 Mar 2016 - 9:01 am | इडली डोसा
सफरीनंतर दोन वर्षाने लेख लिहिल्यामुळे लेखन थोडं मर्यादित झाले आहे हे खरे आहे.
7 Mar 2016 - 10:50 pm | सामान्य वाचक
फोटो आवडले आणि लेख पण
अवांतर : ग्वाटेमला देश आणि यु एस ए चा ग्वान्टानामो कॅम्प। यामध्ये माझा अजून काहीतरी गोंधळ होतो
8 Mar 2016 - 7:32 pm | इडली डोसा
ग्वाटेमला देश आणि यु एस ए चा ग्वान्टानामो कॅम्प यांचं फक्त नावात साधर्म्य आहे. ह्या दोन वेग्वेगळ्या जागा आहेत. मला ग्वान्टानामो कॅम्पबद्दल फारशी माहिती नाही. गुगल केल्यावर हे सापडले.
7 Mar 2016 - 11:12 pm | गवि
वाह. हिरवागार दिसतोय परिसर.
हे सर्व लहान बाळाला घेऊन फिरलात म्हणून आणखी कौतुक.
एकदम अनवट आणि थ्रिलिंग चॉईस.
गुन्हेगारी वातावरण आणि अनार्की याविषयीच जास्त ऐकलंय ग्वाटेमालाबाबत.
तिथेही पर्यटन असेल हे जाणवलंच नाही
8 Mar 2016 - 8:13 pm | इडली डोसा
ग्वाटेमालासिटीमधे जिथे राहिलो तिथे याच कारणासाठी गेटेड कम्युनिटी होती.
पण बाकी जागा पर्यटनाच्या दृष्टिने चांगल्या विकसित केल्या आहेत. रस्ते बर्यापैकी चांगले आहेत. काही ठिकाणी भारतात असल्याचा भास होतो.
आम्ही बर्यापैकी रिसर्च करुन गेलो होतो त्यामुळे काही अडचण आली नाही. आणि कोणत्याही ठिकाणी योग्य ती सावधगिरी बाळगली. नको ते साहस केलं नाही तर अडचणीत येण्याचे प्रसंग टाळता येतात असं वाटतं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
7 Mar 2016 - 11:14 pm | पद्मावति
ही अनोखी सफ़र खूप छान वाटली.
+१००
8 Mar 2016 - 12:03 pm | सस्नेह
अगदी अनकॉमन प्लेस ! छानच आहे हिरवागार आसमंत .
8 Mar 2016 - 3:39 pm | इशा१२३
अप्रतिम फोटो!
वेगळ्या ठिकाणाची सफर आवडली.
सुरेख वर्णनामुळे छान माहिती मिळाली.
8 Mar 2016 - 3:46 pm | बॅटमॅन
असे आहे तर गौतमालय!!!! सफर आवडली, खादाडीचे अजून फटू टाकल्यास अवडतील.
8 Mar 2016 - 3:52 pm | मृत्युन्जय
१० महिन्याचा बाळाला घेउन फिरण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल अभिनंदन. आयुष्यात कधी ग्वाटेमालाला जायचा योग येइल की नाही ते माहिती नाही. माझे भुगोलाचे ज्ञान खुप काही सुंदर नसल्याने विचारतो पण तो "सु(कु)प्रसिद्ध ग्वा टेमाला बीच प्रिझन" इथलाच का?
9 Mar 2016 - 8:22 pm | इडली डोसा
ग्वाटेमला देश आणि यु एस ए चा ग्वान्टानामो कॅम्प यांचं फक्त नावात साधर्म्य आहे.
8 Mar 2016 - 4:49 pm | प्रचेतस
आगळीवेगळी सफर.
मायन संस्कृतीतले झाडात हरवलेले पिरॅमिड्स फारच आवडले.
8 Mar 2016 - 5:39 pm | वेल्लाभट
मॅन!
मी येडा झालोय एक एक जागा आणि एक एक फोटो बघून या अंकातले. कुठे कुठे जाऊ असं होतंय!
अनेक अनेक आभार अशा अनवट जागांची ओळख करून दिल्याबद्दल
8 Mar 2016 - 6:00 pm | अनुप ढेरे
अनवट ठिकाणची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
8 Mar 2016 - 7:53 pm | Mrunalini
छान झालीये सफर. मलाही देशाचे नाव वाचुन आधी तेच डोक्यात आले, कुठे आहे हा देश. पण छान ओळख करुन दिली आहेस.
8 Mar 2016 - 9:01 pm | प्रीत-मोहर
सुंदर!!!
9 Mar 2016 - 3:48 pm | पियुशा
मस्त सफर !
9 Mar 2016 - 5:38 pm | सविता००१
किती सुरेख फोटो आहेत एकेक
खरच, तुझा लेख वाचून आणि फोटो पाहून तर लगेचच हे सगळं पाहिलंच पाहिजे असं वाटलं.फार मस्त
9 Mar 2016 - 6:46 pm | स्मिता श्रीपाद
मस्तच झालाय लेख...
१० महिन्याच्या बाळाला घेउन फिरलात हे खरच खुप कौतुकास्पद आहे
9 Mar 2016 - 6:55 pm | अजया
अनवट जागेची मस्त सफर आवडली.
9 Mar 2016 - 6:55 pm | अजया
अनवट जागेची मस्त सफर आवडली.
9 Mar 2016 - 7:03 pm | नंदन
कॅन्कुन, कोस्टा रिका नाहीतर माचु पिचू अशा नेहमीच्या टुरिष्टी ठिकाणांपेक्षा, अमेरिका खंडातल्या ह्या निराळ्या जागेची सफर खूपच आवडली.
9 Mar 2016 - 10:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका अनवट देशाची सफर आवडली... अजून जास्त फोटो हवे होते :)
दहा वर्षाच्या बाळाला घेऊन पर्यटनव्यवस्था तितकिशी विकसित नसलेल्या या देशात ही सफर केली हे भारीच !
10 Mar 2016 - 6:48 am | समर्पक
सुंदर लेख! थोडी वाचकांसाठी अजून भर घालतो, परवानगी असावी...
हा देश उत्तुंग ज्वालामुखी पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या चार महिन्यांपासून 'फुएगो' हा ज्वालामुखी सक्रिय झालेला आहे. संक्रांती दरम्यान मी एल साल्वाडोर, होन्डुरास, ग्वाटेमाला व बेलीझ या चार देशांना भेट देऊन आलो तेव्हाचे हे फोटो...
१ ज्वालामुखी विस्फोट : आभाळ गच्च भरलेले, रिमझिम पाऊस, धुरकट वातावरण आणि फोन मधील फोटो यामुळे दर्जा कमी आहे, पण अनुभव अत्युच्च!
२ अँटिग्वा शहर जुन्या इमारतींसाठी प्रसिद्ध आहे, खास करून बरोक व कोलोनिअल स्थापत्यासाठी. काही नमुने:
10 Mar 2016 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो. तुमचे सविस्तर प्रवसवर्णन वाचायला आवडेल.
10 Mar 2016 - 2:29 pm | मधुरा देशपांडे
+१
10 Mar 2016 - 9:41 pm | गवि
झकास पूरक छायाचित्रं आहेत... अगदी "समर्पक"..
11 Mar 2016 - 8:53 am | इडली डोसा
खूप सुंदर फोटो आहेत तुमचे.
10 Mar 2016 - 1:23 pm | राही
एका वेगळ्या देशाची सफर केलीत, छोट्या बाळाला घेऊन, तेही त्या देशाची गुन्हेगारी आणि अराजकाविषयी प्रसिद्धी असताना. देश अतिशय निसर्गसंपन्न वाटला. कधी कधी स्वप्नवत. टेंपल्सचे फोटो अधिक असते आणि तपशील दिसले असते तर आवडलं असतं.
10 Mar 2016 - 2:22 pm | एस
अप्रतिम लेख. दहा महिन्यांच्या बाळाला घेऊन फिरलात याबद्दल विशेष कौतुक.
समर्पक, तुमचीच आठवण आली होती लेख उघडला तेव्हा.
10 Mar 2016 - 2:28 pm | मधुरा देशपांडे
ग्वाटेमालाबद्दल लिहीन असं तू म्हणाली होतीस तेव्हापासून खूप उत्सुकता होती या लेखाची. अनवट जागा म्हणून. आणि
जर्मन क्लास मध्ये माझ्यासोबत एक मैत्रीण होती ग्वाटेमालाची. ती आता डॉक्टर होते आहे, अजूनही फेसबुकवर संपर्कात असते. तिच्याकडून या देशाबद्दल खूप काही ऐकलं होतं. तिथली गुन्हेगारी, पर्यटन, तिला तिच्या देशासाठी काहीतरी करायची असलेली इच्छा, तिथले लोक, सण, गरिबी, भाषा आणि बरंच काही. भरभरून बोलायची ती सगळ्याबद्दल. तू तिकडे ये, मग मी तुला फिरवेन सगळीकडे असं ती नेहमी म्हणते. हा लेख वाचून आता नक्कीच कधीतरी ग्वाटेमालाला जायला हवं असं अजून जास्त वाटतंय. दहा महिन्यांच्या बाळाला घेऊन फिरलात याबद्दल विशेष कौतुक. अंकाशिवायही तुझ्या अशाच अनवट जागांच्या सफरीबद्दल वाचायला आवडेल.
10 Mar 2016 - 2:34 pm | पैसा
अनोखी सफर! सुरेख निवांत लिहिलंयस!
समर्पक याचेही फोटो आवडले. त्यातला कमानवाली खिडकीचा फोटो एकदम ओळखीचा वाटत्तो.
10 Mar 2016 - 9:59 pm | अनुप ढेरे
ग्वाटेमाला हे पूर्वी (खूप पूर्वी!) गौतमालय नावानी ओळखलं जायचं म्हणे! त्याचे काही पुरावे वगैरे दिसले का?
11 Mar 2016 - 8:56 am | इडली डोसा
तुम्हाला याबद्दल अजुन माहिती असेल तर लिहा.
11 Mar 2016 - 1:40 pm | गिरकी
फोटो अप्रतिम !!! ग्वाटेमाला देशाची सफर आवडली :)
11 Mar 2016 - 3:23 pm | रिदम
अतिशय सुंदर लेख आणी छान फोटोग्राफ्स....
11 Mar 2016 - 3:48 pm | शामसुता
अतिशय वेगळ्या देशातली तुझी सफर मनापासून आवडली . फोटो खूप सुंदर आहेत .
14 Mar 2016 - 3:39 pm | पिलीयन रायडर
१० महिन्याचं बाळ घेऊन फिरलात!!! क्या बात है!
फोटो आणि लेख दोन्ही आवडले. कधीही न ऐकलेल्या ठिकाणाबद्दल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद! पुन्हा कधी अमेरिकेत येणे झाले तर जायचा बेत आखेन.
14 Mar 2016 - 4:21 pm | पूर्वाविवेक
खूपच छान अनुभव. सुंदर लेख आणि फोटो!
20 Mar 2016 - 7:06 pm | जुइ
वेगळ्या वाटेवरची भटकंती आवडली खास करून इतक्या लहान मुलीला घेऊन.
20 Mar 2016 - 8:04 pm | रेवती
अप्रतीम निसर्गसौंदर्य! फोटू तर खासच!
हिरवाई मस्त. वरून चौथा फोटू भारी आलाय. तुझ्या मुलीचेही फोटू गोड आहेत. तिने खरेच सफर एन्जॉय केलीये.
21 Mar 2016 - 5:04 pm | स्वाती दिनेश
ही अनवट सफर खूप आवडली.
स्वाती
22 Mar 2016 - 1:28 am | इडली डोसा
प्रतिसादांसाठी सगळ्यांचे मनपासुन आभार!
25 Mar 2016 - 2:58 pm | आरोही
सुंदर !! अतिशय मस्त लेख ..
25 Mar 2016 - 3:03 pm | इरसाल
सफर आणी तुमच्या पेक्षा "बाळ' जास्त फेमस झालय.
बघुतरी द्या कसं आहे ते पिटुकलं ये इतक्या कमी वयात हिंडुन आलं तुम्हाला बरोबर नेवुन. ;)
25 Mar 2016 - 8:10 pm | सुधीर कांदळकर
अनवट प्रदेशाची सहल मस्त झाली आहे. धन्यवाद.
26 Mar 2016 - 2:50 am | यशोधरा
सुरेख लेख आणि फोटो. मिराडोर आणि सेमक चांपे परिसराचे फोटो एकदम भारी!
26 Mar 2016 - 11:33 am | पूर्वाविवेक
लेख आणि फोटो फार सुंदर. ग्वाटेमाला फारच छान आहे, मीना प्रभूंच्या पुस्तकातून त्याची ओळख झाली होती.
26 Mar 2016 - 3:43 pm | Maharani
Bhari pics....anwat....
5 Apr 2016 - 2:56 am | श्रीरंग_जोशी
एका नेहमीपेक्षा वेगळ्या पर्यटनस्थळाचे प्रवासवर्णन फोटोज आवडले.