ब्रह्मदेश भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : ब्रह्मदेश लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
सांप्रत-भारताच्या आजूबाजूचा बऱ्याच मोठ्या भौगोलिक प्रदेशातील जनसमुदाय ऐतिहासिक काळात भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली एक सुसंस्कृत समाज म्हणून विकास पावला. आज भले ते स्वतःची ओळख वेगवेगळ्या देशाचे/धर्माचे प्रतिनिधी म्हणून असतील, परंतु वर्तमानातही अन्न, वेश, भाषा, लिपी, कला, स्थापत्य, वाङ्मय, तत्वज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रथा, पूजाविधी व परंपरा या सर्वांवर भारतीय संस्कृतीचा ठसा ओळखता येण्याइतका स्पष्ट आहे. यातील पूर्वेकडच्या काही प्रदेशाचा हा चित्रमय दौरा.
संपूर्ण प्रवासाचा आवाका बराच मोठा होता. ब्रह्मदेश, सयाम, लाओस, व कंबोडिया या चार देशांचा समावेश होता. त्यापैकी काही देशांवर इथे लेखन झालेले असल्याने पुनरावृत्ती टाळून लेखाचा मूळ विषय ब्रह्मदेशाभोवती अधिक ठेउन गरजेपुरती अन्य माहिती समाविष्ट करत आहे. पूर्वी 'पेरू' वर एक लेखमाला लिहिली होती, त्याप्रमाणेच विस्तृत लेखन करण्याचा मानस होता, परंतु वेळेअभावी कमी लेखांत शक्य तितका समावेशक दौरा घडविण्याचा प्रयत्न आहे. काही महिन्यांपासून भारत-थायलँड महामार्गही चर्चेत आहे त्यामुळे या दोघा देशांच्या मध्ये स्थित असलेल्या या नितांत सुंदर प्रदेशाविषयीची माहिती असे या लेखाचे प्रयोजन.
ब्रह्मदेश आपला अगदी सख्खा शेजारी. स्वातंत्र्यपूर्व काळात मद्रास-कलकत्ता-कराची इतकीच मंडले-रंगून ही परिचयाची शहरे होती. परंतु पुढे काही सामाजिक व राजकीय कारणांमुळे हा भूभाग दुरावला तो कायमचाच... 'आपलेपणाच्या' शिल्लक खाणाखुणांचा मागोवा घेत या समृद्ध प्रदेशातील एकल प्रवासाचा अनुभव काही स्मृतीचित्रांसमवेत या लेखांद्वारे गुंफण्याचा हा प्रयत्न.
पूर्वतयारी : एकंदर भौगोलिक आवाका लक्षात घेऊन बँकॉकला मध्यवर्ती ठिकाण बनवून सारा प्रवास आखला. भारतातून विमानेही बँकॉक साठी थेट व स्वस्त आहेत हे आणखी एक कारण. माझ्या आराखड्यानुसार थायलँडमध्ये किमान तीन वेळा येणेजाणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक 'ट्रिपल एन्ट्री व्हिसा' मिळविण्यास प्रयास पडले. पहिल्यांदा तर 'असा व्हिजा आम्ही करत नाही' असे सांगून वकिलातीने कागदपत्र परत पाठवून दिली. नंतर साधारण २५ दिवस सततचा पाठपुरावा, त्यांच्याच वेबसाईटचे दाखले व दिल्लीतील दूतावासाकडून मिळालेली मदत यामुळे शेवटी काम झाले. वेगवेगळ्या देशांना भेटी देत असल्याने तांत्रिकदृष्ट्या मला 'ट्रिपल एन्ट्री ट्रांझीट व्हीझा' मंजूर झाला.
(टीप : थायलँड 'ऑन अरायव्हल' सुद्धा व्हिसा देतो, परंतु त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे तीन तीन वेळा असा वेळेचा अपव्यय न करण्याचा योग्य सल्ला त्यांच्या दूतावासाकडून मिळला व तो अतिशय उपयोगी ठरला.)
ब्रह्मदेश व कंबोडिया दोन्ही देश ई-व्हिसा देतात. साधारण दोन ते पाच दिवसात ईमेल वर उत्तर येते. ब्रह्मदेशाचा ईव्हिसा मात्र केवळ मंडले व रंगून या दोन टिकाणी आगमन होणार असेल तरच मिळतो. बाकी कुठूनही देशात जाण्यासाठी रीतसर दिल्लीहून आधी व्हिसा करावा लागतो.
ब्रह्मदेश : सद्य भौगोलिक सीमांनुसार हा प्रदेश भारत व चीन यांच्या मध्ये स्थित आहे. (सांप्रत चीन व भारत यांची लांबवर समाइक सीमा हि खरी तिबेट सीमा आहे). सांस्कृतिक चीनचा भारताशी संबंध या भूमीवर आला व हा मिलाफ आजही पहावयास मिळतो. स्वतंत्र भारताची अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर व मिझोरम हि राज्ये ब्रह्मदेशास लगत आहेत. खरी छिंदविन नदी हि नैसर्गिक सीमा, परंतु नेहरूंच्या अनेक कृपाकर्तव्यांपैकी एकामुळे इथला नाग जमातींचे पूर्वापार वास्तव्य असलेला बराच भूभाग ब्रह्मदेशाच्या हद्दीत गेला. छिंदविन नदी पुढे इरावतीस जाऊन मिळते. इरावती हि ब्राह्मदेशाची जीवनरेखा. हिमालयातून उगम पावून अनेक महान संस्कृतींच्या विकासास आधार ठरणाऱ्या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र, इरावती, साल्विन, मेकॉंग, यांग्त्झी व हॉंगहे या महानद्यांपैकी पहिल्या चार भारतीय संस्कृतीच्या मातृका होत तर पुढच्या चार पौर्वात्य संस्कृतीच्या. ब्रह्मदेशाच्या बहुतांश प्राचीन राजधान्या व संपन्न शहरे ईरावतीच्या काठीच आहेत.
प्रवासाचा आराखडा:
प्रवास रूपरेखा : आधी लिहिल्याप्रमाणे, थायलँड प्रवासाचे तीन भाग केलेले होते. भारतातून प्रथम बँकॉक गाठले व त्यातील पहिला भाग 'शहरी पर्यटन / नैशाचारी पर्यटन' पूर्ण करून ब्रह्मदेशाकडे प्रस्थान ठेवले. मंडले हा प्रवासातील सर्वात उत्तरेकडचा बिंदू. तिथून सुरुवात करून क्रमाक्रमाने दक्षिणेस येत रंगून वरून पुनश्च बँकॉक, पुढे थायलँड भाग दुसरा 'ऐतिहासिक हिंदू-बौद्ध नागरी पर्यटन' तिथून पूर्वेकडे कंबोडिया प्रवास, पुनश्च थायलँड, भाग तीन, 'अतिउत्तर सीमावर्ती ग्रामीण पर्यटन' पुढे लाओस व शेवटी घरी परत असा एकंदर आराखडा…
गेल्या वर्षी उन्हाळ्यात ईशान्य भारतात प्रवास केला होता तेव्हा मणिपूर च्या सीमेवर ब्रह्मदेशाची प्रथम ओळख झाली. तेथे भारत-ब्रह्मदेश मैत्री करारानुसार १६ मैलांपर्यंत दोन्ही बाजूंच्या नागरिकांना एकमेकांच्या हद्दीत मुक्त प्रवेश आहे. मी आसाम, त्रिपुरा, नगालँड, मणिपूर असा भटकत सीमेवरच्या 'मोरे' गावातून तिथल्या अधिकाऱ्याचे सही-शिक्क्याचे पत्र घेऊन 'तामू' या ब्रह्मदेशाच्या हद्दीतल्या गावास भेट देऊन आलो. या देशाविषयी कुतूहल निर्माण झाले ते तेव्हा. तोही प्रवास अत्यंत रोमांचक होता, त्याविषयी पुन्हा कधी…
तर मग, ब्रह्मदेशात प्रवेशास तयार?
भारत - ब्रह्मदेश सीमा, मणिपूर
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
11 Mar 2016 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा !
कंबोडिया आणि थायलँड पाहिले आहेत. पण ते देश दुसर्याच्या नजरेतून बघायला मजा येईल. ब्रम्हदेश-लाओसला भेट देण्याचा योग अजून आलेला नाही, तेव्हा प्रवासवर्णनमेजवानीची वाट पाहत आहे !
11 Mar 2016 - 9:30 pm | प्रचेतस
सुरेख सुरुवात.
लेखमालेची वाट पाहात आहे.
14 Mar 2016 - 4:22 pm | नाखु
एका नवीन ठीकाणाची ओळख
11 Mar 2016 - 11:40 pm | पद्मावति
मस्तं रंगणार आहे ही मालीका. सुरवात छानच झालीय.
11 Mar 2016 - 11:50 pm | बोका-ए-आझम
कंबोडिया, इंडोनेशियाचा थोडा भाग आणि व्हिएटनाम एवढे भाग कामाच्या निमित्ताने पाहून झाले आहेत. पण त्यालाही १५ पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. आता काय परिस्थिती आहे हे वाचायला नक्कीच आवडेल!
12 Mar 2016 - 8:57 am | पैसा
या मालिकेची सुरुवात केल्याबद्दल खूप धन्यवाद!
12 Mar 2016 - 9:46 am | कंजूस
वाचायला आवडेल.
12 Mar 2016 - 11:12 am | अजया
उत्कंठा वाढवणारी सुरुवात.पुभाप्र
14 Mar 2016 - 3:44 pm | जगप्रवासी
नवीन देश बघायला भेटणार
14 Mar 2016 - 6:55 pm | पिलीयन रायडर
ज्या पद्धतीने माहिती दिली आहे ते आवडलं. शक्यतो आपल्या भटकंतीचा पुढच्याला त्याची सहल आखण्यात फायदा व्हावा. तुमच्या लेखातुन कधी ह्या देशांना भेट द्यायची झालीच तर खुपच माहिती मिळेल असे दिसते.
लेखमाला वाचायला उत्सुक!
9 Jun 2016 - 4:47 pm | उल्का
छान उपयुक्त माहिती.