विज्ञान लेखमाला : ०३ : प्राण्यांच्या वागणुकीचं शास्त्र – इथॉलॉजी

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in लेखमाला
28 Jan 2016 - 12:05 am

|| श्री गुरवे नम: ||

प्राण्यांच्या वागणुकीचं शास्त्र – इथॉलॉजी

बुद्धिमत्ता.. उत्क्रांतीच्या कालौघात मानवाला मिळालेली अभूतपूर्व देणगी. याच बुद्धीचा वापर करून मानवाने निसर्गातली अनेक कोडी उलगडायचा प्रयत्न केला. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली. याच बुद्धीच्या जोडीला मानवाला आणखी एक देणगी मिळाली, ती म्हणजे ‘मन’. प्रेम, वात्सल्य, राग, तिरस्कार, अहंकार, भीती अशा परस्परविरोधी अनेक भावना आणि त्याग, समर्पण, परोपकार, स्वार्थ, कृतघ्नता अशी परस्परविरोधी जीवनमूल्यं हे सर्व मनाचेच गुंतागुंतीचे आविष्कार. मनाची ही गुंतागुंत इतकी, की ‘मानसशास्त्र’ ही मनाचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आणि ‘मनोविकारशास्त्र’ ही मनाच्या आजारांची चिकित्सा करणारी वैद्यकशाखा निर्माण झाली.

माणूस हासुद्धा एक प्राणीच आहे. मग प्राण्यांमध्येसुद्धा माणसाप्रमाणे मन असतं का? प्राण्यांमध्ये माणसाएवढं प्रगल्भ आणि गुंतागुंतीचं मन नसेलही कदाचित, पण प्राणी विविध भावना दाखवतात, हे मात्र खरं. माणूस आपल्या मनातलं ‘बोलून’ दाखवू शकतो, शब्दांतून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. प्राण्यांना ‘बोलता’ येत नाही, पण त्यांच्या वागणुकीतून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करणार्‍या या शास्त्राला ‘इथॉलॉजी’ असं म्हणतात.

तसं पाहिलं, तर प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास काही अलीकडचा नाही. माणूस गुहेत राहत होता, टोळ्यांनी राहत होता, अगदी तेव्हाही शिकार करणं आणि हिंस्र / धोकादायक प्राण्यांपासून बचाव या कारणांनी प्राण्यांशी त्याचा संबंध येतच होता. आता ज्या प्राण्याची शिकार करायची, किंवा ज्या प्राण्यापासून स्वत:चा बचाव करायचा, त्याच्या वागणुकीचा अभ्यास करायला हवा, त्याच्या सवयी माहीत असायला हव्या. पुढे माणसाने काही प्राणी पाळायला सुरुवात केल्यावर प्राण्यांशी माणसाचा सहसंबंध सुरू झाला. ज्या प्राण्याकडून काम करून घ्यायचं, त्याच्या सवयी, विशेष क्षमता अभ्यासायची गरज निर्माण झाली.

अस असलं, तरी एक शास्त्र म्हणून, जीवशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून इथॉलॉजीचा पद्धतशीर, शास्त्रशुद्ध अभ्यास गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांतलाच. याच काळात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात ‘न भूतो’ अशी प्रगती झाली आणि विज्ञानाच्या नव्या शाखाही उदयाला आल्या. इथॉलॉजी हे याच काळाचं अपत्य. इथॉलॉजी म्हणजे शक्यतो नैसर्गिक अधिवासात, नैसर्गिक परिस्थितीमध्ये प्राणी कसे, का, कधी, कशामुळे वागतात याचा अभ्यास. आहार, निद्रा, भय आणि मैथुन (वंशसातत्य टिकवणं) या कोणत्याही प्राण्याच्या आदिम नैसर्गिक प्रेरणा. म्हणजेच अन्न मिळवणं, शत्रूपासून संरक्षण, विणीच्या काळात जोडीदाराची निवड इ. गोष्टी प्राणी कसे शिकतात, कसे करतात याचा अभ्यास. मुख्यत: कॉनरॅड लोरेन्झ (१९०३-१९८९, ऑस्ट्रिया), निको टिन्बर्गेन (१९०७-१९८८, नेदरलँड्स) आणि कार्ल व्हॉन फ्रिश (१८८६-१९८२, ऑस्ट्रिया) या तीन शास्त्रज्ञांच्या मूलभूत आणि सखोल संशोधनामुळे हे एक वेगळं शास्त्र जन्माला आलं आणि विकसित झालं. या कामगिरीसाठी १९७३ साली या तिघांना नोबेल पुरस्कार बहाल केला गेला.

कॉनरॅड लोरेन्झ या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाला इथॉलॉजीचा जनक मानलं जातं. लोरेन्झ हे ऑस्ट्रियामधले एक जमीनदार. त्यांनी त्यांच्या कुरणावरच्या अनेक प्राणी-पक्ष्यांचं निरीक्षण केलं, त्याचबरोबर त्यांनी काही प्राणी-पक्षी पाळले आणि त्यांच्यावरही प्रयोग केले. प्राण्याच्या वागणुकीमध्ये आनुवंशिकतेचा भाग किती आणि कोणता? पिल्लू जन्मल्यानंतर कसं, कधी आणि काय शिकतं? त्याला भोवतालच्या जगाची माहिती कशी होते? यासंबंधी त्त्यांनी अनेक प्रयोग केले आणि काही नव्या संकल्पना शोधून काढल्या.

आपलं जीवन जगण्यासाठी आपल्या भोवतालच्या जगाबद्दल ज्ञान होणं आवश्यक आहे. माळरानावरच्या पक्ष्यांच्या पिल्लांचा जन्म झाल्यावर ती लगेच इकडेतिकडे तुरुतुरु धावतात, पण आईच्या आवतीभोवती असतात. काही धोका जाणवला, तर आई त्यांना हाक देते आणि पिल्लं धावत आईच्या पंखाखाली येतात. आपल्याला संरक्षण देणारी आई ते कशी ओळखतात? बदकाचं अंडं कोंबडीने उबवलं, तर बदक पिल्लू कोंबडीला आई मानतं.. असं का? कावळ्याने कोकिळेचं अंडं उबवल्यावर हेच घडतं. आई आपल्यासारखी दिसत नाही, तर ती आपली आई कशी असू शकेल? असा विचार ती पिल्लं करत नाहीत. पिल्लं आईला कसं ओळखतात? आईबरोबर त्या पिल्लाचे नातेबंध कसे जुळतात? याचा अभ्यास करण्यासाठी लोरेन्झनी कोंबडीच्या आणि बदकांच्या पिल्लांवर अनेक प्रयोग केले. त्यांनी आणि त्यांच्या साहाय्यकांनी कृत्रिम उबवणी यंत्रामध्ये बदकांची अंडी उबवली. या काळात ते आपला आवाज ‘अंड्यांना (अंड्यातल्या पिल्लांना)’ सतत ऐकवत राहिले. (अभिमन्यूची आठवण झाली ना?) पिल्लं बाहेर आल्यावर त्यांच्या दृष्टीला पडलेली पहिली गोष्ट म्हणजे ही माणसं. त्यांनाच ती पिल्लं आई मानायला लागली. माणसंच नव्हे, तर हलवत ठेवलेला फुगा, ठोकळा अशा निर्जीव वस्तूही त्यांनी वापरून पहिल्या. जन्मत:च नजरेला पडणार्‍या अशा हलत्या प्रत्येक गोष्टीला पिल्लांनी आपली आई मानलं. एका प्रयोगात सगळ्या पिल्लांना मधोमध एकत्र ठेवून जेव्हा त्यांचे चार वेगवेगळे ‘दत्तक पालक’ आवाज करत चार दिशांना चालायला लागले, तेव्हा पिल्लांनी आपापली पालक आई बरोब्बर ओळखून ‘ति’च्या मागे चालायला सुरुवात केली.

या सर्व प्रयोगांवरून लोरेन्झनी संकल्पना मांडली की जन्म होताच पिल्लांच्या मनावर काही गोष्टींचा ठसा उमटतो (इम्प्रिंटिंग). जन्म झाल्याझाल्या नजरेला पडणारा पाहिला जीव (पहिली गोष्ट) म्हणजे आई, कानावर पडणारा पहिला आवाज म्हणजे आईचा, या गोष्टींचा ठसा पिल्लांच्या मेंदूवर उमटतो. आता आपल्या मनात येईल की, आपल्यासारखी न दिसणारी वस्तू आपली आई कशी असू शकेल, असा प्रश्न त्या पिल्लाला पडत नसेल का? हा प्राणी / ही वस्तू वेगळी दिसते, मग ती आपली आई कशी असेल, एवढी साधी गोष्ट त्या पिल्लाला समाजत नाही? पण जरा खोलात जाऊन विचार केला, तर लक्षात येईल की पिल्लू जन्माला येताच आईव्यतिरिक्त दुसरी कोणतीतरी गोष्ट नजरेला पडणं असं नैसर्गिक स्थितीमध्ये घडत नाही. समोर आईच दिसते, आईचाच आवाज कानावर पडतो. त्यामुळे नजरेस पडणारी पहिली गोष्ट म्हणजे आई, हा मेंदूवर आईचा ठसा उमटणं अगदी सयुक्तिक वाटतं.

या प्रयोगांमुळे काही गमतीजमतीही घडायच्या. लोरेन्झ एकदा आपल्या ‘मॅलार्ड’ पिल्लांना घेऊन घराबाहेरच्या बागेत फिरायला बाहेर पडले. मॅलार्ड आई सतत आवाज करत राहते आणि पिल्लांना मिनिटभरही तिचा आवाज ऐकू आला नाही, तर ती कावरीबावरी होतात. त्यामुळे लोरेन्झ तोंडाने ‘क्वेग्गेग्गेग्गेग्गेग क्वेग्गेग्गेग्गेग्गेग’ असा अथक आवाज काढत, चवड्यांवर बसून मॅलार्ड आईसारखं डावी-उजवीकडे डुलत, पुढे जात होते. पाठीमागून पिल्लं येत होती. सहजच कुंपणाकडे त्याचं लक्ष गेलं आणि.. कुंपणाच्या भिंतीपलीकडे दिसले आठ-दहा जणांचे गोंधळलेले, प्रश्नार्थक चेहरे.. कारण, बागेतल्या उंच गवतामध्ये छोटी पिल्लं लपून गेल्यामुळे, त्या बघ्यांना फक्त दिसत होते ‘क्वेग्गेग्गेग्गेग्गेग क्वेग्गेग्गेग्गेग्गेग’ असा आवाज काढत, चवड्यांवर बसून डावी-उजवीकडे डुलत पुढे सरकणारे दाढीधारी, प्रतिष्ठित गृहस्थ लोरेन्झ!

सागरी कासवांच्या बाबतीतही पिल्लांच्या मेंदूवर जन्मस्थानाचा ठसा उमटतो. कासव मादी समुद्रकिनार्‍यावर खड्डा खणून त्यात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आल्यावर पिल्लं समुद्राकडे चालायला लागतात. त्यातली अनेक पिल्लं भक्षकाचं भक्ष्य होतात. पण काही पिल्लं यशस्वीपणे समुद्रात पोहोचतात. त्यातल्या मादी पिल्लांच्या मेंदूमध्ये या प्रवासाचा ठसा उमटतो. मग ती मादी प्रजननक्षम होते आणि नराबरोबर मिलन होतं, तेव्हा अंडी घालायला ती त्याच किनार्‍यावर येते. कोकणच्या (विशेषत: वेळासच्या) आणि ओडिशाच्या किनार्‍यावर ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या संख्येने अंडी घालायला येतात.

नंतर इतरही शास्त्रज्ञांनी इम्प्रिंटिंगसंबंधी प्रयोग केले. त्यात दिसून आलं की पिल्लाच्या मेंदूवर अशाच प्रकारे भावंडांबद्दलही ठसा उमटतो. जन्मत:च उमटलेल्या या ठशांचा दूरगामी परिणाम होतो, त्यामुळे आपल्या सख्ख्या नातलगांशी पुढे लैंगिक संबंध टाळले जातात. म्हणजे ते आपली भावंडं ओळखतात असा अर्थ नाही. तर, आपल्याच भावंडांशी लैंगिक संबंधांची प्रेरणा या ठशांमुळे दुबळी होत असावी आणि ‘सगोत्र विवाह’ टाळले जात असावेत.
ठसे उमटण्याची ही प्रक्रिया एक-दोन दिवसांतच घडते, त्यानंतर थांबते. अगदी लहानपणी उमटलेले हे ठसे पिल्लावर दूरगामी परिणाम करून जातात.

प्राण्याचं रोजचं जीवन म्हणजे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. जगण्याच्या या रोजच्या लढाईत असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा त्यांना तोंड कसं द्यायचं, हे शिकायला वेळच नसतो. सर्वच पिल्लांमध्ये (अगदी माणसामध्येसुद्धा) काही ‘ज्ञान’ जन्मजात असतं. कॉम्प्युटरमध्ये BIOS असते, तसंच काहीसं. आईचं दूध कसं प्यायचं ते सस्तन प्राण्यांच्या पिल्लाला शिकावं लागत नाही. धोक्याची जाणीव झाली आणि आई-बाबा जवळ दिसत नसले की सुरक्षित जागी दबकून स्तब्ध राहायचं, हे प्राण्यांच्या पिल्लांना शिकावं लागत नाही. जिवावर बेतणार्‍या प्रसंगांमध्ये कसं वागायचं हे जन्मजात ‘ज्ञान’ त्यांच्याकडे नसतं, तर ते शिकण्यापूर्वीच पिल्लं शिकारी प्राणी-पक्ष्याच्या पोटात जातील. मग अशा प्रसंगात पिल्लं वागतात, त्याला सहजप्रेरणा (Instinct) म्हणतात. प्रत्येक जातीनुसार पिल्लामध्ये काही सहजप्रेरणा असतात.

निको टिन्बर्गेन या शास्त्रज्ञाने स्टिकलॅबक माशाचा आणि कुरव (सी गल) पक्ष्यांचा अभ्यास करून 'सहजप्रेरणा' या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्यांनी खिडकीजवळच्या काचपेटीत (फिश टँकमध्ये) स्टिकलबॅक मासे ठेवले होते. त्यांच्या विणीच्या काळात नराचं पोट लालचुटुक होतं. नर शेवाळापासून घुमटासारखं घरटं बांधतो, त्याला वरून एक भोक पाडतो आणि त्यात मादीने अंडी घातल्यावर, अधूनमधून घरट्यावर (पंख हलवून) ‘वारा घालतो’. ही कृती समजून केलेली असते का? ती कशासाठी केलेली असते? यासंबंधी अनेक प्रयोग केल्यावर लक्षात आलं की अंड्यांच्या वाढीसाठी जादा प्राणवायूची आवश्यकता असते. पंख हलवून अंड्यांवर ताजं पाणी सोडलं गेल्यामुळे अंड्यांना आवश्यक प्राणवायू मिळतो. घरट्याला भोक पाडून त्यावर पंख हलवून ताजं पाणी सोडणं ही सहजप्रेरणेने घडणारी वागणूक होती. त्याच काळात, दिवसाच्या ठरावीक वेळी नर स्टिकलबॅक अत्यंत अस्वस्थ आणि आक्रमक होतो, असं दिसलं. प्रयोगानंतर लक्षात आलं की दिवसाच्या ज्या ठरावीक वेळी रस्त्यावरून पोस्टाची लाल गाडी जाते, त्या वेळी तो अस्वस्थ होतो. लाल रंग या ‘उद्दीपकाला’ (Stimulusला) तो एक सहजप्रेरणेचा प्रतिसाद (Instinctive Response) होता. जणू काही दुसरा नर स्टिकलबॅक त्याच्या मालकीच्या जागेवर घुसखोरी करू बघत होता..

टिन्बर्गेन यांनी केलेल्या कुरव पक्ष्यांच्या अभ्यासातही उद्दीपक म्हणून रंगाचं आणखी एक वेगळं उदाहरण पाहायला मिळालं, तसंच सहजप्रेरणेच्या यंत्रणेवरही प्रकाश पडला. कुरव आईच्या पिवळ्या चोचीवर एक लाल ठिपका असतो, त्यावर चोचीने टकटक केलं की अन्न मिळतं, ही कुरव पिल्लाला जन्मापासूनच सहजप्रेरणा असते. हा ठिपका लालच असला पाहिजे असं नाही, तो पिवळ्या रंगावर ठळकपणे उठून दिसला तरी पुरे, हेही प्रयोगान्ती लक्षात आलं. अंड्यांतून पिल्लं बाहेर आली की आई-बाबा अंड्यांची टरफलं दूर नेऊन टाकतात. चंडोल (Crested Lark), डोंबारी (Sparrow-Lark), लावी (Quails), तित्तिर (Grey Patridge / Francolin) वगैरे माळरानावर राहणारे पक्षीही हेच करताना दिसतात. टरफलाच्या आतल्या पांढर्‍या रंगामुळे भक्षक प्राणी-पक्ष्यांचं लक्ष सहज वेधलं जाईल, म्हणून सहजप्रेरणेने केलेली ती कृती असते. कुरवांच्या घरट्यांच्या वसाहती असतात. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी अनेक निरीक्षणं करता आली. घरटी चाळीसारखी एकमेकांच्या जवळ जवळ असतात की बंगल्यासारखी एकमेकांपासून अंतर राखून? सगळे कुरव एकाच वेळी का अंडी घालतात? अशा प्रश्नांची उत्तरं मिळाली. इतरांच्या आधी किंवा नंतर अंडी घातली, तर त्याकडे भक्षकांचं सहज लक्ष जाईल, म्हणून सगळे कुरव साधारण एकाच वेळी अंडी घालतात; चाळीतल्या खोल्यांसारख्या, एकमेकांना खेटून असलेल्या घरट्यांमध्ये अंडी जास्त सुरक्षित राहतात, त्यातही साधारण मध्यभागी असलेल्या घरट्यांमधली अंडी जास्त सुरक्षित राहतात, आणि एकत्र राहिल्यामुळे शत्रूचा प्रतिकार करता येतो, असं लक्षात आलं.

आपल्यालाही प्राण्यांच्या सहजप्रेरणेचे अनेक अनुभव येत असतात - विशेषत: ज्यांनी कुत्रा, मांजर, मासे, पोपट, लव्ह बर्डस असे पाळीव प्राणी पाळलेले असतील, त्यांना नक्कीच येतात. माझ्या एका डॉक्टर मित्राच्या पाळीव कुत्र्यासंबंधी मला आलेले हे दोन अनुभव -

मित्राने पाळलेला हा जातिवंत कुत्रा नव्हता, रस्त्यावरचा भटका कुत्रा होता. अगदी लहान पिल्लू असताना मित्राने त्याला घरी आणून पाळलं होत. टॉमी त्याचं नाव. माझी-त्याची चांगलीच गट्टी. मित्राच्या घरी गेल्यावर सर्वात आधी टॉमीशी चार-पाच मिनिटं दंगा करायचा आणि मगच इतरांशी बोलायचं, असा शिरस्ता. एकदा माझ्या घरी काही वैद्यकीय वापरासाठी हायड्रोजन पेरॉक्साइडची बाटली आणली होती. त्यातलं उरलेलं औषध मित्राच्या दवाखान्यात उपयोगी पडेल, म्हणून ती बाटली घेऊन त्याच्या घरी गेलो आणि.. दरवाजा उघडण्यापूर्वीच टॉमीने भुंकून हैदोस घातला. शेवटी मी घरात जाऊन साबणाने हात-पाय धुतले, तेव्हा कुठे तो शांत झाला आणि नेहमीप्रमाणे माझ्याशी दंगा करायला आला. कुत्र्यांमध्ये दृष्टीपेक्षा गंधाची संवेदना तीव्र असते, त्यामुळे गंधाशी संबंधित सहजप्रेरणा जास्त प्रबळ ठरली. त्याच्या नजरेला जरी मी (त्याचा मित्र) दिसत असलो, तरी हायड्रोजन पेरॉक्साइडच्या उग्र गंधामुळे मी अनोळखी असल्यासारखा तो भुंकायला लागला. दुसर्‍या प्रसंगामध्ये, याच मित्राच्या मुलाला सापाची कात सापडली. ती घेऊन तो घरी पोहोचला मात्र.. टॉमी शेपूट घालून आतल्या खोलीत पलंगाच्या खाली जाऊन दडला. वास्तविक, टॉमी हा शहरात (चेंबूरमध्ये) जन्मलेला आणि वाढलेला कुत्रा. तो काही जंगलात जन्मला नव्हता. त्याला साप माहीत असायचं काहीच कारण नाही. सापाशी त्याचा कधीच संबंध आला नव्हता. तरीही त्याच्या सहजप्रेरणेमुळे त्याची वागणूक घडली.

कार्ल व्हॉन फ्रिश यांनी प्राण्यांमध्ये ‘शब्दावाचून कळले सारे’ – म्हणजे शारीरिक संदेश कसे दिले-घेतले जातात यावर संशोधन केलं. त्यांनी यासाठी मधमाश्यांचा अभ्यास केला. त्यांच्या पोळ्याच्या आसपास भरपूर मकरंद असलेली फुलं कुठे आहेत हे त्यांना कसं कळतं? हा शोध घेण्यासाठी त्यांनी पाळलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यापासून दूर अंतरावर एका ताटलीत पाक ओतला आणि ते शेजारी बसले. थोड्या वेळाने एक मधमाशी आली. तिच्या पाठीवर त्यांनी ब्रशने रंगाचा एक ठिपका दिला. थोड्या वेळाने ती माशी उडाल्यावर त्यांनी पोळ्याजवळ असलेल्या आपल्या सहकार्‍यांना इशारा केला. ती पोळ्यात आल्यावर बाकीच्या माश्या तिच्याभोवती गोळा झाल्या. मग ती ठिपकेवाली माशी विशिष्ट प्रकारे पोट हलवून वर्तुळाकार नाचायला लागली. मग तिने ‘सांगितल्याप्रमाणे’ काही माश्या अन्नाच्या स्रोताकडे (पाकाच्या ताटलीकडे) आल्या. मात्र ती माशी आली नव्हती. नंतर त्यांनी अन्नसाठा कमी-जास्त केला, पोळं आणि अन्नसाठा यांच्यातलं अंतर कमी-जास्त केलं, अन्नासाठ्याची दिशा बदलली आणि प्रत्येक वेळेला त्या टेहाळी माशीच्या नृत्याचा अभ्यास केला. पोट हलवण्याचा वेग, त्याची दिशा, वर्तुळाचा परीघ अशा तिच्या हालचालींची रेखाचित्रं काढली. त्यावरून लक्षात आलं की या खास टेहळ्या ‘खबर्‍या’ (स्काउट) माश्या परिसरात फिरतात आणि विशिष्ट प्रकारे नृत्य करून अन्नासाठ्याबद्दलची सर्व माहिती इतर माश्यांपर्यंत बरोबर पोहोचवतात. ‘शब्देविण संवादू’.. असंच काहीसं.

या तिघांच्या मूलभूत संशोधनानंतर जगभरात अनेक वैज्ञानिकांनी विविध प्रयोग केले. काहींनी प्रयोगशाळेतही प्रयोग केले. उंदरावरच्या एका प्रयोगात, पिंजर्‍यातला एक विशिष्ट दिवा लागल्यावर एक कळ दाबायची, म्हणजे एक दर उघडून अन्न मिळतं, असं उंदराला शिकवलं. ही अर्थातच सहजप्रेरणा नव्हती, तर अनुभवाने शिकणं होतं.

दुसर्‍या एका प्रयोगात एका बेडकाला एक चतुर खायला दिला, तो त्याने खाल्ला, नंतर गांधीलमाशीसारखी दिसणारी माशी दिल्यावर तीसुद्धा खाल्ली, पण नंतर खरी गांधीलमाशी दिल्यावर तिने जिभेला दंश केल्यावर हा कीटक खाणं टाळायला हवं हे शिकून नंतर खरी आणि नकली गांधीलमाशी नाकारली, पण चतुर दिल्यावर मात्र तो खाल्ला. असंच दुसरं उदाहरण म्हणजे डॅनाइडी उपकुलाच्या काही फूलपाखरांचे भक्षक पक्षीही अनुभवातून या फूलपाखरांना टाळायला शिकतात. या फूलपाखरांच्या अळ्या रुईची पानं खाऊन वाढतात. पानातल्या अल्कलॉइड्समुळे त्या चवीला कडवट आणि विषारी होतात. पुढे त्यांचं फूलपाखरू झाल्यावर त्यांना एखाद्या पक्ष्याने खाल्लं तर पक्ष्याला त्रास होतो, म्हणून पक्षी नंतर अशी फूलपाखरं खायचं टाळतात. (ही विशिष्ट फूलपाखरं विषारी आणि चवीला वाईट आहेत, याचं भक्षकांना जन्मजात ज्ञान – सहजप्रेरणा – नसतं.) याचा फायदा घेण्यासाठी, मुळात कडवट नसलेल्या डॅनिड एग फ्लाय या फूलपाखराच्या मादीने कडवट फूलपाखराच्या रंगरूपाची नक्कल केली आहे. त्यामुळे पक्षी या चांगल्या चवीच्या फूलपाखरालासुद्धा टाळतात. (जीवशास्त्रामध्ये याला ‘बेटेशियन नक्कल’ म्हणतात. यासंबंधी लेख स्वसंरक्षणासाठी फुलपाखराची युक्ती जरूर वाचा.) प्राण्यांच्या वागणुकीची ही उदाहरणं म्हणजे ‘अनुभवातून आलेलं शहाणपण’.

स्वजातीच्या इतर प्राण्यांचं अनुकरण म्हणूनही प्राण्यांची वागणूक पाहायला मिळते. कधी अपघाताने एखाद्या प्राण्याला काही शोध लागतो आणि मग इतर प्राणी त्याचं अनुकरण करतात. विशेषत: समूहाने राहणार्‍या प्राण्यांमध्ये हे बघायला मिळतं. याबाबतीत माझा एक गमतीदार अनुभव सांगतो. एकदा सकाळी फिरायला गेलो, तेव्हा शेजारच्या सोसायटीच्या तळमजल्यावरच्या घराच्या खिडकीखाली बरेच कावळे जमा झालेले दिसले. खिडकीमध्ये दूधवाल्या ‘मड्डूअण्णा’ने (मुंबईत पूर्वी भैय्ये दूध आणून द्यायचे, हल्ली लुंगीधारी ‘मड्डूअण्णा’ देतात.) ठेवलेल्या दुधाच्या गळक्या पिशवीतून गळणार्‍या दुधाची मेजवानी चालली होती. एक कावळा धीर करून खिडकीत चढला आणि त्याने गळणार्‍या भोकातून दूध पिण्यासाठी भोकावर चोच मारली. त्यामुळे भोक मोठं झालं आणि दूध जास्त जोरात गळायला लागलं. चोच मारून भोक मोठं करता येतं, हा कावळ्यांना अपघाताने नवा शोध लागला. मी त्यांना हुसकावून लावलं. तीन-चार दिवसांनी पाहिलं, तेव्हा दूधवाल्याने चांगली (न गळणारी) पिशवी खिडकीत ठेवली, तर कावळ्यांनी पिशवीला मुद्दाम चोची मारून भोक पाडलं आणि दूध मिळवलं. एका कवळ्याला अपघाताने शोध लागला, त्याचं इतरांनी अनुकरण केलं. असं आणखी दोन-तीनदा झाल्यावर मात्र मी त्या घरातल्यांना सांगितलं आणि दुधाची पिशवी दरवाजातून हातात घ्यायला लागल्यावर हा प्रकार थांबला.

माणसाला बर्‍याच गोष्टी शिकाव्या लागतात. कुरव पिल्लांना आणि नर स्टिकलबॅकला लाल रंगाचा अर्थ शिकावा लागत नाही, माणसाला मात्र लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं हे शिकावं लागतं. बुद्धिमत्तेच्या वरदानामुळे माणूस विचार करू शकतो, विश्लेषण (Analysis) करू शकतो आणि त्याला जिज्ञासेपोटी, कुतूहलापोटी चाकोरीबाहेरचं नवं काहीतरी सुचतं. 'सुचणं' हा प्रतिभेचा आविष्कार मात्र डॉल्फिन, चिंपांझी यासारख्या, बुद्धिमान मानले गेलेल्या मोजक्याच प्राण्यांच्या वागणुकीमध्ये - मर्यादित प्रमाणात का होईना - दिसतो. चिंपांझीच्या एका उंच पिंजर्‍याच्या छताला केळी टांगली होती. पिंजर्‍यात लाकडाची काही खोकी पडली होती, ती एकमेकांवर रचून केळ्यांपर्यंत पोहोचता येईल, ही कल्पना चिंपांझीला ‘सुचली’. तसंच एका चिंपांझीने काठी वापरून उंचावर टांगलेली केळी मिळवली. या चिंपांझींना काहीतरी सुचल्यामुळे ते तसे वागले.

तीन शास्त्रज्ञांनी पाया घातलेल्या इथॉलॉजीची ही धावती तोंडओळख. ठसा उमटणं, सहजप्रेरणा, अनुभव, अनुकरण, प्रतिभा इ. कारणांमुळे प्राण्यांची विशिष्ट वागणूक घडते, हे इथॉलॉजीच्या प्रवासात उलगडत गेलं. पुढे आणखी संशोधन करताना वागणुकीमागची प्रक्रिया, प्रेरणांची कारणं यांचा अभ्यास करताना इतरही शास्त्रशाखांचा अभ्यास इथॉलॉजीला जोडला गेला. भूक लागली की प्राणी अन्न शोधतो, हिवाळा सुरू झाला की थंड प्रदेशातले पक्षी उबदार प्रदेशाकडे स्थलांतर करायला प्रवृत्त होतात, विणीचा हंगाम सुरू झाला की जोडीदाराचा शोध सुरू होतो आणि नर ‘प्रणयनृत्य’ करू लागतात या वागणुकीमध्ये भूक लागणं, हिवाळ्याची सुरुवात, विणीचा ठरावीक काळ ही झाली (बाह्य) कारणं. पण या सर्व बाह्यप्रेरणांनी शरीरात अंतर्गत बदल घडतात, ते अभ्यासण्यासाठी ‘शरीरक्रियाशास्त्र’चा (Physiologyचा) अभ्यास करावा लागतो. प्रणयाराधनासारख्या कृती संप्रेरकांमुळे घडतात, म्हणून अंत:स्रावविज्ञाना’चा (Endocrinologyचा) अभ्यास आवश्यक ठरतो. काही वागणुकींमागचं (उदा. पाळीव कुत्रा आपल्या मालकाचा हुकूम तत्परतेने का पाळतो?) कारणं शोधण्यासाठी उत्क्रांतीशास्त्राचा, अनुवंशशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. उत्परिवर्तनामुळे (Mutationमुळे) वागणुकीमध्ये झालेला बदल समजण्यासाठी जनुकशास्त्राचा (Geneticsचा) अभ्यास करावा लागतो. सर्व निरीक्षणांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्यासाठी संख्याशास्त्राचा आधार घ्यायला लागतो. अशा अनेक शास्त्रांची सांगड घालत इथॉलॉजी बहरते आहे.. प्राणिविश्वाकडे आपल्याला डोळसपणे बघायला शिकवण्यासाठी.

संदर्भ :
King Solomon’s Ring by Konrad Lorenz
आपली सृष्टी, आपले धन – खंड चौथा, निसर्ग प्रकाशन, पुणे.

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Jan 2016 - 11:27 pm | पैसा

अत्यंत मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख!

सतिश गावडे's picture

27 Jan 2016 - 11:39 pm | सतिश गावडे

छान माहितीपुर्ण लेख. आवडला.

फारच रोचक लेख व अनुभव. यावरून काही दिवसांपूर्वी एका कावळ्याची ध्वनिचित्रफीत जालावर गाजत होती ती आठवली. तसेच लांडग्यांची बुद्धिमत्ता ही कुत्र्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा सरस कशी असते हे सांगणारा डिस्कव्हरी चॅनलवरचा एक कार्यक्रमही आठवला.

उगा काहितरीच's picture

28 Jan 2016 - 12:09 am | उगा काहितरीच

छान लेख.

रामपुरी's picture

28 Jan 2016 - 12:17 am | रामपुरी

रोचक माहिती

Jack_Bauer's picture

28 Jan 2016 - 12:56 am | Jack_Bauer

खूप वेगळा विषय आणि छान माहिती. तो एक गुलाम आणि सिंह ह्यांची गोष्ट आठवली.

या विज्ञानमालेमधील प्रत्येक लेख वाचनीय आणि संग्रहणीय होणार आहे असं दिसतंय!

नूलकरांचा हा लेखही आवडला. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.

सुनील's picture

28 Jan 2016 - 8:07 am | सुनील

लेख आवडला आणि भावलादेखिल.

(श्वान आणि कासवाचा पालक) सुनील

"त्यामुळे आपल्या सख्ख्या नातलगांशी पुढे लैंगिक संबंध टाळले जातात. म्हणजे ते आपली भावंडं ओळखतात असा अर्थ नाही. तर, आपल्याच भावंडांशी लैंगिक संबंधांची प्रेरणा या ठशांमुळे दुबळी होत असावी आणि ‘सगोत्र विवाह’ टाळले जात असावेत.
ठसे उमटण्याची ही प्रक्रिया एक-दोन दिवसांतच घडते, त्यानंतर थांबते. अगदी लहानपणी उमटलेले हे ठसे पिल्लावर दूरगामी परिणाम करून जातात."

-तसं नेहमीच नसावं.माझ्याकडच्या फिशटँकमधल्या चाळीस वर्षांच्या अनुभवातून सांगतो.प्रजोत्पादन करणे याला अधिक महत्त्व दिलं जातं प्राण्यांकडून.याचा अर्थ असा होतो की अगोदरच्या पिढ्यांतील वेगवेगळ्या "मूळपुरुषाचे" गुणसूत्रं सुप्तावस्थेत संभाळून ठेवली जातात आणि वेळप्रसंगी पुढे येतात.

नाखु's picture

28 Jan 2016 - 8:48 am | नाखु

वेगळ्या विषयावरची माहीती. भाजे लेण्याच्या कट्ट्यावर झलक पाहिलीच होती. तुमच्या चिकाटीला आणि लेखनशैलीला कुर्नीसात.

वि.लेखमालेचा पंखा नाखु

मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख.आवडला.

बोका-ए-आझम's picture

28 Jan 2016 - 9:06 am | बोका-ए-आझम

पण हा लेखाचा नाही तर लेखमालिकेचा विषय आहे. वाट पाहातोय.

सुहास झेले's picture

28 Jan 2016 - 9:21 am | सुहास झेले

वाह... माहितीपूर्ण लेख. निसर्गाने सर्वांनाच काहीनाकाही भरभरून दिले आहे. मस्त वाटले लेख वाचून :) :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2016 - 9:41 am | कैलासवासी सोन्याबापु

एकच नंबर!!! आमची आजी नेहमी एक गोष्ट सांगत असे म्हणे "कुत्री गुरं वगैरे खुप माया लावतात बाबा त्यांना ही भावना असतात" २० दिवस बाहेरगावी राहून घरी परत आलो की उड्या मारून अक्षरशः हसणारे आमचे जर्मन शेफर्ड आठवले कुशीत मान खुपसुन घुसळणारी गोठ्यातली जनावरे आठवली ! अन ते तसे का करतात ह्याच्या बद्दल वैज्ञानिक माहीती मिळाली ! :)

प्रचेतस's picture

28 Jan 2016 - 9:44 am | प्रचेतस

खूपच सुरेख लेख.
अतिशय आवडला.

प्राची अश्विनी's picture

28 Jan 2016 - 10:13 am | प्राची अश्विनी

लेख आवडला.

किलमाऊस्की's picture

28 Jan 2016 - 10:16 am | किलमाऊस्की

वेगळ्या विषयावर माहिती कळली.

सस्नेह's picture

28 Jan 2016 - 10:24 am | सस्नेह

प्राण्यांच्या भावविश्वाची रोचक माहिती.

यशोधरा's picture

28 Jan 2016 - 10:35 am | यशोधरा

लेख अतिशय आवडला!

प्रमोद देर्देकर's picture

28 Jan 2016 - 11:02 am | प्रमोद देर्देकर

खुप छान माहितीयुक्त लेख. आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2016 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत अप्रतिम लेख.

नुलकरसाहेब, या विषयाची इतकी सुंदर तोंडओळख करून दिली आहेत तुम्ही की तुमच्या कडून या विषयावरच्या एका दीर्घ लेखमालेची अपेक्षा ठेवणे अनिवार्य झाले आहे ! जरूर लिहा.

शान्तिप्रिय's picture

28 Jan 2016 - 12:12 pm | शान्तिप्रिय

अतिशय सुन्दर. संग्राह्य लेख!

फारच माहितीपूर्ण आणि रोचक लेख. आवडला.

कविता१९७८'s picture

28 Jan 2016 - 12:47 pm | कविता१९७८

माहीतीपुर्ण छान लेख

प्रीत-मोहर's picture

28 Jan 2016 - 3:14 pm | प्रीत-मोहर

आवडीचा विषय आल्याने विषेश आवडला हा लेख :)

मराठी कथालेखक's picture

28 Jan 2016 - 3:57 pm | मराठी कथालेखक

प्राण्यांना ‘बोलता’ येत नाही, पण त्यांच्या वागणुकीतून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात.

माणसाच्या सहवासात पोपट बोलायला शिकतात (असं मी ऐकून आहे, मी प्रत्यक्षात अनुभवलेल नाही) हे खर असेल तर मग पोपट काय बोलतात ? त्या बोलण्यातून काही बुद्धीमत्ता /भावूकता प्रगट होते का ?
बाकी मांजरींचे काही किस्से कुणी सांगू शकेल काय?

सूड's picture

28 Jan 2016 - 4:55 pm | सूड

सुंदर!!

‘शरीरक्रियाशास्त्र’ = Physiology
'अंतस्रावविज्ञान’ = Endocrinology
'उत्परिवर्तन' = Mutation
'जनुकशास्त्र' = Genetics

इत्यादिकांचाही परिचय झाला. ह्यातील कितीतरी गोष्टी ह्याआधी मला माहीतच नव्हत्या.

आदिजोशी's picture

28 Jan 2016 - 6:37 pm | आदिजोशी

एकच शब्द :)

स्वाती १'s picture

28 Jan 2016 - 6:53 pm | स्वाती १

माहितीपूर्ण लेख आवडला. अशा लेखमालिकेची कल्पनाही छान आहे!

राजेश घासकडवी's picture

28 Jan 2016 - 7:05 pm | राजेश घासकडवी

माहितीपूर्ण आणि रंजक असं दोन्ही असलेला लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. व्यक्तिगत अनुभवांमुळे तो वाचनीय होतो, आणि वाचकांचे स्वतःचे काही अनुभवही आठवायला मदत करतो.

त्यामुळे आपल्या सख्ख्या नातलगांशी पुढे लैंगिक संबंध टाळले जातात. म्हणजे ते आपली भावंडं ओळखतात असा अर्थ नाही. तर, आपल्याच भावंडांशी लैंगिक संबंधांची प्रेरणा या ठशांमुळे दुबळी होत असावी आणि ‘सगोत्र विवाह’ टाळले जात असावेत.
ठसे उमटण्याची ही प्रक्रिया एक-दोन दिवसांतच घडते, त्यानंतर थांबते. अगदी लहानपणी उमटलेले हे ठसे पिल्लावर दूरगामी परिणाम करून जातात.

किती काळात ठसा उमटतो हे प्रत्येक प्रजातीवर अवलंबून असावं. मी कुठेतरी वाचलं होतं - आता आठवत नाही - की पूर्वी जेव्हा अगदी लहान वयातच मुलीचं लग्न करून ती सासरी जात असे तेव्हा नवरामुलगाही लहानच असे. एका कुटुंबात राहिल्यामुळे त्यांच्यात बहीण भावंडासारखं काहीसं नातं होत असे. त्यामुळे अशा लग्नांतून फर्टिलिटी रेट कमी असायचा.

सुबोध खरे's picture

28 Jan 2016 - 7:23 pm | सुबोध खरे

फार माहितीपूर्ण आणि रोचक लेख.

नया है वह's picture

28 Jan 2016 - 7:58 pm | नया है वह

लेख आवडला !
अवांतर

बदकाचं अंडं कोंबडीने उबवलं, तर बदक पिल्लू कोंबडीला आई मानतं.. असं का.....

हे वाचून मला टॉम अ‍ॅंड जेरी विद डकीचा एपिसोड आठवला :)

अन्या दातार's picture

3 Feb 2016 - 6:39 pm | अन्या दातार

मला 'छोटीसी बात' मधला "मुर्गियाँ वापस" वाला प्रसंग आठवला. =))

मृत्युन्जय's picture

28 Jan 2016 - 8:42 pm | मृत्युन्जय

विज्ञान लेखमाला मला आवडेल की नाही असा प्रश्न पडला होता पण या मालिकेतले तिनही लेख एकापेक्षा एक सुंदर आहेत. तिन्ही लेख अप्रतिम झालेत.

हा लेख देखील अप्रतिम.

खटपट्या's picture

29 Jan 2016 - 2:25 am | खटपट्या

रोचक माहीती. आणखी येउद्या...

अर्धवटराव's picture

29 Jan 2016 - 4:53 am | अर्धवटराव

__/\__

Keanu's picture

29 Jan 2016 - 7:58 am | Keanu

त्यामुळे आपल्या सख्ख्या नातलगांशी पुढे लैंगिक संबंध टाळले जातात. म्हणजे ते आपली भावंडं ओळखतात असा अर्थ नाही. तर, आपल्याच भावंडांशी लैंगिक संबंधांची प्रेरणा या ठशांमुळे दुबळी होत असावी आणि ‘सगोत्र विवाह’ टाळले जात असावेत.

मागे एकदा डिस्कवरी वाहिनीवर काही विशिष्ट जातीचे मासे दाखवलेले. समागमाच्या काळात हा मासा आपला जोडीदार निवडतो. जर जोडीदार भिन्न लिंगी नसेल तर, एकाच्या शारीरिक रचनेत बदल होऊन तो नर अथवा मादी होतो. जोडीदारातील कोणी लिंग बदल करायचा, हे कसं ठरतं हे अजूनही एक कोडं आहे.

Maharani's picture

29 Jan 2016 - 10:49 am | Maharani

Uttam lekh..manoranjak aani mahitipurn

जव्हेरगंज's picture

29 Jan 2016 - 12:15 pm | जव्हेरगंज

वाह!!
सुरेख!

फार सुंदर लेख!!

मुक्त विहारि's picture

29 Jan 2016 - 1:45 pm | मुक्त विहारि

पण फारच थोडक्यात आवरता घेतलात, असे वाटते...

ह्या विषयावर एखादी लेखमाला लिहाच, अशी आग्रहाची विनंती.

सुधांशुनूलकर's picture

31 Jan 2016 - 9:00 pm | सुधांशुनूलकर

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मन:पूर्वक आभार. मिपाकरांसारख्या चोखंदळ रसिक वाचकांचं नेहमीच प्रोत्साहन मिळत राहिल्यामुळे लिहायला हुरूप येतो. प्राणी आणि प्राणिसृष्टी ही तर ‘माझ्या जीवाची आवडी’. त्याबद्दल लिहायला नेहमीच अवडतं. ते वाचायला तुम्हालाही आवडतं, असा आतापर्यंतचा अनुभव आहेच. काही घरगुती शुभकार्यामुळे तीन दिवस फारच व्यग्र होतो, त्यामुळे उत्तर लिहायला उशीर झाला.

@ एस - लांडगे हे कुत्र्यांच्या एका वंशाचे पूर्वज. त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे काही पैलू कुत्र्यांच्या बाबतीत हरवले असावेत, कारण कुत्रा माणसाच्या सान्निध्यात राहायला आल्यामुळे काही पैलू निरुपयोगी ठरल्याने र्‍हास पावले असावेत. तसंच, डुकरांचीही बुद्धिमत्ता कुत्र्यांपेक्षा सरस असते, असं आढळून आलंय.

@ कंजूस - मुख्यत: पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यावर प्रयोग केले गेले आहेत. पक्षी आणि सस्तन प्राणी यांना त्या प्रयोगांचे निष्कर्ष लागू पडतात. मासे, उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांच्यामध्ये इम्प्रिटिंगबाबत फारसे प्रयोग झालेले नाहीत.

@ बोका-ए-आझम, डॉ सुहास म्हात्रे, मुक्त विहारि - या विषयावर लेखमाला लिहायचा विचार केला नाहीये, कारण याच्या पुढच्या संकल्पनांविषयी मला स्वत:ला काहीच प्रत्यक्ष अनुभव नाही. आणखी लिहिलं, तर ते फक्त ‘पुस्तकी’ (theoretical) होईल, थोडंसं क्लिष्टही होईल, त्या लेखनाला माझ्या स्वत:च्या अनुभवांची ‘फोडणी’ नसेल.

@ मराठी कथालेखक - माणसाच्या सहवासात पोपट (इतरही काही पक्षी) बोलायला शिकतात हे खरंय, मी स्वत: पाहिलं आहे. पण ते समजून-उमजून ‘बोलणं’ नसून माणसाच्या आवाजाची नक्कल असते. नक्कल करण्यालाही मर्यादा असतात. ते फक्त काहीच शब्द शिकू शकतात, फारच क्वचित संपूर्ण वाक्य (तेही चार-पाच शब्दाचंच) बोलू शकतात. (नाहीतर त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या नसत्या का?) त्या बोलण्यातून बुद्धिमत्ता / भावुकता प्रकट होत नाही, तर काही शब्द उच्चारायला शिकायची क्षमता दिसते, एवढंच. तसंच, काही गोष्टींशी / व्यक्तींशी / प्रसंगांशी त्यांच्या बोलण्याचा सहसंबंध असू शकतो - उदा. ‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’ असं योग्य त्या वेळीच म्हणणं, एखाद्या माणसाला नावाने हाक मारणं इ. माणसाने शिकवल्यामुळे किंवा कधीकधी स्वत:च्या अनुभवावरूनही हे शिकणं होतं.

@ राजेश घासकडवी, Keanu : तुम्ही लिहिलेली उदाहरणं मीही वाचली-ऐकली आहेत, पण त्याबद्दल अधिक माहिती नाही.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

सर्वांचाच
सुधांशुनूलकर

मदनबाण's picture

31 Jan 2016 - 10:00 pm | मदनबाण

लेखन आवडले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Yourself (PURPOSE : The Movement) :- Justin Bieber

सुधीर कांदळकर's picture

1 Feb 2016 - 8:56 am | सुधीर कांदळकर

नीटनेटका, मुद्देसूद, जमलेला लेख आवडला. वाचतांना गुंग होऊन गेलो. काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. 'द ह्यूमन झू'. लेखकाचे नाव बहुधा फ्रीमन - पहिले नाव आठवत नाही - लंडनच्या प्राणीसंग्रहालयाचे माजी क्यूरेटर. जंगलात मुक्त वावरणार्‍या प्राण्यांची पिंजर्‍यात कोंडल्यावर वागणूक कशी बदलते आणि हेच तत्त्व मुक्त संचार करणारा भटक्या आदिमानव आधुनिक युगात प्रथम गावात आणि नंतर शहरातल्या बंदिस्त फ्लॅटमध्ये मर्यादित अर्थाने कोंडला गेल्यावर आधुनिक मानवाला कसे लागू पडते यावर आहे. ते वाचतांना देखील असाच गुंग होऊन गेलो होतो. फुग्यांना आई समजणार्‍या इम्प्रिन्ट स्मृतीवर याच पुस्तकात प्रथम वाचले होते.

मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

एक एकटा एकटाच's picture

1 Feb 2016 - 9:42 am | एक एकटा एकटाच

अत्यंत सुरेख लेख

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Feb 2016 - 11:37 am | लॉरी टांगटूंगकर

अत्यंत माहीतीपूर्ण लेख!
वाचतांना मजा आली. धन्यवाद.!

नंदन's picture

2 Feb 2016 - 2:48 pm | नंदन

लेख अतिशय आवडला.

आणखी लिहिलं, तर ते फक्त ‘पुस्तकी’ (theoretical) होईल, थोडंसं क्लिष्टही होईल, त्या लेखनाला माझ्या स्वत:च्या अनुभवांची ‘फोडणी’ नसेल.

अगदी नेमकं! सन्माननीय अपवाद सोडल्यास, विकी वा अन्य लिंकांवरून पाडलेल्या, तथाकथित 'माहितीपूर्ण' लेखांचं बेगडी अस्तर पाहून या लेखनाचं अस्सलपण अधिक जाणवतं.

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 8:22 pm | शैलेन्द्र

सुंदर लेख

नीलमोहर's picture

3 Feb 2016 - 10:31 am | नीलमोहर

प्राणी आणि प्राणिसृष्टी हा आवडता विषय, त्याबद्दल सहजसोप्या रोचक पध्दतीने लिहील्यामुळे वाचायला मजा आली.
अजूनही येऊ द्या. धन्यवाद.

मयुरMK's picture

3 Feb 2016 - 12:09 pm | मयुरMK

हा लेख सुद्धा छान :)