अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक.
आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे,
कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
सध्याचा महागाईचा वाढता आलेख पाहून भविष्यातील आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो.
खर्च वाढते राहतात मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढतेच असे नाही. त्यातून आमच्यासारखे खाजगी क्षेत्रांत नौकरी करणारे, ज्यांची मुळात नौकरी अस्थिर बेभरवशाची असते, ज्यांना नौकरी नंतर पेन्शन पीएफ इ.काहीच सुविधा नसतात, त्यांच्यासमोर तर आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य कसे मिळवावे याबद्दल फार मोठे प्रश्नचिन्ह असते .
नौकरी/व्यवसाय यातील उत्पन्न सोडून इतर कोणत्या मार्गाने उत्पन्न वाढवता आले तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही.
जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर वेळोवेळी चांगला परतावा मिळू शकेल आणि पुढील खर्चांचे थोडेफार अंदाज घेऊन त्याप्रमाणे भविष्याचे नियोजनही करता येईल.
माहितीतील सर्वसधारण गुंतवणूक पर्याय म्हणजे बँक/पोस्टातील मुदत ठेवी, शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स,
पीपीएफ, कंपन्यांतील मुदत ठेवी, इन्शुरंस पॉलिसीज, स्थावर मालमत्ता इ.
सध्या बँकेतील ठेवींचे व्याजदर झपाट्याने कमी होत आहेत, साधारण २-३ वर्षांपूर्वी जे व्याजदर ९-१० % होते
ते आता ६-७ % एवढ्यावर आले आहेत. त्यामुळे या ठेवींवरील गुंतवणूक फारशी फायदेशीर ठरणार नाही, फक्त
पैसे सुरक्षित राहतील एवढेच. मात्र पोस्टातील अनेक ठेवी/स्कीम्स स्थिर आणि खात्रीशीर परतावा देतात.
सोने/ चांदी यातील गुंतवणूक फारच बेभरवशाची असते. माझ्याकडे साधारण ५ ग्रॅम सोने आणि पाव किलो चांदीचा
एक ठोकळा अशी जबर मालमत्ता आहे. २-३ वर्षांपूर्वी कधी नव्हे ते बुध्दि झाली आणि १३ हजार दराने ती चांदी घेतली, आज तीच चांदी ७-८ हजारच्या आसपास मिळतांना पाहून आहे तीही दान करावीशी वाटते.
तेव्हाच भावाच्या लग्नातील दागिन्यांसाठी घरच्यांनी ३५ हजार दराने सोने घेतले ते आज २५ हजारच्या आसपास आहे.
असं नेहमी आपल्याबाबतीत होतांना पाहून नशीब नामक गोष्ट अस्तित्वात असते यावर पक्का विश्वास बसलाय.
अशा अस्थिरतेमुळे सोने/ चांदी मध्ये पैसे घालायची इच्छा होत नाही.
मी बॅंकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, पोस्टातील NSC,MIS इ. मध्ये वेळोवेळी गुंतवणूक करत असते पण
भविष्याच्या दृष्टीने हे पुरेसे नाही याची कल्पना आहे त्यामुळे इतरही सुरक्षित आणि विश्वसनीय पर्याय शोधत आहे.
असे खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग कोणाला माहीत असतील त्यांनी कृपया इथे शेअर करावे.
पुढील १०-१५ वर्षांचा विचार करता कोणते शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स यामध्ये गुंतवणूक करावी याबद्दल
माहिती देता येईल, अशी माहिती देणारे इतर स्त्रोत असतील तर तेही इथे सांगावेत.
माझ्याप्रमाणेच अनेकांना आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असेल,
मात्र ते प्रभावीपणे कसे करावे याबद्दल व्यवस्थित माहिती नसेल, त्यांना यातून काही उपयुक्त मार्गदर्शन मिळाले
तर फारच उत्तम.
प्रतिक्रिया
24 Dec 2015 - 12:34 pm | सस्नेह
हाय हाय ! मी तर एफडी व्याजदर १८ % असलेले याची देही याची डोळा पाहिले आहेत !
बाकी ' खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग' खरंच कुणाला माहिती असतील का याबद्दल शंका आहे. असले तर वेलकम ! धाग्यावर नजर ठेवून आहे !
24 Dec 2015 - 11:10 pm | समीर_happy go lucky
कुठे?? कोणती बँक?? इ. इ.
24 Dec 2015 - 12:58 pm | सुबोध खरे
खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग'
हे दोनच आहेत
१) श्रीमन्त घरात जन्म घेणे
२) श्रीमंत घरी लग्न करणे
बाकी सर्व उपाय खात्रीशीर नाहीत.
जितका जास्त धोका तितका परतावा जास्त
जितकी गुंतवणूक सुरक्षित तितका परतावा कमी.
बाकी तज्ञ लोक आपल्याला सल्ला देतीलच.
25 Dec 2015 - 8:13 pm | प्रसाद भागवत
माझ्या सर्व तरुण समुह सदस्यांनो,... आयुष्यांत करोडोपती (कोटी....एकावर सात शुन्ये) कसे व्हावे याचे काही हमखास सोपे उपाय मी तुम्हांला सांगणार आहे,,,,
(१) एकदा तरी किमान दीड कोटीचे बक्षीस असणारी लॉटरी जिंका
(२) एखाद्या कोट्याधिशाच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न करा.
(३) एखाद्या गढ्गंज संपत्ती असलेल्या नातेवाईकाच्या मृत्युपत्रांत आपले नाव प्रमुख वारस म्हणुन येइल, अशी व्यवस्था करा
(४) शेअर बाजाराबद्दलचे सातत्याने हमखास खरे अंदाज वर्तवणारा एखादा ज्योतिषी वा तज्ञ शोधा
(५) राजकारणांत प्रवेश करुन आमदार, खासदार,... गेला बाजार किमान नगरसेवक व्हा
(७) स्मगलिंग, हवाला... किंवा तत्सम प्रकारचा व्यवसाय निवडा
(८) स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु होण्यासही हरकत नाही
आणि हे सोपे उपाय नसतीलच जमणार, तर आणखी एक, शेवटचा उपाय आहे,.... पहा जमलं तर-
आपल्या निवृती पर्यंत आपल्या मासिक शिल्लक रक्कमेच्या निदान 10% एखाद्या उत्तम ईक्विटी म्युच्युअल फंडात 'S.I.P' व्दारे गुंतवा - प्रसाद भागवत
(मी पुर्वी केलेला एक 'WA' पोस्ट .....)
24 Dec 2015 - 12:59 pm | एस
डोण्ट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट!
परत येतो.
24 Dec 2015 - 1:37 pm | अनुप ढेरे
https://www.valueresearchonline.com/
ही साइट वापरून बघा. फ्री आहे आणि रिलायबल आहे.
https://savers.moneylife.in/
ही सर्विसदेखील छान आहे पण फुकट नाही. वर्षाला ३५०० आहे बहुतेक. ( प्रसिद्ध अर्थ-पत्रकार सुचेता दलाल चालवतात हे.)
अवांतर: निरुपयोगी माहिती वाचू नका. (फेड रेट हाइक, जपानमधलं रिसेशन, चायना डेट वगैरे वगैरे)
24 Dec 2015 - 1:59 pm | कपिलमुनी
हा "बाण" कुठे मारलाय बर्र ??
24 Dec 2015 - 2:39 pm | अनुप ढेरे
कुठेही नाही. :)
गुंतवणुकीचे निर्णय घ्यायला ती माहिती निरुपयोगी आहे असं म्हणतोय. आर्थिक घडामोडींबद्दल केवळ उत्सुकता असू शकते कोणालाही.
24 Dec 2015 - 1:41 pm | अनुप ढेरे
हा ब्लॉग देखील छान आहे.
http://www.subramoney.com/
24 Dec 2015 - 1:57 pm | सुखी
http://www.dyotasolutions.com/ यान्चे workshops मिळाले तर आइका. छान guidance देतात.
24 Dec 2015 - 2:02 pm | कपिलमुनी
सध्याच्या तरूण पिढीला पेन्शन नाही आणि कॉम्पिटीटीव्ह क्षेत्रामुळे जॉबचा भरवसा नाही . त्यामुळे रीटायरमेंट प्लॅनिंग महत्वाचा आहे.
५० नन्तर खर्च जास्त आणी उत्पन्न कमी होणार , त्यासाठी उत्पन्नाचा पर्यायी आणि खात्रीशीर मार्ग म्हणून इन्वेस्टमेंट हवी.
24 Dec 2015 - 4:43 pm | प्रसाद१९७१
भविष्याची तरतुद आणि आर्थिक सुरक्षीतता मिळवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "विकले जाऊ शकणारे स्किल बाळगणे". ह्याला पर्याय नाही.
तुम्ही जर नोकरी करत असाल आणि वायफळ पैसे खर्च करत नसाल तर २२, २५ वर्ष नोकरी करुन आर्थिक स्थैर्य नक्की येते.
24 Dec 2015 - 9:22 pm | सुधांशुनूलकर
सुबोध खरे, एस, अनुप ढेरे, सुखी यांच्या प्रतिसादांबद्दल त्यांचे आभार आणि त्यांच्याशी सहमत.
पूर्वी जसा प्रत्येक कुटुंबाचा एक 'फॅमिली डॉक्टर' असायचा, तसा आता 'फॅमिली गुंतवणूक सल्लागार' असायला हवा. नवरा-बायकोचं सध्याचं वय, एक / दोघेही नोकरीत असल्यास निवृत्तीचं वय आणि निवृत्तीला शिल्लक असलेला काळ, पेन्शन मिळणार अथवा नाही, मुलांचं वय, सर्व स्रोतांद्वारे आपला आय-व्यय (Income and Expenditure), जोखीम घेण्याची (आर्थिक) कुवत आणि तयारी, भविष्यकालीन लक्ष्य आणि त्यासाठी तरतूद, आपत्कालीन / अनपेक्षित खर्चासाठी तरतूद अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीतला समतोल साधायला ते योग्य सल्ला देऊ शकतात. आमचा याबाबत खूप चांगला अनुभव आहे.
बँकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, पोस्टातील NSC, MIS इ. अतिसुरक्षित पण (डॉ. सुबोध खरे यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे) जितकी गुंतवणूक सुरक्षित तितका परतावा कमी. मात्र कमावत्या व्यक्तीचा (योग्य योजनेतला) आयुर्विमा आणि कुटुंबातल्या सर्वांचा आरोग्यविमा मात्र असावाच.
ई.एल.एस.एस.मध्ये (Equity Linked Savings Schemeमध्ये) गुंतवणूक हल्ली फायदेशीर ठरत आहे. वार्षिक साधारणत: १२% ते १८% परतावा मिळू शकतो. सल्लागाराच्या सल्ल्यानुसार विविध कंपन्यांच्या योजना निवडा. ई.एल.एस.एस.ची जोरदार शिफारस.
शेअर्स, फोरेक्स (विदेशी चलन - Foreign Exchange) आणि कमोडिटी बाजारांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर योग्य अभ्यास आवश्यक; कारण त्यात परतावा जास्त असला, तरीही जोखीमही तितकीच जास्त. या क्षेत्रात थोडी गुंतवणूक जरूर असावी.
कोणत्या प्रकारात किती गुंतवणूक असावी, याचा काही 'जादूई फॉर्म्युला' सांगता येणार नाही, तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असेल. तरीही ढोबळमानाने ई.एल.एस.एस.मध्ये जास्त, त्याखालोखाल विमा, त्यानंतर PPF, शेअर्स आणि त्याखालोखाल इतर (बँक मुदत ठेवी, NSC, KVP, वगैरे सुरक्षित योजना) असा फॉर्म्युला आमच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.
आमचा अनुभव : चार-पाच वर्षांपूर्वी, राहतं घर सोडून नवं घर घेण्याची वेळ आमच्यावर आली होती. थोड्या कर्जाची सोय होत होती, तरी उरलेले पैसे स्वतःलाच उभे करायचे होते. काही मुदत ठेवी, पीपीएफमधून थोडी उचल, NSC, थोडे ई.एल.एस.एस. विकून थोडी रक्कम आणि काही शेअर्सची विक्री याद्वारे आम्ही ते पैसे उभे करू शकलो - कुणाकडूनही पैसे न मागता.. केवळ समतोल गुंतवणुकीमुळे.
फलदायी गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा.
24 Dec 2015 - 9:49 pm | सतिश गावडे
>> पूर्वी जसा प्रत्येक कुटुंबाचा एक 'फॅमिली डॉक्टर' असायचा, तसा आता 'फॅमिली गुंतवणूक सल्लागार' असायला हवा.
गुंतवणूक सल्लागार असलेले एक मिपाकर काका जाहिरात केल्याचा आक्षेप घेतला जाऊ नये म्हनून हा सल्ला आपल्या प्रतिसादानमधून आडून आडून देत असतात. :)
24 Dec 2015 - 10:33 pm | संदीप डांगे
प्रसादाचा लाडू आहे तो. खायचा की नाही याबद्दल मिपाकर सुज्ञ आहेत. ;-)
25 Dec 2015 - 1:06 pm | प्रसाद भागवत
आधी कपाळाला गंध टिळा लावुन मारे उत्सवात जायचे वा दिडीत सामिल व्हायचे, कोणी पहात नाही तोपर्यंत अन्न भडारा,खिचडी फळे खायची, आणि मग सुज्ञपणाचा, स्वयंभुपणाचा बाणा दाखविण्यासाठी 'प्रसादाचा' लाडु नाकारायचा...अशा मानसिकतेचेही लोक असतात ही मौलिक माहिती दिल्याबद्दल घन्यवाद. बरे वाटले..
26 Dec 2015 - 12:42 am | संदीप डांगे
;-)
26 Dec 2015 - 9:21 am | भंकस बाबा
काही लोकांना ,भेंडीबाजारच्या भाषेत बोलायचे तर 'कीड़े करण्याची' सवय असते.
दुर्लक्षिलेले बरे.
मी स्वतः शेयर मार्केटमधे २० वर्षे आहे. तुम्ही केलेले विश्लेषण व दिलेला सल्ला फारच उपयुक्त असतात.
25 Dec 2015 - 12:59 pm | प्रसाद भागवत
गावडेसाहेब, आपल्या प्रतिसादात आपण कोणाचे नांव घ्यायचे टाळले असले तरी त्याचा रोख माझ्याकडे असावा असे वाटल्याने हे लिहितो आहे. अर्थातच आपली ही टिपण्णी मला उद्देशुन नसल्यास गैरसमजाबद्दल आधीच माफी मागतो.
मी लेखांवरील अनेक प्रतिसादांत 'वेळ काढुन भेटा अर्धा एक तास..' वा.. 'चहा पीत पीत थोड्या गप्पा मारु..' अशा आशयाची प्रतिक्रिया देत असतो त्यावरुन माझ्ह्यावर मी 'जाहिरात करतो' अशी टीका आधीही झाली आहे. मी त्याचा प्रतिवादही केला आहे.
गुंतवणुक सल्ला हा व्यक्तीपरत्वे बदलतो वा तो देताना अनेक बाबी या तपशीलवार चर्चेने ठरतात हे या मागचे मुख्य कारण आहे. 14 विद्या 64 कलांमध्ये केवळ Online कोर्सने पारंगत होउ पहाणार्या एखाद्या बुद्धेवंतास तो आजारी पडल्यावर अशाच ओळखीच्या सर्जनने त्याने त्याची सारी व्यावसयिक कौशल्ये या अशा फोरमवर वापरुनच कार्यभाग उरकावा असेही वाटेल, पण व्यवहारात ते शक्य नाही.
माझ्या लेखांवरील बहुसंख्य शंकात्मक प्रतिक्रियांना मी जमेल तितक्या विस्ताराने उत्तरे दिली आहेत. मात्र 'शेयर बाजारात गुंतवणुक करायला "योग्य" सल्लागार असूच शकत नाही....अशा प्रतिक्रियांवर 'भेटुन बोलु' हेच उत्तर सयुक्तीक नाही काय?? अर्थांत ह्यात सक्तीचा भाग नाही हेही मी आवर्जुन सांगत असतो.
तसे पाहायला गेले तर मग माझा लेखच माझी पुरेशी जाहिरात करतो. तो वाचला, आवडला असे म्हणुन वाचक अनेकदा 'आजची निफ्टीची दिशा सांगता का ?? किंवा कोणते शेअर्स घेवु?? असे प्रश्न खाजगीत विचारतात. जर मी 'एखादेवेळी भेटा' असे म्हणणे अपराधिक वा अनैतिक ठरत असेल, तर मग केवळ आर्थिक फायद्याच्या हेतुने असे प्रश्न विचारणे कोणत्या प्रांतात बसते ?? अर्थात मी त्यात काही वावगे समजत नाही हा भाग वेगळा.
आपण प्रतिक्रियेंत सुचविले आहे त्याप्रमाणे मी माझी भुमिका कधीच 'आडुन आडुन' मांडालेली नाही वा माझे व्यावसायिक हितसंबंध लपवुनही ठेवलेले नाही्त .या समुहावराल बरेच सद्स्य या निमित्ताने माझ्या संपर्कांत आहेत, त्यातील अनेकजण मला शंका विचारतात वा चर्चा करतात, मी मला वाटत असलेली माहिती त्यांच्याबरोबर शेअर करतो, मात्र आजातागायत मी एकाही सदस्यास आपण माझ्यामार्फतच गुंतवणुक वा विमा करावा अशी साधी सुचनाही केलेली नाही, कोणाकडुनही 'फी' वा अन्य कोणतेही मुल्य आकारलेले नाही वा कोणताही विपर्यस्त सल्ल दिलेला नाही. असे असताना मी 'हाच व्यवसाय' करतो व अधिक माहितीकरिता व्यक्तीगत संपर्क करा' हे सांगण्यात आक्षेपार्ह असे काय आहे.??
आपण या परिवारातील एक जुने व जाणते ( माजी. संपादकमंड्ळाचेही) सदस्य आहात, त्यामुळे आपला एखाद्या अन्य सभासदाप्रतीचा असलेला दृष्टिकोण महत्वाचा असलेने मला हा खुलासा करणे भाग आहे.
25 Dec 2015 - 1:33 pm | सतिश गावडे
काका, माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्याकडेच होता. कदाचित तुम्हाला तुमचा नामोल्लेख केलेला आवडणार नाही म्हणून मी तुमचे नाव लिहायचे टाळले.
अर्थात मी हा उल्लेख सकारात्मक दृष्टीकोनातून केला होता. व्यक्तीशः मला तीन एलायसी एजंटांनी पॉलिसीज गळ्यात मारून बकरा बनवले होते. पुढे कामाचा भाग म्हणून मला विमा व्यवसायाचा अभ्यास करावा लागला आणि मी कसा बकरा बनवला गेलो आहे ते लक्षात आले. त्यावेळी मला सर्व प्रथम आर्थिक साक्षरतेचे महत्व कळले.
वित्त नियोजन ही अतिशय गुंतागुंतीची बाब आहे. गुंतवणूकीचे शेकडो पर्याय आहेत. त्यातून आपल्याला योग्य तो पर्याय निवडण्यासाठी त्यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा वेळी आपल्या विश्वासातील गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला घेण्यात गैर काही नाही.
25 Dec 2015 - 8:52 pm | प्रसाद भागवत
मला हे ही सांगावयास पाहिजे की मी MDRT कळपांत सामिल एक विमा सल्लागारही आहे, मात्र मी आजपर्यंत कधीही टर्म इनशुरन्स वगळता अन्य कोणतीही पॉलिसी घेण्याचा सल्ला कोणासही दिलेला नाही. माझ्या विविध ठिकाणच्या लिखाणांतुन मी सातत्याने युलिप्स विरोधी मतप्रदर्शन करत आलेलो आहे.
एवढेच काय,अशा टर्म विमा पॉलिसीचा कालावधी्ही विमाधारकाच्या वयाच्या 60 वर्षांनंतरचा नसावा..असे माझे वैयक्तिक मत आहे.
24 Dec 2015 - 10:45 pm | सतिश गावडे
यलायशीतील गुंतवणूक सर्वात उत्तम. आणि तुमच्या आर्थिक भवितव्याची काळजी सर्वात जास्त यलायशी येजंटांना असते.
24 Dec 2015 - 11:05 pm | संदीप डांगे
तुम्ही गमतीत लिहिलंय की सिरियसली तुम्हाला असं वाटतं...?
24 Dec 2015 - 11:12 pm | सतिश गावडे
मी सिरियसली लिहिलंय की नाही हा मुद्दा बाजूला ठेऊया. मात्र असे मानणारे लोक आपल्या अवतीभवती असतात. मी आयटी कंपन्यांच्या गेटवर यलायशी येजंटांनी "करोडपती" योजनेचे ब्यानर लावलेले पाहिले आहेत.
24 Dec 2015 - 11:28 pm | संदीप डांगे
मग ठिक आहे... ;-)
24 Dec 2015 - 11:03 pm | भंकस बाबा
गुंतवणुक व् विमा दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची सांगड घालणारा तुम्हाला गाजरें दाखवत असतो.
एलआईसी मधे ४ ते ५% पेक्षा परतावा मिळत नाही.
25 Dec 2015 - 9:18 am | सुबोध खरे
+१००
एल आय सी एजंट स्वतःच्या फायद्याच्या योजना आपल्या गळ्यात मारतात असे सार्वत्रिक आढळून आलेले आहे. ते चुकूनसुद्धा तुम्हाला फक्त आयुर्विमा(term insurance) सुचवत नाहीत. कारण त्यात हप्ता सर्वात कमी आणि म्हणून कमिशन सुद्धा सर्वात कमी असते.
एल आय सी चा एजंट तुम्हाला विक्रीपश्चात कोणतीही सेवा देत नसेल तरीही त्याला भरलेल्या प्रत्येक हप्त्यात, त्याचे कमिशन मिळते पण तुम्ही एजंट बदलू शकत नाही. कारण एल आय सी च्या नियमात अशी सोयच नाही. मुळात विमा हि गुंतवणूक नाहीच. ती एक सुरक्षा आहे तेंव्हा त्यातून परतावा मिळेल हि अपेक्षाच चुकीची आहे. परंतु ६०-६५ वर्षे एल आय सी आणि त्यांच्या एजन्तानी आपल्याला दुप्पट रक्कम भरून अर्धी रक्कम परत मिळेल अशा विम्याच्या पॉलिसी भीती दाखवून गळ्यात मारलेल्या आहेत आणि असा मोठा गैरसमज पसरवलेला आहे.
25 Dec 2015 - 8:51 pm | प्रसाद भागवत
मला हे ही सांगावयास पाहिजे की मी MDRT कळपांत सामिल एक विमा सल्लागारही आहे, मात्र मी आजपर्यंत कधीही टर्म इनशुरन्स वगळता अन्य कोणतीही पॉलिसी घेण्याचा सल्ला कोणासही दिलेला नाही. माझ्या विविध ठिकाणच्या लिखाणांतुन मी सातत्याने युलिप्स विरोधी मतप्रदर्शन करत आलेलो आहे.
एवढेच काय,अशा टर्म विमा पॉलिसीचा कालावधी्ही विमाधारकाच्या वयाच्या 60 वर्षांनंतरचा नसावा..असे माझे वैयक्तिक मत आहे.
25 Dec 2015 - 9:21 am | सुबोध खरे
ढोबळ मानाने आपल्या पगाराच्या १०० पट किंवा आपली असलेली सर्व कर्जे याच्या दुप्पट (यातील जी रक्कम मोठी असेल) त्या रकमेचा टर्म विमा ऑन लाईन घ्या
आणि बाकी सर्व पैसे इतर शुद्ध गुंतवणूक म्हणून गुंतवा.
25 Dec 2015 - 8:07 pm | प्रसाद भागवत
सहमत.
25 Dec 2015 - 7:16 pm | चौकटराजा
कालच मी ज्यांचा अत्यंत चाहता आहे त्या चंद्रशेखर टिळक यांचे "गुन्तवणूक" या विषयावरील व्याख्यान ऐकून आलो.या पूर्वी काही पुस्तके वाचली आहेत व माझ्या समजुतीप्रमाणे मी एक योग्य तोच खर्च करणारा आहे या भांडवलावर आधारित काही सुचवितो.
१. आजच्या काळात तुम्हाला रामरक्षा मारुती स्तोत्र वा कुराण बायबल ई काही नाही आले तरी चालेल पण अर्र्थिक साक्षरता आलीच पाहिजे कारण प्रेमाने वा अशा पढत विद्येच्या जोरावर छाप पाडून कामे करून घेण्याचे दिवस संपले आहेत.
२. गुंतवणुकीचा पहिला धडा म्हणजे तीमधे आपली मानसिक गुतवणूक कधीच असता कामा नये. उदा. सोन्याला स्त्री धन नावाचा मुलामा देणे , वडीलार्जित जमीन जुमल्याला वारसा असा गोण्डस् शब्द देऊन कवटालून बसणे हे टाळले पाहिजे.
३.अन्न, निवारा ,आरोग्य, वहातुक हे त्रिकालाबाधित धन्दे आहेत. त्याना मरण नाही पण वस्त्र शिक्क्षण दूरसंचार हे तंत्रावर आधरित आहेत सबब उत्तरोत्तर शाळा महाविद्यालय कालबाह्य ठरू शकतात.मोबाईल कचर्याच्या किमतीने मिळू शकतो हे ध्यानात घ्यावे. ( कालच मी तू नळी वरून सॉल्डर च भाकरी दोनही करायला शिकलो गुरू करावा लागला नाही )
४.कोंणतीच गुंतवणूक सर्वकाल उत्तम गुंतवणूक असत नाही. उदा अभियान्त्रिकीचा अभ्यास जर॑ नेट वरून करून थेट परीक्षेला बसू देण्याचे धोरण आले तर डी वाय चे काय व त्याभोवतीच्या होस्टेलचे काय ? घरी बसून नेटवर काम करण्याचे धोरण कम्पन्याना मान्य झाले तर कंपनी बस व्यवसायाचेच काय ?
५.महागाई म्हणजे संघटित कामगार व बुदीजीवी लोकानी मंद् व असंघटितावर केल्या कुरघोडीचे फलित असते निसर्गता: काहीनाच तीव्र बुद्धीमत्ता असते त्यामुळेच हा फरक शकानुशतके रहाणार आहे.अभियन्ता व जे सी बी चालविणारा यांच्या वेतनात फरक असतो. तो या कारणाने. मागणी व पुरवठा यात काही साधनात पुरवठा कमीच पडतो उदा शेतीमाल.यात काहीचेच वेतन जास्त असल्यामुळे ते महागाईस कारणीभूत ठरतात. आय टी वाल्यानी महागाई आणली असे जे म्ह्टले जाते ते त्यामुळेच. अर्थात गुन्तवणूक करण्याची गरज दोन कारणाने निर्माण होते एक उत्तरोत्तर शरीर थकत असल्याने निवृती अटळ असते व मरण आपल्या हातात नसल्याने किती पैसा लागेल अशा काळात याचे गणित अवङ्हड असते. दुसरे कारण म्हण्जे माहागाई. तिचा जो दर असतो त्याप्रमाणे चलनाची क्रयशक्ती कमी होत जाते साहजिकच गुतवणूकीतून येणारे उत्पन्न हे महागाई दरापेक्षा जास्त असले पाहिजे हे चौथीतला मुलगा ही सांगेल.
६.गुन्तवणूक करताना तुमची मानसिकता तपासून घेणे गरजेचे असते . बायकोच्व्या अंगावर शंभर तोळे सोने आहे म्हणून रेलेवे कन्सेशन मिळते का ? त्याने नक्की आर्थिक फायदा कोणता होतो? जी गोष्ट विकण्याचे धारिष्ट आपल्यात नाही ती आपली फक्त मानसिक गुतवणूक असते आर्थिक नाही. तेंव्हा सोन्यापासून सावधान. आजकाल दोन घरे तीन घरे विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे . या घरांच्या चक्रव्युहात सरकार आपल्यात पद्धतशीर पणे घुसवीत असते. कारण बाम्धकाम व्यवसाय सरकारला फार मोठा महसूल जागेवर देत असतो. वर्षानुवर्षे भाड्याने घरे देण्यापेक्षा त्यामधील काही घरे विकून आलेल्या पशाचा उपभोग का घेउ नये. सर्व जण आपण मुलांसाठी करणार असू तर आपण आयुष्य कशासाठी घालवायचे याची मानसिकता बदलली पाहिजे. अवाच्या सवा हप्ते भरून मुला बायकांसाठी जीवन विमा उतरवीत बसणे हा गुम्तवणुकीतील एक मोठा सापळा आहे . म्हणून जीवनविम्यापासून ही सावधान. विमा हा मुख्यता: बेनीफिएशरीने काढावयाचा असतो अर्थात मिळवत्या पत्नीचा विमा नवर्याने व मिळवत्या पतीचा नवरा मिळवत्या बायकोने. आपण नेमके उलट करीत असतो. आपण गेलो तर बायकोचे काय ? हा प्रश्न १९३० मधे ठीक होता आता स्त्री शिकली आहे अनुकंपा तत्वावर अनेक ठिकाणी तिला नोकरी मिळते. क्वचित ती दुसरे लग्न देखील करून आधार शोधू शकते.
७.राष्ट्रीय बॅन्केत ठेव ही सुरक्षित वाटत असली तरी ते एक अनसेक्युअर्ड लोन असते हा कायदा आहे. उद्या एखादे सरकार एखाद्या सरकारी बॅकेस दिवाळेखोर ही बनवू शकते. ही शक्यता धुसर असली तरी एक अभ्यास म्हणून समजून घेणे जरूर आहे. सबब अशा बॅन्केचा शेअर ५५० वरून ५५ येणे शक्य आहे.
बाकी अनेक मुद्दे आहेत पण आपला अतिरिक्त पैसा सर्व प्रकारच्या पर्यायात विखरून गुंतवणे रास्त ! हरेक गोष्टीचा विमा काढत बसण्यापेक्षा जीवन एक जुगार हे वाक्य ध्यानात ठेवावे. आपल्या जीवनात सर्वच गोष्टी अघटित होतील असे मानण्याचे कारण नाही.
25 Dec 2015 - 8:08 pm | प्रसाद भागवत
सहमत.
25 Dec 2015 - 8:40 pm | सुबोध खरे
आयुर्विमा (टर्म) ४० च्या माणसाचा एक कोटी रुपयाचा ऑनलीन घेतला तर साधारण पणे २२-२४,०००/- रुपये वर्षाला येतो. ३० वर्षे मुदतीसाठी/ वयाच्या सत्तरी पर्यंत. म्हणजे रुपये २०००/- महिना भरून तुम्ही एक कोटी रुपयाचा विमा उतरवू शकता आणि बाकी सर्व पैसे गुंतवणुकी साठी वापरू शकता. एक कोटी रुपयाचा विमा काढल्याने मिळणार्या मानसिक शांततेचि किंमत काय?
25 Dec 2015 - 8:45 pm | प्रसाद भागवत
वयाच्या सत्तरी पर्यंत........... विमा पॉलिसीचा कालावधी विमाधारकाच्या वयाच्या 60 वर्षांनंतरचा नसावा..असे माझे वैयक्तिक मत आहे.
25 Dec 2015 - 8:58 pm | सुबोध खरे
हे ज्या माणसाला साठीला निवृत्त व्हायचे आहे त्याच्यासाठी ठीक आहे.तरीही आज भरत असलेला हप्ता नंतर बराच कमी वाटतो
तेंव्हा तुम्ही नंतर तेवढाच हप्ता भरून दहा वर्षे आपण आपल्या पत्नीच्या वृद्धापकाळाची सोय करीत असता.
सहसा बायका नवर्या पेक्षा ३-५ वर्षांनी लहान असतात आणी ५-७ वर्षे जास्त जगतात म्हणून.
26 Dec 2015 - 3:47 pm | प्रसाद भागवत
गणित विषेषतः actuarial science व insurable interest सारख्या कल्पनांचा विचार करता आपले म्हणणे तितकेसे बरोबर नाही हे समजुन येते पण ठीक आहे.. प्रत्येकाला स्वतःचे असे काही मत असते हे मान्य.
26 Dec 2015 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे
मी माझ्या रमेश हवेले या वर्गमित्राच्या कंपनीत पुण्यात गुंतवणुक केली आणि आता बट्ट्याबोळ झालाय. धनदा कार्पोरेशन या कंपनीचा तो सर्वेसर्वा. गेली २० वर्षे गुंतवणूक तिथे करत आलो ते केवळ मित्राच्या विश्वासावर. सुरावातीच्या काळात धनदा पोर्टाफोलिओ इनवेसमेंट प्रा.लि अशी होती नंतर ग्रुप ऑफ कंपन्या वाढत गेल्या. सुरवातीच्या काळात चांगला परतावा मिळाला.अनेक ओळखीचे व नातेवाईक यांनी गुंतवणुक केली.
मला सुरवातीला २४ नंतर १८ नंतर १४ अशा टक्क्याने परतावा मिळाला. आता सर्व गुंतवणुकदार अडचणीत आले आहेत.
त्याच्याकडून धनदाचे ४५०० शेअर्स ४४ रु ला २०१० साली ६ वर्षासाठी घेतले २०१६ ला तो १४ टक्के क्युमुलेटीव रिट्न येतील या दराने तो ते शेअर्स परत घेणार असा तो एफडीचा हिशोब.
आता सगळच चित्र बदलल आहे.
बातमी १
बातमी २
गुंतवणूक दारांचे सर्व पैसे मिळतील असे आश्वासन तो वेळोवेळी देतो. पोलिस बंदोबस्तात शेअर होल्डर्सची मिटिंग झाली अन्य गुंतवणुदारांनी गेट बाहेर घोषणाबाजी केली. सगळ्यांनीच चिकित्सा न करता विश्वासावर गुंतवणूक केली आहे. सुरवातील सगळ्यांना्च चांगला परतावा मिळाला आहे. हा मित्रही गेल्या पंचवीस वर्षात शुन्यातून भरभराटीला आला आहे. त्यामुळे गुंतवणुक प्रकाराची भीतीच वाटते. सरळ आपले राष्ट्रीय बॅंकेत टाकले तर बरे झाले असते असे वाटते. मित्र गावाकडचा आहे. कौटुंबिक रिलेशन असतात ना छोट्या गावात.
पाहू या आता काय होते ते. पैसे बुडाल्यात जमा आहेत असे गृहीत धरले की मग मानसिक त्रास होत नाही. मित्राचा फसवण्याचा हेतु आहे असे मला वाट्त नाही.
26 Dec 2015 - 9:49 am | सुबोध खरे
आपल्या फसवणुकी बद्दल सहानुभूती आहे.
परंतु आयुष्यात एक गोष्ट मी कटाक्षाने पाळली आहे आणि तसाच सल्ला देतो.
ते म्हणजे नातेवाईक किंवा मित्र यांच्याशी गुंतवणूक किंवा विमा सारखा आर्थिक व्यवहार न करणे. यात MLM ( AMWAY, ORIFLAME ई) सुद्धा येतात.
कारण ते म्हणजे "अवघड जागी दुखणे आणि जावई डॉक्टर" अशी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती.
26 Dec 2015 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे
गुंतवणूक ही शेवटी रिस्क असते. मग अन्य कोणावर विश्वास टाकून रिस्क घेण्यापेक्षा आपल्या विश्वासातल्याच माणसावर भरोसा ठेवून रिस्क घ्यावी असा विचार त्यामागे असतो.
26 Dec 2015 - 10:29 am | सुबोध खरे
गुंतवणूक हि थोडी फार धोकादायकच असते. याच साठी जवळच्या माणसांशी व्यवहार टाळतो कारण जेंव्हा जाते तेंव्हा पैसाही जातो आणी नाते/संबंध सुद्धा ताणले/ दुखावले जातात. शिवाय जवळच्या माणसाने फसवले याचे दुःख जास्त होते.
26 Dec 2015 - 12:50 pm | संदीप डांगे
+१००
26 Dec 2015 - 3:57 pm | प्रसाद भागवत
नटसम्राट नाटकांत एक वाक्य आहे...'एकवेळ भरलं ताट दुसर्याआला द्यावं पण आपला बसावयाचा पाट देऊ नये......" येथेही हे तत्व काहीसं लागु पडतं...आपला पैसा आपल्या नावारच गुंतवला जाईल असे पाहावे, जेणेजरुन त्याचे जे काही बरे वाईट होते त्याचे अवलोकन आपल्याला करता येते. 'पोर्टफोलिओ इनवेसमेंट' हा प्रकार नेमके येथेच कमी पडतो. त्यात बहुधा पारदर्शकता नसते ज्याची परिणिती हा झाला प्र्कार घडण्यांत होते
27 Dec 2015 - 9:12 am | चतुरंग
मी देखील ७ वर्षांपूर्वी साधारण १.५ लाख रुपयांना असाच फसवला गेलोय...
सर्वसाधारणपणे यात मानसिकता कशी असते त्याचे मी विश्लेषण केले. मला हाती आलेले काही मुद्दे पुढीलप्रमाणे.
१ - गुंतवणूकदार ओळखीतला असतो त्यामुळे विश्वास बसणे सोपे होते.
२ - परताव्याची रक्कम अतिशय आकर्षक सांगितलेली असते - उदा. २४% सुरुवातीला. (खरेतर हाच पहिला धोक्याचा इशारा असतो की मार्केट इतक्या सहजासहजी असे व्याजदर देत नाही तर या माणसाला हे देणे कसे परवडणार आहे? परंतु ओळखीमुळे आपण जास्त खोलात शिरुन बारकाईने चौकशी करण्याच्या फंदात पडत नाही, थोडी भीड पडते.)
३ - सुरुवातीला सांगितलेल्या दराने व्याज देऊन विश्वास पक्का केला जातो. (आपण अधिक बेसावध होतो.)
४ - आता व्याजदरात घट होते - जसे तुम्ही सांगितलेत २४% वरुन १८%. (हे देखील मार्केटपेक्षा बरेच चांगले असल्याने कोणी फारशी खळखळ करत नाही. कोणी विचारलेच तर मार्केट डाऊन आहे वगैरे मुद्दे तोंडावर मारले जातात..)
५ - अजून काही रक्कम गुंतवण्याची गळ घातली जाते. आतापर्यंत परतावा भरपूर असल्याने बर्याचदा पैसे गुंतवलेही जातात. यावेळी व्याजदर अजून कमी होतो - जसा की १४% (इथेच तुम्हाला धोक्याचा शेवटचा इशारा मिळालेला असतो की व्याजदर झपाट्याने कमी का होतोय? आणि आधी एवढा कसा काय २४% मिळाला? जागे व्हा!! परंतु आपण आता पुरते फसलेलो असतो. मोह वाईट. एकदा मनात शंकेची पाल चुकचुकते देखील परंतु मित्रच आहे फसवेल कसा? अशी आपणच आपली समजूत घालतो..).
६ - पुढील वेळी व्याज मिळत नाही. आपण अस्वस्थ होतो. मित्र सांगतो अरे मार्केट जर्रा टाईट आहे पैसे सुटले की लग्गेच व्याज देतो...
७ - असे दोनेक वेळा होऊन थोडे व्याज मिळते. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
८ - काही महिन्यात सगळाच बँड वाजतो अनेकांना पैसे मिळत नाहीत आणि सगळे उघडकीला येते.
(अशा प्रकरणात पुढल्या गुंतवणूकदाराकडून मिळालेली रक्कम आधीच्या गुंतवणू़दारांना व्याज म्हणूण फिरवलेली असते. बाजारातून मिळालेला पैसा + पुढल्या गुंतवणूक्दारांकडून मिळालेली मुद्दल = आधीच्या लोकांचे व्याज असा सगळा मामला असतो, कुठेतरी जाऊन ही साखळी अपुरी पडायला लागते आणि मग पैसे देणे शक्य होत नाही....)
आपला बाजारापेक्षा जास्ती पैसे मिळवण्याचा मोह नडतो हीच यातली खरी मेख आहे. "व्हेन इट इज टू गुड टु बि ट्रू, अलवेज सस्पेक्ट!" हे धोरण आपण सर्वांनीच अंगी बाणवायला हवे आणि जिथे पैशाचा प्रश्न येतो तिथे नाती, मैत्री सगळे बाजूला ठेवून अतिशय व्यावहारिक विचारच केला जायला हवा. हे मी माझ्या फसवणुकीतून शिकलो. आता मी अत्यंत परखडपणे पैशांचा चोख हिशेब ठेवतो. नात्यात शक्यतोवर व्यवहार करत नाही अगदीच अपरिहार्य असेल तर पैसे पैशांच्या जागी, नाते त्याच्या जागी!
असो तुमचे पैसे परत मिळोत अशा सदिच्छा! :)
26 Dec 2015 - 10:25 am | सुधीर
बर्याच गोष्टी डोक्यात आहेत कधीतरी वेळ मिळेल तसा उतरवेन. सिएफए लेव्हल थ्री च्या अभ्यासक्रमातून गुंतवणूकदारांचं मानसशास्त्र आणि गुंतवणूकीचं ज्ञान यांचा संगमातून अलिकडे विकसित होत असलेला विषय वाचायला मिळतो आहे. सर्वात खटकणारी बाब म्हणजे या इंडस्ट्रीत दलालांच्या जाळ्याशिवाय बहुतेक प्रॉडक्टस एण्ड युजर्स पर्यंत विकले जात नाहीत. त्यामुळे होतंय असं की गुंतवणूकदाराच्या काय फायद्याचं आहे त्यापेक्षा दलाली कुठून जास्त मिळेल यावर प्रॉड्क्टस विकले जातात.
26 Dec 2015 - 10:30 am | सुबोध खरे
गुंतवणूकदाराच्या काय फायद्याचं आहे त्यापेक्षा दलाली कुठून जास्त मिळेल यावर प्रॉड्क्टस विकले जातात.
हाच तर मुख्य प्रश्न आहे.
26 Dec 2015 - 1:18 pm | भंकस बाबा
आजकाल गुंतवणुकदारांना सगळे इंस्टेंट पाहिजे असते. थोडासा अभ्यास करून गुंतवणुक करणे नेहमीच चांगले, पण लोक सांसबहुच्या मालिका बघतिल मात्र वर्तमानपत्र , बिज़नेस वाहिन्या इकडे मात्र दुर्लक्ष करतील. नेमका ह्याच मानसिकतेचा फायदा उचलतात.
जीवन सरल ही एलआइसी ची स्किम बंद होत असताना या दलालानि अशी ओरड केलि की परदेशी विमा कंपन्या दबाव आणून ही फायदेशीर स्किम बंद करत आहे त्यामुळे तुम्ही अखेरचा हात मारून घ्या.
मग काय पळत सुटले सर्व, आणी गुंतवले पैसे!
26 Dec 2015 - 3:43 pm | प्रसाद भागवत
'बंद होणार्या विमा योजना - वस्तुस्थिती काय आहे ??' ...ह्या माझ्या लेखांत मी ह्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या लेखाची थेट लिंक कशी द्यावी हे समजले नाही. क्षमस्व
26 Dec 2015 - 12:32 pm | प्रकाश घाटपांडे
वर प्रतिसादा उल्लेख केलेला मित्र हा सीएफए च आहे.
26 Dec 2015 - 7:18 pm | सुधीर
युएस सिएफएच्या/चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्टच्या तिनही लेव्हल्सच्या सिल्याबस मध्ये नैतिकतेवर जवळजवळ १०-१५% भर आहे. त्यांनी स्वत: डेव्हलप केलेले एथिकल कोड अॅण्ड कंण्डक्ट खूप विचाराअंती बनविले गेले आहेत असे मला वाटते. आणि ते तोडले गेल्यास नावापुढे CFA लावता येत नाही. (सिएफपी/सर्टीफाईड फायनान्शिअल प्लॅनर वा इंडियन सिएफए याबद्धल मला फारशी कल्पना नाही. पण सहसा फायनान्समधल्या प्रोफेशन मधली नैतिकता ही बर्याच ठिकाणी शिकविली जाते). तरीही नैतिकता आणि प्रोफेशन याची सांगड घालणं हे वैयक्तिक आहे.
मूळात ज्या कुठल्या कंपनीत तुम्हाला गुंतवणूक करावयाचा सल्ला दिला गेला तो तुमचं संपूर्ण अॅसेट अलोकेशन्स पाहून दिला गेला का? तुमची रिस्क-रिटर्न प्रोफाईल पाहीली गेली का? तुमच्या दीर्घ आणि मध्यम पल्ल्याच्या फायनान्शिअल गोल्स्ची नोंद घेतली गेली का? तुमच्या तरलतेची गरज पाहिली गेली का? तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीची गरज पाहिली गेली का? तुम्हाला गुंतवणूकीतली जोखीम सांगितली गेली का? यातल्या बहुतेकांची उत्तर नाही असतील आणि तर तो तुमच्यासाठी काम करणारा गुंतवणूक तज्ञ नव्हताच. तुमच्या प्रतिसादातून वाटते की तुमचा मित्र तुमच्यासाठी गुंतवणूक तज्ञ म्हणून काम न करता "माझ्या स्वतःच्या कंपनी मध्ये गुंतवणूक कर असा सल्ला देणारा", स्वतःच्या कंपनीची जाहिरात/वकिली करणारा धूर्त सिईओ/प्रमोटर वाटतो. खरा गुंतवणूक तज्ञ म्हणून काम करत असता तर इतर कुठल्याही एखाद दुसर्या (आणि खास करून स्मॉल कॅप) कंपनीत गुंतवणूक करतानाची रिस्क तुम्हाला नक्कीच सांगितली गेली असती.
27 Dec 2015 - 10:24 am | मोगा
नोकरी व्यवसाय दीर्घकाळ करत रहाणे.
मायबाप सरकार जे लिमिट देइइल तितके पोस्टात ठेवणे.
गरजेपेक्षा एक घर जास्त घेऊन ठेवणे.
28 Dec 2015 - 9:44 am | कंजूस
मला यातलं कळत नाही { यावर अगोदरच बरेचवेळा शिक्कमोर्तब झालं आहे} फक्त आजच्या लोकसत्ताची लेखाची लिंक द्यावीशी वाटली म्हणून .बय्राच जणांना हे अगोदरच माहित असेलच-
करप्रणाली बदल/लोकसत्ता
प्राप्तिकर प्रणालीतील वर्षांतील ठळक बदल
मागील वर्षांत महत्त्वाच्या घडामोडी
28 Dec 2015 - 11:55 am | नीलमोहर
माहितीपर आणि उपयुक्त प्रतिसादांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.
इथे शेअर्स्/म्युच्युअल फंड्समध्ये कोणी गुंतवणूक करत असतील त्यांनी याबद्दल काही माहिती दिली तर फार उपयोग होईल, उदा. साधारण रू.५०,०००-१ लाख या दोन्हींत विभागून गुंतवायचे असतील तर कुठे गुंतवावेत.
शेअर्स मध्ये खरेदी/विक्री जास्त न करता फक्त दीर्घ काळासाठी (५-१० वर्षे) घेऊन ठेवायचे असतील तर साधारणतः
कोणत्या कंपनीज मध्ये गुंतवावेत ? तसेच कोणत्या म्युच्युअल फंड्स, (sip) मध्ये गुंतवणूक करावी ?
यासाठी मार्केट्चा अभ्यास करणे अर्थात गरजेचे आहे पण तेही लगेच समजणार नाही, त्याला तसा वेळ द्यावा लागेल.
कृपया याविषयी अधिक माहिती द्यावी ही विनंती.
28 Dec 2015 - 12:03 pm | सुबोध खरे
३ सर्वोत्तम म्युच्युअल फंड्सइकोनॉमीक टाईम्सच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील
http://economictimes.indiatimes.com/marketstats/pid-131,pageno-1,sortby-...
आणी मनी कंट्रोलच्या सल्ल्यानुसार सर्वोत्तम
http://www.moneycontrol.com/mutual-funds/top-rated-funds
28 Dec 2015 - 12:05 pm | सुबोध खरे
सर्वोत्तम समभाग
http://profit.ndtv.com/news/market/article-clsa-bets-on-long-term-india-...