आपले 'लोक'ल अभिव्यक्ति स्वातंत्र्य ?

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in काथ्याकूट
1 Dec 2015 - 2:46 pm
गाभा: 

अजून या विषयावर धागा दिसला नाही म्हणून नाइलाजास्तव धागा काढतो आहे.

अगोदर ही बातमी वाचा:
Offices of Lokmat Newspaper Attacked Over Piggy Bank Cartoon

http://epaper.esakal.com/Sakal/30Nov2015/Normal/PuneCity/page3.htm

मला हिंदू-मुस्लीम वादाची आणि नेहमीची तीच ती चर्चा करण्यात काही रस नाही.

याच सुमारास शनिशिंगणापूरला एका महिलेने पूजा केल्यामुळे गावकरी संतप्त झाल्याचीही बातमी आली. त्यावर रीतसर पुरोगामी प्रतिक्रियाही आल्या.
पण गेल्या दोन दिवसात मला वृत्तवाहिन्यांवरील चर्चा(?) पाहण्याचा योग न आल्याने मिडीयात या दोन्ही बातम्यांना किती फूटेज मिळाले याची कल्पना नाही.

पहिल्या बातमीबाबत मला जास्त उत्सुकता आहे कारण ही बातमी थेट माध्यमांशी संबंधित आहे.

याआधी शिवसेना व तत्सम संघटनांनी माध्यमांवर हल्ले केले तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा किती संकोच झाला होता हे जाणकार जाणतातच. त्यामुळे आता हे प्रकरण खरंच अनावधानाने घडले असा बचाव होणार की दै.लोकमतमधील गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांपैकी एक व्यक्ती 'देशपांडे' आडनावाची असल्यामुळे ही आगळीक संघी लोकांनी मुद्दामच केली आहे,माध्यमांत बघा उच्चवर्णीयांचा कसा प्रभाव आहे वगैरे ठराविक पुरोगामी वळणाची चर्चा होणार,कुणास ठाऊक?
की दर्डांची भाजपाशी जवळीक वाढली हे याप्रकारामागील कारण आहे ?

पण प्रस्थापित माध्यमांतून यावर चर्चा तरी होणार का?

उत्तर शोधणे जास्त कठीण नाही...त्याबाबत काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत माझीच एक फेस्बुक पोस्ट पुन्हा इथे टाकण्याचा मोह आवरत नाही...

जान है तो जहान है !
असा योगायोग फार दुर्मिळ असतो. जवळपास एकाच वेळी माध्यमात या दोन बातम्या आल्या.
१. 'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये'-http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=7852642
२. Fatwa against A.R. Rahman for film on Prophet -http://www.thehindu.com/news/national/fatwa-against-ar-rahman-for-film-o...

आता एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करावी किंवा करू नये हा वास्तविक पाहता त्या अभिनेत्याच्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’चा प्रश्न. त्याचप्रमाणे एखाद्या चित्रपटाला संगीत द्यावे किंवा देऊ नये हा संगीतकाराचा. इतरांना त्यात पडायचे काहीच कारण नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांचे कर्तव्य ठरते. पण दोन्ही बातम्या एकसाथ आल्यामुळे काही लोकांची गोची झाली आहे.
तेव्हा या चर्चेबद्दल दोन शक्यता आहेत-
१. दोन्ही विषयांवर अजिबात चर्चा होणार नाही.
किंवा
२. समजा चर्चा झालीच तर सिनेमावाल्यांच्या (वाचा: सेलिब्रेटींच्या) हा..मु...च्या बातम्या करणारे सर्वज्ञानी पत्रकार आणि संपादक या दोन बातम्यांमधील कुठल्या बातमीचा कीस पाडून कोणाला ‘कटघरे’मे ‘खडा’ करतील हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
कारण हे विरोध कोण करतय यात दडलेलं आहे ?
पत्रकार, कलाकार, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्याचे स्वतंत्रतासेनानी असले म्हणून काय झालं , भैया आखिर जान है तो जहान है !

आता ‘मुहम्मद: द मेसेंजर ऑफ गॉड’ भारतात बघण्यासाठी उपोषण करावं लागू नये म्हणजे मिळवलं. समजा तशी वेळ आलीच तर ‘एफटीआयआय’ च्या आवारात एखादे पाल रिकामे आहे का याची चौकशी करावी म्हणतो.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 3:45 pm | संदीप डांगे

लोकमत प्रकरणाबद्दल एक व्यावसायिक ग्राफिक डीझायनर म्हणून माझे मत मांडतो. त्यांनी जो अनावधनाने झाले हा शब्दप्रयोग वापरला आहे हे खरे आहे असे वाटते. आजकाल तरुण ग्राफिक डीझायनर्स व्यवसायात दाखल होत आहेत, त्यांच्यात सामान्यपणे व्यवसायाचे गंभीर प्रशिक्षण घेतलेले फार कमी आहेत. गल्लोगल्ली ग्राफिक डीझाइनींग शिकवणारे कोर्सेस निघाले आहेत. त्यात सॉफ्टवेअर वापरून चित्र तयार करणे म्हणजेच इलस्ट्रेशन, ग्राफिक डीझाईन असे समजले जाते. त्यामागे फार अभ्यास, समाजरचनेची समज, प्रचलित चिन्हांमागचा इतिहास, त्यांचे महत्त्व ह्या गोष्टी टाळल्या वा दुर्लक्षिल्या जातात.

प्रस्तुत डीझाइन बनवणाराचा आयसिस प्रश्नाबद्दलचा अभ्यास नाही हेच दिसून येते. त्याला ब्रिफ मिळाले असेल की आयसिस, पैसा, आर्थिक बाबींबर एक ग्राफिक बनवा. त्याने पैसा साठवण्याचे रुपक म्हणून पिगी बँक घेतली, त्यावर डुकराचे जे वर्तुळाकार नाक आहे त्यावर आयसिसचा सिम्बॉल म्हणून आयसिसच्या झंड्यावरचं अरेबिक ग्राफिक चिकटवून दिलं. हे अगदी रुटीन काम आहे. इथे भारताचा पैसा, किंवा रिलायन्सचा पैसा, लष्कराचा पैसा असं काहीही ब्रिफ असतं तर त्या डीझायनरने हेच केलं असतं. डुकराच्या नाकावर भारताचे अशोक चिन्ह, रिलायन्सचा लोगो, वैगेरे चिकटवलं असते. आपल्या जडणघडणीत, शिक्षणात, संस्कारात काही गोष्टी इतक्या घट्ट बसलेल्या असतात की दुसर्‍यांच्या लेखी आपण करत असलेल्या क्रियेचा भलताच अर्थ निघतो हे ध्यानात येत नाही. 'पिगी बँक म्हणजे पैशाचं रुपक' हेच घट्ट डोक्यात बसलेल्या डीझायनरच्या मनात ते डुक्कर आहे हेच येणार नाही, त्यातून ते इस्लाममधे निषिद्ध आहे हेही लक्षात येणार नाही. आयसिसच्या झंड्यावरचं ते अरेबी म्हणजे आयसिसचा सिम्बाल नाही तर 'अल्लाहचा प्रेषित मोहंमद' हे शब्द आहे हेही लक्षात येणार नाही कारण भाषा-लिपीचे अनोळखी असणे. ही प्रक्रिया समजणे अवघड आहे पण बर्‍याच डीझाइन हाउसेसमधे असे चुकलेले डीझाइन बदलणे नेहमीचेच असते. लोकमतच्या बाबतीत कोणा जाणकाराने ते प्रिंट होऊन वितरण होईपर्यंत बघितले नाही हे त्यांचं दुर्दैव. पुरवण्या तशाही फार दुर्लक्षित असतात.

दोनच दिवसांपूर्वी मी खफ वर माझा आयपीएलचा किस्सा शेअर केला होता. क्रिकेटचा फार गंध नसलेला मी ब्रेट ली फ्लिप करून डावखुरा गोलंदाज करून मोकळा झालो होतो.

ए ए वाघमारे's picture

1 Dec 2015 - 5:54 pm | ए ए वाघमारे

आपले दोन्ही प्रतिसाद आवडले.

तरीही एक मुद्दयाबाबत शंका आहे.आपण म्हणता तसे इस्लाम आणि त्याचा इतिहास,प्रतिके याबाबतच्या असलेल्या अज्ञानाचा हा 'एक्स्क्यूज' 'शार्ली हेब्दो'ला का मिळू नये? हजारो वर्षांपासून मुस्लिमांच्या शेजारीशेजारी राहून हिंदूंचे इस्लामबाबत इतके अज्ञान असेल तर युरोपियनांचे किती असेल? प्रेषिताचे चित्र काढणे हे पाप हे त्यांना बिचार्‍यांना काय माहीत, असेही असू शकते ना?

मी आधीही म्हटले तसे हिंदू-मुस्लिम वादापेक्षा माध्यमवीरांच्या भूमिकेबद्दल मला अधिक उत्सुकता आहे. मी काही शिवसेनेचा समर्थक नाही परंतु हेच हल्ले शिवसेनेने वा तत्समांनी एखाद्या 'अनावधानाने' झालेल्या चुकीबद्दल केले असते तर एव्हाना असल्या 'भ्याड' हल्ल्याबद्दल पत्रकार संघटनांनी मोर्चे काढले असते, मनगटशाहीच्या चर्चा झडल्या असत्या, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी पुन्हा उगाळली गेली असती आणि या 'असहिष्णुते'बद्दल तथाकथित पुरोगाम्यांनी माध्यमांमधे जिथेतिथे धिंगाणा केला असता इ.इ. पण लोकमत प्रकरणात असे काहीही झालेले दिसत नाही. या ग्राफिकमुळे भावना दुखावल्या हे मान्य करूनही त्यानंतरची हिंसक प्रतिक्रिया ही निर्विवादपणे निषेधार्ह आहे अशी नि:संदिग्ध प्रतिक्रिया पत्रकारजगतातून आलेली दिसत नाही,निदान मला तरी माहीत नाही. माझा मुख्य रोख या गोष्टीकडे आहे.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 6:12 pm | संदीप डांगे

अधिक माहितीसाठी चार्ली हेब्दोबद्दलची विस्तृत चर्चा मांडणारा हा धागा : http://misalpav.com/node/29981

तरीही एक मुद्दयाबाबत शंका आहे.आपण म्हणता तसे इस्लाम आणि त्याचा इतिहास,प्रतिके याबाबतच्या असलेल्या अज्ञानाचा हा 'एक्स्क्यूज' 'शार्ली हेब्दो'ला का मिळू नये? हजारो वर्षांपासून मुस्लिमांच्या शेजारीशेजारी राहून हिंदूंचे इस्लामबाबत इतके अज्ञान असेल तर युरोपियनांचे किती असेल? प्रेषिताचे चित्र काढणे हे पाप हे त्यांना बिचार्‍यांना काय माहीत, असेही असू शकते ना?

असा 'एक्स्क्यूज' 'शार्ली हेब्दो'ला मिळणे शक्यच नाही कारण ते स्वत: आम्ही हे जाणून बुजून करत आहोत असे जाहिरपणे मान्य करतात. त्यांचे प्रत्येक कर्मठ धर्माच्या माननीय चिन्हांवर मर्मघाती व्यंग करणे हे एक वैशिष्ट्य आहे. त्याची लोकमतच्या प्रकरणाशी तुलना करणेच चुकीचे आहे.

या ग्राफिकमुळे भावना दुखावल्या हे मान्य करूनही त्यानंतरची हिंसक प्रतिक्रिया ही निर्विवादपणे निषेधार्ह आहे अशी नि:संदिग्ध प्रतिक्रिया पत्रकारजगतातून आलेली दिसत नाही,

याचे कारण असे असू शकते की लोकमतकडून खरोखर चूक घडली आहे. त्यांनी चूक करायला नकोच होती. पण आता झाली तर झाली म्हणून ते आपली चूक जास्त प्रसिद्ध होणार नाही याचीच काळजी घेतील. ते जर बोंबाबोंब करतील तर कामाच्या बाबतीत ते कसे बेफिकिर राहतात, त्यांच्या पत्रकारांचे आंतराष्ट्रीय प्रश्नांबाबतचे ज्ञान किती तोकडे आहे याचीच जाहिरात होईल. यापुढे त्यांच्या कामाच्या गांभिर्याबद्दल संशय उत्पन्न होणे व्यवसायाच्या दृष्टीने बरोबर नाही व काँग्रेसधार्जिणा पेपर असल्याने मुस्लिमांच्या मनात त्यांच्या समुहाची प्रतिमा खराब होणेही काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे झाले-गेले विसरून जा अशी सामोपचाराची भूमिका लोकमतने घेतली असावी.

अभ्या..'s picture

1 Dec 2015 - 6:18 pm | अभ्या..

शार्ले हेब्दो अन ह्या प्रकरणात अजून एक फरक हा कार्टून अन ग्राफिक असा आहे. किंवा व्यंगचित्रकार अन डीटीपी ऑपरेटर असा आहे. कार्टून हे परिस्थितीचे आकलन होऊन कार्टूनिस्टच्या पॉईंट ऑव्ह व्ह्यू ने मांडलेले असते. ग्राफिक हे फक्त सिम्प्लीफाईड पिक्टोरिअल प्रेझेन्टेशन असते. या प्रेझेन्टेशनमध्ये स्कॅन्ड इमेज, क्लिपआर्ट, रेफरन्सेस, आयकॉन्स ह्याचा मुक्तपणे वापर होतो. ते सादर करणार्‍याला फक्त संबधित लेखाचा रेफरन्स असतो, कार्टूनिस्ट पूर्ण्पणे स्टाईल क्रिअ‍ॅट करुन त्याद्वारे तो विषय त्याच्या वक्रदृष्टीने साकारत असतो. अर्थात समजून उमजून म्हणू शकता. ग्राफिक्स तसे नसते बर्‍याचदा. ती कमी पगारावर राबवलेल्या कमी अभ्यासू लोकांची पाट्याटाकू मोहीम असू शकते.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 6:32 pm | संदीप डांगे

धन्यवाद अभ्या...!

कार्टूनिस्ट हा स्वयंभू कलाकार असतो. ज्ञात घटनेवर, तपशीलावर आपले स्वतःचे मत मांडत असतो. जसे आपण इथे, फेसबुकवर एखादे विधान करतो तसेच विधान कार्टूनिस्ट आपल्या व्यंगचित्रातुन करत असतो. त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी कार्टूनिस्टवर येते. एकप्रकारे कार्टून्स ही व्यंगचित्रकाराच्या विचारसरणीचीच अभिव्यक्ति असते.

याउलट डीटीपी आर्टीस्टचे 'कृत्य' अनेकांच्या हातभाराने तयार झालेले असू शकते. डीटीपी आर्टीस्टवर त्याच्या कामाची संपूर्ण जबाबदारी कधीच येत नाही. ती जबाबदारी ते ग्राफिक इलस्ट्रेशन प्रसिद्ध करणार्‍यावरच असते.

ए ए वाघमारे's picture

2 Dec 2015 - 10:47 am | ए ए वाघमारे

लोकमतच्या प्रकरणाशी तुलना करणेच चुकीचे आहे

चूक मान्य !

आदूबाळ's picture

1 Dec 2015 - 6:54 pm | आदूबाळ

लोकमतच्या बाबतीत कोणा जाणकाराने ते प्रिंट होऊन वितरण होईपर्यंत बघितले नाही हे त्यांचं दुर्दैव.

यग्जॅक्टली! संपादक झोपले होते का?

अभ्या..'s picture

1 Dec 2015 - 6:57 pm | अभ्या..

लोकमतचे संपादक. हीहीहीहीहीहीहीही

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 7:13 pm | संदीप डांगे

आता चांगलीच जाग आली असेल....

मार्मिक गोडसे's picture

1 Dec 2015 - 3:56 pm | मार्मिक गोडसे

त्यामागे फार अभ्यास, समाजरचनेची समज, प्रचलित चिन्हांमागचा इतिहास, त्यांचे महत्त्व ह्या गोष्टी टाळल्या वा दुर्लक्षिल्या जातात.

सहमत

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 4:12 pm | संदीप डांगे

याचीच दुसरी बाजू ती हल्ला करणार्‍या मुस्लिमांची. 'पिग्गी बँक' हे एक साधन आहे, डुक्कराचं रुपक नव्हे. पैसे साठवण्यासाठी पाश्चात्त्य देशांनी पिगच्या आकारातलीच खेळणी बनवली त्यामागे त्यांचीही काही सांस्कृतिक धारणा असेल, म्हणजे डुकरे पाळणे, विकणे हे रेडीकॅश सारखे असेल जसे आपल्याकडे शेळीपालन करणारे शेळ्यांना एटीएम म्हणतात. त्यामुळे जे कॅश पटकन उपलब्ध करून देतं ते पिग म्हणून पिग्गी बँक तयार झाली असेल. दुर्दैवाने हा सगळा प्रकार असा असू शकतो हे समजण्याची कुवत हल्ला करणार्‍या मुस्लिमांत नाही.

एकिकडे आयसिस चा मुस्लिमांशी संबंध नाही असे बोलायचे, दुसरीकडे आयसिस खुद्द तो लोगो वापरते आहे याबद्दल अजिबात खळखळ करायची नाही अशा डबल स्टँडर्ड मधे आता मुस्लिम फसले. तोच लोगो कोणी आयसिसचा सिम्बॉल म्हणून वापरला की त्याच्यावर हल्ले करायचे. हे फक्त गुडघ्यात अक्कल असणार्‍यांकडून अपेक्षित आहे. इथे मुस्लिमांच्या प्रायोरिटीज अधिक स्पष्ट झाल्यात.

मागे देवी लक्ष्मीचे चित्र अंतर्वस्त्रांवर वापरल्या गेले होते तेव्हा हिंदुंनी रितसर मार्गाने आक्षेप घेऊन आपला विरोध दर्शवला, कंपनीच्या ध्यानात ती गोष्ट व्यवस्थित आणून दिली की तुम्ही जे करताय ते चुकीचे आहे म्हणून. कंपनीने सर्व गोंधळ समजून घेऊन ते डीझाइन माग घेतले व झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. हीच अपेक्षा मुस्लिमांकडून याबाबतीत अपेक्षित होती, त्यांनी असे केले असते तर ह्याच घटनेला जास्त सकारात्मक प्रसिद्धी मिळून मुस्लिमसमुदायाबद्दलची लोकांची भावना बदलण्यास मदत झाली असती. पर ऐसा हो न सका!

दोन्ही प्रतिसाद अप्रतिम. हेच मी लिहायला आलेलो. इतक्या अप्रतिमपणे जमले नसते मला. नाइस संदीप. वेल प्लेड.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 4:36 pm | संदीप डांगे

धन्यवाद! ;-)

चांदणे संदीप's picture

1 Dec 2015 - 6:27 pm | चांदणे संदीप

+ 111111111111

प्रसाद१९७१'s picture

1 Dec 2015 - 4:55 pm | प्रसाद१९७१

उत्तम प्रतिसाद डांगे साहेब

नाखु's picture

1 Dec 2015 - 5:14 pm | नाखु

विवेचन डांगे साहेब..

"थेट दागतरानेच आजाराची मिमांसा केल्यावर आम्ही पत्रावळी वाचक काय बघणार पुरवणीतल्या पोरवण्या"

-----कुडमुडी

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2015 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ संदीप डांगे : उत्तम समतोल विवेचन !

याॅर्कर's picture

1 Dec 2015 - 9:39 pm | याॅर्कर

शिवसेनेच्या हल्ल्यावेळी लई बोंबा मारल्या त्यांनी.
घ्या म्हणावं आता हिरवा प्रसाद.

हुप्प्या's picture

2 Dec 2015 - 2:02 am | हुप्प्या

आयसीसने आपल्या झेंड्यावर मुस्लिमांना शिरोधार्य वाक्ये लिहिली म्हणून आता त्या झेंड्याचा विनोदाकरता वा व्यंगचित्राकरता वापर होता कामा नये असा आग्रह करणे आणि त्या आग्रहाला मान देणे हे अत्यंत घातक आहे. कुणीही सोम्यागोम्या आपले अरबीचे ज्ञान वापरुन हवे तिथे ती अक्षरे लिहील आणि आपला कार्यभाग साधेल. उदा. पाकिस्तानने रणगाड्यांवर अशी वाक्ये लिहिली तर मुसलमान (व त्यांना मान देऊन अन्य धर्मीयही) अशा रणगाड्यांची राखरांगोळी करायला कचरतील का? त्यांनी तसे कचरावे का? त्यांना हा दुबळेपणा माहित असेल तर उद्या ते हिंदु देवतांची चित्रे आपल्या विमानांवर वा अन्य वाहनांवर काढतील आणि मग त्यावर हल्ले करणे धार्मिक भावना दुखावणारे होऊ लागेल.
लोकमतातील लेखकाने आपल्या परीने आयसिसवर एक प्रतिकात्मक हल्ला करायचा प्रयत्न केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून ते तसेच ठेवायला हवे होते पण लोकमतने तात्काळ शेपूट घातली आणि माफी मागून एक घातक पायंडा पाडला आहे. असल्या उथळ, भडक, असहिष्णू विचारांचे असेच नवनवे अविष्कार भविष्यात दिसतील असे वाटते.

बाँब नावाचा फटाका मिळत असे. पण तेंव्हा कोणीही धर्म / देवतेचा अपमान [फटाका फुटल्यावर चित्राचे अनेक कपटे होउन इतस्ततः विखरत असात] असे विवाद्य मत मांडत नसे. वरील उदाहरण वाचुन ही आठवण आली. सध्या या फटाक्याबद्दल [२५+ वर्षे झाली फटाके उडवणे बंद केल्याला] काहीही माहीती नाही.

लक्ष्मी तोटा मिळतय की अजून. डुप्लीकेट लक्ष्मी तोटा पण पाहिला. त्यावर वाघावरची देवी होती. ह्या दिवाळीला मी सद्दाम अन लादेनचे फोटो असलेले अन त्याच नावाचे सुतळी बाँब पण पाह्यले. बाकी उरलेल्यावर पिक्चरमध्ये बाजार ऊठलेल्या हिरवीणी होत्या.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 11:58 am | संदीप डांगे

यावर्षीपासून त्यावर बंदी घालायची मागणी काही हिंदू संघटनांनी केली असे वाचले होते. सवयीच्या परिणामामुळे अनेकदा विसंगती लक्षात येत नाही. पूर्वी कधीतरी पहिल्यांदा दारूच्या दुकानात गेलो असता तिथे देव वैगेरे मांडलेले, अगरबत्ती-हार घातलेला पाहून धक्का बसला होता. संस्कार व विचारसरणीनुसार क्रिया-प्रतिक्रिया उमटतात.

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2015 - 11:23 am | सुमीत भातखंडे

पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा फारसा निषेध होताना दिसला नाही.

नाखु's picture

2 Dec 2015 - 11:40 am | नाखु

आझाद मैदानावरील झालेल्या गलिच्छ हैदोस बद्दलही नव्हता.

कदाचित अशी घटना असहिष्णुता या सदरात मोडली जात नसावी असा विचारवंतीय मतप्रवाह असू शकतो.आणि त्या मुळेच अदखलपात्र बाब आहे ही.

चला सकाळचे ११.३० वाजलेत एकू या सुमधूर गीत .

जिंदगी मौत ना बन जाए