सध्या WhatsApp मुळे कैक जुन्या मित्र नातेवाईकांशी संपर्कात राहणे अतिशय सोपे झालेले आहे. पण ह्याचबरोबर तेथे प्रचंड ढकलनिरोप येत असतात जे बरेचदा मला अस्वस्थ करतात. बरं ते कोणाकडून येतात तर रूढार्थाने सुशिक्षीत लोकांकडून. जरा सारासार विचार केला तर या संदेशाताला फोलपणा उघड होतो पण जराही सारासार न विचार करता दे दणादण संदेश forward केले जातात.
अशाच काही संदेशांचा पर्दाफार्श करण्यासाठी हा धागा.
सुरुवात मीच करतो.
काही दिवसांपूर्वी मला आलेला हा संदेश.
लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही.....
अवश्य वाचाच !!!गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?
(ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र)
गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे.(एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वौच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर)
आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही.
पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची.
आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे.
कोणाचं वाक्य आहे, मला आठवत नाही. पण, बहुधा नेपोलियनचं असावं.
If you can’t convince, confuse.
लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या.
मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही.
पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं.
हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.
कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते.
यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील.
त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल.
काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.)
ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते.
ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले.
१-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ(कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.
कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते.,
सोली सोराबजी २० लक्ष,
कपिल सिब्बल २२ लक्ष,
महेश जेठमलानी (राम जेठमलानींचे पुत्र) ३२ ते ३४ लक्ष.हे कसायांच्या बाजूने उभे होते.
राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता.
कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता.
दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.” न्यायाधीशांनी विचारले, “आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.” त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.
गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.
कसायांचे दावे (१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो.
(२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय.
(३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार?
(४) गायींमुळं परकीय चलनही मिळते.
(५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.”
दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे.
आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल.
त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात.
दीक्षितांनी सर्व आकडेवारी 7न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा रु. ५० मिळतात. म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात.म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….
एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?”
त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं.
ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.”
जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले,
“ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micronutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले.
दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले.
गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”
सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.
आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते.
एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो.
अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.
अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.
अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले.
पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.
न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, एक्सलंट.
कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.
आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”
भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.
धर्म आणि श्रद्धा बाबतचा मुद्दा बाजूला ठेवू. सर्वात पहिले ही कोर्टकेस खरी होती की नाही. कोणाच्याही नावावर काहीही खपवायचे. पण खरी होती असे मानून चालू.
- ह्या म्हाताऱ्या गायींना खायला देणे व इतर देखभालीच्या खर्चाचे काय?
- हाच पैसा तरण्या गायीना पोसण्यासाठी वापरला तर त्याही शेण आणि गोमुत्र पैदा करतीलच की. शेणाबरोबरच बाकीचेही फायदे देत असतील (दूध वगैरे) तर त्यांना पोसणे जास्ती फायद्याचे नाही का?
- जर एवढा पैसा फक्त शेणखतातून मिळत असेल तर मग शेतकरी इतके गरीब लोक कसे? शेतकरी नुसते शेण विकूनच आरामात बसून खातील की. आत्महत्या कशाला करतील?
- कोणतीही पेट्रोल वर चालणारी गाडी मिथेन वर चालवणे सहज शक्य नाही. त्यासाठी जे conversion kit लागेल त्याचा खर्च ह्यात धरलेला नाही. तसेच मिथेन refilling stations कुठे आहेत? तेथपर्यंत हा मिथेन gas नेणार कसा. त्याला लागणारे infrastructure उभारण्यासाठीच्या खर्चाचे काय?
त्यामुळे देशाची पेट्रोल डिझेल ची गरज संपेल वगैरे हास्यास्पद दावे आहेत.
Disclaimer : मी गोहत्याबंदीचा समर्थक अथवा विरोधक आहे म्हणून वरील उहापोह केला नसून एक फोल Hypothesis चे उदाहरण म्हणून वरील संदेश उद्धृत केला आहे.
प्रतिक्रिया
3 Nov 2015 - 8:41 pm | जेपी
मी असले फालतु whatsapp सारखे प्रकार वापरत नाही.
थोडा पयका खर्च करा ..जुन्या मित्रांशी नातेवाईकाशी कनेक्टेड राहा..
लेख फालतु आहे..पण सध्या फुकटच नेट आहे प्रतिसादासाठी वापरुन घेतल.
3 Nov 2015 - 8:57 pm | चिरोटा
झोप येत नसेल तर वॉट्स अॅपवरील संदेश वाचावेत मग लवकर झोप येते.संदेश कधी माहितीत भर घालणारेही असतात.
सण कधी येणार हे कॅलेंडर्पेक्षा वॉट्स-अॅपवर आधी कळते. सण कुठलाही असो-दोन तीन दिवस आधी चिरफाड चालू होते. उ.दा. दिवाळी. एका ग्रूपमध्ये दिवाळी ह्या शब्दाचा नक्की अर्थ्,पूर्वज ते कशी साजरी करीत,मग दुसर्या ग्रूपमध्ये पाडगावकरांच्या कवितेच्या चार ओळी व आकाशकंदिलाचे काही फोटो,रांगोळीचे महत्व,तिसर्या ग्रूपमध्ये कश्मीर ते कन्याकुमारी,बंगाल ते आसाम...दिपावली साजरा करण्यात दिसणारे साम्य..चौथ्या ग्रूपमध्ये दिवाळीशी संबंधीत एखादे कल्पक कोडे..
3 Nov 2015 - 9:31 pm | ट्रेड मार्क
https://youtu.be/D4QBjXydTkQ
काही प्रकल्प आणी प्रयोग या विषयी यात माहिती दिली आहे. कृपया चित्रफीत बघावी.
3 Nov 2015 - 9:45 pm | लंबूटांग
पण बहुधा मी मुद्दा समजावण्यात कमी पडलो असेन. लेख सर्वसाधारण विचार न करता संदेश forward करण्याबद्दल आहे गायींच्या उपयुक्ततेबद्दल नाही. तो संदेश केवळ उदाहरणादाखल दिला आहे.
मला गायीच्या उपयुक्ततेबद्दल काहीच शंका नाही. ह्या चित्रफीतीत दुभत्या गायींचे उदाहरण दिलेले आहे. मला त्यांच्या शेणाचे उपयोग वगैरे ही मान्य आहेत. पण त्या संदेशात म्हातारया गायींचे उदाहरण दिले आहे. जी पेट्रोल डीझेल संदर्भातली आकडेवारी दिली आहे ती स्वप्नरंजनासारखी वाटते.
3 Nov 2015 - 10:37 pm | ट्रेड मार्क
लोकं खरंच बरेचदा नुसतं ढकलतात. त्यातल्या बर्याच पोस्ट खर्या नसतात सुद्धा. या बद्दल सहमत.
आवाज चालू करून पण बघा. त्यात हरियाणामधील एका प्रकल्पाची माहिती दिली आहे ज्यात जवळपास ११०० भाकड गायी (म्हाताऱ्या) पाळल्या आहेत आणी त्यापासून जे शेण व गोमुत्र मिळतं त्यापासून विविध गोष्टी तयार करून विकतात. वर्षाची उलाढाल ३.५ कोटी आहे म्हणतात.
मिथेन पण तयार करण्याचा एक प्लांट टाकलाय आणि त्यापासून स्वयापाकासाठी वगैरे वापर करता येतो. GAIL च्या माजी CEO चे पण मत त्यात दिलेले आहे.
वरील पोस्ट मध्ये कदाचित अतिशयोक्ती असेलही पण म्हणून पूर्णतः बाद ठरवता येईल असं वाटत नाही. मिथेन वापरायचा झाला तर त्यासाठी conversion kit, refilling stations पण लागतीलच. पण तो खर्च व पेट्रोल आणी त्यासाठी जाणाऱ्या विदेशी मुद्रा याची तुलना व्ह्यायला पाहिजे.
पेट्रोल ला पर्याय म्हणून असं इंधन, कि जे गाडीत अजिबात बदल न करता वापरता येईल, मिळणं अवघड आहे. निदान आत्ताच्या टेक्नोलॉजी प्रमाणे तरी. इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय आहे.
अवांतर: तुम्हाला आणी इतर बर्याच लोकांना माहिती असेल… टेस्ला कंपनीच्या एका मस्त गाडीची माहिती - http://www.teslamotors.com/models
Some features
All electric, All wheel drive, autopilot,
recharge in 20 mins, travels approx 250 miles (400 kms) in one charge,
0-60 in 2.8 secs, Top Speed 155 mph,
luggage space in front and back
जाहिरात करण्याचा उद्देश नाही. परंतु मला आवडली आणी एक futuristic technology असलेली गाडी म्हणून केवळ माहितीसाठी देत आहे.
3 Nov 2015 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
राजिव दीक्षित ह्या प्रकरणाचा पोल खोल केलेली एक मोठ्ठी पोस्ट फेसबुका वर कुठेतरी वाचली होती..सापडली की लिंकवतो
3 Nov 2015 - 10:37 pm | परिकथेतील राजकुमार
माऊसचा स्क्रोल मोडला.
3 Nov 2015 - 10:42 pm | प्रीत-मोहर
=)) =)) =))=)) =)) =))
4 Nov 2015 - 8:10 am | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त =))
4 Nov 2015 - 10:46 am | नन्दादीप
परा परत आले.... बरा वाटला......
5 Nov 2015 - 4:23 am | सोत्रि
'जुनं तेच सोनं' हा खाक्या सोडा. (तुम्हाला ते जमेलसं वाटत नाही पण प्रयत्न करा).
जुने मोडके माउस वापरलेत की स्क्रोल पण मोडणारच ना!
- (न मोडलेला) सोकाजी
5 Nov 2015 - 10:38 am | रिम झिम
तरी बरं,
मिपावर उजव्या बाजुस स्क्रोल दिलाय...
5 Nov 2015 - 3:06 pm | परिकथेतील राजकुमार
उजव्या हातानी आम्ही फक्त संध्या करतो.
5 Nov 2015 - 3:18 pm | बॅटमॅन
अलीकडे ती चोवीस नावेही बदललीत असे ऐकून होतो. खरेखोटे ते आचमन करणारेच जाणोत. =))
5 Nov 2015 - 8:05 pm | परिकथेतील राजकुमार
नावे?
अहो आचमन ३० ६० ९० असे करतात. ;)
5 Nov 2015 - 8:08 pm | बॅटमॅन
तेच हो ते.
म्हणजे
बियर साठाय नमः
व्हिस्की तिसाय नमः
वगैरे वगैरे. ज्याचे जसे पुण्य त्याप्रमाणे साठ-तिसाचे नव्वद-खंबा आणि बियर - व्हिस्की पासून स्कॉच- व्होडका वगैरे.
5 Nov 2015 - 8:12 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
बॅट्या तू पित नाय तेच बरे आहे बाबा.
5 Nov 2015 - 8:15 pm | टवाळ कार्टा
=))
5 Nov 2015 - 8:18 pm | बॅटमॅन
खी खी खी =)) =))
6 Nov 2015 - 10:38 am | मालोजीराव
ब्याट्या अबे टॉवर आणि पिचर मध्ये बियर मोजतात हल्ली, ६० ml तर मुत्राबरोबरच बाहेर पडते
6 Nov 2015 - 11:16 am | टवाळ कार्टा
क्रेट र्हैला कै? ;)
6 Nov 2015 - 12:12 pm | बॅटमॅन
खी खी खी. बाकी टॉवर आणि पिचरमध्ये किती एमेल मावते म्हणे?
6 Nov 2015 - 12:26 pm | टवाळ कार्टा
ते लिटरमध्ये अस्तात रे =))
6 Nov 2015 - 6:01 pm | प्यारे१
बॅटमॅन यांचा निरागसपणा पाहून मन भरुन आलं आणि एक लार्ज व एक मीडियम jigger भर पाणी अश्रूंच्या रूपानं वाहून गेलं.
5 Nov 2015 - 3:06 pm | परिकथेतील राजकुमार
अणिवाश्यांनी ह्यात पडू नये!
3 Nov 2015 - 11:33 pm | एस
फुगत चाललेले खिसे आणि रिकामी होत चाललेली डोकी अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त माणसांच्या हाती मिळालेले एक कोलित म्हणजे हे 'व्हॉट्सअॅप'.
हे वापरणं कधीच बंद केलेलं आहे.
3 Nov 2015 - 11:46 pm | सतिश गावडे
अँड्रॉईड फोन घेतल्यानंतर व्हाट्सअॅप इन्स्टॉल आणि मोठया हौसेने शाळेतले, कॉलेजातले, कॉलेजातले, मिपावरचे ग्रुप्स जॉईन केले. आणि ही फॉरवर्ड्सची फुकटची डोकेदुखी सुरु झाली.
लोक काहीही म्हणजे अक्षरशः काहीही पुढे ढकलत राहतात.
उपाय खुपच सोपा होता. एक एक करत सारे ग्रुप्स सोडले. पुन्हा अॅड करणार्यांना तसे न करण्याची तंबी देऊन पुन्हा ग्रुप्स सोडले.
वन टू वन कम्युनिकेशनमध्येही फॉरवर्ड्स टाकणारे काही महाभाग निघाले. त्यांना ब्लॉक केले.
खुपच सोपं आहे या त्रासापासून वाचणं.
व्हाट्सअॅप ही एक चांगली सुविधा आहे. मात्र ती आपण कशी वापरतो यावर सारं अवलंबून आहे.
5 Nov 2015 - 10:17 am | बिपिन कार्यकर्ते
हा प्रतिसाद मी, 'पहले मै काफी मोटा था. चलने फिरने मे भी तकलीफ होती थी. फिर मुझे मिला मोटापा कम करने का एक बेहतेरीन उपाय...' या चालीवर आणि त्या आवाजात वाचला. लै मज्जा आली.
5 Nov 2015 - 10:38 am | सतिश गावडे
=))
5 Nov 2015 - 10:52 am | टवाळ कार्टा
खि खि खि....त्याच्याब्रोब्र ब्लाँड सगा डोळ्यासमोर आणा =))
4 Nov 2015 - 5:42 am | अविनाशकुलकर्णी
लग्नात जश्या देण्या घेण्याचा साड्या असतात..ब्लाउज पिसेस असतात..
तसे whatsapp चे msg असतात...
4 Nov 2015 - 5:42 am | कंजूस
उदाहरणार्थ असलेला लेख पूर्ण कशाला?मुद्दा पटवायचा तर काही अतिरेकी ( वैचारिक) लोकांचं हे खेळणं झालंय.जत्रेमध्ये हौसेने घेऊन दिलेली पिपाणी मुलाने आठ दिवस वाजवत रहावे तसं करतात या वाटसपचं.
अरे तु वाटसपवर ये आम्ही कित्ती मज्जा करतो या आग्रहास्तव घेतले आणि सर्वात अगोदर "ओटो डाउनलोड फोटो,व्हिडिओ बंद केले.ग्रुपचे मेसेजिस "unfollow"करता येत नाहीत म्हणून ग्रुप सोडले.
बरं वाटसपवर कॅालिंग करायला जावं तर बय्राच लोकांच्या फोनसमध्ये होत नाही.
4 Nov 2015 - 8:37 am | लंबूटांग
चोप्य पस्ते केला मी.
त्या ग्रुप्सना सोडून दिले आहे मी कधीच. पण हे सध्या जवळच्या नातेवाइकांकडूनच सुरू आहे. बरं बरेचसे संदेश तर इतके भारत स्पेसिफिक असतात की मी मनात आणले तरी इथे बसून काही करू शकत नाही.
असो. मुद्दा हा की WhatsApp चा वापर करून मोठ्या प्रमाणात अफवा वगैरे पसरवल्या जाणे किती सहज शक्य आहे आणि लोक विचार न करता बिनधास्त ढकलत असतात.
खरं तर लेख लिहिताना वाटले होते की इतर लोक असे काही उघड उघड खोटे असणारे संदेश आले असतील तर ते आणि त्यावर का विश्वास ठेवू नये याची कारणमीमांसा टाकतील पण मी असे स्पष्ट लिहायला पाहिजे होते धाग्यातच.
आपण आपली विडंबनेच लिहावीत हे बरे :).
4 Nov 2015 - 8:25 am | जयन्त बा शिम्पि
मी स्वत: जरी वॉट्स अप वापरीत नसलो तरी, अनेकजण संदेश नुसते वाचतात आणि इतरांना पाठवितात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात फार भर पडत नसते हे जाणवते. वाचलेले संदेश लक्षात ठेवले जात नाहीत, लक्षात ठेवुन इतरांना सांगण्याची कला नाही, संवय नाही. लिहुन ठेवण्याची आवड नाही. मग फक्त क्षणभराच्या करमणुकीसाठीच हा खटाटोप करावयाचा कां , हा मला पडणारा प्रश्न आहे.
4 Nov 2015 - 9:42 am | कंजूस
परदेशातील नातेवाइकांशी बोलण्यासाठी वाटसप आणि वाइबर वसूल आहे आणि त्यासाठीच वापरतो.
4 Nov 2015 - 9:52 am | सुबोध खरे
पूर्वी जालावर येणारे HOAX आता वॉट्स अॅप वर यायला लागले. सुरुवातीला मी त्याला उत्तरे लिहून त्याचा दुवा देऊन लोकांना सावध करायचा प्रयत्न चालविला होता. पण नंतर त्याचा कंटाळा आला. चांगले सुशिक्षित इंजिनियर सुद्धा अशा गोष्टी शहानिशा न करता पुढे ढकलताना पाहून भ्रमनिरास झाला आणि आता मी केवळ एक करमणुकीचे साधन म्हणून त्याच्या कडे पाहतो.
सिनेमात नाही का नागीण येउन साप चावलेल्याचे विष परत शोषून घेते.
अमर अकबर अंथोनी सिनेमात तिघा जणांचे रक्त एकत्र करून गुरुत्वाकर्षणाच्या मुलभूत नियमाना अपवाद करून वर चढते आणि आईच्या शरीरात पाठविले जाते.
किंवा शोले मध्ये वीज नसलेल्या रामगढ मध्ये प्रचंड मोठी पाण्याची टाकी बांधलेली दिसते जेथून विरु आत्महत्येची धमकी देऊन मौसी कडून होकार मिळवतो. या सर्व गोष्टींचा आपण डोक्याला त्रास करतो का? मग वॉट्स अॅप तसेच आहे समजा आणि त्याचा आनंद घ्या.
4 Nov 2015 - 11:21 am | अनुप ढेरे
http://rajeevsane.blogspot.fr/2015/05/blog-post_29.html
हा ब्लॉग वाचा आणि राजीव दिक्षितांबद्दल मत बनवा.
4 Nov 2015 - 11:53 am | गॅरी ट्रुमन
गोहत्याबंदी वगैरे मुद्द्यांमध्ये मला पडायचे नाही.आणि व्हॉट्सअॅपवर लोक काहीही कसे फॉरवर्ड करतात हे दाखवून द्यायला हे एक उदाहरण म्हणून घेतले आहे हे समजले.पण---
हा मुद्दा काही 'हजम' झाला नाही. गाय म्हातारी म्हणून आणि तिच्यापासून आता काहीही उपयोग नाही मारायची? जीव आहे तो. मग म्हातारा झाला म्हणून कापायचा? कधी कुठचा प्राणी पाळला असाल तर तुम्हाला नक्कीच समजेल की ती मुकी जनावरे किती माया लावतात ते.
4 Nov 2015 - 5:42 pm | रेवती
आपल्या प्रतिसादाशी सहमत आहेच पण लंबूकडे भूभू आहे.
4 Nov 2015 - 5:55 pm | गॅरी ट्रुमन
लंबूटांगचा हेवा करायला हवा मग. आम्हाला दोघांनाही कुत्र्यांची महाप्रचंड आवड असूनही समाधान मानावे लागते रस्त्यावरच्या कुत्र्यांवरच :(
4 Nov 2015 - 8:08 pm | यशोधरा
Ho, lambucha bhu bhu Khupach cute aahe. Lambu, ek don photo taak ki bhu bhu che.
4 Nov 2015 - 8:12 pm | रेवती
भूभू दिसायला मोठा आहे पण या समरमध्ये धमाल मुलाच्या मुलाने व मिपाकरीण अस्मितेच्या मुलाने मिळून त्याला खेळून खेळून दमवला होता. शेवटी तो लंबूजवळ येऊन झोपला तो जायलाच तयार नव्हता.
4 Nov 2015 - 8:17 pm | यशोधरा
Lab aahe na?
4 Nov 2015 - 8:19 pm | रेवती
हो. नुसता मोठा दिसतो पण स्वभावानं फार गरीब आहे.
4 Nov 2015 - 8:53 pm | यशोधरा
Labu tashshech asatat. Khup goad asatat. Mala pan havaay Labu.
5 Nov 2015 - 10:18 am | बिपिन कार्यकर्ते
+१०००००००
4 Nov 2015 - 6:47 pm | लंबूटांग
पण धंद्याच्या दृष्टीने विचार करता तुमच्याकडे समजा २ पर्याय आहेत. जागा मर्यादित आहे असे गृहित धरले आहे.
तुम्ही कोणता स्वीकाराल? दुभती गाय ठेवणे अधिक फायद्याचे नाही का?
पाळीव प्राणी माया लावतात वगैरे अगदी खरी गोष्ट आहे आणि वर रेवती आज्जीने म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे २ भू भू आहेत त्यामुळे तो मुद्दा १००% मान्य. पण गाय पाळीव प्राणी category मध्ये मोडत नाही तर तिला उपयुक्त पशू म्हणून पाळतात असे मला वाटते. असो बाकी चर्चा खवत करू :).
4 Nov 2015 - 12:12 pm | 'पिंक' पॅंथर्न
व्हॉट्अॅप हे अफवा पसरवायचे पण एक अधुनिक साधन आहे...
दर १५ दिवस / महिन्यांनी "आमुक एक गेला, आपल्या ग्रूप तर्फे श्रद्धांजली" असा मेसेज ठरलेला असतो. आणि प्रत्यक्षात तीच व्यक्ती " बाबांनो मी अजुन जीवंत आहे" हे सांगण्याचा आटापिटा करत असते. आता पर्यंत या व्हॉट्अॅपने किती जणांना जीवंतपणी श्रद्धांजली वाहिली याचा शोध घेतला तर मोठी यादी तयार होईल ..
4 Nov 2015 - 4:20 pm | उगा काहितरीच
WhatsAppचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की कुणीही आपल्याला ग्रुप वर ॲड करू शकते . ही गोष्ट सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण घातक आहे . समजा , "क्ष" एक अतिरेकी आहे. त्याच्याकडे तुमचा नंबर आहे , व त्याने तुम्हाला एखाद्या समाजविघातक गोष्टी पसरवत असलेल्या ग्रुपवर तुमच्या नकळत ॲड केलं तर पोलिसांचा ससेमिरा तुमच्या मागेही लागु शकतो .
त्यामुळे समजा मला कुणी एखाद्या ग्रुपवर ॲड केलं तर मला पॉपअप यायला हवा कि "xxx want to add you in yyy group! You want to join or not? "
(सदरील बाबीसाठी whatsapp ला मेल केला , पण अजूनतरी त्यांचा रिप्लाय आला नाही.)
4 Nov 2015 - 5:14 pm | अस्वस्थामा
+१०० ...
पुण्यातल्या एका मित्राला याचा अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. अशाच एका ग्रुपवर (जिथे दाऊदचे नि ओसामाची स्तुती करणारे मेसेज यायचे) त्याला अॅड केले गेले. त्याने बाहेर पडूनही परत परत अॅड केले गेले. मग त्याने whatsapp बंद केलं तर फोन सुरु. पोलिस पण काही मदत करेनात. वैतागून त्याने नंबर बंद केला आणि आता तो कोणाला नंबर द्यायला पण दहादा विचार करतो..
(त्याने रितसर तक्रार करायला हवी होती असं आमचं मत पण स्वतःवर वेळ येते तेव्हा जे लगेच त्रास कमी होण्यास होईल ते केले जाते हे ही तितकंच मान्य आहे.)
4 Nov 2015 - 5:02 pm | विकास
लेखातील मुद्यांशी सहमत... आमच्या एका नातेवाईकांच्या गृपमधे ठरवले आहे की कुठलाही "फॉरवर्ड" कॅटेगरीतला मेसेज पाठवायचा नाही.
वर डॉ खरे यांनी म्हणल्याप्रमाणे काही ग्रूप्स मधे ऑ अथवा बापरे वाटणारे मेसेज आले तर मी ते http://www.snopes.com/ सारख्या संस्थळावर जाऊन त्याची शहानिशा करतो आणि तसे सांगतो.
वर जो काही तुम्ही मेसेज चिकटवला आहेत त्याबाबत देखील मी असेच चेक केले होते कारण मला तो मेसेज आणि त्यातले वैज्ञानिक चमत्कार जरा जास्त वाटले. उदा मिथेनवरची गाडी ३ महीने चालवणे वगैरे... मला अशी कुठलीही न्यायालयीन केस आढळली नाही. मला आलेल्या मेसेज मधे एक दुवा देखील होता. पण तो अमेरीकन न्यायालयांचा होता आणि तो देखील अधिकृत नव्हता आणि त्यात देखील काही नव्हते... :)
असो.
5 Nov 2015 - 12:58 am | सतिश गावडे
हाच नियम मी शाळेतल्या ग्रुपला घालू पाहत होतो. त्यांनी माझी साग्रसंगित पुजा केली. त्यांच्या दृष्टीने फॉरवर्ड्स टाकायचे नसतील तर ग्रुप कशाला बनवायचा.
5 Nov 2015 - 10:53 am | टवाळ कार्टा
झैरात
4 Nov 2015 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट्सअॅपने आपल्या आयुष्यातील खुप मोठी जागा व्यापून टाकली आहे. चोवीस बाय सात ढकलसंदेशाचा प्रवास सुरु असतो. कशा कशाची पडताळणी करायची नाही. एक तर मेसेज ढकला नाही तर डिलिट करा. च्यायला, मेंदुमधील विचार करण्याची शक्ती एक दिवस अशा संदेशाच्या मार्याने आपण घालवून बसणार आहे.
- दिलीप बिरुटे
(वाट्सअॅपचा व्यसनी)
4 Nov 2015 - 6:45 pm | रेवती
हे प्रकरण बंद का करत नाहीस मग?
ढकलसंदेश पाठवणार्यांना एकदा सांगून पहा. नाही ऐकले तर त्यांनाही तुझ्या वेळाची किंमत नाही हे समजून त्यातून बाहेर पड की! हे प्रकरण माझ्या एकूणच आवाक्यातले नसल्याने त्याचा वापर नसतो. नवर्याला मात्र यात सामील व्हावेच लागले कारण मुलाच्या मित्रांच्या पालकांचा गृप आहे व शाळेसंबंधीत, प्रोजेक्टसंबंधित निरोप पोहोचवले जातात. त्यातून हळूच इंटरटेनमेंट नावाचा गृप सुरु झालाय. मग ते वाट्टेल ते विनोद धाडत राहतात. बरं झालं मी नाहीये त्यात.
माझ्या चुलत, आते, मामे, मावस भावंडांचा मिळून 'ब्रदर्स अॅन्ड सिस्टर्स' असा एक गृप आहे. त्यावर आधी सगळ्यांनाच बरे वाटले. नंतर नंतर वास्तूशांतीचे फोटू, लग्नाच्या, मुलांच्या वादीचे फोटू, सासूसासर्यांच्या एकसष्ठ्या, सत्यनारायण पूजा, दिवाळीच्या फराळाचे असे फोटू. मग आमच्या शिनियर शिट्टीजनांनी हळूच त्यात प्रवेश मिळवला. मग मुले काय बोलतात त्यावर लक्ष ठेवणे वगैरे. माझ्या आतेबहिणीच्या काकवा, आत्या, चुलत सासवा वगैरेही त्यात हळूहळू आल्या. मोठ्या चुलत, आत्ते भावंडांची मुले कॉलेजात असल्याने ती आली, आता त्यांचे नवरेही सामील झालेत. अरे, काय गृप म्हणायचा की काय! भारतात दिवसभर चालू असलेली निरोपा निरोपी आपल्याकडच्या रात्री वैताग आणते. "अय्या, ही कोणती साडी गं? ती वास्तूशांतीची का? त्यावेळी रंग जरा मोरपिशी वाटला होता, आता जरा निळसर का वाटतोय?" वगैरे वाचून माझे भाऊ वैतागायला लागले व मी त्या गृपमध्ये सामील होवू का नको वाटण्याआधीच विचार सोडून दिला. तसेच फेसबुकाचेही आहे. कॉलेजातील भाच्या, पुतण्यांचे रोजचे फोटू असतात. आज काय नवे कपडे म्हणून, उद्या काय हेयर कलर केलेले फोटू, नंतर मैत्रिणीच्या वादीला गेल्यावरचे. हे असले पहायला वेळ आहे कोणाला? त्यावर आपण काही बोललो नाही तर बरे दिसेल का? की तक्रारी असतील की मावशीने लाईक केले नाही किंवा मामा/ काका माझ्या मोटरसायकलबद्दल काहीच म्हणाला नाही वगैरे. ते फेसबुक नको आणि व्हॉटस अपही नको. आमच्या मुलाचे मात्र सकाळी सहा ते रात्री कितीही वाजेपर्यंत हे चालूच असते. रागावून उपयोग नसला तरी मी घसा सुकेपर्यंत ओरडत राहते. निदान जेवताना तरी ते प्रकरण लांब ठेवायचे व रात्री अमूक एक वेळेनंतर फोन म्यूट झाला पाहिजे हे नियम घालून दिलेत. ते जेमतेम ५० टक्केच पाळले जातात. तू जर हे वेळेवर बंद केले नाहीस तर असिमोलाही सवय लागेल. ;)
4 Nov 2015 - 7:40 pm | विकास
म्हणून म्हणतो, व्हॉट्सअॅप सोडा आणि मिपा जोडा! ;)
4 Nov 2015 - 8:15 pm | रेवती
ते काही सांगू नका. तुम्ही इथे जवळ रहात असून येऊन भेटता का? चित्राताईला सांगा की आता मी तिच्याशी बोलणे सोडलेय. माणूस माणसाला भेटायला तयार नाही आणि म्हणे व्हॉटस अप सोडा................
4 Nov 2015 - 9:16 pm | विकास
भेटेंगे हम जरूर भेटेंगे... :)
4 Nov 2015 - 7:45 pm | टवाळ कार्टा
वरणभात खफवरचे प्रतिसादसुध्धा काही जास्त वेगळे नस्तात =))
4 Nov 2015 - 7:51 pm | बॅटमॅन
अग्दि अग्दि =)) =)) =))
4 Nov 2015 - 8:34 pm | सायकलस्वार
म्हणजे??
4 Nov 2015 - 8:23 pm | कंजूस
मिपा अथवा संस्थळं तसेच फेसबुक यात आणि वाटसपमध्ये खूप फरक आहे.फोन नंबरवर अवलंबून नाहीये आणि पूर्ण ताबा असतो ना काय बघायचे यावर.
वाटसप हे विहिरीतले डराँव डराँव.
4 Nov 2015 - 8:27 pm | कंजूस
मी एकदा साळुक्यांना ( मैना) वरणभात खायला ठेवला बाल्कनीत तर त्या फक्त वरण खाऊन गेल्या भात तसाच ठेवला.त्यावेळेस तुरडाळ महाग नव्हती.
4 Nov 2015 - 8:41 pm | कविता१९७८
फाॅरवर्डस ढकलतात तर ढकलतात पण अशुद्घलेखनाकडेही पाहत नाहीत की समोरच्यापुढे आपली काय छाप पडेल, यात सुशिक्षिततही मागे नाहीत हे खरे. मेसेजेसची सत्यता ही पडताळुन पाहत नाहीत हे वेगळे.
एक कोजागिरी पौर्णिमेचा मेसेज फीरत होता
चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवाणी
कोज्यागिरीच्या राञीने लिहीली जाग्रनाची कहाणी
कोज्यागिरी पौर्णिमेच्या गोड गोड सुभेच्या
4 Nov 2015 - 9:16 pm | विकास
लोल =))
4 Nov 2015 - 9:39 pm | याॅर्कर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गणपती तुमची इच्छा पूर्ण करेल.
4 Nov 2015 - 11:49 pm | सर्वसाक्षी
नव सभासदांचा. हे लोक जुने संदेश नव्या उत्साहाने ओततात.
त्या खालोखाल उपद्रवी लोक म्हणजे धूमकेतू. हे अधून मधून येतात आणि इथे आतापर्यंत काय काय उमटलाय याची अजिबात फिकीर न करता असलेला कचरा बदाबदा ओततात आणि निघून जातात.
हे सततचे आणि सक्तिचे पुनर्प्रक्षेपण डोक्यात जाते
5 Nov 2015 - 2:50 am | विकास
नव सभासदांचा. हे लोक जुने संदेश नव्या उत्साहाने ओततात.
हा प्रकार, जेंव्हा इमेल नवीन होती त्या काळात इमेल बरोबर देखील होयचा.
5 Nov 2015 - 2:57 am | प्यारे१
भारताला INDIA का म्हटलं जातं त्याचं स्पष्टीकरण whatsapp ला वाचून सरसकट सगळे स्वातंत्र्य मिळवून दिलेले लोक ढसाढसा रडायला लागले आहेत असं वाटून गेलं.
5 Nov 2015 - 10:54 am | संदीप डांगे
हिथं सांगा ना राव.
5 Nov 2015 - 11:00 am | गॅरी ट्रुमन
अहो व्हॉट्सअॅपवरील विद्वानांच्या मते भारताला इंडिया म्हणतात याचे कारणे INDIA म्हणजे "Independent Nation Declared In August" . म्हणजे भारताला १५ ऑगस्ट ऐवजी जुलैमध्ये स्वातंत्र्य मिळाले असते तर इंडिया ऐवजी इंडिज म्हटले असते तर!! आणि इस्ट इंडिया कंपनी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी फक्त ३४७ वर्षे जन्माला आली आणि ८९ वर्षे आधी लयालाही गेली त्यात इंडिया हा शब्द कसा आला असले फालतू प्रश्न या विद्वानांना कधीच पडत नाहीत.
5 Nov 2015 - 2:11 pm | संदीप डांगे
(डोक्याला हात मारून घेणारी स्मायली कल्पावी) देवा....!
5 Nov 2015 - 11:02 am | उगा काहितरीच
डोक्याला शॉट ! म्हणे Independent Nation Declared In August . काहीच्या काही मेसेजेस प्रचंड आत्मविश्वासाने टाकतात. या डॉक्टरने असे सांगितले , मंगळावरून कॉस्मिक किरणे येणार आहेत, लिंबू फ्रिजर मधे ठेऊन खा, आईची शप्पत , वडिलांसाठी शेअर करा, पेशव्यांना १०० लोकांनी युद्धात हरवले, छत्रपती संभाजी महाराज ७.५ फूट उंच होते, अमक्या ढमक्याचा वाढदिवस , आजचा दिवस कसा खास आहे, चंद्र वेगळा दिसणार आहे आणि gm gn ! अरे काय चाल्लय काय ?
5 Nov 2015 - 10:59 am | बाळ सप्रे
एकंदरीत ढकलण्याच्या अतिरेकामुळे whatsapp वर आलेल्या पोस्टची credibility लयाला गेली आहे हे नक्की .. अगदी थोडे लोक ढकलण्यापूर्वी याचा विचार करतात ..
5 Nov 2015 - 11:20 am | सुबोध खरे
मी दिवसात दोन वेळा व्हॉट्सअॅप पाहतो. दोन्ही वेळा दवाखान्यातून परत आल्यावर दहा मिनिटांसाठी करमणूक म्हणून. यापेक्षा त्याची जास्त लायकी नाही. त्यातील विनोद वाचून हसता येते.
शिवाय मूर्ख लोकांनी टाकलेले संदेश वाचूनही. लिंबू मिरची गाडीला का लावायची तर साप चावला तर ताबडतोब उपचार करता येतो इ इ.
आता असे वाचून हसायलाच येते काय करायचे.
म्हणतात ना--तसे पाहिले तर आपण सर्व जण मुळात मूर्खच आहोत
पण काही लोक ते परत परत सिद्ध करत राहतात.
हसा आणि आरोग्य मिळवा.
5 Nov 2015 - 1:56 pm | खटपट्या
खी खी खी
बाडीस..
5 Nov 2015 - 2:19 pm | नाखु
त्यांचा practice makes man perfect असाही विचार असेल.
5 Nov 2015 - 2:03 pm | पैसा
=)) लै वेळा सहमत!!
5 Nov 2015 - 2:11 pm | टवाळ कार्टा
खिक्क
5 Nov 2015 - 2:37 pm | प्यारे१
विवाहोत्सुक लोकांना 'पोहे' दिसले की चिर मिरच्या आणि नंतर पिळ लिम्बु असं काही करता यावं म्हणून लींबूमिरच्या बांधतात असं एक स्पष्टीकरण whatsapp वर फिरवावं म्हणतो. ;)
5 Nov 2015 - 2:44 pm | अभ्या..
खाली एक बिब्बा असतोय. देऊ का त्याचे पण स्पष्टीकरण? ;)
5 Nov 2015 - 8:03 pm | विकास
मी दिवसात दोन वेळा व्हॉट्सअॅप पाहतो.
डॉक्टरांनी म्हणलेले असल्याने, दिवसातून दोन वेळेस गोळ्या घ्या, असे म्हणल्यासारखे वाटले. ;) (ह.घ्या.)
लिंबू मिरची गाडीला का लावायची तर साप चावला तर ताबडतोब उपचार करता येतो इ इ.
नशिबाने असले मेसेजेस अजून आलेले नाहीत. फक्त एखादा जोक हा नवीन असला तर तो एका पेक्षा अधिक गृपमधे माझ्या सकाळच्या वेळेस दिसतो.
5 Nov 2015 - 11:30 am | अजया
डाॅ. बाडिस!!
5 Nov 2015 - 8:04 pm | विकास
वरील उपयुक्त चर्चा वाचून वाटले की आता येत्या वर्षी दहावीच्या परी़क्षेस मराठीत निबंधाला विषय असणारः
"व्हॉट्सअॅप शाप की वरदान?" ;)
5 Nov 2015 - 8:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हॉट्स अॅप चा वापर खुप मर्यादित आहे. मिपाकरांच्या गृपावर पण फार कमी गप्पा हाणल्या जातात. दिवसभरात १/२ तासापेक्षा जास्तं वापरत नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर हे अशक्य नाही.
7 Nov 2015 - 5:46 pm | डॉ. सुधीर राजार...
सहमत आहे.
8 Nov 2015 - 9:01 am | गरजू पाटिल.
(ज्या-त्या स्टाइलन वाचावं)
बातमी
दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.
ही बातमी विस्ताराने लिहा...
*****************************
नवकथा
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.
************************************
नवकविता
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी
अंग चोरून पडलेली
वडे तळणाऱ्या माणसाच्या
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुर्र
ही खरी घामाची कमाई
पुढ्यातल्या
टवका गेलेल्या बशीतला
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात येउन गेलं
उगाचच
*****************************************
ललित
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.
'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं.
'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!
******************************************
शामची आई व्हर्जन
'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'
******************************************
जी ए कुलकर्णी व्हर्जन
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.
*********************************************
गो. नि. दांडेकर व्हर्जन
हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?
*******************************************
ग्रेस व्हर्जन
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!
8 Nov 2015 - 9:15 am | गरजू पाटिल.
हे कळणारे लोक्स कंपुत असावेत. झालंच तर कंपुचा संपू व्हावं आणि लोकसंख्येला आळा घालावा.
१०-१५ च्या वर एकही नको. कटाक्षान.