स्पेन... बरेच दिवसांपासुन स्पेनला जायची इच्छा होती. ती ह्या जुन मधे पूर्ण झाली. १-२ महिने आधीपासुनच मी तिथली माहिती मिळवायला सुरवात केली होती. कुठल्याही नविन ठिकाणी गेल्यावर मला तिथले स्थानिक पदार्थ खायला आवडते. गाझपाचो सुप, हॅम आणि स्पॅनिश पायेया हे तीन पदार्थच सगळ्यात जास्त ऐकण्यात होते, पण आम्ही प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळले की फक्त एवढेच नाही तर अजून खूप प्रकार आहेत इथे खाण्यासारखे.
आमची १५ दिवसाची ट्रिप ठरली होती. माद्रिद, वॅलेन्सिया, इबिझ्झा आणि बार्सेलोना. आमच्या ट्रिपची सुरवात मॅद्रिद ह्या शहरापासुन होणार होती. आम्ही रात्री ८ वाजता हॉटेलवर पोहोचलो. दिवसभराच्या प्रवासाने खूप भूक लागली होती. हॉटेल समोरच बरेच रेस्टॉरंट्स होते. त्यातल्या एका रेस्टॉरंट मधे घुसलो. गरम होतच होते त्यामुळे सगळ्यात आधी सांगरियाची ऑर्डर दिली.
(सांगरिया)
सांगरिया हे स्पेन व पोर्तुगल मधील प्रसिद्ध पेय आहे. रेड वाईन, फळांचे तुकडे, ज्युस आणि कधीकधी ब्रँडी हे सर्व एकत्र करुन हे पेय बनवले जाते. वाईन नसल्यास तुम्ही sparkling wine किंवा Champagne as a base म्हणून वापरु शकता. थंडगार सांगरियामुळे आता जास्त गरमी जाणवत नव्हती पण अजूनच भूक लागली होती. आम्हाला स्पॅनिश पायेया खायचा होता. वेटरनी सांगितले की फक्त एका माणसासाठी मिळणार नाही. तुम्हाला पूर्ण मोठा पॅन घ्यायला लागेल जो २ माणसांसाठी आहे. शेवटी आम्ही २ माणसांसाठी Lobster paella मागवला.
एवढ्या मोठा पॅनमधे पायेया बघुन आम्हाला धडकीच भरली होती, पण चव खूप छान असल्यामुळे आणि लागलेली भूक, आम्ही तो पायेया संपवला. पायेया राईस्, टोमॅटो, मिक्स फिश, केशर, पापरीका आणि सगळ्यात शेवटी लॉबस्टर ह्या सर्व जिन्नसांसोबत शिजवलेला भात. खरच, खूप छान चव होती त्याची. भरपेट पायेया आणि सांगरिया ह्याने आमचे मन व पोट त्रुप्त झाले होते. थोड्यावेळ फेरफेटका मारुन आम्ही झोपायला गेलो.
(लॉबस्टर पायेया)
दुसर्या दिवशी सकाळी हॉटेल रिसेपशनिस्टने आम्हाला जिथे नाश्ता मिळणार होता, त्या रेस्टॉरंटचा पत्ता दिला. रेस्टॉरंट जवळच होते. नाश्त्यासाठी वेगळे टेबल मांडले होते. तिथे वेगवेगळी फळे, ब्रेड, कुकीज, cold cut meat, फ्रुट ज्युस, दही, दूध, कॉफी हे सगळे ठेवले होते. शिवाय टेबलवर एक छोट मेन्यू कार्ड होते. त्यात ब्रेड टोस्ट आणि ऑमलेटचे ऑप्शन होते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऑर्डर करु शकता. तिथे मला सगळ्यत जास्त आवडलेले टोस्ट म्हणजे, फ्रेश बेक्ड ब्रेड स्लाईस वर हर्ब्स टाकुन बनवलेले टोमॅटो स्प्रेड. ह्या वर तुम्ही आवडत असल्यास चीज टाकुन टोस्ट करु शकता. टोस्ट मधे असलेले दुसरे ऑप्शन्स म्हणजे, ब्रेड-बटर, जॅम, सॉसेज स्प्रेड, toast with Ham.
(टोमॅटो पेस्ट टोस्ट)
नाश्ता करुन आम्ही बाहेर पडलो. आता आम्हाला पूर्ण दिवस फिरायचे होते. सकाळाच्या भरपेट नाश्त्यामुळे दुपारी भूक अशी लागलीच नव्हती. त्यामुळे थेट रात्रीच जेवायला गेलो. आज आम्ही 'स्पॅनिश हॅम' खाणार होतो.
स्पेन हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते ह्या हॅमसाठी. स्थानिक भाषेत ह्याला jamón ibérico (यामोन आइबेरियो - आइबेरियन हॅम) असे म्हटले जाते. मॅद्रिद मधे सगळ्यात जास्त तर पूर्ण स्पेनमधे ठिकठिकाणी तुम्हाला हे हॅम म्युझियम बघायला मिळतात. दुकानात प्रवेश करताच तुम्हाला हे हॅम सगळीकडे लटकवेलेले दिसतात. हे हॅम पश्चिम व दक्षिण स्पेनमधे आढळणर्या आइबेरियन पिगच्या पायाचे बनवलेले असतात. ह्यांना जन्मापासुन खास खाद्य दिले जाते. योग्य वयात आल्यावर त्यांचा मांडीचा भाग मिठ लावुन २ आठवड्यासाठी वाळवला जातो. त्यांना परत एकदा धुवून ५-६ आठवड्यांसाठी परत वाळवले जाते. ह्या पूर्ण प्रक्रियेला कमीत कमी १ वर्ष लागते. काही ठिकाणी ३ वर्ष देखिल हे हॅम साठवले जाते.
(आइबेरियन हॅम)
(आइबेरियन हॅम)
आमच्या हॉटेल जवळच एक बरेच जुने असलेले हॅम म्युझियम होते. आज आम्ही तिथे जेवायचे ठरवले होते. खुप गर्दी दिसत होती. तिथे तुम्हाला उभे राहूनच खावे लागते. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागवायचे आणि तिथेच उभे राहून बियर सोबत खायचे. आम्ही एक जागा पकडुन मिक्स हॅमची प्लेट मागवली. हॅमची चव खुप छान होती. तोंडात टाकताच हॅम विरघळत होते. मिक्स हॅम, मिक्स चिज, सँडविचेस आणि बियर व सॉफ्ट ड्रिंक ह्याने आमचे पोट तुडूंब भरले होते.
(मिक्स हॅम आणि चीज प्लेट)
(मिक्स हॅम आणि चीज प्लेट)
दुसर्या दिवशी आमची मॅद्रिदची वॉकिंग टुर होती. त्या टुर गाईडने आम्हाला एक पदार्थ नक्की खायला सुचवले होते. तो पदार्थ होता, Cantabrian Cocido Montañes (Mountain stew in a pot). ह्यात वापरलेले पदार्थ म्हणजे पोर्क रिब्स, बेकन, पांढरे बिन्स, कोबी, भात, चिरोझ हे सगळेच पचायला खूप जड असल्यामुळे दुपारच्या जेवणातच खाल्ला जातो. एका मातीच्या भांड्यामधे पोर्क व बिन्स सूप तर प्लेटमधे पोर्क रिब्स, बेकन, कोबी, भात, चिरोझ serve केले जाते. तुम्ही तुमच्या बाऊल मधे प्लेटमधे ठेवलेल्या पदार्थांमधील जे आवडेल ते घेऊन त्यावर सुप टाकुन हे खाल्ले जाते. आम्ही पण हा पदार्थ दुपारीच खाल्ला आणि गाईडने सांगितल्या प्रमाणे थेट दुसर्या दिवशीच नाश्ता केला.
(Cantabrian Cocido Montañes)
(Cantabrian Cocido Montañes)
(Cantabrian Cocido Montañes)
ह्या नंतर आता आम्हाला मॅद्रिद मधे प्रसिद्ध असलेले चुरोज खायचे होते. चुरोज म्हणजे मैदा, बटर व अंडी मिक्स करुन भज्यांसारखे पिठ भिजवले जाते. त्याचे पाईपिंग बॅग मधे भरुन लांब तुकडे तळले जातात. हे तुकडे साखर व दालचिनी पावडर मधे घोळुन चॉकलेट सॉस सोबत serve केले जाते. स्पॅनिश लोकांचा हा आवडीचा नाश्ता आहे.
(चुरोज)
आमचे मॅद्रिदचे दिवस संपून आता आम्ही व्हॅलेन्सियाला पोहोचलो होतो. समुद्र किनारी असल्यामुळे इथे आम्हाला भरपुर मासे खायला मिळणार होते. त्यामुळे आम्ही खूष होतो. तसेच व्हॅलेन्सियाचे फुड मार्केट (Mercat Central) सुद्धा प्रसिद्ध आहे. व्हॅलेन्सियाचा पायेया थोडा वेगळा असतो. ह्या पायेया मधे असलेले प्रमुख घटक म्हणजे snails आणि डबल बी. Snails खायची काही हिंमत झाली नाही त्यामुळे ह्या पायेयाची चव घेता नाही आली. वर सांगितल्या प्रमाणे आम्ही व्हॅलेन्सियामधे भरपूर मासे खाल्ले. व्हॅलेन्सिया नंतर आम्ही इबिझ्झा मधे २ दिवस घालवणार होतो. येथे खाण्यासाठी असे काही प्रसिद्ध नाही. पण येथिल समुद्र किनारा आणि रात्री २-३ वाजेपर्यंत चालु असलेले रेस्टॉरंट्स मात्र नक्कीच लक्षात राहतील.
आमचा शेवटचा टप्पा होता बार्सेलोना. येथे आम्ही ५ दिवस राहणार होतो. इथे आम्ही तपाश टुर आधीच बुक केली होती. तपाश तसे आम्ही बाकी सगळ्या शहरांमधे खाल्ले होते, पण त्या मागचा इतिहास, कथा, खायची पद्धत काहीच माहित नव्हते. त्यासाठी ह्या टुरची आम्ही आतूरतेने वाट बघत होतो.
आज आमची तापाश टुर होती. टुरच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो. थोड्याच वेळात सगळे लोक जमल्यावर टुर गाईडने आम्हाला तापाश बद्दल सांगायला सुरवात केली.
"Tapash" हा शब्द "Tapar" म्हणजे "To cover" ह्या शब्दापासुन आला आहे. आम्हाला सांगितलेल्या कथेप्रमाणे, राजा अल्फोन्सो हा जिथे रहायचा तिथे नेहमी वारा असे. एकदा तो फिरण्यासाठी बाहेर पडतो. तेथे एका ठिकणी तो एका नोकराला वाईन मागतो. तो राजाला वाईन एका ब्रेड व हॅमच्या तुकड्यासोबत देतो. खूप वार्यामुळे वाईनमधे कचरा पडु नये म्हणुन तो वाईनचा ग्लास त्या ब्रेडवर हॅम ठेवुन त्याने झाकुन देतो. तेव्हा राजा त्याला परत वाईन मागताना "Tapar" मागतो, म्हणजे "To cover". ह्यावरुनच Tapash हा शब्द आला.
तपाश म्हणजे आपल्या भाषेत 'चकणा' :) तपाश हे थंड, गरम, तळलेले किंवा भाजलेले देखील असू शकते. आमच्या टुरमधे आम्ही तीन तपाश बारमधे जाणार होतो. सगळ्यात पहिले आम्ही सिटी सेंटरमधे असलेल्या एका छोट्याश्या पण खूप जुन्या असलेल्या बार मधे गेलो. तिथे चिकन क्रोकेट्स, मश्रुम क्रोकेट्स, स्पॅनिश ऑमलेट, सॉसेजेस असे वेगवेगळे प्रकार ठेवले होते. त्यासोबत आम्ही संत्र्याच्या फ्लेवरची लिकरची चव घेतली. तिथे अर्धा-पाऊण तास घालवून दुसर्या बारमधे जायला निघालो. हा बार तपाशसाठी प्रसिद्ध आहे. इथे आम्हाला ब्रेड स्लाईस वर टोमॅटो पेस्ट आणि चुरोज असे ओपेन सँडविच, चिकन कटलेट्स व रोझ / रेड / व्हाईट वाईन दिली होती.
(चिकन क्रोकेट्स)
(वेगवेगळे तपाश)
(ब्रेड विथ टोमॅटो पेस्ट)
(ब्रेड विथ सॉसेजेस)
(क्रॅब लेग्स)
ह्या बारमधे आम्हाला एक मोठे दिव्य पार पाडायचे होते. :P स्पेनमधे पूर्वी "पोरोन' नावाचे एक पेयपात्र पेय पिण्यासाठी वापरले जायचे. आज त्याच्याच वापर करुन पाणी, बीयर किंवा वाईन प्यायची होती. हे पात्र म्हणजे आपल्या प्रयोगशाळेत सापडणार्या एखाद्या पात्राप्रमाणेच दिसते. ह्याच्या आकारामुळे ह्यात वाईन ठेवली असता वाईनचा हवेशी जास्त संयोग येत नाही त्यामुळे तिची चवही खराब होत नाही. असे म्हटले जाते की, स्पेनमधे जेव्हा प्लेगची साथ आली होती, तेव्हा एकत्र पेयपान करताना एकमेकांना त्याची लागण होऊ नये ह्यासाठी हे पात्र बनवले गेले.
(पोरोन)
आम्हाला ३ वेगवेगळे पोरोन दिले होते. एकामधे वाईन, एकामधे बियर आणि एकामधे पाणी असे भरले होते. ज्याला जे हवे असेल त्यानी ते पात्र वापरायचे. प्रत्येकाने ते पात्र हातात घेउन प्यायचा प्रयत्न केला. खुप मजा येत होती. कधी कोणाच्या अंगावर सांडत होते तर कोणाच्या तोंडातून ते पेय भरल्यामुळे ओसंडून वाहत होते. पण माझा नवरा मात्र ती स्पर्धा जि़ंकला. आम्ही सगंळ्यांनी खूप एंजॉय केले. ते पात्र नक्की घ्यायचे, हे ठरवूनच आम्ही टुर संपवून घरी आलो.
दुसर्या दिवशी सकाळीच एका souvenir shop मधुन हे पोरोन विकत घेतले. बार्सेलोनामधे भरपुर खाणे-फिरणे ह्यात दिवस कसे संपले कळलेच नाही. अजुनही स्पेनमधल्या बर्याच जागा बघायचे आणि वेगवेगळे पदार्थ खायचे बाकी आहेत. परत एकदा स्पेनची ट्रिप करायची हे ठरवूनच आम्ही स्लोवाकियाला परत आलो.
अजुन काही वेगवेगळे खाल्लेले पदार्थ :
(तळलेल्या मिरच्या)
(पोर्क इयर्स (कान) - स्थानिक भाषेत ओरिया)
(फ्राईड रॅबिट)
(स्पॅनिश ऑमलेट)
(सांगरिया)
(Ox tail stew)
(चुरोज)
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:10 am | पैसा
अफलातून फोटो! यातले काही पदार्थ वाचताना स्पॅनियर्ड्स चिन्यांचे भाऊ आहेत काय अशी शंका आली! ;)
16 Oct 2015 - 11:47 am | प्रीत-मोहर
ऑसम खाद्ययात्रा!!!
16 Oct 2015 - 1:07 pm | वेल्लाभट
तोंपासु
सगळेच पदार्थ रोचक पण हॅम जॅम भारी... आयमीन जाम भारी वाटतोय
पोरॉन सुंदर
माहोल फोटो आहेत आणि वर्णनही खास
ही ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार
16 Oct 2015 - 4:53 pm | मितान
शाकाहारी असल्याने स्पेनमध्ये अगदीच मोजके खाल्ले होते. पण हे उत्साहाने सतततत फसफसणारे लोक खातात काय याचे कुतूहल होते. या लेखाने ती इच्छा पूर्ण केली.
16 Oct 2015 - 5:28 pm | अनन्न्या
शाकाहारींसाठी काही असते का खायला? फोटो मस्त आलेत, आणि पोरोन (चंचूपात्र) खास आहे अगदी!
16 Oct 2015 - 8:08 pm | रेवती
अगदी वेगळी माहिती व पदार्थही कधी न ऐकले पाहिलेले.
लेखन आवडले. फोटू तर छानच आलेत.
स्पॅनिश ऑम्लेट हे भटुर्यासारखे दिसतेय व चुरोज हे चकलीसारखे.
॓
17 Oct 2015 - 3:43 pm | सस्नेह
फोटो भारीच आहेत.
पण मी शाकाहारी असल्याने तोंपासू नाही ...!
19 Oct 2015 - 2:16 am | जुइ
शाकाहारी असल्याने असे वाटत आहे की स्पेन पाहायला गेलो तर खायला फारसे काही नाही असे वाटते.
16 Oct 2015 - 9:21 pm | कविता१९७८
स्पॅनिश आॅमलेट मस्तय, सर्व पदार्थ तों.पा.सु.
16 Oct 2015 - 10:04 pm | के.पी.
स्पॅनिश खाद्ययात्रेचि सफर घडवून दिल्याबद्दल आभार.
अगं ते पोरोन फारच इंटरेस्टिंग आहे,खुप आवडलं :】
17 Oct 2015 - 3:36 am | सानिकास्वप्निल
वाह! वाह! स्पॅनिश खाद्ययात्रेचा अनुभव झक्कास !
अगं किती छान फुडी ट्रीप झाली तुमची. किती वेग-वेगळे पदार्थ आहेत आणि नॉन-व्हेजच्या तर व्हरायटी आहेत, यातले मी फार मोजकेच पदार्थ खाते तरीसुद्धा फोटो बघून तोंपासू ;)
स्पॅनिश ऑम्लेट कसलं फ्लफी आहे आणि हो रेवतीसारखेच म्हणेन भटुर्यासारखे दिसतेय अगदी. चुरोज, क्रॅब लेग्ज, तळलेल्या मिरच्या, तपाश सगळेच भारी! तपाश सर्व्हिंग प्लॅटर घेतलेस की नाही तुझ्याही संग्रहात ठेवायला?
मस्तं वर्णन मृ, फोटो पण सुंदर. मला ते पोरोन हवयं :))
17 Oct 2015 - 9:54 am | विशाखा पाटील
काय काय खातात हे लोक्स! कोणता प्राणी खात नाहीत... बाकी वेगळ्या खाद्यजत्रेची ओळख मस्त.
17 Oct 2015 - 2:19 pm | मधुरा देशपांडे
माहितीपुर्ण आणि सुंदर फोटोंनी सजलेला लेख. बरेचसे पदार्थ खात नाही त्यामुळे स्पे न ला जायचे म्हटले की मला पहिले खायचे काय हाच प्रश्न पडतो. चुरोज मेक्सिकन हॉटेल मध्येही मिळतात इथे.
17 Oct 2015 - 9:18 pm | नूतन सावंत
मी मात्र हे सगळे पदार्थ खाऊन पाहणार,कसले मस्त फोटो आहेत.लेख आ हे वे सां ला न.
18 Oct 2015 - 1:37 pm | मांत्रिक
एकदम मस्त माहिती. फोटो तर अगदी झकास! ते तळलेले क्रॅब्ज फार आवडले. अगदीच कुरकुरीत दिसताहेत.
18 Oct 2015 - 5:05 pm | पियुशा
मी तर यातले कैच्च खाउ शकणार नाही , पण धागा न फोटु ऑसम आहेत :)
18 Oct 2015 - 8:21 pm | स्वाती दिनेश
स्पेनची खाद्ययात्रा आवडली.
तपास/तापस, पायेया माझ्या विशेष आवडीचे..
स्वाती
18 Oct 2015 - 8:55 pm | उमा @ मिपा
खाद्यमहाजत्रा जबरदस्त आहे! फोटो क्कायच्या क्काय तोंपासु. मृणालिनी, मस्तच लिहिलाय लेख.
19 Oct 2015 - 11:34 am | गिरकी
स्पेन भटकण्यासाठी लिस्ट वर होतं. आता तिथली खादाडी बघून स्पेनचा नंबर लिस्ट मध्ये खूप वर गेला आहे. :)
19 Oct 2015 - 4:41 pm | पिलीयन रायडर
फोटो पाहुन वाटलं की शाकाहारी लोकांनी कशी बरं ऐश करावी अशा ठिकाणी??
एका देशामधल्या खादाडी बद्दलचा लेख पहिल्यांदाच वाचलाय मी.. आवडला!
19 Oct 2015 - 7:29 pm | प्यारे१
फोटो 'बायपास' करुन वाचलाय लेख. लेख म्हणून आवडला.
19 Oct 2015 - 9:03 pm | इडली डोसा
मस्त ओळख करुन दिली आहे वेगवेगळ्या स्पॅनिश खाद्यांची. विशेष म्हणजे कधिकाळी स्पॅनिश अमलाखाली असलेल्या लॅटिन अमेरिकेत मात्र लॅटिनोजचे स्वत:चे असे वेगळे पदार्थ असतात.
20 Oct 2015 - 5:53 pm | Maharani
छान माहिती आणि फोटो ..
21 Oct 2015 - 3:27 pm | Mrunalini
सगळ्यांचे आभार.
तसे व्हेज ऑप्शन्स कमीच वाटले मला सुद्धा. पण पिझ्झा आणि फलाफलचे शॉप्स सगळीकडे आहेत आणि फास्ट फुड चेन्स मुळे तसे खाण्याचे हाल होणार नाहीत.
21 Oct 2015 - 5:20 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागागागा.......
21 Oct 2015 - 10:34 pm | इशा१२३
बापरे काय काय प्राणी खातात हे स्पेनिश लोक.
आमच्या सारख्या व्हेज लोकांना खायला काहि मिळ्ते कि नाहि?
असो नविन बरिच माहिति मिळाली.छान लेख.
24 Oct 2015 - 11:28 am | अस्मी
मृ स्पेनची एकदम मस्त ओळख आणि खतरनाक फोटोज!!!
24 Oct 2015 - 8:39 pm | पद्मावति
आहाहा....काय मस्तं! ही स्वादिष्ट, रंगतदार खाद्ययात्रा खूप खूप आवडली.
3 Nov 2015 - 2:08 pm | मुक्त विहारि
मस्त...