उभा जन्म कोकणात गेला त्यामुळे भात म्हणजे जीव की प्राण, त्यामुळे तो कुठल्याही स्वरूपात मला आवडतो. मऊ मऊ दुधुभातु पासून जी उदरभरणाला सुरुवात केली. आता तो प्रवास रीसोतो पर्यंत आलाय. मला भातावर निरनिराळे प्रयोग करायला आणि खायलाही आवडतात. भात खाल्ला नाही तर जेवल्यासारखं वाटत नाही असे मानणाऱ्यातले आम्ही.
तांदूळ हे जगात सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं तृणधान्य आहे. जगात सगळ्यात जास्त तांदूळ चीनमध्ये आणि त्या खालोखाल भारतात पिकवला जातो. त्यामुळेच भारतीय आहारात आपल्याला भाताचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.
भाताला आयुर्वेदातही महत्व आहे. भात शीत प्रकृतीचा मानाला जातो. पचायला हलका असतो. पोटाला थंडावा देतो त्यामुळे भूक शांत होते. पण आयुर्वेद सांगतं की जुना भातच खाणे योग्य आहे. आपल्या हिंदू धर्मातसुद्धा तांदुळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
माझ बालपण कोकणात गेलं. आजी सकाळी उठली की खिमटाचं मोठ्ठ पातेलं चुलीवर ठेवायची. (खिमट म्हणजे मऊ भात किंवा गुरगुट्या भात. ब्राम्हणेतर समाजात खिमट किंवा खिमटी म्हणूनच ओळखला जातो.) उकळी आली की पातेल वैलावर जायचं आणि रटरटत राहायचं. आम्ही चुलीसमोर बसून आईने ढोसेपर्यंत दात घासत बसायचो. यथावकाश सगळ उरकलं की खिमट खायला बसायचं. उपवासाच्या वारी लोणचं व भाजलेला तांदळाचा पापड आणि इतर दिवशी चुलीत भाजलेल्या वाकट्या तोंडीलावण म्हणुन मिळायच्या. ते गरम गरम खिमट ओरपताना ब्रम्हानंदी टाळी लागायची. रीसोतोच्या तोंडात मारेल अशी चव. पण कधी रात्रीचा भात उरला असेल तर मग लसणाची खमंग फोडणी दिलेला फोडणीचा भात. फोडणीचा भात तर मला एवढा आवडायचा की आई सांगते लहानपणी ताप आला की मी आईकडे फोडणीचाच भात मागायची.
आई चपात्या करायची. तांदळाच्या व नाचणीच्या भाकऱ्या पण बनवत असे. लुसलुशीत तांदळाचे घावणे तर आई खूप छान बनवायची. लहानपणी चपाती मला अजिबातच आवडायची नाही. मात्र गरम गरम तांदळाच्या भाकरीचा चंद्र फार आवडायचा. पण मनापासून आवडायचा तो भातच. गरमगरम भातावर वरण, साजूक तूप आणि लिंबू आजही तितकंच आवडतं. हातसडीचा भात आणि त्यावर तिखट लालभडक माश्याचे कालवण, जोडीला पांढरा कांदा. पहिले भात आमच्या शेतातलाच असायचा, हल्ली शेती नाही करत. आजकाल बारीक कोलम खायची सवय झाली तसा जाडा भात खाववत नाही.
लहानपणी पुण्याला मावशीकडे जायचो तेंव्हा त्यांच्याकडे छोट्याश्या पातेल्यातला भात पाहून मला हसायला यायचं. मावशी म्हणायची, 'भाताने लवकर भूक लागते.' मावस भावंड आम्हाला 'कोकणे कोकणे भात बोकणे' चिडवायची. पण म्हणून काही माझ भात प्रेम कमी झालं नाही. उलट तीच भावंड आमच्याकडे आली की माझी आजी त्यांना सांगायची की भात खावा थोडासा शेवटी, पोटाला थंडावा येतो.
लग्न झाल तसं भात आणखी आवडू लागाला. कामावरून घरी आल्यावर साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा येतो. आमच्यासारख्या भाताखाऊना भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. मग भाताचेच वेगवेगळे प्रकार करू लागले. सोयीस्कर, पोटभरीचा आणि हेल्दी वन डिश मिल भातापासून तयार होतो. माझ्या धाकट्या मुलीला पण नुसतं वरण भात खायचा कंटाळा पण अस काही केलं की तिला फार आवडतं.
पालक खिचडी- पालक खिचडी रात्रीच्या जेवणासाठी अगदी योग्य पर्याय आहे. बनवायला सोपी, पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम.
साहित्य:
तांदूळ - १ कप (बासमती घेण्याची गरज नाही, रोजच्या वापरातला किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
मुगडाळ- १/२ कप
शेंगदाणे- १/४ कप (आवडत असल्यास अजून जास्त वापरा)
पालक, चिरून- ३ कप (१ छोटी गड्डी/जुडी)
कांदा, चिरून- ३/४ कप (१ मोठा)
टोमॅटो, चिरून- १/२ कप (१ मध्यम)
लसूण, ठेचुन किंवा बारीक चिरून- ६ पाकळ्या
राई/ मोहरी- १/२ टीस्पून
जीरे- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला / मिरची पूड- २ टीस्पून
गोडा मसाला- २ टीस्पून
तेल- ३ टेबलस्पून
गरम पाणी- अंदाजे २ १/२ ते ३ कप (तांदूळ नवा आहे कि जुना यावर अवलंबुन आहे.)
मीठ- चवीनुसार
खवलेले ओले खोबरे- १/२ कप
साजूक तूप- जरुरीनुसार (ऐच्छिक)
कृती:
किमान १ तास शेंगदाणे पाण्यात भिजत घाला.
पालक निवडुन, धुवून आणि चिरून घ्या. कोवळी देठे घ्या.
तांदूळ व मूगडाळ धुवून बाजूला ठेवा.
कुकरमध्ये तेल गरम करा. राई टाका.
राई तडतडली की जिरे, लसूण आणि कांदा घालून परता.
कांदा गुलाबी झाल्यावर हळद, हिंग, तिखट घाला आणि थोडावेळ परता.
आता टोमॅटो, पालक, शेंगदाणे आणि गोडा मसाला घालून एक मिनीट परतून घ्या.
तांदूळ आणि डाळ घालून जरासं परता.
नंतर पाणी आणि मीठ घाला. झाकण लावून ३ शिट्ट्या काढा.
वाफ गेल्यावर कुकर उघडा आणि व्यवस्थित मिक्स करा.
वाढताना भातावर साजूक तूप आणि ओले खोबरे टाकून कोशिंबीर व पापडाबरोबर सर्व्ह करा.
टीप: पालकाऐवजी मेथी वापरू शकता.
........................................................................................
सोड्याची खिचडी - सोड्याची खिचडी किंवा सोडे भात कोकणात अतिशय लोकप्रिय आहे. सी.के.पी. लोकांची तर यात खासियत आहे.
साहित्य:
सोडे - १/२ कप
तेल- ४ ते ६ टेबलस्पून
तांदूळ - २ कप (बासमती तांदूळ वापरण्याची गरज नाही, मी कोलम तांदूळ वापरते. )
कांदा, उभा चिरून- २ कप
टोमॅटो, बारीक चिरून- १ कप
बटाटा- १ मोठा
दालचिनी- १ इंचाचा तुकडा
तमालपत्र- ३
आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
हळद - १/२ टीस्पून
हिंग- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ४ ते ५ टिस्पून
ओल्या नारळाचे वाटण- २ टेबलस्पून (नाही वापरले तरी चालेल)
मीठ- चवीनुसार
पाणी - ४ कप (तांदूळ जुना आहे की नवा यावर अवलंबून असते)
अंडी, उकडलेली - २
कोथिंबीर, बारीक चिरून - मुठभर
कृती:
सोड्याचे हातानेच तोडून लहान तुकडे करा.
व्यवस्थित धुवून आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवा आणि नंतर घट्ट पिळून घ्या.
तांदूळ धुवून बाजूला निथळत ठेवा.
बटाटा सोलुन त्याचे साधारण १ इंच लांबीचे तुकडे करा.
एका छोट्या कुकर मध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी आणि कांदा घालावा.
कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जरास परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परता आणि भिजवून पिळुन घेतलेले सोडे घालून १ मिनिट परता.
नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता टोमॅटो, बटाटा घाला आणि २ मिनिटे चांगले परता.
नंतर तांदूळ घालून एक मिनिटभर परता.
पाणी आणि मीठ घाला. (नुसतेच पाणी वापरण्याऐवजी अर्धे पाणी आणि अर्धे नारळाचे दुध वापरले तर अजून मस्त चव येते.) चांगले मिक्स करावे आणि झाकण लावून कुकर बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या घ्या. (कुकरच्या बाहेरही करता येईल, गरम पाणी वापरलेत तर भात चांगला मोकळा व लवकर शिजेल. साधारण भात शिजायला १५ ते ते २० मिनिटे लागतील.)
वाढताना वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. कोशिंबीर आणि उकडलेल्या अंड्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. सोबत सोलकढी उत्तम लागते.
टीप:
सोडे म्हणजे उन्हात सुकवलेली कोलंबी. कोकणात अनेक पदार्थात सोडे वापरले जातात.
........................................................................................
कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव
साहित्य:
सोललेल्या कोलंब्या- १ कप
बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)- २ कप
कांदा, उभा चिरून- २ मध्यम
टोमॅटो, चिरून- २ मोठे
आलं-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
घरगुती मसाला / मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून किंवा (२ टीस्पून लाल तिखट + १ टीस्पून गरम मसाला)
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लिंबू रस- १ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
साजुक तूप- १ टेबलस्पून
शहाजिरे - १ टीस्पून
तमालपत्र- ३
बाद्यान/चाक्रीफुल- २
मसाला वेलची- २
काळीमिरी- ८
लवंग- ५
दालचिनी- २ इंचाचा तुकडा
नारळाचे दुध- १ कप
गरम पाणी- ३ कप
कोथिंबीर- १/४ कप
तळलेला कांदा-१ कप (ऐच्छिक)
कृती:
कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास मुरत ठेवावी.
तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा.
पातेल्यात तेल गरम करा. अख्खे/खडे मसाले फोडणीला घाला.
त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता.
तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला.
एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला.
हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.
तळलेला कांदा व कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करा.
टीप :
मोठ्या कोलंबी पेक्षा लहान कोलंबी या भातात चांगली लागते.
नारळाचे दुध नसेल तर पूर्ण पाणी वापरले तरी चालेल. (म्हणजे २ कप तांदूळ = ४ कप पाणी)
........................................................................................
दही बुत्ती/दही भात - दही बुत्ती/दही भात उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाला गारवा मिळतो. झटपट होणारा हा भाताचा प्रकार रुचकर आणि पोटभरीचा आहे.
साहित्य:
तांदूळ- १ कप
दही- १ १/२ कप (दही शीळे व फार आंबट नको)
काकडी- १ (ऐच्छिक)
शेंगदाणे- २ टेबलस्पून (ऐच्छिक)
तेल- १ टेबलस्पून
मोहरी- १ टीस्पून
कढीपत्ता पाने- १ डहाळी
सुक्या लाल मिरच्या- २ ते ३
उडीद डाळ- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
मीठ- चवीनुसार
कृती:
भात शिजवून घ्यावा. एका ताटात काढून पसरावा म्हणजे लवकर थंड होईल.
भात थंड झाला की त्यात दही आणि मीठ घाला. ढवळून एकत्र करून घ्या.
काकडीचे छोटे तुकडे करून घ्या.
कढल्यात तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत. हे शेंगदाणे व काकडीचे तुकडे दही घातलेल्या भातावर पसरावेत.
त्याच गरम तेलात उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली की त्यात कढीपत्ता, सुक्या मिरच्या तोडून घालाव्यात. सगळ्यात शेवटी हिंग घालून गॅस बंद करावा आणि हि फोडणी दही-भातावर घालावी.
छान एकत्र करून वाढावे.
सुचना आणि वैविध्य :
* भात गरम असताना भातात दही मिसळू नये.
* तुम्हाला भात जर मऊ व गुरगुट्या आवडत असेल तर त्यात १/४ कप थंड दुध घालावे.
* भात अजून चटपटीत बनवायचा असेल तर भातात बारीक किसलेले आले मिसळावे.
कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जीरे असे एकत्र वाटून दह्यात फेटावे आणि भातात घालावे, छान चव येते.
* सुक्या मिरच्यांऐवजी सांडगी मिरच्या (भरून सुकवलेल्या) फोडणीत टाकाव्यात. भात खाताना वरून कुस्करून * टाकाव्यात, भाताला छान खमंगपणा येतो.
* काकडी ऐवजी किंवा सोबत काळी/हिरवी द्राक्षे किंवा डाळिंबाचे दाणे भातात टाकावेत. पांढरा कांदा पण चिरून घालता येईल. पण मग अशी फळे किंवा भाज्या घातलेला भात लगेचच संपवावा. अन्यथा भाताला पाणी सुटेल व कडवटपणा येईल.
........................................................................................
वालाची खिचडी / डाळींब्यांचा भात
ही खिचडी आमच्या कोकणात फार लोकप्रिय आहे. खरतरं ही फक्त नावानेच खिचडी आहे, आहे हा बिरड्याचा (वालाचा) मसालेभात … एकदा नक्की बनवा, नक्कीच पुन्हा पुन्हा बनवत राहाल.
साहित्य:
उत्तम प्रतीचा जुना तांदूळ - २ कप (बासमती घेण्याची गरज नाही, आंबेमोहर किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
मोड आणून सोललेले वाल- १ १/२ ते २ कप
चिरलेला कांदा- २ कप
चिरलेला टोमॅटो - १ कप
ठेचलेला लसूण- १ टेबलस्पून (या भातासाठी आले अजिबात वापरू नका. आल्याची चव बिरड्याची चव घालवते)
राई/ मोहरी- १ टीस्पून
जीरे- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला / मिरची पूड- ४ ते ५ टीस्पून
गोडा मसाला- २ टीस्पून
खिसलेला गूळ- १/४ टीस्पून किंव्हा चिमुटभर (ऐच्छिक)
तेल- ५ ते ६ टेबलस्पून
गरम पाणी- ४ ते ४ १/४ कप (खास कोकणी चवीसाठी नारळाच दुध २ कप + पाणी २ १/४ कप वापरा)
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
खवलेले ओले खोबरे- १/२ कप
साजूक तूप- जरुरीनुसार (ऐच्छिक)
कृती:
तांदूळ आणि वाल धुवून बाजूला ठेवावेत.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी.
ती तडतडली की जीरे, लसूण, कांदा टाकावा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
नंतर त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जरा परतावे.
त्यात वाल, टोमॅटो आणि १/४ कप खोबरे आणि गोडा मसाला टाकून मिनिटभर परतून घ्यावा.
नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जर वेळ परतून घ्यावे.
नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन भात शिजवावा.
नंतर त्यात गूळ टाकून हलक्या हाताने हलवून छान एकत्र करून २ वाफा काढाव्यात. खिचडी तयार.
ही खिचडी प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येते.
वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडस तूप टाकावे.
गरमागरम खिचडी कैरीची कढी किंवा टोमॅटो सार बरोबर वाढावी.
........................................................................................
मोडाच्या मुगाचा भात
मोड आलेल्या मुगाची उसळ किंव्हा आमटीच आपण करतो. पण हा भात सुद्धा छान लागतो.
साहित्य:
शिजवलेला (किंवा शिळा) भात - १ कप
उकडलेले मोडाचे मुग- १/२ कप
चिरलेला कांदा- १/२ कप
चिरलेली सिमला मिरची - १/४ कप
जिरे- १/२ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लाल मिरची पूड- १ टीस्पून
गरम मसाला- १/२ टीस्पून
तेल- २ टेबलस्पून
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर आणि टोमाटो चकत्या सजावटीसाठी
कृती:
भाताची शीते हलक्या हाताने मोकळी करून घ्यावी.
एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, शिमला मिरची, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, मिरची पूड, मुग टाकून १-२ मिनिट परतून घ्यावा. त्यात भात आणि मीठ टाकून छान एकत्र करून झाकण लावून एक वाफ द्यावी.
कोथिम्बिर आणि टोमाटोने सजवून गरमागरम वाढा.
........................................................................................
राइस व्हेजीटेबल रिंग
साहित्य:
राइस बनवण्यासाठी:
उकडलेले चणे- १/४ कप
शिजवलेला भात- २ कप
लिंबाचा रस- २ टीस्पून
बारीक चिरलेला लसूण- १/२ टीस्पून
मिक्स हर्ब्स- १ टीस्पून
मीर पूड- १ टीस्पून
ऑलिव तेल- २ टीस्पून
मीठ चवीनुसार
व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी:
कांद्याच्या रिंगा- ४
१/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेला कांदा - १/४ कप
टोमॅटो स्लाइस- ४
१/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - १/४ कप
२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - ४ चौकोन
बेबी कॉर्न- ४ (१ इंचाच्या तुकड्यात कापावी)
गाजर- १ (१/४ इंचाच्या तुकड्यात कापावे)
ग्रेव्ही बनवण्यासाठी :
बारीक कापलेला कांदा- १/२ कप
बारीक कापलेला टोमॅटो - १/२ कप
लसूण पाकळ्या- ८
दालचिनी- १/२ इंचाचा तुकडा
लाल मिरची पूड - १ टीस्पून
साखर- १/४ टीस्पून
मिरी पूड- १/२ टीस्पून
ऑलिव तेल- २ टेबलस्पून
किसलेले प्रोसेस्ड चीज- १/२ कप
ऑलिव स्लाइस - ५
मीठ चवीप्रमाणे
कृती:
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, कापलेला कांदा व लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात टोमॅटो आणि मीठ टाकावे. टोमाटो मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यात मिरची पूड, मीर पूड, मिक्स हर्ब्स आणि साखर टाकून अजून थोडे परतून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे. ग्रेव्ही तयार.
एका बाऊल मध्ये वर दिल्याप्रमाणे राइस बनवण्यासाठी जे साहित्य दिले आहे ते सर्व एकत्र करावे.
बेबी कॉर्न ब्लांच करावे. वरील सर्व भाज्या (व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी नमूद केल्या आहेत त्या ) थोड्याश्या तेलात परतून घ्याव्यात. परतताना चवीप्रमाणे थोडे मीठ आणि मिरपूड भुरभूरावी.
एका ओवन प्रूफ चौकोनी डिश मध्ये वरील राइस पसरून घ्यावा. मध्यभागी एक खड्डा बनवावा. त्याच्या कडेला फोटोत दाखवल्याप्रमाणे सिमला मिरचीचा मोठा चौकोनी तुकडा, टोमॅटो स्लाइस आणि बेबी कॉर्न चे तुकडे एकाआड एक लावावेत.
त्या खड्ड्यात परतलेल्या उर्वरित भाज्या टाकून त्यावर ग्रेव्ही ओतावी व वर किसलेले चीज पसरावे. चार बाजूला चार कांद्याच्या रिंगा व ऑलिव चे स्लाइस ठेवावे.
५ ते ८ मिनिटे ओवन मध्ये बेक करावे. खायला तयार.
........................................................................................
खिमट
तांदूळ स्वच्छ धुवून सुती कापडावर सावलीत खडखडीत वाळवून घ्या. (लवकर शिजायला हवे असेल तर वाळल्यावर हाताने चुरावे किंवा मग लहान मुलांसाठी खिमट बनवायचे असेल तर मिक्सरमधून भरड काढून घ्यावेत. गावी न चुरताच वापरतात. कारण नंतर शिजले कि रवीने घोटतात. खिमट घोटायची खास लाकडी मोठ्ठी, मजबूत रवी असायची. )
छोट्या कुकर मध्ये थोडंस साजूक करून त्यात जरासं जीर आणि चिमुटभर हिंग घालावे. त्यात मुठभर तांदूळ परतून घ्यावेत. तांदळाच्या चौपट-पाचपट पाणी टाकावे.
चवीप्रमाणे मीठ घालून ४-५ शिट्ट्या काढा. वाफ गेल्यावर रवीने घोटावे किंवा पावभाजीच्या मॅशरने दाबून घ्यावे. घट्ट वाटल्यास पाणी टाकून उकळून घ्यावे. खिमट गरमच खायला हवे. बरोबर मेतकूट, लिंबाचे लोणचे आणि तांदळाचा किंवा पोह्याचा पापड मस्ट.
........................................................................................
मुगडाळ खिचडी
शेंगदाणे तासभर आधी भिजत घालायचे. मुगडाळ आणि तांदूळ धुवून दुप्पट किंवा थोड्या जास्त पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून ठेवायचे. छोट्या कुकरमध्ये तेलावर किंवा तुपावर दालचिनी, मिरी, जिरे, मिरची, कडीपत्ता याची फोडणी करायची. शेंगदाणे व कांदा जरासा परतून हिंग, हळद घालायचे. टोमॅटो चिरून थोडासा परतायचा. आले-लसुण पेस्ट घातली तरी चालेल. मुगडाळ-तांदूळ पाणी काढायचे पण टाकायचे नाही. फोडणीत डाळ-तांदूळ परतून घ्यायचे. जरुरीप्रमाणे मीठ आणि काढलेले पाणी व थोडा गोडा मसाला टाकायचा. तेलावर फोडणी केली असेल तर वरून एक चमचा तूप टाकायचे. व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या ३-४ शिट्या घ्यायच्या.
साध्या डाळीएवजी सालवाली मुगाची डाळ पण चांगली लागते. पण ती किमान अर्धा तास तरी भिजवून ठेवावी म्हणजे छान शिजते. या खिचडीत गाजर, बटाटा, मटार, फरसबी इत्यादी भाज्या किंवा दुधी किसून घातला तरी चालतो. मला खिचडी थोडी मऊच आवडते. सोबत सांडगी मिरची, पापड आणि कढी किंवा कुठलेही सार (टोमॅटो, कैरी, कोकम, चिंच) पाहिजेच. गेला बाजार कोशिंबीर तरी हवीच. खोबऱ्याची हिरवी चटणी पण मस्त लागते.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 12:37 pm | पैसा
कस्ले सुंदर प्रकार आहेत!! भारी एकदम!!! सगळे करणार एकेक करून.
16 Oct 2015 - 2:37 pm | वैदेहिश्री
सगळे वेज प्रकार करुन बघेनच.
"भात खाल्ला नाही तर जेवल्यासारखं वाटत नाही असे मानणाऱ्यातले आम्ही" अगदी सेम आहे.
16 Oct 2015 - 2:52 pm | प्रीत-मोहर
अगदी अगदी. पुण्यात आल्यावर कठिण झाल होत माझ भाताशिवाय निभणं. मग निमित्ताला रुममेटला पोळीभाजीच्या डब्यात शिळी पोळी सापडली आणि आम्ही घरी स्वैपाक करायला लागलो.
चेन्नै ला जॉब साठी ६ महिने राहिले. तिथेही भाताचे अत्यंत रुचकर प्रकार खायला मिळाले. ट्मरिंड राईस, लेमन राईस आणि इतर बेरेच आंध्रा मेस आणि हॉस्टेल मेस वाल्याने खाउ घातले. त्याची जाताजाता आठवण आली.
अवांतर हिंजवडी ला फेज वन मधे आंध्रा मेस आहे. आणि तिच ऑथेंटिक चव असते.
17 Oct 2015 - 2:04 am | स्रुजा
हो, एक आंध्रा मेस नगर रोड ला पण आहे, आणि कहर चव असते.
पुर्वा, भात माझा ही जीव की प्राण. यातले सगळे व्हेज प्रकार करुन बघणार. सादरीकरण लाजवाब. मला सगळ्यात जास्त आवडला तो त्यातला सहजपणा. घरच्या घरी पण सुंदर दिसणारे आणि अर्थात च चविष्ट पदार्थ. तू केवळ पदार्थाला केंद्र स्थानी ठेवलं आहेस ते फार च भावलं, हे खरं कौशल्य !
16 Oct 2015 - 6:42 pm | उमा @ मिपा
व्वा व्वा... आम्ही पण भातखाऊ... छान मेजवानी पूर्वा! नक्की करणार, आवडीने खाणार.
सुरुवातीचं वर्णन खासच लिहिलंय, खूप आवडलं.
16 Oct 2015 - 10:21 pm | अजया
तुझ्या ब्लाॅगवर वाचून काही प्रकार करतच होते.आता एकत्रच मिळाले.छान लिहिलंय पुराण!
17 Oct 2015 - 11:57 am | Maharani
वाह..छान लिहीलयस....एकेक प्रकार करुन पाहीन
18 Oct 2015 - 2:45 am | मधुरा देशपांडे
वाह, देखणे फोटो. कट्टर भातप्रेमी नसले, तरीही आवडीने खाते भात. वेगळे ट्राय करायला आवडतेच, त्यामुळे तुझ्या पद्धतीनेही करुन बघेन.
18 Oct 2015 - 5:01 pm | प्यारे१
___/\___
(... .... ... :/ स्स्स्स्स्स्स्स्र्लप)
19 Oct 2015 - 10:07 am | गिरकी
भात …… जीव कि प्राण …. पण वजनाकडे बघून हल्ली जरा हात आखडता घ्यावा लागतो :( खूप मस्त प्रकार पाहून तोंपासु.
19 Oct 2015 - 11:19 am | सामान्य वाचक
१ १ करुन सगळे वेज भात करुन बघण्यात येतील
19 Oct 2015 - 8:19 pm | सानिकास्वप्निल
भात आवडतो, अगदी भातप्रेमी नाही मी पण भाताचे वेग-वेगळे प्रकार बनवून खायला आवडतात. छान दिल्या आहेत पाककृती, नक्कीच बनवून बघेन मी काही.
फोटो पण देखणे आहेत :)
20 Oct 2015 - 7:20 am | बिन्नी
मला भात फार आवड्तो. यातल्या क्रुती करून बघेन.
20 Oct 2015 - 10:45 am | मांत्रिक
अगदी झकास कलेक्शन. अगदी मनापासून धन्यवाद! या वीकांताला एकतरी प्रकार करणार.
21 Oct 2015 - 5:37 pm | इशा१२३
वा मस्त प्रकार.घरात सगळेच भातप्रेमी असल्याने बहुतेक सगळे व्हेज प्रकार करतेच.डाळिंब्याचा भात मात्र अजुन केला नाहिये.करुन बघेन.
21 Oct 2015 - 7:39 pm | Mrunalini
भात तर माझा पण आवडता. भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही. सोड्याची खिचडी तर काय मस्त दिसतीये. सोडे नाचतायत आता डोळ्यासमोर माझ्या. :P
21 Oct 2015 - 9:13 pm | आरोही
सगळे प्रकार मस्त !! नक्की करण्यात येतील ..
23 Oct 2015 - 11:57 am | बोका-ए-आझम
म्हणजे क्या कहने! काॅलेजच्या दिवसांत अनेक वेळा वरळी कोळीवाड्यातल्या एका मित्राच्या घरी हे प्रकार बनवून खाल्ले आहेत. त्याची आठवण झाली. बाकी पाकृही छान!
23 Oct 2015 - 5:55 pm | रेवती
सर्व पाकृ आवडल्या. फोटूही छानच!
आधी मला भात फारसा आवडत नसे, आता आवडतो.
23 Oct 2015 - 6:30 pm | अनन्न्या
मलाही करून खाऊ घालायला फार आवडतं! सगळे व्हेज प्रकार नक्की करून पाहिन.
24 Oct 2015 - 12:13 pm | प्रचेतस
एकसे एक प्रकार आहेत भाताचे.
फोटोही जबरी
24 Oct 2015 - 8:14 pm | मितान
तुझ्या ब्लॉगची फ्यान आहे मी ! पालक खिचडी तर फारच छान :)
26 Oct 2015 - 5:33 pm | स्वाती दिनेश
खूप छान धागा,
ह्यातील भा कृ (भातांच्या पाकृ) नक्की करणार..
स्वाती
27 Oct 2015 - 4:21 pm | पिलीयन रायडर
भात सोडावा म्हणलं की असले लेख वाचले जातात.. आणि मग.... असोच...
तुम्ही पण आम्हाला घरी बोलवायचं मनावर घ्या!! खिमटी खाऊन पहायला आवडेल खुप!
29 Oct 2015 - 5:22 pm | कविता१९७८
वाह मस्तच, एकेक वेळा सर्व करुन खाल्ले पाहीजे, फोटो अगदी तों.पा.सु.
2 Nov 2015 - 9:06 pm | दीपा माने
भाताचे जेवणातले स्थान अनन्य साधारण आहे ह्या मताची मी आहे. तुमच्या भातांच्या पाकृ पाहून कधी करून पाहीन असे झाले आहे.
तुमच्या ब्लॉगला भेट देणे आत्ताच होईल.
19 Nov 2015 - 12:32 pm | विभावरी
केवढे प्रकार भाताचे !!!भात पोटाला थंडावा देतो आणि तृप्ती पण !
19 Nov 2015 - 12:32 pm | विभावरी
केवढे प्रकार भाताचे !!!भात पोटाला थंडावा देतो आणि तृप्ती पण !
19 Nov 2015 - 12:33 pm | विभावरी
केवढे प्रकार भाताचे !!!भात पोटाला थंडावा देतो आणि तृप्ती पण !
28 Nov 2015 - 3:44 pm | पूर्वाविवेक
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. सर्वांचे मनापासून आभार.