ताटाभोवतीची सजावट(महिरप)

इशा१२३'s picture
इशा१२३ in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:32 pm

नमस्कार मंडळी! जागतिक अन्न दिनाच्या शुभेच्छा!

k

अन्न ही माणसाची मूलभूत गरज. माणसाला जगायला काय हवे असे विचारले तर उत्तर येईल अन्न, वस्त्र, निवारा. तर यातील अन्न मुख्य. आता माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो हा प्रश्न आला तर आपण बहुधा खाण्यासाठी जगणार्‍या गटात मोडू. बहुतेकांना खाण्याची आवड असतेच. बरोबरच आहे म्हणा सुरेख, स्वादिष्ट, रुचकर जेवण कोणाला आवडणार नाही? आता हेच छान छान पदार्थ प्रसन्न वातावरणात बसून खाल्ले तर चार घास जास्तच जातील, म्हणजे फक्त रुचकर भोजन नाहीतर आजूबाजूचे वातावरणही सात्त्विक हवे. शिवाय नुसते वातावरण नाहीतर आजूबाजूची, जेवणघरात स्वच्छताही हवी.

जेवायला बसायची जागा कशी स्वच्छ सजवलेली असावी. नीटनेटकी बैठक, स्वच्छ भांडी, सुबक मांडणी मनाला कसे प्रसन्न करते. पूर्वी कशा छान सारवलेल्या जमिनी असायच्या. बसायला पाट, ताटाखाली पाट, चकचकीत तांब्या भांडे असायचे. आता टेबल आले तरी ते स्वच्छ सजवलेले असेल तरच छान वाटेल. पूर्वीचा पेशवाई, सावकारी थाट तर अजूनच निराळा. सव्वा हात केळीचे पान, चंदनी पाट, ताटाखाली लाल पाट, उत्कृष्ट उदबत्त्या, आग्रहाचे वाढणे, साखळीचे गंध, श्लोक, चांदीची भांडी, पदार्थांनी भरलेले पान आणि त्याभोवती विविधरंगी सुरेख रांगोळ्या. आता असा सगळा सरंजाम करणं शक्यच नाही पण सणासुदीला, एखाद्या विशेष प्रसंगी निदान आपण ताटाभोवती रांगोळी तरी काढू शकतोच की.

या रांगोळ्या अशा वाढलेल्या ताटाला काही वेगळीच शोभा आणतात. काहीतरी विशेष असल्याची जाणीव करून देतात. लांबलचक पंगत असो वा एका ताटाभोवती मांडलेली महिरप असो दिसते सुरेखच. मला आठवतंय लहानपणी आणि अजूनसुद्धा सण वा वाढदिवस असला की आई आवर्जून ताटाभोवती रांगोळी काढायची. आईची बोट कशी झरझर फिरायची, नाजुक फुलांची नाहीतर मोराची, वेलबुट्टीची नक्षी ताटाभोवती काढायची. कधी फुलांची तर कधी मोत्यांची. प्रत्येकाला असे ताट मिळायचे. पुढे घरात टेबल आले तरी महिरप सणासुदीला असतेच. खाली जमिनीवर पंगत वाढली तर एकच वेलबुट्टीची लांबलचक महिरप रेखाटली जाते. नाहीतर ताटाभोवती विविध रंगाचा वापर करून सुरेख रांगोळ्या वापरून सजावट करता येते. आता बाजारात तसे छापही मिळतात आणि अनेक रंगही.

r

याशिवाय अजून एक साधा प्रकार म्हणजे घरात केलेली पुठ्ठ्याची महिरपही छान दिसते. करायलाही सोपी.

j

घरातलाच एखादा पुठठा घेऊन हवा तसा आकार कापून घ्यावा. कापलेल्या आकारावर हवा तो रंगीत कागद लावावा. छानशी लेस चिकटवून घ्यावी. त्यावर टिकल्या, फुलं, मोती यांची हवी तशी नक्षी काढून घ्यावी. असे विविध आकार करून त्याची आकर्षक मांडणी करता येते. अगदी सहजपणे मांडताही येते.

असाच एक सुरेख प्रकार मोत्याच्या मांडणीचा. पूर्वी माझी आजी छान मोत्याच्या वस्तू बनवायची. मोत्याची कमळं, प्राण्यांचे आकार, खेळणी एकाहून एक सुरेख. घट्ट वीण असलेल्या या वस्तू टिकायच्या भरपूर. त्या कधी शिकणं जमलं नाही पण मोत्याची ती करत असलेली महिरप मात्र मी शिकून घेतली. विविध रंगाचे मणी मोती एकात एक गुंफून नवेव नवे डिझाइन बनवायचा मग छंदच लागला. कोणाकोणाच्या रुखवतावर हौसेने ठेवल्या. महालक्ष्मी बसवल्या की त्यांच्या नैवेद्याच्या ताटाभोवती ठेवायला केल्या.

mm

आता गृहिणी जास्त व्यस्त होऊ लागलीये पण हौस असतेच ना! शिवाय सोयीसाठी टेबल वापरले जाते. बर्‍याच घरी आताशा काचेचे टेबल असते. मग त्यावर रांगोळी काढणे अवघड. मोत्याच्या, पुठ्ठ्याच्या कधी करणार? अश्या वेळेस झटपट मांडता येणारी कुंदन रांगोळी मांडावी. यातही विविध आकार, रंग, कुंदन मिळतात. हवी तशी करा आणि देखणी सजावट मांडा.

माझा अजून एक आवडता प्रकार म्हणजे फुलांची महिरप. छान विविधरंगी फुल घ्यावीत काही सुगंधी तर काही नाजुक. नुसत्या पाकळ्या घेऊन त्यात फुलं मांडून मोहक रचना करता येते. ताज्या फुलांनी त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होते. कधी गुलाब पाकळ्या, कधी निशिगंध, कधी झेंडूच्या पाकळ्या. मंद सुगंध छान वाटतो. हवे तसे नक्षीकाम करून फुल मांडता येतात. लग्नकार्यात वधूवरांच्या ताटाभोवती फुलांची रांगोळी असतेच.

ff

या काही महिरपींशिवाय लहान मुलांसाठी केलेल्या चॉकलेटच्या, क्विलिंगच्या, लोकरी फुलांच्या अनेकविध सुंदर महिरपी बनवता येतात. भारतीय खाद्यसंस्कृतीत असणारी ही अशी पारंपरिक महिरप सजावट, कोणत्याही सजावटीपेक्षा जवळची वाटणारी.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 9:19 am | कविता१९७८

वाह सुरेखच

मृत्युन्जय's picture

16 Oct 2015 - 9:43 am | मृत्युन्जय

झक्कास

किसन शिंदे's picture

16 Oct 2015 - 9:56 am | किसन शिंदे

व्वा! अशी सजावट केल्यावर लोक जेवायचे विसरून जातील. आवडली सजावट.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 10:49 am | प्रीत-मोहर

सुप्पर्ब.

pradnya deshpande's picture

16 Oct 2015 - 11:45 am | pradnya deshpande

अशी महिरप केल्यावर दोन घास नक्की जास्त जाणार.

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 11:55 am | पिलीयन रायडर

सुंदर!

कलाकाराचे हात आहेत तुझे! सुंदर महिरपी.ताटाभोवती महिरप काढली की कसं स्पेशल वाटायला लागतं.केळवणाला तर ताटाभोवती सजावट हवीच हवी असते.तुझ्या आयडिआ कामी येतील आता!

मीता's picture

16 Oct 2015 - 12:15 pm | मीता

मस्त

उमा @ मिपा's picture

16 Oct 2015 - 12:19 pm | उमा @ मिपा

सुंदर कलाकृती! माहिती पण खूप छान लिहिलीयस. तुझ्यातली सुगरण, कलाकार, लेखक अधिकाधिक बहरत राहो ही सदिच्छा.

मितान's picture

16 Oct 2015 - 3:42 pm | मितान

+१११
अगदी असंच म्हणते मी

असेच म्हणते !!किती ती कला आणि किती तो उत्साह !!

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 2:25 pm | वेल्लाभट

अतिशय छान!

पियुशा's picture

16 Oct 2015 - 3:02 pm | पियुशा

वा, ईशा तै खरच कलाकार आहेस तु, सगळ्या डिझाइन्स मस्त दिसताहेत :)

काय सुंदर महिरपी आहेत....मान गए.....

हाहा's picture

16 Oct 2015 - 5:39 pm | हाहा

सगळ्या महिरपी सुंदर आहेत.

प्रश्नलंका's picture

16 Oct 2015 - 8:29 pm | प्रश्नलंका

तू सुगरण , हाताला चव आहे हे माहित होते पण एवढी छान कलाही आहे तुझ्या हातात आज हे नव्याने कळाले . खूपच सुंदर लेख. सगळेच डिझाईनंस खूप छान आहेत . तुझ्याकडे जेवणाचा बेत करायला हवा ;)

स्रुजा's picture

16 Oct 2015 - 8:46 pm | स्रुजा

आहाहा .. काय सुरेख महिरपी आहेत! गृहिणीने इतक्या प्रेमाने दोन घास जास्त पोटात जावेत म्हणुन मेहनत केली म्हणजे ती सुरेख च उमटणार. खरंच कला आहे तुझ्या हातात आणि करताना ची आत्मीयता लेखनात, डीझाईन्स मध्ये कळते आहे.

नूतन सावंत's picture

16 Oct 2015 - 9:59 pm | नूतन सावंत

ये हाथ मुझे दे दे इशा.

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 3:52 am | सानिकास्वप्निल

इशा बाई दंडवत घे __/\__
काय सुरेख दिसतायेत गं महिरपी, असे भरलेले पान, त्याभोवती देखणी महिरप, अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे गं तुला.
सुंदर आहेत सगळ्याच कलाकृती :)
लेख ही खूप आवडला.

पैसा's picture

17 Oct 2015 - 8:37 pm | पैसा

एक से बढ़कर एक!! पूर्वी असले खूप उपद्व्याप केलेत. हे बघून आळस झटकला पाहिजे असं वाटतंय!

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:51 am | मधुरा देशपांडे

किती सुरेख आहे हे सगळं. आता यातुन प्रेरणा घेऊन मी निदान आईने केलेल्या रांगोळ्या काढते बाहेर काहीतरी निमित्त्याने.
तुझी कलाकारी अशी अनेक लेखांमधुन अजुन येऊ देत आणी आम्हाला नवीन सुंदर कलाकृती बघुन डोळ्यांना आनंद मिळु देत.

अशा महिरपी असल्या तर स्वैपाक कसाही असला तरी चालून जावा.

के.पी.'s picture

18 Oct 2015 - 7:08 pm | के.पी.

किती सुंदर!
ती मणी-मोत्यावाली फार आवडली.

आईग्ग्ग! मस्त मस्त महिरपी आहेत. केळवणाचं किंवा स्पेशल जेवणाभोवती आपल्या ताटाला महिरप असली की भारी वाटतं. तू कलाकार असल्यानं पुठ्ठ्याच्या केलेल्या महिरपी आवडल्याच व रांगोळीच्याही आवडल्या. सगळे फोटू मस्त आलेत.

आणखी एक म्हणजे तुला फक्त आयडिया येण्यासाठी सांगतिये. जर क्रोशेकाम येत असेल तर तशीही महिरप चांगली दिसते. माझा कलेमधील एकूण आनंद बघून आतेसासूबाईंनी माझ्याकडे आल्यावर क्रोशाची लेस ताटाभोवती लावण्यासाठी करून ठेवली आहे. दरवेळी तीच लेस सवाष्णीला बघायला मिळू नये म्हणून मी सारख्या सवाष्णी बदलते. ;)

सवाष्णी बदलायची आयडिया बेस्ट रेवाक्का.
आन ते क्रोशा काहि अजुन माझ्यावर प्रसन्न झाल नाहिये बघ.अनेक वर्षांपुर्वी नाद सोडला होता.एकदा परत ट्राय करून बघते.

रातराणी's picture

20 Oct 2015 - 4:34 am | रातराणी

सुरेख!

भुमी's picture

21 Oct 2015 - 12:51 pm | भुमी

अश्या सुंदर सजावटीमुळे प्रसन्न वातावरण निर्माण चार घास जास्तच जाणार हे नक्की!!!
लेख आणि फोटोज अप्रतिम !!

भुमी's picture

21 Oct 2015 - 12:52 pm | भुमी

अश्या सुंदर सजावटीमुळे प्रसन्न वातावरण निर्माण होऊन चार घास जास्तच जाणार हे नक्की!!!
लेख आणि फोटोज अप्रतिम !!

भुमी's picture

21 Oct 2015 - 12:52 pm | भुमी

अश्या सुंदर सजावटीमुळे प्रसन्न वातावरण निर्माण होऊन चार घास जास्तच जाणार हे नक्की!!!
लेख आणि फोटोज अप्रतिम !!

फारच छान! आवडल्या महिरपी!

मृत्युन्जय's picture

21 Oct 2015 - 3:48 pm | मृत्युन्जय

सजावट सुंदरच आहे. महिरपी मस्त जमल्यात

मला फोटो नाही दिसते. :(

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 8:57 pm | स्वाती दिनेश

महिरपी सुंदर आहेत..
स्वाती

मितान's picture

24 Oct 2015 - 10:28 am | मितान

सुरेख! !!
माझ्या लेकीला शिकायचंय म्हणे सगळं ! कधी येऊ ?

मितान's picture

24 Oct 2015 - 10:28 am | मितान

सुरेख! !!
माझ्या लेकीला शिकायचंय म्हणे सगळं ! कधी येऊ ?

विशाखा राऊत's picture

25 Oct 2015 - 3:32 am | विशाखा राऊत

तुस्सी क्या ग्रेट हो तुम नही जानते. एक नंबर महीरपी आहेत.

अनन्न्या's picture

26 Oct 2015 - 4:37 pm | अनन्न्या

मण्यांच्या फार पूर्वी केल्यात... पण तुझ्या महिरपी फारच रेखीव आहेत आणि त्याबरोबरचे वर्णन तर काय एक नंबर! मस्त!!!

पद्मावति's picture

26 Oct 2015 - 7:06 pm | पद्मावति

वाह, किती सुंदर सजावट. मस्तं.