अमेरिकेहून वहिनी आली होती म्हणून तिला भेटायला अन कुटुंबात नव्याने चैतन्य आणणार्या भाचीला पाहायला म्हणून आत्याकडे गेले होते. गावं अर्थात कोल्हापूर! आत्या सुशिक्षित! त्यांच्या दोन मुली डॉक्टर, मुलगा इंजीनिअर!! इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन त्यातली एक आतेबहीण सांगू लागली, (हिला स्वतःला त्या वेळी दोन मुले, मी ही माझा लहान मुलगा घेऊन सिंगापूरहून आलेली) "अगं पाहिलंस का? वृषाली तिच्या मुलीला दिवसातून दोनदा ही अशी फळ खायला घालते" चेहर्यावर अतोनात कौतुक ओसंडून जात असलेलं, अन हातात त्याहूनही कौतुकाने एखादा अनमोल खजिना पकडावा तसा पकडलेला एक काचेचा कंटेनर (छोटीशी चौरसाकृती बाटली) "तुझ्याकडे सुद्धा हे मिळत असेल ना? आपल्याकडे असं काहीच मिळत नाहीत बेबी प्रॉडक्ट्स!! मला वृषाली म्हणाली, ताई तुम्ही पण शेअर करा हे बेबी प्रॉडक्ट्स माझ्या बरोबर. बघ ना!"
आता काय कुणास ठाऊक, त्याच मातीची असून मला जरा रंगीबेरंगी चकचकीत अस काही दिसलं की पळून जायची इच्छा होते तेथून. साधं देखणं जाईचं फुलं शुभ्र पांढरा रंग लेऊन येतं! त्याला कधी हजार पाकळ्या अन सतराशेसाठ रंग फुटत नाहीत, पण परिमल असा की मन क्षणात शांत होतं. तीच गोष्ट मोगरा, सोनचाफा, प्राजक्ताची. साधी सोपी रुप लेऊन अंगी सुवासाची श्रीमंती लेणार्या या फुलांना कधी झगमगता साज ल्यावा लागत नाही!
तर असो! ती इतक्या कौतुकाने काही दाखवतेय म्हंटल्यावर मलासुद्धा थोडाफार औत्सुक्य दाखवावेच लागलं. हातात घेऊन पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं, "बनाना" अर्थात कंंसात ऑरगॅनिक लिहायचा कंटाळा नव्हता. साधारण पाव ते अर्ध केळं मावेल असा तो कंटेनर होता. मला तर बाबा ती बाटली माझ्या मसाल्याच्या साहित्यासाठी एकदम परफेक्ट वाटली. ;)
"बघ ना! हे असं ठरवून ते सकाळी ब्रेक्कीला एक (अहो आहात कुठे? नाश्ता न्याहरी म्हंटलं की कसं एकदम गावठी कोल्हापुरी वाटतं!! हे कसं? एकदम सोफेस्टिकेटेड.) माझी ही बहीण जरा गोष्टीवेल्हाळ अन मुलांवर [तिच्या] प्रेम करणारी आहे, त्यामुळे तिच्याशी सहज गप्पा होऊ शकतात.
खर सांगू का? मला त्या "बनाना"त आणि त्या गप्पांत अजिबात इंटरेस्ट नव्हता. समोरच खिडकीला सकाळीच मामंजींनी आणलेली रसबाळी केळी लटकत होती. दोरीला मध्येच गाठ मारुन त्यात तो घड अडकवलेला होता. पिवळीजर्द अशी त्यांची साल, छोटा छोटा दोन बोटांच्या जाडीचा आकार! अन त्यात भरुन वाहणारा तो स्वाद मला अन माझ्या लेकाला खुणावत होता. "तेलं...." आमचे चिरंजीव उद्गारले. बहिणीने पाहिलं "ओह गॉड! अगं तो तर मराठीत केळं म्हणतो आहे?" मी हसले. तोवर मुलाने खाली उडी मारुन खुर्ची तिथवर न्यायचा प्रयत्न सुरु केलेला.
"तो केळं खातो?" बहिणीने विचारलं. आता मात्र मला तिची कीव येऊ लागली! जरा शहाणे करुन सोडावे की काय असा विचार मनात रुंजी घालू लागला. मी बहिणीला विचारलं, "केळ आत्ता सोललं समज, तर किती वेळ चांगलं टिकतं ग? अरे? काळं नाही का पडणार ते? ऑक्सीडायझेशन......" मी हातातली ती चौरस सुरेख आकाराची बाटली तिच्या डोळ्यासमोर नाचवली.."अग त्यात हे असं ऑक्सीडायझेशन होऊ नये म्हणुन......." आता ती गप्प बसली. नाही म्हंटल तरी डॉक्टर होत्या या बाईसाहेब! मी नुसतीच सुस्कारले.
अचानक काहीतरी आठवून तिने विचारलं "काय गं? तू काही तरी स्वतःच बनवायचीस ना बेबी फूड? कोणी दिलं होतं तुला ते?"
आता काय सांगू मंडळी? जेंव्हा प्रत्येक घरात बाळ जन्मल म्ह्टलं की "डाबर का लाल तेल" जॉन्सन बेबी प्रॉडक्टस, अन सेरेलॅक्स, फॅरेक्स असे डबे एकावर एक रचले जायचे, तेंव्हा मी आपली बाजारातून आणलेली धान्ये निवडून, धुवून, वाळवून त्यांना भाजत बसायचे, अन मग मिक्सरवर त्याची छानशी फाईन पावडर करुन ते बाळाला शिजवून द्यायचे.
का करायचे मी हे?
आधीच बाळ होताना डॉक्टरांनी औषधांचा इतका मारा केला होता की काय सांगू? ( जर जुन्या काळात माझ्यासारखी केस असती तर बाळ होणं जरा अवघडच होतं म्हणा! ) त्यामुळे बाळ झालं की आपण त्याला जास्तीतजास्त नैसर्गिकरीत्या वाढवायचं यावर माझ्या बाळाचा बाप फार ठाम होता. काय ठेवलयं त्या बेबीफूड्स मध्ये? राईस सिरीअल? म्हणजे काय? सिरीअल म्हणजे काय? इथपासून त्याची काही ठाम मते होती. आता साध्या सोप्या इंग्लिश मध्ये सिरीअल म्हणजे cereal म्हणजे धान्य असं आम्ही पार पाचवीपासून घोकलेले! पण अशी एकही भारतीय कंपनी नव्हती की, बाबा मी तुमच्या बाळाला तांदूळ खाऊ घालतो, अस म्हणेल. ते म्हणणार सीरीअल! अन मग आमच्या येथे सीरीअल म्हणजे बाळासाठी काहीतरी वेगळा, चांगला(च्च) आहार! दुधाच्या बाटल्या, त्यासाठी मिल्कपावडरचे डबे, अन माझ्या बाळाला हा फ्लेवर आवडतो अन तो नाही या असल्या चर्चासत्रात मी आपली गपगुमान मान खाली घालून बसलेली असायचे. माझं ही नवसाचं बाळ होतं! त्यालाही नेहमी काही बेस्टेस्ट बेस्ट द्यावंसं मला वाटायचं, अन त्या वेळी हा आमचा बाळाचा बाप खंबीरपणे अन प्रसंगी कठोरपणे मला बाळाला जे नैसर्गिक तेच योग्य हे ठामपणाने सांगायचा.
आधीच कोणतच धान्य कितीही म्हंटलं तरी नैसर्गिक नाही. त्यात आणि बेबी फूड म्हणुन हे सगळे बुस्टर्स, वायटॅमिन्स, आयर्न्, कॅल्शियम हे सगळ मिसळलेलं. आता घालताना तुला जरी तू काहीतरी चांगल देते आहेस वाटत असल तरी ते पुढे जाऊन काय परिणाम दाखवेल ते आपल्याला माहित नाही. तू काय बनवते आहेस ते तुला माहित आहे, एका मोठ्या फॅक्टरीत नक्की काय मिसळतात अन काय विकतात ते कोणाला ठाऊक? असं वेळोवेळी सांगून तो माझा अधेमध्ये डोकं वर काढणारा मदरइंस्टींक्ट खोडून काढत असे. अर्थात माझ्या बाळात अन बाकीच्या, फूड खाऊ बाळात लक्षणीय फरक मी कायम नोटीस केला. ती बाळे अंगाने अशी गुदुमुदु भरलेली! तर माझं बाळ त्यामानाने जरा बारीक अंगाचं. ती मुले अशी आवरता न आवरणारी, खूप धसमुसळी तर माझं बाळ थोड शांत पण व्यवस्थित. त्या मुलांना वरचेवर हातात काही ना काही खायला हवे असायचे, कायम भुकेली, तर माझं बाळ त्याच्या ठराविक वेळी व्यवस्थित दिलेले संपवून त्यावर समाधानी. नक्की काय चांगलं काय वाईट याची तेंव्हा इतकी खात्री नव्हती. उगाचच वाटायचं मी माझ्या बाळाला डिप्राइव्ह करते आहे जे मॉडर्न जगाने देऊ केलयं. अश्यातच सिंगापुरमध्ये वेळोवेळी पेपरमध्ये कोणत्याही आई-बापाला हादरवुन टाकणार्या बातम्या वाचल्या. एक होती हवाबंद डब्यात मिळणार्या बेबी मिल्क फॉर्म्युलात मिसळेलेली मेलामाईन पावडर!! अन दुसरी होती की बेबी फॉर्म्युल्याने लहान मुलांना दिसू लागलेल्या ब्रेस्टस??????
अशीच वर्ष उलटली अन चौथी पाचवीतल्या माझ्या कन्येच्या वर्गातल्या आया कुजबुजू लागल्या. "आजकल यही उमर है लडकियोंकी! थोडी जल्दी बडी हो रही है। मुझे तो डॉक्टर बोले ९-१० इयर्स मे ही बहोत सारी लडकियां "बडी" हो रही है।' मी माझ्या लेकीकडे पाहिलं. अजून निरागस बाहूल्यांमध्ये रमणारा तो जीव तसाच निरागस होता. मी ज्या मार्गावर होते तो मार्ग योग्य असल्याची पहिली पावती मी माझी मुलगी ९ वर्षाची असताना मला मिळाली.
आज माझी दोन्ही मुले व्यवस्थित उंच, अंगाने पण ठीक, उगा ढब्बु म्हणता येईल अशीही नाहीत (बाकी सगळे खरच अंगाने मला जरा जास्त भरलेले वाटतात, खरच! आपल्या काळी आपण जाड्या म्हणायचो तीच अंगयष्टी आता राजमान्य आहे) अन एकदम काडी पैलवान तर अजिबात नाहीत. वयाच्या १३व्या वर्षी मुलगी व्यवस्थित ऋतुमती झाली अन माझ्यातल्या आईने निदान एक सुटकेचा निश्वास टाकला.
मुलं म्हणुन मुलांनी करायला हवा तेव्हढा दंगा घरी असतो, पण त्यात अशी अंगातली ताकद दाखवायची खुमखुमी नसते. रगेलपणा आहे सगळ आहे, पण अतिरेक नाही कुठल्या गोष्टीचा अन ही एक माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अजून तरी कोणत्या अॅलर्जीज, अन बाकीचं काही नाही.
त्यातच परवा माझ्या मुलाला पित्ताचा त्रास होउ लागला. मला स्वतःला; मला आठवतेय तेंव्हापासून पित्त आहेच. येथे एक मराठी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नेलं तर त्यांनी पुन्हा सकाळी दुधाबरोबर हे सिरीअल, व्हिटबिक्स, रोल्ड ओटस यांची यादी दिली अन नवरा..नव्हे नव्हे..बाळाचा बाप.. पुन्हा फिस्कारला! "ते तू टॉनिक बनवायचीस ना? ते बनव!" त्याने ऑर्डर सोडली अन अजून मला त्या निवडणे, धुणे, भाजणे यातुन सुटका नाही याची खात्री मला पटली.
तर काय आहे अस जे सहा महिन्यानंतर आईला थोडसं निर्भर करेल, बाळाला व्यवस्थित पोषण मिळेल अन ज्यासाठी आईला बाहेरच्या कोणावरही अवलंबून रहावं नाही लागणार?
मी सहा महिन्यानंतर म्हणते आहे कारण जर जमत असेल तर खरचं पहिले सहा महिने बाळाला बाहेरचं पाणी सुद्धा देऊ नका. दर दोन तासांनी व्यवस्थित अंगावर पाजवलं, अन जर बाळ व्यवस्थित शी सू करत असेल तर खरच बाहेरच काहीही द्यायची गरज नसते. आई अन बाळासाठी नैसर्गिकरीत्या एकमेकाला शब्दाविना जोडण्याच काम तर यामुळे होतंच, पण दोघांच्याही प्रकृतीला ते मानवतं सुद्धा.
सहा महिन्यानंतर मात्र एक दिवस एक दोन चमचे भाताची पेज देउन बाळाला हळू हळु बाहेरच्या दुधाव्यतिरिक्त अन्नाची सवय सुरु करा. एकदा का बाळाला त्या पेजेची चव लागली, नुसत्या पेजेच्या वासाने मिटक्या सुरु झाल्या की हळूच एक दिवस त्यात मुगाच्या डाळीच पाणी मिसळा. हे सगळ बाळाला इंट्रोड्युस करताना कमालीची स्वच्छता बाळगा. सुरवातीचे काही दिवस कदाचित बाळाला हे अन्न मानवणार नाही अश्यावेळी हे थांबवून पुन्हा एक दोन दिवसांनी सुरु करा.
ही पहिली पायरी व्यवस्थित पार पडली की मात्र एक दिवस एक वाटीभर तांदूळ अन अर्धी वाटी मूग डाळ धुवून घरातच साधारण सुकवून गॅसवर भाजून घ्या. मिक्सरवर जमेल तेव्हढं बारीक दळून हे मिश्रण एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्या. दिवसातून साधारण दोन आणि मग तीनवेळा यातला एक चमचाभर मिश्रण एक वाटीभर पाण्यात थोडावेळ भिजवून मग चिमटीर मिठासह व्यवस्थित शिजवून घ्या. साधारण थंड करुन बाळाला भरवायला सुरवात करा. एव्हाना बाळ सात महिन्याचे झाले असेल. आता मात्र मी जे खाणं अगदी बाळ दोन वर्षाचे होईतो अगदी निवांत भरवायचे ते बाळाचं खाण अगदी एक अथवा दिड किलोने बनवून स्वच्छ अन हवाबंद डब्यात साठवा.
साधारण वर्षाच्या बाळाला या खाण्यात कधी उकडलेला लाल भोपळा, कधी वांगं, कधी गवार, गाजर अश्या फळ भाज्या व्यवस्थित शिजवून खायला द्यायला सुरुवात करा. पालेभाज्या मात्र जरा जपून इंट्रोड्युस करा. या सीरीअल मध्ये मी प्रत्येक महिन्याला एक नविन धान्य इंट्रोड्युस करत गेले. त्यामुळे माझ्या मुलांना अजून तरी टचवुड कोणतीही अॅलर्जी नाही. फक्त नवीन धान्य मिसळताना अगदी थोड्या प्रमाणात एकावेळच्या खाण्यात ते घालून एक दोन दिवस बाळाला पचतंयना हे पहा. बाकी आईच्या नजरेतून बाळाची कोणतीही गोष्ट सुटत नाहीच, त्यामुळे काळजी नको.
वर्षाच्या बाळाला मात्र या बरोबरच मी आणखी एक जास्त पौष्टिक खाणं दिवसातून एकदा देत असे, अन त्याला आम्ही टॉनिक म्हणत असू.
तर घ्या या दोन बेबी फूड रेसिपीज अन पुन्हा म्हणुन त्या बाजारातल्या सुरेख दिसणार्या बाटल्यांच्या आहारी जाऊ नका.
तर घ्या पाहू!!
४ वाट्या कोणताही चांगला तांदूळ, २ वाट्या मूग डाळ, १/२ (अर्धी) वाटी गहू, १/२ वाटी नाचणी, १/२ वाटी उडीद डाळ, १/२ वाटी चणा डाळ, १/२ वाटी ज्वारी. ( तांदूळ मूगडाळीने सुरुवात करुन मी हळुहळू या बाकीच्या डाळी मिसळत गेले. हेतू एकच! बाळाला सगळ्या अन्नाची सवय व्हावी. नाचणीसत्व तर आपण जाणतोच, पण ही अशी या खाण्यातून गेलेली नाचणीसुद्धा चांगलीच! उडीद आपल्या आहारात तसे जरा कमीच [कोल्हापुर भागात] म्हणून मी ते सुद्धा मुद्दामच अॅड करत गेले)
ही सगळी धान्ये निवडून, धुवून घरातच साधारण कोरडी होइतो वाळवून मग कढईत मस्तपैकी भाजून घ्या. मिक्सरवर जमेल तितके बारीक करुन हवाबंद डब्यात भरुन ठेवा. बनवायच्या आधी एक अर्धा तास पाण्यात भिजवून मग छानसं शिजवून थोड्याश्या मिठाबरोबर बाळाला भरवा.
टॉनिक
हे खाणं मात्र बाळाच्या आईला सुद्धा लाभदायक ठरावं! मी सुद्धा एका ग्लासभर दुधात चमचाभर ही पावडर मिसळून व्यवस्थित शिजवून खायचे. अजिबात थकवा जाणवत नाही दिवस रात्र बाळाची उसाभर करताना. जेव्हढी मिळेल तेव्हढी झोप सुद्धा गाढ असायची. बहुतेकदा बाळ एकटीने सांभाळताना ही ग्लासभर खीरच माझी न्याहरी असायची.
१/२ किलो नाचणी, १/४ किलो गहू, १/४ किलो उकडा तांदूळ (फार ताकद या उकड्या तांदळाला), १ वाटी नायलॉन साबुदाणा (नुसता स्टार्च, कार्ब) ऑप्शनल, १ वाटी फुटाणे डाळ, १०० ग्राम खसखस, १०० ग्राम बदाम, १०० ग्राम वाळलेली खारीक.
खारका फोडून घ्या. अन साबुदाणा अन फुटाणे डाळ सोडून बाकी सगळ व्यवस्थित धुवून घरातच वाळवून घ्या. कढईत व्यवस्थित भाजून हे मिश्रण मिक्सरवर बारीक करुन स्वच्छ डब्यात भरुन ठेवा.
बनवताना, दुधात अथवा पाण्यात एक चमचाभर मिसळून शिजवून घ्या. हवी असेल तर थोडी साखर मिसळा. दिवसातून एकदा हे खाणं मी बाळाला भरवत असे. अन मी स्वतः सकाळची एक वेळ दुधातून शिजवून खात असे. यातच थोड्या मनुका शिजवताना चुरडून घातल्या तर बाळाचे पोट साफ रहाते. या वेळी मुलाला बनवताना या टॉनिकमध्ये मी जवस सुद्धा भाजून घातले, अन रोज सकाळी गेला पंधरवडा माझा मुलगा अजिबात कुरकुर न करता हे दुधात घालून पितो आहे. पित्त व्हायचं थांबलं त्याचं. आणि काय हवं मला, नाही का?
चला तर!! वर्षानुवर्षे आपल्या आज्या पणज्यांनी ज्या पद्धतीने सुदृढ बाळे वाढवली त्याच प्रकारे आपणसुद्धा आपली बाळे नव्या जमान्याच्या नव्या सुधारणांत त्यांची पद्धत मिसळून करुन पाहूया. पूर्वीच्या माणसांच्या ताकदीच्या कथा तर आपण ऐकतोच! कदाचित या असल्या साध्या आहारातच त्याचे गुपित दडले असावे?
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:16 am | पैसा
छान माहिती!
16 Oct 2015 - 11:30 am | अजया
छान माहिती दिलीये.अगदी उपयुक्त.
16 Oct 2015 - 11:57 am | मीता
छान माहिती!
16 Oct 2015 - 1:29 pm | प्रीत-मोहर
मस्त माहिती स्पँडीताई
16 Oct 2015 - 2:39 pm | कविता१९७८
मस्त माहीती
16 Oct 2015 - 2:48 pm | वेल्लाभट
बँग ऑन टार्गेट.
तुमच्या नव-याचं, तुमचं कौतुक आहे की तुम्ही हे ठामपणे केलंयत. नाहीतर आपल्याकडे जग करतं म्हणून आपण करायचं ही घाणेरडी मनोवृत्ती इतकी खोलवर रुजलीय की वी आर ऑलमोस्ट कंपेल्ड टू फॉलो द ट्रेंड्स.
हे असं करून आपण एक दिवस आपला युनीकनेस पूर्णपणे घालवून बसणार आहोत (ऑलरेडी घालवलाय बराचसा).
सो जास्तीत जास्त लोकांना हे सांगा. पटवायचा प्रयत्न करा. आपलं सोडून दुस-याच्या पद्धती आंधळेपणाने अनुसरायचा मूर्खपणा करू नका म्हणावं.
वन्स अगेन, सुंदर लेख. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळलात, अमलात आणलात त्याबद्दल कौतुक.
16 Oct 2015 - 9:51 pm | स्रुजा
+१ अगदी असेच म्हणते . लेख तर नेहमीसारखाच तुझ्या शैलीने सजलाय आणि तुझ्या आणि तुझ्या अहोंच्या कौतुकास्पद ठामपणामुळे खुललाय.
16 Oct 2015 - 6:35 pm | उमा @ मिपा
ज्जे बात ताई! या सगळ्या गोष्टींवर खरंच गांभीर्याने विचार केला पाहिजे सगळ्यांनी. आपलं ते जुनाट आणि फॉरेनचं चांगलं असा विचार करणारी खूप लोकं आहेत. तू नेहमीच छान, मनापासून लिहितेस, तसंच हेही आहे.
16 Oct 2015 - 8:31 pm | प्रश्नलंका
+१ असचं म्हणते. खुप मस्तं माहिती. धन्यवाद अप्पूताई.
16 Oct 2015 - 6:53 pm | टक्कू
स्पंदना धन्यवाद! मी सध्या याच stage ला आहे आणि मी सुद्धा अगदी हेच follow करायचं ठरवला होता. तुमच्या लेखाने संपूर्ण माहिती मिळाली. दोन्ही बेबी फूड रेसिपी करणार.
हा विषय आवर्जून निवडल्याबद्दल आभार!
- टक्कू
http://takkuuu.blogspot.in/
17 Oct 2015 - 1:49 am | रेवती
वा! छान प्रकार सांगितलेस बेबीफूडचे! हे सगळे आपले आपण केले, निभावले की कधीच विसरत नाही. थोड्याफार फरकाने असेच करत असे.
17 Oct 2015 - 9:19 am | पद्मावति
अप्रतिम लेख. वाक्या- वाक्याशी सहमत आणि रेलेट होत आहे. बेबी फुड चा अतिरेक, फॉर्मुला त्यांचे परिणाम प्रचंड सहमत. तू म्हणालिस त्याच पद्धतीने माझ्या मुलांचं लहानपणी संगोपन केलंय. त्यामुळे तुझ्या प्रत्येक वाक्याला सेम पिंच, सेम पिंच वाटत होतं. फार सुंदर विषय, उत्तम विचार आणि अप्रतिम लेखनशैली.
17 Oct 2015 - 7:39 pm | नूतन सावंत
अपा,आमची आईही याच प्रकारे भरडी बनवत असे आणि आम्हीच काय पण आता माझी भाचरुंडं याच घरगुती आहारावर मोठी झालीयेत नि त्यांची रोगप्रतिकारकशक्तीहि आजकालच्या भाषेत अॉसम आहे.अनाहितांनी जरूर हा लेखाचा फायदा घ्या.
17 Oct 2015 - 7:56 pm | सस्नेह
उचित आणि उपयुक्त माहिती !
17 Oct 2015 - 9:39 pm | सानिकास्वप्निल
उपयुक्त लेख अॅपीताई, मीसुद्धा याचे प्रिंट काढून ठेवणार आहे.
छान लिहिले आहेस, याचा नक्कीच फायदा होईल.
18 Oct 2015 - 2:28 pm | प्यारे१
हे जपायलाच हवंय. टिकवायला हवं नि वाढवायला देखील.
पित्त म्हणजे कायम चा सोबती झालाय इतक्यात.
आपातै चे आभार.
18 Oct 2015 - 4:41 pm | मांत्रिक
माझ्या आईने आम्हांला तसेच आमच्याही मुलांना याच पद्धतीने बेबी फूड घरच्या घरी तयार केलं. माझ्या सौ.लाही अशीच भीति वाटायची की दुसर्यांची मुलं टुमटुमित दिसतात, आमची मुलगी मात्र पहिल्यापासून जरा बारकीच दिसायची. पण नंतर तिलाही पटत गेलं. आज मुलगी ४ वर्षांची आहे. अतिशय अॅक्टिव्ह, उत्साही आणि हुशार. विकतचं बेबी फूडच चांगलं हा गैरसमज आहे.
21 Oct 2015 - 4:47 pm | एस
प्रचंड उपयुक्त लेख. भारतात स्तनपानापेक्षा या आयत्या डब्ब्यांवर आया आणि डॉक्टरही का विश्वास ठेवतात हे समजत नाही! फारच छान माहिती दिली आहेत अपाताई!
या लेखालातरी वाखु साठवण्याची सोय उपलब्ध करून द्या, तांत्रिकसमिती!
21 Oct 2015 - 5:35 pm | Mrunalini
माहितीपुर्ण लेख. :)
22 Oct 2015 - 4:09 pm | अनन्न्या
छान माहिती दिलीस, अनेकीना उपयोग होईल याचा.
23 Oct 2015 - 11:37 am | पलाश
अतिशय महत्वाचा मुद्दा मांडणारा लेख!! बाळाच्या आईसाठी तर हे अनुभवसिद्ध वरदानच आहे. सगळ्या बारकाव्यांनिशी मांडलेला लेखनप्रपंच आवडला. सोबतच्या बालाहाराच्या कृती फार उपयुक्त आहेत.
24 Oct 2015 - 9:33 am | तुषार काळभोर
माझे मागच्या वर्षभरातले अनुभव दुसर्याच्या (कीबोर्डमधून) वाचतोय असं वाटलं.
बाळाची चाहूल लागल्यापासूनच त्याच्या आईला घरगुतीच पौष्टिक पदार्थ सुरू केले. विकतचे रेडीमेड पदार्थ शक्य तितके टाळायचाच प्रयत्न केला.
बाळाला जन्मानंतर ४ महिने फक्त आणि फक्त आईचे दूधच दिले होते. विकतची दूध पावडर नाही आणि कसलेही टॉनिक/सप्लिमेंट्स नाहीत.
पेज चार महिन्यानंतर चालू केली. 'विकतचं सेरेलॅक/फॅरेक्स मी त्याला खाऊ देणार नाही' हा माझा ठाम निग्रह होता. (बर्याचदा तो फोर्स करावा लागला). चार ते सहा महिने पेज व वरणाचं पाणी दिल्यावर एकदा सेरेलॅक आणलं. घरच्यांच्या समाधानासाठी. त्यातले जिन्नस वाचले. तांदूळ....... (आणि थोडे वाढीव लोह, अ जीवनसत्व ए).
मी फक्त आई व बायकोकडे पाहिलं.
ती सुरुवात होती होममेड बेबीफूडची.
माझं पहिलं घरगुती सेरेलॅकः तांदूळ + मूगडाळ ( सातवा महिना) (थोडं भाजून घ्यायचं, मग त्याचा रवा बनवून ठेवायचा आणि लागेल तसा पाणि घालून शिजवायचा)
तांदूळ + मूगडाळ + पोहे + रवा (८-१० महिने) (अधिक शिजवताना गाजराचा एखादा तुकडा, फ्लॉवरचा एखादा तुरा, मटारचे ४-५ दाणे टाकायचे आणि चारताना ते कुस्करायचे)
पुढे मग टोमॅटो, इतर भाज्या हळूहळू वाढवणं सुरू केलं.
(मार्गदर्शनासाठी आईचे अनुभवाचे बोल,व्हाट टू एक्स्पेक्ट-पहिलं वर्षं, आणि मी सांगितलेलं समजावून घेऊन ते करणारी व बाळाला भरवणारी अर्धांगिनी )
टीपः हे लहान मुलांचं आदर्श जेवण असेलच, असं नाही. तसेच प्रत्येक मूल हे युनिक असतं. एखादा पदार्थ पचत नाहीये असं वाटलं तर तो देणं थांबवायचं, दुसरा द्यायचा व पहिला पदार्थ काही आठवड्यांनी परत द्यायचा. त्यामुळे एकावेळी एक-एक नवीन पदार्थ इंट्रोड्युस करायचा.
रिजल्टः लेखात सांगितल्यासारखेच! आता जो लहान मुलांचा सरासरी बांधा आहे, त्यापेक्षा माझा मुलगा 'बारीक' वाटतो. पण त्याची बौद्धिक व मानसिक प्रगती समाधानकारक आहे.
24 Oct 2015 - 10:17 am | मितान
उपयुक्त माहिती स्पंदना !
25 Oct 2015 - 3:35 am | विशाखा राऊत
खुप छान माहिती. आवडला लेख. मी पण लेकीला कुठलेच बेबीफुड दिले नाही कधी.
25 Oct 2015 - 12:09 pm | आरोही
खरेच मस्त लेख ...मी हि कधीच कुठ्लेच्च रेडीमेड फूड बाळाला दिए नाहीये ..सगळे घरी बनवलेले पदार्थ च खाऊ घातले
26 Oct 2015 - 3:36 pm | स्नेहल महेश
मस्त माहीती
27 Oct 2015 - 4:43 pm | पिलीयन रायडर
मी सुद्धा कधीही कुठलं बेबी फुड दिलं नाही.. सेरेलॅक किंवा दुधात घालुन तत्सम गोष्टी न दिल्याने की काय माझाही मुलगा सगळं नीट खातो. माझं एक निरीक्षण हे ही आहे की ज्या मुलांना अशा बेबी फुडची सवय असते ते रोजच्या पोळीभाजीला फार कुरकुर करतात आणि पिझ्झा / बर्गर मात्र मनापासुन हाणतात!
मी पाळलेले सर्व साधारण नियमः-
१. ४-५ व्या मह्नियापासुन घरात जे शिजेल ते - भात / वरणाचे पाणी / भाज्या / पोळी हाताने कुस्कुरुन दिले. अर्थात एक एक पदार्थ हळुहळु दिला.
२. मिक्सर अजिबात वापरला नाही. हाताने जेवढं रवाळ होईल तितपतच. अगदी गाळ करुन कधीही काहिही दिलं नाही.
३. ज्युस वगैरे आजवर दिले नाहीत. संपुर्ण फळंच.
४. दुधात साखर नाही. साधे पांढरे दुध. कुठलाही फ्लेवर नाही.
५. बेकरी प्रॉडक्ट्स अधुन मधुन.. रोज दुध बिस्किट वगैरे कार्यक्रम नाहीत.
६. आम्ही जे जेवतो तेच अन्न. वेगळे / साधे असे काही प्रकार नाहीत. आम्ही फार गोड किंवा फार तिखट खात नाही. त्यामुळे तसा काही कधी त्रास त्यालाही झाला नाही.
७. त्याच्या कर्डिओलॉजिस्ट्च्या मते, रोजचे जेवण असे हवे
- एक भाजी , एक कोशिंबिर , पोळी , भात (असे २ वेळा - लंच / डिनर - टोटल २ भाज्या ,२ कोशिंबिरी)
- एक फळ
- दुध माफक (एखादा कप , पण नाश्ता किंवा पोटभरीचा पदार्थ म्हणुन नाही)
- २ वेळा घरातला ताजा नाश्ता
क्वांटिटी - बाळाच्या मुठी एवढा पोर्शन भाजीचा,
अप्पुतै.. तू जे हे दिलं आहेस.. ते फार अनमोल आहे. मला डाळतांदुळ भाजुन - भरडुन खाऊ घालतात तेच माहिती होतं. पण आता तुझी रेसेपी नक्की करेन. बाळाच्या आईसाठी पण अत्यंत आवश्यक आहे ही खीर.
हा लेख मेन बोर्डावरही हवा. मी कॉपी करुन ठेवलाच आहे.
5 Mar 2017 - 10:59 pm | वेल्लाभट
याला प्रचंड अनुमोदन. हवाच आहे. लोकांना कळायला हवं काय योग्य आहे आणि काय अयोग्य.
5 Mar 2017 - 3:16 am | भास्कर केन्डे
लेख आवडला.
आम्ही (मी, माझी बायडी आणी आता लेकी) सुद्धा भारतात गेल्यावर बरेच काहि ऐकतो. 'अमेरिकेत येवढी वर्षे राहून सुद्धा तुम्ही अजून अमु़क अमुक असं करता...' हे वाक्य आम्हाला आताशा अंगवळणी पडलयं. बरेचदा लोकांची कीव येते. आपल्याकडे पुर्वापार चालत आलेला खजिना या लोकांना दिसत नाही याचं वाईट वाटतं.
तुमच्या सारखे समदु:खी दिसले की जरा आत्मविश्वास वाढतो. :)