माझे वजन २०१२ पर्यंत ७५ किलो होते ते ६ महिन्यात ५८ किलोवर आणले आणि आमच्या घरात मी न भूतो न भविष्यति असा इतिहास घडवला! काही केल्या मी खाण्याच्या बाबतीत काहीही कंट्रोल करु शकत नाही आणि वजन तर या जन्मी कमी होणं शक्य नाही इतका माझ्या घरच्यांना माझ्यावर दांडगा विश्वास. पण मी त्या विश्वासाला तडा देउ शकेन हा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता. वजन जास्त असताना शिर्डी पदयात्रा केली तेव्हा घरातल्यांच्या एका विश्वासाला तर मी तडा दिलाच होता पण त्यावेळी मला भरपूर त्रास झाला होता हे मी अनुभव कथनात दिलेले आहेच. तर त्याचे झाले असे की बहिणीला हातावर चरबीच्या गाठी आहेत आणि त्या काही केल्या बर्या होत नाहीत तर तिच्यासाठी म्हणून आम्ही एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो. तसे आधी केरला आयुर्वेदिक सेंटर मधे जायचो पण तिथले वैद्य हे प्रॉपर डिग्री घेतलेले वाटत नाही आणि नाडी पाहुन ते शरीरशुद्धीची औषधे देतात एकावेळचे बिल १००० /- पर्यंत नेउन दर १५ दिवसांनी बोलवत असत पण त्यात ही ६ महिने झाले तरी जराही फरक पडला नव्हता. एका ओळखीवरुन हे कळाले की या वैद्यांकडे बी.ए.एम.एस. ची डिग्री आहे आणि ते १५ वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत , लोकांना चांगला गुण येतो. म्हणून मी आणि बहीण त्यांच्या क्लिनीकला गेलो.
बहिणीला तपासल्यानंतर मीही वजन कमी करण्याकरता काही करता येईल का अशी विचारणा केली. त्यांनी सांगितले की १० दिवस बस्ती आणि स्वेदन करुन व्यवस्थित पथ्य केल्यास वजन बरेच कमी होउ शकते. मी विचार केला करुन पाहायला तर काही हरकत नाहीये नाहीतरी लो बी.पी. आणि सतत ताप असा येत असतो तर करुन पहावं डॉक्टरांनी नाडी चेक करुन वात प्रकृती नुसार माझ्या शरीराला सुटेबल अशी काय खावे अन काय खाऊ नये याची यादी लिहून दिली ती पुढील प्रमाणे.
१] सकाळी लवकर उठुन १ तास चालणे. (लवकर उठुन या करीता की ऑफीस जवळ असल्याने मी अगदीच आरामात उठायचे ८ नंतर)
२] नाश्ता - ज्वारीची भाकरी अन भाजी / एक वाटी कांदे पोहे
३] दुपारचे जेवण : - ज्वारीची भाकरी अन भाजी अथवा मासे (कालवण / कढी)
४] संध्याकाळचा नाश्ता - एक वाटी कांदे पोहे /
५] रात्रीचे जेवण - ज्वारीची भाकरी अन भाजी अथवा मासे (कालवण / कढी)
६] दिवस भरात फायबरयुक्त फळे भरपुर खाणे (आंबा आणि केळं सोडुन), दिवसातन एकदा तरी थोडी पपई खावी कारण पपई पोटाला सारक असते.
७] जेवणाच्या वेळी गरम पाणी प्यावे.
काय खाऊ नये
आंबट, वातुळ भाज्या , बटाटा, आंबवलेले पदार्थ , दही ताक
इतकंच काय ते एका कागदावर लिहुन दिले होते मग मीच माझ्या डाएटचे नियोजन केले. काय खाऊ नये हे लिहिताना खूप कमी लिहून दिले होते पण मी वेळोवेळी फोन करुन विचारुन घेतले.
१] भात, गहू (भात आणि गव्हाच्या जागी फक्त ज्वारीची भाकरी खाऊ शकता, त्यामुळे अशक्तपणा येत नाही)
२] सर्व बेकरी पदार्थ (केक , ब्रेड , बिस्किटे, खारी बिस्किटे , टोस्ट , बटर) , मैदयाचे पदार्थ
३] सर्व आंबवलेले पदार्थ ( दही , ताक, इडली , डोसा, उतप्पा )
४] सर्व बेसनाचे पदार्थ
५]मूग वगळता बाकी सर्व कडधान्ये वर्ज्य
६] लोणचे , उडदाचे पापड , पनीर, चीझ , बटर ,
७] चिंच (चिंचेच्या जागी कोकम (आमसुले) , लिंबू , टोमॅटो वापरु शकता)
८] भाज्या - वांगी, गवार, कोबी , फ्लॉवर आणि बाकीच्या वातुळ भाज्या , - बटाटा
९] सोयाबीन, मश्रुम्स
१०] तूप, नारळ, शेंगदाणे
११] तळलेले पदार्थ
१२] चिकन, मटन, अंडी,
१३] नुडल्स , पास्ता, कोल्डड्रिन्क्स ,
१४] गोड पदार्थ पूर्ण बंद , साखरे ऐवजी गुळाचा वापर करु शकता. शक्यतो केमिकल विरहीत गूळ वापरा.
15] दूध पिऊ शकता पण रात्रीच्यावेळी नाही कारण दुधामुळे पोषण होते म्हणुन सकाळी दूध प्यायले तर दिवसभरात तेवढ्या कॅलरीज जाळल्या जातात.
१६] शिळे अन्न खाऊ नये ताजे शिजवुन लगेचच खावे.
आयुर्वेदामधे खाण्याच्या वेळा आणि त्यावेळचा पदार्थ असे काही नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असे असते. शक्यतो ज्याने गॅस होईल असे पदार्थ टाळावेत.
पुढील पदार्थ खाऊ शकता
१] दोन्ही वेळ - ज्चारीची भाकरी
२] भाज्या : - पालेभाज्या , भोपळा, सुरण , दुधी , तोंडली , मुगाची डाळ , मुगाची भाजी , शेवग्याच्या शेंगा , पडवळ, करटोली , दोडका, घोसाळे
३] भरपुर मासे पण फक्त कढी (आमसुले आणि टोमॅटो घालुन, चिंच पुर्णपणे बंद)
सतत ज्वारीची भाकरी खाउन कंटाळा येऊ लागला मग मी ज्वारीचे वेगवेगळे पराठे (कधी दुधी किसुन घालुन, कधी भोपळा किसून घालुन, कधी भोपळा कसुरी मेथी घालुन , कधी कांदा लसूण , जीरे घालुन) कधी किसलेला भोपळा, दुधी , कांदा , टोमॅटो, आले लसूण , जीरे घालुन इंस्टंट डोसा, आख्खे मूग दळुन धिरडी खाल्ली.
साधारण १० डिसेंबर 2012 पासुन सुरुवात केली होती. फेब्रुवारी 2013 एन्ड पर्यंत ६६ किलो झालं , एप्रिल ५ ला ऑफिस मधे मेडीकल चेकअप झालं तेव्हा वजन ६२ किलो होतं , जुन 2013 पर्यंत ५८ किलो झालं.
जास्तीत जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते. शेवटी आपला तोंडावरचा कंट्रोल महत्त्वाचा आणि आपली शारीरिक मेहनत (व्यायाम) महत्त्वाची. रोज सूर्यनमस्कार करायला सांगितले होते आणि जेवल्यानंतर लगेचच वज्रासन करायला सांगितले पण ते काही माझ्याच्याने झाले नाही. रोज सकाळी १ तास चालणे - यात कशामुळेही खंड पडता कामा नये.
इतकं केलं तरी खुप फरक पडतो पण आपल्या तोंडावरचा कंट्रोल महत्त्वाचा. एकदा खाल्लं तर चालतं हा अॅटीटयुड ठेवायचा नाही, मित्रमंडळी , नातेवाईकांच्या सांगण्यावरुन खाल्लं तर नुकसान आपलंच. ब-याचदा मित्रमंडळी, नातेवाईक जेलसीमुळे सुद्धा खायला लावुन आपला नियम तोडायला लावतात कारण त्यांना स्वत:ला असं करणं जमत नाही. मला मित्रमंडळीचा खूप वाईट अनुभव आला या बाबतीत. माझे सख्खे मित्र म्हणवणा-यांनी माझे मनोबल खचवण्याचा खुप प्रयत्न केला. पण आपली इच्छाशक्ती महत्त्वाची. आणि मुख्य म्हणजे वजन कमी झालं आता काहीही खाऊ शकतो असे करु नका. वजन खूप मुश्किलीने कमी होतं एकदा कमी झालं कि ते मेन्टेन करा. ओढुन ताणून काहीही करु नका, हसतमुखाने करा, मला वजन कमी करायचंच आहे आणि ते ही माझ्यासाठी असे ठरवून करा. मी हे खाऊ शकत नाही ते खाऊ शकत नाही म्हणुन मी बिचारा /मी बिचारी असा विचार करु नका. नो दया , नो सहानुभूती!!
माझ्या भावानेही माझा उत्साह पाहुन माझ्या बरोबर डाएट सुरु केले होते, त्याने एकुण १८ किलो तर मी २० किलो कमी केले. रुची अंकामुळे हे डायेट सर्वांना सांगायची आयतीच सुवर्ण संधी मिळाली.
शेवटी शेवटी तर डायेटचा परिणाम इतका दिसू लागला की बसले की पोटात खड्डा दिसायला लागला इतकी बारीक झाले! तेव्हा डॉक्टरांनीच सांगितले इतकं बारीक व्हायचं नाही तब्येत वाढवा. मग पुन्हा थोडी तब्येत वाढवली. माझे वजन कमी झाल्यावर बर्याच जणांनी माझ्याकडे ज्वारीच्या रेसिपीजची मागणी केली होती, मी स्वतः आणि भावासाठी बर्याच रेसिपीज बनवल्या होत्या त्या पुढीलप्रमाणे.
रेसिपीज : -
ज्चारी इंस्टंट डोसा -
ज्वारीचं पीठ , आले - लसुणाची पेस्ट , कांदा - टोमॅटो पेस्ट, मिरची बारीक चिरुन, कोथिंबीर बारीक चिरुन , जीरे , मीठ सगळे एकत्र करुन नॉनस्टीक तव्यावर लगेचच डोसा थापा. तवा नॉनस्टीकच हवा नाहीतर डोश्याऐवजी गोळा होतो. डोसा शिजायला वेळ लागतो लगेचच परतु नका.
ज्चारी पराठा - ज्वारीचं पीठ , आले - लसुणाची पेस्ट , कांदा - टोमॅटो पेस्ट (हवी असल्यास), मिरची बारीक चिरुन, कसुरी मेथी , भोपळा किसुन, जीरे, मीठ सगळे एकत्र करुन व्यवस्थित मळुन घेउन पराठ्या प्रमाणे लाटावे. तव्यावर भाजावे.
कधी कधी भोपळा न टाकता बनवता येतो. कधी भोपळयाच्या जागी दुधी किसुन घालावा, कधी मेथीची अथवा अन्य पालेभाजी चिरुन घालावी. कधी मुळा किसुन घालावा. आपल्याला हव्या त्या पालेभाजा घालुन पराठे, झुणका बनवता येतो.
ज्वारीचे पीठ थंड पाण्यात मळण्यापेक्षा गरम पाण्यात मळले तर चपाती नीट लाटता येते.
ज्वारीचे पिठले : -
१ कप ज्वारीचे पीठ २ कप गरम पाण्यात कालवुन (गुठळ्या काढुन)
आले - लसुणाची पेस्ट , कांदा - बारीक चिरुन , टोमॅटो बारीक चिरुन , मिरची बारीक चिरुन, कोथिंबीर बारीक चिरुन, जीरे, मीठ, तीळ, राई, तेल.
पॅन मधे तेल तापवुन त्यात जीरे, तीळ, राई तडतडवणे, नंतर आले - लसुणाची पेस्ट, मिरची, हळद घालणे. नंतर कांदा - टोमॅटो, मीठ घालुन परतवणे, थोडे शिजल्यावर ज्वारीचे गरम पाण्यात कालवलेले पीठ मिक्स करणे, झाकण ठेवुन थोडा वेळ शिजवणे. कोथिंबीर घालुन गरमागरम खाणे.
मुगाची धिरडी (पेसरट्टु) - आख्खे मुग दळुन, पीठात आले - लसुणाची पेस्ट, हळद, मीठ घालुन लगेचच धिरडी थापावीत. हा अगदी भरपेट नाश्ता होतो. थोडं इडली सारखं मिश्रण बनवुन इडली पात्रात उकडुन इडल्या बनवु शकता. जोडीला टोमॅटोची चटणी घेऊ शकता.
मेथी आणि ज्वारीच्या कोफ्त्यांची भाजी - मेथी बारीक चिरुन घ्यावी, त्यात ज्वारीचे पीठ घालावे. बारीक चिरलेला कांदा घाला, किसलेला मुळा घाला, जीरे, तीळ, ओवा आणि मीठ घालुन गरजेनुसार थोडे पाणी घालुन पीठ मळुन घ्या, लहान गोळे करुन घ्या, एका पॅन मधे कमी तेल घेऊन शॅलो फ्राय करुन घ्या. दुसर्या पॅन मधे तेल गरम करा, जीरे - मोहरीची फोडणी द्या, बारीक चिरलेली हीरवी मिरची आणि कढिपत्ता घाला, टॉमेटोचे पेस्ट घालुन शिजत ठेवा, थोड्या वेळाने १ चमचा हळद , १ चमचा गरम मसाला, १ चमचा किचन किंग मसाला घालुन परता, थोडं पाणी घाला आणि मीठ घालुन एक उकळी येउ द्या, गॅस बंद करुन ज्वारीचे कोफ्ते मिसळा आणि ५ मिनीटे झाकून ठेवा.
* आख्खे मुग दळुन, पीठात आले - लसुणाची पेस्ट, हळद, मीठ घालुन लगेचच धिरडी थापावीत. हा अगदी भरपेट नाश्ता होतो.
अशी ही आहारावर नियंत्रण आणून वजन कमी करण्याची कहाणी.हा वसा कोणीही कधीही घेऊ शकतो.फक्त ऊतू नये, मातू नये,घेतला वसा टाकू नये एवढे लक्षात असू द्यावे!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 10:19 am | अमृत
काय खाऊ नये या यादीत सगळ्या आवडीच्या गोष्टी असल्यामूळे निशेध! :-)
छान धागा आहे.
16 Oct 2015 - 11:03 am | स्मिता श्रीपाद
मस्त झालाय लेख....
पाकृ नक्की करुन बघणार..
16 Oct 2015 - 11:43 am | अजया
ज्जे बात.१९७८राॅक्स!!
वाचताना काय काय खाऊ नये वाचून दुःख झाले:)
16 Oct 2015 - 2:50 pm | के.पी.
मस्तच लेख,
छान छान सोप्या पाकृसोबत :)
16 Oct 2015 - 3:35 pm | सानिकास्वप्निल
लेख खूप छान झालाय, बर्याच हेल्दी पाकृ दिल्या आहेस गं.
हे कटाक्षाने पाळून, अजिबात न कंटाळता वजन कमी केलेस खरचं कौतुक वाटले तुझे :)
16 Oct 2015 - 4:53 pm | उमा @ मिपा
ज्वारीची महती मोठी. चिकाटी आणि हिम्मत यासाठी अभिनंदन.
पाकृ नक्की करणार.
16 Oct 2015 - 6:15 pm | मधुरा देशपांडे
दंडवत घे बाई. काय खाऊ नये च्या यादीत मी बघितलेच नाही.
ज्वारीच्या पाकृ इंटरेस्टिंग आहेत, स्पेशली कोफ्ते. करुन बघेन नक्कीच.
16 Oct 2015 - 7:22 pm | वेल्लाभट
रेसिपी जबर, तुमची चिकाटी कौतुकास्पद. ज्वारीच्या रेसिपींचा सडा पडलाय धाग्यात.
पण; काही बाबतीत तुमच्या मतांशी मी आदरपूर्वक असहमत आहे.
१ तास चालण्यावर ठेवलेली भिस्त, खाण्यवर कंट्रोल/तोंडावर ताबा फिलॉसॉफीज, वजन या आकड्याला दिलेलं अवास्तव महत्व इत्यादी गोष्टी.
वजन इज अ डिराइव्ह्ड नंबर; रिमेंबर. व्हॉट कंट्रोल्स द नंबर इज ऑफन इग्नोअर्ड. असो.
हा विषय वेगळा आहे त्यामुळे इथे वाढवत नाही.
16 Oct 2015 - 10:14 pm | रेवती
बापरे! वजन कमी करण्याचा दणकाच लावलास तू!
मनावर खूप नियंत्रण हवे यासाठी.
तुझे अभिनंदन.
17 Oct 2015 - 1:11 am | स्रुजा
काय सातत्य आहे !! अतिशय कौतुकास्पद. कहर आहेस. ज्वारीच्या एवढ्या छान रेसिपी ज बद्दल विशेष धन्यवाद.
17 Oct 2015 - 8:51 am | नूतन सावंत
कवी,ज्वारी उत्पादक तुझा सत्कार करणार आहे असे कळतेय.*विं** इतक्या चिकाटीने सातत्य राखून तू वजन कमी केलेस यात तुझे कौतुकाच आहे.गरज ही शोधाची जननी आहे हे काही खोटे नाही नाहीतर बेसन,कुळथाच्या पिठल्याच्या पंगतीला ज्वारीचे पिठले कसे येऊन बसले असते?सगळ्या पाककृती मीही करून पाहीन .वजनाचा नसला तरी मधुमेह आणि कॉलेस्टोरॉलचा संबंध नेहमीच येतो.धन्यवाद तुझ्या प्रयोगशीलतेला.असेच नवनवीन प्रयोग करत राहून त्यात यशस्वी हो.आणि आमच्याही ध्यानात भर घाल.
17 Oct 2015 - 2:46 pm | एस
अवघड आहे असे डाएट सतत ठेवणे. तरीपण प्रयत्न करून पाहीन. आणि सख्ख्या मित्रमंडळांबद्दल जे लिहिलेय त्याच्याशी बाडिस! ;-)
18 Oct 2015 - 9:41 am | पैसा
मस्त पाकृ! तुझ्या चिकाटीचे खूप कौतुक आहे. मात्र पथ्याच्या बाबत वेगवेगळ्या उपचार पद्धतीत खूप फरक दिसतात. आपले रोजचे चौरस जेवण, फळे, पाणी, दूध अधुन मधून अंडी हे मला मानवते. पोट अगदीच रिकामे ठेवू नये किंवा आहे म्हणून हादडु नये. साखर, तेलकट पदार्थ टाळावेत. एवढ्याला नियमित व्यायामाची जोड़ दिली तर खूप फरक पडतो हे स्वानुभवावरून सांगू शकते.
18 Oct 2015 - 2:32 pm | प्यारे१
आमचे येथे
जे खाऊ नये ते सगळं खाल्लं जातंय नि जे खायला हरकत नाही सांगतात ते मिळत नाहीये.
(ही सबब सांगितली आहे. खांबाला स्वतः धरुन खांब मला सोडत नाही म्हणणारे आम्ही. असो!)
18 Oct 2015 - 4:51 pm | मांत्रिक
तुमची चिकाटी मोठी आहे. साई पदयात्रेचा धागा वाचल्यावरच ते लक्षात आलेलं होतं. मनापासून अभिनंदन! बाकी मी स्वतः ओव्हरवेट असल्याने तुमच्या सल्ल्यांचा जरुर विचार करेन. रोज चालतो एक तास, फक्त खाण्यावरचे निर्बंध पाळणे फार मुश्किल. नॉन व्हेज तर अतिशय फेव्हरेट!
19 Oct 2015 - 9:50 am | गिरकी
खूप उपयोगी धागा. नवीन डायेट पदार्थ पण आवडले.
20 Oct 2015 - 3:46 pm | स्नेहल महेश
वाचताना काय काय खाऊ नये वाचून दुःख झाले
21 Oct 2015 - 12:06 pm | पिलीयन रायडर
अत्यंत उपयुक्त धागा! ज्वारीचे एवढे पदार्थ होऊ शकतात हे माहितीच नव्हतं.
21 Oct 2015 - 8:02 pm | इशा१२३
धन्य आहेस तु.चिकाटिने करतेस सगळ.ज्वारीच्या अनेक रेसेपि दिल्या आहस.उपयुक्त आहेत अगदि.
22 Oct 2015 - 2:27 pm | Mrunalini
वा.. मस्तच. फॉलो करायचा प्रयत्न करतीये.
22 Oct 2015 - 4:24 pm | अनन्न्या
न खाण्याची यादी वाचली पण विसरले, एवढा निग्रह करू शकेन असे नाही वाटत, पण रेसिपी नक्की करून बघेन.
23 Oct 2015 - 1:45 pm | बोका-ए-आझम
प्रयत्न करुन नक्कीच पाहीन. सध्या एक तास चालणे सुरु केलेलं आहे.
26 Oct 2015 - 7:38 am | मितान
मस्त रेसिप्या कविता !
यात वेळ मिळताच भर घालते. चालेल ना?
26 Oct 2015 - 1:17 pm | कविता१९७८
नक्की चालेल
26 Oct 2015 - 5:43 pm | स्वाती दिनेश
कविता, स्वतःचे वजन कमी करून नंतरही ते मेंटेन्ड ठेवले आहेस ते मागच्या कट्ट्याच्या वेळी दिसले, :)
(काय खाऊ नये? ह्या यादीत सगळे आवडणारे पदार्थ ! :( )
स्वाती
31 Oct 2015 - 2:54 pm | पद्मावति
खुपच उपयुक्त लेख. आवडला.
31 Oct 2015 - 3:34 pm | Maharani
ज्वारीचे केवढे पदार्थ होऊ शकतात..सहीच..
3 Jan 2016 - 9:44 pm | ढ.अदिती
आपल्या तोंडावरचा कंट्रोल महत्त्वाचा आहे तोच अवघड आहे :) कितीतरी गोष्टींची चटक लागते आणि त्यांना नाही म्हणणे म्हणजे फारच अवघड . मित्र मैत्रिणींच सहकार्य तेवढाच महत्वाचे. फक्त ज्वारीने आणि व्यायामाने इतका फरक पडू शकतो हे वाचून उत्साह आला आहे. नक्कीच प्रयत्न करुन पाहीन. या लेखाबद्दल आभारी आहे आणि तुमचे अभिनंदन!
7 May 2016 - 9:15 pm | रॉजरमूर
वा खूप छान
खूप छान माहिती दिलीत ताई .
आपली चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे .
15 May 2016 - 10:43 am | बाइसा
छान माहिती. पण भात खाऊ नये असे असताना कांदेपोहे कसे चालतील?