गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतले आणि आम्हाला भटकंतीची ठिकाणं खुणावायला लागली. मात्र दिवसाचे गणित काही जुळेना.मला क्लिनिक एक दिवसावर बंद करणे अशक्य होते.मग रविवार सोमवार कुठेतरी जायचंच ठरवलं.नेमकं तेव्हाच पेपरमध्ये कासचे फोटो येऊ लागले.गणपतीच्या दिवसात जो थोडाफार पाऊस झाला त्यानंतर फुललेले पठार.ते बघून कासला जाण्याचे निश्चित केले.रविवारी कास टाळायचे होते. तिथल्या गर्दीचं वर्णन ऐकून होतो.मग रविवारी कासच्या जवळपासची ठिकाणं करुन कासजवळच्या निवांत रिसाॅर्टला रात्री रहायचे.सकाळी उठून कास बामणोली करुन परतायचे असा बेत फायनल झाला.कास जवळची ठिकाणं शोधताना औंध जवळच असल्याचं लक्षात आलं.मग रविवारी औंध यमाई देऊळ संग्रहालय आणि ठोसेघरचा धबधबा असा कार्यक्रम ठरवला.
रविवारी अगदी पहाटे पावणे पाचलाच निघालो.कारण त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. कुठे मिरवणूकीमुळे अडून राहण्यापेक्षा पहाटे बरं असा विचार करुन लवकर निघालो.त्या शांत वेळात रहदारीही अगदी तुरळक.आकाशात झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झालेली.
अर्ध्या तासात खंडाळ्याला पोहोचलो.तिथे चक्क कुडकुडायला लावणारी थंडी होती पहाटे.थंडीत मस्त गरम चहा घेऊन सोबतची सँडविचेस खाऊन सुसाट निघालो.मग थेट शिरवळलाच थांबलो.तिथला श्रीरामचा वडापाव मिसळ कोण चुकवणार! शिरवळहून निघालो ते सातारा पार करुन औंध रस्त्यालाच लागलो.आता रस्त्याने उसाचे मळे ,ट्रॅक्टरमधून मिरवत जाणारे गणपतीबाप्पा जागोजागी दिसायला लागले.बघता बघता टेकडीवरचं यमाईचं देऊळ दिसायला लागलं.टेकडी चढून गाडी थेट मंदिरापर्यंत जाते..वरून भोवतालचा परिसर छान हिरवागार दिसत होता.समोर दगडी चिर्यांनी बांधलेलं ,दोन दीपमाळा तटबंदी मिरवणारं देखणं देऊळ आहे.अगदी स्वच्छ प्रांगण.आम्ही सोडून फारसं कोणीच नव्हतं देवळात.देवीचं निवांत दर्शन घेतलं.देवीची मूर्ती पण छान आहे. मोठी.सोन्याच्या मोठाल्या डोळ्यांनी आपल्याकडे बघणारी! मंदिरातून बाहेर पडलं की डाव्या हाताला पायर्या लागतात.त्या थेट संग्रहालयाकडे नेतात. प्रांगणात छान दगडी महिरपीच्या ओवर्या आहेत.तिथे गारव्यात जरा वेळ बसलो शांत.
( हा फोटो जालावरून साभार.मंदिराच्या आत कॅमेराला परवानगी नाही.)
छान गार वारा वाहात होता.ओवर्यांवर आमच्या गप्पांचा फड जमलाच मग! तोवर इतर लोक यायला सुरुवात झाली.यमाई बर्याच मराठी लोकांचे कुलदैवत आहे.त्यामुळे नविन लग्न झालेल्या जोडप्यांची वर्दळ वाढायला लागली तसे आम्ही निघालो.खाली भवानी वस्तू संग्रहालय आहे.अगदी नाममात्र तिकिट काढून आपल्याला प्रवेश मिळतो.आवारातच अनेक वीरगळ ठेवलेले आहेत.ते बघून वल्लीची आठवण निघालीच! त्याच्या लेखामुळे वीरगळाबद्दल सोबतच्यांना माहिती देता आल्याने माझ्या नवर्याच्या डोळ्यात,' काय बै माझी हुश्शार 'असे भाव आलेले मला याची देही याची डोळा बघायला मिळाले;)श्री. रा.रा. वल्ली यांचे मंडळ कचकून आभारी आहे!!
बर्याच दिवसापासून हे संग्रहालय बघायचे होते.मुख्यत: तिथल्या चित्र आणि शिल्पांसाठी.औंधचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी हे स्वतः चांगले चित्रकार आणि दर्दी होते.कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी कोट्याळकरांसारखे चित्रकार त्यांनी जेव्हा तीन चार रुपये पगार असे त्या काळात साठ रुपये पगारावर दरबारात मानाच्या स्थानी घेतले होते.स्वतः बाळासाहेबांनी त्यांच्या देश विदेशाच्या दौर्यांमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू, चित्रं विकत घेऊन त्यांचा संग्रह केलाच.पण संग्रहालय कसे उभारावे याचे परदेशी जाणकारांकडून ज्ञान घेऊन नैसर्गिक उजेड आणि प्रकाश व्यवस्थेने परिपूर्ण असे प्रशस्त संग्रहालय उभारून ते लोकार्पण केले.राजा रवीवर्म्याला उत्तेजन देण्यासाठी त्याला मदत करणारे राजे हे औंधाचे बाळासाहेब पंत प्रतिनिधी आणि बडोद्याचे सयाजीरावमहाराज. अनेक देशी विदेशी चित्रकारांच्या ओरिजिनल तसेच प्रतिकृती हे या संग्रहालयाचे खास आकर्षण.
संग्रहालयाच्या सुरूवातीलाच या राजाचे सुंदर पोर्ट्रेट आहे.त्यावरून त्या चित्रकाराबद्दल अपेक्षा फार उंचावल्या.लगेचच पुढच्या दालनात त्या धप्पदिशी खालीही आल्या! या दालनात कोट्याळकरांनीच काढलेली काही सुरेख पोर्ट्रेट्स आहेत आणि पौराणिक प्रसंगावरची काही चित्रं. यात शीव तांडव नृत्य यावर त्यांचीच तीन चित्रं आहेत.ती अगदीच बाळबोध तर आहेतच पण त्यातल्या रचनेमुळे जरा हास्यास्पद पण आहेत! एका चित्रात शंकर नृत्य करतोय आणि पार्वती गातेय.ती गातेय ते अगदी तमाशातल्या बाया एक हात कानावर आणि एक हात हवेत उडवून गातात तशी.शंकर त्या गाण्यामुळेच तांडव करतोय की काय असे वाटून हसायला आले ! बरं तांडव करतानाही शंकराच्या चेहेर्यावर अगदी अष्टसात्विक भाव! एका चित्रात सरस्वती एका हातात खांबासारखी वीणा घेऊन उभी आहे.बाजूला छोटे नागडे गणपती आणि कार्तिकेय 'माझ्या गणाने घुंगरूवर' नाच करत आहेत अशा पोझमध्ये! आणि बाजूला एक मोर नाच रे मोरा आज्ञेची वाट बघत असल्यासारखा!असो!!
पुढच्या काही दालनांमध्ये मात्र अप्रतिम कलाकुसरीच्या वस्तू आहेत.विशेषत: चंदनात अखंड कोरलेले शिवचरित्र अगदी पाहावे असे.किरीट अर्जून युद्धावर एक बंगाली चित्रमालिका तर मजलाभर पसरलीये.अनेक हस्तीदन्ती कोरीव वस्तू,जपानी वस्तू पण बघण्यासारख्या. संग्रहालयाचे जिने नेमके पोचवत रहतात.कुठे शोधत जावे लागत नाही.खालच्या मजल्यावर देशी आणि विदेशी चित्रकारांची चित्रं आहेत.त्यात रवीवर्म्याची प्रसिद्ध सैरंध्री,दमयंती भेटल्या! याआधी बडोद्याला रवीवर्म्याची ओरिजिनल चित्रं बघितली होती.चित्रात देवी असो वा सैरंध्री सगळ्या त्याला आवडणार्या नऊवारी पातळात.चेहेरेही सारखेच.तरीही ही चित्र मला आवडतात.कदचित त्यातल्या भावदर्शनामुळे.
(सर्व चित्र जालावरून साभार.आत कॅमेराला परवानगी नाही)
पुढच्या एका दालनात ठाकूरसिंग यांचं तैल रंगातलं प्रसिद्ध 'ओलेती' चित्र आहे.आवर्जून बघावं असं.
याच्या आधीच्या दालनात परत एकदा करमणूक करणारी काही चित्र दिसली.इथे व्हेनिसचा देखावा या शीर्षकाखाली काप्री आणि सोरेन्तो या इटलीतल्या ठिकाणांची बाळबोध चित्रं आहेत.काही चित्रात तर व्हेनिसमध्ये व्हेसुवियस ज्वालामुखीतून धूर पण येतोय!या आणि सर्व चित्रांखाली जे इंग्रजीतून त्याचे वर्णन आणि शीर्षकं दिली आहेत ती वाचून तर भलतीच करमणूक होते.विलाप करणार्या गोपिका या चित्राखाली इंग्रजीत 'गोपिका इन फ्युजन' असे लिहिलेले आहे!काही ठिकाणे मराठी शब्दाचे शब्दशः इंग्रजी भाषांतर दिलेले आहे! मग मी जरा टेन्शनमध्येच ओलेतीचं शीर्षक वाचलं! पण ते इंग्रजीतही ओलेतीच होतं, वेट लेडी नव्हतं म्हणून मी हुश्श केलं;)
या पुढे मात्र काही सुरेख शिल्पं बघायला मिळाली.विशेषतः फ्लायिइंग मर्क्युरी हे ब्राँझमधले आणि मदर अँड चाइल्ड हे मार्बलमधले. एका दालनात सहा ऋतूंची सहा शिल्पं आहेत.मराठमोळ्या स्त्रीच्या स्वरूपात.तळाशी त्या त्या ऋतूचे वर्णन करणारी कविता.हे पूर्ण दालन अगदी पहावे असे आहे.बर्याच लोकप्रिय शिल्पांच्या सुबक प्रतिकृती देखील आहेत.मायकेल अॅन्जेलोचा लाडका डेव्हिड देखील होताच!
जाता येता अनेक सुरेख चित्रं दिसत रहतात.खरं तर हे म्युझियम पहायला एक दिवस पुरत नाही.
एक परमआदरणीय वस्तू इथे आहे.शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले पत्र.ही मूळ प्रत इथे लावलेली आहे.द.मा. मिरासदारांचे शिवाजीचे हस्ताक्षर आठवलेच!
परत निघताना द्रष्ट्या कलावंत भवानराव उर्फ बाळासाहेबपंत प्रतिनिधींच्या समाधीला वंदन करून ठोसेघरला जाण्यासाठी कूच केलं.
ठोसेघरला पोचता पोचता पाच वाजून गेल्याने गर्दी अगदी कमी होती.धबधब्याचा खळाळ दुरूनच ऐकू येत होता.आधी एक ऊंचावरून कोसळणारा मोठा धबधबा आणि पुढे जाऊन देखणा लहान धबधबा दिसतो.इथे पाणी खडकातून वाहत येते.आणि निसरड्या दगडांवरून थेट दरीत उडी घेते. हा धोकादायक धबधबा आहे.इथून निसटून अनेकांनी प्राण गमावलेत.पण लक्षात कोण घेतो:( अनेक लोक रेलिंग ओलांडून अगदी लहान मुलं घेऊन धबधब्यात मजा करायला जात होते.नुसत्या डोळ्यांनी त्या धबधब्याच्या देखण्या दृश्याचा आनंद घेता येत नसावा!पण तिथे लावलेल्या बोर्डप्रमाणे लहान मुलं घसरून वाहून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असूनही लोक असे दु:साहस कसे करू शकतात कोण जाणे.
धबधबा मात्र देखणा.मोठाही आहे.खाली गोल डोहात उडी घेतो.आजूबाजूला घनदाट जंगल आहे.आणि सभोवती छोटी पिवळी फुलं उमललेली.सुरेख दृष्य आणि नामांकित स्वच्छता.डोळे निवले अगदी पाहून.
जड पावलाने बंद होण्याच्या वेळेत निघालो.येताना सज्जनगडाचे लांबूनच दर्शन घेतले.खाली समर्थसृष्टी नविनच सुरू झालंय.त्याच्या आवारातला हा मारुतीराया.
आणि आमच्या निवांत रिसॉर्टमध्ये उद्या कासला जाण्यासाठी येऊन निवांत विसावलो..
(क्रमशः)
प्रतिक्रिया
1 Oct 2015 - 10:14 am | दमामि
वा! फोटो सुरेख!
1 Oct 2015 - 10:41 am | प्रदीप@१२३
अप्रतीम.......... फोटोस.
1 Oct 2015 - 10:56 am | वेल्लाभट
सहीच.....
1 Oct 2015 - 11:07 am | त्रिवेणी
मस्तच ग. मी सुद्धा chale आहे रविवार_सोमवार. रविवारी आमची कुलदेवी भुवनेश्वरी आणि औदुम्बर ला जाणार.ते जल्यावर औंध ला जावु. संध्याकाळी आम्ही पण निवांत ला थांबणार आहोत. पण फ़क्त८१च नॉन ऎसी रूम अवेलेबल होती.मग सोमवार सकाळी कास ला जावु.
1 Oct 2015 - 11:12 am | एस
अरे वा! चक्क सगळे फोटो लोड झाले! मस्त सफर. पुभाप्र.
1 Oct 2015 - 11:22 am | मितान
वा वा ! मस्त लिहिलंय अजया ! अजून फोटो हवेत !
भाग २ च्या प्रतीक्षेत...
1 Oct 2015 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सफर !
1 Oct 2015 - 11:43 am | पदम
पुढ्च्या साताराभेटित ह्या ठिकाणान्ना भेट नक्कि देणार.
1 Oct 2015 - 12:08 pm | कविता१९७८
वाह मस्तच, वर्णन वाचुनचपाहील्याच समाधान मिळाले
1 Oct 2015 - 12:24 pm | मृत्युन्जय
वा. मस्तच. पुभाप्र
1 Oct 2015 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले
वाह अप्रतिम !
औंधाच्या म्युझियम मधील ते रामायण आणि महाभारताचे चित्रण असलेलेले लाकडी दरवाजे / भिंती पाहिल्यात का ? किंव्वा संगमरवरी रामाची मुर्ती ! निव्वळ अप्रतिम !
आणि राजा रविवर्माचे " ओलेती " हे चित्र ___/\__ ते वरीजीनल आहे म्हणे !
आणि अऊंधाच्या म्युझियम च्या गुप्त विभागातील खजिन्यात चंद्रकांतमणी देखील आहे , मात्र तो विभ्जाग पहाण्या साठी कलेक्टर परमीशन मिळवावी लागते म्हणे !
आणि राजाचे गावातील यमाईचे मंदीर पाहिलेत का ? तिथेही अप्रतिम चित्रे आहेत अनेक !
गदिमांच्या "औंधाच्या राजाच्या" आठवणीने डोळे पाणावले ... सगळीच गणिते बरोबर येत नसतात , काही चुकतात !
2 Oct 2015 - 9:55 am | अजया
औंधाचा राजा _/\_
'ओलेती' रविवर्माचे चित्र नाही.ठाकूरसिंग यांचे आहे.राजवाडा मिरवणूकींना कंटाळून बघायचा सोडला खरं तर.अनेक लोक गुलाल उधळत अचकट विचकट नाचत रस्ता अडवत होते :( आता तिथेही चित्रं आहेत वाचल्यावर परत जाणे आले!
1 Oct 2015 - 12:48 pm | नाखु
वर्णन आवडले. आणि फोटो पाहून आम्ही (आमचे जुने सहल्फोटो आठवून) फोटो काढण्याबाबत किती अडाणी+करंटे आहोत हे लक्ष्यात आले.
स्थानीक "आम"दार प्रगो मनावर घेईल तेव्हा सातारा परिसर पाहण्याचे ठरवले आहे. बाकी काळजी घेण्यास "समर्थ" आहेतच.
पुलेप्र.
शिवथर घळ पाहिलेला पण ठोसेघरला(सज्जन्गडवारीतही) न गेलेला नाखु
1 Oct 2015 - 12:55 pm | सस्नेह
बाकी, गेल्या वर्षी कास ट्रीप न करता या वर्षी आयोजित केल्याबद्दल कचकून णिशेध !!
1 Oct 2015 - 1:03 pm | इशा१२३
सुरेख फोटो.माहितीहि छान.
यमाइ देवीचे देऊळ पाहिलेस ना.डोंगरावरच्या देवळात पायर्या चढुन जायलाहि मजा येते.अर्थात गाडिवरपर्यंत जाते त्यामुळे जास्त सोय होते. त्या डोंगरावरुन आजुबाजुचा परीसर पहायला मलाहिखुप आवडते.काय सुंदर आहे तो भाग.माहेरची कुलदेवता यमाइ असल्याने ते देउळ अन म्युझियम अनेकदा पाहिलय.सुंदर कलाकृती आहेत तिथे.
1 Oct 2015 - 1:10 pm | मधुरा देशपांडे
मस्त. पुभाप्र.
1 Oct 2015 - 1:39 pm | स्वाती दिनेश
मस्तच ग,
'पार्वती गातेय' चे वर्णन :)
पुभाप्र.
स्वाती
1 Oct 2015 - 1:57 pm | सानिकास्वप्निल
वाह!! छान लिहिले आहे, फोटो ही सुंदर :)
पुभाप्र.
1 Oct 2015 - 2:16 pm | पद्मावति
आहा, सुंदर भटकंती.
पहाटे आकाशाचा फोटो, मंदिराचा, धबधब्याचा सगळेच फाटो सुंदर आले आहेत. वर्णन फारच मस्तं. यमाई चं देऊळ आणि भवानी संग्रहालयचं वर्णन तर खूपच आवडलं.
पु.भा.प्र.
1 Oct 2015 - 2:52 pm | प्रीत-मोहर
मस्तच!!!!
1 Oct 2015 - 3:21 pm | बोका-ए-आझम
अजयातै, तुमची लेखणी इटली आणि कास ही दोन्हीही वर्णनं कशी काय एवढी अप्रतिम करु शकते? पुभाप्र!
1 Oct 2015 - 3:31 pm | Mrunalini
सुंदर फोटो ताई आणि लेख ही मस्त. रवि वर्मांची पेंटिंग्स तर बेस्ट.
1 Oct 2015 - 3:32 pm | मित्रहो
कासे पठाराविषयी खूप ऐकलेय पण सारे म्हणतात तिथे फार गर्दी असते त्यामुळेच कधी जाणे झाले नाही.
फोटोही खूप सुंदर
1 Oct 2015 - 4:04 pm | प्रचेतस
लेखन आणि वर्णन छान. वीरगळांचे फोटू घेता आले असते तर अजून काही वीरगळ पाहिल्याचं समाधान मिळालं असतं.
औंंधच्या संग्रहालयात कधीपासून जायचं आहे, बघू कधी योग येतो ते.
1 Oct 2015 - 6:41 pm | रेवती
फोटू आवडले. सफर छान चाललिये. आता पुढील लेखन लवकर द्यावे.
1 Oct 2015 - 7:27 pm | पैसा
खूप छान लिहिलंस!
1 Oct 2015 - 7:50 pm | पियुशा
मस्त वर्णन ,पुढचा भाग टाक लवकर
1 Oct 2015 - 9:56 pm | यमन
मिसळ आणि वड्याचे फोटो टाकले नसल्या मुळे फौल धरण्यात आला आहे .
बाकी फोटो आणि प्रवासवर्णन उत्तम .
श्रीरामचा वडापाव प्रेमी … यमन
2 Oct 2015 - 9:52 am | अजया
फोटो काढायला कोण थांबतो हो! घे की हाण असा वडापाव तो:)
2 Oct 2015 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
सुंदर.
2 Oct 2015 - 2:59 am | विशाखा राऊत
मस्त वणर्न..
2 Oct 2015 - 9:14 am | Maharani
Mast varnan...aani photo pan apratim...pubhapra
9 Oct 2015 - 9:04 am | कैलासवासी सोन्याबापु
औंध ची देवी अन देऊळ पाहून आनंद झाला, आमचे मुळगाव ह्याच भागातले, तुम्ही जो हिरवाई चा पैनोरमा घेतला आहे तो उन्हाळ्यात मात्र रौद्र भासतो फार दूरवर दिसणारे डोंगर (गोलाकार) अन सगळीकडे रखरखाट असतो अगदी एखादे देसी ग्रैंड कैनियन असावे तसा त्याचे ही सौंदर्य वेगळेच!!
18 May 2016 - 9:37 pm | उल्का
अप्रतिम लेख.
हे आपल्या महाराष्ट्रातील असल्यामुळे बघता येईल.
कासलाही कधीपासून जायचे आहेच.
19 May 2016 - 4:23 pm | दिगोचि
मी हे सन्ग्रहालय स्वतः तीन वर्षापूर्वी सातारच्या भेटीत पाहिले. १९५०च्या दशकात औन्धच्या राजेसाहेबानी सरकारला चालवायला दिले पण तरीहि त्यचे वातोळे झाले नाही. आम्ही तेथे असलेले व मुघल सम्राट औरन्गजेबने स्वहस्ते लिहिलेले कुराण पाहिले. तसेच जहान्गिर बादशहाचि रत्नजडित काठी पाहिली. या व अशा काही महत्वाच्या गोष्टी तेथे स्ट्रोन्गरूममधे ठेवल्या आहेत.
20 May 2016 - 1:24 pm | प्रसाद गोडबोले
काय ? औरंगजेबाला अरेबिक येत होती ? ब्यॅटम्यॅन सरांना विचारले पाहिजे !
20 May 2016 - 3:41 pm | प्रचेतस
हो.
अरबी आणि फारसी.
फारसी तर राजभाषाच होती की मुघल दरबारची.