भारतभेटीला प्रथमच येणार्या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न. माझा शेजारी असलेल्या मॅनीच्या लाझ नामक दूरच्या भाच्याची ही संक्षिप्त भारत भ्रमण-कथा.
===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================
Hello Family!
तर मी माझी निरोपा-निरोपी करून घेतली, सध्यापुरती, आणि आता भारत सोडलाय.
या महिनाभर लांबीच्या भारतभेटीच्या कित्येक महिने आधीपासून मी बहुतांशी फक्त टीकाच ऐकत आलो होतो: महिनाभर म्हणजे अति-लांब काळ आहे, तिथे कानठळ्या बसतील असं ध्वनी-प्रदूषण आहे, तुला संपूर्ण वेळ जुलाब लागतील, वगैरे, वगैरे. Well, हे सगळं आहे इथे, पण तरीही हा देश म्हणजे एक अद्वितीय, श्रीमंत अशी संस्कृती आहे, अवर्णनीय निसर्गसौन्दर्य आहे, आणि अत्यंत साहसाचं असं दोलायमान आयुष्य आहे. इथलं प्रत्येक राज्य अनोखं आहे, प्रत्येकाची वेगळी भाषा आणि प्रवृत्ती आहे, वेगळे धर्म किंवा वेगळ्या चालीरीती आहेत, अन्नपदार्थ आहेत, हवामान आहे, आणि निसर्गात तर इतकं वैविध्य आहे की तुम्ही एका प्रचंड, वैचित्र्यपूर्ण म्युझियमच्या वेग-वेगळ्या दालनांमधून फिरताहात असं वाटत राहतं, प्रत्येक दालन वेगळं सजवलेलं, प्रत्येकातली पात्रं वेगळी, आकर्षक वेषभूषेतली!
गेला आठवडा मी मी मुंबई या महानगरात घालवला. लोकसंख्या २८ दशलक्ष, कदाचित अधिकच, कारण इथे हजारोंनी लोक झोपड्यांमध्ये आणि रस्त्यांच्या काठाने राहतात. माझे दिवस मी व्यतित केले इथल्या रस्त्यांवर भटकण्यात, शाही दिमाखाच्या ब्रिटिश इमारती आणि त्यांमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय स्थापत्यशास्त्राच्या इमारती पहात.
.
.
.
रस्ते कायम गर्दीचे असतात, आधुनिक तसेच पुरातन काळातल्या वाहनांनी दुथडी भरून वाहत. बैलगाड्या, बसेस, कार्स, ऑटो रिक्षा, दुचाक्या, सायकली, छोटे टुक-टुक, अजस्त्र ट्रक्स; सगळ्यांना कुठे तरी प्रचंड घाईने जायचं असतं! दर तीन मीटर्स वर ही सर्व वाहनं त्यांचे कर्णे वाजवत असतात. इथे भारतात बहुतेक कर्णा वाजवण्याचा अर्थ "धोका, काळजी घ्या" असा नसून "hello, मी तुझ्या ढुंगणामागे/शेजारी आहे" असा असावा! आणि बहुधा दर ३० सेकंदांनी कर्णा वाजवणं हे सक्तीचं असावं! जर मी इथे कधी काळी स्थायिक व्हायचं ठरवलंच तर तर या एका गोष्टीशी मात्र माझं जमणं अशक्य आहे!
रोज संध्याकाळी मी माझा पूर्वीचा सहकारी आणि इथला मित्र गौरव याच्या साथीने हे शहर प्रत्येक रंगात रंगवायला बाहेर पडायचो, आमची मोहीमच होती, दर रात्री एक वेगळी सिंगल तरुणी शोधायची आणि तिच्याबरोबर मजा करायची. आम्हाला आयुष्यभर पुरतील इतक्या कथांचा साठा आमच्याकडे जमा झालाय. काल अखेरच्या रात्री आम्ही एक ड्रायव्हर असलेली गाडी भाड्याने घेतली (भारतात गाडी आणि ड्रायव्हर, दोन्ही स्वस्त गोष्टी आहेत), आणि रात्रभर एका बार नंतर दुसरा बार असं भटकत राहिलो, आणि पहाटे तीन वाजता शेवटच्या बारमधूनच विमानतळावर पोहोचलो, मी जवळजवळ फ्लाईट चुकवणारच होतो, पण शेवटच्या क्षणी कसाबसा पोहोचलो. समुद्रकिनाऱ्याची ओढ गौरवच्या आग्रहापेक्षा अधिक होती.
तर म्हणून आज मी श्रीलंकेत समुद्रकिनाऱ्यावर आहे. एक टुक-टुक भाड्याने घेतली आहे, भारतात भेटलेले दोन नवे मित्र साथीला आहेत, आणि येते दोन आठवडे आम्ही श्रीलंकेत फिरू. आतापर्यंत आम्ही बेटाच्या मध्य भागातील पठारांवरून चहा-मळ्यांच्या टेकड्यांकडे गेलो. विषुववृत्तीय फळं चाखली, नैसर्गिक धबधब्यांमध्ये डुंबलो, काही ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या, अखेरचा टप्प्यात जगप्रसिद्ध अशा आरागम सामुद्रधुनी इथे तीन दिवस राहून सर्फ केलं, भरपूर ताजं सामुद्रिक अन्न खाल्लं, आणि अननस, नारळ वगैरे फळांचा आस्वाद घेतला. आज आम्ही त्रिंकोमाली या मोठ्या किनाऱ्याच्या गावी आहोत. टुक-टुक मधून जातांना माझ्या उजवीकडे मला दिसतो आहे अथांग समुद्र, निर्मनुष्य किनारे, आणि मी दर दहा मिनिटांनी वाळूत लोळण्यासाठी थांबवतो आहे म्हणून माझे साथीदार माझ्यावर खवळले आहेत! कारण आम्हाला पुढे जाऊन देवमासे पहायचे आहेत आणि स्नॉर्केलिंग करायचं आहे. तिथून आम्ही परत बेटच्या मध्य भागाकडे येऊ, डांबुल्ला इथल्या गुहांमधली मंदिरं पाहू, आणि मग इथून पुढच्या प्रवासाठी फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळाकडे निघू.
माझा पुढचा थांबा असेल मलेशिया. एका दिशेचं तिकिट ८० डॉलर्सना मिळालं. तिथून मग १७ सप्टेंबरच्या ऑक्टोबरफेस्ट साठी वेळेत जर्मनी आणि मग मायामी. मलेशियात किती दिवस असेन, जर्मनीत किती थांबेन, सध्या काहीच निश्चित नाही. माझ्याकडे विमानाचे माईल्स आहेत, वेळ आहे, साहसी यात्रा चालू आहे.
I hope everyone is doing well. Speak soon.
Thanks,
- लाझ
=============================================================
या अंतिम भागानंतर सर्व वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. लाझचे फोटो मला मिळाले नाहीतच, त्यामुळे माझ्या कल्पनाविलासानुसार त्या त्या ठिकाणी अनुरूप वाटली ती प्रकाशचित्रे मी गूगल अर्थ, बिंग इमेज आणि गूगल इमेज यांच्या उत्खननातून टाकत गेलो. काही ठिकाणी उचित वाटले तसे व्हिडिओज टाकले. वाचकांना निदान आतापर्यंत तरी त्यापैकी बरीच आवडली आहेत असं दिसतं, त्या प्रोत्साहनाबद्दलही आभार.
लाझ इथे परतेल तेंव्हा मी नसेन, तेंव्हा त्याची भेट होण्याची संधी धूसर आहे. पण लाझची इ-ओळख करून देणार्या मॅनीचे आभार. आणि अखेर पुन्हा एकदा, माझाच देश मी डोळे उघडून पहायची किती गरज आहे हे जाणवून देणार्या लाझचेही आभार!
=============================================================
प्रतिक्रिया
5 Sep 2015 - 7:41 am | कैलासवासी सोन्याबापु
मी पहिला!!!
बहुगुणी सर,
इतका सुन्दर अन वेगळ्या डोळ्यांनी पाहिलेला अनुभव तुम्ही तितक्याच ताकदपुर्ण पद्धतीने आम्हाला दिलात अत्यंत आभार तुमचे, आमचे बाबा रोटरी इंटरनॅशनल ला सदस्य होते तेव्हा एक स्वीडिश व्यक्ति आमच्या घरी राहायला आली होती, तेव्हा मी घरी होतो काही कामानिमित्त माझी स्पर्धा परीक्षेची इंग्लिश मधली पुस्तके पाहून तो गृहस्थ फार अचंबित झाला होता. भारताचा प्राकृतिक अन सांस्कृतिक भूगोल , बिपनचंद्र, जे एल मेहता अन रोमिला थापर ची इतिहासाची पुस्तके सगळे वाचले त्याने ३ महिन्यात आमच्याकडल्या वास्तव्यात. एकदा टीवी पाहात असता चॅनल ब्राउज करताना सुर्या का कुठलेतरी तमिळ चॅनल लागले तेव्हा त्याने मला "हा कसला कार्यक्रम आहे? ही कुठली गाणी गातायत?" असे विचारले तेव्हा मी त्याला तमिळ असे सांगितले तेव्हा मला म्हणाला "ते काय म्हणत आहेत मला सुद्धा सांग न" मी म्हणले "Buddy I really don't know what the songs are about because I don't know this language at all" तर त्याला प्रचंड आश्चर्य वाटले व तो म्हणाला "तुझ्या देशातली भाषा तुला येत नाही?" ह्यावर मी त्याला बयाजवार सांगितले की "बाबा रे भारतात १४०० च्या आसपास वेगवेगळ्या भाषा आहेत, मला त्यातल्या ३ लिहून वाचुन बोलून येतात अन इतर ४ एक फ़क्त बोलून येतात मोडक्यातोड़क्या" तेव्हा त्याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते, त्याला नवल वाटत होते की एका फोरेनर ला जितकी एलियन तमिळ भाषा आहे तितकीच एका भारतीय माणसाला सुद्धा आहे तरीही तुम्ही देश म्हणुन एकत्र कसे राहता ह्याची! विलक्षण भारी वाटले जेव्हा तो म्हणाला "I salute this unity in diversity of ur great nation" त्यांच्या चष्म्यातुन पाहणे बरेच मजेशीर असते खरे.
5 Sep 2015 - 8:33 am | जेपी
सुंदर लेखमालीका.
धन्यवाद बहुगुणी जी.
5 Sep 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखमालिका ! परकिय माणसाच्या प्रामाणिक परखड शब्दातला भारत अगदी तसाच आहे !
======
या लेखातले वरून चौथे चित्र (इमारतीतून जाणारा रस्ता असणारे) ओसाका (जपान) मधले आहे. चुकीने इथे पडले काय ?
5 Sep 2015 - 12:16 pm | सुबोध खरे
फोटो क्रमांक ४ हा भारतातील नाही आणी फोटो क्रमांक ५ मुंबईतील नाही.
5 Sep 2015 - 1:15 pm | प्यारे१
+१
पाचवं छायाचित्र पुण्यातलं (बहुतेक स्वारगेट चौकातलं वाटतंय)
काय ती पीएमटी च्या बसेस ची सुन्दर ठेवण, आहाहा!
ऑटो लावण्याच्या पद्धतीवरून शिस्तीचं देखणं प्रदर्शन दिसतंय
आणि त्या दुचाक्यांची संख्या तर वा रे वा! फार च चान चान छायाचित्र आहे.
5 Sep 2015 - 3:27 pm | एस
ती पीएमपीएलच्या स्वारगेट आगाराची बस आहे.
बाकी हे वर्णन वाचताना मजा आली. सोन्याबापूंचा प्रतिसादही भारी.
5 Sep 2015 - 12:20 pm | सुबोध खरे
नंतरचा परिच्छेद सुद्धा गंडला आहे. मुंबईत बैलगाड्या सायकली आणी टुक टुक नाहीत
5 Sep 2015 - 1:24 pm | अरुण मनोहर
वाचून मजा आली ! धन्यवाद बहुगुणी !
5 Sep 2015 - 3:18 pm | इशा१२३
सुरेख लेखमाला.परदेशी माणसाच्या नजरेतुन भारताचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद.
5 Sep 2015 - 5:03 pm | पद्मावति
खूप छान प्रवासमाला. सगळेच भाग फार आवडले.
6 Sep 2015 - 12:16 am | बहुगुणी
माझ्या नजरचुकीने झालेल्या चुका चाणाक्ष वाचकांनी ओळखल्या आहेत, क्षमस्व; संपादकांनी प्रकाशचित्रे क्र. ४ व ५ काढावीत ही संपादकांना विनंती.
डॉ. खरे: लाझचं मूळ वाक्य असं आहे -
The streets are busy with a mix of current day and ancient modes of transportation all trying to get somewhere in a hurry; ox carts, cars, rickshaws, trucks, tuk tuks, bikes, and motorbikes.
माझ्याही आठवणीतल्या मध्य मुंबईत ही तिन्ही वाहनं नाहीत, पण तो बहुधा बजाज टेंपो-सदृश छोट्या (कोंबड्या वगैरे वाहून नेणार्या) वाहनांना tuk tuks म्हणत असावा, आणि मुंबईच्या उपनगरांतून सायकली अद्याप हद्दपार झाल्या नसाव्यात अशी आशा आहे.
6 Sep 2015 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे
लाझचं हे वाक्य केवळ मुंबईबद्दल नसून लिहिण्याच्या भरात त्याच्या डोळ्यासमोर राहिलेल्या प्रातिनिधीक चित्राचे असावे. असे चित्र भारतात बर्याच ठिकाणी बघायला मिळते. तेव्हा लाझला तेवढी काव्यसूट द्यायला हरकत नाही ! :)
6 Sep 2015 - 11:20 am | मांत्रिक
मलाही असंच वाटतं. बहुधा आपल्याला बोलायचं असतं एक, आणि टर्मिनॉलॉजी पुरेशी बलवान नसल्यामुळे आपण बोलून जातो दुसरंच. त्यातलाच प्रकार हा देखील. थोडं हलकं घ्यायला हरकत नाही.
6 Sep 2015 - 9:54 am | खटपट्या
प्रचंड सहमत...
7 Sep 2015 - 1:01 pm | नाखु
ह्याचे फलक करून पुण्यात किमान १०-१५ ठिकाणी तरी लावले पाहिजेत एक पिंपरी चौकात कायमस्वरूपी अनिवार्य !!!
7 Sep 2015 - 7:31 pm | gogglya
जागा कुठुन मिळणार हो पिंपरी मध्ये?
6 Sep 2015 - 10:53 am | अनिरुद्ध.वैद्य
प्रवासवर्णन खूप वेगळे आणि मस्त वाटले. लाझच्या मूळ लेखांची लींक मिळू शकेल काय?
धन्यवाद!
6 Sep 2015 - 2:40 pm | कोमल
अप्रतिम लेखमाला.
तुम्हाला, मॅनीला आणि लाझला खुप शुभेच्छा.
त्याला कळवाल जमल्यास की तो खुप फेमस झाला आहे मिपावर :)
6 Sep 2015 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याला कळवा जमल्यास की तो खुप फेमस झाला आहे मिपावर :)
+१००
हा निरोप द्याच लाझला !
7 Sep 2015 - 7:55 am | अनिरुद्ध.वैद्य
येस!!
7 Sep 2015 - 9:32 am | बहुगुणी
आभार! सर्व लेखांचे दुवे आणि आपलं कौतुक हे लाझपर्यंत नक्की पोहोचवेन.
7 Sep 2015 - 7:52 am | हेमंत लाटकर
खुप छान
7 Sep 2015 - 10:37 am | यमन
मजा आली वाचताना .
एक वेगळा अनुभव दिलात .
लगेच संपली .ओशो गार्डन विसरले का लाझ राव ?
9 Sep 2015 - 6:56 pm | नया है वह
.
9 Sep 2015 - 7:31 pm | रेवती
लेखमाला आवडली.
11 Sep 2015 - 11:19 pm | बहुगुणी
12 Sep 2015 - 5:34 am | कंजूस
ही गम्मत पहाण्यासाठीच ते भारतात येतात.न सुधारता आपण आहे तसेच राहिलो तरच आपण पर्यटन यादीत स्थान टिकवू शकू वेगळा खर्च न करता.
केरळमध्ये काही फॅारनर मुद्दाहून कोपय्रावरच्या साध्या हॅाटेलात "चपाती"( इकडे चप्पाती मागवली की तीन चपात्या आणि एक उसळ देतात) खाताना पाहिले आहे..त्यांच्या अजस्त्र देहापुढे छोट्याश्या थाळीतील दोन मिमि जाडीच्या पिटुकल्या तीन चप्पात्या फारच केविलवाण्या दिसतात. पुरी भाजीला पुरी मसाला म्हणायचे.
12 Sep 2015 - 6:50 am | बहुगुणी
न "सुधारता" आपण आहे तसेच राहिलो तरच आपण पर्यटन यादीत स्थान टिकवू शकू वेगळा खर्च न करता.
तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे.
भाग १, ३ आणि ४ यांमध्येही शेवटी लाझने पाठवलेली प्रकाशचित्रे टाकलेली आहेत.
12 Sep 2015 - 5:24 pm | मार्गी
अत्यंत सुंदर लेखमाला! खूप विचार करायला लावणारी! धन्यवाद!
20 Sep 2015 - 10:33 am | पैसा
परक्यांच्या नजरेतून भारत! त्यांची समजूत अशी राहू दे. हरकत नाही. मात्र रोज रात्री एक तरुनी शोधून मजा मारणे प्रकाराचे आश्चर्य वाटले. मुंबईत अशा तरुणी सहज सापडतात हा संदेश परदेशात जात असेल तर मात्र ते धोक्याचे आहे. या प्रकारात काय भयानक धोके असू शकतात याची जाणीव जर या कोणाला नसेल तर काही अनावस्था प्रसंग उद्भवू शकतात. यात फक्त एड्सची भीतीच नव्हे, तर गोव्यात गेल्या काही वर्षात बर्याच फॉरेनर्सचे बळी गेले आहेत आणि खुन्यांचा शोध लागला नाही हेही त्यांना माहीत नसेल तर कठीण आहे. स्वस्त सेक्स आणि ड्रग्ज साठी आपला देश कुप्रसिद्ध व्हावा ही मला अजिबात न आवडणारी गोष्ट.
21 Sep 2015 - 3:00 am | बहुगुणी
पण तशा तरूणी परदेशी प्रवाशांना मजा मारण्यासाठी मिळतात यापेक्षा त्यांना त्या शोधून देणारे त्यांचे कोणी भारतीय मित्रच असतात हे मला आधिक धक्कादायक वाटलं. असो. मी ही घटना जशी विदित केली गेली तशी इथे सांगितली याचं कारण केवळ एकच आहे: ही सत्य परिस्थिती असेल, तर अशा vulnerable तरूणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना (आणि खरं तर सर्वच समाजाला) हा धोका कळावा. अशा घटनांची वर्णनं टाळण्यापेक्षा त्यांची माहिती असणं केंव्हाही चांगलं असं वाटतं. [अर्थात इथे, तरुणींची ओळख करून देणाऱ्या भारतीयांपेक्षा, त्या तरूणींचा स्वत:चाच MY BODY MY CHOICE असा काही दृष्टीकोन असणं अशक्य नाही. Either way, awareness is better than blind faith in so-called 'values'.] या लेखमालेच्या निमित्ताने चर्चा होते आहे यातच सारं काही आलं. प्रतिसादांबद्दल सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.