हो-नाही करता करता शेवटी कनेक्टिकटला जायचं ठरलं एकदाचं ! ६ डिसेंबरला फार्मिंग्टन ह्या गावी महाराष्ट्र फाऊंडेशनने, महाराष्ट्रातील समाजसेवा कार्यासाठी, 'निधी उभारणी' कार्यक्रम आयोजित केला होता. अस्मादिक सदस्य असलेल्या 'उभ्या उभ्या विनोद' (stand up comedy!) करणार्या ग्रुपचा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला होता.
मी कार्यक्रमासाठी येणार म्हणून प्राजुने त्या शनिवारी रात्री त्यांच्या घरीच रहायचं आमंत्रण दिलं. रविवारी (७ डिसेंबर) सकाळी प्राजुच्या घरी शितलही येणार असं ठरलं. चतुरंग आणि रेवती दीड-एक तासांच्याच अंतरावर असल्याने ते ही येतो म्हणाले. असं करत-करत मिपाचा छोटा कट्टाच ठरला ! आधी माझंच हो/नाही चाललं होतं पण जेव्हा रविवारी कट्ट्यासाठी प्राजु मिसळ करणार आहे ह्याची खात्री पटली तेव्हा(च) मग शनिवारी तिथे रहायचं नक्की ठरलं ! (सध्या बायको आणि मुलगा पुण्याला असल्याने मी असाही 'वारकरी'च आहे !)
कार्यक्रम अपेक्षेपेक्षा उत्तम झाला … म्हणजे प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा !! रात्री साधारण नऊच्या सुमारा भर थंडीत श्री., सौ. आणि चि. प्राजु (असे तिघंही) कार्यक्रमाच्या जागी मला न्यायला आले. कार्यक्रमस्थळापासून त्यांच्या 'कारस्थाना'पर्यंत जाताना थंडीनं जाणवून दिलं की आपण न्यू जर्सीच्या तीनेक तास उत्तरेला आहोत ! अंधारात मी कुठे दिसतोय का ते बघायला जगदीश (म्हणजे श्री. प्राजु) आणि प्राजु (म्हणजे सौ. जगदीश) जरा कुठे गाडीतून उतरले आणि थंडीने एकदम कुडकुडायलाच लागले ! शेवटी एकदाचे सगळे गाडीत बसलो. निघाल्यावर पाच-दहा मिनिटांत अथर्व (चि. प्राजु) छानपैकी पेंगुळला आणि बघता बघता स्वप्नांच्या दुनियेत रमला ! गाडीतली CD ऐकताना तबियत खूषच झाली एकदम. किशोरची 'रिमझिम गिरे सावन…'वगैरे क्लासिक्स सुरू होती ! गाडीत बसल्यापासून आम्ही जे एकमेकांना जोक्स, किस्से सांगायला लागलो अणि चेकाळल्यागत हसायला लागलो ते पार रविवारी संध्याकाळी मी परतीच्या प्रवासाला निघेपर्यंत !
प्राजुच्या घरी आल्यावर तिने लगेच थंडीला उपाय म्हणून मस्त वाफाळती कॉफी केली आणि आम्हा तिघांचा गप्पांचा फड रात्री सव्वाबारापर्यंत जमला. (अरे ! कोणीतरी ह्या प्राजुला सांगा रे.. संध्याकाळी सहानंतर, थंडीचा उपाय म्हणून प्यायला, कॉफीशिवाय बरीच द्रव्ये असतात !)
रविवारी सकाळी उठल्यावर बाहेर बघतोय तर रात्रीत छानपैकी बर्फवृष्टी होऊन सगळीकडे पांढरीशुभ्र चादर अंथरली गेली होती. सकाळी छानपैकी चहा आणि गरम गरम कांदेपोहे खात आमची बडबड सुरूच ! तेवढ्यात जगदीश आणि प्राजुमधे एक पेल्यातलं वादळ झालं की मिसळ 'पुणेरी' करावी की 'कोल्हापुरी' ! जर हा वाद 'संदीपला मिसळ द्यायची की नाही' इथे पोचला तरच आपण त्यात पडावं असा सूज्ञ विचार करून मी गप्प बसलो !! शेवटी 'मिसळ तयार करणारी’ कोल्हापुरची' असल्यामुळे कोल्हापुरी मिसळ ठरली !
साधारण अकराच्या सुमारास चतुरंग - रेवती, शितल - अमर (श्री. शितल) वगैरे सगळे आले आणि सुरू झाला 'कल्ला @ कट्टा'!! मी दुपारी तीनच्या बसने परत जाणार होतो त्यामुळे आधी खाऊन घ्यावं आणि मग जरा गप्पा करत बसावं असं ठरलं. मिसळ-पाव आणि दही-वडे (सौजन्य: प्राजु), मस्तपैकी पुलाव (सौजन्य: शितल) असा बेत होता. त्यावर गोड घास म्हणून 'आंबा घालून केलेली खोबऱ्याची बर्फी' (सौजन्य: रेवती) आणि चॉकलेट बर्फी (सौजन्य: शितल) असा जंगी बेत होता.
त्यानंतर मग, आदल्याच दिवशी मी सादर केलेला, स्टँड अप कॉमेडी प्रयोग पहायची इच्छा सगळ्यांनी प्रकट केली. साधारण १०-१२ मिनिटे मी स्टँड अप कॉमेडी केली. सादर करताना अर्ध्यातूनच कुणी थांबायला सांगितले नाही किंवा हूट आऊट केलं नाही म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणींना हा प्रकार आवडलाय असा सोयिस्कर अर्थ मी घेतला ! (त्याबद्दल अधिक (आणि खरी) माहिती प्राजु, शितल, चतुरंग आणि रेवती देऊ शकतील !)
आता सगळेजण आपापल्या पोतडीतून किस्से, विनोद, चुटके काढायला लागले. कुठेही बघा खिलाडूवृत्तीने जोक्स देण्याघेणारी मंडळी असतील तरच मैफिल मस्त जमते. इथे तर सगळे नुसते चेकाळलेच होते. कोकणस्थ, देशस्थ… इ., जोक्स / किस्से … नुसती धमाल चालली होती. प्राजुला वाटलं की मी देशस्थ आहे. अस्सल (अट्टल (!) नाही) सीकेपी बाणा जपत मी निषेध नोंदवला.
एकंदर सगळी धमाल पाहून जगदीशनं सुचवलं की माझ्या बसचं तिकीट पूर्ण रविवारसाठी चालेल, तीन वाजताच जायची गरज नाही. बस स्टेशनला फोन करून खातरजमा केली आणि म्हणलं चला तीनच्या ऐवजी चारच्या बसने जातो, तेवढा अजून एक तास मिळेल. मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन आम्ही सगळे पुन्हा एकदा उधळलो. हसून हसून पार फुटायची वेळ आली. साधारण पावणेचार वाजता लक्षात आलं की चारची बसही चुकणार ! आता एकदम पाचची बस मिळेल !
मग प्राजु म्हणाली थांबा जरा मी चहा करते ! आम्ही सगळ्यांनी तिलाच विचारलं की मग इतका वेळ आम्ही सगळे कशासाठी थांबलोय असं तुला वाटतंय?
चहाबरोबर अजून थोड्या फुलबाज्या उडवत, एकमेकांना पुन्हा लवकरच भेटायचं ठरवत शेवटी साडेचारच्या सुमाराला निघालो. जगदीश आणि चतुरंग बस स्टेशनपर्यंत सोडायला आले. (जगदीशने त्याच्या कारमधून सोडले म्हणून तो आला आणि चतुरंग बहुतेक हे बघायला आला की मी न्यू यॉर्कच्याच बसमधे बसतोय ना ? !!)
पाचची बस वेळेवर निघाली, जवळपास ठरलेल्या वेळी न्यू यॉर्क शहरात पोचली. मनात म्हटलं चला अधून-मधून बसने प्रवास करायला हरकत नाही. तेवढ्यात आमच्या बसने दुसऱ्या एका गाडीची प्रेमाने विचारपूस केली !! मग काय ! पोलिस येण्यातवगैरे अर्ध्या-पाऊण तासाचं खोबरं. शेवटी मग तात्पुरती दुसऱ्या बसची सोय झाली आणि मी न्यू यॉर्कला पोर्ट ऑथोरिटी इथे पोचलो. त्यानंतर मग न्यू जर्सीची बस पकडून रात्री घरी.
अतिशय सुखद अशा त्या वीकांताच्या आठवणी आता आम्हा सगळ्यांच्या मनात कायम राहतील.
मिसळपाव

नारळाची आंब्याचा पल्प घालून केलेली वडी :

चॉकलेटच्या वड्या :

पुलाव :

मिसळपावचा आनंद घेताना :
डावीकडून : चतुरंग, जगदीश, संदीप, आणि अमर.
संदीप चा उभ्या उभ्या विनोदाचा कार्यक्रम :

सादरीकरणाचे वेळची एक भावमुद्रा :

-संदीप चित्रे.
---------------------------
www.atakmatak.blogspot.com
---------------------------


प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 1:56 am | संदीप चित्रे
ह्या वृत्तांताच्या शेवटी छायाचित्रे लावण्यासाठी प्राजुचे वेगळे आभार :)
12 Dec 2008 - 2:04 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Dec 2008 - 2:24 am | टारझन
कट्टा मस्त झालाय हं ..
आणि फोटू के व ळ . अ प्र ति म .
- टारोबा खेचर
(आम्हाला हलकेच घ्या नाही तर जड जाईल)
12 Dec 2008 - 2:33 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !!
स्टँडप कॉमेडीचे थोडे अधिक अंश वाचायला /ऐकायला मिळाले तर अजून आनंद होईल ! :-)
12 Dec 2008 - 3:07 am | संदीप चित्रे
स्टँड अपचा रिपीट शो करूया ... काय म्हणता ?
12 Dec 2008 - 8:34 am | छोटा डॉन
कट्टा आणि कट्ट्याचे फोटो केवळ " अ प्र ति म " !!!
>> स्टँडप कॉमेडीचे थोडे अधिक अंश वाचायला /ऐकायला मिळाले तर अजून आनंद होईल !
असेच म्हणतो ...
ह्यावर आणखी एक भाग यायला हरकत नाही.
जर शुटिंग केले असेल तर "तु नळीचा दुवा" दिल्यास आणंद होईल ...
संदिपशेठची वर्णनशैली मस्तच, एकदम खुसखुषीत वाटते वाचायला ...
येऊ द्या अजुन ...
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
12 Dec 2008 - 1:42 pm | नंदन
असेच म्हणतो. फोटो आणि वर्णन झकासच. स्टँड अप कॉमेडीचा काही भाग पहायला नक्कीच आवडेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Dec 2008 - 1:55 pm | मनस्वी
सहमत.
12 Dec 2008 - 3:40 am | सहज
संदीप कट्टावर्णन आवडले.
12 Dec 2008 - 3:48 am | रेवती
पुन्हा सगळा शो आणि नंतरची धमाल आठवून अजूनही हसू येतेय.
हे सगळं ऐनवेळी जमवून आणल्याबद्दल प्राजूचे आभार.
संदीपने इतकं हसवलं की मला वाटायला लागलय,
आपल्याला बुवा भ्रमण मंडळ नाही तरी बैठण मंडळ व ग्रहण (खाणे या अर्थी) मंडळ
स्थापन करता येइल.
रेवती
12 Dec 2008 - 3:49 am | मुक्तसुनीत
ग्रहण (खाणे या अर्थी)
तुम्हाला ग्रहण च्या ऐवजी "सेवन" असे म्हणायचे असावे. :-)
12 Dec 2008 - 3:53 am | रेवती
भ्रमणसारखा शब्द असावा
म्हणून तो शब्द तसाच ठेवलाय.
अर्थ सेवन असाच घ्यावा.
रेवती
12 Dec 2008 - 3:55 am | टारझन
णाही हो सुनित भौ ... रेवती काकुंना भ्रमण-बैठण-ग्रहण हा तिय्या जमवायचा असावा ..
भ्रमण-ग्रहण च्या तुलनेत भ्रमण-सेवन नाही चपलख बसतं ... तो लघु-गुरू चा किंवा वृत्ताचा प्रौब्लैम होत असावा.
- टारेवती
12 Dec 2008 - 5:52 am | रेवती
टारगटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय.
टारेवती काय?
रेवती
12 Dec 2008 - 1:19 pm | राघव
अहो तो सद्ध्या फ्रस्ट्रेशन काढतोय सगळीकडे! जास्त टेंशन नाय घ्यायचं!! :D
टार्या, हलकेच घे रे बाबा.. नाय तर मलाच हाणशील धरून!! :)
मुमुक्षु
12 Dec 2008 - 1:35 pm | टारझन
छ्या ... कुठे सगळी कडे ? फ्रस्ट्रेशन काढायला इथे चिक्कार सुविधा आहेतच की ... मी हल्ली सगळ्यांच्याच सह्यांचं विडंबण करतो ... त्यात णविण ते काय ?
नाय हो हाणत बिणत णाय.... एकदा वाइच भेटा फकस्त.
- टारूक्षु
12 Dec 2008 - 3:57 am | मानस
डि.सी. ला आता होऊनच जाऊ दे एखादा कट्टा
प्राजु, काय वाटतं? मुक्तसुनितला विचारतो ...........
तसेही "कोल्हापुरी मिसळ" खाऊन य वर्षे लोटली आहेत. संदीप मकाम (मराठी कला मंडळ ऑफ ग्रेटर वॉशिंग्टन) साठी आता एक कार्यक्रम नक्की
मा
12 Dec 2008 - 8:55 am | संदीप चित्रे
मानस... मला अवश्य कळवा.
आमचा सहा जणांचा ग्रुप आहे स्टँड अप कॉमेडीवाला ... दीड - दोन तासांचा तर कार्यक्रम नक्की करू शकतो :)
12 Dec 2008 - 5:22 am | शितल
खुप खुप हसलो, हसुन (आणी खाऊन ही )फुटलो नाही एवढेच, संदीप ने आम्हाला खुप हसविले आणी रेवती ने ही अगदी मस्त किस्से सांगुन हसुन पुरेवाट केली.
:)
वृत्तांत मस्त लिहिला आहेस रे संदीप. :)
12 Dec 2008 - 8:27 am | रामदास
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसतायत त्या कुणाला ?
(वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हायरस सारख्या पसरत चालल्या आहेत.)
12 Dec 2008 - 8:57 am | संदीप चित्रे
वाढदिवस नुकताच काही दिवसांपूर्वी होऊन गेला होता.. त्यामुळे ते बॅनर दिसतंय.
12 Dec 2008 - 8:57 am | झकासराव
कट्टा मस्त झाला असणार. संदीपचे हावभाव बघुन लक्षात येतय की त्याने केलेला कार्यक्रम फर्मास होता.
खादाडीचे जे फोटु टाकले त्याने लाळ जमा झालीच तोंडात. मिसळ काय,बर्फी काय, पुलाव काय दहिवडे काय सगळच भारी की.
:)
अवांतर : अरे रे!!
मत्य्सप्रेमी संदीप शेठ साठी बोंबील नव्हत का??? ते रात्रीच्या जेवणात आहे अस त्याला सांगितल असत तर त्याने ५ ची बस देखील सोडली असती. ;)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
12 Dec 2008 - 9:00 am | संदीप चित्रे
प्राजुने आधी सांगितलं असतं की रविवारी रात्री बोंबील मिळतील तर लॅपटॉप घेऊनच कनेक्टिकटला गेलो असतो आणि सरळ सोमवारी तिथूनच ऑफिसचं काम केलं असतं :)
12 Dec 2008 - 9:09 am | चित्रा
बरेच रंगत आहेत. वृत्तांत आणि फोटो छान!
12 Dec 2008 - 9:10 am | बिपिन कार्यकर्ते
अरे, तुझ्या स्टँडप कॉमेडीबद्दल जास्त नाही लिहिलंस!!!! हा भाग क्रमशः करून टाक. पुढच्या भागात टाक तुझ्या कॉमेडीबद्दल. :)
बिपिन कार्यकर्ते
12 Dec 2008 - 1:24 pm | राघव
सहमत आहे.
असे कट्टे बघीतले की मी miss केलेले कट्टे आठवतात.. साला छळवाद आहे नुसता ~X(
मुमुक्षु
12 Dec 2008 - 1:02 pm | स्वाती दिनेश
कट्टा मस्त झालेला दिसतो आहेच, रेवतीची ग्रहणमंडळाची आयडीया भारी..
स्वाती
12 Dec 2008 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणखी एक झकास कट्टा ! करा भो मजा करा !
सगळ्यांच्याच आयुष्यात असे आनंदाचे क्षण कुठे पेरलेले असतात.
-दिलीप बिरुटे
(नोकरी एके नौकरी, आणि घर एके घरवाला )
12 Dec 2008 - 10:20 pm | यशोधरा
एकूण भन्नाट धमाल चाललीये तर!! :)
12 Dec 2008 - 11:03 pm | विसोबा खेचर
आपुलकीने एकत्र जमलेल्या मिपाकरांचे फोटू पाहिले, खादाडीचे फोटू पाहिले, दिल खुश झाला! :)
आता आम्ही समाधी घ्यायला मोकळे!
अरे शक्तिवेलू, ही आपुलकीच मी तुला समजवायचा अनेकदा प्रयत्न केला रे! पण प्रत्येक वेळेला तुझा शिष्ठपणा नडला! :(
असो,
मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जगवा! आपुलकीने एकमेकात मिसळा, चार घटका सुखाच्या घालवा!
हाच श्री संत तात्याबांचा मराठी आंतरजालाला संदेश..!
आपला,
तात्या.