नाव वाचून आश्चर्य वाटलं असेल,पण हा किल्ला म्हणजे आपल्या रत्नागिरीतल्या हर्णे बंदराजवळ असलेला आपल्याला परिचित असा सुवर्णदुर्ग नसून, लंडन मधल्या ग्रीनविच मध्ये असलेला सुवर्णदुर्ग आहे.
किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे
याची कहाणी सुरु होते कोकण किनार्याजवळ असणार्या आपल्या मराठ्यांच्या सुवर्णदुर्ग पासूनच. अठराव्या शतकात शाहू छत्रपती गादीवर आल्यानंतर मराठ्यांची सत्ता सार्वभौम झाली व भारतभर पसरली, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आली.कान्होजींचा मृत्यू १७२९ साली झाला आणि त्यानंतर संभाजी आंग्रेकडे कारभार आला, संभाजी आणि पेशव्यांच्यात झालेल्या १७४० सालच्या झटापटीत संभाजी जखमी होऊन मृत्यू पावला, त्यामुळे त्याच्या भावाने म्हणजे तुळाजीने पेशव्यांशी वैर धरले, १७४२ साली तुळाजीला अंजनवेल किल्ला घेतल्याबद्दल शाहू छत्रपतींनी सरखेल पद बहाल केले. शाहू छत्रपतींच्या हयातीत त्यांनी तुळाजी आणि मानाजी आंग्रे यांच्या कारभारावर अंकुश ठेवला, दुर्दैवाने शाहूंचे १७४९ साली निधन झाले.
सरखेल कान्होजी आंग्रे
संभाजी आंग्रे, पायरेट्स ऑफ कॅरेबियन -३ मध्ये दाखवण्यात आलेले.
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला, सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला. सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व, प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली, इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते. इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
कप्तान विलियम जेम्स
इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते, ७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले. अशा प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले. २ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
या लढाईत गाजवलेल्या दैदिप्यमान पराक्रमामुळे आणि कंपनीच्या व्यापारातला मोठा अडथळा दूर केल्यामुळे इंग्रजांनी कप्तान जेम्स ला चीफ कोमोडोर पदी बढती दिली आणि त्यानंतर इस्ट इंडिया कंपनीचा संचालक हि बनवले. सुवर्णदुर्ग ची कामगिरी विलियम जेम्स च्या आयुष्यातली सर्वात महत्वाची ठरली. त्याने १७५९ साली आपले बस्तान भारतातून लंडन येथे हलवले, कप्तान म्हणून भारतात आलेला जेम्स चारच वर्षात गर्भश्रीमंत बनून लंडन ला गेला. तेथे गेल्यावर कॉर्न्वाल येथून तो खासदार म्हणून निवडून आला.१७७८ साली ब्रिटनने त्याला 'सर' हा मानाचा किताब दिला.
कप्तान जेम्स ते सर विलियम जेम्स हा आपला प्रवास सुवर्णदुर्ग च्या कामगिरीनेच झाला याची वाच्यता विलियम जेम्स नेहमी करत असत,त्यांच्या हृदयात या किल्ल्याविषयी एक वेगळे आणि महत्वाचे स्थान होते. हा किल्ला आपल्यायेथे हि असावा हि त्यांची मनापासून इच्छा होती, दुर्दैवाने डिसेंबर १७८३ साली त्यांचा मृत्यू झाला पण त्यांची हि इच्छा त्यांची पत्नी लेडी एनी जेम्स यांनी पूर्ण केली. २ एप्रिल या सुवर्णदुर्ग जिंकल्याच्या तारखेदिवशीच १७८४ साली या लंडन मध्यल्या सुवर्णदुर्ग ची पायाभरणी झाली, तत्कालीन प्रसिध्द वास्तूतज्ञ रिचर्ड जप्प यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला उभारला.
लंडन ते पॅरिस दरम्यान चे सर्वात उंच स्थान असलेल्या या सुवर्णदुर्गने दुसर्या महायुद्धात संदेश वहनाची मोलाची कामगिरी बजावली.
१९८८ पासून हा किल्ला नागरिकांसाठी बंद होता, २००२ साली स्थानिक ग्रीनविच कौन्सिल ने एक निर्णय घेऊन हा किल्ला विकायचे ठरवले, परंतु स्थानिक लोकांनी आंदोलन करून सरकारला या किल्ल्याच्या इतिहासाची जाणीव करून दिली आणि कौन्सिल ने आपला निर्णय रद्द तर केलाच आणि या किल्ल्याच्या डागडुजीसाठी,पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी २,५०,००० पौंड एवढी भरघोस रक्कम सुद्धा हेरीटेज फंड मार्फत दिली.
सुवर्णदुर्ग प्रीजर्वेशन ट्रस्ट मार्फत सध्या या किल्ल्याची देखभाल केली जाते.
एका ऐतिहासिक घटनेमुळे उभारली गेलेली लंडनमधील हि सुवर्णदुर्ग ची वास्तू, तिची सरकार आणि स्थानिकांकडून घेतली जाणारी काळजी, देखभाल एका बाजूला आणि याउलट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आपल्या येथील सुवर्णदुर्ग, त्याची होणारी हेळसांड, सरकारचा नाकर्तेपणा दुसर्या बाजूला. सगळंच दुर्दैवी.
किल्ल्याच्या देखभालीसाठी आणि इथला ऐतिहासिक वारसा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सुवर्णदुर्ग प्रीजर्वेशन ट्रस्ट मार्फत प्रयत्न केले जातात -
पहिल्या मजल्यावर एक हेरीटेज कॅफे आहे, जे पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. अनेक शाळांना येथे हेरीटेज वॉक साठी आमंत्रित केले जाते.पर्यटकांसाठी किल्ल्याच्या गायडेड टूर्स ट्रस्ट चे स्वयंसेवक आयोजित करतात.
कार्यक्रमांसाठी किल्ल्याचा काही भाग हा रोयल्टी घेऊन वापरास दिला जातो. किल्ल्यामध्ये एक छोटेखानी संग्रहालय सुद्धा आहे.
मोठ्यांना 2.50 पौंड तर लहान मुलांना 2 पौंड असे टिकिट आहे,
या सर्व उपक्रमातुन मिळणार्या निधि चा वापर हा किल्ल्याची देखभाल आणि दुरुस्तिस केला जातो.
कधी जर लंडन मधल्या ग्रीनविच ला गेलात तर शुटर्स हिल वर असणारा हा किल्ला बघायला नक्की जा, आणि तिथे गेल्यावर शिवरायांचा जयजयकार करायला विसरू नका !
किल्ला कोठे आहे -
सेवेर्नदुर्ग कॅस्टल,
कॅस्टलवूड,शूटर्स हिल
लंडन SE18 3RT
वेब - www.severndroogcastle.org.uk
(लेख पूर्वप्रकाशित महाराष्ट्र टाईम्स येथे)
- मालोजीराव
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 1:33 pm | एस
माहितीपूर्ण लेख.
जे लोक इतिहास जपू शकत नाहीत ते इतिहास घडवूही शकत नाहीत.
6 Aug 2015 - 10:12 pm | सुहास झेले
अगदी अगदी... धन्यवाद ह्या माहितीसाठी ... :)
पायरेट्स परत बघावा लागेल आज :) :)
6 Aug 2015 - 1:33 pm | अमृत
नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.
अवांतर - मूळ किल्ल्याला हानी पोहचू नये म्हणून ती लाकडी कठड्यांची व फरशीची योजना केली असावी काय?
6 Aug 2015 - 9:16 pm | मालोजीराव
तो भाग observation deck म्हणून 1878 साली लंडन शहराचे mapping करण्यासाठी बनवला गेला असावा ...
6 Aug 2015 - 1:35 pm | अजया
माहितीपूर्ण लेख.लंडनवारीत नक्की बघणार हा सुवर्ण दुर्ग.
आपल्याकडच्या अनास्थेविषयी आणि किल्ल्याच्या कथेविषयी न बोलणे श्रेयस्कर!
6 Aug 2015 - 3:13 pm | नाखु
आणि प्रतीसादालाही +१११
6 Aug 2015 - 9:28 pm | प्यारे१
+नाखुन काका लंडनला निघाले. ;)
एन्जॉय करा.
बाकी लेख उत्तम.
सगळ्या ब्रिटीशांनी अशी आठवण ठेवायची ठरवली तर भारतातल्या बर्याच किल्ले, महालांची नावं यु के मध्ये जागोजागी दिसतील यात शंका नाही. चोर साले!
7 Aug 2015 - 1:40 pm | नाखु
माझा लेक किंवा ल्येक मला १५-२० वर्षांनी घेऊन जाणार आहे अस्सा विश्वास आहे !
बाकी पुढे राम जाणे.
मध्यम(वर्गी) मार्गी नाखु
12 Sep 2015 - 2:41 pm | प्यारे१
नक्की जाल ओ. टेन्शन इल्ले.
मला पण आईवडलांना विमानात बसलेलं बघुन 'लै भारी' वाटलं होतं.
6 Aug 2015 - 1:43 pm | प्रचेतस
सुरेख लेख.
ह्याबद्दल आधीपासून थोडेसे माहित होतेच. तुझ्या लेखामुळे सविस्तर माहिती झाली.
6 Aug 2015 - 1:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
संभाजी आंग्रे, पायरेट्स ऑफ कॅरेबियन -३ मध्ये दाखवण्यात आलेले
पाइरेट्स च्या ब्रेदरेन कोर्ट मधे जेव्हा हे पात्र "श्री सुंबाजी वोट्स फॉर श्री सुंबाजी" म्हणते तेव्हाच हे पात्र भारतीय असल्याचे कळले होते त्याचा रेफेरेंस दिल्याबद्दल धन्यवाद आपले!!
6 Aug 2015 - 2:37 pm | मालोजीराव
चित्रपटात संभाजी आंग्रे हे पात्र पाहून अभिमान वाटला…पण त्यांचा उल्लेख पायरेट लॉर्ड केलाय हे चुकीचं वाटलं
6 Aug 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा
+१
6 Aug 2015 - 9:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
+१, पण दादा शेवटी सगळे सापेक्ष!! कोणाचे लुटारु ते कोणाचे योद्धे एंड वाईस वर्सा म्हणायचे अन सोडायचे अजुन आपल्या हाती काय असते म्हणा!
6 Aug 2015 - 10:30 pm | एस
संभाजी आंग्र्यांवरून ते पात्र बेतलेय का याबद्दल थोडा साशंक आहे. पात्राचा पेहराव इ. पंजाबी धाटणीचा आहे.
7 Aug 2015 - 12:43 pm | मालोजीराव
चित्रपटातल्या ब्रेथ्रेन कोर्ट चे सदस्य म्हणून जी नावे दिलीयेत त्यात "संभाजी आंग्रे " असेच नाव आहे :)
Ammand
Chevalle
Sumbhajee Angria
Ching
Jocard
Elizabeth Swann
Hector Barbossa
Eduardo Villanueva
Jack Sparrow
Edward Teague
Ragetti
Prison Dog
17 Sep 2015 - 7:15 pm | प्रचेतस
संभाजी आंग्रे हे पात्र संभाजी महाराजांवर बेतलेले नसून प्रत्यक्षात अस्तित्वात होऊन गेलेल्या व्यक्तीवर आधारित आहे असे मला वाटते.
कान्होजी आंग्रे ह्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा सेखोजी हा आरमारप्रमुख झाला. ह्या सेखोजीने पेशव्यांसोबत (बाळाजी विश्वनाथ भट) जंजीऱ्याच्या स्वारीत भाग घेतला होता. सेखोजीच्या निधनानंतर आंग्र्यांच्या दोन मुलांमधे सत्तेवरुन यादवी माजली. ह्या सेखोजीची ही दोन मुले म्हणजे मानाजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे.
शाहूराजांनी मानाजीला कुल्याब्याचा (अलिबागचा किल्ला) प्रदेश दिला तर संभाजीला सुवर्णदुर्गाचा.
ह्यानंतर संभाजी आंग्रे ह्याच्या मृत्युनंतर त्याचा सावत्रभाऊ तुळाजी आंग्रे ह्याने सुवर्णदुर्ग बळकावून आंग्र्यांच्या आरमारी सत्तेवर प्रभुत्व मिळवले. तुळाजी आरमारी सामर्थ्यामुळे पेशवे आणि खुद्द शाहूमहाराजांनाही जुमानेनासा झाला. अखेर पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेउन घेरीयानजीक तुळाजीचे आरमार बुडवले व मराठी आरमाराची दुर्दैवाने इतिश्री झाली.
हे आंग्रे समुद्रावर प्रचंड शक्तिशाली होते. परकीय जहाजांकडून ते चौथ वसूल करत. आंग्र्यांचे दस्तक असल्याशिवाय बाहेरील जहाजांना इथल्या समुद्रात प्रवेश नसे. हे दस्तक नसलेल्या किंवा चौथाईस नकार देणाऱ्या जहाजांची लुटालुट करावी असा कान्होजीचा हुकूम होता. सिद्दी, फ़िरंगी, टोपीकर अशा आरमारी सत्ता ह्या आंग्र्यांना भिवून असत. साहजिकच चौथ न देणाऱ्या जहाजांना लुटणाऱ्या आंग्र्यांना समुद्री चाचे अथवा पायरेट्स ठरवले गेले.
6 Aug 2015 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
या महत्वाच्या नवीन माहितीसाठी अनेक धन्यवाद !
एका ऐतिहासिक घटनेमुळे उभारली गेलेली लंडनमधील हि सुवर्णदुर्ग ची वास्तू,तिची सरकार आणि स्थानिकांकडून घेतली जाणारी काळजी,देखभाल एका बाजूला आणि याउलट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आपल्या येथील सुवर्णदुर्ग,त्याची होणारी हेळसांड, सरकारचा नाकर्तेपणा दुसर्या बाजूला.सगळंच दुर्दैवी.
+१०००
6 Aug 2015 - 2:08 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते. लेख आवडला.
10 Sep 2015 - 6:41 am | चाणक्य
.
6 Aug 2015 - 2:04 pm | द-बाहुबली
मस्त माहिती. अभिमानास्पदच.
6 Aug 2015 - 2:10 pm | सूड
मस्त माहिती!!
6 Aug 2015 - 3:01 pm | शलभ
मस्त माहिती..आवडला लेख..
6 Aug 2015 - 3:04 pm | वेल्लाभट
क्लासच आहे ! नेव्हर न्यू ! वाह
6 Aug 2015 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले
मस्तच !
6 Aug 2015 - 3:14 pm | सानिकास्वप्निल
मस्तं माहितीपूर्ण लेख.
ग्रीनीचला भेट दिली तर हा किल्ला नक्कीच बघणार :)
धन्यवाद.
6 Aug 2015 - 3:15 pm | अनुप ढेरे
छान आहे लेख. आवडला!
6 Aug 2015 - 3:21 pm | कपिलमुनी
शशकच्या त्सुनामीमध्ये वेगळा लेख !
6 Aug 2015 - 4:02 pm | नि३सोलपुरकर
मालोजीराव, नवीन माहितीसाठी अनेक धन्यवाद !
अवांतर : कपिलमुनी ह्यांच्याशी १००% सहमत .
6 Aug 2015 - 9:10 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख आवडला,
स्वाती
6 Aug 2015 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी
ऐतिहासिक व माहितीपूर्ण लेख खूप आवडला.
युरोपातल्या ऐतिहासिक वास्तूंविषयी जाणिवा पाहिल्या की आपल्याकडच्या परिस्थितीचा विषाद वाटतो. अरबी समुद्रात कृत्रिम बेट उभारून छत्रपतींचे स्मारक उभारण्याऐवजी सुवर्णदुर्गसारखे ऐतिहासिक वारसे जपले जाणे महत्वाचे.
वारसे जपण्याचे काम यशस्वीपणे झाल्यावर व कायमस्वरुपी प्रक्रीया रुळल्यावर जर अशी स्मारके उभारली गेली तर त्यांचे स्वागतच असेल.
7 Aug 2015 - 5:02 am | जुइ
लेख आवडला. आपल्याकडल्या ऐतिहासिक वास्तू जपाच्या आस्थे बाबतीत न बोलेलेच बरे.
7 Aug 2015 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा
जय हो मालोजिबाबा की! लेख आवडला.
7 Aug 2015 - 8:29 am | विशाखा पाटील
छान लेख!
7 Aug 2015 - 10:02 am | अदि
माहितीपूर्ण लेख!!
7 Aug 2015 - 12:21 pm | पद्मावति
खूपच सुरेख आणि अनोखी भटकंती. तुमच्यामुळे इतक्या छान ठिकाणाची माहिती कळली त्याबदद्ल तुमचे आभार. इथे नक्कीच जाणार.
7 Aug 2015 - 3:28 pm | जडभरत
मस्तच! खूप नवीन माहिती मिळाली!! धन्यवाद!!!
7 Aug 2015 - 4:24 pm | आदूबाळ
हम्म.
जनरल आर्थर वेल्स्लीची (नंतरचा ड्यूक ऑफ वेलिंग्टन) आठवण झाली. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात कोणा पत्रकाराने त्याला "तुझी अविस्मरणीय लढाई कोणती?" असा प्रश्न विचारला. सर्वांना वॉटर्लू असं उत्तर अपेक्षित होतं. पण वेल्स्लीने मात्र "असईची लढाई" असं उत्तर देऊन सगळ्यांना चकित केलं होतं.
7 Aug 2015 - 6:04 pm | किसन शिंदे
लेख आवडला मालोजीराव. मटात वाचला होताच, इथे पुन्हा वाचला.
9 Sep 2015 - 5:15 pm | नया है वह
लेख आवडला
9 Sep 2015 - 11:49 pm | बोका-ए-आझम
इतिहास जपावा तर ब्रिटिशांनी आणि वारसा विद्रूप करावा तर आपण असं दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आलेली आहे.
10 Sep 2015 - 5:43 pm | अरविंद कोल्हटकर
ह्याच विषयावर १८ जुलै २०११ ह्या दिवशी 'उपक्रम' ह्या जुन्या संस्थळावर मी लेख लिहिला होता. ते संस्थळ कधीकधी उघडते पण सध्या बंद दिसते म्हणून त्याची लिंक देता येत नाही.
वर दिलेल्या माहितीशिवाय त्यात हेहि लिहिले होते. 'सेवर्नद्रुग'च्या संस्थळावर आंग्रे हे 'चांचे' असल्याचा उल्लेख त्यावेळी होता. आंग्रे हे खरे कोण होते आणि त्यांना चांचे म्हणणे कसे चूक आहे हे मी ह्या इमारतीच्या सध्याच्या संचालकांना लिहिले होते आणि त्याची योग्य दुरुस्तीहि करायला सांगितले होते. आनंदाची गोष्ट अशी की संचालकांनी ह्या तपशीलाची नोंद घेतली आहे आणि मजकुरात योग्य ती दुरुस्ती केली आहे असे त्यांचे उत्तरहि मला मेलने आले.
10 Sep 2015 - 8:40 pm | मालोजीराव
होय त्यांनी वेबसाईट मध्ये बर्याच सुधारणा केल्यात आणि बरेच स्वयंसेवक सुद्धा नेमलेत.
तिथला डेव म्हणून एका स्वयंसेवकाशी ओळख झाली त्यालाही आंग्रे घराण्याचे इतिह्सातील स्थान सांगितले, INS आंग्रे बद्दल हि सांगितलं.ते आंग्रेंच्या बद्दल अजून माहिती मागितली आहे त्यांच्या सुवर्णदुर्ग (Severndroog) हेरीटेज वॉक मध्ये सांगण्यासाठी.
10 Sep 2015 - 8:34 pm | खटपट्या
अप्रतीम लेख.
11 Sep 2015 - 4:00 pm | इशा१२३
छान लेख.आवडला.आपल्याकडे ऐतिहासिक वास्तु कधी जपल्या जाणार देव जाणे.
11 Sep 2015 - 4:01 pm | सस्नेह
रोचक माहितीपूर्ण लेख.
11 Sep 2015 - 5:58 pm | विवेकपटाईत
राजस्थान मध्ये गड किल्याना जपले आहे. पण महाराष्ट्रात (इथे कुणी मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा आहे का?). याच किल्याना जपल आणि पर्यटन वाढविले तर महाराष्ट्राच्या वीरांचा इतिहास भारतीय जनतेला कळेल. लोक शिर्डीला येतात, आणि परत जातात. महाराष्ट्रात पाहण्यासाठी काही आहे, त्यांना माहित नसते.
पण काय करणार महाराष्ट्र भूषण आपण जातीच्या चष्म्यातून पाहतो. ऐतिहासिक वारसा जपण्याची संभावना कमीच.
12 Sep 2015 - 8:28 pm | मालोजीराव
महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या संवर्धनात सर्वात मोठा अडथळा अतिभावनिक शिवप्रेमींचा आणि किल्ल्याचंही राजकारण करणाऱ्या नेत्यांचा आहे.
रोपवे,किल्ल्यांपर्यंत रस्ते होण्यास अनेक गडप्रेमी संस्थांचा विरोध आहे. त्यामुळे सीएसआर तत्वावर किल्ले घेण्यास कोणी संस्था,उद्योगपती उत्सुक नाही.
राज्यासमोर सध्या अनेक समस्या असल्याने शेतकऱ्यांच हित आणि त्यांना मदत जास्त अपेक्षित आहे सरकारकडून,त्यामुळे किल्ले संवर्धनासाठी सरकारकडून निधीची अपेक्षा ठेवणे सध्यातरी संयुक्तिक ठरणार नाही.
11 Sep 2015 - 9:02 pm | खटपट्या
खालील लींकवर या कील्ल्याचे दर्शन घडते..
https://www.google.co.in/maps/place/Severndroog+Castle/@51.4664559,0.0601689,128m/data=!3m1!1e3!4m2!3m1!1s0x47d8a91b6a781c09:0xd16e8141f194254e!6m1!1e1?hl=en