च्यानेलांचे जाहिरातप्रदूषण

सामान्यनागरिक's picture
सामान्यनागरिक in काथ्याकूट
25 Jul 2015 - 3:17 pm
गाभा: 

मी थेट-घरात ( आंग्ल भाषेत – डीटीएच) दूरदर्शन सेवेचा एक ग्राहक आहे. साधारण सातेक वर्षांपूर्वी मी ही सेवा घेतली. त्यावेळी खासगी च्यानेले अगदी भरात आलेली होती. मलाही त्यावळी ही सेवा घेतल्याचा आनंद झाला. अर्थात खासगी च्यानेले म्हणजे जाहिराती असणारच. आणि त्यावेळी तीस मिनीटांच्या कार्यक्रमात किंवा मालिकेच्या भागात आठे ते दहा मिनीटांच्या जाहिराती असायच्या. बरेच वेळा त्या नको तेंव्हा चालु व्हायच्या पण मालिकेचा भाग कोणता आणि जाहिराती कोणत्या हे नक्की ओळखु यायचे. संध्याकाळ्चे कार्यक्रम बघतांना आमची सौ. बरोबर त्या वेळेस उठुन खिचडी टाकायची आणि पुढच्या जाहिरातीच्या ब्रेक मधे कुकरच्या खालचा ग्यास बंद करायची. मालिकेचा तो भाग संपता संपता कुकर थंड झालेला असायचा आणि पुढची मालिका सुरु व्हायच्या आधी आमच्या खिचडी, पापडाचे ताट असायचे. असे आमचे जीवन सुखेनैव चालु होते.
हळू हळू या जाहिरातींचे कार्यक्रमाच्या वेळेवर होणारे आक्रमण वाढु लागले. हल्ली तर असे लक्षात आले आहे की काही काही मालिकेच्या भागांमधे सतरा मिनीटांच्या जाहिराती आणि केवळ तेरा मिनीटांचा मालिकेचा भाग असतो ज्यात पात्रे एकदम हळु हळु संवाद बोलुन कसेतरी तेरा मिनीटे भरण्याचा प्रयत्नं करत असतात.
त्यात भर म्हणुन की काय हल्ली खालील प्रकारच्या जाहिराती पण चालु झाल्या आहेत.
१. दूरदर्शन संचाच्या पडद्याच्या खाली असलेली एक सरकती पट्टी. यात वंध्यत्व निवारणापासून तर दिव्य औषधींपर्यंत सगळ्या जाहिराती असतात.
२. त्यात भर म्हणुन काहीतरी ब्रेकींग न्युज किंवा खास घोषणा केल्यासारखे ( वर वर्णन केलेल्या) जाहिरात पट्टीच्यावरचा काही भाग व्यापुन काही जाहिराती येतात.
३. कधी कधी पडदा छोटा करुन डाव्या बाजुची उभी पट्टी आणि खालच्या बाजुची आडवी पट्टी या जागेत जाहिराती येतात
४. भरीस भर म्हणुन पडद्याच्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यामधे एखादी छोटीशी लुकलुकती प्रतिमा असते जी अचानक खाली किंवा मध्यभागी येउन मोठी होते आणी जाहिरात झळकु लागते.
अर्थात खासगी चित्रवाणी म्हंटले की जाहिराती असणारच हे मान्य. त्यातुनच त्यांना उत्पन्न मिळते आणि त्यातुनच मालिका बनतात हेही मान्य. पण गेल्या काही वर्षांत त्यांचेही उत्पन्न काही पटींनी वाढले आहे. प्रेक्षक-ग्राहक म्हणुन आपल्याला काही हक्क आहेत की नाही ? जेंव्हा मी ही सेवा घेतली तेंव्हा काही मिनीटे तरी अखंड कार्यक्रम पाहाण्याचा निखळ आनंद मिळत होता. आज पडद्याच्या सगळ्या भागांवर जाहिरातींची आक्रमण होऊ लागलेले आहे. कधी कधी तर पडद्याच्या कोणत्या भागात आपल्याला हवा असलेला कार्यक्रम चालु आहे हे बारकाईने पहावे लागते.

आपण पैसे देऊन या सेवा घेत असतो. तेंव्हा मला कार्यक्रमाच्या इतके टक्के भाग जाहिरातींविना शांतपणे पहाता आला पाहिजे अशी मागणी आपण करु शकतो का ? हे च्यानेलांना बंधन कारक ठरु शकत नाही का? आज सरकारी सेवांना सुद्धा सेवा-हमी कायदा लागु होत आहे तेंव्हा या बद्दल आपण प्रेक्षकांनी जागरुक व्हायला नको का ? च्यानेलांनी या बद्दल काही हमी द्यायला हवी की नको ? की सगला मामला ’ हा आमचा धंदा आहे, आम्ही काही आमची सेवा घेण्य़ासाठी जबरदस्ती केलेली नव्हती. बघायचं असेल तर बघा नाहीतर आपला संच बंद करुन हरी पाठ म्हणत बसा ’ असा आहे ?
या संदर्भातील कायदेशीर जाणकार या बद्दल काही प्रकाश टाकु शकतील का ?

प्रतिक्रिया

सहमत आहे. एकतर जाहिराती दाखवायचं बंद करा नाहीतर चॅनेल 'फ्री-टू-एअर' करा.

द-बाहुबली's picture

25 Jul 2015 - 3:34 pm | द-बाहुबली

इंटरनेट हाच यावर सर्वोत्तम उपाय बनुन जाणार आहे. तसही मी रोडीज नेटवरच बघतो ब्रेक/जाहीरातीचा वांदाच निर्माण होत नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा

रोडीज??/ इतका भिकार कार्यक्रम तर बघायलाच नको कुठेही

द-बाहुबली's picture

25 Jul 2015 - 5:02 pm | द-बाहुबली

मला रोडीज आवडतो. पण रघु गेल्या पासुन मजा नाही. अतिशय रटाळ सिजन झाला ह्या वेळचा. चायनेल वी चे दिल दोस्ती/ वेब्ड वगैरे जास्त बरे म्हणाय्ची वेळ आली इतर सिजन मात्र जाम धमाल आली बघायला. रणविजयबद्दलही आदर आहे त्याने आधी शॉर्ट- सर्वीस- कमीशन केले मग टीवीवर आला. देशभक्तच तो.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2015 - 4:22 pm | प्रकाश घाटपांडे

जेव्हा जाहिरातींचा परिणाम उलटा होतो आहे हे जेव्हा उत्पादकांना समजेल त्यावेळि हा प्रकार कमी होईल.तिडिक आणणार्‍या जाहिरातीतील उत्पादेन घेउ नका व इतरांनाही घेण्यापासून परावृत्त करा अशी एक जाहिरात सोडून द्यायची जनहितार्थ.

पैसा's picture

25 Jul 2015 - 4:26 pm | पैसा

काय बघणार त्यावर? बातम्या बकवास. त्या बातम्यांवरचे अर्णव गोस्वामी, वागळे इ. चे कार्यक्रम म्हणजे कोण मोठ्यांदा ओरडतो याची स्पर्धा. क्रिकेट अन डब्लूडब्लूएफ सारखेच. कौटुंबिक सीरियल्स विनोदी सुद्धा वाटत नाहीत आता. बंद असलेला टीव्ही सगळ्यात बेश्ट.

पद्मावति's picture

25 Jul 2015 - 4:33 pm | पद्मावति

यावर बेस्ट उपाय म्हणजे आपले आवडते कार्यक्रम रेकॉर्ड करून आपल्या सोयीच्या वेळेस बघायचे. जाहिराती सोडल्या तर मूळ एपिसोड हा फक्त पंधरा- सोळा मिनिटांचाच असते. त्यामुळे रेकॉर्डिंग झालं की अर्धा पाऊण तासात दोन तीन मालिका बघून होतात.

संजय पाटिल's picture

25 Jul 2015 - 6:13 pm | संजय पाटिल

+१११ सहमत
अलिकडे Recording ची सुवीधा असणारे थेट घरात संच मिळतात बाजारात.

एक प्रदर्शनिय वस्तू असाच होत असल्याने, तुमच्या तक्रारीबद्दल जास्त काही सांगता येणार नाही.

सदस्यनाम's picture

25 Jul 2015 - 5:13 pm | सदस्यनाम

मला लई आवडतेत झैराती बघायला. मस्त असतेत कार्यक्रमापेक्षा.

शि बि आय's picture

26 Jul 2015 - 5:13 pm | शि बि आय

जाहिराती बघायला आवडतात पण सगळ्यात डोकं फिरत ते गोरेपणाच्या क्रीम च्या जाहिराती बघून…
७ दिवसात त्वचा गोरी काय दिसते, डाग, मुरमे गायब काय होतात आणि सगळ्यात कहर म्हणजे सावळी मुलगी गोरी झाल्यामुळे तिला तिचे घरचे देखील ओळखू शकत नाहीत...

वेल्लाभट's picture

27 Jul 2015 - 4:17 pm | वेल्लाभट

लौल !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jul 2015 - 7:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे तर काहीचं नाही. मी आधी टीव्ही बघत नाही आणि चुकुन माकुन जेवायला बसलोचं आणि टीव्ही चालु असेल त्यावेळी तर तो संडासघास्या हार्पिकवाला दुसर्‍यांचे संडास घासताना दिसतो.

अगदीच १०-१२ वर्षांचा होतो तेव्हा सहकुंटुंब सहपरिवार टिव्हीसमोर बसलेला असताना बरोब्बर त्याचवेळेला कुटुंबनियोजनछाप झैरातींचा बरोबर मारा चाललेला असायचा. साला ते "प्यार हुआ इकरार हुआ.." वालं अत्यंत आवडतं गाणं चारचौघात म्हणायची सोय राहिली नाही.

माझ्या एका मित्राच्या आजोबांनी, "आमचा सागर बघा गाणं कसं छान म्हणतो. बाळा ते मावशी-काका आलेत त्यांना छान गाणं म्हणुन दाखव" म्हणल्यावर प्यार हुआ इकरार हुआ सुरु करुन डिलक्स वगैरे उत्तरार्धही मिनिटभरात उरकला होता. आजोबांची कवळी पडायला आलेली पार. बेक्कार धुलाई झालेली त्याची त्यादिवशी. दुसर्‍या एकानी त्या प्रोडक्टचं इंग्रजी नाव थेट इंग्लिशच्या बाईंना भर वर्गात विचारुन झीट आणलेली.

बाकी ते गोरं करणार्‍या क्रीमच्या झैरांतींमुळे गोरं ते सुंदर असा लोकांचा गैरसमज झालाय. :(

खटपट्या's picture

28 Jul 2015 - 12:31 pm | खटपट्या

ये तो बडा टाईट है !! आठवतंय का ?

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 2:57 pm | पगला गजोधर

टाईट नव्हे

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2015 - 2:58 pm | टवाळ कार्टा

टॉइंग टॉईंग

स्रुजा's picture

31 Jul 2015 - 10:07 am | स्रुजा

रोफलले मी प्रतिसाद वाचुन. हार्पिक बद्दल अगदी सहमत. गचाळ पणा करतात अगदी.

बाकी ते गोरं करणार्‍या क्रीमच्या झैरांतींमुळे गोरं ते सुंदर असा लोकांचा गैरसमज झालाय. :(

हे फार आधी पासून आहे हो , जाहीरातींचं युग नंतर आलं. पण एक आहे , आपल्या कडच्या जाहिराती फार कल्पक असतात. कशाचं बंबार्डींग किती करायचं याचा विवेक नाहीचे पण ज्या कुटुंबाबरोबर बघता येतात त्या बाकीच्या जाहीरातींपैकी खुप सार्‍या कल्पक असतात. कॅनडामधल्या जाहीराती इतक्या रद्दी आणि बकवास असतात की डॉक्युमेंटरी परवडली.

सामान्यनागरिक's picture

27 Jul 2015 - 4:39 pm | सामान्यनागरिक

सवाल जाहिराती चांगल्या अस्तात की वाईट हा नाही. आपण से काही पैसे देतो ते कार्यक्रम बघण्यासाठी. त्याबरोबर थोड्या जाहिराती बघू. पण हे प्रमाण वाढत चाललं आहे .

प्रेक्षक म्हणून आपले काही हक्क आहेत की नाहीत? आपण ह्यांना कोर्टात खेचु शकतो का ?

भाते's picture

27 Jul 2015 - 5:04 pm | भाते

तुम्ही कधी मराठी वाहिन्यांवरच्या (भाषांतरीत) मराठी जाहिराती पाहिल्या आहेत का? आजकाल सगळ्या हिंदी जाहिरातीमध्ये अर्धे हिंदी आणि अर्धे इंग्रजी शब्द वापरलेले असतात. इतर भाषेत त्या भाषांतरीत जाहिराती दाखवताना मुळ जाहिरातीमधले इंग्रजी शब्द तसेच ठेऊन फक्त हिंदी शब्दांचे भाषांतर केले जाते. मागे कुठलीतरी साबणाची जाहिरात होती. बहुदा लाईफबॉय. आई म्हणते, "रोहन, पेहले नाहाकर आओ." पोरगा म्हणतो, "नो (इंग्रजी) पसीना (हिंदी)." मराठीत ती जाहिरात दाखवताना "नो घाम." असे भाषांतर केले होते. डोक्यात जातात असल्या जाहिराती. एकतर हिंदी जाहिरात दाखवा किंवा पुर्ण जाहिरात मराठीत दाखवा.
अशीच ती डेटॉलची जाहिरात. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आणि नर्स काय गाण म्हणतात. लग्नात लहान पोरं काय गाण म्हणतात. अरे काय चालवलंय!

यावर उपाय म्हणजे ती मालिका आंजावर किंवा तुनळीवर बघायची. एक तासाची सीआयडी मालिका ४०-४५ मिनिटांत बघुन होते.

बाकी जाऊ देत, पण दररोज खिचडी?

सामान्यनागरिक's picture

28 Jul 2015 - 12:03 pm | सामान्यनागरिक

अहो पन्नाशी नंतर हे असंच असतं.
रोजची संध्याकाळ खिचडी किंवा तत्सम पदार्थ खावे
लागतात. पण आमची सैों त्याचे असंख्य प्रकार करते .
आता हल्ली सौ. मॅगीबाई नेसलें नसतात साथ दयायला, नाहीतर आठवडयातून दोन वेळस त्याही असायच्या.

gogglya's picture

30 Jul 2015 - 6:50 pm | gogglya

खिचडी च्या पाकृ येउद्या की...

मुविंसारखेच म्हणते. आमच्याकडे भारतीय किंवा हामेरिकन च्यानेले नसल्याने हा त्रास रोज नसतो. पण ज्येष्ठ नागरिक जेंव्हा सिरिय्ल्स बघतात तेंव्हा हा अनुभव थोडाफार येतो. मालिका वेळेनंतर बघितल्यामुळे जाहिराती नसतात पण मध्येच पुढील कार्यक्रमाची नावे येतात तेंव्हा 'पुढील कार्यक्रम' असे लहान अक्षरात येऊन चालू कार्यक्रमात एक वलय, प्रकाशकिरण असे येतात व त्यातून पुढील कार्य्क्रमाचे नाव दिसते. आता चालू कार्यक्रमात मनुष्य पडद्यावर बोलतोय तर त्याच्या छातीतून एकदम सूर्यकिरण कसा काय? असा गोंधळ दोन तीनदा झालाय. एकंदरीतच मालिका आवडत नाहीत, तेवढा संयम नाही. आमच्या मातोश्रींबद्दल आदर आहे. घरातील कामे वेळेवर उरकून आज अमक्याचे लग्न तमक्याशी आहे किंवा आजच्या एपिसोडात जान्हवीचा ड्रेस/साडी/कानातले/गळ्यातले/केसातले चांगले आहे वगैरे प्रकारात कमालीचा रस असतो.

ब़जरबट्टू's picture

28 Jul 2015 - 2:52 pm | ब़जरबट्टू

या जाहिरातीचा वेळ तासाला जास्तीत जास्त १२ मिनिटे असावा, असा कोर्टाचा निर्देश ( का मार्गदर्शक ) आला होता असे स्मरते. आता लिंक नाही आहे, पण शोधतोय. .
HBO ad free घ्याच आता :)

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 4:00 pm | संदीप डांगे

चालू कार्यक्रमात कोणत्याही पद्धतीने (स्ट्रिप, फ्लोटींग, स्पॉट) जाहिरात करणे हे मार्गदर्शक नियमांविरुद्ध आहे. त्याविरूद्ध चॅनेलवाल्यांना कोर्टात खेचल्या जाऊ शकते. आपल्याकडे हे सगळं धाब्यावर बसवण्याची पद्धत आहे म्हणून अत्याचार सूरु आहे.