पावसाळा आणि पोट बिघडणे
अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे या लेखातील काही शंका आणि त्याबद्दलचे चर्वित चर्वण याबद्दल हा लेख.
पोट पावसाळ्यातच जास्त का बिघडते. याचे कारण आपल्या पिण्याच्या पाण्यात आहे.
पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचे तीन मापदंड आहेत.
१)भौतिक (PHYSICAL).-- यात पाण्याचे दृश्य स्वरूप म्हणजे पाणी स्वच्छ आणी पारदर्शक आहे कि त्यात काही दृश्य पदार्थांचे मिश्रण आहे ( गढूळ पणा) म्हणजे आपण माती मिश्रित पाणी उकळले तर ते पोटास चालेल पण दिसण्यात चालणार नाही.
२)रासायनिक ( CHEMICAL). -- यात पाण्यात वेगवेगळी रसायने मिश्रित असतील परंतु बाहेरून पाणी स्वच्छच दिसेल. जसे मचूळ पाणी असते ज्यात वेगवेगळे क्षार मिसळलेले असतात पण पाणी स्वच्छ दिसते. पाण्यात किटकनाशके मिश्रित असतील तरीही पाणी दिसायला स्वच्छच दिसेल.
३) जैविक ( MICROBIOLOGICAL) -- स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यात जर बाह्य घाण (शेण, विष्ठा इ) मिसळली असेल तर त्यात जीवाणू असू शकतात.आणि या जंतूंमुळे आपल्याला रोग होतो. याचे सूक्ष्म पृथक्करण केलें असता जर यात कोलीफॉर्म जीवाणू सापडले तर त्यात जैविक प्रदूषण झालेले आहे असे समजले जाते याचे कारण हे कोलीफॉर्म जीवाणू फक्त प्राण्यांच्या मोठ्या आतड्यात आढळतात.
या पाण्याचे शुद्धीकरण कसे केले जाते-- मोठ्या शहरात जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. उदा मुंबईत भांडूप संकुल किंवा पुण्यात पर्वती किंवा पुलगेट येथे हि जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. मूळ धरणातून पाणी येथे आणले जाते आणि ते २४ तास तुरटीचे द्रावण टाकून ठेवले जाते यामुळे या पाण्यातील गढूळ पणा त्यातील जीवाणू सोबत खाली बसतो.या मुले पाण्यातील ९० -९५% जीवाणू बाहेर टाकले जातात. मग खालचे १० टक्के पाणी सोडून वरचे ९० टक्के पाणी दुसर्या गाळणी( slow किंवा fast SAND FILTER)तून गाळले जाते. यात उरलेले ५-१०% जीवाणू गळले जातात आणी जवळ जवळ शुद्ध पाणी पुढे पाठवले जाते आता याच्या पुढे त्यात क्लोरीन वायू मिसळला जातो. पाण्यातील संपूर्ण जीवाणू नष्ट होईपर्यंत हा वायू मिसळतात आणी त्यानंतर पुढे पाईपात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी १ PPM (एक दशलक्षांश) एवढा उर्वरित क्लोरीन वायू राहील अशा तर्हेने मिसळला जाईल.
पावसाळ्यात काय होते?
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात माती धुतली जाऊन धरणात येते. त्यामुळे धरणातील पाणी गढूळ असते. या मातीबारोबारच शेण, मानवी विष्ठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्यात येते. आता हे पाणी भौतिक तर्हेने शुद्ध करण्यासाठी २४ च्या ऐवजी ४८ किंवा ७२ तास निवळण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. परंतु लोकसंख्येच्या रेट्यामुळे आपल्या महापालिकांना हे शक्य होत नाही. एक दिवस जरी पाणी आले नाही तरी लोक, वृत्तपत्रे आणी लोकनेते काव काव सुरु करतात. मग याला उपाय म्हणून पाणी पूर्ण न निवळताच पुढे पाठवले जाते( म्हणून बाटलीत घेतले तर पाणी गढूळ दिसते) . आणी त्यातील जीवाणू मारण्यासाठी क्लोरीन जास्त मात्रेत मिसळला जातो. आणी बर्याच वेळेस त्यात होणारे प्रदूषण लक्षात घेता महापालिकेचे अभियंते २ PPM (दोन दशलक्षांश) इतका उर्वरित(RESIDUAL) क्लोरीन ठेवतात. यामुळे पावसाळ्यात आपल्या घरात जोरात नळाने पाणी सोडले तर क्लोरिनचा वास येतो. हे पाणी भौतिकदृष्ट्या स्वीकारार्ह नसले तरीही जैविक दृष्ट्या शुद्ध असते आणी यामुळे पावसाळी आजार होत नाहीत.
जोरदार पाउस पडला कि जेथे तेथे पाणी साचते. हे पाणी विहिरीत मिसळले जाते ज्यात शेण, विष्ठा इ सुद्धा मिसळली जाते. पाण्याच्या ट्य़ान्कर मध्ये हे पाणी तसेच भरले जाते आणी ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरवले जाते. बर्याच चांगल्या हॉटेलात पाणी शुद्ध करण्यासाठी AQUAGUARD सारखे उपकरण लावलेले असते त्याने हे पाणी शुद्ध होते परंतु स्वयंपाक घरात भांडी धुण्यासाठी किंवा स्वयंपाका साठी, चटणी साठी काही AQUAGUARD चे पाणी वापरले जात नाही.बर्याच हॉटेलात भरपूर ग्राहक असतील तर ग्रेव्ही असणारी भाजी किंवा सामिष पदार्थ कमी पाण्यात अगोदर शिजवून घेतात आणी शेवटच्या क्षणी पाणी टाकून उकळून तो पदार्थ ग्राहकाला दिला जातो. अशा वेळेस ते पाणी पूर्ण उकळी येईपर्यंत न थांबल्याने शुद्ध होत नाही आणी त्याच त्रास आपल्याला होऊ शकतो.
मग ज्या लोकांचे पोट संवेदनशील असते त्यांना पटकन पोट बिघडण्याचा त्रास होतो. इतर काही लोक दगड सुद्धा पचवू शकतात त्यांना काहीही होत नाही.
बरेच लोक मला हे सांगतात कि आम्ही बिसलेरी( पक्षी -- बाटलीबंद पाणी) वापरतो. उगाच चान्स घेत नाही. दुर्दैवाने बाटलीबंद पाण्याची परिस्थिती पावसाळ्यातच नव्हे तर इतर ऋतू मध्ये हि गंभीर आहे.
पहा http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Lives-at-risk-with-10000-i...
"We did a survey this year and over 2,000 people were caught running unlicensed water bottling plants in parts of North Delhi alone.
"The point to be noted is that while licensed water bottling plants sell around 10,000 of water bottles every day, the unlicensed bottling plants manage to sell 30,000-40,000 bottles every day."
म्हणजे दिल्लीत मिळणारे ८० % बाटलीबंद पाणी हे डूप्लिकेट आहे.
गुगलून पाहिल्यास आपल्याला असे असंख्य दुवे मिळतील. २५ लिटर च्या बाटल्या सुद्धा सहज डूप्लिकेट मिळतात.
जरी हि दिल्लीतील परिस्थिती असली तरी मुंबईतहि परीस्थिती फार उत्तम आहे असे म्हणता येणार नाही. ८० % नाही तरी ३०-ते ४० % बाटली बंद पाणी हे शंकास्पद आहे. जर आपण लांब पल्ल्याच्या गाडीने सी एस टी स्थानका पर्यंत गेलात तर हमालांच्या बरोबर बारकी पोरे आत शिरून "बिसलेरी" च्या बाटल्या चढा ओढीने गोळा करताना दिसतात. कारण एका बाटलीचे त्यांना २ रुपये मिळतात. याच बाटल्या अर्थात धारावीत परत भरल्या जाऊन १५ रुपयाला आपल्याला नळाचे पाणी "बिसलेरी" म्हणून विकले जाते.
मी स्वतः हॉटेलात साधे पाणी घेणे पसंत करतो. जर शंका असेल तर हॉटेलात जाऊन तेथील AQUAGUARD चालू आहे का हे पाहतो.
याला एक सोपा उपाय मी माझ्या असंख्य रुग्णांना सांगतो ज्यांची फिरतीची नोकरी आहे. CLORIWAT हि बाटली आपल्या ब्यागेत ठेवा. पूर्वी १० रुपयाला मिळणारी बाटली ५७ रुपये झाली आहे. http://www.cloriwat.com/ पण हि बाटली १०,००० लिटर पाणी शुद्ध करते.
बाटलीबंद पाणी विकत घेतले तरी ती बाटली उघडून त्यात याचा एक थेंब टाका पाच मिनिटे थांबा आणी मग ते पाणी प्या. निदान पाणी जंतुरहित मिळेल.
यात सोडियम हायपो क्लोराईट आहे जे पाण्यात क्लोरीन सारखे जंतुनाशक म्हणून काम करते. पाण्याला क्लोरिनचा किंचित वास येतो परंतु पाणी शुद्ध तरी असते.
हा विषय गहन, गंभीर आणी फार खोल आहे. ( हॉटेलात बिसलेरी घेत नाही म्हणून मी कंजूष आहे किंवा मागासलेला आहे अशा तर्हेच्या नजरांना मी कित्येक वेळा सामोरा गेलेला आहे.) पण बाटलीबंद पाण्यावर माझा विश्वासच नाही. बाटलीबंद पाणी बघितले तर स्वातंत्र्याला ७० वर्षे होत आली तरीही जनतेची शुद्ध पिण्याचे पाणी हि मुलभूत गरज पुरवण्यात वेगवेगळ्या सरकारांना अपयश आले हीच भावना माझ्या डोक्यात येते.
प्रतिक्रिया
14 Jul 2015 - 10:44 am | तिमा
पाणी बाटलीबंद आणि हवा डबाबंद अशी स्थिती आहे आपल्या शहरांची. आजच कळलंय की अच्छे दिन यायला २५ वर्ष लागणार आहेत. आता या जन्मी तरी अच्छे दिन बघायला मिळणार नाहीत.
14 Jul 2015 - 10:59 am | उगा काहितरीच
छान माहिती डॉक्टरसाहेब,
शंका क्र १)मेडीक्लोर एम वगैरे वापरून पाणि पिण्यायोग्य होते का ?
२) प्रवासात वगैरे नाइलाजाने दूषित पाणि प्यावे लागले तर काय खबरदारी घ्यावी ?
३)दूषित पाणी पिणे चांगले कि पाणी न पिता तहानलेलेच रहाणे (अर्थात प्रवासात वगैरे)
14 Jul 2015 - 11:14 am | आनंदराव
डॉक्टर् साहेब, एवढया विस्त्रुत माहिती बद्दल आमचे आभार आण सलाम पण स्वीकारा.
आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी किमान १०-१५ लिटर घरचे पाणी घेउनजातो. अर्थात चारचाकी असल्यामुळे हे शक्य होते.
बाकी बिसलेरी न घेतल्यामुळे मागासलेले आहेत अशा नजरा बघितलेल्या अहेत.
डॉक्टरसाहेब, पाणी इन्स्टंट शुद्ध करण्याचा उपाय यापुढे अमलात आणेन.
पुन्हा आभार !
14 Jul 2015 - 11:18 am | सुबोध खरे
MEDICLOR M मध्येही सोडियम हायपो क्लोराईट आहे तेंव्हा ते CLORIWAT ऐवजी वापरलेले चालेल.
दुषित पाणी पिण्यापेक्षा चहा किंवा कॉफी प्या त्याने तहान पूर्ण भागणार नाही पण शरीरातील पाणी कमी होणार नाही आणी उकळलेले असल्याने जंतुसंसर्ग होणार नाही. उत्तर हिंदुस्तानात कोल्ड ड्रिंक्स सर्रास भेसळ युक्त मिळतात.
रसायन शास्त्रात रस असणार्यांसाठी जल शुद्धीकरणासाठी पाहावा असा दुवा
http://www.cdc.gov/safewater/chlorination-faq.html
14 Jul 2015 - 11:36 am | एस
फार उपयुक्त माहिती!
14 Jul 2015 - 11:47 am | मदनबाण
उत्तम माहिती ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
14 Jul 2015 - 12:00 pm | कंजूस
अगदी उपयुक्त माहिती वेळेवर.
एक अवांतर:दोन साप एकमेकास विळखा घालून मध्ये एक दंड असे जे चिन्ह मेडिकल संबंधीत दाखवले जाते ते १)कोणाचे आहे ,२)कोण वापरू शकतो?,३)सापांचा संदर्भ काय असावा?,४)या चिह्नात फेरफार करून काही ठिकाणी वापरलेले दिसते त्यामुळे फसवणुक करण्याचा हेतु असतो का?
14 Jul 2015 - 1:29 pm | बॅटमॅन
ते चिन्ह ग्रीक धन्वन्तरी एस्क्लेपियस याचे आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Asclepius
याचा मुलगा मॅखॉन हा ट्रोजन युद्धात ग्रीकांचा आर्मी डॉक म्हणून कामावर होता.
त्या चिन्हाबद्दल माहिती इथे मिळेल.
https://en.wikipedia.org/wiki/Rod_of_Asclepius
त्यातला एक परिच्छेद.
The staff has also been variously interpreted. One view is that it, like the serpent, "conveyed notions of resurrection and healing", while another (not necessarily incompatible) is that the staff was a walking stick associated with itinerant physicians.[12] Cornutus, a Greek philosopher probably active in the first century CE, in the Theologiae Graecae Compendium (Ch. 33) offers a view of the significance of both snake and staff:
Asclepius derived his name from healing soothingly and from deferring the withering that comes with death. For this reason, therefore, they give him a serpent as an attribute, indicating that those who avail themselves of medical science undergo a process similar to the serpent in that they, as it were, grow young again after illnesses and slough off old age; also because the serpent is a sign of attention, much of which is required in medical treatments. The staff also seems to be a symbol of some similar thing. For by means of this it is set before our minds that unless we are supported by such inventions as these, in so far as falling continually into sickness is concerned, stumbling along we would fall even sooner than necessary.[13]
In any case the two symbols certainly merged in antiquity as representations of the snake coiled about the staff are common. It has been claimed that the snake wrapped around the staff was a species of rat snake, Elaphe longissima.[14] AKA "Aesculapian snake"
14 Jul 2015 - 3:58 pm | कंजूस
चिन्हाची माहिती असलेला परिच्छेद इथेच आणल्यामुळे बराच त्रास वाचवलात बॅटमॅना.आपल्याकडे डॅाक्टरांचे रेजिस्ट्रेशन करणाय्रा संस्थेचं हे चिन्ह आहे की काय अशी समजूत होती.
14 Jul 2015 - 1:16 pm | काळा पहाड
डॉक्टर साहेब, माहिती बद्दल धन्यवाद. दोन गोष्टींबद्दल माहिती हवी होती.
१. आपली पचनशक्ती अमेरिकन्स पेक्षा चांगली आहे कारण आपण अशुद्ध पाणी पितो असं म्हटलं जातं. ही अशुद्ध पाणी पिण्याची क्षमता किती ताणावी? त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? मग लहानपणापासून शुद्ध पाणी प्या, हात स्वच्छ धुवा वगैरे जे आपल्याला सांगितलं जातं त्याचं काय?
२. क्लोरीन पाण्यात घालून प्याल्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? (तुम्ही CLORIWAT चा एक थेंब एक लीटर पाण्यात हे प्रमाण म्हणताय ना? की बाटली मोठी हवी?)
14 Jul 2015 - 7:05 pm | सुबोध खरे
का प साहेब
आपली पचन शक्ती अमेरिकन लोकांपेक्षा चांगली आहे यात तथ्य नाही. शरीर जन्तुविरुद्ध प्रतिपिंडे( antibody) तयार करतात. काही काळाने त्यांची मात्रा कमी होते म्हणून आपण दर पाच वर्षांनी धनुर्वात किंवा दर तीन वर्षांनी टायफ़ॉईड च्या लशीचा बूस्टर डोस घेतो आणि या प्रतीपिंडान्ची पातळी वर आणून ठेवतो. फक्त आपण मधून मधून स्वचछ पदार्थ खात असल्यामुळे त्या जंतुंचा आपल्याला थोड्या प्रमाणात संसर्ग होतो आणि त्यामुळे आपली प्रती पिंडांची पातळी वर येते. आपण युरोप अमेरिकेत गेल्यावर तेथिल सार्वजनिक आरोग्याची पातळी बरीच उच्च असल्याने आपल्या लोकांची प्रतीपिंडांची पातळी खाली गेलेली असते त्यामुळे ते( एन आर आय) लोक भारतात आले कि त्यांचे पोट पटकन बिघडते. ते भारतात जास्त काळ राहिले तर त्या प्रतीपिंडांची पातळी परत वर येते आणि त्यांची "पचनशक्ती" सुधारते. एक किंवा दोन दशलक्षांश क्लोरीन पाण्यातून शरीरात गेल्याने फारसे नुकसान होत नाही.पण तो न वापरल्याने होणार्या अशुद्ध पाण्यातून होणारे रोग फारच जास्त हानी करतात.
http://www.cdc.gov/safewater/chlorination-faq.html हा दुवा पहा
14 Jul 2015 - 1:25 pm | बॅटमॅन
उपयुक्त माहितीबद्दल अनेक धन्यवाद!
14 Jul 2015 - 1:37 pm | उमा @ मिपा
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
14 Jul 2015 - 1:41 pm | द-बाहुबली
अत्यंत उपयुक्त अन नेमकी माहिती...!
_/\_
14 Jul 2015 - 1:47 pm | कपिलमुनी
खास करून ट्रेकिंगमध्ये MEDICLOR वापरावेच.
14 Jul 2015 - 4:24 pm | अभिजीत अवलिया
उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद.
14 Jul 2015 - 4:40 pm | वेल्लाभट
पाण्याबद्दल स्पष्ट भाष्य केलंत त्याबद्दल अनेक आभार.
क्लोरिवॅट पूर्वी प्रवासात वापरायचो. नंतर हळू हळू बिसलेरी (किंवा मिनरल वाटर) कडे कल वाढला. असो.
क्लोरिवॅट पुन्हा सुरु करणेत येईल.
14 Jul 2015 - 8:55 pm | रामपुरी
खूपच उपयुक्त माहीती
14 Jul 2015 - 9:59 pm | जुइ
CLORIWAT च्या माहिती बद्द्ल धन्यवाद!
14 Jul 2015 - 10:26 pm | सविता००१
CLORIWAT च्या माहिती बद्द्ल धन्यवाद!
15 Jul 2015 - 2:00 am | पद्मावति
अतिशय उपयोगी माहिती. आणि तुम्ही दिलेल्या टिप्स विशेषत: क्लॉरीवॅट बदद्ल त्याबद्दल तुमचे खूप आभार.
15 Jul 2015 - 4:00 am | निनाद मुक्काम प...
डॉ युके व जर्मनीत नळाचे म्हणजे अगदी घरच्या टोयलेत मधील पाणी पिण्यासाठी वापरतात. तरीही तेथे बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री होते ,
तुमचा भारतात बाटलीबंद पाण्याच्या शुद्धते वर विश्वास नाही म्हणून साधे पाणी पीत असाल तर ते योग्य आहे मी स्वतःला हॉटेल शी संबंधीत असल्याने भारतातील बाटलीबंद पाणी ह्यावर तुमच्या मताला दुरोजा देतो ,
भारतात अनेक जण बाटलीबंद पाणी हे साधे पाणी पिण्याजोगे असते म्हणून पितात
परदेशात साधे पाणी शुद्ध असून सुद्धा बाटलीबंद पाणी पितात
याच्यामागील कारण
ब्रांड चे महात्म्य अंगवळणी पडले असते
पूर्वीच्या काळी राजे व प्रतिष्ठित व्यक्ती बाटलीबंद पाणी प्यायचे त्यामुळे त्याचे अप्रूप जेव्हा बाटलीबंद पाणी सामान्य जनतेला उपलब्ध झाले तेव्हा तत्कालीन पिढीला होते जे पुढे पिढ्यान पिढ्या संक्रमित होत गेले.
भारता पेक्ष्या परदेशात बाटली बंद पाण्याचे मोठे मार्केट आहे जेथे १९ सेंट ते दीड युरो पर्यंत दीड लिटर पाण्याची बाटली मिळते तेव्हा स्टेटस सिंबॉल हा सुध्धा घटक असतो
मी स्वतः सुपर मार्केट चे घरगुती ब्र्यांड चे पाणी १९ सेंट वाल्या बाटलीतून पितो तेही आम्हाला गेस असलेले स्पार्क लिंग पाणी पिण्याची सवय झाली आहे म्हणून
दुसरे महत्त्वाचे कारण चव
येथे क्लोरीन चा अति वापर असो किंवा अन्य कारणाने नळाच्या पाण्याची चव मला तरी मचूळ वाटते त्याची तुलना मी बोर वेल च्या पाण्याच्या चवीची करेल ,
बाटली बंद पाण्याची चव मला सुसह्य वाटते. आमच्या म्युनिक मध्ये नळाला पाणी थेट आल्प्स मधून येते तरीही बाटलीबंद पाणी हाच पर्याय योग्य वाटतो ,
मात्र डिसेंबर मध्ये जेव्हा मी भारतात येत आहे तेव्हा आपण जो कट्टा करू तेव्हा तुम्ही सांगितलेले औषधाने जलशुद्धी करून मगच ते सेवन करू
लहान मुलगी बरोबर आहे तेव्हा तुम्ही सांगितलेले औषधाचा उपाय एकदम लय भारी आहे आता ती बाटली घेऊन फिरणे अनिवार्य आहे.
15 Jul 2015 - 8:43 pm | सूड
तुमच्या नळाला पाणी आल्प्स मधून येतं? कसलं भारी!!
15 Jul 2015 - 6:37 am | सस्नेह
थोडक्यात आणि उपयुक्त माहिती.
अॅक्वागार्ड आणि प्युअर इट सारख्या उपकरणात पाणी खरोखरच शुद्ध होते का ? ती खात्रीची सुरक्षितता देतात ?
30 May 2017 - 8:44 pm | सुबोध खरे
टाटा स्वच्छ, अॅक्वागार्ड किंवा प्युअर इट यात जल शुद्धीकरण तीन वेगळ्या तर्हेने होते.
१) गाळणे
२) अतिनील किरण
२) रिव्हर्स ऑस्मॉसिस
टाटा स्वच्छचे उदाहरण घेऊ यात गाळणे पद्धतीने पाणी शुद्ध केले जाते.
यात पाणी हे अतिशय सूक्ष्म अशी गाळणीतुन गाळले जाते ( MICROFIBER FILTER). ज्यामुळे पाण्यातील तरंगणारी अशुद्धता (गढूळपणा, माती) इ गाळले जाते. या गाळणीचे उत्पादन भाताच्या तुसाला वाळूबरोबर भाजून केले जाते. यामुळे त्याचे ऍक्टिव्हटेड कार्बन आणि ऍक्टिव्हटेड सिलिका मध्ये रूपांतर होते. या दोन्ही गोष्टीमुळे पाण्यातील कीटकनाशके किंवा खते काढून टाकली जातात( हे पदार्थ त्या गाळणीत अडकून राहतात (ADSORB) .
शिवाय पाण्यात असलेले जंतू मारण्यासाठी त्यात उत्पादनाचे वेळेस चांदीचे नॅनो पार्टिकल्स घातले जातात. या मुळे त्यातील सर्व जिवाणू विषाणू व त्यांचे स्पोअर्स नष्ट होतात. अशा तर्हेने पाणी पिण्यास शुद्ध होऊन मिळते. टाटा स्वच्छ १००० रुपयात ३००० लिटर शुद्ध पाणी देते. म्हणजे साधारण एका घरासाठी रोज दहा लिटर या दराने १००० रुपयात आपल्याला एक वर्ष शुद्ध पाणी मिळू शकते. याला कोणत्याही तर्हेची वीज किंवा पाण्याची जोडणी आवश्यक नाही. जेंव्हा हि गाळणी निकामी होते तेंव्हा त्याचा फ्युज बंद होतो आणि पाणी खाली उतरणे बंद होते. यानंतर हि गाळणी बदलावी लागते (रुपये ५५०/-)
https://en.wikipedia.org/wiki/Tata_Swach
प्युअर इट मध्ये चांदीच्या ऐवजी क्लोरीन वायू पाझरणारी गाळणी वापरली जाते. आणि नंतर पाण्यात उरलेला क्लोरीन ऍक्टिव्हटेड कार्बनच्या फिल्टरने काढून टाकला जातो.
ऍक्वागार्ड मध्ये सुरुवातीला अशीच गाळणी असते ज्यात गढूळपणा, तरंगणारे पदार्थ, कीटकनाशके इ काढलं जातं. यानंतर हे पाणी दोन काचेच्या नळ्यांतून पुढे जात असताना त्यांच्या वर अतिनील(ULTRAVIOLET--UV) किरणांचा मारा केला जातो ज्यामुळे त्यातील जिवाणू विषाणू इ मरतात. रिव्हर्स ऑस्मॉसिस या पद्धतीत वरील गाळणी आणि UV शिवाय पाण्यातील क्षार सुद्धा बाहेर काढले जातात त्यामुळे ़खारट किंवा मचूळ पाणी शुद्ध गोड करून मिळते. अणुपाणबुडीत हीच पद्धत वापरून समुद्राचे पाणी क्षार काढून गोड करून वापरले जाते.
या सर्व पद्धतीमध्ये साधारण एक वर्षाने एक तर गाळणी बदलावी लागते किंवा ऍक्वागार्डच्या काचेच्या नळ्या साफ करून घ्याव्या लागतात.
यात सर्वात स्वस्त म्हणजे टाटांचे स्वच्छ हे आहे. यामुळे मी माझ्या बऱ्याच रुग्णांना आपल्या गावच्या घरात ते नेऊन ठेवण्यास सांगतो. गावची घरे बंद असतात. तेथील पाण्याच्या स्रोताची खात्री नसते. तेंव्हा टाटाचा स्वच्छ फिल्टर विकत आणून घरी ठेवून द्या.सुटीत गेलात कि विहिरीचे पाणी "स्वच्छ" मध्ये वरून भरा. खाली आलेले पाणी निर्धास्तपणे प्या. उकळलेले पाणी हे उत्तम असते पण त्यातील हवा निघून गेल्यामुळे त्याची "चव" लागत नाही. त्यामुळे माणसे पाणी कमी पितात आणि डिहायड्रेशन होते आणि थकवा येतो. याला हा रामबाण उपाय आहे.
15 Jul 2015 - 6:51 am | रेवती
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
15 Jul 2015 - 7:12 am | श्रीरंग_जोशी
फारच उपयुक्त माहिती.
अवांतरः सॅन फ्रान्सिस्को हे जगातले पहिले शहर जिथे बॉटल्ड वॉटरवर बंदी आहे.
15 Jul 2015 - 7:13 am | कंजूस
माथेरान स्टेशनला (२) आपण बाहेर पडतो तिथे उजवीकडे एक खाद्यपदार्थ विक्री दुकान आणि बाजुला पाणपोई आहे.एका छोट्या मुलाने सात आठ बॅाटलस पाणपोईतून भरून मागच्या बाजूने स्टॅालवर आणून ठेवतांना मी एकदा पाहिल्या आहेत.या चांगल्या कामासाठी त्या मुलास वडे समोसे पाव मिळत असावा.तिथून पाणी बॅाटल घेऊन आपण एकप्रकारे चॅरटी /समाजसेवा वगैरे करत असतो.
15 Jul 2015 - 8:47 pm | कंजूस
दुरुस्ती - माथेरानला जाण्यासाठी नेरळ स्टेशनमधून( प्लॅट २) बाहेर पडतो असे वाचावे.
15 Jul 2015 - 2:44 pm | खटपट्या
अत्यंत उपयुक्त माहीतीबद्दल धन्यवाद..
15 Jul 2015 - 6:43 pm | मितान
योग्य वेळी योग्य माहिती मिळाली. येत्या काही दिवसांत बरेच प्रवास आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीचा निश्चित उपयोग होइल. धन्यवाद !
15 Jul 2015 - 7:45 pm | सुधीर
CLORIWAT च्या माहिती बद्द्ल धन्यवाद!
15 Jul 2015 - 8:07 pm | स्वाती२
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
15 Jul 2015 - 8:38 pm | पैसा
अतिशय उपयुक्त माहितीसाठी खूप धन्यवाद! नेहमीप्रमाणेच सोप्या भाषेत छान समजावून सांगितलेत.
30 May 2017 - 9:44 am | सुबोध खरे
दोन वर्षांपूर्वीचा धागा परत वर आणत आहे.
जाहिरात समजा. ((==))
30 May 2017 - 10:37 am | मार्मिक गोडसे
फारच उपयुक्त माहीती ! खरं तर दर महिन्याला हा धागा वर आणला गेला पाहिजे.
30 May 2017 - 12:07 pm | पुंबा
अप्रतिम लेख. डॉक्टरसाहेब, अश्या लेखांमुळे मिपावर येण्याचे सार्थक होते.
खरोखर! केवळ विषण्णता वाटते.
30 May 2017 - 12:20 pm | दशानन
वाह, अतिशय उपयुक्त व योग्य वेळी धागा वर आला.
थोड्याच वेळात प्रवासाला निघतोय, CLORIWAT घेतो सोबत.