संध्याकाळ होत आली. झाडांच्या सावल्या मोठ्या होऊ लागल्या. रस्त्यावरची माणसे कोणत्यातरी अनामिक ओढीने आपापल्या घरी जाताना पाहून मनात अनेक विचारांचे वादळ घोंगावयाला लागले. सायकलवर लटकत असणाऱा जेवणाचा डबा ; डाळ तांदूळ कांदे व भाजी ह्यानी भरलेली ती मळकट पिशवी हे सांभाळत गर्दीत वाट काढत सायकल घराकडे दामटत जाणाऱ्या त्या माणसाला कशाची ओढ असेल बरं !
एक आजोबा डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि पिशवीतून डोकावणारी कोथिंबीर जुडी घेऊन मंद चालीने घराकडे निघालेत. कोण असेल त्यांच्या घरी ? जीवनाच्या सायंकाळी असेल का कोणी तरी त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेल ? का जवळ बसवून चीऊकाऊचा घास ज्यांना भरवला ती पाखरे परदेशी कशी असतील ह्याच चिंतन सुरू असेल मनात? काय असेल जीवनाची ओढ आणि कसली हुरहुर?
सकाळी लवकर घरातील सर्व काही आवरून मस्टरवर वेळेत सही झाली की अर्धी लढाई जिंकणारी ती. मुलांची शाळा अभ्यास, नवर्याची नोकरी, घराचे हप्ते, संपलेला गॅस आणि जेवायला काय करायचं. अशी एक ना अनेक ओझी ओढत घराकडे निघालेली ती. कुठून एकवटली असेल ऊर्जा तीच्या जीवनात?
आज कट्ट्यावरच्या आजी जरा आनंदी दिसतायत. रोजच्या तक्रारी सोडून नाजुक हसतायत. लेकीचा नक्की फोन झाला असणार. नातवंडांच कौतुक भरभरून करताना दुखणारा गुडघा विसरल्या असणार . कसे आहेत हे मनाचे खेळ? मन व्यापणारी गोष्ट कशी विरून टाकते शरीर व्याधी ?
भाग 2
खरे तर त्याला आज लवकर जायच होत. आकाशातील ढगांनी पावसाची वर्दी दिली. जमेल तशी सायकल वेगाने घराकडे दामटत तो निघाला होता. दोन्ही लेकरांची आता शाळा सुरू होणार आहे. दर वर्षी वेगवेगळ्या गावी कामासाठी झोपड टाकून संसार थाटणारा तो... पोरांना गावात आजाकडे शाळेत जायला ठेवायची वेळ आली की कासावीस होत असे. लेकरांची माय भरल्या डोळ्यांनी शाळेच्या कपड्याना ठिगळ लावीत बसलेली असे. शाळेला सुट्टी सुरू झाली लेकर गावाकडून आई बापाकडे आली की झोपडं कस नाचायला लागायचे. झोपडीतला संसार जरा आवरता घेऊन लेकर आईबापाच्या कुशीत आनंदाने विसावायची. लेकराला छातीशी कवटाळून मायेचा बांध ओसंडून वाहायचा. लेकरांची वेणी फणी व आंघोळ करताना तीच मन भरुन यायच. बिल्डींगवर छोटी छोटी कामे करताना अपघातात जखमी झालेल्या पायाच्या वेदना क्षणात विसरायला व्हायच्या. लवकरात लवकर परत एकदा कामावर सुरू होण्याचे विचार मनात क्षणभर का होईना मान वर काढत होते. बापाची ससेहोलपट आता जाणवू लागली होती. तरीपण कीती सहजपणे तो हे सगळे घेत होता. सांजच्याला घरी आल्यावर तिला पाय दुखतोय का म्हणून विचारत होता. आज पोरांना तिखटाच जेवण करायच होत. मीठ मसाला व वशाट आणल होत. लेकरांची आईच्या आसपासची लगबग तो मोठ्या मजेने पहात होता. १० × १० च्या झोपडीत जणू स्वर्ग अवतरला होता.
प्रतिक्रिया
24 Jun 2015 - 9:19 pm | उगा काहितरीच
वा छान !
25 Jun 2015 - 8:00 am | यशोधरा
आवडलं, पण क्रमशः आहे का हे?
25 Jun 2015 - 12:15 pm | एस
असेच विचारतो. पुढील भाग येणार आहे/त का?
26 Jun 2015 - 8:14 pm | prasadoak7
होय क्रमशः
25 Jun 2015 - 9:29 am | सुबोध खरे
सुंदर लेखन
25 Jun 2015 - 12:42 pm | कपिलमुनी
चांगले वर्णन
25 Jun 2015 - 1:48 pm | सौंदाळा
मस्त लिहिले आहे.
25 Jun 2015 - 4:27 pm | नाखु
पुभाप्र
पुलेशु
25 Jun 2015 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
आवडले ! तुमचे लेखन अजून वाचायला आवडेल.
26 Jun 2015 - 2:23 pm | पैसा
आवडलं. अजून येऊ द्या!
26 Jun 2015 - 2:24 pm | विशाल कुलकर्णी
+१
26 Jun 2015 - 7:34 pm | prasadoak7
एक ललित बंधाची साखळी स्वरूपात रचना करण्याचा मनोदय आहे. एकूण 5 विविध सामाजिक स्तरातील भाव विश्वाची गुंफण रेखाटन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
26 Jun 2015 - 9:01 pm | खटपट्या
छान पु.भा,प्र.
29 Jun 2015 - 11:23 am | रातराणी
वाचतीये. आवडतंय :)
29 Jun 2015 - 1:08 pm | prasadoak7
धन्यवाद मशः आहे पुढचा भाग पण वाचा
29 Jun 2015 - 11:50 am | उमा @ मिपा
लिखाण आवडलं, पुभाप्र.