समीट माउंटेनिअर्स या सौस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत शाळा कॉलेजमधील मुलांसाठी कर्जत जवळील पेठ किवा कोथळीगड या किल्ल्यावर नाईट ट्रेक आणि रॅप्लिंग मोहिमेचे आयोजन केले होते.
प्रथम पेठ किल्ल्याविषयी थोडीशी माहिती:
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावामुळे या किल्ल्याला पेठ्चा किल्ला म्ह्टले जाते. किल्ल्याच्या सुळ्क्यावर जाण्यासाठी कातळ कोथळुन किवा पोखरून पाय-या केलेल्या आहेत त्यामुळेच ह्याला कोथळीगड असेही नाव प्रचलित आहे. आजूबाजूच्या प्रदेशावर टेहळणीसाठि हे एक उत्तम ठाणे होते त्याचप्रमाणे मराठ्यांचे शस्त्रागारही या किल्ल्यावर होते. अधीक इतिहास http://trekshitiz.com/marathi/Peth_%28Kothaligad%29-Trek-P-Alpha.html
येथे पाहता येईलच.
दुपारी ३.३० च्या कर्जत गाडीने मुंबईहून १८ आणि ठाण्याहून आम्ही २० असे एकुण ३८ जण कर्जतच्या दिशेने निघलो. कर्जतला जाणारी ही एकच आणि शेवटची ट्रेन असावी बहुतेक कारण कर्जत स्टेशन आलं तरी गर्दी कमी होईना. असो रोज म.रे. त्याला कोण रडे. संध्याकाळी पाचच्या सुमारास कर्जत स्टेशनला धडकलो. तिथे स्टेशनवरच पुन्हा एकदा शिरगणती झाली आणि ३८ टोटल झाली एकदाची.
ट्मट्म रिक्षा हा एक नवा वहान प्रकार लहानमुलांना येथे बघायला मिळाला. सहा आसनांची क्षमता असूनही १० जण त्यात अगदी आरामात बसत होती. जसजसे प्रवासी बसतील तसतशी ट्मट्मची रुंदी वाढत असावी बहुदा, कारण वाटेत आणखी एक दोन शिटा मिळाल्या तर बेस काम होईल असेच भाव ट्मट्म चालकाच्या चेह-यावर दिसत होते. थोडीशी घासाघीस करुन ७०० रुपयाला एक ट्मट्म या प्रमाणे ४ ट्मट्मा बुक केल्या आणि आमचा ३८ जणांचा ताफा कर्जत ते आंबिवली या ट्मट्म प्रवासासाठी सज्ज झाला. अंतर साधारण २५ ते २७ कि.मी.
साधारण ६ च्या सुमारास ट्मट्म मधुन निघालो ते ६.४५ ला आंबिवली गावात पोहोचलो. आंबिवली गावातील श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेल कोथळीगड मध्ये चहा व पोहे सांगून ठेवले होतेच.
चहा पोह्यांचा कार्यक्रम झाल्यावर (म्हणजे चहा पोहे खाण्याचा) सर्वांना गोलाकार वाटोळ करायला सांगितलं आणि २ दिवसाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती व काही आगाऊ सुचना दिल्या. पाण्याच्या बाटल्या भरून, आपापल्या पाठ्पिशव्या बांधून निघेपर्यंत ८ वाजुन गेले होते. रात्रीचे ८ वाजुन गेले तरी हवेतिल उकाडा काही कमी झाला न्हवता. मजल दरमजल करीत दिड तासाच्या चालीने साधारण ९.३० वाजता पेठ माची गावात पोहोचलो. आंबिवली गावातील श्री. गोपाळ सावंत ह्यांचे बंधु श्री. श्रीराम सावंत ह्यांच्या पेठ माची गावातील घरी जेवणाची व निवासाची व्यवस्था केली होतीच. हात पाय धुवून मुलं फ्रेश होतायत तोपर्यंत गोपाळ सावंत आणि कुटुंबीयांनी जेवणाची तयारी केली. तांदुळाची गरमागरम भाकरी, झुणका, डाळ भात, पापड लोणच आणि वाटीभर ताक असा फक्कड बेत असल्यावर काय हो सगळेच जण तुडूंब जेवले हे सांगणे नकोच.
मुली श्रीराम सावंत ह्यांच्या घरात तर मुल घरासमोरील देवळात अशी झोपायची व्यवस्था करुन, लवकर झोपा रे, उद्या पहाटे ५ ला उठायचय, वगैरे उगिचच दटावणी करून आम्ही देखिल देवळाच्या बाजुलाच असलेल्या मोकळ्या आवारात झोपायला गेलो. अचानक १२.३० च्या सुमारास गार वारा चालु झाला, ढगांचा गडगडाट आणि विजांचा खेळ करत रिमझिम पावसाला सुरुवात झाली. झालं लगेच आम्ही आमची गाठोडी उचलली आणि पाउस जायची वाट पाहत देवळाच्या कठड्यावर बसुन रहिलो. अपेक्षे प्रमाणे १० मिनिटातच पाउस गायब आणि आम्ही पुन्हा वळ्क्ट्या पसरुन आडवे. अर्धा तास होतोय तोवर पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा खेळ करत पाउस हजर. आतामात्र आम्ही वळ्कट्या उचलल्या आणि देवळात आडवे झालो. आता गावातला श्वान समाज जागा झाला आणि बरोब्बर आमच्या समोर येउन एकमेकांना हाका घालू लागला ते अगदी पहाट होईपर्यंत त्याचं भुंकण चालुच. ह्या सगळ्या गडबडीत झोपेची काशी झालीच आणि पहाटे जरा डोळा लागतोय तोपर्यंत घंटा वाजली (पण ही घंटा देवळातली नसुन आपल्याला तयारी करून निघण्यासाठी आहे हे नंतर माझ्या लक्षात आल). असो. अहो पूर्ण रात्र जागरण झाल्यावर काय घंटा लक्षात येणार.
चहा बिस्किटे खाउन ६.३० च्या सुमारास किल्ल्याच्या दिशेने निघालो.
८ वाजता एका पडक्या दरवाज्यातुन प्रवेश करुन सर्वच जण किल्ल्यावर पोहोचलो.
गुहेच्या बाजुलाच असलेले बहिरोबा मंदिर
आमच्यातले २-३ जण आधीच पुढे जाउन रॅप्लिंगच्या तयारीला लागले होते. किल्याच्या टाक्यातले थंडगार पाणी पिऊन १०-१५ मिनिटांच्या विश्रांती नंतर सर्व मुल रॅप्लिंग साठी रवाना झाली.
आता गुहेत मी एकटाच राहिलो होतो, अल्पोपाहारासाठी कांदा टोमेटो भेळ दयायची असल्याने कांदा टोमेटो कापत बसलो. अमेझॉन वरून दोन स्लायसर मागवले होते, बायकोची नजर चुकवुन ते ईथे घेऊन आलो होतो मग काय विचारता ३०-४० मिनिटात्च त्यावर १-१ किलो कांदा टोमेटो कापुन त्यात भेळेची पाकिट घालुन एका मोठ्या परातीत भेळ तयार. जसजशी मुल रॅप्लिंग करून येत होती त्यांना पेपर प्लेट मध्ये भेळ देत होतो.
काही मुल गुहेत परतल्यावर मी गडाच्या अत्त्युच्च टोकावर जाण्यासाठी निघालो.
गडाच्या माथ्यावर घेऊन जाणारा आणखी एक दरवाजा
अस्मादिक, मागील रांगेत पदर गड व भिमाशंकर
वरून पदरगड, भीमाशंकर रांगेचे फोटो काढले, आणि रॅप्लिंगच्या ठिकाणी पोहोचलो, ब-याचश्या मुलांचे रॅप्लिंग करून झाले होते. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला.
साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही सर्वानीच गडावरुन उतरायला सुरुवात केली. पाउण एक तासात श्रीराम सावंत ह्यांच्या घरी पोहोचलो. तिथे सर्वांसाठी पन्ह तयार होतच.
तळपत्या उन्हात पेठचा किल्ला
पेठ माची गावातुन आंबिवली कडे रवाना
पन्ह्याचा आस्वाद घेउन १२.३० च्या रणरणत्या उन्हातून आंबिवली गावाचा रस्ता धरला. १.३० च्या वैशा़ख वणव्यातुन अंग भाजुन घेत गोपाळ सावंत ह्यांच्या हॉटेल कोथळीगड मध्ये पोहोचलो एक्दाचे. थोड फ्रेश होतोय तोवर जेवणाच ताट आलच. भूकातर लागल्या होत्याच कारण सकाळ पासुन भेळेव्यतिरिक्त काही खाणं झालेल न्हवत, शिवाय प्रचंड उकाड्यामुळे तहान तहान होत होतीच.
मोहिम समाप्तिची घोषणा करुन एक ग्रुप फोटो काढला
आदल्या दिवशी बोलण झाल्याप्रमाणे बरोब्बर २.३० - २.४५ च्या सुमारास चारही ट्मट्म हजर झाल्या आणि आम्ही ४.१५ ची कर्जत सी. एस.टी. ट्रेन पकडण्यासाठी आंबिवलहून निघालो.
बज्जु गुरुजी
ता.क. टमटम वाले श्री. काळोखे - संपर्क - ९२७०७२५६९०
आंबिवली गावातील श्री. गोपाळ सावंत - जेवण व निवास - संपर्क ८४४६८६९३७७
प्रतिक्रिया
17 May 2015 - 6:04 pm | अजया
छान वृत्तांत.नंबर दिलेत ते बरं केलंत!लवकरच जाण्यात येईल!!
17 May 2015 - 9:43 pm | सानिकास्वप्निल
छान लिहिले आहे, फोटो ही मस्तं
आवडले.
17 May 2015 - 9:54 pm | प्रचेतस
एकदम झकास.
कोथळीगडाची गुहा खूपच सुंदर.
17 May 2015 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा
खुपच छान...
और
... इसका तो जव्वाब नही।
18 May 2015 - 3:59 am | स्रुजा
मस्त ट्रेक ! छान लिहिलंयेत आणि फोटो पण छान. एवढी लहान लहान मुलं, एकदम उत्साहाने भारलेला ट्रेक झाला असणार.
18 May 2015 - 4:35 am | जुइ
सह्मत आहे. तपशीलवार वर्णन आवडले!!
18 May 2015 - 4:32 am | श्रीरंग_जोशी
या उपक्रमाचे कौतुक वाटते.
फोटोज व तपशीलवार वर्णन आवडले.
अवांतर - आजवर तांदळाची भाकरी कधी खायची संधी मिळाली नाही. कुणी पाकृ टाकेल काय?
18 May 2015 - 12:57 pm | सतीश कुडतरकर
एक सूचना करावीशी वाटते. संबंधितांकडे पोहोच कराल अशी अपेक्षा!
हौशी मंडळी असल्यास सुरक्षिततेला प्राधान्यक्रम असावा. एकाही मुलाच्या डोक्यावर शिरस्त्राण नाही. जे सर्वथा चुकीचे आहे. रॅपलींग करताना दोर हलत असतो, त्यामुळे मार्गातील अस्थिर दगड मुळातून निघून खाली पडत राहतात आणि अपघात होण्याची शक्यता असते.
सर्व लहान मुले असल्याने कृपया काळजी घ्या!
18 May 2015 - 7:41 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त झालेला दिसतोय ट्रेक...हौशी ग्रुप आहे की व्यावसायिक?
19 May 2015 - 11:22 am | गणेशा
मस्त एकदम