व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १, भाग २, भाग ३
डॅन्युब नदी आणि तिच्या दोन तीरांवर वसलेले आणि रात्री चमचमणारे बुडापेस्ट बघून आता दुसऱ्या दिवशी बुडा किल्ला बघण्याची उत्सुकता होती. हंगेरीतील राजघराण्याचे वैभव असलेला हा किल्ला तेराव्या शतकापासून तर आजतागायत दिमाखात उभा आहे. या किल्ल्यातील बहुतांशी दालनांमध्ये आता विविध प्रकारची प्रदर्शन आहेत.
येथीलच एका इमारतीत असलेल्या हंगेरियन नॅशनल गॅलरीत, अनेक उत्तमोत्तम शिल्पे, चित्रे बघायला मिळाली. यापैकी मोजकीच फोटोत आली आहेत. परंतु चित्रकलेत रस असणाऱ्यांनी या प्रदर्शनासाठी वेगळा वेळ काढायला हवा. बऱ्याच चित्राबद्दल माहिती देणारे फलक देखील आहेत ज्यावर त्याचा चित्रकार, त्याची माहिती, त्याची एखादे चित्र काढण्यामागची भूमिका, याबद्दल वाचायला मिळते. प्रत्येक दालनात विषयवार वर्गवारी करून ही चित्रे, शिल्पे ठेवली आहेत, त्याबद्दल वाचताना यामागे किती सखोल विचार केला आहे हे देखील जाणवते.
एका दालनात काही Altarpieces ठेवण्यात आली आहेत. चर्च मध्ये कधी गर्दीमुळे, तर कधी दूरवर असल्याने या Altarpieces ला जवळून बघायचा योग येत नाही. इथे निवांत पणे ते बघता आले.
हे किल्ल्यावरून दिसणारे शहर आणि चेन ब्रिज. बुडा आणि पेस्ट यांना जोडणारा हा पहिला पूल १८४९ मध्ये वापरात आला.
इथे जवळच असलेले अजून एक आकर्षण म्हणजे Matthias Church आणि Fisherman’s Bastion. किल्ल्यापासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले हे चर्च बघताक्षणी मनात घर करते.
Fisherman’s Bastion हे या चर्चच्या समोरच असलेले एक ठिकाण. चर्चच्या सौंदर्यात अधिक भर पडावी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण शहराचा नजर बघण्यासाठी खास अशी एक जागा असावी या कल्पनेतून हे बांधले गेले. इथून शहराचे अप्रतिम दर्शन होतेच, पण या वास्तूचे वेगळेपण जास्त भावते. एकमेकांशी जोडलेले हे सात टॉवर्स म्हणजे हंगेरीतील स्थानिक लोकांच्या सात मुख्य जमातींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले जाते. या नावाबद्दल बऱ्याच दंतकथा आहेत. त्यातील मुख्य कथेप्रमाणे या शहराचे संरक्षण करणाऱ्या कोळी लोकांच्या स्मरणार्थ हे नाव दिले गेले. याजागी आता काही restaurants आहेत, जिथे बसून कॉफी चा आस्वाद घेत बुडापेस्टचे सौंदर्य न्याहाळताना ही वास्तू बांधतानाचे उद्दिष्ट साध्य झाल्यासारखे वाटते.
आधीच कडाक्याच्या थंडीत इथे उंचावर सोसाट्याच्या वाऱ्याने भर घातली होती. खाली येउन नदीकाठाने परत एक चक्कर मारली.
शहराचे लोभसवाणे रूप डोळ्यात शक्य तेवढे साठवले आणि हॉटेलवर परतलो.
बुडापेस्टमधला शेवटचा दिवस उजाडला. सकाळपासून बर्फ पडायला सुरुवात झाली होती. पहिला मोर्चा वळवला पाप्रिका मार्केट कडे.
खास प्रकारच्या पाप्रिका/मिरच्या आणि लसूण हे दोन हंगेरियन खाद्यसंस्कृतीचे सर्वात महत्वाचे पदार्थ. हंगेरीचा प्रमुख खाद्यपदार्थ म्हणजे गुलाश, भाज्या आणि मांस यापासून बनवलेला स्ट्यु किंवा सूप चा प्रकार. गुलाश साठी शाकाहारीना पर्याय मिळणे तसे अवघड आणि आम्ही नुकतेच हॉटेल मधून नाश्ता करून बाहेर पडल्याने तशी भूकही नव्हती. पाप्रिका मार्केट मध्ये आलो आणि पहिले या लाल मिरच्या शोधत फिरायला सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा (जेवढे ऐकले होते आणि फोटो पाहिले होते त्यावरून) ही दुकाने खूपच कमी दुकाने दिसली. खालच्या मजल्यावर मुख्यत्वे भाज्या आणि खारवलेले व सुकवलेले मांस यांची दुकाने होती, यातच थोडीफार या मिरच्यांची होती.
पहिल्या मजल्यावर सुवेनिअर शॉप्स, हंगेरीतील कलात्मक वस्तूंची दुकाने आहेत. यातील अनेक वस्तू, विशेषतः टेबल क्लॉथ बघून आम्हाला अंमळ मौज वाटत होती. काही काचेच्या वस्तू किंवा कपडे याबाबत देखील भारतीय बाजारपेठ बघता विशेष काही वाटले नाही. युरोपीय लोकांना या रंगांचे, डिझाईनचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे कारण त्याबाबतीत इथे फारसे वैविध्य दिसत नाही. परंतु आमच्यासाठी ते सुंदर दिसत असले तरीही घ्यायलाच हवे असे काहीही नव्हते. शिवाय देशोदेशीचे पर्यटक येत असल्याने अवाच्या सवा किमती लावल्या आहेत हे दिसत होते. काही वस्तू, सुवेनिअर मात्र आकर्षक होते. त्यातल्या ज्या वस्तू वेगळ्या वाटल्या, हंगेरियन संस्कृतीची ओळख म्हणून, या शहराला भेट दिली त्याची आठवण म्हणून, त्यांची खरेदी अर्थात झालीच :)
बर्फ पडणे काही थांबले नव्हते. त्यामुळे बाहेर चालणे नको वाटत होते. बुडापेस्ट मधील ही 'मेट्रो १' ही लंडन अंडर ग्राउंड लाईन नंतरची सर्वात जुनी मेट्रो लाईन. १८९६ पासून सुरु झालेली ही मेट्रो लाईन आजही बुडापेस्ट मध्ये धावते आहे. इतर मेट्रो सारखी अत्याधुनिक सुविधा नसली तरीही ही छोटीशी ट्राम सारखी वाटणारी मेट्रो एक वेगळी आठवण म्हणून लक्षात राहते. इथे फोटो काढायचा राहिला त्यामुळे हा आंतरजालावरून साभार.
बुडापेस्ट मधील ओपेरा हा देखील युरोपातील एक प्रसिद्ध ओपेरा. इथे तिकिटे बरीच स्वस्तात होती परंतु कुठलाच नियोजित कार्यक्रम आम्ही गेलो त्या दोन दिवसात नव्हता. शिवाय इथे रोज माहितीपर कार्यक्रम असतो त्याची देखील वेळ जमली नाही. ही एक संधी हुकली ही एक हुरहूर राहिलीच.
इथून पुढे बुडापेस्ट मधील अजून एका प्रसिद्ध चर्च ला भेट दिली. आजवर पाहिलेल्या चर्चेस मधील खास आवडलेले असे हे चर्च.
थर्मल बाथ बघायचे राहिले होते पण हिवाळ्यात तिथे जाण्यात खूप काही रस नव्हता. अजून काही बघायचे राहिले असेही वाटत होते पण तरीही बुडापेस्ट खूप आवडले. उन्हाळ्यात कदाचित एक वेगळे शहर अनुभवता येईल असे वाटले. पण त्याच बरोबर रात्रीच्या रोषणाईसाठी हिवाळाच उत्तम. संध्याकाळी परतीचे विमान होते आणि शहरातून विमानतळावर पोचायला एक तास तरी लागेल असा अंदाज होता. तेव्हा उशीर नको म्हणून शेवटी हॉटेल वरून सामान उचलले आणि बुडापेस्ट विमानतळावर पोहोचलो. बर्फवृष्टी सुरूच होती त्यामुळे सगळीकडे पांढराशुभ्र रंग दिसत होता आणि आम्ही विमान सुटण्याची वाट बघत होतो.
या देशाची आर्थिक स्थिती इतर युरोपीय देशांच्या तुलनेत तेवढी संपन्न नाही हे या शहरात फिरताना सतत जाणवते . स्थानकावर दिसणारे बेघर लोक, बायकांचे राहणीमान, सार्वजनिक स्वच्छतागृहात दिसणारी अस्वच्छता यावरून देखील हे सहज जाणवत होते. हॉटेल आरक्षित करण्यासाठी जेव्हा शोध सुरु केला, तेव्हा इतरत्र असणाऱ्या सर्वसाधारण बजेट मध्ये बुडापेस्टमधली उत्तम दर्जाची हॉटेल्स होती. बुडा किल्ल्यात प्रवेशासाठी जेव्हा तिकिटाच्या रांगेत उभे होतो, तेव्हा एक फरक प्रकर्षाने जाणवला. नॉन युरोपीय लोकांसाठी सवलतीतील तिकिटे उपलब्ध नव्हती. त्याचबरोबर छायाचित्रणासाठी वेगळे पैसे होते. आजवर असे कुठे दिसले नसल्याने आश्चर्य वाटले. बुडा किल्ल्यावर जाताना ज्या बसेस होत्या, त्यांची अवस्था बघून डोळे पाणावले. ;)
फारसे काही नियोजन न करता तशी अचानक झालेली ही सहल. व्हिएन्ना आणि बुडापेस्ट या दोन्ही शहरांनी आवडत्या स्थळांच्या यादीत स्थान पक्के केले, त्यातही बुडापेस्टने जास्तच. व्हिएन्नातील उत्तमोत्तम वास्तू, तेथील राजकन्यांच्या ऐकलेल्या कहाण्या, युएनचे मुख्यालय, तेथील बेकरीतील खाद्यपदार्थ आणि सजावट, संधीप्रकाशात दिसणारे बुडापेस्ट, बुडापेस्ट मधील ज्युईश मेमोरियल, या आणि अशा अनेक आठवणी सोबत घेऊन डॅन्युब नदीच्या तीरावरील दोन शहरांची ही लहानशी सहल पूर्ण झाली. तुम्हाला कशी वाटली हे अवश्य सांगा. :)
समाप्त
प्रतिक्रिया
20 Mar 2015 - 3:17 am | श्रीरंग_जोशी
ही लेखमालिका म्हणजे पर्वणीच आहे. हाही भाग नेहमीप्रमाणेच उत्तम.
सर्वच फोटो सुंदर असले तरी १०, ११, १२ अन १७ विशेष आवडले.
आता पुढचा भाग नसणार याचेच काय ते शल्य वाटते.
20 Mar 2015 - 4:23 am | रुपी
पूर्ण लेखमालिका मस्तच होती. सगळे फोटो तर सुंदर आहेतच पण लेखनही छान आहे. अशा खूप सहली करा आणि अशाच उत्तमोत्तम मालिका येउ द्यात!
20 Mar 2015 - 8:35 am | खेडूत
मालिका अतिशय आवडली .
फोटो पण खूप छान !
पुमाप्र ……
20 Mar 2015 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा
+++१११
याला म्हनतेत फोटू शेअरिंग! एकच नंबर.
20 Mar 2015 - 9:42 am | पॉइंट ब्लँक
फोटो एकदम मस्त आलेत. प्रवास वर्णनही माहितीपूर्ण आहे :)
20 Mar 2015 - 9:44 am | सामान्य वाचक
बुडापेस्ट खरच खूप सुंदर आहे. हंगेरी मध्ये बाकी काही पण पाहण्यासारखे
20 Mar 2015 - 9:51 am | विशाखा पाटील
खूपच मस्त.
ओपेरा हाउसवर 'Faust' नाव दिसतंय. हा जर्मनीतलाच Faustus का?
20 Mar 2015 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूपच सुंदर, वाचनिय आणि उत्तम प्रकाशचित्रांमुळे प्रेक्षणिय लेखमाला ! नेहमीच्या यादीत नसलेल्या शहरांची सुंदर ओळख झाली.
20 Mar 2015 - 1:28 pm | स्वाती दिनेश
हा भागही आवडला, फोटोही सुरेख!
स्वाती
20 Mar 2015 - 2:56 pm | रेवती
वरील छायाचित्रे पाहता शहराचा देखणेपणा चांगलाच नजरेत भरतो. पण फोटो बघताना व आधीचे वर्णन वाचताना देशाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली. देशाच्या इतर कहाण्याही माहिती झाल्या. ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
20 Mar 2015 - 3:10 pm | सूड
चित्रं आवडली, पुभाप्र!!
20 Mar 2015 - 4:06 pm | रुस्तम
खूपच मस्त.
20 Mar 2015 - 4:26 pm | पिलीयन रायडर
फार सुंदर झाली आहे ही सुद्धा मालिका!!
लिहीत रहा...
20 Mar 2015 - 4:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो नेहेमीप्रमाणेचं सुंदर आलेत खुप. मथायस चर्चचा फोटो विशेष आवडला.
20 Mar 2015 - 5:15 pm | अजया
फार छान मालिका.नेहेमी न वाचण्यात येणार्या भागाची माहिती आणि फोटो दोन्ही छान!
20 Mar 2015 - 9:34 pm | सर्वसाक्षी
सफर फारच नामी आहे. प्रेक्षणिय स्थळे नोंद करण्यात येतील.
20 Mar 2015 - 9:44 pm | सानिकास्वप्निल
संपूर्ण लेखमाला मस्तं झालिये खूप आवडली.
सुंदर फोटोज आहेत, छान लिहिले आहेस.
21 Mar 2015 - 3:01 pm | सांगलीचा भडंग
उत्तम लेख मालिका आणि एक नंबर फोटो
22 Mar 2015 - 1:17 pm | इशा१२३
अप्रतिम फोटो आणि वर्णन.
23 Mar 2015 - 11:52 am | एस
अतिशय सुंदर लेखमाला आणि देखणे फोटोही.
6 Apr 2015 - 5:47 pm | स्वाती राजेश
युरोपमधील मला आवडलेले हे एक शहर... :)
सुंदर आहे.... वर्णन फोटो मस्त....
7 Apr 2015 - 9:22 am | मदनबाण
हा भाग देखील आवडला... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }