*छायाचित्र आंजावरून साभार
बेथनी हॅम्लिटन हिचा जन्म हवाईमध्ये एका सर्फर कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासून तिला सर्फबोर्डिंगची आवड होती त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ती सफाईनं सर्फींग करू लागली. तिचे सर्फर व्ह्यायचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी तिच्या घरच्यांचा, स्पॉन्सर्सचा, मित्र-परिवाराचा पूर्ण पाठिंबा होता , त्यामुळे तिला अवघ्या आठव्या वर्षी सर्फ बोर्डिंगच्या स्पर्धेत सहभागी होता आले.
२००३ च्या हॅलोविनच्या सकाळी १३ वर्षीय बेथनी आपली मैत्रीण अॅलेना सोबत सर्फिंगला गेली होती. त्यांच्यासोबत अॅलेनाचे वडीलही होते. सूर्य ही डोक्यावर आला होता, लाटा ही खूप मोठ्या नव्हत्या , बेथनी तिच्या सर्फ बोर्डवर संथपणे ऊन घेत पडली होती. तिचा डावा हात तिने पाण्यात सोडला होता, इतक्यात १४ फूट उंच टायगर शार्कने तिच्यावर हल्ला केला. तिला काही समजण्याआधीच तिचा डावा हात खांद्याच्या जरा खालून त्या शार्कने सर्फ बोर्डसकट चावला होता. पाण्यात रक्ताची लाली पसरली. अॅलेनाच्या वडिलांनी तातडीने tourniquet तिच्या डाव्या हाताला करकचून बांधलं व तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. बेथनीला त्यावेळी फारश्या वेदना जाणवल्या नाहीत पण हॉस्पिटलला जाताना भरपूर रक्तस्त्राव झाल्यामुळे मात्र तिला बधिरपणा जाणवू लागला व ती थंड पडू लागली. तिच्यावर तातडीने सर्जरी करावी लागली. पुस्तकात तिच्यावर दोन सर्जरी केल्याचे म्हटले आहे एका सर्जरीत तिच्या दंडाचे जे काही मांस, हाडाचे तुकडे उरले ते काढावे लागले. दुसर्या सर्जरी मध्ये तिची जखम बंद करण्यासाठी कातडीचे आवरण लावून टाके घालायचे होते. तिला पूर्ण बरे व्ह्यायला काही दिवस लागले. इथे तिच्या कुटुंबासमवेत इतरांना वाटले की बेथनीचे सर्फिंग करियर आता संपुष्टात आले, तर बेथनीने स्वतःला कमकुवत न समजता पुढे ही आपण सर्फिंग सुरु ठेवणार असे ठरवले होते.
हॉस्पिटलमध्ये असतानाची बेथनी.
*छायाचित्र आंजावरून साभार
तिच्या हट्टामुळेच एक महिन्याच्या आतच ती पुन्हा सर्फिंगसाठी सज्ज झाली. तिने स्वतःवर खूप मेहनत घेतली, एका हाताने सर्फ करणं कठिण जात असतानाही तिने मेहनत करणं सोडले नाही. त्याच पाण्यात सराव करताना बिथरली नाही. २००४ साली तिने एका हाताने सर्फिंग करून Open Women’s division स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले , ती तिथेच थांबली नाही अथक परिश्रम करून तिने २००५ च्या NSSA National Championships मध्ये पहिले स्थान मिळवले. आज बेथनी जगातील एक ख्यातनाम व यशस्वी सर्फर आहे ते तिचा स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे, मेहनतीमुळे.
*छायाचित्र आंजावरून साभार
ज्या शार्कने बेथनीवर हल्ला केला होता त्या शार्कला घटना स्थळापासून काही अंतरावर एका कोळ्याने पकडून मारले होते. पोलिस तपासणीत समजले की शार्कच्या तोंडात बेथनीच्या सर्फ बोर्डचे अवशेष होते.
टायगर शार्क व बेथनीचा सर्फिंग बोर्ड.
*छायाचित्र आंजावरून साभार
सोल सर्फर ही बेथनी हॅम्लिटनची आत्मकथा आहे ज्यात तिचे पूर्वीचे आयुष्य, शार्क हल्ला व रिकव्हरी, हल्ल्यानंतरचे आयुष्याबद्दल वाचायला मिळते. ह्याच पुस्तकावर आधारीत सोल सर्फर नावाचा सिनेमा २०११ साली प्रदर्शित झाला होता ज्यात बेथनी हॅम्लिटनची भूमिका अॅनासोफिया रॉबने केली होती, चित्रपट पण छान जमला आहे.
अगदी सुरुवातीपासून खिळवून ठेवणारे पुस्तक आहे हे. बेथनीच्या शार्क-हल्ल्यापासूनच्या प्रवासात आपण ही नकळत कधी सामील होतो लक्षात ही येत नाही. तिच्या साहसाबद्दल कौतुक आहेच पण ह्या शार्क-बिटन सर्व्हायवरला, तिच्या कमालीच्या जिद्दीला मानाचा सलाम करावासा वाटतो.
सोल सर्फर बेथनी हॅम्लिटन
*छायाचित्र आंजावरून साभार
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 1:50 pm | मनिमौ
तिच्या जिद्दीला. मला इतके दिवस surfing हा साहसी व हौशी क्रिडा प्रकार वाटायचा. त्यात Sparha .असतात हे या लेखा वरून समजले.लेख फारच छान आहे.
8 Mar 2015 - 7:49 pm | आयुर्हित
Hats off to bethany!
सुंदर प्रेरणादायी सत्यकथा.धन्यवाद.
8 Mar 2015 - 8:10 pm | सविता००१
अतिशय सुरेख ओळख. धन्यवाद
8 Mar 2015 - 9:15 pm | अजया
छान ओळख! सलाम तिच्या जिद्दीला!
9 Mar 2015 - 12:46 pm | मितान
अतिशय प्रेरणादायी !
सानिका, अजून जरा सविस्तर लिही जमेल तेव्हा.. हे छोटंसं पण आवडलं.
पुस्तक शोधते आता.
9 Mar 2015 - 1:05 pm | Maharani
खुपच छान..प्रेरणादायी..
9 Mar 2015 - 6:11 pm | मधुरा देशपांडे
परिचय आवडला. पुस्तक वेळ मिळेल तेव्हा वाचेनच. त्याआधी चित्रपट नक्की बघणार.
9 Mar 2015 - 11:00 pm | आनन्दिता
सर्फिंग ह्या प्रकाराची मला खुप भीती वाटते. टीवीवर वगैरे सर्फिंग करणार्यांना पाहुन पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. मी जमैका ला सर्फिंग चा प्रयत्न केला होता, सर्फिंगबोर्ड वर साधं उभं रहाताना पण तोल सावरायला जमत नाही. तो तोल महाकाय लाटांच्या समोर म एका हाताने ती कसं सावरत असेल हे अकल्पित आहे.
एखाद्या गोष्टीचं केवळ वेड असावं लागतं, मग ती अशक्यप्राय असली तरी शक्य होते. बेथनी ने शाबित करुन दाखवलं. सानिके इतका भारी व्यक्तीमत्वाबद्दल माहीती करुन दिल्याबद्दल आभार.
10 Mar 2015 - 2:48 am | स्रुजा
वाह सानिका इतक्या प्रेरणादायी व्यक्ती ची ओळख करून दिलीस म्हणून खुप धन्यवाद. वाचताना पण अंगावर काटा आला.
10 Mar 2015 - 1:16 pm | प्रियाजी
खरोखरच बेट्नीच्या जिद्दीला सलाम. अन तुमच्या शोधक नजरेलाही. चित्रपट जरूर पाह्यला पाहिजे.
10 Mar 2015 - 5:27 pm | सस्नेह
अतिशय प्रेरणादायक वृत्तांत !
11 Mar 2015 - 10:06 pm | रेवती
बापरे! अशा अवघड प्रसंगातून सावरून उभे राहणे हेच कौतुकास्पद! अगदी हॉस्पिटलमधील चित्रातही बेथनीचा चेहरा कोमेजलेला नाही.
11 Mar 2015 - 10:55 pm | इशा१२३
खरच बेथनी घाबरलेली,रडकी दिसत नाहिये.त्यातुनच तिची जिद्द्,आत्मविश्वास दिसुन येतोय.प्रेरणादायी बेथनीची ओऴख करून दिल्याबद्दल धन्यवाद सानिका.
12 Mar 2015 - 5:04 am | स्पंदना
रेवाक्का आणि इशाशी सहमत.
मुळची डोळ्यातली चमक जरासुद्धा कमी झालेली दिसत नाही आहे बेथनीच्या.
बाई ग!! किती धिराच्या असतात काही व्यक्ती.
13 Mar 2015 - 5:04 pm | स्वाती दिनेश
बेटनी आवडली, सानिका छान ओळख!
स्वाती
13 Mar 2015 - 6:29 pm | जुइ
खूप छान ओळख करुण दिली आहेस. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
13 Mar 2015 - 8:28 pm | विशाखा पाटील
ओळख आवडली. काय जिद्द आहे!
13 Mar 2015 - 9:51 pm | प्रीत-मोहर
खूप छान ओळख
15 Mar 2015 - 3:05 pm | आरोही
मस्त लेख !!ओळख आवडली ..निवांत वाचायला ठेवलेल्या लेखांपैकी हा एक ...
16 Mar 2015 - 3:38 pm | पिशी अबोली
हिची कथा काही वर्षांपूर्वी पेपरमधे वाचली होती. आत्ता परवापण कुठेतरी बातमी वाचली की ही आत्ता प्रेग्नंट आहे आणि तरी सर्फिंग करतेय.
सलाम! __/\__
16 Mar 2015 - 9:12 pm | इनिगोय
धन्य आहे हिची!
सानि, लेख खूपच आवडला!
17 Mar 2015 - 7:02 pm | Mrunalini
Hats off to her.
सानि, लेख आवडला. मस्त जमलाय.
17 Mar 2015 - 10:41 pm | श्रीरंग_जोशी
बेथनीची ओळख आवडली. तिच्या जिद्दीला प्रणाम.
यावरून आठवले - डॅनिएला गार्सिया.
18 Mar 2015 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
बेथनीच्या जिद्दीला सलाम ! तिची ही प्रेरणादायक ओळख आवडली हेवेसांन.
19 Mar 2015 - 2:14 pm | कविता१९७८
छान ओळख! सलाम तिच्या जिद्दीला!
19 Mar 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी
परवाच हा लेख वाचला अन आज मराठी माध्यमांतही बेथनीबाबत बातमी वाचायला मिळाली.
सहा महिन्यांची गरोदर, एक हात शार्कने खाल्लेला पण तरीही लाटांवर स्वार
या निमित्ताने बेथनीला भावी मातृत्वासाठी शुभेच्छा देऊया.
17 Jun 2015 - 2:17 am | श्रीरंग_जोशी
बातमी: Shark Attack Survivor Bethany Hamilton Gives Birth to Baby Boy: One Arm Won’t Slow Her Down
आयुष्यातील नव्या भूमिकेसाठी बेथनीला शुभेच्छा!!
20 Mar 2015 - 3:57 pm | विभावरी
केवढी ही जिद्द !प्रेरणादायक आहे बेथनी !
25 Mar 2015 - 1:15 am | आतिवास
प्रेरणादायी ओळख.
26 Mar 2015 - 3:10 pm | स्वप्नांची राणी
मस्स्त प्रेरणादायी ओळख!! तिच्या याच पुस्तकावर आधारीत एक सिनेमा पण आलाय.
मला तो १२७ तास वाला पण असाच जिद्दीचा वाटतो..
17 Jun 2015 - 2:27 am | पद्मावति
अशा कथा ऐकल्या की मला लहान लहान गोष्टींची कुरकुर करतांना अगदी गिल्टी वाटतं.