कॉलेजच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या उद्घाटनासाठी जवळपास वीसेक वर्षांनी एकत्र भेटलेले क्लासमेट्स.. बर्याच वर्षांनी एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, नोस्टॅल्जीया, जुने चेहरे इतकया वर्षांनी दिसल्यावर उसळून आलेल्या आठवणी, ज्याच्या नावने हे म्युझिक डिपार्टमेंट चालू होतंय, त्या कायमच्या दुरावलेल्या मित्राच्या आठवणीनी हळवी झालेली मनं..
अशातच आगमन होतं सत्याचं. सत्या.. कॉलेजचा एक काळ गाजवलेला, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा सत्या. ज्याच्या स्टाईल आरशासमोर उभे राहून मुलं कॉपी करायचा प्रयत्न करायची, तो कॉलेजचा हीरो सत्या. ज्याच्या आवाजात एका हाकेत कॉलेज बंद पाडण्याची ताकद होती, असा सत्या. पण आता एवढ्या वर्षांनी समोर आलेला सत्या मात्र वेगळाच आहे. काहिसा गूढ, अंतर्मुख, विमनस्क वाटणारा. कोणत्यातरी प्रचंड दडपणाखाली असल्यासारखा दिसणारा. कोणालाही न सांगता अचानक गायब झालेला सत्या कुठे होता? काय करत होता? अनेक प्रश्नचिन्ह जमलेल्यांच्या चेहर्यावर उमटतात. आठवणींच काहूर उठतं. कोणत्यातरी विचित्र, अप्रीय घटनेमुळे या क्लासमेट्सची ताटातूट झाल्याचं त्यांच्यातल्या बोलण्यावरून समजतं आणि हे गूढ अजूनच वाढतं.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा "क्लासमेट्स" पहिल्या दृश्यापासूनच पकड घेतो, व वेगवान पटकथेच्या आधाराने पूर्ण वेळ प्रेक्षकांना गुंतवून ठेवून उत्तम मनोरंजन करतो. "नारबाची वाडी", "सतरंगी रे" सारख्या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शनकौशल्याची चुणुक दाखवणार्या आदित्यचा हा चौथा चित्रपट. प्रत्येकाला कायमच हवेहवेसे वाटणारे कॉलेजचे दिवस, त्यातली मौजमजा, राडे, प्रेमप्रकरणं, निवडणूका व त्यामधील डाव - प्रतिडाव, आणी या सर्वाच्या जोडीला किंचितशी रहस्याची किनार, असे गणीत त्याने उत्तम जमवून आणले आहे.
चित्रपटाची कथा उलगडत जाते ती जमलेल्या क्लासमेट्सच्या आठवणींच्या फ्लॅशबॅक मधून. रांगड्या व्यक्तिमत्वाचा सत्या (अंकुश चौधरी), त्याची तितक्याच दांडगट स्वभावाची, राडा घालायला सदैव तयार असलेली अप्पू (सई ताम्हणकर), त्यांना २ वर्षं जुनियर, खेळकर स्वभावाचा, सर्वांच्या गळ्यातला ताईत असलेला हरहुन्नरी कलाकार अनि (सिद्धार्थ चांदेकर), आमदाराचा पुत्र, शांत, सुसंस्क्रुत रोहित (सचित पाटिल), आणी कॉलेजच्य ट्रस्टीची पुतणी आदिती (सोनाली कुलकर्णी)यांच्याभोवतीचं हे कथानक. राडेबाज सत्या आणी अप्पूच्या ग्रुपविषयी रोहित आणी आदितीला जरा तिटकाराच असतो. पुढे काहि प्रसंगांनंतर आदितीचिइ त्यांच्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलतो, व कालांतराने ती सत्याच्या प्रेमात पण पडते. सत्यावर अव्यक्त प्रेम करणारी आदिती हे सर्व असहाय्यपणे बघत असते. पुढे कॉलेजच्या निवडणूकांच्या निमित्ताने सत्या आणी रोहित एकमेकांसमोर येतात आणी सुरू होते शह - कटशह आणी कुरघोडीची श्रूंखला. राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक कोणत्याही मार्गाने जिंकण्यासाठी दोन्ही विद्यार्थी संघटना इरेला पेटतात, आणी एका अनपेक्षित धक्कादायक घटनेपाशी येऊन हे सर्व थांबतं. कोणी कल्पनाही न केलेल्या या घटनेने सर्वांचं विश्वच बदलून जातं. हे नेमकं का घडतं? याचे पडसाद त्यांच्या भविष्यावर कसे उमटतात? सत्या अचानक गायब का होतो? हे सर्व पडद्यावरच पाहणं योग्य ठरेल.
वेगवान पटकथा आणी त्याच्या नेटक्या मांडणीमुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. कथेतले ट्विस्ट अत्यंत धक्कादायक जरी नसले, तरी कथेचा वेग राखल्याने चित्रपट मनोरंजक झाला आहे. याचं श्रेय दिग्दर्शकाला द्यायलच हवं. संवाद ही क्लासमेट्सची एक मोठी जमेची बाजू आहे. सर्व पात्रांच्या तोंडी असलेले संवाद अगदी नैसर्गिक आहेतच. चित्रपटातील सर्व पात्र जिवंत वाटावीत यामधे संवादांचा वाटा मोठा आहे.
कॉलेजची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात सर्वात महत्वाची (व बरेचसे चित्रपट ज्यामुळे साफ फसतात ती) गोष्ट म्हणजे केमिस्ट्री. कलाकारांची योग्य निवड, आणी त्यांनी अत्यंत सहजसुंदर वाटावा असा केलेला अभिनय, यामुळे हे गणीत इथे व्यवस्थीत जमून आलं आहे. काही प्रसंग तर अक्षरशः आपण एखाद्या कॉलेजच्या कट्ट्यावर बसून बघतोय असं वाटावे इतके जिवंत झाले आहेत. सर्वच मुख्य कलाकारांचा अभिनय केवळ अप्रतीम. अंकुश चौधरी आणी सई ताम्हणकरला सर्वात जास्त वाव आहे आणी दोघांनीही भूमीका लाजवाब साकारल्या आहेत. त्यांची संवादफेक, देहबोली, सर्वच अप्रतीम. सचित पाटीलनेही शांत, संयमी, तितकाच खुनशी रोहित मस्तच उभा केलाय. पण सर्वात भाव खाऊन जातो तो सिध्दार्थ चांदेकर. त्याच्या वाट्याला आलेली आजपर्यंतची ही सर्वोत्तम भूमिका असेल व त्याने याचे सोने केले आहे.
अमितराज, अमर विश्वजीत, ट्रोय- आरिफ, पंकज पडघम अशा संगीतदिग्दर्शकांच्या भल्यामोठ्या फौजेने दिलेलं संगीत नुसतंच श्रवणीय नव्हे तर लक्षात राहण्याजोगं. विशेषतः "यारियां" , "आला रे आला राजा" नंतर कितीतरी वेळ कानात रुंजी घालत राहतात.
जवळपास ३ तासांच्या या चित्रपटाची लांबी वीसेक मिनिटांनी कमी करता आली असती तर तो अधिक वेगवान झाला असता हे मात्र नक्की. विशेषतः उत्तरार्धात चित्रपट थोडासा रेंगाळल्यासारखा वाटतो. काही प्रसंग अंमळ शब्दबंबाळही झाले आहेत. पण या त्रुटी अगदीच नगण्य (त्यांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास "स्मॉल आहेत रे..").
मराठी चित्रपटात अभावानेच आढळणारं ग्लॅमर, वेगवान मनोरंजक कथा, व सहजसुंदर नैसर्गीक अभिनया मुळे क्लासमेट्स करमणूकीच्या सर्व निकषांवर पुरेपूर उतरतो. साधारण याच पार्श्वभूमीवर बेतलेल्या, नुकत्याच येऊन गेलेला "दुनियादारी" बघून जो मनस्ताप झाला होता, त्याचा उतारा क्लासमेट्स बघून झाला, हे मात्र नक्की.
प्रतिक्रिया
26 Jan 2015 - 7:27 pm | खमक्या
हुर्रे... मी पयला.
दुनियादारी पार्ट २ आहे असं प्रोमोज् वरुन वाटत होतं. (आता तर खात्रीच झाली)
26 Jan 2015 - 8:09 pm | स्वामी संकेतानंद
सस्पेन्स थ्रिलर आहे.बघू शकता.
26 Jan 2015 - 10:15 pm | खमक्या
स्वामींची आज्ञा मानली पाहिजे. बघावा म्हणतो
26 Jan 2015 - 10:25 pm | स्वामी संकेतानंद
सस्पेन्स सांगू का? ;)
26 Jan 2015 - 10:37 pm | श्रीरंग
दुनियादारी सारखा अजिबातच नाही. त्यापेक्षा शतपटींनी चांगला आहे. अवश्य पहा.
26 Jan 2015 - 7:33 pm | मोहनराव
छान परिक्षण!
दुनियादारी बकवास वाटला होता. कदाचित जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे असेल.
26 Jan 2015 - 7:38 pm | एस
असेच म्हणतो.
26 Jan 2015 - 8:06 pm | स्वामी संकेतानंद
मी पाहिला नाही अद्याप कारण मूळ मलयाळम क्लासमेट्स पाहिलाय. ओरिजनल बघितल्यावर रिमेक बघण्याची इच्छा उरत नाही. सस्पेन्स पिक्चर तर मुळीच नाही कारण सगळी स्टोरी आधीच माहीत असते.. :(
26 Jan 2015 - 11:20 pm | सतिश गावडे
मी मुळ मल्यालम चित्रपटाचा तेलुगू रिमेक पाहिला आहे. तेलुगू रिमेकची गाणी खुप आवडली होती.
27 Jan 2015 - 6:13 am | खटपट्या
बघावाच लागेल.
27 Jan 2015 - 8:53 am | स्पंदना
भारी परिक्षण!!
27 Jan 2015 - 2:07 pm | गणेशा
परिक्षण सुरुवात आणि शेवट वाचला... कारण काहीही मत नोंदवले असले तरी पाहणार आहेच हे नक्की आहे म्हणुन परिक्षण वाचले नाही. नंतर वाचेन
27 Jan 2015 - 4:30 pm | प्रचेतस
परिक्षण आवडलं.