शेअरबाजार आणि धोका (Risk) या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. आज मात्र या बाबतीत नक्की खरे काय ?? ह्याचा उहापोह करायचा, आणि जमलेच तर सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेल्या 'धोका' या भुताला बाटलीबंद् करुन गुंतवणुकीच्या समुद्रात सोडुन द्यावयाचे, ह्या ईराद्याने हा लेख लिहितो आहे. असे म्हणतात की एक चित्र हे हजार शब्दांपेक्षा अधिक बोलके असते... दुर्दैवाने माझी चित्रकला ‘भयंकर’ या श्रेणीत मोडत असल्याने मी या सत्यवचनात चित्रा ऐवजी 'उदाहारण' असा माझ्यापुरता बदल करतो आणि ह्या 'शेअर बाजारातील धोका' ह्या मुद्द्यावरुन माझ्या व्यावसायिक जीवनातील एक सत्य अनुभव प्रथम आपल्याला सांगतो सन 1999... माझा मित्र सतीशने मला कंपनीच्या कॅंटीन्मध्ये हाक मारली आणि म्हणाला "अरे प्रसाद, बाबा रिटायर्ड होतायत पुढ्च्या आठ्वड्यात, तुझ्याकडे यायचय त्याना. मिळालेले पैसे कसे गुंतवायचे सांग जरा..."का नाही ?? नक्की ये, मी वाट पहातो"- मी.
ह्या सतीशचे वडील टेल्कोमध्ये अधिकारी होते. सहाजिकच माझ्या दृष्टिने एक मोठा क्लायंट मिळु पहात होता, त्यामुळे सतिश त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे येण्याची वाट पहाण्यांत वेळ न दवडता लवकरच सतीशबरोबरच मीच त्याच्या घरी गेलो. जाताजातानाच "बाबांना शेअर्समध्ये एकही पैसा गुंतवायचा नाही. तु उगीच त्याचा आग्रह धरु नकोस हो, नाहीतर ते तुझ्याकडुन काहीच करणार नाहीत.. दुसरे काही फिक्स डिपॉझिटस, बॉन्ड्स वगैरे असल्यास सांग" सतिशने खरेतर माझ्या व्यवसायाविषयीच्या काळजीपोटी, पण प्रत्यक्षांत माझ्या उत्साहावर विरजण घालणारे सुतोवाच केले..... मग घरी पोहोचल्यावर चहापाणी होताच काकांनी माझा ताबा घेतला. ते राजकारण, महागाई, आजची तरुण पीढी..., अशा नेहमीच्या सगळ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करीत असताना मी महतप्रयासाने गाडी गुंतवणुकीच्या स्टेशनाकडे वळवली, पण व्यर्थ... काकांचे त्याबाबतचे नियोजनही झाल्यातच जमा होते. टेल्को कपनी त्यांना त्यांच्या ठेवीवर स्पेशल 1% अधीक व्याज देणार होती, याशिवाय स्वयंसेवकी विचारसरणीशी बांधिलकी सांगणाया पुण्यांतील एक प्रसिद्ध बॅंकेनेही अशा निवृत्तांसाठी एक विषेष योजना काढल्यामुळे सदरहुची बॅंक व टेल्को कंपनी यांत फिक्स्ड डिपॉझिटस, व जोडीला पोस्टाची कोणतीशी मासिक पेन्शन योजना ...काकांनी नियोजनचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला होता. ".पण काका, मी काय म्हणतो..." काकांचे बौद्धीक ऐकुन कंटाळ्ल्याने मी धीर करुन त्यांना थांबवले. " मला असे वाटते की तुम्ही 30/35 वर्षे नोकरी केलीत टाटांकडे, आता जरा मालक बना की कंपनीचे !!," यावर काका गोधळलेले दिसले म्हणुन मी पुढे म्हटले. " काका, बाकी करा एफ.डीज तुम्ही ठरवल्याप्रमाणे, पण 25/30,000 रुपयांचे टेल्कोचे शेअर्स घ्या" ... " अरे काय सांगतोयस काय तु ? टेल्कोचे शेअर्स घ्या?? अंधार आहे अंधार. ..आमचे दिवस बरे गेले..पुढे काही खरे नाही" काका पुन्हा 'सुरु' झाले. दरम्यान मी ही थोड्या आग्रहानेच माझा मुद्दा त्यांना पटवुन देवु लागलो. तसाही तो तसा मंदीचाच काळ होता आणि श्री.रतन टाटांच्या इंडिकाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्मुळे टेल्को संकटात आली होती. या पार्श्वभुमीवर लवकरच काकांच सुर त्रासिक वरुन रागीट या पट्टीत बदलेल अशी भीती मला वाटु लागली. सतिशनेही एकंदर रागरंग बघुन मला "चला,.निघुया....” अशी खुण केली, आणि "छेSS नको रे हे शेअर्सचे लचांड, घामाचा पैसा असतो आपला, लाखाचे बारा हजार होणे अजिबात नाही झेपणार आपल्याला या वयात" या भरतवाक्याने आमच्या मीटींगची सांगता झाली.
गेली काही वर्षे तोट्यात असणारी, एकदाही लाभांश देउ न शकणारी बॅक केवळ 'आपल्या माणसांची' आहे म्हणुन अन्य कोणतीही शहानिशा न करता आपली आयुष्यभराची पुंजी त्यांच्याकडे सोपविणारे आपण एकीकडे टाटांच्या प्रामाणिकपणावरही विश्वास दाखवतच असतो, मात्र याच टाटांच्या उद्योगांतील एका वीटेचाही मालक बनायला आपण का तयार नसतो?? हे मला आजतागायत कळलेले नाही. .......बाकीचे राहु द्या, श्री. काकांना त्यांच्या डिपॉझिटस वर किती व्याज मिळाले त्याचा हिशेब माझ्याकडे नाही पण एक सत्य मात्र नक्की, ते म्हणजे त्यावेळी दोन आकड्याच्या भावात (रु.100 पेक्षा कमी) मिळत असलेल्या टेल्कोच्या शेअरचा आजचा भाव रु. 2250 आहे, त्या वेळच्या एका 10 रु. मुळ किंमतीच्या शेअरचे आता प्रत्येकी 02 रु.चे 05 शेअर्स झाले आहेत ही बाब कृपया लक्षांत असु द्या. याशिवाय राईट्स म्हणुन मिळालेले शेअर्स आणि दरवर्षी मिळालेला घसघशीत डिव्हीडंड वेगळाच आणि हे ही पुरेसे नाही म्हणुन की काय हा सगळा फायदा चक्क टॅक्स फ्री !!!
हा, पैसे फिक्स्ड डिपोझिट्स मध्ये ठेवण्याचा, विषय माझ्या खास जिव्हाळ्याचा आहे, कदाचित आपणास माझे प्रतिपादन रुचणार नाही परंतु मला आपणास एक अनाहुत सल्ला द्यायला आवडेल. तो हा, की जर आपण अतिविशिष्ट स्वरुपात मोडणारे गुंतवणुकदार (उदा. खु्पच वयस्कर किंवा सीमेवर तैनात जवान ई.) नसाल, तर केवळ आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आपण एफ.डीज कराव्यात.. अगदी अल्पकालीन गुंतवणुक म्हणुनही लिक्विड फंड्स सारखा पर्याय मला अधीक सोयीचा वाटतो. म्हणजे हे पहा.. तुम्ही आपल्याकडील सुपिक जमीन स्वत: काहीही न करता दुसयास कसावयास देणाया शेतकयाची संभावना कशी कराल ?? आता राग मानु नका, पण खरे म्हणजे बेंकेत एफ.डी ठेवणारे आपणही याच शेतकयाच्या जातकुळीतले आळशी, कल्पनाशुन्य नाही काय ? दोघेही त्यांच्याकडील एकमेव उपलब्ध ऐवज, ज्यातुन अक्षरश: विश्व निर्माण करता येते, त्याचा वापर फक्त दुसयाला देण्यासाठी करतात….. एक आपली जमीन दुसयाला वापरावयाला देतो आणि दुसरा आपले पैसे.!!!
या मुद्द्यावर अधिक सांगोपांग, सखोल विष्लेष्ण येथे जागे अभावी शक्य नाही मात्र कोणाची ईच्छा असल्यास मला ते व्यक्तीगत स्वरुपात करायला नकीच आवडेल
आपण दिलेले असे आपलेच पैसे वापरुन समाजातील उद्यमशील वर्ग म्हणजेच टाटा, बिर्ला अणि अंबानी ई सारखी. मंड्ळी कारखाने उभारतात, उत्पादनक्षमता वाढवितात आणि बाजार त्यांच्या वस्तुंनी भरुन टाकतात. आपल्या कोरड्या, पोकळ टीकेचे आणि बक्कळ मायेचे धनी होतात !! त्यातुन होणाया नफ्यांतुनच त्यांना आपल्याला, म्हणजे ठेवीदारांना किती व्याज दर द्यावयाला परवडेल हे ही तेच ठरवितात, आणि आपण अशा त्यांनी ’दिलेल्या’ व्याजातुन आपल्याला मिळालेले उत्पन्न त्यांच्याच घेतलेल्या उत्पादनांच्या किंमतीतुन त्यांना इमानईतबारे साभार घरपोच करतो हे कधी आपल्या लक्षांत आले आहे का ??
तुम्ही, मी आपण आपले 1000 रु. बेकेत व्याजाने ठेवतो तेंव्हा आपल्याला किती रु. व्याज मिळते हे मी सांगायला नकोच, त्या पेक्षा मी आपल्या बाजारांत सहजी उपलब्ध असणा-या काही 'दादा' कंपन्यांच्या फायद्याची ताजी आणि अधिकृत आकडेवारी देतो. आपली स्टेट बॆक तिच्या प्रत्येक 10 रु. च्या शेअरमागे रु.41.79 एवढा नफा (उपार्जन) मिळविते, रिलायन्स च्या बाबत हाच आकडा रु.61 एवढा आहे. टीसीएस प्रतिशेअर (01 रु.चा,रु.10 चा नव्हे) नफा 53 रुपये आणि हिंदुस्थान लीव्हरचा (पुन्हा शेअर रु. 01 चा) रु.12.46 एवढा प्रचंड आहे. येथे मी केवळ काही निवडक उदाहरणे केवळ नमुना म्हणुन घेतली आहेत. ह्या ह्या एकाच घटकाच्या आकडेवारीवरुन अशा कंपन्यांची आपापसात तुलना करणे अजिबातच चुकीचे ठरेल, मात्र आपल्याला मिळ्णा-या व्याजाच्या दराची तुलना यांच्या मिळकतीची जरुर करता येइल…… नव्हे आपण ती करावीच करावी. याहुनही लक्षांत घेण्याची गोष्ट ही, की ह्या सर्व कंपन्या हा असा ’दाबुन’ नफा फक्त काल परवा नव्हे तर वर्षानुवर्षे, पेक्षा दशकानुदशके अव्याहतपणे मिळवत आहेत
सर्वसामान्य माणसे या कंपन्यांच्या नवनविन आणि गुणवत्तापुर्ण उत्पादनांची भुरळ पडुन ती विश्वासाने नेहमीच विकत घेतात. मात्र या कंपन्याची अशी उत्पादने सातत्याने बाजारांत आणण्याची, ती खपविण्याची आणि त्यापासुन अपरंपार फायदा मिळविण्याची त्या वर्षानुवर्षे बाळगुन असलेली अजोड क्षमता अ विकत घेताना आपण अपवादानेच दिसतो.अशी क्षमता विकत घेणे म्हणजेच दुसरे तिसरे काही नसुन ह्या कंपन्याचे शेअर्स विकत घेणे होय.
विचारसरणीच्या ह्याच फरकामुळॆ काही लोक त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांकडॆ ’लिफ्ट’ मधुन जाताना दिसतात आणि आपण मात्र महागाईच्या नावाने धापा टाकत जिन्याने चढ्त असतो.
अर्थात, ज्या प्रमाणे ईसापनीतीतील गोष्टीत मेंढ्यांच्या कळपात कधीकधी कातडी पांघरलेला लांडगा असतो आणि जगतगुरु तुकोबारा यांच्या वारीतही एखादा चोर सामील असतो तसेच येथेही आहे. बाजारांत उपलब्ध असलेला प्रत्येक शेअर आपल्यासाठी संपन्न्तेकडे नेणारा सोपानच असेल या भ्रमांत बिलकुलच राहु नये. खरेतर येथेही अन्य बाजारांप्रमाणेच दिखावु मालाचीच खोगीरभरती जास्त आहे, ज्यांच्यामुळेच अनेकदा शेअर बाजार हा बदनाम झाला, ब-याच प्रमाणांत अस्पृश्य राहिला आहे. यावर योग्य निवड करण्याच्या उपाय म्हणजे मी याच लेखात वर उल्लेख केला आहे तशा 'दादा' म्हणजेच बाजारांतील प्रमुख, नियमित लाभांश देणा-या, सतत मोठ्या प्रमाणावर नफा कमाविणा-या वा प्रमुख निर्देशांकात समाविष्ट असणा-या कंपन्यांचीच निवड करावी.
मला या व्यवसायातील प्राथमिक धडे देणारे श्री. कारखानीस सर नेहमी सांगायचे की 'हे पहा, अशा कपन्यांचेच शेअर आपल्या फोलियोत ठेवावे, की ज्या तुला घरातुन शेजारच्या बसस्टॉप पर्यंत जातानाही दिसतील' . स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, पण तरीही खुलासा करतो की त्यांना असे म्हणावयाचे असे की अशा कंपन्या, ज्यांची उत्पादने पावला पावलावर तुम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवुन देतात, अशाच कंपन्यांवर तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी अवलंबुन राहु शकता. आ श्री. सरांचे हे म्हणणे मला शत-प्रतिशत मान्य आहे, किंबहुना ह्या लेखाचा रोखही फक्त अशाच कंपन्यांकडे आहे.
याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण येथे मध्यम वा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार करतो आहोत, अल्पकालीन, ट्रेडिंग, वा सट्टेबाजी या दृष्टिकोणातुन नव्हे. सर्वसामान्यांसाठी थोडेशी क्लिष्ट पण या दोन्हीमधील (गुंतवणुक वि. सट्टेबाजी) निर्णायक फरक सांगणारी टिपण्णी सर बेंजामिन ग्रॅहम यांनी केली आहे. ते म्हणतात. Investing is an activity of forecasting the yield on assets over the life of the asset, whereas Speculation is the activity of forecasting the psychology of the market.
एकंदरीत, ’विचार बदला --- नशिब बदलेल’ हे सत्पुरुष वचन आपण ऐकलेच आहे, ते अंमलांत कधी आणावयाचे ते ही आपल्याच हाती आहे नाही का ?
प्रसाद भागवत -
10-06-2014
प्रतिक्रिया
14 Jan 2015 - 1:30 pm | जेपी
लेख आवडला.
(सिक्युरिटी फंड प्रेमी)जेपी
14 Jan 2015 - 1:38 pm | अनुप ढेरे
छान लेख, आवडला.
14 Jan 2015 - 2:01 pm | सविता००१
आणखी लिहा हो या बाबत
14 Jan 2015 - 2:03 pm | शलभ
आवडला लेख..
ईथेच होऊन जाऊदे विश्लेषण. भरपूर जागा आहे. :)
14 Jan 2015 - 2:22 pm | पगला गजोधर
लेख छानच ! पण तुम्ही तुमच्या कारखानीस सरांप्रमाणे मला (माझ्यासारख्या) रुकीज् ना, साधारण ५० वाक्ये सिंगल लायनर नॉलेज-नगेट/नियम/ स्त्र्याटेजी (वन मिनिट म्यानेजर सारखे )देऊ शकाल का ? उदा "अशा कपन्यांचेच शेअर आपल्या फोलियोत ठेवावे, की ज्या तुला घरातुन शेजारच्या बसस्टॉप पर्यंत जातानाही दिसतील' ." वै. या वाक्यात खालील आपेक्षित आहे. (५ वी नापास मुलाला देखील समजेल अश्या शब्दात )
१ कोणते शेअर घ्यावे (उदा सेन्सेक्स / निफ्टी मधीलच )?
२ कधी घ्यावे ? किती घ्यावे ? कोणत्या भावाने घ्यावे ? मुल्य (बाजारभाव नाही) कसे ठरवावे ?
३. कधी विकावे ? किती विकावे ? कोणत्या भावाने विकावे ?
४. दीर्घकालीन मुनाफा वसुली कशी करावी.
14 Jan 2015 - 4:10 pm | राजाभाउ
+१
असेच म्हणतो. कुठले शेयर्स घ्यावेत हे ठरवणे तुलानेन ठरवणे सोपे असते. पण ते काय किमतीला घ्यावेत व केव्हा विकावेत याचा अंदाज येण्यासाठी काही सुत्र वगैरे असल्यास गुंतवणुक करणे सोपे होइल अर्थात असे कुठलेही सुत्र १००% चालेल अशी अपेक्षा नाही तरीही अशी गणिती पध्दत गुंतवणुकधारकाला एक प्रकारचा कॉन्फिडंस देइल.
14 Jan 2015 - 8:32 pm | प्रसाद भागवत
गजोधर साहेब, मी अन्यत्र लिहिलेल्या लेखमालिकेतील हा एक लेख आहे अन्य लेखांत आपण विचारेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी येथे काही भाग पुन्हा टाकतो......" साधारणतः 20/22 वर्षांपुर्वी, माझ्या बाजाराशी ओळ्ख होण्याच्या सुमारास एका वयस्क आणि यशस्वी दलाल असलेल्या गुजराथी गृहस्थांच्या कार्यालयांत मी नित्यनेमाने जात असे, त्यांच्याकडे आलेल्या अनेक अशीलांना ते देत असलेला कानमंत्र, जो मला स्वतःलाही मोठ्या प्रमाणांत फायदेशीर ठरला आहे, आज परिस्थितीनुरुप थोडेसेच बदल करुन मी आपल्याबरोबर आनंदाने शेअर करतो. या तोडग्याप्रमाणे (हा त्यांचाच खास शब्द बरं का) (1)वर्षभरांत आपण करणार असलेली गुंतवणुक साधारणतः 14/15 'मुहुर्ताच्या' दिवसांत समप्रमाणात विभागा..हे दिवस अगदी कोणतेही असुद्यात, म्हणजे आपण मानतो ते साडे-तीन शुभ मुहुर्त, वा कुटुंबातल्या सदस्यांचे वाढदिवस, आपल्या वैयक्तीक आयुष्यांतील एखादा विषेष दिवस वा असेच काही.. सामान्यतः हे निवडक दिवस पुर्ण वर्षभर विखुरलेले असावेत ईतकेच. म्हणजे अगदी एका आठ्वड्यात 2/3 असे नसावेत. (2) आता आपले जीवन ज्या दैनंदीन व्यवहार्य गोष्टींशिवाय अपुर्ण आहे किंवा ज्या उत्पादनांशिवाय आपले जीणे मुश्कील होईल असे आपणास वाटते, अशी गुंतवणुकीची तितकीच( मुहुर्ताच्या दिवसां एवढी) मात्र निरनिराळी क्षेत्रे निवडा . उदा. औषधे, लोखंड, वहाने, वीज, बॅंकिंग ई. (३) मग अशा प्रत्येक क्षेत्रातली बाजारांत असलेली 'अग्रगण्य' कंपनी निवडा. उदा. लोखंड म्ह्टल्यास टाटा स्टील, बॅंकिंग मधुन स्टेट बॅक (वा ICICI किंवा HDFC बॅक ही असु शकेल) शेवटी तुमची पसंती महत्वाची. (3) आणि आता प्रत्येक मुहुर्ताच्या दिवशी आपल्या निवडलेल्या टीम मधला एक शेअर क्रमाक्रमाने विकत घ्या.. दॅट्स ऑल.!!!..., शेटजींच्या मते दिवस कोणतेही असोत आणि टीममधील प्लेयर्स कोणतेही, पैसा 'बनविण्यासाठी' या सारखी सोपी पध्द्त नाही, मला सांगावयास हवे की मी व्यक्तीशः या प्रतिपादनाशी पुर्णतः सहमत आहे. अर्थात या पद्ध्तीत फक्त अग्रगण्य वा ब्ल्यु- चीप कंपन्यांचीच निवड टीममध्ये होवु शकते हे मी पुन्हा एकदा ठसवु ईच्छितो. या शिवाय, तीन चार वर्षांनी अगदी आवश्यकता वाट्ल्यास (2) प्रमाणे निश्चित केलेले मुळ प्रभाग किंवा टीममधील एखादा भिडु यांत संतुलन साधण्यासाठी एखादा बदल करणेही उचित ठरते
15 Jan 2015 - 2:48 pm | संचित
अगदी कोणालाही जमेल अशी पद्धत आहे. धन्यवाद. प्रयत्न करून पाहू.
15 Jan 2015 - 5:00 pm | संदीप डांगे
तुमच्यासारखे व्यवस्थित सांगणारे नाही भेटत हो.
माझेकडे येसबँक चे रु. २९० चे आसपास घेतलेले शेअर होते. मार्केटचा काही अनुभव अक्कल नसल्याने घाबरून लगेच ३ महिन्यात विकले आजपर्यंत ठेवले असते तर… आज भाव रु. ८१२.
14 Jan 2015 - 2:24 pm | मराठी_माणूस
छान सुरुवात.
अजुन येउ द्यात.
14 Jan 2015 - 2:57 pm | बोका-ए-आझम
आवडला! माहितीबद्दल धन्यवाद. याच विषयावर एखादं नियमित सदर का चालू करत नाही?
14 Jan 2015 - 3:02 pm | टवाळ कार्टा
ईंडेक्स फंड बद्दल सुद्दा लिहा
14 Jan 2015 - 3:42 pm | पदम
खूप छान माहीति. मलाहि शेअरबाजारात पैसे गुन्तवायला आवडेल. जर अजुन माहिति मिळालि तर बर होइल. मी AIWMI मधुन Credit Research Analyst च प्रशिक्षण घेण्यास सुरवात केलि आहे. अजुन माहीति मिळाली तर नक्किच मदत होइल.
14 Jan 2015 - 3:55 pm | मार्मिक गोडसे
मात्र याच टाटांच्या उद्योगांतील एका वीटेचाही मालक बनायला आपण का तयार नसतो?? हे मला आजतागायत कळलेले नाही. ......
फक्त एक शेअर खरेदी करून एखाद्या नामांकीत कंपनीचे मालक होण्याचा सर्वात स्वस्त व कायदेशीर मार्ग.
तुम्ही आपल्याकडील सुपिक जमीन स्वत: काहीही न करता दुसयास कसावयास देणाया शेतकयाची संभावना कशी कराल ?? आता राग मानु नका, पण खरे म्हणजे बेंकेत एफ.डी ठेवणारे आपणही याच शेतकयाच्या जातकुळीतले आळशी, कल्पनाशुन्य नाही काय
हे वाचल्यावर मला माझे बाबा (वडील) व त्यांचा बागायदार मित्र ह्यांचा शेअर मार्केट ह्या विषयावर झालेला वाद आठवला व तो लिहिण्याचा मोह आवरत नाही.
14 Jan 2015 - 4:06 pm | आदिजोशी
खरे म्हणजे बेंकेत एफ.डी ठेवणारे आपणही याच शेतकयाच्या जातकुळीतले आळशी, कल्पनाशुन्य नाही काय
ह्या वाक्याशी पूर्णपणे असहमत. तुम्ही गुंतवणूक सल्लागार असल्याने त्या नजरेतून हे वाक्य लिहिलंय. शेअर बाजारत पैसे गुंतवायला, त्यातून नफा मिळायला तुम्हाला एक तर स्वतःला प्रचंड वेळ हवा किंवा योग्य सल्लागार हवा. शेअर मार्केट मधे पैसे बुडाल्याची आणि सल्लागाराने हातोहात फसवल्याची शेकड्याने उदाहरणं आहेत.
त्यामुळे ज्याला वेळ नाही त्या मनुष्याने कमी व्याज मिळालं तरी चालेले पण गुंतवणूक सेफ राहील म्हणून एफ.डी करणं अजिबात चुकीचं नाही.
मी स्वतः वेळ असताना शेअर बाजारात पैसे गुंतवलेत आणि बर्यापैकी नफाही कमावला आहे. आता गुपचुप एफ.डी करतो.
रोज उठून मार्केट बघायला नको आणि बाजार कोसळला तर गो* कपाळात जायला नको.
14 Jan 2015 - 4:29 pm | वेल्लाभट
हे खरं आहे. ते वर खाली ने 'गो' क'त जाणं लई वाईट. एफडीत ते बाकी नसतं.
14 Jan 2015 - 4:51 pm | प्रसाद१९७१
शेयर बाजारात गुंतवणुक करायला "योग्य" सल्लागार असूच शकत नाही.
ज्याला त्यातले खरेच कळते आणि त्यातुन पैसे कमवता येतात. तो सल्ला देण्यात वेळ घालवत बसणार नाही. त्यापेक्षा तो वेळ वापरुन अजुन पैसे मिळवेल.
कोणी सल्ला ( फी घेउन ) देतो म्हणले किंवा २०-३० टक्के प्रत्येक वर्षी परताव्याची हमी द्यायला लागला तर त्याला म्हणावे मी पैसे तुला देतो आणि तू मला फक्त १५% परतावा दे प्रत्येक वर्षी. जास्तीचा काय फायदा होइल तो तू घे.
14 Jan 2015 - 8:22 pm | प्रसाद भागवत
प्रसादराव, एकदा आवर्जुन भेटा. थोड्या गप्पा मारु ज्यात बाकीचे खुलासे करेन. तुर्तास एवढेच.
14 Jan 2015 - 8:11 pm | प्रसाद भागवत
जर बॅंका म्हणजे राष्ट्रीयीकृत आणि शेअर्स म्हणजे ब्ल्युचीप 10/12 कपन्या, आणि गुंतवणुक म्हणजे दीर्घकालीन असे ठरवले तर १०० पैकी ९९ वेळा काहीही न करता तुम्हाला FD पेक्षा अधीक परतावा मिळतो, त्याकरिता तुम्हाला खास वेळ वगैरे खर्च करणे, २४ तास डोळ्यांत तेल घालुन दक्ष रहाणे, रोज उठुन मार्केत पहाणे, असे काहीही करावे लागत नाही. माझ्या अन्य लेखांत मी हे अधिक विस्ताराने लिहिले आहे, तेच लेख येथेही परत टाकेनच.
आता सल्लागाराचे बोलावयाचे तर जर आपल्याला साधा नळ दुरुस्त करणारा प्लंबर ते मग आर्किटेक्ट,डॉक्टर असे विविध सल्लागार लागत असतातच की, त्यात समजा एक वाढला..एवढे काय त्याचे ??
14 Jan 2015 - 11:04 pm | अमेरिकन त्रिशंकू
असहमत. तुमची गुंतवणूक जर डायव्हर्सिफाईड असेल तर शेअरबाजारात पैसे बुडण्याचा धोका खूप कमी करता येतो.
14 Jan 2015 - 4:51 pm | तुषार काळभोर
आवडला.
पुभाप्र...
(लगे रहो!)
14 Jan 2015 - 6:05 pm | मुक्त विहारि
पुभाप्र..
14 Jan 2015 - 7:32 pm | दिलिप भोसले
मला स्वताला ही माहिती खूपच आवडली. मी स्व:ता गेले १५ वर्षे शेअर्स बाजारात गुंतवणूक करीत आहे. माझा अनुभव असा आहे की प्रतेक वक्तीची शेअर्स मधे काहीतरी गुंतवणूक हवीच,संयम व योग्य निवड हे या बाजाराचे सूत्र आहे.पारसी व गुजराथी समाज यामध्ये खूपच आघाडीवर आहे. खरतर शेअर बाजार या विषयासाठी एक नियमित सदर सुरु करावे जेणे करून वाचकांना त्याचा लाभ होईल. धिटाई खाते मिठाई, हे लक्षात ठेवावे. वेळे अभावी मी आता लिहू शकत नाही परंतु या विषयावर मी सविस्तर नक्कीच लिहणार आहे.
13 May 2016 - 3:43 pm | स्थितप्रज्ञ
वाट बघतोय...अवश्य लिहा.
14 Jan 2015 - 7:58 pm | आयुर्हित
एक शंका: वर दिलेल्या किमतीत मला शेअर घ्यायचे आहेत, कुठे मिळतील तेही सांगा.
आपण चुकीची किंवा अर्धवट माहिती देत आहात, असे दिसते.
उदा: आपल्या लेखात आपण दर्शनीमूल्याचाच विचार करतात पण त्याऐवजी बाजारभावाचा केला पाहिजे.
"तुम्ही, मी आपण आपले 1000 रु. बेकेत व्याजाने ठेवतो तेंव्हा आपल्याला किती रु. व्याज मिळते हे मी सांगायला नकोच, त्या पेक्षा मी आपल्या बाजारांत सहजी उपलब्ध असणा-या काही 'दादा' कंपन्यांच्या फायद्याची ताजी आणि अधिकृत आकडेवारी देतो. आपली स्टेट बॆक तिच्या प्रत्येक 10 रु. च्या शेअरमागे रु.41.79 एवढा नफा (उपार्जन) मिळविते, रिलायन्स च्या बाबत हाच आकडा रु.61 एवढा आहे. टीसीएस प्रतिशेअर (01 रु.चा,रु.10 चा नव्हे) नफा 53 रुपये आणि हिंदुस्थान लीव्हरचा (पुन्हा शेअर रु. 01 चा) रु.12.46 एवढा प्रचंड आहे. येथे मी केवळ काही निवडक उदाहरणे केवळ नमुना म्हणुन घेतली आहेत. ह्या ह्या एकाच घटकाच्या आकडेवारीवरुन अशा कंपन्यांची आपापसात तुलना करणे अजिबातच चुकीचे ठरेल, मात्र आपल्याला मिळ्णा-या व्याजाच्या दराची तुलना यांच्या मिळकतीची जरुर करता येइल…… नव्हे आपण ती करावीच करावी."
14 Jan 2015 - 8:19 pm | प्रसाद भागवत
आयुर्हित राव, हा लेख ३/४ महिन्यापुर्वी प्रसिद्ध झाला असुन प्रति शेअर नफ्याची ही अत्यंत अधिकृत माहिती आहे. मी कपन्या प्रतिशेअर किती नफा मिळावितात हे सुचित केले आहे, शेअरचा भाव सहाजिकच वेगळा आणि दर्शनीमुल्यापेक्षा जास्त आहे हे उघडच आहे.. मात्र कंपन्याची ही नफा मिळविण्याची अचाट क्षमता दीर्घ्काळांत कायम असते याचा आपणास फायदा होतो असे मला सुचवायचे आहे. या आत्ताच्या प्रतिसमभाग मिळकतीवरुन व या नह्याचे प्रमाणात होणार्या वाढीवरुन भविष्यातील संभाव्य भाव ई. गणिती भाग थोडा क्लिष्ट असल्याने मी तो तपशीलत दिलेला नाही.
14 Jan 2015 - 8:31 pm | आयुर्हित
पण आपल्या लेखात लिहिल्याप्रमाणे ती व्यक्ती स्टेट बँकेचा शेअर १०/- प्रती शेअर प्रमाणे शेअर विकत घेवू शकेल असा होतो.
प्रतिसाद देण्याचे मुख्य कारण असा चुकीचा अर्थ निघू नये किंवा जावू नये हाच आहे.
14 Jan 2015 - 8:35 pm | कल्पतरू
कुठला शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा हे सांगणं सोपं नसतं. माणसं कितीतरी वर्ष याचा अभ्यास करत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा कोणीतरी सांगतोय अमुक शेअर घे म्हणून घेतला असं चुकुनही कधी करू नका. स्वतः अभ्यास करा आणि नंतरच या क्षेत्रात उतरा. जालावर/मोबाईलवर याबद्दल गेम्स असतात अगोदर ते खेळून पहा यशस्वी होत असाल तर पुढे जाण्यात हरकत नाही. या क्षेत्रात प्रचंड सहनशीलता लागते. २००८ सालची गोष्ट, KRBL नावाचा शेअर आहे INDIAN GATE बासमती राईस विकतात ते. मी तो राइस वरचेवर विकत घ्यायचो. त्यावेळी त्याची किंमत होती ३ रुपये. एके दिवशी असाच दुकान्वाल्याकडे गेलो आणि KRBL मागितला, यावेळी त्याने मला प्रतिप्रश्न केला कुठला प्रकार देऊ? आणी माझ्यासमोर ३ प्रकारचे वेगवेगळे KRBL काढून ठेवले. याचा अर्थ सरळ होता कंपनीची जोरदार प्रगती आहे. घरी आलो अभ्यास केला आणि तो शेअर विकत घेतला, आज त्याची किंमत ११० रुपये आहे. हीच गोष्ट tata elxsi , धूम ३ या चित्रपटाला यानेच साऊंड इफेक्ट्स दिले होती धूम ३ रिलीज व्हायच्या अगोदर याची किंमत होती २२०. धूम ३ रिलीज झाल्यावर झपकनयाची किंमत ५०० रुपये झाली आता काहीतरी ७५० च्या आसपास आहे. सांगण्याचा उद्देश हाच कि खूप बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो या क्षेत्रात. मला विचाराल तर या क्षेत्रात उतरा पण सहनशीलता ठेवा शेअर चढला उतरला तर panic होऊन जाऊ नका. या क्षेत्रात कुठला शेअर घ्यावा याचा सल्ला तुम्हाला कोणीही देणार नाही कारण कोणी कितीही expert असला तरी तो खात्री देऊ शकत नाही कि अमुक अमुक शेअर वरती जाईलच. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या.
14 Jan 2015 - 9:45 pm | सुधीर जी
मला पण सान्गा कोनता शेयर घ्यायचा आनि कधि घ्यायचा
15 Jan 2015 - 12:35 pm | प्रसाद भागवत
श्री, सुधीरसाहेब एकदा आवर्जुन भेटा. चहा पीत पीत थोड्या गप्पा मारु ज्यात बाकीचे खुलासे करेन. तुर्तास एवढेच.
17 Jan 2015 - 2:46 pm | सुधीर जी
नक्किच प्रसाद भागवतजी, बाजाराबद्दल एका जानकार व्यक्तिकडुन जानुन घ्यायला मला आवडेल.
15 Jan 2015 - 5:47 pm | मोग्याम्बो
कोणता शेअर कधी घ्यायचा आणि कधी विकायचा याचे उत्तर सोपे आहे जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये सट्टा खेळणार नसाल तर.
कोणताही blue chip शेअर तुम्ही विकत घेऊ शकता.
जसे आपल्या कडे जास्त पैसे असतील तर आपण FD करतो त्याच प्रमाणे शेअर विकत घ्या.
आणि आपण FD केव्हा मोडतो त्याच प्रमाणे शेअर विका. जर आपल्याला पैश्याची गरज असेल तर आपण FD मोडतो तसेच शेअर सुधा गरज असेल तरच विका.
मी माझ्या वयाच्या २२ व्या वर्षा पासून गुंतवणूक करत आहे (२००९ पासून ). जेव्हा मला पहिली नोकरी लागली तेव्हा पासून. नोकरी सुधा जास्त पगाराची नव्हती त्यामुळे गुंतवणूक सुध्दा जास्त नव्हती. त्यामुळे सगळे प्रकार करून झाले. सट्टा खेळून झाला. शोर्ट टर्म सुधा करून झाले. पण फायदा आहे तो लंग टर्म मध्येच.
ज्यावेळी शेअर मार्केट ३-४ दिवस सलग कोसळत असते त्यावेळी शेअर घेणे जास्त फायद्याचे असते.
१-२ वर्षां पूर्वी ज्यावेळी रुपया घसरत होता त्यावेळी मार्केट मध्ये जोरदार मंदी होती. त्यावेळी मी धाडस करून ICICI आणि L&T चे समभार घेतले.
त्यावेळी घेतलेल्या risk ची फळे आज मी चाकत आहे.
19 Jan 2015 - 3:49 pm | कपिलमुनी
गुंतवणूक असेल तर उद्दिष्ट निर्धारीत करावे . लाँग टर्म मधेच जास्त फायदा आहे .
बोनस शेअर मिळतात.. आणि मागच्या ५ वर्षाचे ट्रॅक पाहून इन्वेस्ट करावे
15 Jan 2015 - 6:07 pm | नगरीनिरंजन
लेख आवडला. स्टॉक पिकिंगच्या टॉप डाऊन अॅप्रोचबद्दल लिहावे ही विनंती. विश्षत: येत्या २०-२५ वर्षांत कोणते सेक्टर्स चांगले आणि त्या सेक्टर्समध्ये किती वाढ होईल त्याचा थोडा अंदाज तज्ज्ञ मंडळी देऊ शकली तर फार बरे होईल.
16 Jan 2015 - 6:50 am | अभिदेश
तुमचे SIP बद्दल काय म्हण्णे आहे. दर महिना SIP द्वरा गुन्तवणुक करणे फायद्याचे आहे कि शेयर खरेदि करणे?
16 Jan 2015 - 4:03 pm | टवाळ कार्टा
सध्याच्या काळात (मार्केट खाली जाईल असा अंदाज असताना) SIP हाच चांगला पर्याय वाटतो
सुरुवात कमी रकमेने करायची....मार्केट पडले की रक्काम वाढवायची
19 Jan 2015 - 11:13 am | टवाळ कार्टा
इंडेक्स फंड बद्दल कोणीच काही करत नाही???
19 Jan 2015 - 12:39 pm | प्रसाद भागवत
ईंडेक्स फंड हा गुंतवणुकीचा निश्चितच एक चांगला पर्याय आहे. ईंडेक्सला आधारबहुत धरुनच गुंटवणुक करावी लागत असल्याने फंड मॅनेजरला विषेष असे स्वातंत्र्य नसते,एक लक्षांत घेतले पाहिजे टीममधील सर्वच खेळाडु हे ज्याप्रमाणे 'फॉर्मात' असतीलच असे नाही, त्याच् प्रमाणे ईंडेक्सचे असते. मात्र ईंडेक्स फंड मॅनेजर 'अशा' बॅड-पॅच मधील खेळाडुंना टीममधुन काढुन टाकु शकत नाही. अर्थांत याच गोष्टीमुळे अशा फंडचा 'एक्स्पेन्स रेशो" तुलनात्मक कमी असतो. ते स्वस्त असतात.
मात्र मागील आकडेवारी असे सुचविते की चांगले डायव्हर्सिफाईड फंडस या ईंडेक्स फंडच्या तुलनेने अधिक परतावा देतात.
19 Jan 2015 - 1:05 pm | टवाळ कार्टा
मला असे विचारायचे होते की ५ वर्षांची FD करण्यापेक्षा ५ वर्षांसाठी इंडेक्स फंड घ्यावा का?
19 Jan 2015 - 1:28 pm | प्रसाद भागवत
मी स्वतःसाठी तसे केले असते.
19 Jan 2015 - 1:35 pm | टवाळ कार्टा
म्हणजे करता (तर का?) की नाही करत (तर का?)
19 Jan 2015 - 1:44 pm | प्रसाद भागवत
वैयक्तीक माझ्याबद्दल सांगावयाचे झाल्यास मला आर्थिक निर्णय घेण्याची वेळ आल्यापासुन मी एकदाही एफ डी केलेली नाही,(लॉकर वा तत्सम फायदे मिळाविण्यासाठीचे अपवाद वगळता). अगदी अल्प्काळासाठीही मी Liquid Fundsचा पर्याय स्विकारतो. का?? यची पुरेशी कारणमिमांसा मी आधी्च केली आहे.
19 Jan 2015 - 12:46 pm | मृत्युन्जय
लेख आवडला. लेखाखालचे प्रतिसादही रोचक.
सरसकट सगळे मुद्दे पटले असे नाही मात्र त्यातील गाभा योग्य रीत्या पोचला.
19 Jan 2015 - 2:35 pm | चिनार
प्रसाद भागवत साहेब ,
जर गृह कर्जा वर चे व्याज ,एल आय सी चे हप्ते ह्यात च ८० सी ची मर्यादा संपत असेल तर निव्वळ गुंतवणुकीसाठी इ एल एस एस च्या ऐवजी दुसऱ्या फंड्स चा विचार करावा का ?
तात्पर्य असे की इ एल एस एस चे आणखी काही फायदे आहेत का ?
19 Jan 2015 - 2:57 pm | प्रसाद भागवत
नाही, निदान मी तरी दिल्या उदाहरणांत आपणाला ELSS मधील गुंतवणुक सुचविणार नाही. आपण म्युचुअल फंडांतील दुसरे पर्याय निवडावेत.
13 May 2016 - 3:41 pm | स्थितप्रज्ञ
अगदी बरोबर. त्यातल्या त्यात अजून कमी रिस्क घ्यायची असेल तर index fund किवा nifty etf घ्यावे. थोडा वेळ खर्च करायची तयारी असेल तर valueresearchonline.com या साकेतस्थळावर खूप चांगल्या प्रकारे एखादा चांगला diversified mutual fund निवडता येतो (कमी जोखीम घेणार्यांनी balanced fund निवडावा) आणि एकदा गुंतवणूक सुरु केली (शक्यतो SIP) कि तिमाही आढावा घेतला तरी पुरतो (ज्याला फक्त २-३ तास लागतात) असा माझा अनुभव आहे.