नमस्कार....
२०१५ ची पहिली ट्रेकमोहीम हरिश्चंद्रगडावर करून झालेली आहे. त्याचा सचित्र वृत्तांत सादर आहे. ब्लॉगचा दुवा हा.
आजवर ट्रेकिंग करणा-या कुणालाही भेटलो आणि लोहगड, तिकोना, राजगड, रायगड, नाणेघाट इत्यादी नावं मी घेतली, की 'अरे! तू हरिश्चंद्रगड ला जा; वेडा होशील.' असं तो म्हणणार हे अगदी निश्चित होतं. त्यामुळे हरिश्चंद्रगड हा काहीतरी भारी प्रकार आहे हे मला पक्कं कळलेलं होतं. जालावर, ब्लॉग्सवर जेवढं त्याबद्दल वाचत गेलो, तेवढी तिथे जायची उत्कंठा वाढत गेली. पण 'जमेल का?' हा प्रश्न पडल्याने तीन चार वेळा बेत पुढे ढकलण्यात आला. अखेर 'जमेल का?' ला 'जमवूच' असं बदलून हरिश्चंद्रगड मोहीम आखली. मोहीम झाली. जबरदस्त झाली. आणि आता कुणी हरिश्चंद्र ला जा असं म्हणेल तेंव्हा मीही म्हणेन 'जा म्हणजे काय? गेलोय मी!'
गड तर ठरला. हरिश्चंद्रगड. तारीखही ठरली. आता कसं जायचं हा प्रश्न होता. चार (किंवा त्याहून जास्त) वाटा असलेल्या या पर्वतावर कुठल्या वाटेने जावं हे कळत नव्हतं. पाचनई सोप्पी, तोलार खिंड लांब, नळीची वाट कठीण असे पर्याय होते. शेवटी भेळवाल्याला जसं तीखा/मीठा/मिडियम मधलं मिडियम सांगावं तशी (आमच्यासाठी) मिडीयम कठीण म्हणजेच तोलार खिंडीची वाट आम्ही सर्वानुमते निवडली.
अनुप, स्वानंद, मी, आणि प्रसन्न सकाळी ९ च्या ठोक्याला खिरेश्वर गावातील मेमाण्यांच्या घरात थडकलो. गाडीचा धुरळा बसेस्तोवर चहा पोह्यांची व आमलेट-भाकरीची ऑर्डर सुटलेली होती. आजूबाजूला उंचच उंच सह्यकडे होते. थंड हवा सुटलेली होती. लांब पूर्वेकडे पिंपळगावच्या धरणाचा विशाल जलाशय संथ पसरलेला होता. मधूनच एखादा बगळा येऊन अंगणातल्या झाडावर बसत होता. एकंदरित निवांत अनुभवायचं वातावरण होतं. परंतु आमच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेत त्या वेळी निवांतपणा नव्हता. पोटभर नाश्ता करून सॅक सोबत उन्हांना अंगावर घेत आम्ही वाट चढायला सुरुवात केली.
सोबतीला दोन छोटे सवंगडी घेतले. वाट चुकून वेळ जाऊ नये म्हणून. त्यांना टाटा केल्यावर पुढे जराशी वाट तरीही चुकलोच तो भाग वेगळा. तर सुधीर आणि गौरव आम्हाला एक-सव्वा तासात तोलार खिंडीत घेऊन गेले. पहिला पडाव पार. पुढे रॉकपॅच च्या सुरुवातीला त्यांना अच्छा केला, आणि आम्ही पुढे निघालो. रॉकपॅच म्हणावा तितका अजिबात कठीण नाही. कठीण झाला असता त्या ठिकाणांवर लोखंडी कुंपण लावलेलं असल्यामुळे तो अजूनच सोपा झाला आहे. इथे काही इन अॅक्शन फोटो झाले. जिकडे बघावं तिथे भरभरून सह्याद्री पसरलेला होता. साधारण पाउण तासात रॉक पॅच चढून आम्ही दुसरा पडाव पार केला.
एक झटपट लिंबू सरबताची फैर झाडली आणि मग आम्ही पुढे निघालो. अधून मधून क्लिका क्लिकी चालूच होती. सात टेकड्या ओलांडून जाण्याचा हा तिसरा टप्पा होता. इथे जराशी वाट चुकलो आम्ही, पण पुन्हा योग्य रस्ता मिळालाही. दरम्यान भास्कर ला फोन लावून आम्हाला रस्ता मिळत नाहीये असं सांगण्यात आलं होतं, आणि योग्य वाटेवर अर्धं अंतर गेल्यावर आम्हाला त्या भास्करचं दर्शन झालं. तो बिचारा जवळपास एक दोन किमी आम्हाला शोधत शोधत आला होता. माणुसकीचं जिवंत उदाहरण या अशा माणसांमध्ये बघावं. मग भास्कर पुढे, आम्ही मागे. रॉकपॅच पासून दोन तासात आम्ही हरिश्चंद्रेश्वराजवळ पोचलो. विश्रांतीथांबे धरल्यास पायथ्यापासून पाच तास.
तिथे एका खोपट्यात पिठलं, भाकरी, कढी आणि ठेचा असं फर्मास जेवण तयार होतं. या अशा दमल्या भागल्यानंतर मिळणा-या, चुलीवरच्या साध्या सरळ जेवणाची सर इतर कशालाही येणार नाही. त्यात हसतमुखाने वाढणारी तितकीच साधी सरळ मंडळी असतील तर विचारायलाच नको. तृप्त होऊन, थोडी हरिश्चंद्रेश्वराजवळ क्लिकाक्लिकी करून मूळ मुद्द्याकडे वळलो.
कोकणकडा! सतराशे फूट उंच, नागफण्यासारखे अंतर्वक्र कातळदिव्य म्हणजे हरिश्चंद्रगडाची खरी ओळख. इथे जाऊन तुम्ही नि:शब्द नाही झालात तर नवलच. सह्याद्रीचा हा अशक्य आणि अफाट आविष्कार बघण्यासाठी मी आसुसलो होतो. चार वाजून गेले होते आणि कोकणकड्यावरचा सूर्यास्त आम्हाला चुकवायचा नव्हता. झपाझप पावलं टाकत अर्ध्या तासात 'भास्कर कोकणकडा' या भास्करच्या हॉटेलाजवळ पोचलो. तिथे मामा, म्हणजेच भास्करचे वडील उभे होते. इतक्यात भास्करही आला. तंबू कुठे लावायचा ते सांगून आम्ही चहाची फर्माइश केली. मामांनी अगदी आमच्या मनातलं ओळखलं, आणि म्हणाले, "तुम्ही जा कड्यावर, मी चहा तिथे घेऊन येतो" आयला! कोकणकडा, संध्याकाळ, सूर्यास्त, थंडगार वारा, बेमिसाल नज़ारा, चार मित्र आणि वाफाळता चहा; म्हणजे; याहून भारी काय?
कड्यावर गेलो, झोपून दरीत बघणं झालं, सैरभैर जिकडे तिकडे फोटो काढून झाले, चहा पिऊन झाला आणि एक कधीही न विसरता येणारी संध्याकाळ मनात घर करत मावळतीला लागली. आजकाल हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी नाशिककडून एक सोप्प्पा मार्ग सुरू झाल्याचं कळलं. इतका सोपा की आबालवृद्ध अगदी आरामात तिथे पोचू शकतात. त्याची प्रचीती कोकणकड्यावर जमलेल्या गर्दीतून आली. अर्थात आम्ही त्यापासून लांबच रहात होतो त्यामुळे आमच्या आनंदात मिठाचा खडा पडला नाही.
सूर्य अस्ताला गेला आणि आम्हीही परत आमच्या तंबूकडे परतलो. ताजेतवाने झालो. जेवायला अवकाश होता. त्यामुळे भास्करच्या हॉटेलाबाहेरच खडकांवर आम्ही चौघे, पुण्याहून आलेले आमचे चार मित्र, तिथे आलेलेल आणखी दोन तीन जण अशी गप्पांची मैफल जमवली. अर्थातच चहा हातात होता. तासभर गप्पात गेला. एव्हाना थंडी वाढलेली होती. आम्ही भास्करच्या हॉटेलात आत चुलीजवळ जाऊन बसलो. डाळ, भात, पापड, लोणचं असा बेत होता. भास्करची आई चुलीवर स्वयपाक करत होती. गरम गरम भात, अफलातून अशी आमटी म्हणजे डाळ, असंख्य वन्स मोअर मिळवणारा पापड, आणि चटक्क्कदार लोणचं मनसोक्त खाऊन, मनोमन 'अन्नदाता सुखी भव' म्हणून आम्ही तंबूत परतलो.
थंडी मी म्हणत होती. अंथरूणं, पांघरुणं, स्वेटर, कानात कापूस, कानटोप्या, पायात मोजे असा प्रत्येकाने आपापला बंदोबस्त केला. झोपेची आराधना सुरू झाली. पण थंडी वाढतच होती. स्वानंद सोडून आम्ही तिघेही चळवळत होतो. उपडं, कुशीवर, मुटकुळं करून, उलटं, सुलटं असे झोपण्याचे सगळे प्रकार चार एक तास करून झाले पण झोप लागेना. अनुपच्या म्हणण्याप्रमाणे, 'थंडीमुळे बळी कसे आणि का जात असतील त्याची पुसटशी कल्पना आली.' शेवटी पाच वाजता मी आणि अनुप तसेच कुडकुडत भास्करच्या हॉटेलाशी गेलो, हाक मारली आणि शेकोटीसाठी चार लाकडं दे अशी मागणी केली. मामा उठले आणि आम्हाला शेकोटी पेटवून देऊन गेले. शेकोटीची ऊब आम्हाला जाणवायलाच मुळी अर्धा तास गेला. मग कुठे जरा बरं वाटलं. अगदी उजाडेपर्यंत मग दोघे तिथेच बसून होतो.
पुढे प्रसन्न आणि स्वानंदही आले. कड्यावर लगबग सुरू झाली. कुणी तारामतीला जायला निघाले, कुणी परत जायला निघाले, तर कुणी फोटो काढण्यात गुंतले. आम्ही तारामतीला जाणार नव्हतो. नाश्ता करून आम्हाला परत फिरायचं होतं. त्यामुळे चहा, बिस्किटं, सोबत आणलेले केक, खाकरा, असं खाऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. खरं तर कोकणकड्यावरून पुन्हा एकदा वाकून बघायची इच्छा होती कारण कोकणकडा पुरलाच नव्हता, पण ढग आणि धुक्यामुळे वीस पंचवीस फुटापलिकडे काहीही दिसत नव्हतं, त्यामुळे प्रश्नच नव्हता. भास्करचे आभार मानून, पुन्हा येण्याची निश्चिती देऊन आम्ही निघालो. सुमारे चार तासात आम्ही पुन्हा खिरेश्वरला मेमाण्यांच्या घरी होतो.
हरिश्चंद्रगडाने पहिल्या भेटीत अपेक्षेपेक्षा बरंच काही दिलं होतं, पण ते पुरलं बाकी अजिबात नव्हतं. त्यामुळे परत येणं तर नक्की होणारच. कोकणकड्याने मला इतकी भुरळ घातली आहे, की घरी येऊन 'कोकणकड्यावर 'अस्सं' झोपून खाली बघायचं' हे सांगताना घराच्या फरशीतूनही माझ्या डोळ्यांना ती खोल दरी दिसत होती.
प्रतिक्रिया
7 Jan 2015 - 5:59 pm | प्रचेतस
मस्त रे वेल्लाभटा.
फोटो आणि वर्णन आवडले.
7 Jan 2015 - 6:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. मी पहिल्यांदा ऐकलं होतं असं ते हेचं आणि आता ८-९ ट्रेक झाले तिकडचे. आता सगळ्यांना सांगताना मी हेचं सांगतो. :)
भ भ भ भ भ....भारी!!!
7 Jan 2015 - 7:12 pm | सूड
फोटो दिसत नाहीयेत वेल्लाकाका.
7 Jan 2015 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !... फोटो आणि वर्णन !
आयला! कोकणकडा, संध्याकाळ, सूर्यास्त, थंडगार वारा, बेमिसाल नज़ारा, चार मित्र आणि वाफाळता चहा; म्हणजे; याहून भारी काय?
हे वाक्य मनात घर करून बसलं आहे !7 Jan 2015 - 8:49 pm | स्वच्छंदी_मनोज
वर्णन मस्त जमलय पण फोटो दिसत नाहीयेत त्यामुळे पुर्ण आस्वाद घेता आला नाही :(
7 Jan 2015 - 8:56 pm | कंजूस
थंडीमुळे काही फोटो गारठले काय ?कड्यावरती चहा घेताना ,आणि गडावरच्या देवळाचा फोटो हवेतच. क्लिकाक्लिकीच्या आवाजावर गप्प बसणार नाही.
7 Jan 2015 - 9:00 pm | नगरीनिरंजन
छान!
१५ वर्षांपूर्वी गेलो होतो हरिश्चंद्रगडावर दोन-तीनदा. हॉटेल बिटेल तिथे काहीही नव्हतं आणि शंकराच्या मंदिरातला दिवा सोडला तर रात्री सगळीकडे गडप अंधार असे. पावसाळ्याच्या रात्री अंधारात टेंभे घेऊन खेकडे पकडायला आलेल्या लोकांबरोबर ठेचकाळत हिंडलो होतो. आठवणी ताज्या झाल्या.
त्याकाळी बरोबर थोडंफार खायचं सामान घेऊन जायची पद्धत होती. असं जाऊन गरमा-गरम खायला मिळणे वगैरे नव्हतं काहीच. स्वतः चूल मांडून खिचडी करणे व ब्रेड लोणच्याबरोबर खाणे असा साधा-सीधा मामला असायचा. असो. कालाय तस्मै नमः|
12 Jan 2015 - 12:18 pm | वेल्लाभट
हे तर होणारच. आता गड किल्ले कमर्शियलाईझ होतायत. गाईड, खान-पान यावर गावातल्या चार घरांना रोजगार मिळतो. आणि झालीच बात स्वत: अन्न शिजवण्याची, तर तसंही करणारे लोक अनेक आहेत. आम्हीही रतनगडावर मॅगी करून खाण्याची मजा घेतली होती. दोन्ही गोष्टीत सोय आहे.
12 Jan 2015 - 12:19 pm | वेल्लाभट
मला खटकणारी गोष्ट इतकीच की त्या गड किल्ल्यांचे पिकनिक स्पॉट होत चाललेत. उत्तम उदाहरण लोहगड. रिडिक्युलस.
13 Jan 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. हल्ली कधी रविवारी आणि खासकरुन पावसाळ्यातल्या रविवारी गेलं तरं मुंबईवरुन येऊन गडावरती धांगडधिंगा करणारे अमराठी लोक्स दिसतात. खास करुन लोहगड विसापुर ला ही गोष्ट जाणवण्याएवढी वाढली आहे. आमच्या गेल्या पावसाळी सहलीमधे एका टल्ली एम.एच. ०४ गुज्जु / मारवाडी ग्रुपचं स्थानिक गावकर्यांशी काहीतरी वाजलं होतं छेडछाडीवरुन. भरपुर मार खाल्ला असता त्या लोकांनी गावकर्यांकडुन.
13 Jan 2015 - 11:29 am | वेल्लाभट
खाल्ला पाहिजे होता....
अक्कल आली असती. पैसे आहेत म्हणून काय गड किल्ले बापाचे समजून वागू लागलीयत ****.
माझ्या कार्यालयातला एक अमराठी मला ट्रेकिंगबद्दल उत्साह दाखवून मग विचारतो कसा. संवाद बघा.
Do you booze?
Me: no, but why do you ask?
No I mean ham mast hill pe baith ke khuli havaa me daru pite the
Me: Look; even if I did, I woudnlt booze on a fort or a trek at all
Why?
Me: these places are not the locations to booze. they are historic places.
Ya; historic na? not religious.
Me: Shivaji Maharaj IS a religion for your kind information.
उठून गेला टेबल वरून.
14 Jan 2015 - 9:22 am | खटपट्या
मस्त !!
14 Jan 2015 - 9:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास उत्तर दिलतं त्या वृषभाला.
माझ्या इथे प्राधिकरणामधे दुर्गाटेकडी म्हणुन जागा आहे. तिथे पुर्वी दारु, शिग्रेटी आणि कपल्सचे चाळे ह्यासाठी प्रसिद्ध होता. आता मात्र बर्यापैकी नियंत्रण आणलयं.
14 Jan 2015 - 2:46 pm | वेल्लाभट
अरे नाही तर काय !
आणि चार चौघांसमोर रागाने म्हटलं; अजूनच अपमान झाला त्याचा मस्त. साले गृहीत धरतात आपल्याइथे येऊन आपल्यालाच. if one cannot respect; he must at least not disrespect. 'वो कौन तुम्हारा, वो... हां... शिवाजी' असं अॅरोगन्टली जेंव्हा एक जण फार पूर्वी म्हणाला होता तेंव्हा आइशप्पथ कानशिलात हाणाविशी वाटलेली. केवळ ऑफिस होतं म्हणून. केवळ. असो.
7 Jan 2015 - 9:06 pm | स्वच्छंदी_मनोज
आत्ताच वर दिलेल्या ब्लॉग लिंक वरून फोटो बघीतले.. खलास फोटो आले आहेत.. ते तेवढे आम्हाला ह्या इथे पण दिसतील ह्याची व्यवस्था करा :)
7 Jan 2015 - 9:09 pm | मॅक
वर्णन खूपच छान.....फोटो तर आणखीन छान...
8 Jan 2015 - 2:40 am | बोका-ए-आझम
आपला लेख लई भारी, आपले फोटो त्याहून भारी! हरिश्चंद्रगड तर लईच भारी!
8 Jan 2015 - 5:46 am | चौकटराजा
वेल्लाकाका, फोटो मस्त आलेयत.हा भाग म्हनजे सह्यातला मुकुटमणि आहे असे ऐकलेय. इथे जाउन निशब्द व्हायला आवडेल.( म्हातार्याला जमेल का हे कंजूस काकाना विचारायला हवे मात्र ! )
8 Jan 2015 - 8:40 am | वेल्लाभट
जमेल
मी सांगतो. नाशिक कडून एक वाट निघाली आहे आता. बरचसं अंतर गाडी जाते पुढे फक्त पाउण तास चाल आहे की आला हरिश्चंद्र गड
याच जाऊन!
8 Jan 2015 - 10:35 am | एस
पाचनईपेक्षा वेगळी वाट आहे? आणि नाशिकचा काय संबंध? - म्हणजे उत्तरेकडून असं म्हणायचंय का? गूगल मॅपवर दाखवू शकाल काय नेमकी वाट कुठून आहे ते? सादडे घाट/बैलघाटाकडून आहे का? आणि पाचनईच्या वाटेपेक्षा सोप्पी आहे?
8 Jan 2015 - 11:16 am | वेल्लाभट
हा तपशील मला तिथे आलेल्या काही 'फ्यामिलीज' शी बोलताना समजलाय. खात्री मलाही करून घ्यावी लागेल. पण ज्या पिकनिक वेशभूषेत तिथे ती मंडळी पोचली होती, त्यावरून ती जी वाट आहे ती एकदमच सोपी असणार असं वाटतंय. असो. मला विचारून सांगावं लागेल. बघतो.
8 Jan 2015 - 2:18 pm | स्वच्छंदी_मनोज
रस्ता होतोय. कामही चालू झाले आहे थोडेसे. ह्या वाटेने मंदीरापर्यंत तासा भरात जाता येत असावे.
पण सध्यातरी पाचनईची वाटच सर्वात सोपी आहे. तिव्र चढण नसणारी, जंगलातून जाणारी आणी गावातून १.५ तासात थेट मंदीरापर्यंत नेणीरी आणी पावसाळ्यातही चालू असणारी ही वाटच सध्यातरी कमीतकमी त्रासाची आहे.
@ चौराकाका - तुम्हाला पाचनईची वाट नक्की जमेल.
14 Jan 2015 - 7:08 am | चौकटराजा
गुगलात मोजून पाहिले पाचनई, ओतूर- लवळे, राजूर ,अकोले संगमनेर हे अंतर ६५ किलोमीटर भरते. पुण्याहून निघून एका दिवसात शक्य दिसत नाही. संगमनेर ला मुक्काम केला तर बरे पडेल. काय?
14 Jan 2015 - 11:34 am | एस
एका दिवसात हा किल्ला होत नाही. पण स्वतःचे वाहन असेल तर दोन दिवसांत पाचनईमार्गे नक्कीच करता येईल.
16 Jan 2015 - 3:27 pm | शैलेन्द्र
एका दिवसात परत यायचा बेत सोडा.. कोकनकड्यावरुन सुर्यास्त नाही पाहिला तर काय उपयोग?
पाचनईची वाट तुम्हाला सहज जमेल. पुणे ते राजुर साधारण १४० किमी आणि राजुर पाचनई २५ किमी.. पाचनइवरून एक दीड तासाचा चढ..
8 Jan 2015 - 6:44 am | स्पंदना
सुरेख वर्णन!! मस्ताड फोटो.
8 Jan 2015 - 8:46 am | स्पार्टाकस
आय मिस इट!
8 Jan 2015 - 11:02 am | कंजूस
ब्लॉगचा दुवा मला का येत नाही ?
#चौराकाका: वाहनाने मंचर-संगमनेर-राजूर लवाळे-पाचनई येथे गेल्यास सोपी वाट (दीड तास )आहे. टोलार खिंडमार्ग जमणार नाही.
अकरा वर्षाँपूर्वी महाशिवरात्रीच्या २दिवस अगोदर एकादशीला १६फे २००४ ला खिरेश्वर-टोलार खिँडमार्गे गडावर गेलो होतो. या दिवशी खिरेश्वरचे अपूर्व मंदिर पाहिले. महाप्रसाद साबुदाणा खिचडी भक्षण करून गडावर गेलो होतो. वरच्या मंदिरातही सात दिवस भजन आणि महाप्रसाद होता. पाचनईकर ग्रामस्थ वरच्या मंदिराची सर्व व्यवस्था करतात. मंदिराच्या परिसरात उत्सवाचे वातावरण होते वरच्या गुंफेत रात्री राहिलो होतो. संध्याकाळी कोकणकडा आणि सकाळी हरिश्चंद्र-तारामति शिखरावर भटकून आलो होतो.



खिरेश्वर मंदिराचे शिवरात्र सप्ताह (खिरेश्वर ग्रामस्थांकडून)उत्सवपत्रकाचे फोटो (१+२+३)पाहा
या वर्षी एकादशी १५ फे कट्ट्याच्या रविवारीच आहे. दुध /भांग +खिचडी +रताळी असा बेत असणार.
8 Jan 2015 - 11:31 am | सविता००१
ते पहिलं फूल कसं आहे? छान आलंय.
आणि तो कुत्र्याचा फोटो पण झक्कास आलाय. विझलेल्या चुलीच्या उबेत कसला शांत झोपलाय. मस्तच
8 Jan 2015 - 3:42 pm | कंजूस
@स्वच्छन्दी मनोज ,कोतूळ ते खिरेश्वर या देवराईतून जाणाऱ्या वाटेचा रस्ता करताहेत का ?इथेच शेकरु आहेत.
8 Jan 2015 - 3:48 pm | स्वच्छंदी_मनोज
नक्की खात्री नाही पण ह्याच देवराईतून कोतूळ ते खिरेश्वर रोड होईल आणी तसे झाले तर :(
आम्ही मागच्या वर्षी भैरोबा किल्ला केला तेव्हा कोतूळ साईडने रस्त्याचे काम सुरु झालेले दिसले.
8 Jan 2015 - 8:13 pm | एस
असे व्हावयास नको खरंतर. हरिश्चंद्रगड तसाही पिकनिक स्पॉट होत चालला आहे. पंधरा वर्षांपूर्वी तसं नव्हतं. आणि आता त्या खिंडीतून रस्ता होणार म्हणजे याचाही सिंहगड-राजगड होणार.
अवांतर - प्रमोद मांडेंच्या पुस्तकात हरिश्चंद्रगड एक 'वनदुर्ग' म्हणून दाखवला आहे. ते कदाचित बदलून जाईल. :-|
8 Jan 2015 - 8:15 pm | गणेशा
कालच संपुर्ण व्रुत्तांत वाचला होता पण वेरुळ चे लिखान चालले असल्याने आज रिप्लाय दिला.
मस्त एकदम.. फोटो पण खुपच सुंदर.
मला पण या गडावर जाण्याची तीव्र इच्छा आहे. खरे तर या भागात गेल्यावर निदान १ विक तरी तिकडेच रहावे असे वाटते. हरिशचंद्र गड .. आजोबा .. सांदन .. रतनगड .. भंडारदरा .. अह्हा हा काय मस्त ट्रेक होतील एकत्र
8 Jan 2015 - 9:03 pm | शिद
सुंदर आले आहेत सगळे फोटो. वृत्तांत पण मस्तच.
11 Jan 2015 - 9:44 pm | पैसा
खूपच छान लिहिलंय आणि फोटोही खासच!
12 Jan 2015 - 12:15 pm | वेल्लाभट
लेख, व फोटोंच्या केलेल्या प्रशंसेबद्दल सगळ्या प्रतिसादकांचे अनेक आभार! :)
14 Jan 2015 - 2:49 pm | स्पा
मस्त रे वेल्ला
14 Jan 2015 - 2:49 pm | मधुरा देशपांडे
सुंदर फोटो आणि वर्णन.
14 Jan 2015 - 3:39 pm | वेल्लाभट
धन्यवाद मधुरा देशपांडे आणि ईस्पा
14 Jan 2015 - 3:53 pm | कपिलमुनी
१. दीड तास पायथ्याला पोचायला कि गडमाथ्यावर ?
२. माथ्यावर पोचल्यावर किती वेळ लागतो फिरायला?
३. गडावर मुक्कामाची सोय काय आहे ? गुहा , मंदिर ? बादवे ते तंबू कुठे भाड्याने मिळतात का ?
४. सहकुटूंब जाण्यासारखा आहे का ? ( वर चर्चिल्याप्रमाणे दारू-पार्टीवाले टोळभैरव)
५. किती अवघड आहे ? (वयोगट २०-४० )
14 Jan 2015 - 4:24 pm | वेल्लाभट
प्रश्न १ चं उत्तर माहीत नाही.
२. माथ्यावर पोचल्यावर किती वेळ लागतो फिरायला?
२ तास. तारामतीही बघायचं असेल तर अधिक ४.
३. गडावर मुक्कामाची सोय काय आहे ? गुहा , मंदिर ? बादवे ते तंबू कुठे भाड्याने मिळतात का ?
हो आहे. गुहा आहेत. तंबू भाड्याने मिळतात. कोकणकड्याजवळ किंवा मंदिराजवळ स्टॉल्स/झोपड्या आहेत.
४. सहकुटूंब जाण्यासारखा आहे का ? ( वर चर्चिल्याप्रमाणे दारू-पार्टीवाले टोळभैरव)
ते टोळभैरवांचं सांगणं कठीण आहे.
५. किती अवघड आहे ? (वयोगट २०-४० )
मध्यम ते कठीण. वाट कुठली निवडता त्यावर अवलंबून आहे.
14 Jan 2015 - 4:46 pm | कपिलमुनी
पाचनईच्या वाटेने गावातून निघाल्यावर किती वेळ चालायला लागते ती वाट कशी आहे ?
खाली गावामध्ये स्वतःचा वाहन लावता येइल का ?
तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद !
15 Jan 2015 - 1:17 pm | एस
१. दीड तास पायथ्याला पोचायला कि गडमाथ्यावर ?
पाचनईच्या वाटेने दीड तासांत वर गडमाथ्याला मंदिरापर्यंत पोहोचू शकाल. सोबत पुरेसे पाणी घेणे आवश्यक. एका ठिकाणी डोंगरकड्यातून आडवी ट्रॅवर्स आहे, सोप्पी आहे. वरून कडा झुकला आहे. तिथे थोडा वेळ थांबून मस्त व्ह्यू पाहता येतो. फक्त तिथे आरडाओरडा, धूम्रपान करू नये. वरच्या बाजूला मधमाश्यांची मोठाली पोळी आहेत. वाट सोपी आहे. फार चढण नाही. लोकही ये-जा करत असतात. चुकणार नाही.
पाचनई गावात वाहन लावता येईल. तिथले लोकही अगत्यशील आहेत. तिथल्याच ग्रामस्थांची वरती दुकाने असतात. त्यामुळे त्यांच्याचकडून तंबू घेणे, जेवण-नाश्त्याची सोय करवणे सोप्पे पडेल.
२. माथ्यावर पोचल्यावर किती वेळ लागतो फिरायला?
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, पुष्करिणी, केदारेश्वराचे गुहेतील पाण्यामधले भव्य शिवलिंग, गणेशगुहा इत्यादी परिसर नीट पहायला दोन तास पुरेत. नंतर आपण पश्चिमेकडच्या कोकणकड्याकडे जाऊ शकता. तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल. कोकणकडा इतका प्रेक्षणीय आहे की तिथे फेरफटका मारायला एक ते दोन तास लागू शकतील. हे आपल्यावर अवलंबून आहे. परत यायला पुन्हा अर्धा तास. नंतर तारामती शिखरावर जाऊन यायला दीड तास लागेल.
हरिश्चंद्र शिखर उर्फ बालेकिल्ला पहायला दोन-तीन तास वाढतील.
३. गडावर मुक्कामाची सोय काय आहे ? गुहा , मंदिर ? बादवे ते तंबू कुठे भाड्याने मिळतात का ?
वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे गणेशगुहा - यात शंभरएक माणसे सहज राहू शकतील. मंदिराच्या प्रांगणात तीन-चार जागा आहेत. खुद्द मंदिराच्या कळसाच्या जवळही एक जागा आहे. :-) नंतर तंबूत रहायचे असल्यास मग पुष्करिणीच्या जवळ, कोकणकड्याच्या जवळ अशा बर्याच ठिकाणी राहता येईल. गडमाथा अगदी विस्तीर्ण आहे. या सर्व ठिकाणी स्थानिकांच्या उपहारगृहवजा टपर्या आहेत. त्यांच्यामार्फत तंबू-जेवण-चहा यांची व्यवस्था होऊ शकते.
४. सहकुटूंब जाण्यासारखा आहे का ? ( वर चर्चिल्याप्रमाणे दारू-पार्टीवाले टोळभैरव)
सहकुटूंबपण जाता येईल. अशा वेळी शक्यतो जास्त मोठ्या ग्रुपने जावे आणि स्थानिकांकडून तंबू-जेवण घ्यावे. म्हणजे टोळभैरवांचा त्रास होणार नाही. हरिश्चंद्रगडावर बरेच ग्रुप रोजच येत असतात. आणि भरपूर मोकळी जागाही असल्याने तितका त्रास होऊ नये.
५. किती अवघड आहे ? (वयोगट २०-४० )
पाचनईमार्गे येऊनजाऊन सोपा आहे. आधी एकही ट्रेक केलेला नसेल तर कुणा अनुभवी ट्रेकर्ससोबत जाणे इष्ट. तिथे आम्ही अगदी चार-पाच वर्षांच्या खट्याळ मुलांपासून ते साठीच्या उत्साही तरुणांपर्यंत सर्वांना नेलेले आहे. फक्त वीस-चाळीस या वयोगटातील म्हातारे कटकट करतात असा अनुभव आहे :-)
15 Jan 2015 - 2:15 pm | कपिलमुनी
@स्वॅप्स : अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद !
वेल्लाभट आणि तुमच्या प्रतिसादामुळे जाण्याचे नक्की केले आहे !
17 Jan 2015 - 5:37 am | वेल्लाभट
गावक-यांचे फोन नंबर मी देतो. व्यनि करा जाण्याआधी
15 Jan 2015 - 6:10 pm | एस
(मूळ उपग्रह प्रतिमा - गूगल मॅप्स. अंदाजे नकाशा.)
पुणे-नारायणगाव-ओतूर-ब्राह्मणवाडा-कोथळे-कोतूळ्-पाचनई. पाचनई गावात पोहोचल्यावर तिथे गाडी लावा. नकाशात दाखवल्याप्रमाणे दोन टप्प्यांत थोडा चढ आहे, बाकी वाट बरीचशी सपाटीनेच चालते. थेट मंदिरापाशी पोहोचाल. तिथेच सप्ततीर्थ पुष्करिणी, डोमाची घुमटी, शिवमंदिर, केदारेश्वर गुहेतील पाण्यातील शिवलिंग आहे. तारामती शिखराच्या पोटात गणेशगुहा आहेत. तारामती शिखरावर एक शिवलिंग आहे. बालेकिल्ल्यावर तटबंदीचे थोडे अवशेष शिल्लक आहेत. तारामती शिखरावरून संपूर्ण गडाच्या घेर्याचे, दक्षिणेस माळशेज घाटाचे, उत्तरेस आजोबा, कात्राबाईच्या कड्याचे, पश्चिमेस कोकणाचे, नैऋत्येस नानाचा अंगठा आणि जीवधन, सिंदोळा, इत्यादी किल्ल्यांचे सुरेख दर्शन घडते.
जुन्नर दरवाजाने उतरायची वाट थरारक आहे, खिरेश्वरला नेते. नळीच्या वाटेने चांगलेच कातळटप्पे आहेत. इथे प्रस्तरारोहणतंत्र आवश्यक. बैलघाटाने पुढे सादडे घाटाच्या मार्गे कोकणात उतरता येते. खिरेश्वरमार्गे गेल्यास टोलारखिंडीत मारुतीची मूर्ती आहे. तिथून डावीकडे वर चढायचे, वाटेत छोटा कातळटप्पा आहे. रेलिंग आहेत.
चहा-नाश्त्यासाठी टपर्या/हॉटेल मंदिरापाशी, गणेशगुहांमध्ये, कोकणकड्याच्या जवळ आणि टोलारखिंडीतल्या कातळटप्प्याच्या वरच्या बाजूला इथे आहेत. गणेशगुहांमध्ये कधीही हॉटेल चालू असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी तर हमखास.
माझ्याकडे तिथल्या गावकर्यांचे फोननंबर आत्ता नाहीत. शोधाशोध करून पाहतो.
पण हरिश्चंद्रगड कराच! एकदातरी. :-)
(वरील नकाशाची मोठी साइझ प्रत इथे मिळेल.)
16 Jan 2015 - 8:55 am | प्रचेतस
धन्यवाद स्वॅप्स सविस्तर माहितीबद्दल.
16 Jan 2015 - 1:04 pm | कपिलमुनी
लैच भारी प्रतिसाद ! नकाशा आणि इतर माहिती मुळे हरिश्चंद्रगड अवघड आहे असा गैरसमज होता तो दूर झाला .
चलो हरिश्चंद्रगड !!
16 Jan 2015 - 2:02 pm | स्वच्छंदी_मनोज
धन्यवाद स्वॅप्स.. मेहनत घेऊन उत्तम नकाशा आणी वाटा मार्क केल्याबद्दल. पहील्यांदा जाणार्यांना उत्तम रेफरंस ठरेल..
एक शंका - नकाशात नेढ्याच्या डावीकडे जी जुन्नर दरवाज्याची वाट आहे तिथेच राजदरवाज्याचीपण वाट आहे का? कुठेतरी वाचले होते की नेढ्याच्या डावीकडून जुन्नर दरवाज्याची वाट आणी उजवीकडून राजदरवाज्याची वाट अश्या दोन वाटा आहेत्..पण या दोनपैकी एकही केली नसल्याने खात्री नाही.
16 Jan 2015 - 4:52 pm | एस
http://www.lokprabha.com/20120615/durgachya_desha.htm इथे खालील माहिती मिळाली.
जुन्नर दरवाजालाच काहीजण चुकून झुंजार दरवाजा असेही म्हणतात. मलातरी तिथे जुन्नर दरवाजाव्यतिरिक्त कुठली वाट दिसली नाही. याबाबतीत अधिक माहिती काढावी लागेल. पुढच्या वेळेस गेल्यावर खिरेश्वरच्या ग्रामस्थांकडे विचारपूस करतो.
17 Jan 2015 - 7:45 am | स्पार्टाकस
नऊ वाटा आहेत हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी!
मागे कुठल्यातरी धाग्यावर मी या सर्व वाटांचा उल्लेख केला होता.
यापैकी आठ वाटांनी मी चढलो-उतरलो आहे.
९ व्या वाटेने रॅपलिंग करुन उतरलो आहे, पण चढलेलो नाही! ही ९ वी वाट म्हणजे अर्थातच कोकणकडा हे वेगळं सांगायला हवं का?
18 Jan 2015 - 1:28 am | एस
दहावी वाट किरणने ओपन केलीय रोहिदास शिखराच्या बाजूकडून. :-)
16 Jan 2015 - 2:33 pm | वेल्लाभट
स्वॅप्स यांची मेहनत आणि माहिती त्यांच्या प्रतिसादातून दिसते. उत्तम प्रतिसाद. अनेक धन्यवाद ! नकाशा सहीच.