सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:54 am

(श्री शशिकांत पानट हे एक हॉलिवुड कलाकार आहेत. सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून आकाश गायकी यांच्याद्वारा ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याआठी श्री पानट आणि गायकी दोघांनाही धन्यवाद!)

*****************

एकदा सुख माझ्या स्वप्नांत आलं
त्यानं मला हलवुन जागं केलं
घसा खाकरुन मोठ्या रुबाबांत म्हणालं
"सुख हवय, सुख हवय"
अशी प्रार्थना करीत होतास ना?
आता आलो आहे, तर माझ्याशी बोल ना!

मी थोडा भांबावलो, आणि चरकलो देखील
कारण मागितल्यावर कोणतीही गोष्ट
आतांपर्यंत मिळाली नव्हती,
भुक लागली तरी अनेक महिने
तशीच काढली होती
दारिद्र्यांत पिचलो असतांना
साध्या साध्या गोष्टींचा हव्यास केला होता
निराश झालो म्हणुन
निराशेचा सुस्कारा टाकला होता!
जिंकण्यापेक्षां हरण्याचीच संवय लागली होती
त्यामुळे अवती भोवतीची गर्दीही
अनायासेच कमी झाली होती!

म्हणुनच आयुष्याच्या वैराण वाळवंटांत
स्वत:च्याच अश्रुंनी आपलीच तहान
भागवायची संवय लागलेल्या माझ्या मनाला
हे अजिबात ऊमगेना
की आपणहुन दाराशी चालुन आलेलं हे सुख
आपल्याला म्हणतय तरी कसं
माझ्याशी बोल ना!

छे छे, सुखाचीच कांहीतरी
झाली असली पाहिजे गफलत
कारण त्याला माझ्याच स्वप्नांत
यायचं होतं असं नाही वाटत!

पण मग मनांत म्हटलं आता आलच आहे
तर निदान खात्री करुन घेवु
नाराज होवुन निघुन जाणार नाही
ह्याची खबरदारी घेवु!

मी त्याला विचारलं, "अरे-
तु नक्की ’सुखच’ आहे कशावरुन?"
की माझ्यासमोर ऊभा आहेस दु:ख्खा,
सुखाचं घेवुन पांघरुण?
हे बघ आधी तुला तुझं अस्तित्व सिद्ध करावं लागेल
नाहीतर मला नाही वाटत तुझं माझं जमेल!"
मला वाटलं, सुख दचकेल, विचारांत पडेल,
खिच्यांत हात घालुन, आयडेंटीकार्ड शोधेल
आपण नक्की सुखच आहोत ना?
हे सिद्ध करायचा विचार करायला लागेल

अहो पण कसलं काय नि कसलं काय
ते ढिम्मं हललं नाही
मला वाटलं होतं, तसं कांही झालं नाही!

त्याने एक स्मितहास्याची लकेर झाडली
"ह्या मुर्खाला समजावायचं तरी कसं?"
अशी मान हालविली

"हे बघ मित्रा, मी आहे हा असा आहे,
स्विकारायचं असेल तर स्विकार
अन्यथा हा मी निघालो"
मग तर मला अधिकच संशय आला
"आला तसा निघुन जा" एव्हढेच मी म्हणालो

अधिक कांही न बोलतां
आल्या वाटेनं सुख निघुन गेलं
जातां जातां दु:ख्खाला
माझ्या सांत्वनाला पाठवुन दिलं

कशी कोण जाणे पण
तेव्हढ्यांत मला जाग आली
आणि वाटलं की सुखाला
ऒळखण्यांत आपण चुक केली!
चांगलं स्वत:हुन आलं होतं सामोरं
नको ते प्रश्न विचारुन, मी केलं त्याचं पोतेरं!

खुप वाईट वाटलं मला एका गोष्टीचं
सुखाला ओळखण्यांत आपली चुक झाली ह्याचं!
प्रश्न नेहमी दु:ख्खाला विचारायचा असतो
सुखाला प्रश्नच विचारायचा नसतो
साधारणपणे आपलं हे असच असतं
सुख कशांत असतं
त्याचाच नेहमी विसर पडतो!

तेव्हढ्यांत माझा शेजारी म्हणाला
"दु:ख्खाने मला अनुभव शिकविला
सुखाने मात्र ते कुठे राहातं
त्याचा पत्ताच दिला!
पण ते म्हणालं की त्याचा
पत्ता सारखा बदलत असतो
कारण छोट्या छोट्या गोष्टीत
झोकुन द्यायला तो वणवण फिरत असतो
सुख तसं सांपडायला कठिण नसतं
ते कुठे मिळेल ह्याचा पत्ता मात्र
माहित असणं आवश्यक असतं!

मातीमधल्या बी मधुन हळुवारपणे
जगाची चाहुल घेणारा कोंब पहा
पहाटे पहाटे फुलांच्या पाकळीवर
विराजमान झालेला दवबिंदु पहा
सुर्यास्ताला ऊधळणारे क्षितीजावर
बागडणारे रंग पहा
नितळ पाण्यामध्ये अविरतपणे
स्वातंत्र्य ऊपभोगणारे मासे पहा
खडकाच्या काळजांतुन ऊमलणारी
दुर्दम्य ईच्छाशक्तीची फुले पहा
पावसांत भिजणारे, जगावर छत्र धरणारे
रंगीबेरंगी ईंद्रधनुष्य पहा
सागराच्या किनारी बसुन त्या अथांग
सागराच्या पलीकडे असलेले क्षितीज पहा
नातवांना खेळवितांना त्यांच्या
इवल्या इवल्या डोळ्यांमधले भाव पहा
दिसतील तुम्हांला सारीकडे सुखांच्याच राशी
अरे माणसा, सुख शोधण्याची गरजच नाही रे
तुझे आहे सारे तुझ्यापाशी

--सुख आहे तरी कशांत?
शशिकांत पानट
२४ जुलै-२०१४
shashi@panat.org

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 5:46 pm | प्रभाकर पेठकर

'सुख हे मानण्यावर असते' असे म्हणतात ते उगीच नाही. त्या मागे धावावे लागत नाही. आपल्या आजूबाजूलाच असते पण दुर्दैवाने दु:खालाच कवटाळून बसणार्‍या आपल्याला ते जाणवत नाही.

सस्नेह's picture

22 Oct 2014 - 2:35 pm | सस्नेह

सरळ साधी छान कविता आवडली

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 6:25 pm | मुक्त विहारि

तुझे आहे सारे तुझ्यापाशी

१००% सत्य...

आपल्यापाशी काय नाही आहे, ह्या पेक्षा काय आहे? ह्याची यादी मोठी असते.

नूतन's picture

2 Dec 2014 - 7:30 pm | नूतन

आवडली

आतिवास's picture

14 Dec 2014 - 10:22 pm | आतिवास

कविता आवडली.

पिरतम's picture

9 Feb 2015 - 11:55 pm | पिरतम

छान आहे कविता