प्रास्तविक-
युरोपात गेल्या दोनेक हजार वर्षात निर्माण केल्या गेलेल्या व विशेष म्हणजे जतन केलेल्या वा पुनर्निर्माण केलेल्या चर्चेस, विलाज, क्यासल्स, शॅटो, फोरेट्रेस ई संख्या अमाप आहे. तेथील कोणताच देश असा नाही की तेथे ऐतिहासिक व कलात्मक मूल्य नसलेले काही आहे. या लेखात सर्वच देशातील वास्तुकलेचा आढावा घेणे शक्य नव्हते. यातील चित्रे व माहिती यावर लेखकाचा काहीही अधिकार नाही. ही सारी सामग्री आंतरजालवरचीच आहे.
मानव शरीर ज्या प्रमाणे एका दीर्घकालीन उत्क्रांतिचे फळ आहे. तसेच मानवी जीवशैलीही. भटकंती, स्थिरता, शेती, धर्म, देश, युनो असा मानवसमाज बदलत गेला आहे. मानवी जीवनात वास्तु या गोष्टीला आसरा ते विलास या अगदी टोकाच्या उपयोगांच्या व्याप्तीत महत्वाचे स्थान आहे. म्हणूनच नुसत्या उपभोगाबरोबरच वास्तूच्या देखणेपणाचाही विचार झालेला दिसतो.
वास्तुशैलींचा अभ्यास करणारे लोक काल-स्थान यांच्या संयुक्त संदर्भाने करतात. उदा अतिप्राचीन, प्राचीन, मध्यकाल, अर्वाचीन
असा कालानुसार व त्याला आडवा संदर्भ स्थला नुसार. म्हणजे भारतीय, युरोपीय, अमेरिकन, दक्षिण अमेरिकन, अग्नेय आशियन ई. त्यामुळे युरोपातील वास्तूंचा अभ्यास व निरीक्षण रोमनिस्क, बायझेटाईन, रोमन, रेनेसां, गॉथिक, निओ क्लासिक अशा शब्दांचा वापर करताना इंग्लिश, रोमन, फ्रेंच इटालियन, जर्मन असा स्थलनिदेश करून केला जातो. एखादी शैली म्हणजे त्यातील कमानी, खांब, छप्परे यांची पद्धत. मग ती शैली जिथे निर्माण झाली तिथेच न रहाता इतरत्र पसरते. तेथील हवामान उपलब्ध सामग्री या नुसार बदलते. उदा. स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत स्थायिक झाले. त्यानी तिकडे युरोतातील शैली नेलीही पण त्यावर त्या नव्या जागेत तेथील पर्यावरणानुसार फरक झालाच.
युरोपातील वास्तुकला शैलींच्या काळाविषयी थोडक्यात-
क्लासिकल - ख्रिस्तपूर्व ८५० ते ख्रिस्तोत्तर ४७६
बायझंनटाईन- ख्रिस्तोत्तर ५२७ ते ५६५
रोमनिस्क- ख्रिस्तोत्तर ८०० ते १२००
गॉथिक -ख्रिस्तोत्तर ११०० ते १४५०
रेनेसान्स- ख्रिस्तोत्तर १४०० ते १६००
बरोक -ख्रिस्तोत्तर १६०० ते १८३०
रोकोको - ख्रिस्तोत्तर १६५० ते १७९०
निओ क्लासिक- १७३० ते १९२५
निओ गॉथिक १९०५ त १९३०
मॉडरनिस्ट -१९०० ते आजतागायत
खास- रोमन, ग्रीक इजिप्शैयन शैली त्याही पूर्वीच्या.
आज आर्थिक दास्यत्व निर्माण करून युद्ध खेळले जाते. कारण लढाया व त्यात खास करून अंणुयुद्ध यानी होणारे भयानक परिणास सर्वदूर दिसून येतात. पण कालच्या जगात तसे नव्हते. धार्मिक भावना या आर्थिक समस्यापेंक्षा संघर्षात अधिक प्रभावीपणे काम करतात अशी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची अटकळ होती. त्यामुळे धर्माचा मुलामा घेऊन साम्राज्यवादासाठी जनतेला वेठीस धरायचे हा प्रकार जगभर सर्बत्र होता. युरोपातही तेच चालत असे. आम्ही तुम्हाला संरक्षण देतो. तुम्ही आम्हाला काही तर द्या असे शेतकरी कामकरी ई ना पटवून जमीनदार व उमराव यांची नवी जमात तिथे निर्माण झाली. त्यानी स्वतः साठी अनेक देखणे व मजबूत बांधणी असलेले गढीवजा किल्ले, वाडे बांधले. आज तेच पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे.
युरोपात दिसली टेकडी की बांध वाडा वा प्रासाद हा खाक्या दिसतो. जागा असेल तर विस्तीर्ण बाग भोवती असणारच. तसेच हे वाडे काही ठिकाणी पाणवठ्याच्या काठी तर काही ठिकाणी चक्क नदीच्या पुलावर बांधलेले आढळतात. भवताली घनदाट झाडी असणारच. काही जागी वाड्याभोवती खंदक खोदलेला दिसतो. या लेखात युरोपातील सर्वच वास्तूंचा आढाव घेणे शक्य नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर वास्तू युरोपातील लोकानी बांधल्या आहेत व काळजीपूर्वक जनतही केल्या आहेत. काही वास्तू दुसर्या महायुद्धात पडल्या तरी त्या नव्याने पूर्वीसारख्या बांधलेल्या आहेत.
दक्षिण इटली स्थित कसेर्टा पॅलेस व त्याचा विस्तीर्ण परिसर चकित करणारा आहे. इ स १७५२ मधे नेपल्सच्या सातव्या चार्लस राजासाठी याचे बांधकाम चालू झाले. वास्तुकार व्हॅनव्हिटेली याने याचे डिझाईन केले होते. राजवाडा ते डोंगर हे तब्बल चार किमी इतके अंतर आहे. वाड्यापासून ४ किमी ची पुष्करिणी एका डोंगरापर्यंत जाते. शेवटी एक सुदर शिल्प व धबधबा आहे. एप्रिल १९४५ मधे याच वाड्यात जर्मनानी बिनशर्त शरणागति पत्करली. १९९७ मधे यास " जागतिक वारसा" असा बहुमान प्राप्त झाला....
मोन्टे कसिनो अॅबी -- रोम पासून दक्षिणेस १३० किमी अंतरावर एका टेकडीवर या मोनेस्टरीची स्थापना ई स ५२९ मधे सेंट बेनेडिक्ट यानी केली. १९४४ मधे मोन्टेच्या लढाईत दोस्त राष्ट्रानी प्रचंड बॉम्बिंग करून ही इमारत उध्वस्त केली होती. ती नंतर पुन्हा जशीच्या तशी बांधण्यात आली....
विला अल्डोब्रॅडिनी - दक्षिण इटलीतील फ्रेस्काटी येथे १५५० मधे बांधकामास सुरूवात. १५५८ मधे पोपने आपल्या पुतंण्यास फ्रान्सशी यशस्वी तह केल्याबद्द्ल दिला. आज याच नावाच्या कुटुंबाची मालकी.
विला डी एस्टे - १५५० च्या सुमारास बांधकामास सुरूवात. चर्चची सत्ता असताना कार्डिनल डी एस्टे साठी बांधलेला हा विला. याच्या डिझाईनचे श्रेय पिरो लिगारिओ याला दिले जाते. उतारावर ही बाग तयार करण्यात आली असून सुमारे ५०० कारंजी या बागेत आहेत. हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविले गेले आहे....
सेंट पीटर्स कथिड्रल रोम - ब्रेमेंट, एंजेलो व बर्निनी यानी डिझाईन केलेले हे अप्रतिम बॅसिलिका . याचे काम १५०६ पासून १२० वर्षे पुढे चालू होते. रेनेसां काळातली ही कलाकारी आहे. एकूण उंची ४५२ फूट. वरच्या घुमटाचा व्यास १३६ फूट आहे. घुमटाच्यावर रोम नगराचा देखावा पहाण्यासाठी एका गॅलरीची सोय आहे. मुख्य दर्शनी भागात रोमन पद्धतीचे खांब त्यावरील गच्चीत धर्मगुरूंचे पुतळे. समोर विशाल पटांगण मधीमधे एक उंच स्तंभ. बाजूने अर्धवर्तुळाकार आकारात खांबानी वेढलेले " कॉलोनेड" ....
विला रोक्का पिझाना - वास्तुकार विन्सेझो स्कामोझी याने १६ च्या शतकात पिझानी कुटुम्बासाठी बांधला. वेरोना शहरापासून नजिकच असलेल्या लेनिगो गावातील एक हिरव्यागार उंचवट्यावर हा दिमाखाने उभा आहे. दर्शनी भागातील पोर्टिको चे खांब आयोनिक शैलीतील आहेत.
.
बॅसिलिका - सेट- अन्थोनी पादुआ इटाली- १२३२ मधे बांधकाम सुरू होऊन १३१० मधे पूर्ण तरीही नंतर अनेक बदल करण्यात आले. त्यामूळे बायझेटाईन व तुर्की वास्तुकलेचा प्रभाव दिसतो....
विला ला रोटन्डा- इटाली- आर्किटेक्ट आंद्रे पालदिओ ने रचना आखलेला हा विला उत्तर इटलीतील विसेन्झा गावाच्या बाहेर आहे. रेनेसां काळातील ही वास्तू पालडीओला रोम येथील पॅन्थेऑन या देवळावरून सुचली. चारही बाजुनी प्रोर्टिको ( एक प्रकारचा व्हरांडा) इथे पहावयास मिळतात. इमारतीमधील केंद्रस्थानी असलेला वर्तुळाकार हॉल मुळे रोटन्डा हे नाव दिले असावे. सर्व बाजूंनी सारख्या असणार्या फार कमी वास्तू युरोपात आहेत. कदाचित ही एकच.
__________________________________________________________________________________________--
शेटो ड्युप्लेसी बरे-१४६८ ते १४७२ या केवळ पाच वर्षात फ्रान्सचा एक मंत्री बरे याने ही इमारत बांधली.
शेटो डी सुमोर - लोर नदीच्या एका उपनदीच्या संगमावर सुमोर या गावात १० व्या शतकात मूलतः किल्ला म्हणून बांधकाम . नंतर रूपांतर शेटो मधे करण्यात आले. टोफे नावाच्या स्थानिक नरम दगडात या इमारतीची रचना केली आहे.
शॅटो दु रिवो- लॉर नदीच्या ( फ्रान्स) खोर्यात एका फार्मलँड मधे वसलेला हा किल्ला. १५ च्या शतकातील फ्रेंच वास्तुकलेचा नमुना म्हणून याचा उल्लेख होतो.
शेटो दि ओराँ - १७ च्या शतकात किल्लावजा घरे मागे पडून महाल या स्वरूपात उमरावांची घरे बांधली जाउ लागली त्याचे हे उदाहरण. १९३० मधे फ्रान्स सरकारने विकत घेऊन त्याचे रूपांतर मॉडर्न आटे म्युझीयम मधे केले आहे.
शॅटो द मॉन्टेसोयू - फ्रान्स- लॉर व विएन यांच्या संगमावर ही गढी आहे. राजा सातवा चार्लस यांचा एक सल्लागार जीन दे चम्बर्स याने १४५५ मधे बांधकामास स्रुरूवात केली. १९ च्या शतकाच्या अखेरीस भग्नावस्थेत सोडून दिलेली हे वास्तू आता पुन्हा बांधण्यात आली आहे.
शॅटो ड्से लो डोरेडो - फ्रान्स- १६ च्या शतकाच्या सुरूवातीच्या फ्रेंच रेनेसन्स शैलीत बांधकाम....
शॅटो डी विलान्ड्री- फ्रेंच रेन्सेसान्स शैलीत बांधकाम . आजूबाजूची बाग. त्यातील नक्षीदार कुंपणे अप्रतिम असून या जागेला जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त आहे. १९०६ मधे जोकिम कार्वालो याने ही मिळकत खरेदी करून तिच्या दुरूस्ती साठी अमाप पैसा खर्च केला....
शॅटो दि ज्से नॉंग सो -फ्रान्स- ई स १५१४ ते १५२२ या काळात शेर नदीवर बांधण्यात आला. गॉथिक व रेनेसान्स शैलीचा संगम यात दिसतो फ्रान्स मधील व्हर्साय पॅलेस खालोखाल पर्यटकात ही इमारतच लोकप्रिय आहे.
शॅटो डि ब्लॉ- फ्रान्स- खरे तर १३ व्या ते १७ च्या शतकाच्या दरम्यान बांधकाम झालेल्या अनेक इमारतींचा हा समूह आहे. ओर्लिऑ मधून इंग्रजाना हाकलून देण्यापूर्वी बिशपचा आशीर्वाद घेण्यासाठी जोन ओफ आर्क इथे १४२९ मधे आली होती. एक एक प्रचंड प्रकरण असून आत ७५ जिने, ५६४ खोल्या तर १०० शयनगृहे आहेत. १८४१ मधे राजा लुई फिलिप याने या वास्तूस ऐयिहासिक स्मारकाचा दर्जा दिला. आज येथे एक संग्रहालय आहे....
शॅटो डि शेवर्नी० फ्रान्स - १६२४ ते १६३० च्या दरम्यान बांधकाम. पॅलेस ऑफ लक्सेंम्बर्ग ची छाप आहे. वास्तुकार- जॅक्स बोगी. १९१४ मधे ही वास्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. आज इथे फर्निचर, कलावस्तू, टेपेस्ट्री याचा मोठा संग्रह आहे.
शॅटो डि शेंबो- १५१९ ते १५४७ या काळात राजा फ्रान्सिस १ याने बांधला. जगात अतिशय मान्यता पावण्याचे कारण येथील फ्रेंच रेनेसान्स मधे असलेली वास्तूशैली. या विशाल वास्तूत ४४० खोल्या, २८२ फायर प्लेसेस तर ८४ जिने आहेत. इमारतीवरच्या टॉवर्स व चिमनीज मधे शैलींची सरमिसळ दिसते. त्यात कोठेही सारखेपण नाही. या इमारतीला युनेस्को चा जागतिक वारसा या स्वरूपाचा दर्जा मिळाला आहे.
फोन्टनब्लो पॅलेस फ्रान्स - पॅरिसपासून ५५ किमी अंतरावर असलेल्या या महाकाय प्रासादाच्या बांधकामाला अनेक फ्रेंच राज्यकर्त्यांचा हातभार लागला आहे. गिले ब्रटन, सेबेस्टीनो सेरिलो आणि लिओनार्दो दा विंची यांनी वेळेवेळी येथील भागांचे डिझाईन केले आहे. हेन्री दुसरा याने पुढे इमारतीचा मोठा विस्तार केला. आजूबाजूचे उद्यान ८० हेक्टर जागेवर पसरले आहे. १८ च्या शतकाच्या अखेरीस वाईट दशा झालेल्या या वास्तूला नेपोलिअयन ने पुन्हा वैभव दाखविले....
शॅटो द व्हो ला विकोम्ट- पॅरिसपासून अग्नेयेस ५५ किमी अंतरावर मेन्सी या गावी. जागतिक दर्जाची ही वास्तू आहे. १६५८ ते १६६१ मधे प्राथमिक बांधकाम. आर्किटक्ट लुईस ल व्हा, गारर्डन रचनाकार- आंद्रे ल नोत्र यानी एकत्र काम केले. फुके नावाचा कलांचा आश्रयदाता अर्थमंत्री झाला. याने व्हा नोत्र व बून या कलाकाराना एकत्र आणले. या परिसरासाठी ३ खेडी विस्थापित करण्यात येऊन खेडूताना इमारतीच्या देखभालीत नोकर्या देण्यात आल्या.
_____________________________________________________________________________________--
रोगन्बर्ग अॅबी- जर्मनी- इ,स,११२६ मधे बांधकामास सुरूवात. १७५२ नंतर बरोक शैलीत रूपांतर.
होहेनश्वेनगॉ कॅसल- फुसेन जर्मनी. - परिकथेत शोभेल अशा या वाड्यात ब्व्हेरियाचा राजा लुडविग रहात असे....
नौश्व्वनस्टाईन कॅसल- फुसेन- जर्मनी- जर्मनीतील ऐतिहासिक वास्तुंतील मेरूमणि. रिचर्ड वॅग्नर याच्या संगितिकांची भुरळ पडलेल्या राजा लुडविगने त्याच्या आदरासाठी या इमारतीच काम सुरू केले. राजाने या इमारतीचा खर्च रयतेकडून न घेता स्वता: केला. पण फक्त १७४ दिवस हा इथ राहू शकला. वेडा लुडविग म्हणून शेवट झालेल्या या राजाने सर्वाना वेड लावील अशा वास्तूची निर्मिती केली....
लिंडरहॉफ पॅलेस- जर्मनी- लुडविग दुसरा या राजाने आपल्या हयातीत बांधलेला हा प्रासाद. मात्र यावर फ्रेंच शैलीचा प्रभाव आहे. कार फॉन एफनेर याने या इमारतीच्या भवतालच्या बागेची रचना केली. ही एक अद्वितीय अशी ऐतिहासिक बाग समजली जाते. बागेत पंचमहाभुते, ॠतू व सप्तखंडांच्या मूर्ती आहेत. उतारावर ३० पायर्या असलेला जलप्रवाह असून सर्वात खालच्या भागात नेपचून कारंजे आहे. व्हर्साय वरून प्रेरणा घेऊन या ही इमारतीत हॉल ऑफ मिरर आहे.
प्रॉटेस्टंट लोकांची पंढरी व मार्टिन ल्यूथरची कर्मभूमी असलेल्या जर्मनीतील विटेनबर्ग गावातील हे चर्च. याला कासल चर्च असेही नाव आहे. वास्तुकार कॉनराड फ्लूजर याने याचे डिझाईन केले. इतर चर्चेस प्रमाणे याचा बेल टॉवर नसून तो डोम टाईप चा आहे....
जर्मनीमधील सर्वात मोठी " इंग्लीश गार्डन" अशी मान्यता असलेली वोर्लिट्झ गार्डन. रम्य निसर्ग असलेला परिसर व त्यात अगदी समरस झालेल्या मानव निर्मित वास्तू. विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांच्या प्रतिकृती इथे पहावयाला मिळतात....
नॉनबर्ग कॅसल. फ्रायबर्ग जर्मनी - एका टेकडीवर १०९० मधे बांधण्यात आला. आजकाल खेळाडूंची पंढरी म्हणून गणला जातो.
सिटी पॅलेस - वायमार - पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या वायमार रिपब्लिक फेम वायमार गावात ही इमारत आहे. १० व्या शतकात बांधकामास सुरूवात व नंतर वेळेवेळी बदलण्यात आलेली इमारत. १९२३ मधे संग्रहालयात रूपांतर.
बुकन्वाल्ड मेमोरियल- १९३८ ते १९४५ याकाळात जर्मनीतील सर्वात प्रथम व मोठ्या छळछावणीत ५६ हजार मृतांच्या स्मरणार्थ.
जर्मनीतील एका सोप फॅकटरीने बनविलेली ही अजब वास्तू - २२० मीटर उंचीचा हा पोटॅश वेस्ट चा ढिगारा आहे. दीड कि मी लांबीच्या कन्र्व्हेयर बेल्टच्या साह्याने इथे वाया गेलेला माल आणून सोडला जातो.
राईनहार्डब्रन कॅसल - ९०० वर्षे अनेक मालकांच्या ताव्यात असलेली ही इमारत एका रम्य अशा बागेत आहे. बरेच वर्षे राजेरजवाड्यांचे निवासस्थान असलेली या जागी राणी विक्टोरिया ची भेट प्रिन्स अलबर्ट यांच्याशी झाली.
होहेन्झोलर्न कॅसल जर्मनी- स्टटगार्ड पासून ५० किमी अंतरावर एका २८०० फूट उंचीच्या टेकाडावर बांधकाम. १२६७ ते १८४२ या कालात तीन वेळा याचे पुन्हा पुन्हा बांधकाम करण्यात आले.
वार्टबर्ग कॅसल - जर्मनीमधील हायनिक नॅशनल पार्क च्या सीमेवरील आय्नाच गावानजिकच्या ४१० मीटर उंचावर हा किल्ला आहे. येथे राहून मार्टिन ल्यूथरने बायबल मधील नव्या कराराचे भाषांतर जर्मन मधे केले. १९९९ साली युनेस्को ने याचा समावेश जागतिक वारशाच्या यादीत केला.]
हेरन्किमसी पॅलेस ( लुडविग पॅलेस) बव्हेरिया जर्मनी येथील किमसी सरोवरातील हेरन्से बेटावर हा अचाट सुंदर असलेला प्रासाद बांधलेला आहे. इ स ७६५ ते १८०३ पर्यंत येथे बेबेडिक्टाईन चर्च होते. १८७३ मधे लुडविग दुसरा याने हे ठिकाण ताब्यात घेतले. वास्तुकार- खरिस्चन जॅन्क व इतर दोघानी १८७८ ते १८८५ या काळात या नव्या पॅलेस चे बांधकाम केले. येथील उद्यानावर फ्रान्स मधील व्हर्सायच्या उद्यानाचा प्रभाव दिसून येतो.
दोस्त राष्ट्रानी महायुद्धानंतर बर्चटेसगाडेन मधील त्याचे घर उध्वस्त केले पण त्यांच्या नजरेतून त्याचे हे आवडते विश्रांती स्थान वाचले. 'ईगल्स नेस्ट'.
नम्र निवेदन- आपल्याला हा प्रवास नक्कीच रंजक वाटला असेल. फ्रेंच व जर्मन भाषा हा संस्कृत सारख्या नाहीत. त्यात उच्चार व लिखाण यांचे संबंध नीट नाहीत. त्यामुळे येथील काही नावे ही फ्रेंच , जर्मन ज्याना येते अशा मिपाकराना " हास्यास्पद" वाटण्याची शक्यता आहे. त्यानी सांभाळून घ्यावे. ज्याना या दोन्ही भाषा येत नाहीत, त्याना वाचताना काही त्रास होणार नाही.
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 9:58 am | खटपट्या
जबरद्स्त !!
21 Oct 2014 - 11:00 am | यसवायजी
सु प र्ब ! ! !
21 Oct 2014 - 3:14 pm | आयुर्हित
सुंदर, अवाढव्य, अप्रतिम इमारतींचे नमुने!!
युरोपातील वास्तुकला शैलीची तोंडओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
यामुळे यालेखात एक अप्रतिम खजिनाच रिता झालाय!
21 Oct 2014 - 7:42 pm | मधुरा देशपांडे
प्रचंड माहितीपुर्ण लेख. फार आवडला. :)
22 Oct 2014 - 11:41 am | एस
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण लेख. वास्तुस्थापत्यशैलीबद्दलची माहितीही आवडली.
'जर्मनीतील एका सोप फॅकटरीने बनविलेली ही अजब वास्तू' आणि 'वार्टबर्ग कॅसल' इथे एकच फोटो दोन्हीकडे पडला आहे. तेवढं संमंकडून दुरूस्त करून घ्या.
23 Oct 2014 - 1:34 pm | इशा१२३
फार सुंदर खजिना आणलात इथे.अप्रतिम फोटो आणि माहिती.
23 Oct 2014 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर
नखशिखांत वास्तूसौंदर्य, टापटिपपणा, स्वच्छता, दूरदूर पसरलेली हिरवळ कुणाचाही पाय इथेच घुटमळेल अशी ठिकाणं, पर्यटन स्थळं आणि लेखकाची लेखनशैली.... सर्वच अप्रतिम.
24 Oct 2014 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे
अचाट कलाकृतींच्या फोटोंचा आणि माहितीचा एक खजीनाच आहे हा लेख !!! *i-m_so_happy*
अनेक धन्यवाद हा खजिना इथे उघड केल्याबद्दल ! अजून काय ?
1 Nov 2014 - 11:33 pm | सुहास झेले
सुंदर... मागे मुंबईत आपल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल एका कार्यक्रमात चर्चा झाली होती.. त्यात ह्यातले बहुतेक कॅसल बघण्यात आले होते... धन्यवाद ह्या माहितीपूर्ण लेखासाठी :)
2 Dec 2014 - 7:55 pm | अकिलिज
यातले होहेन्झोलेर्न कॅसल आणि सेंट पीटर्स कथिड्रल पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कॅसलमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या फरश्या खराब होवू नयेत म्हणून पादत्राणांवर अजून मोठ्ठया चपला घालूनच पाहू देतात. या स्थळांची ठेवलेली उत्तम देखभाल पाहिल्यावर पन्हाळा वगैरे आठवून खूप वाईट वाटले.
14 Dec 2014 - 3:09 pm | आतिवास
अशा वास्तू पाहिल्या की मानवजातीची पुन्हा एकदा कमाल वाटते! अजब जादू आहे माणसाच्या हातात!