बाकरवडी

इशा१२३'s picture
इशा१२३ in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 1:07 am

नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच.

या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात. पण सणानिमित्त घरी केलेल्या खमंग बाकरवड्या छान वाटतात.

b1

साहित्यः
बाकरवडीच्या सारणासाठी लागणारे साहित्यः
सुक्या खोबऱ्याचा कीस १ वाटी
खसखस १/४ वाटी
तीळ १/४ वाटी
शेव १/२ वाटी (ऐच्छिक)
तिखट २ चमचे
काळा मसाला २ चमचे
ओवा १/२ चमचा
हळद १/२ चमचा
जिरे पूड १/२ चमचा
धने पूड १/२ चमचा
कोथिंबीर २ वाट्या (बारीक चिरलेली)
मीठ चवीनुसार
हिंग चिमूटभर

b2

सारणाची कृती: तीळ्,खसखस्,खोबरे भाजून घ्यावे.भाजलेले तिन्हि पदार्थ मिक्सर मधून कोरडेच बारिक वाटून घ्यावे.
एका भांड्यात काढून त्यात कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,धने जिरे पुड,काळा मसाला,हिंग घालून एकत्र करून घ्यावे.

b3

सारणाची कृती: तीळ, खसखस, खोबरे भाजून घ्यावे. भाजलेले तिन्ही पदार्थ मिक्सरमधून कोरडेच बारीक वाटून घ्यावे.

एका भांड्यात हे कोरडे वाटण काढून त्यात कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पूड, काळा मसाला व हिंग घालून एकत्र करून घ्यावे.

आवरणाचे साहित्य:
डाळीचे पीठ ३ वाट्या
मैदा १/२ वाटी
तिखट २ चमचे
हळद १/२ चमचा
तेल (मोहनासाठी) २ चमचे
मीठ
तळणीसाठी तेल

b44

कृती : प्रथम डाळीचे पीठ, मैदा, तिखट, मीठ, हळद, २ चमचे तेल एकत्र करून मळावे.
या पिठाचे गोळे करून घ्यावे. त्याच्या थोड्या जाडसर पोळ्या करून त्यावर एकसारखे सारण
पसरून घ्यावे. आता या पोळीचे रोल करावे.

b5

हे तयार रोल ढोकळ्याप्रमाणे वा चाळणीत खाली पाणी ठेवून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावे.
वाफवून झाल्यावर हे रोल गार करावे. गार झाल्यावर रोलचे एकसारखे तुकडे करावे.

b6

गरम तेलात बाकरवडी तळहातावर हलकेच दाबून (तळताना वडी सुटू नये यासाठी) सोडावी. मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावी.

खमंग, खुसखुशीत बाकरवडी तयार!

b7

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Oct 2014 - 10:18 pm | आयुर्हित

सुंदर फोटो व माहिती.
खमंग,खुसखुशीत बाकरवडी पाहून तोंडाला पाणी सुटले!

साती's picture

21 Oct 2014 - 2:39 pm | साती

मस्तच!
नक्की करून बघणार.

वा मस्त गं ईशा..करूँ बघीन एकदा...उकडून घ्यायचं माहीत नव्हतं..

एस's picture

21 Oct 2014 - 4:19 pm | एस

पाकृच्या फोटोतील कोंथिंबिरीचे पान पाहिले की आमच्या मनात वेगळीच चलबिचल होते. नको त्या आठवणी!

बाकी बाकरवडी हा एकदम आवडता प्रकार! कोणी करून खायला घातल्यास किती बरं होईल! बोलवा रे बोलवा मला जरा!

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 4:35 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी फराळातील वेगळेपण फार आवडलं. कधी बनविलेल्या नाहीत आता ह्या पाककृती बरहुकूम प्रयत्न केला पाहिजे.

बहुगुणी's picture

21 Oct 2014 - 4:56 pm | बहुगुणी

वाचनखूण साठवता येत नाहीये याचं वाईट वाटलं.

तुषार काळभोर's picture

21 Oct 2014 - 5:26 pm | तुषार काळभोर

पण प्रचंड नाजूक व निगुतीने करायचा पदार्थ आहे, त्यामुळे आमच्या घरी कधी ट्राय केला गेला नव्हता. हे दाखवून प्रयत्न करण्याविषयी सुचवता येईल.

रेवती's picture

21 Oct 2014 - 6:20 pm | रेवती

सुंदर पाकृ व फोटू. खंमंग, खुसखुशीत झालीये हे कळते आहे.

मृत्युन्जय's picture

21 Oct 2014 - 6:32 pm | मृत्युन्जय

सुंदर दिसताहेत. कधी खायला येउ?

सानिकास्वप्निल's picture

21 Oct 2014 - 9:48 pm | सानिकास्वप्निल

मस्तं दिसतेय बाकरवडी
एकदम खमंग, खुमासदार :)

सस्नेह's picture

21 Oct 2014 - 10:01 pm | सस्नेह

नजाकतदार पाकृ.
तपशील छान दिले आहेस गं इशा

अजया's picture

22 Oct 2014 - 1:22 am | अजया

नक्की करुन बघणार!!

सुहास झेले's picture

22 Oct 2014 - 1:24 am | सुहास झेले

सहीच... पहिल्यांदा मला बाकरवडी कशी बनवतात हे समजले. धन्यवाद यासाठी :)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 8:35 am | मुक्त विहारि

पा.क्रु. नक्की करून बघणार...

अनन्न्या's picture

22 Oct 2014 - 10:46 am | अनन्न्या

कधी करून पाहिली नाहीय, सविस्तर पाकृ. वाचून करावीशी वाटतेय.

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2014 - 3:46 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसतेय..
वेगळी कृती! वाफवून घ्यायची कृती माहित नव्हती.. अशा प्रकाराने करुन बघेन वेळ झाला की..
स्वाती

सगळ्यांचे खुप आभार.नक्की करून बघा.=) :smile:
एक लिहायचे राहिले.हेच सारण आवरणासाठी भिजवलेल्या गोळ्याच्या पुर्‍या लाटून त्यात भरून चौकोनी बंद करायचे आणि तळायचे छान दिड तयार होतात.

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 6:58 pm | दिपक.कुवेत

फोटो अगदि तोंपासू आलेत. फोटोवरुन बाकरवड्या अत्यंत खमंग आणि खुशखुशीत झाल्या असणार ह्यात वाद नाहि. पण काहि ठिकाणी पारी/पोळीला चिंचेची आंबट-गोड चटणी लावून मग सारण पसरवतात ना? शीवाय वड्या डायरेक्ट तळल्याचं एकीवात आहे. वाफवल्याने काय होतं?

पारिला आंबट-गोड चटणी लावतात किंवा सारणात थोडी आमचुर पावडर घालतात.चवीत थोडा फरक पडतो.मी वापरलेली नाहिये.पण वापरायला हरकत नाहि.छान लागेल.
वड्या वाफवल्याने जास्त टिकतात.आणि तळताना सट्ट्या होत नाहित.(उलगडत नाहित् आणि सारण बाहेर येत नाहि)

जुइ's picture

27 Oct 2014 - 4:26 am | जुइ

करुन बघण्यात येईल.

खमंग वास सुटला फोटो पाहिल्या बरोबर.

आरोही's picture

3 Nov 2014 - 12:56 pm | आरोही

खूप आवडली बाकरवडी ..

इशा१२३'s picture

5 Nov 2014 - 4:08 pm | इशा१२३

धन्यवाद सगळ्यांना.

पैसा's picture

8 Nov 2014 - 11:10 am | पैसा

हा प्रकार घरी करता येतो हे तुझ्यामुळे कळले! मस्त सादरीकरण!

तुमचे विशेष धन्यवाद पैसाताई!