"इथे येताना अजिबात माज करायचा नाही. कोण कधी घोडा काढून डोक्याला लावेल हे सांगता येत नाही. इथे सगळे असेच येडझवे येतात. कुणाचा धक्का लागला, काहीही झालं तरी आपलीच चूक असल्यासारखं गुपचाप पुढे निघून जायचं. कुणाशी काही बोलायला जाऊ नकोस. काही अडचण आली तर सरळ मला फोन लावायचा. मी येतोच."
शहरातल्या 'त्या' गल्लीत शिरताना मित्राने बजावलेलं डोक्यात पक्कं बसलं होतं. तसंही तिथे माझ्यासारख्या व्हाइट कॉलरवाल्याने जाणे हे आजूबाजूच्यांच्या भुवया उंचावणारे ठरणार होतेच. महाविद्यालयीन जीवनात एकदाच चुकून 'त्या' रस्त्याने आलो होतो. दुपारच्या वेळी सुस्तावलेल्या त्या गल्लीच्या दोन्ही बाजूंना तेव्हाही उभ्या असलेल्या नेपाळी तोंडावळ्याच्या मुलींकडे आश्चर्याने पहात होतो. पण त्यांचा भडक मेकअप आणि तोकड्या टॉपमधून उघड्या पडलेल्या घळया पाहून लगेचच काय समजायचे ते समजलो होतो. मान खाली घालून त्यांचे 'ये चिकणे, चल ना! आता क्या?' वगैरे जणू आपल्यासाठी नव्हतेच असे समजून पावलांचा वेग वाढवला गेला होता. तिथून बाहेर पडेपर्यंतचा काही मिनिटांचा तो वेळ माझ्यासाठी माझ्या सर्व मूल्यांचा कस पाहणारा होता. त्या कोवळ्या वयातही कोण कुठलीशी कणव दाटून आली होती आणि भयानक रागही आला होता समाजाचा.
आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा पाऊले तिथे वळली होती. जाणीवपूर्वक. शांतपणे. मान सरळ ठेऊन पुढे पहात. रिक्षांचे हॉर्न, हातगाडीवाल्यांचे धक्के, मग्रूरी भिनलेल्या टाळक्यांची टोळकी आणि पुन्हा तेच, तसेच इशारे व मागून ऐकू येणारे खिदळणे - प्रत्येक दारात, गच्चीत, फुटपाथवर घोळक्याने उभ्या असणार्या आस लावून बसलेल्या नजरा... हे सगळे चुकवत, मला हव्या असलेल्या बिल्डींगजवळ येऊन उभा राहिलो. वर पाहून तीच ही जागा हे नक्की केले. जिन्यातून वर चढताना एक राकट हात आडवा आला. 'अरूणभैया से मिलना है।' म्हणालो तसं अदबीने 'उपर जाने के बाद राइट लेना।' असं सांगून तो निघून गेला. माझ्या पेहरावामुळे कदाचित तो मला शासकीय अधिकारी समजला असावा. एक निश्वास सोडून मी आत प्रवेश केला तसा आतील मुलींचा कलकलाट थांबला.
ओशाळलेला मी गोंधळून तिथेच दोन पावले मागे झालो. प्रश्नार्थक चेहर्याने माझ्याकडे पहात एकेकजण तिथून बाहेर पडली. त्यांची कुजबूज मात्र सुरूच होती. आत गेल्यावर एक बाई पुढे आल्या. बहुधा त्यांना ह्याने सांगून ठेवलं असावं. 'आईये सर। आप को अरूणसर ने भेजा है ना? बैठीये। वो अभी आ जायेंगे।' असं म्हणून त्यांनी हसतमुखानं माझं स्वागत केलं तसं थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. 'गेलाय कुठे हा भे*** मला इथे बोलावून!' मनातल्या मनात मित्राला शिव्या हासडत मी तिथल्याच एका खुर्चीत बसलो. 'फील्ड में गये है|' जणू त्यांना माझ्या मनातला प्रश्न कळाला असावा. पुन्हा एकदा ओशाळून मी कसंनुसं हसलो. मला बसवून माझ्यासाठी चहा सांगायला त्याही बाहेर गेल्या. माझे लक्ष आजूबाजूला गेले. उजवीकडच्या खिडकीतून समोरच्या चाळवजा बिल्डींगच्या गच्चीतल्या बाया दिसत होत्या. त्यांना पाहताच एकदम मी नजर दुसरीकडे फिरवली, जणू फार मोठं पाप केलं होतं त्यांच्याकडे बघून. आता इथून पुढे दोन महिने त्यांच्याचमध्ये, त्यांच्याचसाठी काम करायचे आहे हे आठवले आणि कुठलीतरी थंडगार भावना अंगावरून सरसरत निघून गेली. डावीकडे उंचावर पोस्टर लावलेले होते - हिंदीत. गुप्तरोग आणि एड्सची सचित्र माहिती. ते फोटो पाहून क्षणभर मळमळल्यासारखे झाले. पण हे काम करणार्यांबद्दल न जाणो का अभिमान आणि कृतज्ञताही वाटली.
***
तसाही त्याचा फोन काहीशा अनिच्छेनेच उचलला जायचा. हा कधी कुणाला कुठे कामाला लावेल हे सांगता येत नसे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापकपदाची, गलेलठ्ठ पगाराची नोकरी अंगावरून पांघरून काढून टाकावं तितक्या सहजतेने सोडून देऊन तो ह्या लष्कराच्या भाकर्या भाजण्याच्या उपद्व्यापात उतरला होता. समाजाच्या गटारात उतरून तिथे पिचत पडलेल्या काही अभागी जीवांसाठी ऊर फाटेस्तोवर धावाधाव करत होता - हजारबाराशेंच्या रुपड्यांवर. त्या काळातल्या आमच्या कारकुनी मानसिकतेला त्याने नोकरी सोडल्याची बातमी हा मोठाच सांस्कृतिक धक्का होता. त्या त्याच्या 'दीदीलोग' पण आपल्या अरूणभाईला फार मानायच्या. एरवी तिथे कुणीच कुणावरच काडीचाही विश्वास ठेवायला तयार नसतात हे नंतर अनुभवाने आम्हांला कळाले. पण त्याच मुली ह्याच्या एका शब्दाखातर त्यांच्या आयुष्यांच्या नरकअंधारातून बाहेर पडण्यासाठी धडपडायला कबूल होत असत. त्यांच्यासाठी झटताना ह्यानेही कित्येकांना शिंगावर घेतलं होतं. तिथली व्यवस्था, पोलिस, कमिशनर ऑफिस, महापालिका, शासनाचे विभाग, बँका, सगळेच. अशा कितीतरी कार्यालयांमध्ये हेलपाटे घालून त्यांचे प्रश्न मांडायचा, सोडवून घ्यायचा. त्यासाठी भांडायला, वाद घालायलापण तयार असायचा. आणि अशाच त्याच्या कित्येक उद्योगांमध्ये आम्ही कितीही नाही म्हटलो तरी ओढले जायचोच.
आताही तसंच झालं.
"काय?... हम्म्... केव्हा?... ठीक आहे! भेटू."
एवढंच संभाषण आणि कळून चुकलंच की आपले पुढील अर्ध्या सुट्टीवाले बरेच शनिवार आपण गमावून बसलो आहोत. शेवटी शर्टाचा पांढरेपणा जपून थोडाफार झाडू मारायला मिळणार असेल आणि त्याबदल्यात आपल्या 'सर्कल' मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवून घेता येत असेल तर आपण तयार असतोच ना.
निदान माझ्यापुरती तरी वरील समजूत लवकरच चुकीची ठरणार होती. कदाचित काही विझलेल्या पणत्या पेटणार होत्या का? कदाचित त्यांच्यात आत्मभानाचे तेल घातले जाणार होते का आमच्याकडून?
***
बरीच वाट पाहिल्यावर आणि बरेच चुळबुळून झाल्यावर शेवटी मी जायला उठलो. दारात गेलो तर हे महाशय जिना चढतच होते. धाडधाड असा आवाज आणि इकडेतिकडे हलत, मान थोडी वर करून चालण्याची त्याची लकब त्याच्यासारखीच बेदरकार वाटायची. करड्या पडू लागलेल्या झुबकेदार मिशा, एका कानावर चक्क पेन अडकवलेले. गळ्यात शबनम बॅग. एका हातात कसलीशी फाईल. स्वतःला उशीर झाल्याबद्दल माफीबिफी काही न मागता सरळसरळ "काय रे भेxxx, कुठे चालला होतास?" अशी सुरूवात झाली. "थांब, पोरी येताहेत. मला वाटलं की तू येणार नाहीस आxxx! म्हणून मी काय जास्त जाहिरात केली नाही पब्लिकमध्ये."
मी फक्त एकदा रोखून त्याच्याकडे पाहिलं. जे काही म्हणायचं होतं ते त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. नुसताच हसला. "चल, तुला तुझ्या कामाची ओळख करून देतो. हे आमचं ऑफिस-कम्-एव्हरीथिंग..." आणि तो सुरू झाला.
***
गणित आणि इंग्रजी शिकवायचं होतं इतपत कळलं. ऑडियन्स अर्थात कोण असणार होतं हे माहीत होतंच. तिथून बरीच जाडजूड पुस्तकं आणि त्याच्या ढीगभर तोंडी सूचना सोबत घेऊन परत आलो. पुढचा शनिवार चांगलाच बिझी असणार होता. आठवडा ते सगळं समजून घेण्यात आणि क्लासमध्ये काय शिकवायचं याचा मनोमन आराखडा बनवण्यात गेला. शनिवार नेहमीप्रमाणेच लवकर आला होता. पुन्हा ती गल्ली. पुन्हा तेच वातावरण. ह्यावेळी जास्त आत्मविश्वास होता. इथे बातम्या फार पटकन पसरतात की काय असे वाटले. कुणीही कसलाही इशारा केला नव्हता. कुणी अडवलंही नव्हतं.
क्लास भरलेला होता.
***
एकदा क्लासमधील सर्वांवर नजर फिरवून स्मितहास्य करून मोठ्याने म्हणालो, 'गुड मॉर्निंग एव्हरीबडी! हाउ आर यू डूइंग?'
तो होताच कोपर्यात. मग क्लासचा ताबा त्याने घेतला. "मैंने बताया था ना, ये सर आज से आप को हर शनिवार को पढाने आयेंगे| ये बहुत टॅलेंटेड है, पर डरिये नहीं| जैसे आप मेरे साथ एकदम बेझिझक़ बात करती हो वैसे ही सर को भी डाउट पूँछ सकती हो| ये सर बहुत अच्छे पढाते है| मैंने बहुत रिक्वेस्ट की तब जा के तैयार हुए आप को पढाने के लिये| ठीक है? चलो, मैं चलता हूँ| कुछ प्रॉब्लेम हो तो मुझे बुला लेना|"
"ये अरे तू कुठे चाललास?" मी एकदम अस्वस्थ होऊन म्हणालो तसे मला माझी चूक कळाली. "मेरा मतलब है आप कहाँ जा रहे हो?" तो आमचा कितीही लंगोटीयार असला तरी इथे त्याचा हुद्दा आणि मान वेगळा होता. त्या मुलींच्या डोळ्यांत त्याच्याबद्दल किती कृतज्ञता होती हे चटकन दिसून येत होते.
"जी मुझे फील्ड पें जाना है| डोण्ट वरी, दो-तीन घंटे में लौट आऊंगा| आप कंटिन्यू कीजीए|" असं म्हणून तो गेला पण.
मी पुन्हा एकदा माझ्या विद्यार्थिनींकडे एक नजर टाकली.
त्याही माझ्याइतक्याच बुजलेल्या वाटत होत्या.
"आप सब के पास किताबें तो होंगी ना?" इंग्लिश, मराठी की हिंदी - अखेर अरूणनेच प्रश्न सोडवला होता. हिंदीतून सुरूवात केली आणि मी मागे फळ्याकडे वळलो.
***
मी तसा खुशीतच घरी आलो. पहिलाच दिवस छान गेला होता नाही म्हटलं तरी. मुली सगळं नीट समजाऊन घ्यायचा प्रयत्न करत होत्या. शांततेत सगळं ऐकून घेत होत्या. माझी गाडी सवयीप्रमाणं शिकवताना इंग्रजीवर घसरली होती. जे शिकवत होतो त्यात शिकवण्यासारखं काय आहे असं बर्याचदा वाटलं. "इतकं पण बेसिक येत नसेल का यांना, की अजून पुढच्या टॉपिकपासून सुरू करूयात नेक्स्ट क्लासपासून?"
त्याचा फोन आलाच. "ये खाली. चौकात बसूया."
गेल्यागेल्या तो माझ्यावर जवळजवळ खेकसलाच, "भाX, अरे त्या काय कॉलेजच्या हायफाय पोरी आहेत का? इतकं इंग्लिश मारायची काय गरज होती? आता पुढच्या टायमाला येतील का नाही कुणास ठाऊक. साX, हातापाया पडून आणलं होतं एकेकीला. त्यांची झोपायची वेळ असते ती. रात्रभर धंद्याला उभ्या असतात. कशा काय अवसान टिकवून ठेवतील रे? आधीच खूप अवघड वाटतोय त्यांना कोर्स. आधीचा मास्तर कंटाळून पळून गेला होता. म्हणून तुला पकडला, तर तू त्याच्याही वरचा येXXX निघालास. माझी इज्जत घालवलीस!"
मी हबकलोच होतो. कित्येकदा आयुष्यातल्या गृहीत धरलेल्या गोष्टी तशा नसतात हे एवढ्या दशकांच्या अनुभवावरून माहीत झालं होतंच. पण आपलं एखादं गृहीतक इतकं चुकेल असं मात्र वाटलं नव्हतं. त्या रात्री माझ्या स्वतःबद्दलच्या प्रतिमेला चांगलाच धक्का बसला होता. अजून मैलोनमैल वाटचाल करायची होती, स्वतःला घासून तपासून घ्यायचं होतं.
मी झोपलो नाही. शक्यच नव्हतं.
***
वेश्या.
काही शब्दच असे असतात की ते उच्चारायलाही कधीकधी जीभ धजावत नाही. त्याचं एक चांगलंच लक्षात राहिलं होतं आमच्या. "माझं माझ्या आईबापांवर फार प्रेम आहे. त्यांच्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर. पण म्हणून कुणी म्हटलं की त्यांच्यासाठी माझ्याखाली झोप तर मी झोपेल का? नाही. ह्या झोपतात रे. तुला काय वाटलं, सगळ्याच मुली इथे फसवून आणल्या जातात? कितीतरी जणी स्वखुशीने येतात ह्या धंद्यात. आपलं कुटुंब पोसतात. मुलांना चांगल्या शाळेत घालतात, पण ह्या शहरापासून दूर कुठेतरी. रोज दहा-दहा कस्टमरांच्या खाली तंगड्या फाकवतात. तुम्हांआम्हांला जमेल का रे? च्यक्. म्हणून साला आपण त्यांना मानतो."
पण माझ्यासमोर बसलेल्या मुली तथाकथित धंदेवाल्या आहेत, वाममार्गाला लागलेल्या आहेत असं कुणी मला सांगितलं असतं तरी ते मी मान्य केलं नसतं इतक्या त्या गर्ल्स-नेक्स्ट-डोअर वाटत होत्या. पहिल्या दिवशी केलेला मेकअप, नट्टापट्टा पुढच्या शनिवारी गायब झाला होता. आणि त्यांचे बुजरेपणही. भागाकार शिकवताना गंमत उडाली. मलाच मुळात भागाकार कागदावर कसा करायचा हे आठवत नव्हतं. शेवटी त्यांच्यातीलच एकीने धीटपणे पुढे येऊन फळ्यावर करून दाखवले. फक्त तिला ते सांगता येत नव्हते. तेलुगुमधून शिक्षण झालेल्या तिला गुणिले किंवा इन टू वगैरे समजत नव्हते. इथेच भारताच्या खूप ऐकलेल्या विविधतेचे मला पहिल्यांदा दर्शन झाले. आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, नेपाळ, यूपी-बिहार, आणि बांगलादेशी पण. सगळ्याच एकमेकींपासून भाषेने, जातीधर्माने वेगवेगळ्या. त्यांच्यात एकच साम्य होतं.
त्या स्त्रिया होत्या.
***
*त्या वेश्या होत्या.
तिचं नाव निलोफर होतं. किंवा कदाचित नगमा. की नीलम? तसंही तिथल्या प्रत्येकीचं नाव दर रात्री आणि दर कस्टमरसाठी बदलत होतं. आयडेंटिटी प्रूफ वगैरेची भानगडच नव्हती. इतक्या मुली आणि स्त्रिया तिथे होत्या की कुणा एकीला ओळखणार्या अशा पाचदहाजणींपेक्षा जास्त सापडत नसत. त्यातही एकाच शहरात किंवा एकाच मालकिणीकडे त्या राहतही नसत. त्यांची खरेदीविक्री होत असे. पळवूनही नेल्या जात. रोजच्या इतक्या बलात्कारांनंतर त्यांची स्वतःच्या शरीराबद्दलची घृणा, तुच्छता लपून राहणे शक्यच नसे. तत्त्वज्ञानातील अस्तित्त्वाचा कः त्वम् हा प्रश्न कुणी ह्यांना विचारायचे धाडस करत नव्हते. तरीही कुठल्या आशेने आणि कशाच्या जिवावर ह्या रोजचं सरण साहत असतील ह्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं. जाणून घ्यायची इच्छाही नव्हती. तितकी मनाची कवाडे अजून उघडली गेली नव्हती. पांढरपेशा भीतीचे द्वारपाल त्यांचं काम चोख बजावत होते. पण हिची गोष्ट वेगळी होती. तिचं प्रामाणिक हसू थेट हृदयाला भिडू पाहत होतं.
***
आधी वाटलं होतं तितकं हे काम सोपं नव्हतं हे पहिल्या काही तासांतच कळून चुकलं होतं. समोरच्या अठरापगड राज्यांतून आलेल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणार्या, शालेय शिक्षणाची पार्श्वभूमी असणार्या-नसणार्या आणि मरेस्तोवर राबणार्या कष्टकरी मुली होत्या. त्यांच्या जीवनातल्या 'मरेस्तोवर राबण्यामधील' वाक्प्रचाराचा अर्थ दुर्दैवाने शब्दशः होता. पेटवून दिलेल्या देहावर पाण्याचे काही थेंब उडवून त्याला थोडीशी आशा दाखवण्याशीच आमच्या कार्याची तुलना होऊ शकत होती, इतकं ते तोकडं होतं. आश्चर्य म्हणजे त्यांच्या डोळ्यांत आमच्याबद्दल प्रचंड विश्वास दिसत असे. हा माणूस आपल्यासाठी वेळ काढतो आहे, आपल्याला समजावं म्हणून धडपड करतो आहे म्हणून त्यांना आमच्याबद्दल पराकोटीची कृतज्ञता वाटे. त्याचबरोबर इतक्या वर्षांनी पुन्हा पाटीपेन्सिल, खडूफळ्याशी नातं जोडताना त्यांना त्रासही होत असे. 'तेव्हा किती झटकन करत असू, आत्ता मात्र सगळंच अनोळखी वाटतंय, मला जमेल का?' ही न्यूनगंडाची भावना त्यांच्या मनांमधून काढून टाकणे हे आमच्या दृष्टीने सर्वात मोठं आव्हान होतं.
पाढे. गणित शिकवताना अगदी मुळापासून शिकवावं लागणार होतं. त्यांना अंक तर येत होते. त्यांच्यात्यांच्या भाषांची बाराखडी, अक्षरओळखही होतीच. फक्त इंग्रजीतून हे सगळं करणं, लिहिणं, बोलणं त्यांच्यासाठी पर्वतप्रायः भासत असे. भागाकार शिकवताना अगदी दोन गुणिले सहा म्हणजे किती आणि ते का तसे होतात हे मला २ + २ + २ असे ६ वेळा केल्यावर काय मिळेल, म्हणून शॉर्टकटसाठी आपण २ x ६ = १२ असं लिहितो आणि त्याला गुणाकार किंवा इंग्रजीत मल्टीप्लिकेशन असे म्हणतात, ह्या पद्धतीने शिकवावे लागले. सर्वांना मग आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्यामागील तत्त्वे समजाऊन सांगितली. भागाकार करताना तो का करावा लागतो हे उदाहरणासकट शिकवले. त्यासाठी मी नेहमीच्या पद्धतीने पेरू आणि मुले हे उदाहरण घेतले. नंतर ध्यानात आले, यांना पैशाचे व्यवहार मात्र नीट कळतात. मग पेरूंऐवजी पैसे आले. मुलांऐवजी मुली. आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखे त्यांचे चेहरे उजळले.
"ओह, तो इसे आप डिविजन कह रहे थे क्या? ये तो सर हम को आता है। रोज मैं ही तो सब का हिसाब करती हूँ। बस वो कॅल्क्युलेटर पे करते हैं ना तो ऐसे समझ में नहीं आ रहा था।" आणि हे म्हणून ती 'हॅत् तेरी की!' च्या स्टाईलने हसली. तिच्याबरोबर इतरजणींनीही हसत माना डोलावल्या.
तिच्या त्या 'सब का हिसाब' च्या उदाहरणाने मात्र मी क्षणभर हेलावलो.
अर्थात, इथे जगण्याचे असे वाभाडे निघताना बघणे रोजचेच होते. मला त्याची सवय तर सोडा, तोंडओळखही नव्हती. हळवेपणा इथे कामाचा नव्हता. निर्धाराने पाय रोवून काम करायला हवं होतं.
त्या दिवशी मग गणितच घेतलं फक्त. शिकवण्याचं गणितही सुटू लागलं होतं. मुली रमू लागल्या होत्या. माझ्याकडून शिकताशिकताच नकळत मलाही खूप काही शिकवत होत्या.
***
दिवसामागून दिवस जात होते. मुलींच्या हिशेबात रात्री. एरवी शनिवारच्या दोनेक तासांपुरताच असणारा आमचा क्लास तीन-चार तासांपर्यंत रेंगाळू लागला. रविवारीही मग आम्ही वेळ काढू लागलो. कार्यालयाला रविवारी सुट्टी असल्याने कुठे जमायचे हा मोठा प्रश्न होता. "हमारी बिल्डिंग के छत पें बहुत जगह है। पर सर आप हमारे यहाँ आयेंगे क्या?" निलोफरने थोडंसं बिचकत-बिचकतच विचारलं. मला काय उत्तर देऊ हे समजेना. सामाजिक कार्याचा भाग म्हणून वेश्यावस्तीत जाणे, वर्गबिर्ग घेणे हे ठीक होते; पण त्यांच्या माडीचा जिना चढणे... मी अरूणकडे पाहिले. बहुतेक त्याला माझी चुळबूळ लक्षात आली असावी. तो निलोफरकडे वळाला आणि तिला शक्य तितक्या समजावणीच्या सुरात सांगू लागला. पण तिला जास्त सांगण्याची गरज पडली नाही. तिने माझ्याकडे एकवार पाहिले आणि म्हणाली, "ठीक है।" तिच्या नजरेत मला पहिल्यांदाच नैराश्याची छटा जाणवली. जणू ती मला म्हणत असावी, आप क्यों आयेंगे हमारी चौखट पे। आप तो बड़े लोग है। इज्जतदार है। ख़ामख़ा बदनाम हो गये तो। मला तिचं असं निराश होणं फारच लागलं. स्वतःच्या हस्तिदंती मनोर्याबद्दल हसूही आलं. "मैं आऊँगा आप के यहाँ।" त्यांचे चेहरे खुलले होते.
पिचकार्यांनी रंगलेला तो जिना चढताना मधूनच फेकलेली पाकिटंही दिसत होती. अशाच एका पाकिटाकडे पाहतानाच मला कुणाचातरी धक्का बसला. चमकून पाहतो तो एक मुलगी दात घासत माझ्याकडेच पाहत उभी होती. मी तिला सॉरी म्हणत वर सटकलो. ती अजूनही माझ्याचकडे वर बघत होती. एक थंड, तुच्छतेची नजर. साले दोपहर को भी आ जाते है, असंच काहीसं म्हणत असावी. त्या जुनाट चाळवजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर निलोफर लगबगीने सामोरी आली. तिच्यामागून एक तशीच देखणी, पण पोक्त बाई डोळे बारीक करून बघत होती. "हम ने बोला था न मौसी, ये हमारे सर है।" तिने तोबरा भरलेल्या तोंडाने फक्त हूँ केले. निलोफरच्या मागून अजून काही जिने चढल्यावर गच्चीत दरवाजा उघडला. वाटेत एकाही खोलीकडे पाहणे जाणीवपूर्वक टाळले होते. आळसावलेल्या, डोळे जडावलेल्या बाया भेटत होत्या. रंग विटलेल्या, फुटक्या काचांच्या जागी पेपरने झाकण्याचा प्रयत्न केलेल्या त्यांच्या खिडक्यांप्रमाणेच त्याही भर उजेडात भेसूर दिसत होत्या. थकल्या होत्या. ह्यांना झोपही कधी मिळत असेल कुणास ठाऊक. अशातच एखादं गिर्हाईकही मधूनच एखाद्या खोलीतून बाहेर येत होतं. गच्चीत गेल्यावर तिथेच एक सतरंजी अंथरून काही मुली बसलेल्या दिसल्या. इथे फळाबिळा नव्हता. आजचा तास दिलेला गृहपाठ मुलींनी केलाय की नाही हे तपासण्याचा आणि त्यांना काही अडलंबिडलं असेल तर ते सोडवण्याचा होता. तसाही आमच्या हातात फार वेळ नव्हता. संध्याकाळी एरिया हातपाय ताणत जागा होऊ लागणार असे. त्या आत मला परत येणं भाग होतं. मुलींनाही आटोपून तयार व्हायचं असे.
सर्व काही सुरळीत चालले होते असे नव्हते. रोजच त्यांच्यापुढे अडचणींचे डोंगर उभे असत. कधी जागा नसे, कधी कुणी आडवे लावत. मग त्यात मुलींच्या भाषेत 'मामालोग' पण असत. शासनाचे अनुदान मिळवणे आणि प्रत्यक्षात त्याचा चेक हातात पडणे हे नेहमीचेच दिव्य असे. 'प्रोजेक्ट' वरूनही अंतर्गत धुसफूस असे. इगो नावाचा प्रकार इथेही होताच. मध्येच कुणी विदेशी पाहुणे भेट द्यायला येत. त्यांच्यासमोर चकचकीत प्रेझेंटेशन होई. कधीकधी चक्क धंद्यातून बाहेर पडलेल्या आणि आता इथेच नोकरी करणार्या मुलींनाच 'ह्या पहा आमच्या एरियातल्या स्त्रिया' असं म्हणून उभे केले जाई. ऐनवेळी कुठून बोलावणार मुलींना. पाहुण्यांना, सरकारी अधिकार्यांना कधी फिल्डमध्ये नेलं जात नसे. कागदोपत्री भरपूर 'लाभार्थी' असत - सरकारी शब्द. पण इथे मुलींचे रेकॉर्ड ठेवणे खूप अवघड असे. एकतर कुणालाही फोटो मागायला परवानगी नव्हती. केवळ लिखापढी. मुलगी जे नाव सांगेल, जो पत्ता सांगेल तोच लिहायचा. त्याचे कुठले प्रूफ मागता येत नसे. ओळख आणि विश्वास या दोन खांबांवर सगळा डोलारा उभा होता. पण शासकीय यंत्रणेला हे मान्य करायला लावणे कर्मकठीण होते. कधीकधी आम्ही शहराबाहेरच्या हमरस्त्यावरच्या ठरलेल्या टपरीवर गाडीने जात असू. अरूण सिगारेटचे झुरके आणि मी चहा घेत या सगळ्यावर गप्पा मारत बसू. त्याला रोजच सिगारेटवर लेक्चर देणे आणि त्याने धुराच्या वलयाबरोबरच ते उडवून लावणे नेहमीचेच असे. किक बसली की त्याच्याकडचा खजिना खुले. असे कित्येक किस्से त्याच्या पोतडीत होते आणि आम्ही दोघेतिघे ते मंतरलेल्या अवस्थेत ऐकत असू.
आमच्याही प्रोजेक्टला कात्री लागणार होती हे त्याच्याकडून असेच एकदा कळले. मी मानधन-बिनधन काही घेत नव्हतो. पण पोरींकडून तो नावाला थोडेथोडे पैसे क्लासच्या फीच्या नावाखाली घेत असे. त्याला विचारल्यावर म्हणाला की इथे काही फुकट द्यायचं नाही असा आमचा नियम आहे. फुकट दिलं तर त्याची किंमत नसते. फी देतो असे म्हणूनतरी त्या येतात ना तुझ्या क्लासला. त्याच्या लॉजिकवर मी काही बोलण्यात अर्थ नव्हताच. माझ्या लेखी तो पैसा चुकीच्या मार्गाने आलेला, हरामाचा होता. त्याच्या आणि त्यांच्याहीसाठी तो कष्टाचा पैसा होता. चोरीचा, लांडीलबाडीचा नव्हता. ती फीपण शेवटी त्यांच्याचसाठी वापरली जाणार होती ही भावना मला आश्वस्त करे.
***
सुरुवातीला ह्यांना कसं जमेल हा मला पडलेला प्रश्न केव्हाच गायब झाला होता. अंधारवाटेतून धडपडताना मधूनच काही काजवे चमकावेत आणि पुढचा मार्ग दिसावा तशा पद्धतीने क्लासची मार्गक्रमणा होत होती. सगळ्याच रेग्युलर होत्या असे नव्हते. पण प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असत. काही एकही क्लास चुकवत नसत. काही अधूनमधून येऊन बसत. तर काही दांड्याबहाद्दर होत्या. त्यांच्यातल्या काहीजणी थोड्या जास्त शिकलेल्या होत्या, त्यांना इतरजणींना मदत करायची जबाबदारी दिली. क्लास नसताना असं एकमेकींना सांभाळून घेतलं जात असे. मीही आता मुद्दाम हळूहळू का होईना त्यांना इंग्रजीतूनच बोलायचं असा नियम पाळायला लावला होता. त्या एकमेकींशी नाही, पण माझ्याशी इंग्रजीतूनच बोलायचा प्रयत्न करायच्या. "येस. यू आर राईट. व्हेरी गुड." असं म्हटलं की त्यांना धीर येत असे. छान वाटे. कधी क्लासला येऊ शकल्या नाही तर त्या आता अरूणकडे फोनवरून शंका विचारत असत. मग अरूणमार्फत माझ्यापर्यंत त्यांचे प्रश्न पोहोचत आणि ते सोडवून तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात. दांडी मारण्याची कारणे मात्र मी कधी विचारली नाहीत. काय असत ह्याची कल्पना असे. एकदा निलोफरला क्लास सुटल्यावर अरूणने फीचे पैसे मागितले. ती कधी चुकवत नसे, पण ह्या वेळी तिचा चेहरा खजील झाला होता. म्हणाली, कल मामाने पकडा था. लॉकअप में डाल दूँगा बोल के सब ले लिया. अर्थात हे तिच्या अरूणभाईला सांगायला तिला लाज वाटत नव्हती. तिचा चेहरा मी समोर असल्याने पडला होता. ती या धंद्यात का आणि कशी आली असावी ह्याचा माझा कयास खरा असल्याचं अरूणकडून नंतर कळालं. तिच्या बोलण्यातली कमालीची अदब, तिचा शांतपणा, कधी काही अडलं - नाही जमलं तर तिला वाटणारी बेचैनी, तिची भाषा, स्वतःचा उल्लेख 'हम' असा करणं... सगळंच अगदी खानदानी होतं. या नरकातून बाहेर पडण्याची तिची तळमळ प्रामाणिक होती. अनेकजणींचा दृष्टिकोन जमलं तर जमलं असा होता. तिला मात्र पास व्हायचंच होतं. पुढे काय करणार ह्याचं स्पष्ट उत्तर तिच्याकडे नव्हतं, पण शिक्षणातून काहीतरी चांगलंच घडेल हा तिला वाटणारा विश्वास हेच आमचं भांडवल होतं. इथून बाहेर पडल्यावरही अशा स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बुरसटलेलाच होता. त्यांच्याकडे व्हिक्टीम म्हणून नाही तर समाजाच्या दुखण्याचे कारण म्हणूनच पाहिलं जाई. त्यांना बाहेर काम मिळवून देताना त्यांची पार्श्वभूमी शक्यतो लपवण्यातच शहाणपणा होता. कारण ती कळाल्यावर लोक ह्यांच्याकडे एकतर घृणेने तरी पाहत किंवा वाईट नजरेने तरी. सुधारली म्हणून काय झाले, पूर्वाश्रमीची वेश्या ती कायमच वेश्या असा लोकांचा दृष्टिकोन त्यांना सहन होत नसे. त्यातूनच पुन्हा शोषण, पुन्हा अत्याचार हेच चक्र सुरू होई. त्याला कंटाळून मुली पुन्हा इथेच परत येत असत. माणसाला माणसासारखं जगू देत का नाहीत लोक हा प्रश्न माझ्यासारख्यांना नुसताच पडत असेल, त्यांच्या जगण्यालाच तो फास बनून कायमचा आवळलेला होता.
परीक्षा जवळ येऊ लागली तशी मुलींची तयारी लगबगीनं चालू झाली. एकमेकींच्या नोट्स देणे-घेणे, मला कधी काही अडलंच तर अरूणमार्फत प्रश्न विचारणं हे कधीही होऊ लागलं. एकदा रात्री अकरा-साडेअकरालाही अरूणचा फोन आलेला. त्यांच्याकडून मागचे पेपर सोडवून घेणं चालू केलं. अगदी फर्स्टक्लास जरी नसला तरी किमान पास होण्यापुरत्या त्या तयार झाल्या आहेत हे लक्षात आलं होतं. पण अपेक्षेप्रमाणे अरूणच्या त्या प्रोजेक्टला एक दिवशी अचानक डच्चू मिळाला. "माXXXX भडXX!" त्या रात्री तो पहिल्यांदाच हताश झाल्यासारखा वाटला. शेवटी त्याने ती एनजीओ सोडण्याचा निर्णय घेतला. जड अंतःकरणानेच. त्याच्या त्या दीदींचं काय होणार होतं ह्याचं उत्तर आम्हां दोघांकडेही नव्हतं. त्या मुलींना त्यांच्या आयुष्यात चांगलं काही नक्की घडू शकतं असा आशावाद दाखवल्यानंतर अशी माघार घेणं बरोबर नव्हतं. कुणीच आम्हांला काही बोललं नसतं. पण त्या पुन्हा एकदा त्याच नैराश्यगर्तेत ढकलल्या गेल्या असत्या.
आता फक्त निलोफरच्या बिल्डींगची गच्चीच होती. तसाही दोनेकच आठवड्यांचा प्रश्न होता. पुन्हा एकवार त्यांची झुंज सुरू झाली. मी फक्त मार्गदर्शक होतो.
परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ऐन परीक्षेला फक्त काहीच जणी बसल्या. हे असं 'पार्शल सक्सेस' अरूणसारख्यांसाठी नवीन नव्हतं. पण मला त्याचं थोडं वाईट वाटलं. सर्वच मुलींनी परीक्षा द्यायला हवी होती. पास होण्याइतपत आत्मविश्वास नव्हता म्हणून काय झालं, निदान प्रयत्न तरी करायला हवा होता. त्याचदिवशी अरूणनेही नवीन जॉबच्या शोधात छत्तीसगडला जाण्यासाठी शहर सोडलं होतं. त्यालाही सालं जंगलातच गायब व्हायचं होतं कुठेतरी. तेही आत्ताच. माझा विद्यार्थिनींशी असलेला संपर्काचा एकमेव दुवा तुटला होता. त्यांचं पुढं काय झालं हे समजायला मार्ग नव्हता.
पुन्हा त्या गल्लीत जाणं होणार नव्हतं. तो जिना पुन्हा माझी पावलं चढणार नव्हती. निलोफर, त्या मुली, अरूण, ती संस्था... सगळंच पुढे कित्येक वर्षांसाठी विस्मृतीच्या गर्तेत हरवणार होतं.
***
त्या महानगराच्या अजस्र धमन्यांपैकी एकीने उतरून मी ईस्टला जाण्यासाठी ओव्हरब्रिज पकडला. हे शहर अनोळखीपणा फार काळ चालवून घेत नाही. तुम्ही फार लवकर इथल्या गतीबरोबर धावू लागता. नॉनस्टॉप. ओव्हरब्रिजवर रोजच्यासारखेच माणसांचे लोंढे जणू आपोआपच इकडेतिकडे वाहत होते. एक बाजू धरून उतरू लागलो. वाढलेल्या वयाबरोबर आणि ढेरीबरोबरच पॅण्ट सांभाळत न धडपडता उतरायचीही अक्कल आली होती. एका बुरखाधारी महिलेला चुकवण्यासाठी थोडा बाजूला होणार तेवढ्यात तीही त्याच बाजूला थबकून उभी राहिली. तिला ओलांडून बाजूने दोनेक ढांगा उतरलो नसेल एवढ्यात आवाज आला, "सर, सर..!" आवाज ओळखीचा वाटल्याने चमकून मागे वळून पाहिले तर ती माझ्याचकडे पाहत उभी होती. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तिने बुरखा मागे केला आणि प्रसन्न हसली.
तीच होती. तेच ओळखीचे हसू. तेच चमकदार डोळे. उजव्या नाकपुडीतली तीच सोनेरी चमकी. रंग मात्र अजूनच उजळलेला. हातात छानशी पिशवी. तिच्यामागून एक गोड छोकरी तिचा हात धरून ओढत म्हणत होती, "अम्मी चलो ना!"
अगदी मनापासून आनंद होणे म्हणजे काय हे त्या क्षणी अनुभवत होतो. गर्दीच्या लोंढ्याबरोबर मीही तसाच खाली ढकलला जात होतो, पण नजर सतत निलोफरकडेच होती. माझ्याही चेहर्यावर हसू उमटले. फलाटावर आल्याची जाणीव झाल्यावर परत एकदा वरती मान करून पाहिले. ती आता गर्दीबरोबर वरती चालली होती. तिची छोकरी आईच्या कडेवरून मागे वळून आता माझ्याकडेच पाहत होती. मला पाहून तिने हलकेच हात हलवला आणि पलिकडे अदृश्य झाली.
काही बोलायची गरजच नव्हती. शब्देवीणच कळलं होतं, एक पणती छानपैकी तेवू लागली होती.
(ललित)
सूचना - संपूर्ण काल्पनिक. कुठल्याही जिवंत-मृत व्यक्ती-संस्था-घटनांशी संबंध नाही. तसे जाणवल्यास केवळ योगायोग समजावा.
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 1:00 pm | माधुरी विनायक
नि:शब्द आणि नतमस्तक...
21 Oct 2014 - 7:08 pm | सस्नेह
हेच म्हणते
त्या पणतीला प्रज्वलित करणार्याला शतशत सलाम !
21 Oct 2014 - 8:04 pm | मधुरा देशपांडे
नि:शब्द !
21 Oct 2014 - 1:56 pm | इनिगोय
सकारात्मक शेवट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आणि म्हणूनच बहुधा हे काल्पनिक आहे पटलं.
21 Oct 2014 - 2:22 pm | नितिन पाठे
खूप छान..........हॅट्स ऑफ..........swaps
21 Oct 2014 - 4:29 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय हृदयस्पर्शी कथा. काल्पनिक असली तरी विचारांना खिळवून ठेवणारी. विचार प्रवर्तक.
अगदी मनापासून आनंद होणे म्हणजे काय हे त्या क्षणी अनुभवत होतो. गर्दीच्या लोंढ्याबरोबर मीही तसाच खाली ढकलला जात होतो, पण नजर सतत निलोफरकडेच होती. माझ्याही चेहर्यावर हसू उमटले. फलाटावर आल्याची जाणीव झाल्यावर परत एकदा वरती मान करून पाहिले. ती आता गर्दीबरोबर वरती चालली होती. तिची छोकरी आईच्या कडेवरून मागे वळून आता माझ्याकडेच पाहत होती. मला पाहून तिने हलकेच हात हलवला आणि पलिकडे अदृश्य झाली.
काही बोलायची गरजच नव्हती. शब्देवीणच कळलं होतं, एक पणती छानपैकी तेवू लागली होती.
कथेच्या अत्युच्य स्थानी डोळ्यात पाणी तरारले. आनंदाने आणि कष्टप्रद यश अक्षरशः खेचून आणणार्या भगीरथ प्रयत्नांना सलाम म्हणूनही.
21 Oct 2014 - 7:35 pm | रेवती
प्रतिसाद देणं शक्य नाही पण कथा वाचल्याची पोहोच!
21 Oct 2014 - 8:13 pm | मित्रहो
खूप छान कथा. शेवट खूप सुंदर. काल्पनिक असला तरी शेवट सुंदर. आशावाद मग तो कुणाच्याही जीवनात का असे ना हा लागतोच.
21 Oct 2014 - 8:48 pm | बहुगुणी
तुम्ही लाख म्हणाल 'संपूर्ण काल्पनिक', पण कथनातला जिवंत प्रवाहीपणा 'वास्तविक अनुभव आहे' असं सुचवेल इतकं सुंदर लेखन झालंय. आणि असलंही काल्पनिक, तरी ज्या कुणा 'सरां'वर बेतलेली कथा आहे, त्यांना, त्यांच्या धडपडीला सलाम!
शेवट अप्रतिम, दिवाळी उजळून टाकणारा!
21 Oct 2014 - 8:49 pm | बहुगुणी
स्पा नव्हे, स्वॅप्स...क्षमस्व!
21 Oct 2014 - 9:47 pm | उगा काहितरीच
नतमस्तक...
21 Oct 2014 - 10:45 pm | सखी
सुरेख कथा - अजुन शब्द सुचत नाही. टकांळा न करता पूर्ण केल्याबद्द्ल धन्यवाद.
22 Oct 2014 - 1:23 am | सुहास झेले
सुंदर... !!
बहुगुणी म्हणतात तसेच कथा "काल्पनिक" जरी असली, तरी तिला वास्तविक जिवंत प्रवाहीपणा आहे. प्रत्येक शब्दागणिक तो जाणवतोय. सिंपली सुपर्ब :)
22 Oct 2014 - 1:26 am | अजया
कथा अतिशय आवडली.__/\__
22 Oct 2014 - 2:31 am | खटपट्या
खूप छान !!!!
22 Oct 2014 - 3:42 am | सानिकास्वप्निल
खूप सुंदर कथा !!
शेवट सुरेख.
22 Oct 2014 - 8:30 am | मुक्त विहारि
....मी ईस्टला जाण्यासाठी ओव्हरब्रिज पकडला. हे शहर अनोळखीपणा फार काळ चालवून घेत नाही. तुम्ही फार लवकर इथल्या गतीबरोबर धावू लागता. नॉनस्टॉप.
जबरदस्त....
मस्त.... आवडले....
22 Oct 2014 - 10:18 am | विशाखा पाटील
कथा आवडली. reportage आणि ललित ह्यांचं मिश्रण उत्तम झाल्यामुळे काल्पनिक आहे हे शेवटपर्यंत लक्षात येत नाही.
22 Oct 2014 - 10:24 am | सौंदाळा
विधायक, सकारात्मक आणि सुंदर
22 Oct 2014 - 10:35 am | चौकटराजा
"तिथलं" वातावरण उदास करणारं- समस्या
अंधारात पणती लावणारा - संघर्ष.
कुणातरी एकीचा का होईना उत्कर्ष - नाट्य
अशी महत्वाची तीन मूल्ये असलेली कोणतीही कथा यशस्वी व स्मरणीय होते. ते इथं जमलंय !
22 Oct 2014 - 12:54 pm | प्रचेतस
कथा अतिशय आवडली.
मात्र कथेत सत्यांश नाहीच असे म्हणता येणार नाही.
22 Oct 2014 - 2:03 pm | पैसा
काल्पनिक कथांनाही सत्यात काहीतरी आधार असला तर त्या अशा जिवंत खर्याखुर्या वाटतात! अंधारात एकतरी पणती तेवणे गरजेचे. नाहीतर जगणं अशक्य होईल.
22 Oct 2014 - 2:33 pm | वेल्लाभट
नि:शब्द!
22 Oct 2014 - 2:54 pm | सविता००१
नि:शब्द!
22 Oct 2014 - 4:18 pm | पिलीयन रायडर
खुपच सुंदर कथा... बराच वेळ तर मला असंही वाटत होतं की तुम्ही खरंच स्वतः असं काम केलेलं आहे इतकं जिवंत वर्णन!
22 Oct 2014 - 5:18 pm | Maharani
कथा खुप आवडली..
22 Oct 2014 - 10:30 pm | जुइ
शेवट आवडला!
23 Oct 2014 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !!!
कथा काल्पनिक आहे हे लेखकाने स्वतः लिहीले नसते तर त्यावर विश्वास बसला नसता इतके जिवंत लेखन !!!
23 Oct 2014 - 4:34 am | रामपुरी
छानच!
23 Oct 2014 - 3:31 pm | प्रीत-मोहर
स्वॅप्स कथा खूप आवडली.
कथेचा शेवट +व केल्याबद्दल धन्यवाद.
24 Oct 2014 - 9:28 am | भृशुंडी
खूपच आवडली कथा.
अशाच कुणा सरांची आठवण झाली..
24 Oct 2014 - 12:38 pm | जेपी
.......
24 Oct 2014 - 1:06 pm | एस
माधुरी विनायक, स्नेहांकिता, मधुरा देशपांडे, इनिगोय, नितिन पाठे, प्रभाकर पेठकर, रेवती, मित्रहो, बहुगुणी, उगा काहितरीच, सखी, सुहास झेले, अजया, खटपट्या, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, विशाखा पाटील, सौंदाळा, चौकटराजा, वल्ली, पैसा, वेल्लाभट, सविता००१, पिलीयन रायडर, Maharani, जुइ, इस्पीकचा एक्का, रामपुरी, प्रीत-मोहर, भृशुंडी, जेपी... आणि सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. काहींनी खरड करूनही आवर्जून कौतुक केले त्याबद्दलही आभार.
कथा कदाचित सूचनेत लिहिलंय तशी संपूर्ण काल्पनिक नसावी असे वाटले तर त्याबद्दल लेखनाचा संवेदनशील विषय पाहता दोन शब्द लिहिणे अनुचित ठरणार नाही. हे कथाबीज गेल्या कित्येक वर्षांपासून मनात घोळत होते. हेच नाही तर अशी अनेक कथाबीजे अजूनही अमूर्तच राहिली आहेत. मिपा दिवाळीअंकाच्या निमित्ताने निदान एक कथा लिहून पूर्ण केली. कथा संपादकांना पाठवताना थोडी धाकधूक होती. ह्या विषयावरील कथा दिवाळीअंकासारख्या प्रसन्नपणाची अपेक्षा असणार्या ठिकाणी कितपत योग्य ठरेल, कथेचा समावेश अंकात होईल का, तिचे स्वागत कसे होईल अशी शंका मनात होती. शेवटी म्हटलं, आपण आपले काम केले आहे. बाकी जे ठरवले जाईल ते पाहूया. तसे मी मेल करताना लिहिलेही होते. त्यावर मिपा संपादकांचा रिप्लाय आला की हे दिवाळी अंकात नाही घ्यायचं तर काय घ्यायचं? त्यामुळे ही कथा दिवाळीअंकात छापल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच अंक प्रकाशित झाल्यावर कथा आवर्जून वाचून ती आवडल्याचे कळवणार्यांचेही मनापासून आभार.
असं म्हणता येईल की There is nothing completely imaginary and nothing completely real in literature as an art form. मग कुणी अगदी सायन्स फिक्शन लिहीत असेल किंवा अमूर्त अध्यात्मिक अनुभव असेल. त्याची कल्पनाशक्ती ही अनुभवपरीघाच्या फार दूर जाऊ शकत नाही. किंवा एक अदृश्य धागा तिथे उपस्थित असतोच. अर्थात ते अनुभवविश्व हे साहित्यकाराचे स्वतःचे असावे असे नसते. त्याच पद्धतीने वास्तवात एकमेकांशी संबंध नसलेल्या प्रेरणाही एकत्र गुंफून काही वेळा त्यातून वेगळीच रचना करता येते. डॉक्युमेंटरी किंवा रिपोर्ताज प्रकारात संबंधित विषयाची As is प्रकाराने ओळख करून द्यायची असते. Fiction मध्ये बर्याचदा असे धागे हे वास्तवातून दूर भरकटलेले आणि तरीही कुठेतरी वास्तवाशी जुळलेले आणि एकमेकांत गुंफलेले असू शकतात. प्रस्तुत कथा काहीशी अशाच प्रकारात मोडते.
ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली. कथेच्या सुरुवातीला जो तरूणपणी त्या रस्त्याने चुकून आल्यामुळे बसलेला सांस्कृतिक धक्का आहे तो अनुभव माझा स्वतःचा. तेव्हापासूनच ह्या स्त्रियांबद्दल एक प्रकारची कणव कुठेतरी खोल बसली असावी. नंतर या क्षेत्रात काम करणार्या काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यही पाहिले. काही चित्रपट, माहितीपट, मुद्रितमाध्यमातले लेख, इत्यादी अनेक प्रकाराने ह्यासंबंधीची माहिती माझ्याकडे जमा होत राहिली. त्यात 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी...' ह्या कवी अनिल कांबळे यांच्या गझलेचा मला अंतर्मुख करण्यात फार मोठा वाटा होता. शिवाजीनगर स्टेशनला एक संस्था रस्त्यावरील मुलांच्या प्रश्नांवर काम करते. अशी मुलेही आजूबाजूला नेहमी पहात होतो. माझ्या अशाच अनुभवांतून अशा कथाबीजांच्या प्रेरणा कुठेतरी जन्मत गेल्या. त्यातील पात्रे, घटना ह्या काल्पनिक असतात. अर्थात कुठेतरी त्यांचा संबंध वास्तवातील प्रेरणांशी जोडलेला असतोच. पण म्हणून कथेतील पात्रे जशीच्या तशी कुठेतरी अस्तित्त्वात असतील असे समजणे चुकीचे ठरेल.
शिकवण्यातील ती भागाकाराची गंमत बर्याच वर्षांपूर्वी एका प्रौढशिक्षण वर्गाला शिकवत असताना थोड्या वेगळ्या पद्धतीने घडली होती. तेव्हा प्रौढसाक्षरता आणि सामाजिक वनीकरणासारखे सरकारी उपक्रम जोरात असत. हल्ली मागमूसही दिसत नाही. असो. मग अशाच काही घटनांचा समावेश कथेत थोड्या वेगळ्या पद्धतीने केला. ह्या हलक्याफुलक्या घटनेने कथेत निर्माण झालेला ताण हलका करण्याचे काम केले. त्याचबरोबर 'सब का हिसाब' ह्या ट्विस्टने वाचकांना पुन्हा धक्का देत बरेच काही सुचवण्याचेही जमून गेले. सांगायचा मुद्दा हा आहे की, हे सगळे वर्णन प्रत्ययकारी जरी वाटत असले तरी ते सगळे खरे आहे असे नाही. उदा. निलोफरच्या माडीचे वर्णन हे काल्पनिकच आहे. मी अशा वस्तीत कधी इकडून तिकडे जाण्यापलिकडे गेलो नाही. निलोफरचे पात्र तर संपूर्णपणे काल्पनिक. तिचे वर्णन मात्र रेल्वेप्रवासात पाहिलेल्या एका हैदराबादी मुस्लिम मुलीवरून घेतले. अशा खूपशा बाबी काल्पनिक असल्या तरी कथेत चपखलपणे बसल्यामुले खर्या वाटल्या. अजूनही अशी अनेक कथाबीजे मनात रेंगाळताहेत. कधीतरी मूर्त स्वरूप देईन त्यांना. एक परितक्त्या स्त्रीची ससेहोलपट आहे. एक असेच करपलेले बालपण आहे. एक नक्षली आणि पोलिस यांच्यात भरडलेले जोडपे आहे. पाहूयात.
जाताजाता अनिल कांबळेंची ती प्रसिद्ध गझल देत आहे -
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशांत भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी
रस्ते उन्हात न्हाले सगळीकडे परंतु
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी
बाहेर सभ्यतेचे गातात गोडवे जे
वेश्यागृहात त्यांचा दरबार पाहिला मी
- कवी अनिल कांबळे
24 Oct 2014 - 2:31 pm | पैसा
प्रतिसादही कथेसारखाच आवडला! अशा कथांचे शेवट बहुशः कथांमधेच सुखान्त दाखवता येतात. प्रत्यक्षात निराशा, वैफल्य अपयश हेच त्यात पडणार्यांच्या नशिबी येतं.
अनाहितामधे 'कथा' या कथेचा शेवट दुहेरी दु:खान्त होणं त्या कथेला बहुतांशी अपरिहार्य होतं, पण तसा शेवट करू नका, असंच तेव्हाही काहीजणींनी म्हटलं. आता कथा संपवताना तेच लक्षात घेऊन मग राहिलेले तपशील लिहिले. गेल्या वर्षी ती कथा खूप नाट्यपूर्ण आणि दु:खी वळणावर उभी असताना त्यात लिहायचं थांबवलं होतं आणि कदाचित या प्रश्नामुळेच की कथा दु:खान्त करावी का, कोणाला पुढे लिहायचा धीरही होत नव्हता. कदाचित शेवट सुखान्त केल्यामुळे या दोन्ही कथा जरा स्वप्नाळू वाटतील, पण असं एखादं स्वप्न जगण्यासाठी आवश्यकच असतं!
24 Oct 2014 - 4:39 pm | एस
अगदी बरोबर. वास्तवातही सगळंच अंधारमय असतं असं नाही. कुठे काही पणत्या तेवायची धडपड करत असतात. अशाच काही पणत्यांना ही कथा समर्पित आहे.
24 Oct 2014 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर
ही कथा मला व्यक्तिशः तितकीशी आवडली नाही कारण खूपच फिल्मी झालीय. मूळ कथाबीज हे दुःखद शेवटाचं होतं. दिवाळीअंकासाठी उत्सवी अंक असल्यामुळे दुःखी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार योग्य ठरले नसते. त्यामुळे मूळ कथाबीजातली बरीच टोकदार वळणे, काही प्रसंग, वर्णने बदलावी लागली. त्याचबरोबर शेवटही. शेवट काहीतरी सकारात्मक होणार हे ठरल्यावर मग आधीच्या भागात तसे बदल झाले. मूळ प्रेमकथेऐवजी शिक्षक आणि विद्यार्थिनी आली. शेवटचा सुखद धक्का अधिक ठळक होण्यासाठी त्यांचा संपर्क तुटणे आवश्यक होते. मग त्यासाठी अरूणभाईचे पात्र दूर जाणे आणि संपर्काचे दुवे तुटण्यासाठी शिक्षकाचे पात्र मग पांढरपेशी मध्यमवर्गीय दाखवणे क्रमप्राप्त ठरले. मग ती एनजीओ भ्रष्ट दाखवणे वगैरे बाबी आल्या. अरूणभाईंचे पात्र हे अशाच काही चळवळींमध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांपासून प्रेरणा घेऊन केले आहे. एकजण परदेशातली नोकरी सोडून माहितीपटाच्या क्षेत्रात उतरलेला, एक तिकडे मेळघाटात कुठेतरी काम करणारा, अशा बर्याच प्रेरणांवरून अरूणभाईची व्यक्तिरेखा साकारली.
एव्हढ्या चांगल्या कथेचे चव्हाट्यावर केलेले पोस्टमॉर्टम काही आवडले नाही. कथेने जो परिणाम साधला होता तो अम्मळ पातळ झाल्यासारखा वाटला. असो. मर्जी लेखकाची.
24 Oct 2014 - 5:48 pm | एस
ही सत्यकथा नाही हे सिद्ध करणे आवश्यक वाटले. उगाच कुणाचा गैरसमज नको. आणि दुसरे असे की अशाच पद्धतीचे कार्य करणार्या काही खर्या संस्था/व्यक्ती किंवा स्त्रियांकडे ही कथा वाचून कुणी त्यांच्याशी संबंध जोडू नये हे कारण जास्त महत्त्वाचं होतं. कथेचा परिणाम विस्कळीत झाला तरी चालेल. पण खर्या व्यक्तींना त्याचा त्रास व्हायला नकोय. मला व्यक्तिशः कसले नावबिव कमवायचे नाही लेखकबिखक म्हणून. केवळ काही अनुभव खूप तीव्रतेने शब्दबद्ध करावेसे वाटले म्हणून लिहिलंय.
मला ह्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. कृपया उमजून घ्यावे ही विनंती.
24 Oct 2014 - 11:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
कथेइतकाच हा प्रतिसादही आवडला. चांगल्या लिखाणामागचे मनोव्यापार ही नेहमीच कुतुहलाची गोष्ट वाटत राहिली आहे.
कथेच्या शेवटामुळे ती जास्त आकर्षक झाली आहे असे वाटले. कथेतल्या परिस्थितीच्या विखुरलेले तुकड्यांतून जीवन परत जुळवण्याचे काम झाले असले तरच ती एखाद्या पणतीची कथा बनते... अन्यथा एखादा करूण माहितीपट होण्याचीच जास्त शक्यता.
(मला स्वतःला परिस्थितीला शरण जावून कुढत बसणे अथवा मनाची फुका समज घालण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करणे जास्त योग्य वाटते, यामुळे माझे वरचे मत बनले असावे.)
7 Jun 2016 - 6:50 am | उल्का
अप्रतिम कथा.
तुमचा प्रतिसाद वाचून कळलं की मूळ संकल्पना बदलून गुरू-शिष्या आणि सुखद शेवट केलात ते पण त्यामुळे कथा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली.
आणि हो सगळ्यांना वाटलं तेच म्हणेन की शेवटचा खुलासा वाचेपर्यंत मलाही हा सत्यानुभव वाटत होता. असे वाटणे ही एक तुमच्या कथेला मिळालेली दादच आहे.
तुमचे उर्वरित लेखन/कथा सवडीने नक्की वाचणार. पुढील लेखनास शुभेच्छा! :)
24 Oct 2014 - 1:14 pm | आतिवास
हृदयस्पर्शी!
अनेक लोक या निमित्ताने पुन्हा आठवले!
24 Oct 2014 - 7:04 pm | प्रास
कथा आवडली.
एक नोंद.
'वास्तव असलेल्याची कथा लिहिण्यापेक्षा कथेमध्ये वास्तवता असल्याची भावना निर्माण करणारं लेखन अधिक ताकदवान असतं.'
तूर्तास इतकंच....
27 Oct 2014 - 10:20 am | सस्नेह
'
+100
27 Oct 2014 - 6:43 am | स्पंदना
रेवाक्का सारखंच मलाही प्रतिसाद देण शक्य नाही.
ख्युप वर्षापौर्वी मुंबईत खैरानी रोद ला एका रात्री एक अशीच सजलेली स्त्री रिक्षात बसताना पह्यली होती. जे जिव्हारी भिडल होतं अन आहे ते हे...की आत बसण्यापुर्ब्वी थबकलेली तिची पावलं. ते तिच क्षणभरच रेंगाळण बरच काही सांगुन गेलं त्या क्षणी.
27 Oct 2014 - 5:51 pm | सानिकास्वप्निल
काल्पनिक कथा असली तरी मनाला भिडली हे वे सां न
कथेचा सकारात्मक शेवट आवडून गेला.
4 Nov 2014 - 2:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
हम्म...
कथा म्हणुन फारच आवडली असली तरी....जाउ दे...
पैजारबुवा,
20 Apr 2016 - 1:35 pm | कविता१९७८
वाह
20 Apr 2016 - 5:49 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुं द र कथा.
वाचायला सुरुवात केल्यावर शेवटालाच थांबलो.
लेखनाचा जबरदस्तoओघ अन अफलातून शब्द कौशल्य!
अ-प्र-ति-म !
29 Apr 2016 - 9:21 am | अभिजीत अवलिया
उत्तम कथा.
18 May 2016 - 1:25 am | निओ
शेवटी शर्टाचा पांढरेपणा जपून थोडाफार झाडू मारायला मिळणार असेल आणि त्याबदल्यात आपल्या 'सर्कल' मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवून घेता येत असेल तर आपण तयार असतोच ना.
...या सारखी अनेक वाक्ये आवडली खूप छान लिहिलं आहे.
9 Dec 2016 - 5:15 pm | इरसाल कार्टं
तुमच्या प्रयत्नांना सलाम!