संजीत रॉय.
डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूल मधून शालेय शिक्षण.
दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री.
कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅश या खेळामध्ये प्राविण्य.
३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन - १९६५, १९६७ व १९७१.
एक यशस्वी, स्वप्नवत करीयर..
अत्यंत उज्ज्वल भवितव्य खुणावत असताना या तरूणाने थोड्याश्या कुतुहलानेच बिहारच्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी मदतकार्यासाठी १५ दिवस जाण्याच्या निर्णय घेतला. १९६५ साली पडलेल्या या भीषण दुष्काळामध्ये कमालीचे दारिद्र्य, उपासमार, पाणीटंचाई, भूकबळी या गोष्टी पहिल्यांदाच जवळून पाहिल्याने आणि खडतर निसर्गाचा सामना करण्याची सर्वांचीच हतबलता अनुभवल्याने या तरूणाला असंख्य प्रश्न पडले. आपल्या सुखवस्तू आयुष्याची आणि इतर सर्वत्र पसरलेल्या गरीबीची तुलना करून "मी काय करू शकतो..?" या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता एक मार्ग दिसला.. पुढची पाच वर्षे तो एकटाच त्या कठीण मार्गावर चालत होता.
हा मार्ग होता - पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी बिहारच्या दुष्काळी भागामध्ये विहीरी खोदणे.
दुष्काळ आणि पाणी टंचाईवर आपल्या पद्धतीने मार्ग शोधताना त्या तरूणाने एक अकुशल कामगार म्हणून विहिरी खोदण्यात आपला हातभार लावला - तब्बल पाच वर्षे. खेड्यातील अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्या आणि पिचलेल्या लोकांसोबत काम करताना एका क्षणी त्याला जाणीव झाली की ही परिस्थिती बदलायची असेल तर काहीतरी वेगळे केले पाहिजे. काहीतरी वेगळे म्हणजे काय..? आणि कोणत्या ठिकाणी..? भारतामध्ये बिहारपेक्षाही हलाखीची परिस्थिती असणारी ठिकाणे असतील का..? असे अनेक प्रश्न घेवून त्या तरूणाने भारतभर प्रवास केला १०० हून जास्त दुष्काळी ठिकाणे जवळून पाहिली आणि आपण कोणत्या ठिकाणी कामाला सुरूवात करावी यावर पुढचे काही महिने खर्च केले.
एक ठिकाण सापडले. तिलोनीया - राजस्थान.
१०० ठिकाणांमध्ये विकासाची सर्वात जास्त गरज असलेले गांव. दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आणि गावाची एकूणच अत्यंत वाईट अवस्था. अजमेर, जयपुर अशा नावाजलेल्या शहरांपासून एक दोन तासांच्या अंतरावर असूनही या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये काहीही फरक पडला नव्हता. या ठिकाणालाच आपली कर्मभूमी मानून संजीत रॉय यांनी कामाला सुरूवात केली. खेड्यांमध्ये असलेले ज्ञान हे कोणत्याही पुस्तकी शिक्षणापेक्षा खूप समृद्ध आहे आणि हे ज्ञान आणखी समृद्ध करून त्याचा खेड्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायचा असेल तर खेड्यांमध्येच अशी सोय उपलब्ध व्हावी. म्हणून अशिक्षीत परंतु अनुभवी आणि हुशार अशा लोकांचे, लोकांसाठीच एक कॉलेज उभे करण्याची कल्पना सुचली. "बेअरफूट कॉलेज"
संजित रॉय - बेअरफूट कॉलेजच्या जागेवर - १९७२ साली
१९७२ साली बेअरफूट कॉलेज उभारण्यास सुरूवात झाली. गावातल्या जुन्याजाणत्या लोकांनी "शहरातला एक सुशिक्षीत मुलगा येथे येवून काय काम करणार..?" अशा दृष्टीने या कामाकडे पाहण्यास सुरूवात केली. मात्र संजीत रॉय यांच्या प्रामणिकपणाची खात्री पटल्यावर एकच सल्ला दिला "शहरातील अतीशिक्षीत लोकांना येथे काम करण्यास कदापी आमंत्रण देवू नका" शिक्षीत लोकांबाबत त्यांचे अनुभव तसेच काहीसे होते.
बेअरफूट कॉलेजने सुरूवातीपासून काही अलिखीत नियम पाळण्यास सुरूवात केली.
कॉलेजमध्ये नोकरी देताना पदव्या किंवा पुस्तकी शिक्षणापेक्षा खेड्यांच्या विकासासाठी काम करण्यास प्राधान्य.
पगार केवळ पांच हजार रूपये.
नोकरीसाठी कोणतीही करारपत्रे नाहीत.
सर्वात महत्वाची अट - शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भूमीकेतून शिक्षण घ्यावे.
बेअरफूट कॉलेजच्या इमारतीची उभारणी सुरू झाली. १२ अशिक्षीत लोकांनी इमारतीचे आराखडे तयार केले. स्थानीक कामगारांच्या सहाय्याने इमारत उभारली. या इमारतीच्या छताचे काम सुरू असताना मजेशीर प्रकार घडला. छत गळू नये म्हणून त्यावर एक विशिष्ट थर देताना कामावरील सर्व स्त्रीयांनी पुरूषांना तेथे येण्यास मज्जाव केला. " हे ज्ञान फक्त स्त्रीयांपुरते राखीव आहे आणि ही पद्धत आम्ही पुरूषांसोबत 'शेअर' करणार नाही" असे स्पष्ट सांगून गूळ, गोमुत्र आणि अनेक घटक वापरून न गळणारे छत तयार केले. आजतागायत ते छत तसेच टिकून आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीमध्ये "रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम" वापरली आहे. पावसाच्या पाण्याचे मोल दुष्काळी भागात कळते हेच खरे!
कॉलेजच्या इमारतीभोवती झाडे लावणे आवश्यक होते. एका वनखात्याच्या अधिकार्याला सल्ला विचारला असता त्याने "येथे काहीही उगवणार नाही" असे सांगून यांची बोळवण केली. मात्र खेडयातल्याच एका अनुभवी वयस्कर गृहस्थाने कोणती झाडे लावावीत आणि कशी देखभाल करावी याचे ज्ञान दिले. आजही कॉलेजच्या भोवती असलेली हिरवीगार झाडे पुस्तकी शिक्षण आणि निसर्गातून मिळणारे ज्ञान यातील फरक अधोरेखीत करत आहेत.
यादरम्यान संजीत रॉय यांच्याकडे बेअरफूट कॉलेजमधून नक्की काय साध्य करायचे याचा आराखडा तयार होत होता. अत्यावश्यक गरजेच्या सोयी नसलेल्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची गरज भासेल असेल याचा त्यांनी विचार केला आणि कामाला सुरूवात केली. वीज नसलेल्या ठिकाणी प्रकाशाची सोय करण्यासाठी एकाच गोष्टीचा आधार होता - सोलार इंजीनीयरींग. फक्त ८ वी पास झालेला एक पुजारी यांच्या मदतीला आला आणि सोलार इंजीनीयर्स घडवण्यास सुरूवात झाली..
बेअरफूट कॉलेजमध्ये शिक्षण देताना खेड्यांचा विकास करावयाचा असेल तर खेड्यातील महिलांनाच शिक्षण दिले पाहिजे या आग्रही विचाराने संजीत रॉय यांनी खेड्यातील महिला त्यातही "मदर्स आणि ग्रँडमदर्स" यांना शिक्षण देण्यास सुरूवात केली. भारतामध्ये भूतान पासून लेह लद्दाख पर्यंत आणि सेर्री लिओन, गँबीया सारख्या अनोळखी देशांपासून संपूर्ण आफ्रिका खंडातील "मदर्स आणि ग्रँडमदर्स" नी बेअरफूट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.
अशिक्षीत आणि दुर्लक्षीत महिला बेअरफूट कॉलेजमध्ये येवून सहा महिने प्रशिक्षण घेतात आणि आपापल्या खेड्यांमध्ये "सोलार इंजीनीयर्स" म्हणून परततात व सोलार पॅनेल्स बसवतात. जेथे आजपर्यंत वीज पोहोचली नाही ती खेडी या सोलार इंजीनीयर्सच्या अथक परिश्रमांमुळे प्रकाशमान होत आहेत. भारत सरकारचा बेअरफूट कॉलेजला भक्कम पाठींबा आहेच. जगाच्या पाठीवर वसलेल्या कोणत्याही खेड्यातील स्त्री साठी भारत सरकार त्या ठिकाणाहून तिलोनीयापर्यंत व परतीचा प्रवास आणि सहा महिने प्रशिक्षणाचा खर्च भारत सरकार उचलते. सोलार पॅनेल्स आणि बाकी सामग्रीचा खर्च ते देश उचलतात.
आकडेवारीतच बोलायचे तर ६४ देशांमधील ७४० हून जास्त "मदर्स आणि ग्रँडमदर्स" आपापल्या खेड्यांमध्ये सोलार इंजीनीयर्सचे काम करत आहेत.. वीज नसलेल्या ठिकाणी वीज तयार करत आहेत.
वीजेच्या बाबतीत खेडी स्वयंपूर्ण झाल्यानंतर पुढचे कौतुकास्पद पाऊल म्हणजे खेड्याचा सर्वांगीण विकास त्यातही आपल्या परीने मूलभूत गरजांची पूर्तता करताना बेअरफूट कॉलेज त्यांच्या "इंजीनीयर्सना" बोअरवेल, दंतशास्त्र, रेडीओ, कूटीरोद्योग आणि वैद्यकीय सेवांचे प्रशिक्षण देतात..
...आणि उद्याचे नागरिक घडविण्यासाठी रात्रशाळाही चालवतात.
फक्त "मदर्स आणि ग्रँडमदर्स" ना वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पारंगत करून खेड्यांचा उध्दार करताना बेअरफूट कॉलेजने साधलेल्या वुमन एम्पॉवरमेंटची झलक...
संजीत रॉय, त्यांची पत्नी अरूणा रॉय आणि पडद्यामागचे अनेक नायक नायिका बेअरफूट कॉलेज च्या माध्यमातून जे साध्य करत आहे ते सर्वच येथे लिहून काढणे आणि त्यांचे कंगोरे टिपणे हे अशक्य कोटीतले काम आहे..!!
म्हणूनच हा लेख अपूर्ण आहे. .... प्रत्येक "ग्रेट स्टोरी" प्रमाणेच..!!
****************************************************************
सर्व प्रकाशचित्रे अंतर्जाल व http://www.barefootcollege.org वरून.
ही माहिती व प्रकाशचित्रे वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल संजीत रॉय आणि बेअरफूट कॉलेज यांचे आभार.
****************************************************************
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 12:19 pm | पिलीयन रायडर
अत्यंत स्तुत्य उपक्रम!! स्त्री सबला होवो म्हणजे नक्की काय होवो ह्याचे हे उदाहरण...
पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचे असते.. आपले पोस्ट ग्रॅजुएशन पर्यंतचे सगळे शिक्षण पाण्यात गेले आहे असं मला अनेकदा वाटतं.. हा लेख वाचुन परत एकदा आपण भिकार कामं करतो ह्याची जाणिव झाली...
ह्या उपक्रमाशी आमची ओळख करुन दिल्या बद्दल मोदकचे शतशः आभार!!!
21 Oct 2014 - 3:38 pm | सविता००१
या प्रकल्पाची अतिशय सुरेख ओळख करून दिली आहेस मोदक! धन्यवाद.
22 Oct 2014 - 8:13 am | सुधीर
असेच म्हणतो!
21 Oct 2014 - 4:52 pm | प्रभाकर पेठकर
एकदा वाचून प्रकल्पाचे गहिरे रंग उलगडणे अशक्य आहे. पुन्हा पुन्हा वाचावे लागेल.
सर्वात शेवटचे चित्र अतिशय 'बोलके' आहे.
संचित रॉय आणि त्यांच्या सहकार्यांना आदरपूर्वक नमस्कार.
22 Oct 2014 - 1:44 pm | एस
सहमत. मोदक यांचे मनापासून आभार अशा कार्याची ओळख करून दिल्याबद्दल.
21 Oct 2014 - 7:44 pm | रेवती
भन्नाट मनुष्याने केलेले भन्नाट काम!
शेवटचे छायाचित्र पाहून क्षणभर थबकले.
या दिवाळीच्या भेटीबद्दल मोदकाचे आभार!
21 Oct 2014 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशंसनिय हा शब्द खूsssप तोकडा पडत आहे इतके हे काम थोर आहे... __/\__
21 Oct 2014 - 8:58 pm | बोका-ए-आझम
क्या बात है!
21 Oct 2014 - 9:58 pm | बहुगुणी
१६व्या फोटोतील (अंड्यांचे कॉर्यूगेटेड ट्रेज लावून भिंती sound-proof केल्यासारखं वाटतंय म्हणून) हा बहुतेक रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे असावा, त्यातील स्त्रीच्या चेहेर्यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं. शेवटचं ग्राफिकही अप्रतिम!
सहभाग घेण्याच्या इच्छेने या कार्याची माहिती काही काळापूर्वी घेतली होती, तो अर्धा धागा पुन्हा पकडायला हवा याची आठवण करून दिल्याबद्दल मोदकरावांचे आभार.
(अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :-) )
21 Oct 2014 - 11:02 pm | इनिगोय
रेकाॅर्डिंग स्टुडिओच नव्हे तर यांचं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे ते. इथलेच स्थानिक लोक कार्यक्रम, बातम्या सादर करतात आणि ती जी स्त्री दिसतेय, तशाच महिला (इतर अनेक गोष्टींप्रमाणेच) रेडिओकेंद्रही सहज चालवतात.
अशा त-हेचं काम लेखाच्या आवाक्यात आणणं खरंच कठीण आहे. या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल मोदकचे आभार..
22 Oct 2014 - 12:13 pm | मोदक
त्यातील स्त्रीच्या चेहेर्यावरील आत्मविश्वास सर्व प्रकल्पाचंच द्योतक असावं.
बेअरफूट कॉलेजने अद्भुदरम्य असाव्यात अशा अनेक गोष्टी "घडवल्या" आहेत, खाली शेअर केलेला व्हिडीओ आवर्जून पहावा.
(अवांतरः या संस्थेशी संलग्न असलेल्या shoptelonia.com या हस्तकलेच्या वस्तूंच्या किंमती पाहून मात्र हबकलो होतो त्याची मात्र आठवण झाली :) )
सहमत...!!!!!!!
22 Oct 2014 - 1:27 am | सुहास झेले
टेड talks मधून मला सर्वप्रथम ह्यांची माहिती मिळाली होती... अत्यंत स्तुत्य उपक्रम आणि त्याची उत्तमरित्या ओळख करून दिलीस रे. आवडला लेख :)
22 Oct 2014 - 11:59 am | मोदक
मलाही यांची ओळख येथूनच झाली.
22 Oct 2014 - 12:48 pm | मुक्त विहारि
नेहमीप्रमाणेच एकदम वाचनीय आणि माहितीपुर्ण....