निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.
निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.
मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे. कारण निंदा करणारा हा स्वत: कोणत्या ना कोणत्या बाबतीत कमजोर असेलच की ज्यामुळे इतर लोकांच्या तो निंदेला पात्र असेल. मग निंदा करून मिळते काय? निंदा ही एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला त्याचा बुद्धीनुसार झालेले आकलन असते. त्यामुळे निंदा व्यक्तिसापेक्ष असते जसे की सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. तसेच निंदेचे असते.
काही निंदक लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.
समाजात अशा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध असले पाहिजे. एकवेळ एका विशिष्ट विचारसरणीला धरून चालणारा शत्रू आणि निंदक परवडला पण सतत रंग बदलणारे सतत स्वत:च्या फायद्यासाठी आपले विचार बदलणारे व ते विचार त्यांच्या सोयीनुसार दुसऱ्यांवर लादणारे मित्र आणि नातेवाईक यापासून मात्र सावध असले पाहिजे.
उदाहरणार्थ, कुणी मुद्दाम आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण शांत असलो तर "बर्फासारखा थंड" आणि संतापलो तर "भडकू डोक्याचा" असा शिक्का आपल्या कपाळावर मारतात. पण आपण लोकांच्या प्रत्येक म्हणण्यानुसार सतत स्वत:ला बदलत गेलो तर आपल्याला जगणे मुश्कील होईल आणि आपले स्वत्व उरणार नाही, म्हणून शांत राहणे व बोलणे हेच फायदेशीर असते कारण हे दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक स्वत: सुद्धा आदर्श नसतात आणि संताप हा केव्हाही चांगला नसतोच. तसेच "थंड आणि संताप" यातील सुवर्णमध्य कधीच अस्तित्वात नसतो. मुळात सुवर्ण मध्य ही संकल्पनाच व्यक्तिसापेक्ष आणि प्रसंग सापेक्ष आहे. म्हणून शांत राहणे योग्य!
शिक्केवाले निंदक प्रत्येकाला "हा असा आहे आणि तो तसा आहे" असे शिक्के मारत फिरतात. स्वत:च्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो.
त्याचप्रमाणे काही निंदक हे सतत एखाद्या व्यक्तीतला दोष काढण्यात गुंतलेले असतात. त्यांना फक्त ठराविक व्यक्तीतले गुण तर ठराविक व्यक्तीतले दोषाच दिसतात. हे तर फारच विषारी निंदक. अशा निंदकांच्या सहवासात राहिल्यावर आत्मविश्वासाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे निंदक आपल्या घरातलेच असतील तर मग काही पाहायलाच नको.
काही निंदक सतत तुलना करतात. इतरांच्या मुलावरून स्वत:च्या मुलांना बोलणे, तो बघ कसा आहे आणि तू? यात "तू" हा "तो" चा आदर्श घेणे तरत दूरच पण "तो" आणि "तू" मध्ये तुलनेमुळे द्वेष मात्र वाढीस लागतो. हे तुलनाबाज कहर करतात. हे सतत आपल्या दोन मुलांमध्ये तुलना करतात, त्या दोन मुलांच्या मुलांमध्ये सुद्धा तुलना करतात.
आता तुम्ही म्हणाल निंदकांकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण करत राहावे. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. प्रत्येक जण स्वचालक (internally driven) नसतो, काही जण लोकप्रमाणचालक (externally driven) असतात आणि ते या निंदकांना बळी पडतात.
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुर केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||
सव्वाशेर दणका द्या जरा | निंदकांची निंदा करा ||
म्हणा त्याला परनिंदा सोडा | थोडी स्वनिंदा करा ||
तेव्हा निंदक होई बरा | अन समाज सुदृढ होईल खरा ||
आपल्याला काय वाटते? सांगता का जरा ....!!
निंदाबुद्धी विनश्यते । ओम शांती शांती शांती ॥
प्रतिक्रिया
12 Oct 2014 - 11:07 am | क्लिंटन
लेख आवडला.
12 Oct 2014 - 11:38 am | संजय क्षीरसागर
एकदम सहमत!
12 Oct 2014 - 11:48 am | निमिष सोनार
आणि मला आनंद वाटतो की मी वरील लेखन विषयाबाबतचे माझे विचार नेमकेपणाने मांडू शकलो....
12 Oct 2014 - 12:10 pm | संजय क्षीरसागर
निंदक घरातला असो की बाहेरचा, तो न्यूनगंडानं पछाडलेला असतो. निंदा करणं आणि विधायक सूचना देणं यात जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्याची तळमळ आणि घेणार्याचं हित असतं. पण स्वतःला काहीही येत नसतांना उगीच दुसर्याला खाली खेचणार्यांना (आणि अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार्यांना) योग्य वेळी आणि तिथल्या तिथे निरुत्तर करायला हवं. यामुळे निंदकाच्या स्वभावात सुधारणा होण्याची शक्यता असते आणि पुन्हा नाहक निंदा करण्यापूर्वी त्याला विचार करणं भाग पडतं. आपण गप्प बसल्यानं निंदक सोकावतात.
12 Oct 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि
"..... जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्याची तळमळ आणि घेणार्याचं हित असतं."
सहमत....
12 Oct 2014 - 12:13 pm | निमिष सोनार
विधायक सल्ला आणि निंदा यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. खरेच आहे.
12 Oct 2014 - 12:19 pm | संजय क्षीरसागर
विधायक सल्ला देणारा स्वतः विषयात जाणकार असतो आणि त्याचा हेतू लगेच कळतो. निंदक निव्वळ शेरेबाजी प्रवीण असतात, त्यांचा स्वतःचा वकूब शून्य असतो (हे आंतरजालावर बहुसंख्यप्रमाणात पाहायला मिळतात).
दुसरं म्हणजे विधायक सल्ला देणार्यांशी संवाद होऊ शकतो, निंदकाला झोडून काढण्याशिवाय पर्याय नसतो.
12 Oct 2014 - 12:21 pm | मनीषा
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुर केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
तुम्ही असे केले की तुम्ही देखिल निंदक झालात , मग तुमची बुद्धी ठिकाणावर आणायला तुमची निंदा करणे कुणाला तरी भाग पडेल , मग तो निंदक होइल , मग .... , आणि मग हे अनंत काळ, अनंत वेळा साठी चालूच राहील . मग काय करायचे ?
तसही निंदा सदा सर्वकाळ वाईटच असते असं काही नाही. काहीवेळा ती प्रगतीला पोषकच असते.
12 Oct 2014 - 12:35 pm | संजय क्षीरसागर
त्याचा अर्थ `आपण निंदक होतो' असा नाही. आपण फक्त प्रत्त्युतर देऊन निंदकाला त्याची जागा दाखवून देतो. यावर निंदक पुन्हा हिंमत करत नाही आणि केलीच तर उघडा पडतो, कारण त्याच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा टिकाव किती वेळ लागणार? तस्मात, हा सिलसिला दोन (फार तर तीन) एक्सचेंजेसमधे बंद पडतो, अनंतकाळाचा प्रश्न येत नाही.
12 Oct 2014 - 2:02 pm | मनीषा
मी तुमचा प्रतिसाद वाचून हे लिहिले नव्हते.
पण ते असो ...
निंदकाला न्यूनगंड असतो हा तुमचा भ्रम आहे. निंदा तोच करतो जो स्वतःला 'लै शाणा' समजतो. दूसर्याला समजावणे, सुधरवणे, शिकविणे हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं मानतो तो. निंदक उघडा पडतो वगैरे काही खरं नसतं .
आणि निंदेची व्याख्या काय ते सुद्धा सुस्पष्टं नाहीये . निंदा कधी म्हणायचं आणि प्रामाणिक मत कधी समजायचं काहीच समजत नाही.
काही पट्टीचे निंदक असतात (पु.ल. च्या पट्टीच्या पानवाल्या सारखे ) , त्यांच्यासमोर कुणाचेच काही चालत नाही. कारण आपण केलेल्या निंदेला / टीकेला कोण काय उत्तर देतं आहे हे ऐकायला ते तयारच नसतात . कान बंद तोंड चालू. अशांना कसं नाउमेद करणार.?
12 Oct 2014 - 2:23 pm | संजय क्षीरसागर
जर निंदा म्हणजे काय याबद्दलच तुम्ही संदिग्ध आहात तर, तुमच्या निष्कर्षांना
काहीच अर्थ उरत नाही.
माझी निंदेची व्याख्या सरळ आहे : स्वतःला विषयातलं काहीही गम्य नसतांना व्यक्तिगत शेरेबाजी करणे' (आणि यामुळे दुसर्याचा आत्मविश्वास कमी होतो असा लेखकाचा निष्कर्श आहे)
आता तुमची निंदेची कल्पना स्पष्ट करा.
12 Oct 2014 - 7:56 pm | मनीषा
आपला तो विधायक सल्ला, परखड प्रामाणिक मत आणि दुसरा करतो ती निंदा , शेरेबाजी इ. असे मानणार्या लोकांमूळे ही संदिग्धता किंवा गोंधळ होतो.
तुमची निंदेची व्याख्या सरळ आहे पण अपुरी आहे ती. जमा वजा खर्चं बरोबर शिल्लक असे आले की झालं, इतकं सोपं नाहीये ते.
निंदा किंवा टीका आणि विधायक सल्ला यात एक खूप बारीकशी सीमारेखा असते. जशी टवाळी, कुचेष्टा आणि चेष्टा मस्करी यात असते तशीच. सुज्ञांना ती दिसते, कळते. पण काहींच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गोंधळ होतो.
आता स्वतःला काही गम्यं नसताना केलेली शेरेबाजी म्हणजे निंदा.. असं तुम्ही म्हणता, पण शेरेबाजी करणार्याला नेमके तसेच वाटले असल्याने त्याने टीका केली असण्याची शक्यता आहेच ना. मग कोण बरोबर, कुणाला विषयात गम्यं आहे अथवा नाही?.. ते कसं ठरवणार. की आपणच म्हणायचं मी बोललो ते योग्यं आणि मला जो बोलतो आहे त्याला यात काहीच गम्यं नाही अस?
पण असं समजण्यात काही अर्थं नाही. ती स्वतःला घालून घेतलेली समजूत आहे फक्तं.
12 Oct 2014 - 8:30 pm | संजय क्षीरसागर
प्रश्न बोलणारा `मुद्यावर' बोलतोयं का `व्यक्तीगत' बोलतोयं इतकाच आहे.
शेरेबाजी चाललीये का चर्चा हे कळणं काय अवघड आहे? म्हणजे मी एखाद्याशी मुद्देसूद बोलतोयं आणि तो मात्र दिसला कुठे सहारा की लगेच तिकडे हजेरी लावून, `जनमतासाठी' चाचपडतोयं, याला शेरेबाजी म्हणतात.
विषयात गम्य असेल तर चर्चा विषयाला धरुन चालते. मग मुद्दा मान्य होईल किंवा अमान्य, तिथे व्यक्तिगत सरसकटीकरणाचा (म्हणजे अमक्याच्या विरोधात किती आणि बाजूनं किती असले प्रश्नच उपस्थित होत नाहीत).
14 Oct 2014 - 10:37 pm | पियू परी
संजयजींशी बाडिस. :)
12 Oct 2014 - 12:56 pm | निमिष सोनार
धन्यवाद!
12 Oct 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर
फक्त विधायक सल्ला आणि निंदा यातला फरक ताबडतोप कळायला हवा, अर्थात, हे `इनो'बाज सहज ओळखू येतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.
माझा अनुभव वेगळा आहे, निंदकांमुळे मला प्रेरणा मिळते! एकदा त्यांना जळजळ होतेयं हे लक्षात आलं की आपलं बरोबर चाललंय याची खात्री पटते. आत्मविश्वास तर असतोच, द्विगुणीत होतो.
12 Oct 2014 - 1:38 pm | निमिष सोनार
खरे आहे पण मी लेखात सांगितल्याप्रमाणे सगळेच internally driven नसतात ना!
म्हणून लोकांच्या प्रतिक्रियेचा त्यांचेवर परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
12 Oct 2014 - 2:25 pm | संजय क्षीरसागर
सुहृद्धाचा सल्ला आणि निंदकाची टिपण्णी यात (तत्क्षणी) फरक करता यायला हवा.
12 Oct 2014 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर
निमिष सोनार,
एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते. जो आपल्याला न रुचणारी मते मांडतो तो 'निंदक' असा विचार करून फक्त 'भाटगिरी' करणार्याला जो 'आपलं' मानतो त्याच्या मतांमध्ये परिपक्वता येत नाही. त्याची नेहमीच दिशाभूल होत असते. कुजकटपणे टिका करणारे आणि परखड मतप्रदर्शन करणारे ओळखता यावे लागतात. गोड बोलून फसविणार्या मित्रापेक्षा परखड बोलणारा शत्रू चांगला.
परखड टिका आत्मपरिक्षणास उद्युक्त करते. अशी व्यक्ती, त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून आपल्या चुकांचं अवलोकन करून त्या सुधारण्याची आपल्याला संधी देते.
हेतुपुरस्सर निंदा करणार्याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही.
आई-वडील दोन मुलांमध्ये फरक करतात, एकमेकांशी तुलना करतात ते चांगल्या हेतुनेच. दुसर्याचे चांगले वागणे, अभ्यासातील प्रगती, स्वभावातील उत्तम बाजू आपण आत्मसात करायला प्रेरणा देतात. मोठ्यांची, यशस्वी माणसांची चरित्रे आपण का वाचतो? उद्योजकांची आत्मचरित्रे का वाचावीत? सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्ध आंदोलनं करणार्यांच्या कथा का वाचाव्यात? कारण त्यातून प्रेरणा मिळून आपल्या व्यक्तिमत्त्वात विधायक बदल घडतात आपले व्यक्तिमत्त्व उजळून निघते. इथे दूसरे कोणी नाही आपण स्वतःच स्वतःचे 'परखड सल्लागार' (तुमच्या भाषेत 'निंदक') असतो. अशा व्यक्तीशी आपण स्वतःशीच तुलना करुन स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवितो आणि आपल्या आयुष्यातही चिमुकले यश प्राप्त करतो.
माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या ताईशी माझी तुलना, आमच्या आईकडून, नेहमीच केली जायची. ताई म्हणजे अभ्यासात अव्वल नंबर मिळविणारी अत्यंत हुशार विद्यार्थीनी आणि मी म्हणजे 'नर्मदेतला गोटा' हे ऐकतच मी मोठा झालो. पण त्याने मला प्रेरणा दिली. माध्यमिक शालान्त परिक्षेनंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर भरकटलेले आयुष्य सावरण्यासाठी, ७ वर्षांनी, पुन्हा कॉलेजला प्रवेश मिळवून पदवी संपादन केली, कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकलो आणि स्वबळावर परदेशात नोकरी मिळविली. का? तर मलाही काहीतरी 'होऊन' दाखविणं गरजेचं वाटायला लागलं. ताई पेक्षा मी खुप मागे पडतो आहे, आयुष्य निरुद्देश चाललं आहे ही जाणिव मला झाली ती त्या बोचर्या टिकेमुळेच. असो.
टिकेतून, निंदेतून सकारात्मक ज्ञान मिळवा आणि आयुष्यात पुढे चला. म्हणूनच म्हंटले आहे:
'निंदकाचे घर असावे शेजारी.'
12 Oct 2014 - 3:03 pm | प्यारे१
+१
शेवटच्या परिच्छेदाशी किंचित असहमत.
पौगंडावस्थेतल्या (दुसर्याच्या तुलनेत) न्यूनगंड आणि अहंगंड ह्या दोन्ही दशा तिथंच पार कराव्यात आणि पुढचं आयुष्य 'स्वतःशी स्पर्धा करत नये नये मकाम कायम' करत जगावं.
बाकी पेठकर काका, दुर्लक्ष सगळ्यात उत्तम, पण हे कधी कधी जमतच नाही.
12 Oct 2014 - 3:21 pm | निमिष सोनार
अशा निंदकांबद्दल काय जे दुसऱ्यांना शिकवत असलेल्या गोष्टी स्वत: कधीच पाळत नाहीत?
असे निंदक काय कामाचे जे केवळ असूयेपोटी निंदा करतात?
मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो.
आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही.
टीका मी व्यक्तीबाबत करत नाही तो व्यक्ती एखाद्या प्रसंगात चुकत असेल तर तेवढी चूक मी लक्षात आणून देतो, शक्यतो खासगीत!!.
मी कधीही कोणत्या व्यक्तीला लेबल लावून मोकळा होत नाही की तू असाच आहेस आणि तू तसाच आहेस....
असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची?
आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात?
अहो उत्तम टीकाकार माणूस पाहून टीका कमी-जास्त करत नाही....
उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!!
12 Oct 2014 - 3:46 pm | संजय क्षीरसागर
टिका ही व्यक्तिगत आणि सरसकटीकरणात्मक असते. सल्ल्याचा रोख मुद्यावर असतो.
उदाहरणार्थ, मुलांच्या उशीरा उठण्याचा (जागतिक प्रश्न) दोन प्रकारे हाताळला जाऊ शकतो :
१) `तू मुलखाचा आळशी आहेस, लवकर उठणं तुला कधी जमायचं कुणास ठाऊक?' (निंदा)
२) `अरे, रोज उशीरा उठणं तब्येतीला चांगलं नाही, त्यानं दिवसाची सुरुवातच संथ होते. उद्यापासनं (फक्त चार दिवस) लवकर उठून पाहा'. (सल्ला)
12 Oct 2014 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर
मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो.
आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही.
ह्यालाच मी 'परखड सल्लागार' म्हणतो. तुमचा मुलगा जर तुम्हाला 'निंदक' समजायला लागला तर ती त्याची चुक असेल, तुमची नाही.
असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची?
योग्य पालक आणि परखड सल्लागार कधीच एकतर्फी टिका करीत नाहीत. दोन व्यक्तींमध्ये तुलना करण्याऐवजी गुण-दोषांची तुलना करतात आणि बदलण्यासाठी मार्गदर्शन करतात. जसे तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत करीत आहात. लहान वयात परिपूर्ण समज नसली तरी 'विचारचक्र' सुरु होण्याइतकी समज नक्कीच असते. ती जर नसेल तर मुलांना वाढविण्यात मुळातच कांहीतरी चुक झाली आहे हे ओळखून ती चुक आधी सुधारावी आणि नंतरच पुढील उपदेशामृत पाजावे.
आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात?
हा चित्रपटांमधून सख्खा आणि सावत्र ही नाती अधोरेखित करायला वापराचा फंडा आहे. प्रत्यक्षात सूज्ञ आई-वडील इतक्या टोकाच्या भूमिका घेत नाहीत. चुकल्यावर दोघांनाही बोल लागतो. परकी माणसे असे करीत असतील तर त्यांच्यातला पक्षपातीपणा त्यांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकारच देत नाही. अशांचे बोलणे मनावर न घेता सोडून द्यायचे असते. किंवा जिथे जिथे 'त्या' दूसर्याची मनमानी दिसून येईल तिथे तिथे ती त्या उपदेशकर्त्याच्या नजरेत आणून वाद घालावा.
उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!!
निमिष साहेब,
माझा प्रतिसाद आपण नीट वाचलेला दिसत नाहिये.
निंदक म्हणजे परखड सल्लागार असे मी म्हंटलेले नाहीए. पण तुम्ही 'निंदक (तुमच्या भाषेत 'परखड सल्लागार') असे म्हणून मी तसे म्हंटल्याचे सुचवित आहात. माझ्या प्रतिसादातील पहिलेच वाक्य एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते हेच सांगते आहे की निंदक अणि परखड सल्लागार हे दोन वेगवेगळे असतात. ते आपल्याला ओळखता यावे लागतात. माझे म्हणणे आहे सर्वांनाच निंदक समजू नका.
12 Oct 2014 - 7:50 pm | पैसा
प्रतिसाद आवडला.
12 Oct 2014 - 7:59 pm | मनीषा
एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते.
आणि
हेतुपुरस्सर निंदा करणार्याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही.
सहमत.
12 Oct 2014 - 2:55 pm | प्यारे१
@ मनीषा,
काय कसं काय?
जयंत कुलकर्णींची एक चांगली कथा वाचायला या.
गुरुजींचं भावविश्व पण छान च.
बरेच धागे आहेत मिपावर वाचण्यासारखे.
या इकडं. :)
12 Oct 2014 - 3:22 pm | संजय क्षीरसागर
लेखकाला नाऊमेद करण्याचा.
12 Oct 2014 - 5:15 pm | पैसा
या जगात महत्त्वाचं काय, जगाची विभागणी कोणत्या दोन गटात झाली आहे वगैरे गोष्टी तुम्हाला कधी कळायच्या?
12 Oct 2014 - 6:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सन्दर्भ समजला नाही.
12 Oct 2014 - 8:00 pm | मनीषा
अगदी योग्यं सल्ला
बेशर्त स्विकारला आहे. :)
12 Oct 2014 - 3:23 pm | निमिष सोनार
त्यावर आपले मत व्यक्त करावे ही विनंती...!! चू.भू. द्या. घ्या.
12 Oct 2014 - 3:26 pm | निमिष सोनार
आणि आजपर्यंत मी पाहिलेले सर्व टीकाकार आणि निंदक हे नेहेमी पूर्वग्रह दूषित आणि व्यक्तिसापेक्षच पाहिले आहेत...!!!
किंबहुना प्रत्येक टीकाकार आणि निंदक हा व्यक्तिसापेक्ष चा असतो....
त्यात निन्दाकाचा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असतोच....
12 Oct 2014 - 3:52 pm | संजय क्षीरसागर
निंदा म्हणजे दुसरं काय?
`आपल्याला नाही ना जमत, खेच दुसर्याला खाली', हा तो हेतू!
12 Oct 2014 - 6:32 pm | मार्मिक गोडसे
सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते.
एखादे उदाहरण
12 Oct 2014 - 7:25 pm | कवितानागेश
लेख चान्गलाच आहे.
पण समोर खोटी वाहव्वा करुन मागे टिन्गल करणारे उघड निन्दका पेक्षा खतर्नाक असतात. असे माझे मत आहे.
12 Oct 2014 - 7:29 pm | पैसा
आणि स्वतःला परखड समजणारे पण प्रत्यक्षात सर्वनिंदक असणारे? प्रत्येकाला असं वाटतं की मी परखड बोलतोय, पण तेच १०० जणांच्या बाबत होऊन ते दुखावले जात असतील तर त्या माणसाने स्वतःचा शोध घेतला पाहिजे, की मी निंदक तर नाही ना!
12 Oct 2014 - 10:14 pm | निराकार गाढव
हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला आहे.
12 Oct 2014 - 10:16 pm | पैसा
याला गिरिजादेवीच्या जत्रेत सोडून या रे कोणतरी!
12 Oct 2014 - 8:03 pm | मनीषा
अगदी योग्यं
माझं देखिल (अनुभवान्ती) असच मत आहे.
12 Oct 2014 - 8:55 pm | अजया
आपण दुस~याची यथेच्छ निंदा करायची,त्याला स्पष्ट,परखड मत वगैरे नाव द्यायचं.दुस~याने आपली निंदा केली तर तिला व्यक्तिसापेक्ष,पूर्वग्रहदुषित असं समजायचं हा बेस्ट अॅटिट्युड आहे.आवडेश!!
12 Oct 2014 - 10:23 pm | प्यारे१
'र्या' साठी टाईप करा R + y + A.
धन्यवाद.
12 Oct 2014 - 10:33 pm | अजया
माहितीये प्यारेकाका!टॅबवर देवनागरी कळफलकावर ते दुसर्या असं टाइप होतंय!!म्हणून तसं लिवलंय.
12 Oct 2014 - 10:37 pm | कवितानागेश
प्यारेकाका निन्दक आहेत!
12 Oct 2014 - 10:42 pm | अजया
=))
असं वर लिहिलेलं वाचलं बुवा!
12 Oct 2014 - 11:07 pm | सस्नेह
निन्दक कोणता अन कोण परखड हे मज आता निरोपावे
..ऑऽऽ झोप आली ब्वा
13 Oct 2014 - 2:44 am | प्यारे१
@ तीन संपादिका ;)
येस्स्स्स्स!
त्या यदाकदाचित मधल्या दुर्योधनासारखं जितं जितं जितं म्हणावंसं वाटतंय ब्वा!
आखरकार आप लोगोंने मुझे पहचान ही लिया!
उपरवाले, सब मुरादे पुरी हो गयी.
13 Oct 2014 - 6:55 pm | संजय क्षीरसागर
यू आर सो लकी!
निंदा काय असते हे पाहायचं असेल तर इंटरनेट हा उत्तम पर्याय आहे. इथे प्रत्येकाचं ज्ञान, त्याचा व्यासंग, त्याची बहुश्रुतता (अर्थात, असेल तर!) त्याच्या लेखनातून आणि प्रतिसादातून व्यक्त होत असते.
ज्यांना काहीही जमत नाही (हे सुद्धा तिथल्यातिथे सापडतं!) ते कमालीचे अस्वस्थ होतात.
त्यांचा न्यूनगंड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग कोणत्याच विषयात काही गम्य नाही, चर्चेत भाग घेता येत नाही, स्वत:च्या विकासासाठी काहीही करता आलेलं नाही (आणि दुर्दैव म्हणजे इथून पुढे काही करता येईल असं वाटत नाही), असे लोक विडंबनं (पक्षी : निंदा) सुरु करतात. स्वतःचा वकूब शून्य पण दुसर्याला खाली खेचण्याचा प्रयत्न!
आता असाच न्यूनगंड असलेले, पण लोकलज्जेस्तव गप्प बसलेले, त्याला साथ द्यायला लागतात! विडंबकाला समाधान काय? तर `आपण कर्तृत्त्व दाखवलं! प्रतिभेची कमाल दाखवली!! आणि त्याच्या मागे टाळ्या पिटणार्यांना आनंद काय? तर फारच खचायला होत होतं, चला थोडा दिलासा मिळाला!
13 Oct 2014 - 7:29 pm | सूड
आयाम निंदक, आय लाईक टू डू निंदा!!
डझ मिपा ह्याव एनी प्रॉब्ळंम्म??
(सुडक्या आणिकोण (!!))
14 Oct 2014 - 5:36 pm | कवितानागेश
अरे सुडक्या, ते जगाबद्दल लिहितायत, मिपाबद्दल नाही.
मिपावर लाडक्या शेफला शिव्या देतात, सरळ्सरळ याला बॅन करा रे, म्हणून हाक देतात आणि इरिटेटिन्ग लोक्स्ना चान चान म्हणून चढवतात, हे तुला नव्यानी सांगायला हवं का?
तेन्व्हा हे वरचं सगळं मिपाबद्दल नाही.
बाकी सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं, आणि एक-दोनच कुणीतरी निंदा करतात तेंव्हा दुर्लक्ष करावं, हा साधा सरळ नियम मला पाळायला सोपा जातो.
बाकीच्यांनी त्यांचे त्यांचे काय ते पहावं.
जय हिन्द, जय महाराष्ट्र!
14 Oct 2014 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर
सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं
छे: छे: माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाला ज्ञान, अनुभव, आकलनशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा सूक्ष्म दृष्टीकोन वगैरे वगैरे नाही. मी त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकतो. माझं मार्गदर्शन त्यांना समजत नसेल तर तो त्यांचा दोष आहे. असा विचार करावा.
14 Oct 2014 - 6:29 pm | सुहास..
कोणी निंदा म्हणा वा परखड टीका की काय ते पण , झालेली / असलेली चुक मी सांगायला कचरत नाही ...अर्थात सांगायची एक पध्दत असतेच ...उद्या एखादा फुटपाथ सोडुन रस्त्यावर, मेन ट्रॅफिक मध्ये चालायला लागला तर त्याला रस्त्यावरचा माणूस ही सांगतो की तु रस्ता सोडून चालला आहेस, मग मी समोरच्याच्या(मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही) इतका जवळचा असुन मी का नाही सांगायच ?
मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही आहे, चमचा नाही !!
या स्वभावामुळे बरेच मित्र गमावलेला ( आणि तरी ही स्वतःशी प्रामाणिक असलेला )
वाश्या