काही महीन्यांपूर्वी पौड रोड,पुणे (दशभुजा गणपती ते चांदणी चौकापर्यंत) येथील एकमेव पेट्रोलपंप श्रीमती अनघा घैसास या धाडसी महिलेने केलेल्या तक्रारीमुळे बंद पडला.अजुनही तो बंदच आहे.
अनघा यांनी आपल्या कारमध्ये पेट्रोल भरले आणि त्यात हातचलाखी केल्याचा त्यांना संशय आला. केवळ तिथल्या कर्मचार्यांशी वाद घालुन न थांबता त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनी व पोलिसांकडे तक्रार केली. ईतकेच नाही तर त्याचा पाठ्पुरावा केला आणि पंप बंद करण्यात यश मिळवले.त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही आल्या असतील किंवा अजुनही येत असतील. त्यामुळेच त्यांच्या धाडसाला सलाम.
मला आलेले पेट्रोल मारण्याचे काही अनुभव
१.पेट्रोल भरताना लक्ष दुसरीकडे वळवणॅ,अवांतर गप्पा मारणे--उदा. बाईकवर स्वामी समर्थ लिहिले असल्यास "काय?स्वामींचे भक्त का?" वगैरे
२ रिसीट पाहीजे का?कार्ड पेमेंट करणार का? असले फालतू प्रश्न विचारणे
३ नळीचे नॉझल बाईकच्या टाकीत गेल्यावर लगेच क्लच न दाबणे, यावेळी मीटरवर मात्र आकडे वाढत चालले असतात.मध्येच कधीतरी क्लच दाबला की खरा पेट्रोलचा फ्लो चालु होतो.
४ नॉझल आत असताना मधे मधे क्लच दाबणे, यानेही फ्लो थांबतो बहुतेक.
५. ३ लिटर पेट्रोल भर असे सांगितल्यास " राउंड फिगर करु का?" (म्हणजे ३०० किंवा ४०० रुपये असे)विचारणे. यात ही काही ठिकाणी P1 म्हणजे २०० रुपये P2 म्हणजे ४०० रुपये असे सेट केलेले असते आणि त्यात फसवले जाण्याचा धोका असतो.
आणि त्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये (आय.टी मध्ये) काम करणार्या मित्राशी चर्चा केल्यावर मिळालेले काही उपाय
१.डिजिटल मशिन असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावे. कंपनी संचालित असेल तर उत्तम. जिथे पेट्रोलची किंमत सेट केल्यावर पेट्रोलचा फ्लो सुरु होण्याआधी कर्मचारी एक टोकन स्वाईप करतात तिकडे तर अजुनच उत्तम.
२ नॉझल एकदा टाकीत घालुन क्लच दाबला , की कर्मचार्याला हात काढुन घ्यायला सांगावे. नळी पडेल वगैरे फालतू कारणे ऐकुन घेउ नयेत. हवे असल्यास स्वतः नळी धरावी.
३. ३२०,४१० रुपये असे ऑड नंबर किंमतीचे पेट्रोल भरणे, त्यासाठी वरचे १० २० रुपये सुट्टे ठेवणे.त्यामुळे झक मारुन ते पूर्ण आकडे मशीनवर दाबावे लागतात.
४.मशीन तुमच्या उजव्या हाताला येईल अशी गाडी लावणे. निदान मलातरी ते बरे पडते लक्ष ठेवायला.
५.स्कूटी/अॅक्टीवा अशा गाड्यांची टाकी आतमध्ये असते,शिवाय बरेचदा डिकीत काही सामानसुद्धा असते. डिकी उघडणे,गाडी स्टँड्ला लावणे यात मशीनवरच्या आकड्यांकडे दुर्लक्ष होण्यास जास्त वाव असतो.
६.पेट्रोल मारल्याचा संशय आल्यास तुम्ही टाकी उघडुन कर्मचार्याला चेक करुन दाखवायला सांगु शकता.तसे करणे त्यांना बंधनकारक आहे.
आपण एखाद्या पंपावर कधीतरी पेट्रोल भरत असु, पण रोज तिकडे येणारे काही शे लोक आणि प्रत्येकाची ५० रुपयाची फसवणुक गृहित धरली तर एकेका पंपावर किती लाखाची लूट होत असेल?
तुमच्या काही सूचना आहेत का ही लूट थांबवायला?
प्रतिक्रिया
8 Oct 2014 - 6:00 pm | प्रचेतस
हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना जवळपास सर्वच 'शेल' चे पेट्रोल पंप भेसळमुक्त पेट्रोल अचूक मापात देतात हा स्वानुभव आहे. शेल चे पेट्रोल भरल्यावर गाडीचा मायलेज ५ /७ ने वाढलेला आहे तसेच इंजिनसुद्धा उत्तम चालत आहे.
8 Oct 2014 - 6:19 pm | प्रसाद१९७१
शेल च्या पंपा बद्दल सहमत. पूर्वी तिथे भरायचो, सर्वीस पण उत्तम आहे.
शेवटी साहेब ते साहेबच
8 Oct 2014 - 9:09 pm | अत्रुप्त आत्मा
जोर दार +++१११
============
गेली दीड वर्ष शिंपली पेट्रोल वापरणारा - आत्मु! :)
9 Oct 2014 - 3:13 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी...
शेलचे पेट्रोल वापरल्यापासुन गाडीचा मायलेज वाढलेलं आहे...
8 Oct 2014 - 6:10 pm | रेवती
अनघा घैसासांबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांचे कौतुक वाटले. त्यांना धमक्या आला असतील असे मलाही वाटते.
8 Oct 2014 - 7:00 pm | यसवायजी
राऊंड फिगरबाबत फेसबूकावर वाचले होते. पण ते खरे वाटत नाही.
जर मशीनमधे असं रि-प्रोग्राम करुन गंडवायचं ठरवलं तर, कितीही रुपयांचं तेल टाकलं तर ८०% च टाकीत पडेल असं करुन घेणं सोपं जाईल की मग.
8 Oct 2014 - 7:08 pm | यसवायजी
५०० चं पेट्रोल टाकायला सांगितलं होतं. तो २०० चं टाकून थांबला. मी पैसे देण्याच्या नादात होतो, तेवढ्यात लक्ष गेलं.
त्याला म्हटलं अरे ५०० चं सांगितलंय. त्याने परत तिथुनच पुढे पेट्रोल टाकायला चालू केलं आणी ३०० ला थांबला. आणी सांगू लागला की आधी २०० चं आणी आता ३०० चं टाकलं. मी दंगाच केला. म्हटलं चल ऑफिसात, सीसीटिव्ही चेक करू, आणी मग पोलिसातच जातो. मग घाबरुन त्याने पुर्ण पाचशेचं पेट्रोल टाकलं.
8 Oct 2014 - 7:16 pm | सुबोध खरे
असाच अनुभव मला मुलुंड पश्चिम येथे आला. मी आपल्या मोटार सायकल मध्ये ५०० रुपयाचे पेट्रोल टाकण्यास सांगितले असता माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याने १०० चा आकडा शून्य न करता पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली आणि पाचशे वर थांबला. मी त्याला विचारले तर म्हणाला पाचशेचेच पेट्रोल टाकले आहे. मी शांतपणे त्याला म्हणालो कि तुझे तक्रार पुस्तक घेऊन ये त्यात तक्रार लिहिल्याशिवाय मी तुला पैसे देणारच नाही. या बरोबर तेथे असलेली तिन्ही पोरे गायब झाली. मी दोन मिनिटे वाट पहिली तर ती माझ्याकडे लक्षच देइनत. मी शांतपणे गाडी चालू केली आणि पुढे निघालो. त्यांनी ते पहिले पण कोणीही पुढे आले नाही. मी शांतपणे पैसे न देता चालवत राहिलो आणि घरी आलो. चारशे रुपयाचे पेट्रोल गेले तरी चालेल तक्रार नको याचा अर्थ रोज ते किती लोकांना गंडवत असतील?
9 Oct 2014 - 9:19 am | चौकटराजा
हा अनुभव मला पिंपरीच्या पिंपळे पंपावर आलेला आहे. आता मी जोरात ओरडून तीन्शे चे टाक असे सांगतो.
9 Oct 2014 - 12:54 pm | नाखु
हा सगळ्यात "चोरटा आणि माजूरडा (हट्वादींचा) पंप आहे.
अनुभव हीच खात्री.
नेमके आप्ल्या भागात कंपनी द्वारा संचालित पंप नाहीये.
8 Oct 2014 - 7:24 pm | शिद
ह्या असल्या चालूगिरीमूळे पेट्रोल भरण्यार्या पोरांचा नक्की काय फायदा होत असेल? म्हणजे त्यांना त्यामोबदल्यात इन्सेटीव/कमीशन वैगरे मिळते की कसे? नाहीतर ह्या सगळ्या प्रकरणात पेट्रोलपंप मालकालाच काय तो फायदा.
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
8 Oct 2014 - 8:13 pm | सह्यमित्र
पेट्रोल भरण्यार्या पोरांचा फायदा होत असावा. माझ्या माहिति प्रमाणे त्यांना सुरवाति चे रीडिंग आणि काम संपवितानचे रीडिंग ह्यातल्या फरका ला पेट्रोल च्या दराने गुणल्या वर येइल इतकि रक्कम जमा करावि लागते. त्यामुळे कमी पेट्रोल भरुन जास्त पैसे घेऊन त्यांचा फायदाच होत असावा.
8 Oct 2014 - 7:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वाचतेय. पेट्रोल पंपची एजन्सी मिळवण्यासाठी 'वर'पर्यंत खटपटी कराव्या लागतात असे ऐकले आहे.पेट्रोलमध्ये आधीच भेसळ केलेली असते त्यामुळे नंतर कितीही प्रामाणिक्पणाचा आव आणला तरी त्याला फार अर्थ नसतो.
पेट्रोल भरणार्या पोरांना फार फायदा होत नसेल असे वाटते.खरा मलिदा मालकालाच मिळत असावा.
8 Oct 2014 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी
२००६ साली पुण्यातील सातारा रस्त्यावरील हि.पे. पंपावर क्रेडीट कार्डने बिल देतोय सांगितल्यावर एकाने मला लगेच कार्ड काढायला सांगितले व दुसर्याने पेट्रोल भरणे सुरू केले. ५०० चे भरायचे असताना पूर्वीच्या माणसाचे झाल्यावर मिटर रिसेट न करताच सुरू केले. माझे पूर्ण लक्ष क्रेडीट कार्ड मागणार्याने स्वतःकडे वळविल्याने मी खात्रीशिरपणे दावा करू शकलो नाही की शुन्यापासून सुरूवात झालेली नाही. त्या आठवड्यात गाडी नेहमीपेक्षा लौकर रिझर्व वर आल्याने माझी शंका खरी ठरली.
जून २०१४ मध्ये थोडा असाच अनुभव बावधनच्या शिंदे पेट्रोलियमवर आला. प्लेझर स्कूटरची सीट उचलून टाकीचं झाकण काढल्यावर लगेच पेट्रोल भरणे सुरू केले गेले. गाडी धरून ठेवण्याच्या नादात मान पूर्ण वळवून मीटरकडे लक्ष देता आले नाही. रांगही फार असल्याने इतरांना फार वाट बघावी लागू नये हा माझा सौजन्यवाद अंगलट आला.
8 Oct 2014 - 8:34 pm | दशानन
सिंहगडरोडवरील वडगावचे पेट्रोल पंपवाले पण फसवणूक करतात. त्यांच्याकडे पेट्रोल मध्ये भेसळ असतेच पण गर्दीचा फायदा घेऊन शक्य तेवढ्या मार्गाने ग्राहकाला हसवले जाते. मी तर त्या पंपाकडे अगदीच नाइलाज असला तरच जातो.
8 Oct 2014 - 10:33 pm | दादा कोंडके
सहमत. तिथे हमखास फसवणुक होते.
त्यामुळे मी रांकाजवळच्या पेट्रोलपंपात जातो. पण मागच्या महिन्यातच तिथेही फसवणुकीचा अनुभव आला. अर्जुनाचा जसा माश्यावर डोळा होता तसा मी पेट्रोलपंपावर मीटरवर डोळा ठेवतो. काहिही बोललं तरी लक्ष विचलीत होउ देत नाही. तरी पण हरामखोर लोकं काही क्लृप्त्या शोधून काढतात. अॅक्टीवा किंवा तत्सम स्कूटर असेल तर शांतपणे गाडी बंद करून स्टँडला लावायची. आणी सर्वात शेवटी टाकीचं झाकण उघडायचं.
9 Oct 2014 - 12:05 pm | त्रिवेणी
माझा एक प्रश्न आहे.
एक दोन ठिकाणे जे म्हंटले आहे की टाकीतले पेट्रोल काढून परत मोजायला लावायचे. पण आपल्या गाडीच्या टाकीत आधीचे ही थोडे पेट्रोल असतेच ना. मग असे काऊंट करायचे.
हसु नका कोणी पण मी कायम 100 चेच पेट्रोल एकावेळी भरते. घरून निघतानाच 100 ची नोट सनकोटच्या खिशात ठेवते. आणि पेट्रोल भरायला गेल्यावर सुरवातीच्या गाडीत पेट्रोल भरून होईस्तोवर पेट्रोल टॅंकचे झाकण काढून ठेवते. 100 सेट केले आहेत का ते आधी बघून मगच पेट्रोल भरायला सांगते.
9 Oct 2014 - 12:27 pm | काळा पहाड
एवढं सगळं केल्यावर तुम्हाला कशाला टाकीतले पेट्रोल काढून परत मोजायचंय?
11 Oct 2014 - 12:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
पुण्याच्या दिसताय ;-) ;-) ;-)
11 Oct 2014 - 12:49 am | काळा पहाड
संशय का मनी आला? आता फक्त त्या पेट्रोलचा त्याचं ईंटरोगेशन करून जीव घेणं बाकी आहे.
11 Oct 2014 - 8:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
टाकीत maximum १०० रु चे पेट्रोल हे वाचून पटकन अंदाज आला. ;-)
11 Oct 2014 - 5:53 pm | त्रिवेणी
मुळची खांन्देशी पण आता पुणेरी
8 Oct 2014 - 10:22 pm | काळा पहाड
मी काहीही झालं तरी शून्य आहे हे बघितल्याशिवाय पेट्रोल टाकायला सुरू करायची परवानगी देत नाही आणि पूर्ण पेट्रोल भरून होईपर्यंत कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आणि मीटरवरची नजर काढत नाही. पाकीटही मी नंतरच काढतो.
8 Oct 2014 - 10:33 pm | सुहास..
आमची लय वट्ट आहे ;) पंपच मुळात आम्ही आणलाय, आणि खोट कशाला सांगु एक दोन नियम ही धाब्यावर बशविलेत त्यासाठी ( गावात पंपच नव्हता ) गेल्या दोन वर्षांपासुन तिथेच भरतो , शिवाय तिथले कामगार ही माझ्याच शब्दावर कामाला लागल्याने असल्याने तक्रार करण्याचा प्रश्न नाही, ऑफ कोर्स शेल चाच आहे.
आधी ही काही अश्या म्हणजे महाप्रचंड तापदायक म्हणाव्यात अश्या घटना नाहीतच , सवय लावुन घेतली आहे एकाच पंपावर पेट्रोल भरणाची , तिथे ही ओळख होतीच ...नगर मध्ये मात्र एकदा बाईक मध्ये पेट्रोल वरुन चांगलच पेटल होत, सारख-सारख गचके देत भरत होता , सरळ बाईक मधुन काढल आणि त्याल मोजुन दाखविल, आमची टाकी रिकामी होती ...वाद चाले पर्यंत खुप गर्दी जमा झाली होती, गर्दी ही हळु हळु वळली आमच्या सपोर्ट ला ...मग माफी ई. व्यवस्थित भरणे झाले ....
खुप विषय आहेत असेच ! छोट्या-छोट्या गोष्टी आहेत.. पंचरवाल्याच ही उदाहरण आपण दिलेलेच आहे ...आपल्याकडे वाद घालायला वेळ नसतो असे म्हणुन वेळ मारुन नेऊ नये, किंवा आता कुठे वाद घाला..किंवा ताकद नाही...नकोच ...आपल्यावर अन्याय होतो ना , मग आवाज उठवायलाच हवा हे माझ वैयक्तीक मत !!
आणि नेहमीचा डॉयलॉग आमचा " मला त्रास होत असेल तर माझ्या इतका मोठा भाई कुणीच नाही " :)
9 Oct 2014 - 6:26 am | पाषाणभेद
लोकजागृती व्हावी म्हणून लिंक देतोय.
ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान
हा आमचा जुनाच अनुभाव. २००९ सालातला. म्हणजे अजून प्रेटोलपंपावर फसवाफसवीची समस्या हायेच म्हना.
9 Oct 2014 - 11:17 am | काळा पहाड
अजून राष्ट्रवादी वाले आहेतच ना.
11 Oct 2014 - 1:49 am | खटपट्या
लेख चान्गला आहे. मराठी शब्द तर भन्नाट आहेत .....
पेट तेल, डीज तेल, खड्क तेल :)
9 Oct 2014 - 11:16 am | वेल्लाभट
वाशीमार्गे पामबीच कडे जाताना ब्रिज उतरल्यावर डाव्या हाताला बरीच गाड्यांच्या सुशोभीकरणाची दुकानं आहेत, त्यांच्या रांगेत एक इंडियन ऑईल चा पे.पंप आहे. तद्दन चोर. दोनदा भांडण झालंय. पहिल्यांदा माहित नव्हतं म्हणून गेलो. दुस-यांदा इलाज नव्हता म्हणून गेलो. पण त्यानंतर कधीच नाही. ९९९.८७ भरलं, मी म्हटलं १००० कर नाहीतर १३ पैसे दे. प्रश्न १३ पैशाचा नाही. पण हे असं पैशातही मारतात ऐकून होतो. प्रत्यक्ष बघितलं.
एकंदरित मत पक्कं केलंय, प्रथम प्राधान्य एचपी. द्वितीय बीपी. नाहीच तर मग ईं.ऑ.
9 Oct 2014 - 11:17 am | काळा पहाड
प्रथम प्राधान्य शेल ला.
9 Oct 2014 - 12:51 pm | वेल्लाभट
मुंबईत नाही शेल; मग मुंबईकर काय करेल!
सहज एक 'आठवले'ली कविता
9 Oct 2014 - 12:39 pm | काव्यान्जलि
वाचतीये … मला कासट पेट्रोल पंपावर २ वेळेस असा अनुभव आला . आता मी अश्वमेध जवळच्या , कर्वे रोडच्या पंपावरच पेट्रोल भरते ..
9 Oct 2014 - 12:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
तद्दन चोर आहेत..ईकडे पेट्रोल भरणे कधीच बंद केलेय्.
तिकडुन जाताना कधी कधी बघतो की २ व्हीलरवाले काही जण गाडीवर बसुनच नोट पुढे करतात आणि टाकीचे झाकण मागे असते.(बहुतेक टी.व्ही.एस. वेगो) तिकडे बघायची पण तसदी घेत नाहीत.भरणार्याचे चांगलेच फावत असेल.
त्याउलट ज्ञानेश्वर पादुका चौकातला बी.पी. पंप...अजुन तरी अनुभव चांगला आहे.एकदा नळी टाकीत सोडल्यावर पुन्हा हात लावत नाहीत्.गाडीचे अॅव्हरेजही चांगले आहे.
9 Oct 2014 - 12:50 pm | वेल्लाभट
मुंबईत नाही शेल; मग मुंबईकर काय करेल!
सहज एक 'आठवले'ली कविता
9 Oct 2014 - 1:20 pm | मदनबाण
मी सर्व प्रथम मीटर झीरो झाल्या शिवाय टाकीचे झाकण उघडतच नाही, कारण आधी वरती लिहले गेलेले अनुभव आलेले आहेत. नोझल टाकीला खाली चिकटेल असे न धरता बर्यापैकी वर धरायला सांगतो.मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की हल्ली सेंसरमुळे पेट्रोलला पेट्रोल भरणारे नळकांडे टच झाले की ऑटो फिलींग थांबते { हे नळकांडे टच झालेले पेट्रेल परत खालच्या टँक मधे पाठवले जाते म्हणे ! खरे-खोटे ठावुक नाही. }

(चित्र जालावरुन घेतले आहे.}
शेलवाले म्हणतात :-
All filling nozzles have a built-in cut-off device that is intended to reduce the possibility of customers being splashed with fuel during filling. This device works by sensing the pressure coming out of the vehicle's petrol tank. As the tank gets fuller, the pressure increases in the filling neck of the car and this is sensed by a valve in the nozzle which closes the flow.
The hose and nozzle still hold fuel so there is no draining back to the stations' underground tanks. The metering of the fuel takes into account the amount of product in the hose and nozzle at the start and finish of the transaction so that the customer only pays for what is delivered into the tank.
Pumps are calibrated annually and all pump equipment have also been checked and tested, and found to be properly calibrated in full compliance with all regulations.
वरती शेलवाल्यांचा अनुभव त्यांच्या एकुण व्यव्हारातुन सकारात्मक दिसतो आहे, पण मग इतर कंपन्यांचे काय ?
बाकी मागीतलेल्या रक्कमेचे पेट्रोल हे कसे मारतात ते इथे :- http://www.jagoinvestor.com/2014/03/petrol-pump-fraud-in-india.html नीट समजाउन सांगितले आहे.
जाता जाता :- मी पेट्रोल भरल्यावर बील नेहमी मागुन घेतो,तुम्ही सुद्धा बील मागण्याचा आग्रह धरा. पक्के बील जे पंपातुनच प्रींट होउन येते ते घेण्याचा आग्रह धरावा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15
9 Oct 2014 - 2:11 pm | आसुड
ससुर्जी का पंप है ... विचाराव लागेल खर काय ते
10 Oct 2014 - 5:44 pm | जेपी
मी तर डायरेक्ट कॅन किंवा लिटरच्या बाटलीत पेट्रोल घेतो.
आमच्या इथल्या पंपवाल्यान माझ नावच बाटलीवाला ठेवल.