माणसाचं मन हा प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. मन नक्की कुठं असतं हे सुद्धा अजून स्पष्टपणे कळलेलं नाही. तो शरीराचा अवयव आहे की नुसती कल्पना हेच एक मोठे गौडबंगाल आहे. 'माझ्या मनात विचार आला' म्हणजे नक्की काय झालं ते मलाही सांगता येणार नाही पण माझं अख्खं आयुष्यच त्यावर अवलंबून असतं . मी इतरांशी कसा वागलो,वागतोय आणि इथून पुढे वागणार हे तिथेच ठरतं. मन म्हणजे काहीसं धुक्यात हरवलेला लोहगडाच्या विंचूकाट्यासारखं… ते तिथे आहे हे पक्कं माहित असतं पण धुक्यामुळे कायम अस्पष्ट आणि संदिग्ध….
तसंच त्याला पूरक म्हणून दुसरं एक स्वतःच असं एक जग दिलंय माणसाला निसर्गाने …. ते म्हणजे स्वप्नांचं … आता इथे स्वप्न हे शास्त्र आहे की केवळ मनाचे खेळ कि ज्योतीषासारखे वादग्रस्त हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण बऱ्याच वेळा पडणाऱ्या स्वप्नातून निष्पन्न असे काहीच होत नाही. भोवतालच्या परिस्थितीनुसार पडणारी स्वप्ने कोणतेही फळ देत नाहीत. उदाहरणार्थ घड्याळाचा गजर कानावर पडून खूपदा आगीचा बंब किंवा रुग्णवाहिका स्वप्नात दिसते म्हणजे त्या स्वप्नाला तसा अर्थ नसतो. मात्र काही सूचक स्वप्नेही असतात ज्यायोगे नजिकच्या भविष्यात घडणाऱ्या काही घटना अगोदर दिसू शकतात पण त्यासाठी आपले मन रेडियो सारखे त्या लहरी शोषण्यासाठी तयार हवे.
मला स्वतःला बऱ्याचदा मी अधांतरी आकाशातून खाली पडतोय किंवा रेल्वेचे रूळ , रेल्वेचा प्रवास, नाणी गोळा करणे अशी स्वप्न नेहमी पडत असतात. त्याचा खरच काही अर्थ असतो का नाही हे कळायला काही मार्ग नाही. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे सगळेजण म्हणतात पण मी स्वतः बाईक आणि चारचाकी चालवायला स्वप्नातच शिकलोय. आदल्या रात्री स्वप्न पडल्यावर दुसर्या दिवशी मी तशी गाडी चालवून पहिली असताना ती मला यायला लागली होती. माझ्या कित्येक देवाघरी गेलेल्या आप्तेष्टांना मी स्वप्नातच भेटलोय. त्यांच्या स्पर्शापासून सगळं मनापासून अनुभवलंय. त्याचा अर्थ माहित नाही पण प्रचंड मानसिक शांतता मात्र नक्की लाभली आहे…
मी कुठेतरी ऐकले होते की स्वप्न म्हणजे माणसाचा थोडक्या पण ठराविक काळासाठी झालेला मृत्यूच असतो.आपले सूक्ष्म शरीर जड देह सोडून त्याच्या जगात विहार करायला निघून जाते पण ते त्या जड देहाशी बांधलेले असते. ज्या क्षणी सूक्ष्म शरीर परत येत नाही म्हणजेच कायमचा मृत्यू ! आपण स्वप्नात ज्या व्यक्तींना बघतो त्यांचे आणि आपले सूक्ष्म शरीर एकमेकांना भेटते (पण ह्याची खात्री मी केलेली नाही ). जे आयुष्य आपण प्रत्यक्षात जगू शकत नाही ते तात्पुरते का होईना जगायला मिळते ते केवळ स्वप्नांद्वारेच !
खालील दुवा मला ह्या बाबतीत प्रचंड उपयोगी वाटला :
http://www.dreamscience.org/idx_science_of_dreaming_section-1.htm
हे स्वप्नांचे जग अद्भुत आहे… पण मानवनिर्मित खेळ की निसर्गनिर्मित चमत्कार ?
प्रतिक्रिया
8 Oct 2014 - 3:32 pm | विलासराव
आपले सूक्ष्म शरीर जड देह सोडून त्याच्या जगात विहार करायला निघून जाते पण ते त्या जड देहाशी बांधलेले असते
खरतर अनंत अशा काळाचा विचार केला तर आपण आपले जे जिवन जगतो तेच स्वप्न आहे असे मला वाट्ते आनी मृत्यु आपल्याला स्वप्नातुन जागं करतो तेंव्हा आपण आपल्या खर्या जगात असतो.
अवांतर:
मी पयला!!!!!
8 Oct 2014 - 3:39 pm | मदनबाण
सध्या जे स्वप्नात पाहतो तेच प्रत्यक्षात घडावे अशी माझी लई म्हणजे लई इच्छा आहे बाँ...
काय स्वप्न पडले ? तर सध्या निवडुकीच्या काळात लक्ष्मी-दर्शन घडवले जात आहे, या काळात म्हणे पोतीच्या पोती पैसे आणले-नेले आणि वाटले जातात ! त्यातलेच एक पोते चुकुन मला मिळते ! आणि त्याचा वापर मी मनसोक्त ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी करतो ! ;)
प्लीज प्लीज प्लीज... माझे हे स्वप्न खरं होण्यासाठी प्रार्थना करा बरं का... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX
8 Oct 2014 - 5:58 pm | हरकाम्या
कुठल्या देवाची प्रार्थना करु.....?
9 Oct 2014 - 5:14 am | खटपट्या
नशीब सनी लिओने नाही येत स्वप्नात :)
9 Oct 2014 - 1:34 pm | मदनबाण
नशीब सनी लिओने नाही येत स्वप्नात
नको नको ! *LOL* { दोनदा नको नको हे उच्चारण पाखरांकडुन सध्या उधार घेतले आहे,एकदा नको म्हणणारा पाखरु जीव दुर्मीळ ;) }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15
9 Oct 2014 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर
जीनके दिन खराब चल रहे होते है, उनके सपनेमें सनी लियॉनभी साडी पहन कर आती है।
9 Oct 2014 - 4:15 pm | मदनबाण
जीनके दिन खराब चल रहे होते है, उनके सपनेमें सनी लियॉनभी साडी पहन कर आती है।
*LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15
9 Oct 2014 - 6:26 pm | टवाळ कार्टा
आजकाल सन्नी लिओनी स्वताचे कपडे घालून पिच्चर करायला लागली...आरं कुटं नेऊन ठिवलाय महाराश्ट्र माजा :(
8 Oct 2014 - 4:02 pm | कपिलमुनी
इंसेप्शन बघा ;)
8 Oct 2014 - 6:07 pm | आनन्दा
मनाचे अद्भुत खेळ हे नक्कीच. स्वप्नांवरून तुमच्या मनातील सुप्त भावना कळतात. ज्याचा मानसोपचारात खूप उपयोग होऊ शकतो..
8 Oct 2014 - 6:08 pm | आनन्दा
मला देखील आपण ईंजिनिअरिंगच्या व्हायवाला निघालोय आणि आपण जर्नल लिहिलेच नाहियेत असे एक स्वप्न नेहमी पडते..
8 Oct 2014 - 6:26 pm | रेवती
क्लासट्रोफोबिआ असल्याने मलाही काय काय स्वप्ने पडत असतात. पूर आल्याची स्वप्ने खूप वर्षांपासून पडत आहेत. खरा पूर येऊन गेला तरी ती बंद झाली नाहीत.
9 Oct 2014 - 12:31 am | काउबॉय
बाळगणार्या व्यक्तीना गढूळ पाणी दिसणारी स्वप्ने जास्त पडतात असे माझे विविध व्यक्ति बाबत निरिक्षण आहे. आपण क्लासट्रोफोबिआ आहे असे आधीच सांगितले आहे म्हणून मी हे लिहित नाहिये. Its a generic statement.
9 Oct 2014 - 12:34 am | रेवती
माझ्या नवर्यानं जर हा तुमचा प्रतिसाद वाचला तर तो नक्की म्हणेल, "बघ, मी हेच म्हणतोय!" :)
8 Oct 2014 - 6:52 pm | नानासाहेब नेफळे
स्वप्नांना काही अर्थ नसतो, स्वप्न हे मेंदुतील इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेमुळे दिसतात.
9 Oct 2014 - 12:35 am | काउबॉय
सगळ्याच गोष्टी मेंदुतील इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेमुळेच घडताना /अनुभवताना दिसतात. ती थांबली तर.... विलासराव म्हणतात तसे स्वप्नातून कायमचे जागे व्हायची पाळी येइल.
9 Oct 2014 - 1:23 pm | नानासाहेब नेफळे
स्वप्नांना अर्थ नसतो, परंतु स्वप्नांच्या हेतुविषयी माहिती सापडली .थ्रीट सिम्युलेशन थेअरी असे त्याचे नाव आहे.
http://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/15766897/
8 Oct 2014 - 7:07 pm | जेपी
रोचक धागा. मला माझ्या आयुष्यात घडणार्या शुभाशुभ घटनेबद्दल बर्याच वेळेस पुर्वसुचना मिळतात. अर्थात जे घडणार आहे ते टाळता आल नाही. सविस्तर प्रतिसाद उदाहरणासकट देईन.
8 Oct 2014 - 10:25 pm | माम्लेदारचा पन्खा
आन्दो....
8 Oct 2014 - 7:11 pm | सूड
स्वप्नात सापासारखे विषारी प्राणी सतत दिसत असतात. विहीरी, अंधार, एखादं जुनं घर, मूर्ती उध्वस्त करुन ठेवलेलं देऊळ...हे व्हेरी कॉमन!! आताशा अर्थ लावणं पण सोडून दिलंय. ;)
8 Oct 2014 - 7:13 pm | बॅटमॅन
स्पांडुकथांचे वाचन अंमळ जास्त आहे काय हो सध्या ;)
8 Oct 2014 - 7:27 pm | सूड
स्पांडुकथा आता दोन तीन वर्षांपूर्वीच्या, हे कधीपासूनचं ते मला पण आठवत नाहीये.
8 Oct 2014 - 7:18 pm | जेपी
नाय नाय स्पांडु सोबत फिरणे जास्त होतय वरन आत्रुप्त आत्मा बी माग लागलेला आस्तो.
घ्या *wink*
8 Oct 2014 - 11:05 pm | vikramaditya
ज्या अपेक्षेने हा धागा लिहिलात, त्या अंगाने प्रतिसाद / अनुभव / वैज्ञानीक माहीती आली तर माहितीत खुपच भर पडेल.
8 Oct 2014 - 11:25 pm | आयुर्हित
हम तो भैया, घोडे बेचके सोते है!
यामुळे झोपेत स्वप्न कधीच पडत नाहीत.
परंतु जागेपणी स्वप्न बघतो व ते पूर्ण करण्यासाठीच जगतो!
8 Oct 2014 - 11:32 pm | भृशुंडी
जवळपास १-२ वर्षं स्वप्न जशी आठवतात तशी लिहून ठेवायचा प्रयत्न केला- एक चाळा म्हणून.
काही स्वप्न लख्ख आठवतात, काही अंधुक.
पण कधीही भविष्यदर्शक स्वप्न पडल्याचं स्मरत नाही. गाडी वगैरे चालवायला स्वप्नात शिकणं दूरच राहिलं.
9 Oct 2014 - 2:39 am | प्रभाकर पेठकर
आपण जेंव्हा झोपतो तेंव्हा शरीर कमीत कमी उर्जा वापरत असते. शरीराची अंतर्गत साफसफाई, झीज भरून काढणे वगैरे कामांना जोर आलेला असतो. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात.
आपल्या झोपेची आंदोलने ही जागृतावस्था ते खोल निद्रावस्था ह्या दोन स्थितींमध्ये होत असतात. खोल निद्रितावस्थेत एक REM (Rapid Eye Movement) अवस्था असते. म्हणजे बंद डोळ्यांची बुबुळे इथे-तिथे वेगाने हलत असतात. त्या वेळी प्रत्यक्षात आपण स्वप्न पाहात असतो. खोल निद्रितावस्थेत पडणारी स्वप्ने झोपेतून जागे झाल्यावर आठवत नाहीत पण निद्रा आंदोलनाच्या जागृतावस्थेकडील स्थितीत पडलेली स्वप्ने जागे झाल्यावरही आठवतात. सामान्यपणे एका स्वप्नांचा काळ हा वीस सेकंदांइतका असतो.
ही सर्व ऐकीव आणि वाचीव माहिती आहे.
9 Oct 2014 - 8:56 am | भिंगरी
. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात
म्हणूनच आपण त्यादिवशी विचारही न केलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात.आत्ता संपर्कात असलेल्या व्यक्ती आपल्या जुन्या घरात असलेल्या दिसतात.मात्र ते घर आता आपले नसते.किंवा लहाणपणीचे असते.
9 Oct 2014 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हवं ते स्वप्न सरावानी पाडुन सुद्धा घेता येतं. ज्यांना अजुन माहीती हवी असेल त्यांनी ल्युसिड ड्रीम असं आं.जा. वर शोधा.
9 Oct 2014 - 9:10 am | चौकटराजा
मी स्वप्न पडण्याच्या बाबतीत खंदा खेळाडू आहे.काही वेळेस मला पाच पाच स्वप्नेही आठवल्याचे घडले आहे. व मी त्याची रफ स्केचेसही काढली होती ! ( नाय थापा नाय बा !). मला तीन विषयांवरची स्वप्ने पूर्वी वारंवार पडली आहेत. प्रचंड पूर पाणी फोफावते पण मी एका अशा उंच जागी जाउ शकतो हिथे मी बुडत नाही. ही गोष्ट घडलेली ठिकाणे म्हणजे वाईजवळील धोम तसेच शिरवळ जवळील सारोळा पूल तसेच खंडाळ्याची अमृत्ता़जन ची पाटी. ( याचे मी कल्पलेले कारण - मला पोहता येत नाही याची मनाशी असलेली खंत व पोहायची हौस यात पडलेली दरी) .दुसरे स्वप्न असे की माझे एक एक करून सर्व दात ९ रिष्टर स्केल वर पडणे. ( मी कल्पलेले कारण- मी लहानपणी नीट दात घासले सते तर ? ची मनाला लागलेली टोचणी) तिसरे असे की मला पंखाशिवाय उडता येते. असे स्वप्न . त्यामुळे मी अगदी
मनसोक्त उड्डाणे केली आहेत.स्वर्गसे मी उपर. ( मी क्ल्पलेले कारण - मला फिरायची फार तहान आहे. पण माझ्याकडे
एक दुचाकी शिवाय काहीही नाही याची अंतर्मनाला असलेली जाणीव) बाकी कसबा पेठेत फूटपाथ वर उभा राहून मदनमोहन लता या कॉम्बोची गाणी एका जुन्या जमान्याच्या खिडकीत कुणीतरी शौकिन ऐकतो आहे व मी ही श्रवणास्वाद घेत आहे . शिवाजीनगर सोडल्यानंतर शेती महाविध्यालयाचे एक शेत आहे. त्या शेतात चाललेला ओ पी नय्यर यांच्या गीतांचा कार्यक्रम मी बांधावर फतकल मारून ऐकला आहे. विशेष अनुभव असा की या दोन्ही वेळेस जी फायडेलिटी मी
अनुभवली आहे तशी बोस च्या स्पीकरमधुनही येणे अशक्य आहे. बाकी दिवंगत वडिलांशी गप्पा मारणे, सचिनचा वाढदिवस
शारदाश्रम शाळेत चालू असताना मी तिथे असणे. सचिनशी गप्पा करणे . मोहन जोशी ( नट),राज ठाकरे यांच्या बरोबर गप्पा असे भन्नाट अनुभव घेतलेत. तसेच आपल्या उरावर बसून कोणीतरी आपला गळा दाबून आपल्या ठार करते आहे.
बायको प्रवासात हरवली. मोटार सायकलवरून फिरता कधीही वाट न सापडणार्या चक्रात अडकलो. असे अनुभव आहेत.
निष्कर्ष - अनोळखी व्यक्ती सहसा स्वपनात भॅटत नाहीत. काही वेळेस आपल्याला हवी असलेली पण न मिळणारी गोष्ट किंवा आपल्या मनातील टोचणी याचे बीज स्वप्नात आकार घेते. बहुदा आपल्याला माहित असलेलीच ठिकाणे नव्या
संरचनेसह अवतरतात. उदा सारोळा पूल, शारदाश्रम शाळा ही मी पाहिलेलीच ठिकाणे आहेत. प्रत्यक्षात पाहिलेल्या काश्मीर पेक्षाही स्वर्गीय काश्मीर मी स्वप्नात पाहिलेय. आमच्या कंपनीतील सर्वीस म्यानेजर व मार्केटिंग म्यानेजर यांचे जोरदार भांडणही स्वप्नात पाहिलेले आहे. अशी आहे स्वप्नसृष्टी.
9 Oct 2014 - 9:55 am | प्रभाकर पेठकर
>>>>बायको प्रवासात हरवली.
हेवा वाटतोय हो तुमचा.
9 Oct 2014 - 1:06 pm | बॅटमॅन
नशीब, काकू नैत मिपावर ते ;)
9 Oct 2014 - 1:07 pm | कपिलमुनी
>>>>बायको प्रवासात हरवली.
कसं जमवलं हो ? ;)
9 Oct 2014 - 4:25 pm | एस
काही झालं तरी स्वप्न ते स्वप्नच. ;-)
9 Oct 2014 - 9:15 am | भिंगरी
पण मी स्वप्नात नेहमी छान पोहते.आणि पोहण्याची जागाही नेहमी एकच दिसते.(माझ्या गावच्या नदीचे पात्र)
11 Oct 2014 - 5:16 pm | संचित
माझ्या स्वप्नात रोज पूर येतो आणि त्यात मी water sliding करत असतो :)
9 Oct 2014 - 10:48 am | स्पंदना
परवा सकाळी ऊठायला उशिर झाला, माझी कन्या खवळली म्हणाली का नाही उठलात? मी अगदी प्रांजळपणे सांगितल, स्वप्नात गाडी हरवली होती. उठले असते तर सापडणार नाही म्हणुन उठले नाही.
9 Oct 2014 - 1:01 pm | जिन्क्स
थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो...
मला बर्याच वेळेला मी नग्न अवस्थेत मोठ्या पार्टी/ समारंभाला गेलो आहे अशी स्वप्नं पडतात. त्या पार्टी/ समारंभाला सगळे माझे ओळखिचे लोक असतात (मित्र/नातेवाइक वगैरे). जेंव्हा कळते की हे एक स्वप्न होतं तेंव्हा खूप खूप बरं वाटतं. पण तरी मी दुसर्या दिवशी काही काळ खजील होउन वावरत असतो. काय कारण असेल अशा विचित्र स्वप्नाचे??
9 Oct 2014 - 1:06 pm | विलासराव
कदाचीत ज्या जन्मात मनुष्यजात नग्न अवस्थेत वावरत होती त्या जन्मातील संस्कार मेंदुतुन(खोल अंतर्मनातुन ) वर येत असतील.
9 Oct 2014 - 1:09 pm | आनन्दा
तुम्ही काही सिक्रेट लपवण्याचा प्रयत्न करत आहात का?
9 Oct 2014 - 1:18 pm | टवाळ कार्टा
स्वप्नात आरसा मिळाला तर चेक करा की तुम्ही charlie sheen नाहित =))
9 Oct 2014 - 1:58 pm | काउबॉय
क्लासिक =))
9 Oct 2014 - 2:06 pm | काउबॉय
आपण नोकरी शोधत आहात काय ?
अथवा तीव्रतेने जॉब शिफ्टिंगचा प्रयत्न चालु आहे काय ?
अथवा आपले कौशल्य/कल जे आहे त्याच्या संबंध नसलेला जॉब आपण करत आहात काय ?
एका वाक्यात जॉब सटिसफेक्षन आहे की बदल हवाय ?
9 Oct 2014 - 6:21 pm | _मनश्री_
माझे आजोबा एकोणीस वर्षांपूर्वी गेले .
पण अजूनही ते रोज माझ्या स्वप्नात येतात .
अस स्वप्न पडत कि ते जिवंतच होते हरवले होते स्मृती गेल्यामुळे घरी येऊ शकले नव्हते
आणि मला आणखी एक स्वप्न नेहमी पडत कि मी दोन भिंतींच्या मध्ये उभी आहे आणि त्या दोन्ही
भिंती वेगाने माझ्याजवळ येत आहेत आणि मी त्या भिंतींच्या मध्ये अडकणार पण तेवढ्यात जाग येते
9 Oct 2014 - 9:26 pm | प्रकाश घाटपांडे
काही लोक म्हणे ठरवून स्वप्न पाडतात.
10 Oct 2014 - 9:42 am | काउबॉय
हे हिप्नोटिज्म इतकेच वैज्ञानिक आहे. इन्सेप्शन याच संकल्पनेवर आधारित होता.
13 Oct 2014 - 12:06 am | पैसा
वाचायला मजा आली. खूप लहान मुलं दिवसभर जे खेळतात तेच स्वप्न पडल्याचं सांगतात. अगदी लहान बाळं झोपेत दूध पीत असल्यासारखे ओठ करतात. म्हणजे आपले जेवढे अनुभव असतात त्याच्याशी संबंधित अशीच स्वप्नं बरेचदा असतात. मला स्वप्नात लहानपणीचं घर आणि आताची माणसं असं खूपदा दिसतं.कधी कधी अत्यंत वाईट घटनांची पूर्वसूचना म्हणावी अशी स्वप्नं पडलेली आहेत. कार्यकारणभाव मात्र माहित नाही.
13 Oct 2014 - 9:49 am | चौकटराजा
स्वप्ने ही जास्त विचार करणार्याना पडतात. स्वप्ने ही अगदी गाढ झोप येणार्याना पडत नाहीत.कित्येक वेळा मला असा अनुभव आलेला आहे की मंगल प्रभात कार्यक्रमात वाजणारे भक्तीगीत ज्यावेळी चालू असते त्यावेळी तेच गायक स्वप्नात
गाणे गाताना दिसतात. उदा बाबुजींचे समाधी साधन संजीवन नाम हे गीत चालू असताना ते कोठेतरी पिंपळाच्या पारावर बसून गाताहेत असे स्वप्नात दिसू शकते. यावेळी आपल्याला जाग येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने अशी वास्तव व कल्पना यांची सरमिसळ होत असावी. " आणि मी जागा झालो !!!! " असा स्वप्नांचा बर्याच वेळा शेवट असतो.
14 Oct 2014 - 2:04 am | प्रभाकर पेठकर
गाढ निद्रावस्था आणि जागृतावस्था ह्यांच्या आंदोलनात गाढ झोपेतील स्वप्ने आठवत नाहीत. जागृतावस्थेजवळील स्थितीतील स्वप्ने आठवतात.