अठरावा दिवस:
एक दिवस आधी आल्यामुळे आज धारचुल्यातच आरामाचा मुक्काम. पहाटे उठण्याची घाई नव्हती, पाठीवर सॅक घेऊन चालायचेही नव्हते. सारे आरामात आवरून ९-३० वाजता नाश्ता करून नेपाळला गेलो. म्हणजे भारत-नेपाळ यांना जोडणारा कालीमैय्यावरील झुलता पूल पार करून नेपाळच्या धारचुला येथे गेलो. नेपाळी धारचुला गरीब दिसला, व्यापारीही फारसे उत्साही वाटले नाहीत. बाजारात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खूप होत्या, पण त्यांची गॅरंटी नसते. कुठल्याही वस्तूची किंमत विचारली की ते सांगत अमुक इंडियन रुपीज्. कारण नेपाळी रुपयाची किंमत भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. आपल्या जवळ नेपाळी रुपये असावेत म्हणून आपले दहा रुपये देऊन नेपाळी पंधरा रुपये घेतले. दहा रुपयाची एक आणि पाच रुपयाची एक अशा नोटा घेतल्या. ह्यांनी खुखरी नावाच्या नेपाळी सिगारेटचे पाकिट घेतले. मग हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहणार्या रंगीत चादरी घेतल्या कुटुंबातील प्रत्येकाला देण्यासाठी. चादरी चांगल्या निघाल्या, रंगही गेला नाही. आणि खरंच त्या हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड असतात. चादरी खरेदीत आमची फसवणूक झाली नाही. तिथे छान पिकलेली फळे प्लम मिळाली. गोड होती. बाजारात वेगळेच मश्रूम बघायला मिळाले, मोठे मोठे गुच्छ असतात फुलांसारखे मश्रूमचे. थोडावेळ फिरुन परत भारतात परतलो. आम्हीही आता फॉरेन रिटर्न झालो बरं का!
दुपारी भोजनप्रसादानंतर विश्रांती घेतली. अठरा दिवसांनी टी.व्ही.पाहिला. निगमच्या दुकानातून कैलासमानस यात्रेची सी.डी., ॐ नमःशिवाय मंत्रधून असलेली कॅसेट, उत्तराखंडची फ्लोरा अॅण्ड फॉना आणि पर्यटन अशी दोन पुस्तके, ॐ पर्वत, आदिकैलास, पांडव पर्वत, पार्वती मुकुट पर्वत यांचे मोठे फोटो विकत घेतले. संध्याकाळी भारताचा धारचुला बघायला गेलो. तीन दिवसांच्या पावसाने सगळीकडे चिखल झाला होता, रस्ता उखडला होता. टिपीकल भारतीय गाव आहे धारचुला. हुतात्मा स्मारक पाहिले. इतका स्वच्छ सुंदर हिमालय या गावाच्या पाठीशी उभा आहे पण इथे? स्वच्छ हिमालयाचा गचाळ पायथा.
----------------------------
एकोणिसावा दिवस:
आज चंपावतला मुक्कामाला जायचे होते. तीन जीप होत्या प्रवासासाठी. पिठोरागढ या जिल्हा मुख्यालयाच्या शहरापर्यंत सारा मार्ग घाटाचा आहे. पावसाने ठिकठिकाणी लॅण्डस्लाइड झालेले होते, रस्ता काही ठिकाणी खचला होता. निसर्गसौंदर्य अगदी बद्रीकेदार सारखे. वाटेत लागणार्या गावा-गावांत मागील तीन दिवसांत झालेल्या निसर्ग प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. पडलेल्या घराची कुठे डागडुजी चालली होती तर कुठे शेतात आलेला गाळ काढून समतल करणे चालले होते. सगळीकडे अपार कष्ट करणारे गावकरी दिसत होते, इतके गरीब, कष्टाळू तरीही हसतमुख. पिठोरागढच्या निगमच्या रिसॉर्ट मध्ये दुपारचे भोजन घेतले.
लोहाघाटजवळ एका टेकडीवर मायावती आश्रम आहे. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने त्यांचे शिष्य श्री. व सौ. सेवियर या इंग्लिश जोडप्याने स्थापन केलेला अद्वैत आश्रम आहे. या आश्रमात १९०१ मध्ये स्वतः स्वामी विवेकानंद १५ दिवस राहिले होते. अद्वैत आश्रम असल्याने इथे कुठलीही मूर्ती नाही. ज्या खोलीत स्वामीजी राहिले होते तिथे फक्त अगरबत्ती लावून ध्यान-धारणा करतात. सध्याचे स्वामी मुमुक्षानंद ७६ वर्षांचे आहेत. सुंदर बगिचा, नीरव शांतता, हिमशिखरांचे अद्वैत दर्शन होत असते. आश्रमातर्फे एक १०० बेडचे रुग्णालय चालवले जाते. सर्व प्रकारच्या तपासण्या येथे होतात. उत्तम ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, सी. टी. स्कॅन आहे. सर्व आजारांवर गरीबांसाठी मोफत उपचार केले जातात. बाकीच्यांना माफक दरात सर्व सुविधा मिळतात. आश्रमात संस्कृतच्या अभ्यासासाठी बरेच परदेशी विद्यार्थी राहतात.
संध्याकाळी पाच वाजता चंपावतला पोहोचलो. हे रिसोर्टही सुंदर आहे. फ्रेश होऊन गावात असलेले १२०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर पाहण्यासाठी गेलो. मंदिराचे कोरीव काम फार सुंदर आहे. शिवपिंडी भव्य आहे.
-----------------------------
विसावा दिवस:
सकाळी ७ वाजता जीपगाड्या निघाल्या. ९-३० ला घाट संपवून टणकपूरला आलो. इथल्या रिसॉर्टमध्ये नाश्ता केला. टणकपूर हे रेल्वे जंक्शन आहे. नेपाळी धारचुल्यातील लोकांना राजधानी काठमांडूला जायचे असेल तर याच टणकपूर जंक्शनवररून गोरखपूरमार्गे जावे लागते. १०-३० वाजता टणकपूर सोडले. हिमालयाची साथ सुटली. उन्हाळा जाणवू लागला. दुपारी १-३० ला रुद्रपूरला आलो. निगमच्या हॉटेलमध्ये भोजनप्रसाद घेतला. निगमचे गाईड श्री.पांडेजी यांचा निरोप घेतला. ते येथूनच नैनितालला त्यांच्या ऑफिसला जाणार होते. ते नैनिताललाच राहतात. जीप सोडून बसमध्ये बसलो. संध्याकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचलो. एकमेकांचा निरोप घेतला. मराठी सहयात्रेकरुंची गाडी उद्याची आहे म्हणून सर्वांना आमच्या मुलीच्या घरी घेऊन गेलो. ती आम्हाला घेण्यासाठी आली होतीच. एक न विसरता येणारी अनुभवयात्रा संपन्न झाली.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३.
------------------
प्रतिक्रिया
10 Sep 2014 - 8:05 pm | एस
एकूणच लेखमालिका आवडली. अगदी तुमच्यासमोर बसून तुमच्याशी बोलतोय, तुमच्या गप्पा ऐकतोय असे वाटत होते. लेखनशैली साधी आणि थेट भिडणारी. ह्यावेळी तुम्ही मोठे भाग टाकलेत त्याबद्दल आभार!
मिपावर आवर्जून लिहीत रहा! इथला निरागसपणा किंचित हरवत चाललाय कुठेतरी...
11 Sep 2014 - 4:50 pm | खुशि
आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथयात्रांमधील अनुभव लिहावे असा विचारअआहे.
10 Sep 2014 - 11:32 pm | कवितानागेश
सर्व भागांच्या लिन्क्स दिल्या आहेत.
पुन्हा एकदा सांगावसं वाटतय, तुम्ही फार श्रीमंत आहात खुशिताई. :)
11 Sep 2014 - 4:46 pm | खुशि
तुम्हा सर्वाना आवडले फार फारच छान वाटले.फोटो तुम्ही टाकले का?चम्पावतचे मंदिर आणि अद्वैतआश्रम आता आतापर्यंत केलेल्या अमरनाथ यात्रा.बद्दल लिहिणारअआहे.
11 Sep 2014 - 5:42 am | स्पंदना
माऊशी सहमत.
अतिशय श्रीमंत!!
तुमच्या सहल कथनामुळे पुर्वी लोक यात्रीला का जायचे ते थोडफार उमगतय.
आता कोठेही अश्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना निदान थोडीफार पायी यात्रा करावी अशी मनात उर्मी जाणवतेय. तो अनुभव कीती संपन्न करुन जाईल याची कल्पना येते आहे.
11 Sep 2014 - 9:23 am | कंजूस
अप्रतिम! लेख आणा फोटो छानच .आता तमिळनाडची चैनई ते मदुराई रामेश्वर यात्रा करा आणि लिहा.
13 Sep 2014 - 1:58 pm | सविता००१
तुम्ही लिहा हो खुशिताई. फार सुरेख वाटतं
14 Sep 2014 - 9:53 am | कंजूस
पिकासाच्या एक दोन फोटोंच्या लिंक कॉपी करता आल्या तर व्यनी करा. काम सोपे आहे.
14 Sep 2014 - 10:16 am | पैसा
छान यात्रा आणि तिचं साधं सरळ वर्णन. आवडली मालिका.