आज सोसा-नारायण आश्रम मार्गे सिर्खा. अंतर १६ किमी. उंची ९००० फूट.
पहाटे ५-३० वाजता पराठे, बोर्नव्हिटा असा नाश्ता करुन चालायला सुरूवात केली. पांगूचा अवघड डोंगर उतरून खाली आलो, तर सोसाच्या डोंगराला जोडणारा नदीवरचा पूल पडला आहे असे दिसले. मराठी गाईड सुनील पित्रे आणि पांडेजी यांनी नदीचा उतार शोधला, आणि मग एकमेकांच्या आधाराने सर्वांनी नदी ओलांडली. घोड्यावरुन जाणारे लांबच्या रस्त्याने गेले होते. खरे म्हणजे घोडे गेले तो मोटार रस्ता आहे नारायण आश्रमापर्यंतचा, पण निगम वाहनाची व्यवस्था करत नाही म्हणून डोंगर चढून रस्त्यावर आलो. सोसासाठी पुन्हा डोंगर चढायचा किंवा रस्त्याने सोसा गाव टाळून सरळ नारायण आश्रमाला जायचे असे दोन पर्याय होते. रस्त्याने थोडे लांब पडणार होते, पण डोंगर चढण्याचा त्रास वाचणार होता म्हणून आम्ही रस्त्याने जायचा निर्णय घेतला. साडेदहा वाजता नारायण आश्रमात पोहोचलो.
नारायणस्वामी कर्नाटकातील मोठे इंजिनीयर होते. त्यांनी संन्यास घेतला होता. भारतभ्रमण करीत कैलासयात्रेच्या वेळी ते या कुमाऊं प्रदेशात आले असताना येथील कठीण जीवन, दारिद्र्य पाहून त्यांनी येथेच राहून येथील जनतेसाठी काम करायचे ठरवले. २६ मार्च १९३६ रोजी आश्रमाचा वास्तुमुहूर्त केला. मफतलाल हे प्रसिद्ध उद्योगपती त्यांच्या प्रमुख शिष्यमंडळींपैकी एक होते. त्यांनी या कामी खूप मदत केली. आश्रमांच्या सर्व इमारतींचा प्लॅन स्वतः नारायणस्वामींनी तयार केला आहे. लांबून लांबून दगड आणवले. पाथरवटांकडून चिरे तयार करवून घेतले. लाकडी इमारतीची रचना अशी केली आहे की बर्फ छतावर साठणार नाही, प्रकाश भरपूर येईल पण आतमध्ये थंडी अजिबात वाजणार नाही. हवा खेळती राहील. खिडक्यांची रचना तिहेरी आहे. बाहेर जाळी, मध्ये काच, आत लाकडी दार. बागबगीचा, ध्यानकेंद्र, अन्नपूर्णाभवन, राहण्याच्या खोल्या - सर्वच अप्रतिम आहे. येथे नेपाळी चित्रकाराने काढलेली नैसर्गिक जलरंगातील येशू ख्रिस्ताची दोन चित्रे आहेत. एका चित्रात येशू सुळावर उठून बसलेले आहेत. ही चित्रे शंभर वर्षांपूर्वीची आहेत. नारायणस्वामींच्या पूजेची चांदीची मूर्ती मफतलाल यांनी त्यांना दिलेली आहे.
नारायणस्वामींनी कुमाऊं भागात अनेक शाळा, कॉलेज, दवाखाने, हॉस्पिटल इत्यादी सुरू केली आहेत. सर्व संस्थांचा कारभार भक्तांनी दिलेल्या देणग्यांवर व्यवस्थित सुरु आहे. १९३६ ते १९५४ पर्यंत स्वतः नारायणस्वामी आपले प्रथम अनुयायी ईश्वरीदत्त पांडे यांच्या सहयोगाने पाहात असत. पण १९५४ मध्ये स्वामी अचानक कोणालाही न सांगता आश्रम सोडून निघून गेले. म्हणतात की फक्त सुती लंगोटी बांधून ते गंगा प्रदक्षिणा करत होते. व भिक्षांऽदेही करत होते. पुढे कळले की ९ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी ते कलकत्त्याच्या चित्तरंजनदास हॉस्पिटलमध्ये ब्रम्हलीन झाले.
सध्या आश्रमाचा कारभार श्रीमती द्रौपदीदेवी गर्ब्यांग या पाहतात. या माताजी पदवीधर असून त्यांचे शिक्षण दिदीहाट येथील कॉलेजमध्येच झालेले आहे. प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या आहेत माताजी. वृद्ध झाल्या असल्या तरी उत्साही आहेत. स्वतः आम्हाला सारा आश्रम दाखवला, चहापाणी केले.
नारायण आश्रमापासून सिर्खा ८ किमी आहे. रस्ता कठीणच आहे. चढ-उतार करत दुपारी दीड वाजता सिर्खा येथे मुक्कामी पोहोचलो. "ॐ नमः शिवाय" ने रसना देऊन स्वागत झाले. स्नानासाठी गरम पाणी मिळाले. मग स्नान, कपडे धुणे वगैरे करून भोजनप्रसादाचा आस्वाद घेतला. स्वादिष्ट पोळी-बटाट्याची भाजी, भरपूर सॅलड, गुलाबजामुन असा बेत होता.
थोड्या विश्रांतीनंतर आजूबाजूला हिंडून निसर्गसौंदर्य पहात गावकर्यांशी गप्पाटप्पा मारल्या. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी भरपूर साजूक तूप घातलेली आणि पापड-लोणचे असे भोजन करून दुलईमध्ये गुडूप झालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
1 Sep 2014 - 3:52 pm | कवितानागेश
आश्रमाचे वर्णन वाचून बघायची इच्छा होतेय.
1 Sep 2014 - 6:29 pm | खुशि
जरुर जा.दिल्लीहुन काठगोदाम एक्स्प्रेस किंवा बसने काठगोदाम येथे जाउन तिथुन बसने धारचुला येथे जावे तिथुन जीप मिळते.नेटवर सर्च करुन लेटेस्ट माहिती मिळू शकेल.मी पिकासावर कैलास यात्रेचे फोटॉ टाकले आहेत.
1 Sep 2014 - 11:15 pm | सस्नेह
थोडे मोठे भाग लिहा ना खुशिताई. तीन मिनिटात संपतं हे वाचून.
2 Sep 2014 - 4:14 pm | कविता१९७८
हो खरंच भाग थोडे मोठे लिहा, लेखन आवडतय.
2 Sep 2014 - 6:11 pm | खुशि
कविता, अग हेच टाइप करताना नाकात दम येतो, शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करत असते,पारिग्राफ करते पण तरिही प्रकाशित झाल्यावर सरळ एका मागोमागच लिहिले गेलेले असते,असे का होते काही समजत नाही.जमेल तसे लिहिते ग!तुम्ही इतक्या आपुलकीने वाचता म्हणून लिहावेसे वाटते.
3 Sep 2014 - 7:26 pm | एस
-----------------
तुम्हांला मराठीतून टंकलेखन सहाय्य इथे मिळेलः
http://www.misalpav.com/node/1312
बादवे ते भोजनप्रसादाच्या बेताचं वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले आहे! ;-)
(संमं - नंतर हा प्रतिसाद उडवा बरं का! ) :-)
3 Sep 2014 - 9:25 pm | पैसा
हे नारायण स्वामी म्हणजे मल्याळम लोक मंदिरे बांधतात तेच का?