मिपाकरांचे मंगळावर संमेलन

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 12:35 pm

मंगळावरील पहिले संमेलन आणि तेसुद्धा मिपाचे!

गेले काही दिवस श्री. प्रमोद देर्देकर ह्यांनी मिपाचे एक जागतिक संमेलन व्हावे, असा विचार मांडला. बराच ऊहापोह चालू होता. (गदारोळ हा शब्द मुद्दाम टाळला आहे. जुन्या, जाणत्या आणि नेणत्या मिपाकरांना माहीत आहे की मिपावर बर्‍याचदा गदारोळच होतो.) थोडीफार चर्चाही होतीच चालू. मीही दोनतीन ठिकाणांना अनुमोदन दिले. आपल्या पिताश्रींचे काय जाते, असे म्हणून गप्प बसलो होतो.

दसरा झाला आणि आम्ही थोडे मोकळे झालो. उगाच आपला टाईमपास करायला म्हणून प्रत्येक धागा उघडून मला योग्य वाटेल त्या ठिकाणी प्रतिसादही घालायला लागलो. एकमेकांना व्य.नि. आणि खरडवह्यांतून संदेशही द्यायला लागलो. रोजचे संदेश बघत असताना एक दिवस ‘नीलकांत’ ह्यांचा संदेश दिसला. त्यांना माझा मोबाईल नं. हवा होता. मी देऊन टाकला. कर नाही त्याला डर कशाला?

रात्री नीलकांत साहेबांचा फोन आला. म्हणाले, “मिपा संमेलन भरवायचे आहे. कुठेही भरवलेत तरी तुम्हाला चालेल असे वाटते. ह्या शनिवारी रात्री बैठक बोलावली आहे, तर ठाण्याला या.” मी ह्या साहेबांना प्रथमच भेटत होतो आणि तेही फोनवर. त्यामुळे वरील तीन वाक्यात हा मला कुठे गाडणार तर नाही ना? अशी शंका मनात आली. कारण मी ठिकाणाच्या मागे मुद्दामच लागलो होतो.

“मुंबईकरांना आणि ठाणेकरांना डोंबिवली तर दूर वाटतेच, पण कल्याणकरांनाही ती दूर वाटते” हा अनुभव दोन वेळा घेऊन झाला होता. जळगाव, भुसावळ वगैरे खानदेशी भागात राहणारे मिपाकर मराठवाड्याला बरोबर घेऊन आणि प्रसंगी विदर्भातल्या माणसांशी हितगुज करून येतील ह्याची जेवढी खातरी होती, तितकाच ठाम विश्वास पुणेकरांच्या बाबतीतही होता की, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील माणसे निव्वळ कट्ट्यासाठी एकमेकांची हद्द ओलांडणार नाहीत.

महाराष्ट्राबाहेरील मिपाकरांना कुठलेही ठिकाण चालणार होते, पण अनिवासी भारतीयांचा भर मुंबई आणि पुणे ह्यांच्यावरच असणार, हे गृहीत होते. अनिवासी भारतीय (अ.भा.) जास्तीत जास्त गोव्याला यायला तयार होतील, असाही एक अंधुक अंदाज होता. त्यामुळे हा धागा बहुधा लुप्त होणार, असे वाटत होते.

मी जरी संघाचा नसलो, तरी बैठक ह्या शब्दाला तसा घाबरतोच. बहुधा असे नक्की काहीतरी झाले असावे की जेणेकरून त्यांनी बैठक बोलावली. बरे, बोलावली तर बोलावली आणि तीही ठाण्याला, म्हटल्यावर माझी जरा तंतरलीच की हो. पण आता खुद्द मालकांनीच बोलावल्यावर जाणे भागच होते.
बैठकीला वेळेवर गेलो. रात्री ८ वाजताची आणि तीही शनिवारी असल्याने अर्धांग जरा कुरकुरत होते. पण तिला गजरा घ्यायचे वचन दिले आणि ठाण्याला ९ वाजता पोहोचलो. रामदासांकडेच बैठक असल्याने मंडळी हळूहळू जमा झाली. रात्री १० वाजता नीलकांतशेठ अवतरले आणि मिपाच्या टाइमप्रमाणे बैठक वेळेवर सुरू झाली. तोपर्यंत रामदासकाकांनी त्यांचा पी.सी. ऑन केला आणि स्काईप, याहू, फेसबूक आणि मिपा यांच्या साहाय्याने जगभरातील मिपाकर एकत्र आले. रोज एकमेकांशी चर्चा करणारे आणि वेळप्रसंगी एकमेकांना चिडवणारे मिपाकर हेच का? असा प्रश्र्न मला पडला नसता तरच नवल.

बैठकीला सुरुवात तर झाली आणि मिपाकरांचे संमेलन व्हावे ही प्रमोद ह्यांची इच्छा सगळ्या मिपाकरांनी लगोलग एकमताने मंजूर केली.

पण मला ज्याची खातरी होती, तसेच झाले. ठिकाण काही नक्की होईना. अमेरिकावासी मिपा संमेलन अमेरिकेत करायला तयार होते, पण त्यांना फक्त मिपाकरच हवे होते. माबोकर नको होते. शिवाय ह्या निमित्ताने सासू आपल्या घरी कायमची राहायला येते की काय? असा सूनबाईलाही प्रश्न पडला होता. जास्तीत जास्त ते मीमकरांना स्वीकारायला तयार होते. सुंठीवाचून खोकला गेलेला पाहून सुनेने सोडलेला सुस्कारा सगळ्यांना ऐकू गेला.

गल्फमध्ये काम करणारे फारच कमी असल्याने त्यांना अशी काही अडचण नव्हती. पण त्यांना मनुष्यबळ फारच कमी पडत होते. तरीही प्रभाकर पेठकरांनी ‘ओमान’चा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या हॉटेलमधला स्टाफ ते द्यायला तयारही झाले. नेहमीप्रमाणे अमेरिकेच्या स्वातंत्र्यावर गदा येणार, अशी शंका कुणीतरी उपस्थित केली आणि बुरखा कंपल्सरी असल्याने स्त्रीवर्गाने ओमानला मान डोलावली नाही. कधी नव्हे ते पुरुषवर्गानेही स्त्रियांच्या ह्या इच्छेला मूक संमती लगेच दिली.

आफ्रिकेत जायला कुणीच तयार नसल्याने, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडवासीयांना संधी दिली गेली. अपर्णाताई तयार होत्या, पण तिथेही जास्त मिपाकर राहत नसल्याने त्यांना खूप काम पडेल, अशी शंका पैसाताईंनी व्यक्त केली. त्यांच्या सूनबाईने लगेच नाक मुरडले. सूनबाईने हळूच उच्चारलेले “सुनेची नाही चिंता आणि परगावच्या बाईची मात्र काळजी” हे वाक्य सगळ्यांनाच ऐकू गेले. सासू अशा वेळी जे करते, तेच पैसाताईंनी केले... म्हणजे सरळसरळ दुर्लक्ष केले. आपण स्कायपीवर आहोत, हे सून जरी विसरली तरी सासू विसरली नव्हती. मग आता युरोपचे कुणी आहेत का असे विचारताच, निनाद जर्मनीत संमेलन भरवायला तायार झाला. स्वतः शेफ असल्याने त्याने सगळी सोय करायची जबाबदारीही घेतली. पण “त्याच वेळी जर्मनीत बियर समारंभही आहे” म्हणाला. मिपाकरांवर नीलकांत साहेबांचा जास्त विश्वास असल्याने त्यांनी आपल्या अधिकारात जर्मनीला नकार दिला. (संमेलनाच्या निमित्ताने हे मिपाकर कुठे कुठे गायब होतील आणि बियर पीत बसतील, अशी रास्त शंका त्यांनी किसन शिंदे ह्यांच्याकडे बोलून दाखवली. किसनही म्हणाले, “आपल्या दोघांतच संमेलन व्हायचे. त्यापेक्षा नकोच ते जर्मनी.”)

मग चित्रगुप्त म्हणाले, “ठीक आहे. या पॅरिसला.” पॅरिस म्हटल्याबरोब्बर स्त्रीवर्गाने एकमुखाने “नाही” म्हणून सांगितले. अगदी सास्वा-सुनांसकट. तसे पुरुषांनाही पॅरिस नकोच होते. (इतकी वर्षे तिथे राहूनही चित्रगुप्तांना मॉडेल म्हणून एकसुद्धा मिळाली नाही, तर एक/दोन दिवसात आपले काय होणार? अशी शंका परा यांनी आदीला बोलून दाखवली. त्यामुळे पॅरिसही बारगळले.)

शेवटी सुधीर ह्यांचा लेख वाचल्यामुळे गविंनी श्रीलंकेचा विषय मांडला. तो नक्की होणार, इतक्यात मुवि म्हणाले, “श्रीलंका ठीक आहे. पण पासपोर्ट कुठे आहे?” अशा प्रकारे मिपावरील असंख्य धाग्यांचे जे होते, तेच झाले आणि पासपोर्ट नसल्याने श्रीलंकाही बारगळले.

आता पुढे काय? असा प्रश्न डोळ्यासमोर आला न आला तोच, बिरुटे सर म्हणाले, “आता असे एखादे ठिकाण पाहिजे की जिथे पासपोर्टची आवश्यकता नाही आणि माझ्या अंदाजाने चंद्र ठीक होईल.” लगेच इरसाल म्हणाले, “त्या चंद्रावर जाऊन उड्या मारण्यापेक्षा इथेच काय ते उड्या मारू.” बिरुटे सरांच्या बोलण्यानंतर विजूभाऊ बोलले नसते तर नवलच. मग विजूभाऊ म्हणाले, “चंद्राचे गुरुत्वाकर्षण फार कमी असल्याने आपण मंगळावर गेलो तर?” विजूभाऊंच्या ह्या सूचनेमागे फार मोठा विचार होता. कारण मंगळ हा ग्रह प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. शिवाय नुकतेच अमेरिकेने मंगळावरचा अभ्यास जवळजवळ पूर्ण केला होता आणि त्यांना आता मंगळावर जाण्यासाठी स्वयंसेवक हवे होतेच. (आणि स्वयंसेवकाचे नाव काढल्याबरोबर मुद्दामहून काहीतरी गहन विचार करणारे आपोआप बाजूला झाले.)

शिवाय ‘मेन आर फ्रॉम मार्स’ ह्या पुस्तकाप्रमाणे कदाचित आपल्याला आपले पूर्वजही मिळतील. स्त्रीवर्गही असे समजल्याबरोब्बर राजी झाला. पृथ्वीवर गदारोळ माजवणार्याो ह्या पुरुषवर्गाच्या मूळ पुरुषांचे बौद्धिक घ्यायचा चानस त्यांनाही हवा होताच.

अशा रीतीने ‘मंगळावर’ मिपा संमेलन भरवायचे ठरले. लगोलग संपादक मंडळातर्फे वल्ली ह्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आणि पहाटे पाच वाजता बैठक संपली.

सकाळी १० वाजता वल्ली ह्यांना संदेश मिळाला की राष्ट्रपतींनी तातडीची बैठक आयोजित केली आहे. दुपारी दोनचे विमान पकडून (त्या वेळी हजर असलेल्या संपादक मडळींपैकी फक्त रामदासच हजर होते.) त्यामुळे त्यांना घेऊन वल्ली दिल्लीला गेले.

संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती भवनात बैठक सुरू झाली.
सर्वप्रथम राष्ट्रपतींनी मिपाचे आभार मानले. हिमयुगापासून ते क्रिकेटयुगापर्यंत मिपावर चालणार्याज सगळ्या चर्चा संसद वाचते आणि त्याप्रमाणे देश कसा चालवायचा हेसुद्धा ठरवले जाते, असे त्यांनी सांगितले आणि अमेरिका सगळी मदत करायला तयार आहे, उद्यापासून अमेरिकन वकिलातीत जाऊन तयारी सुरू करा, असेही सांगितले.

आता ह्या २/४ ओळीच जर सांगायच्या होत्या, तर दिल्लीला कशाला बोलावले? असा प्रश्न वल्लींना पडला. पण रामदास म्हणाले, “अरे तीही धोरणे असतात. एकोळी धागे मिपावर चालत नाहीत म्हणून लोक काय काय मज्जा करतात, ते माहीत आहे ना? तसेच इथेही.”

दुसर्याि दिवशी संपादक मंडळ अमेरिकन दूतावासात गेले. दहाची वेळ होती, तरी मिपा स्टँडर्ड टाइमप्रमाणे ते वेळेत, म्हणजे बारा वाजता पोहोचले. त्यांना गेल्यागेल्या प्रवेश मिळाला, हे पाहून बर्याोच लोकांचा जळफळाट झाला. काही लोक गेले २/३ दिवस ताटकळत होते, त्यांचा चेहरा फार केविलवाणा झाला होता. मिपाकरांना फार लवकर प्रवेश मिळतो, असाही काही परप्रांतीय मंडळींचा समज झाला. ते लगेच मराठी शिकायच्या मागे लागणार होते. पण नुसते मराठी शिकून चालणार नव्हते, तर त्याचबरोबर, मिपा सदस्यत्वही आवश्यक होते आणि ते लवकर मिळायलाही भाग्य लागते, हे समजल्यावर त्या परप्रांतीयांचे मराठी-प्रेम कमी झाले.

दहा मिनिटातच अमेरिकन दूतावासातील काम संपले. त्यांनी यानाची चावी दिली आणि जुहूच्या हेलिपॅडमध्ये सूट आणि यान दोन्ही मिळेल, असे सांगितले. यानीची चावी मात्र त्यांनी गवि ह्यांच्याचकडे दिली. अमेरिकेत गविंचे लेख प्रसिद्ध आहेतच, पण नासाच्या प्रशिक्षण योजनेतदेखील त्यांचा सहभाग आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आता वेळ फार कमी असल्याने स्पाने लगोलग मिपा वर धागा काढला. ‘मंगळावर मिपा संमेलन’ ३ नोव्हेंबरला होणार. २ तारखेला मुंबईहून यान निघणार. प्रवेश मर्यादित. त्वरा करा.’ आणि प्रतिसादांचा ओघ लगेच सुरू झाला. अमेरिकेने यान तर दिले होते, पण इंधनाची सोय नव्हती. त्यामुळे इंधनाचा शोध घ्यायला एक तांत्रिक समिती नेमण्यात आली. सोत्री ह्यांचे ज्वलनशील इंधनावरील ज्ञान पाहून त्यांना ह्या समितीचे अध्यक्षपद मिळाले. विविध इंधनांच्या अभ्यासासाठी आणि स्वतःवर प्रयोग करून घेण्यासाठी बरेच स्वयंसेवक तयार झाले. मीही लगेच हात वर केला. एकाच बैठकीत ब्रिटिश यांनी लोकल इंधनाचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. हिंदुस्थानात फार पूर्वीपासूनच द्रव इंधनाची परंपरा आहे, हेच ह्यातून सिद्ध झाले.

तोपर्यंत बिरुटे सर आणि क्लिंटन यांनी मंगळाची माहिती काढायला सुरुवात केली. चित्रगुप्त यांनी यानाच्या रंगरंगोटीला लगेच सुरुवात केली. ह्या वेळी त्यांना मॉडेल म्हणून दिवाळीत आम जनता जे रॉकेट वापरते, ते दिले गेले. प्रथम फडणीस आणि स्पा यांनी यानाच्या स्पेयर पार्ट्सची माहिती आणि जमवाजमव सुरू केली. गवि ह्यांनी १/२ क्षणांतच यान कसे चालवायचे ह्याचे प्रशिक्षण घेतले आणि लगेच ते ‘यानांचे अपघात’ लिहायला बसले. मंगळावर पृथ्वीवासीय प्रथमच जाणार असल्याने त्यांनी दिशा दाखवायला म्हणून भटक्या खेडवाला आणि श्रीरंग जोशी ह्यांना मदतीला घेतले.

केवळ २५/३० जागा उपलब्ध असल्याने जे रेग्युलर प्रतिसाद देतात आणि धागा काढतात, त्यांनाच न्यायचे नक्की झाले. वाचनमात्र मिपाकरांना नकारघंटा देण्यात आली. (इथे नम्रपणे नकारघंटा देण्यात आली, असेच लिहायला संपादकांनी सांगितले.) बरेचसे मिपाकर ह्या ना त्या धाग्याच्या रूपाने एकमेकांशी बांधले गेले होते. कोणाशी कोणाचे जमते, हे त्यांना एकमेकांना माहीत नसले तरी संपादक मंडळींना ठाऊक होतेच. प्रत्येकाच्या नाड्या ते ओळखून होते. शेवटी खालील नावे नक्की झाली. स्त्रियांनी ह्या वेळी खानपान सेवेत मदत करू नये, असे ठरले. स्त्रीवर्ग खूश झाला. रोज २५/३० माणसांचा स्वैपाक कोण करणार? आणि तोही तिन्ही त्रिकाळ? सुंठीवाचून खोकला गेला म्हणून स्त्रीवर्ग खूश झाला.

गणपा, दीपक कुवैत, निनाद आणि प्रभाकर पेठकर खानपान सेवा... मदतनीस मुवि....

मी पाटा-वरवंटा आणि खलबत्ता न्यायला तयार झालो. पण कुणाच्यातरी डोक्यात खुनशी विचार आले तर? म्हणून संपादकांनी नाही म्हणून सांगितले. शेवटी मिक्सर आणि ओव्हन नेले. ओव्हनचा नक्की काय उपयोग करायचा, ह्यावर गणपा, दीपक आणि प्र.पे. ह्यांची बरीच चर्चा झाली. मी त्या वेळी इंधनाच्या अभ्यासवर्गाला नुसतीच हजेरी लावून आलो होतो. त्यामुळे मी चर्चेत भाग घेतला नाही. शेवटी अमेरिकेतून डबाबंद अन्न आणायचे आणि ऐन वेळी गरम करून द्यायचे, असे निनादने सांगितले आणि तसेच ठरले.

सोत्री, ब्रिटिश इंधनाची व्यवस्था.. मी इथेही मदतनीस म्हणून जाणार होतो, पण त्यांनी सूडला घेतले आणि माझ्यावर सूड उगवला. का, ते नंतर कधीतरी सांगेन. सध्या त्याच्यात आणि माझ्यात इंधन जात नाही. (सोत्री हलकट आहे. आता त्याच्या एकाही लेखाला प्रतिसाद देणार नाही, अशी मी मिपा प्रतिज्ञा घेतली आहे.)

प्यारे१, इरसाल, धन्या आणि परा ह्यांना हवामानाचा अंदाज घेऊन यानातील तापमान नियंत्रित करण्याचे काम दिले. यान जरी अमेरिकन असले, तरी प्रवासी मराठी असल्याने आतील तापमान नियंत्रित करणे जास्त गरजेचे होते.

पैसाताई, अपर्णा अक्षय, पूजा पवार ह्यांना स्त्रीवर्गाच्या प्रमुख म्हणून नेमण्यात आले. रेवतीआजींना प्रमुख सल्लागार म्हणून नेमण्यात आले. सानिका स्वप्नील, टक्कू आणि जयवीताईंनी खानपान सेवेला मदत लागली तर करायची, असे ठरले. हेमांगी के ह्यांना संपादकांनी खास आग्रह करून बोलावले होते. तेथे त्या मंगळावरील वैदिक परंपरांचा उदय आणि अस्त असा अभ्यास करणार होत्या. पण ऐनवेळी त्यांनी (हेमांगी के ह्यांनी) मंगळावरील भोंडल्याचा अस्त आणि हिंदुस्थानात त्याचा उदय हा विषय निवडला. त्यांना खरे तर मदतनिसाची गरज नव्हती, पण कोमलताईंनी त्यांना मदत करायचे ठरवले. अशी सगळी जमवाजमव सुरू असतानाच बिका ह्यांनी एक महत्वाची खबर आणली.

खबर अशी होती की, मिपाकरांना मंगळावर जायला भाग पाडावे, अशी अमेरिकेची इच्छा होती. मध्यंतरी मिपावर बर्यािपैकी चर्चेला असलेला राष्ट्रगीताचा धागा अमेरिकेत प्रसिद्ध झाला. अमेरिकेला ते काही आवडले नाही आणि मग त्यांनी तो प्रश्न युनोत मांडला. भारताने कानावर हात ठेवले. पण भारत कितीही खरे बोलला, तरी ‘सत्यमेव जयते’ हे अमेरिकेचे तत्त्व नसल्याने त्यांनी पाकिस्तानला विचारले. पाकिस्तानवाल्यांनी सांगितले की त्यांना आमच्याकडे पाठवा. कारण तसेही येत्या २०/२२ वर्षांत आम्ही तिकडे येतच आहोत. तर मग आत्ताच काय ते होऊन जाऊ दे.

शेवटी युनोत तडजोड झाली, की मिपाकरांना मंगळावर पाठवा. तिथून ते परत आले की बघू या.

ह्या संदेशाने मिपाकरांत अजून उत्साह संचारला (कुणी असे काही अस्मितेला धक्का लावण्याचे वक्तव्य केले की खरा मिपाकर पेटून उठतो.) आणि ते वेगाने कामाला लागले. ‘मोकलाया दाही दिशा’ हे मिपागीत म्हणून प्रसिद्ध आहेच. तेच गीत दररोज सकाळ संध्याकाळ वाजवण्यात आले.

इ.एक्का, जॅक डॅनियल ह्यांचे ऐनवेळी यायचे ठरले. चतुरंग ह्यांनीही बुद्धिबळाच्या सामन्यांचे वेळापत्रक बघून यायचे नक्की केले. नीलकांत ह्यांनी ऐनवेळी यायला नकार दिला. पहिलाच दिवाळसण असल्याने त्यांना इथे थांबणे भागच होते.

नक्की तारीख ठरली आणि सगळे मिपाकर एक दिवस आधीच जुहूला जमा झाले. प्रत्येकाने आपापले सूट चढवले अणि मग लक्षात आले की सगळे एकसारखेच दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापले चिन्ह ठरवून ते हेल्मेटला लावावे, असे ठरले.

लक्षात राहिलेली काही चिन्हे देत आहे.
पैसाताई = ह्यांनी तीन चिन्हे लावली होती. रुपया, डॉलर आणि होन.
कोमलताई = ह्यांनी त्या मिपावर जी स्मायली वापरतात, तेच चिन्ह म्हणून वापरले.
सोत्री = विविध ग्लासेस एकत्र करून त्यांचा फोटो काढला आणि तोच लावला.
चतुरंग = बुद्धिबळाचा पट.
चित्रगुप्त = कुंचला (आधी ते पॅरिसला राहणार्याा एका मॉडेलचे चिन्ह टाकणार होते, पण घरातून नकार मिळाला.)
अपर्णाताई = कांगारू.
पूजा पवार = पूजेचे तबक हेच चिन्ह म्हणून घेतले.
अत्रुप्त आत्मा = पूजेचे तबक ‘पूजा पवार’ ह्यांनी पळवल्याने बुवा थोडे नाराज होते, पण मग त्यांनी फुलांच्या रांगोळीचे चिन्ह निवडले. ‘पूजा पवार’ ह्यांनी जीभ दाखवून त्या चिन्हाबाबतीत मतप्रदर्शन केले. बुवांनी डो़के आपटत आहे असे दाखवले.
मुवि = बर्‍याच वेळ कुठले चिन्ह घ्यावे ते समजेना. शेवटी त्यांनी बायकोचा फोटो लावला.
जॅक डॅनियल = बरोबर... त्यांनी नागाचेच चिन्ह स्वीकारले होते. ते मंगळावरील सापांचा अभ्यास करायलाच आले होते.
इ.ए. = ह्यांनी बराच प्रवास केला असल्याने त्यांच्याकडे चिन्हांचा तोटा नव्हता. त्यांना काय करावे हा प्रश्न पडला.
त्यांनी बाजूच्याला विचारले, तर त्याने इ.ए.हेच चिन्ह लावा, म्हणून सांगितले. (हे असे योग्य आणि परखड मत पराशिवाय कोण व्यक्त करणार?)
वि.मे.= ह्यांना मिपाकर चांगलेच ओळखून आहेत. तुमचा लेख कसा झाला, हे त्यांच्या प्रतिसादावरून समजते. त्यांचा प्रतिसाद येऊ नये, म्हणून खरा मिपाकर लक्षपूर्वक लेख टाकतो. त्यांनी "?" हे चिन्ह स्वीकारले. (खरे तर त्यांना ते स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.)

सगळे जण स्वागतकक्षात जमल्यानंतर परत एकदा मोजणी करण्यात आली आणि २/३ तासांसाठी सर्व मिपाकरांना एका खोलीत बसवण्यात आले. चहापान आणि खाण्यापिण्याची सगळी सोय मिपाकरांनी स्वतःहून केली होती. सानिकाताईंनी दाबेली, तर मृणालिनीताईंनी मखाण्याची खीर आणली होती. तशी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आणली होती, तरीही ती कमीच पडली. बरे झाले आपण खानपान सेवेत नाही आहोत, असे नंतर सानिकाने मृणालिनीला सांगितले.

अगदी ठरलेल्या वेळेला यान लागले आणि धावपळ सुरू झाली. सोत्री आणि कं.ने इंधन भरायला घेतले. त्या वासाने बर्याकच लोकांचा पोटशूळ उठला. संपादक मंडळीने हळूहळू एकेकाला आसनस्थ होण्यास मदत केली.

सं.क्षी. आणि ओक ह्यांच्यामध्ये सुबोध खरे ह्यांना बसवले. खरे तर संक्षी आणि ओक ह्यांना बरेच विषय बोलायचे होते. अध्यात्मनाडी श्रेष्ठ की भविष्यनाडी श्रेष्ठ, ह्यांवर त्यांना बरीच चर्चा करायची होती.

सोत्री, ब्रिटिश आणि मी एके ठिकाणी बसलो. सोत्रींनी आम्हाला सुरा शास्त्र शिकवायचा वादा केला होता.

अत्रुप्त आत्मा आणि विजूभाऊंनी बिरुटे सरांबरोबर बसायचे ठरवले होतेच आणि तसेच घडले. पुण्यात जास्त स्थळे आहेत की संभाजीनगरमध्ये? ही चर्चा त्यांना करायची होती.

लेडीज फर्स्ट ह्या न्यायाने कॉकपिटजवळ आधी स्त्रियांची व्यवस्था करण्यात आली होती. पण नंतर त्यांना मध्यभागी बसवण्यात आले.

पूजा पवार, पैसाताई ह्यांच्यामध्ये अपर्णा अक्षय ह्यांना बसवण्यात आले. त्यांच्याकडे ह्या दोघींशी नीट बोलायची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडली.

हेमांगी के, रेवतीआज्जी आणि कोमल ह्या एकत्र बसल्या. तिघींचाही पुणे, डोंबिवली आणि अमेरिकेशी संबंध असल्याने त्यांच्या छान गप्पा झाल्या. हेमांगी के ह्यांनी फक्त दर वेळी हसून मान डोलावणेच पसंत केले. त्यांचे सगळे लक्ष फक्त पुस्तक वाचनातच होते.

पल्लवी मिंड ह्या मृणालिनी आणि सानिका स्वप्नील दोघींच्या मध्ये बसल्या होत्या. त्यामुळे पल्लवीताईंना स्वैपाकातील बर्याीच टिप्स मिळत होत्या.

गणपा, प्र.पे. (प्रभाकर पेठकर) आणि दीपक (कुवैत) एकत्र बसले होते. त्यांची खान-पान सेवेबाबत चर्चा हळू आवाजात सुरू होती.
जॅक डॅनियल, इ.ए. आणि वल्ली हे एकत्र बसले होते. प्रवास आणि साप ह्या विषयांवर तेही मस्त गप्पा मारत होते.
रामदासकाका, क्लिंटन आणि सर्वसाक्षी एकत्र बसून पुढील कार्यक्रम ठरवत होते.
प्यारे१, धन्या आणि इरसाल ह्यांच्या गप्पा खूपच रंगात आल्या होत्या. बॅटमॅनला वगळल्याने त्याचा थोडा जळफळाट झाला, पण त्याला स्पा, प्रथम फडणीस ह्यांच्याबरोबर बसवले. स्पा आणि प्रथमने बॅटमॅनला त्याच्या बाईकविषयी विचारायला सुरुवात केली आणि मग तोही खुलला.
चतुरंग, चित्रगुप्त आणि बिका एकत्रच बसले होते. त्या तिघांचे एकमेकांत छान पटले. चतुरंग साहेबांनी दोघांनाही बुद्धिबळाची थोडीफार दिक्षा दिली.
इकडे कॉकपिटमध्ये मात्र थोडी अडचण निर्माण झाली होती. गवि आणि श्रीरंग जोशी ह्यांनी यान चालकाची जबाबदारी घेतली होती. पण भटक्या खेडवाला यांच्याकडून ऐन वेळी चार्ट हरवला. पण त्यांनी सांगितले की त्यांना ट्रेकिंगचा दांडगा अनुभव असल्याने ते नीट नेतील.
यानाने उड्डाण केले आणि एका दिवसातच ते मंगळावर पोहोचले. शेवटी पहिल्या धारेचे महत्त्व औरच, असे ब्रिटिश म्हणाला ते खोटे नाही.

यान व्यवस्थित मंगळावर उतरले. सगळ्यांनी गवि आणि टीमचे अभिनंदन केले आणि त्यांना एकटे सोडून बाकी सगळे मंगळ बघायला निघाले. गविंनी आधी यानाची तपासणी केली आणि संपादक मंडळींना बोलावण्यासाठी मोबाईल काढला तर समजले की रेंज नाही. पण अशी हार मानतील ते गवि कसले? त्यांनी लगेच आपला लॅपटॉप काढला आणि संपादक मंडळींना मिपाच्या साहाय्याने व्य.नि. केला. संपादक मिपाबरोबर सतत संपर्कात असतात, हे त्यांना माहीत होते.

सं.मं. आली आणि समजले की इंधन टाकीला गळती झाल्यामुळे पुरेसे इंधन नाही.
आता मंगळावरच राहायला लागत आहे की काय? अस प्रश्न निर्माण झाला.
पण असे हार मारतील ते मिपाकर कसले? रामदासांनी लगेच सूत्रे आपल्या हातात घेतली. सोत्री आणि मं.ना इंधनाची भट्टी लावायला सांगितली. खानपान सेवाही त्यांच्या मदतीला दिली.
हेमांगी आणि टीमला ट्रेकिंगवाल्यांची सोबत दिली आणि सूचना केली की, आजूबाजूच्या वस्तीतून काही मिळत असेल तर बघा.
इ.ए. आणि जॅ.डी. पण त्यांच्यासोबत निघाले. त्यांना काही इजा होऊ नये, म्हणून डॉ. खरेसुद्धा त्यांच्यासोबत निघाले.

महिलावर्गाने खानपान सेवा आपल्या हातात घेतली. पूजा पवारला कांदे सोलताना त्रास होतो, म्हणून पैसाताईंनी स्वतः होऊन कांदे चिरायला घेतले. सास्वा-सुनांचे हे प्रेम बघून अपर्णाताई गहिवरल्या आणि तो लाईव्ह टेलीकास्ट लगेच मिपावर टाकला.

धन्या, बॅट्मॅन आणि इ मंडळी भूगर्भात काही मिळत आहे का, ते शोधायला गेली. ह्या सगळ्या मं.ना मिपा उत्खननाचा दांडगा अनुभव होता. दगड-धोंडे पालथे घालता घालता त्यांना एक झरा दिसला. त्यातून सप्तरंगी पाणी वहात होते. त्याच वेळी सुदैवाने संक्षी जवळच होते. ते ओकांचा डोळा चुकवून तिथे आले होते. त्यांनी तो चमकदार प्रवाह ओळखला आणि सांगितले की तो शाश्वत जलाचा स्रोत आहे. ते पाणी घेऊन ही मं. यानाजवळ आली.
इ.ए. आणि मं. इकडे तिकडे काही वन्य प्राणी वगैरे दिसत आहेत का, ते बघत होती. शोधता शोधता त्यांना बर्यावच मोठ्या संख्येने साप जमा झालेले दिसले. ते आपापसात काहीतरी बोलत होते आणि जेडॅकडे मान वेळावून बघत होते. एकाने शेपटीच्या साहाय्याने जॅडॅला बोलावले आणि म्हणाला,

"ओळखलेत का जेडी मला?
होतो मी एकदा आजारी पडलेला,
भुकेने झालेलो मी कासावीस,
त्रास देत होते मजला ते दुष्ट खवीस.
काय करावे काही सुचेना,
सुटत होता माझा धीर,
तेवढ्यात तुम्ही मला दिला एक उंदीर.
त्या उदरभरणाची आहे मला जाण,
नाद नाही करायचा, तुमच्यासाठी काहीपण "

जेडीला सर्पभाषा येते, हे मिपाकरांना नवीनच होते. पण सापांना बर्याोच गोष्टी ठाऊक असतात, हे जेडीला माहीत होते. शिवाय पृथ्वीवरील साप जर इथे येऊ शकतो, तर आपण परत पृथ्वीवर का नाही जाऊ शकणार? मग जेडीने त्यांना सगळी माहिती विचारली. इथे सगळे साप कळप करून राहतात, ही माहिती नवीनच होती. शिवाय ह्या सापांचाही एक प्रमुख होता. मग त्यालाच बरोबर घेऊन ही मं. यानापाशी आली.

यानापाशी भट्टी लावत असतानाच कुणालातरी एक गांडूळ दिसले. तो त्याला पकडायला जाणार, इतक्यात तो साप ओरडला, “अरे, त्याला हात लावू नका. इथे गांडूळ हा विषारी प्राणी आहे.”

हेमांगी के आणि इतर मं. वस्ती कुठे दिसत आहे का? ते शोधत होते. तिकडे त्यांना एका गुहेसारखे काहीतरी दिसले. आतून थोडा प्रकाशही येत होता. आत जाऊन बघितले तर तिथे बरीच कागदपत्रे पसरलेली दिसली. त्या कागदपत्रांमध्ये ओक साहेब बुडून गेले होते. त्यांनी सांगितले की, ही सगळी जुनी नाडीपद्धत आहे. थोडा अभ्यास करायला लागेल. तुम्हीही बसा आणि आपापल्या नाड्या शोधा. हेमांगीताईंना ह्या भविष्यात काही रस नसल्याने त्या इकडे-तिकडे पाहायला लागल्या. तर त्यांना जुनी भित्तिचित्रे दिसली. त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू केला.

इकडे ओकांना त्यांची नाडी मिळाली. भाषा अगम्य असली तरी ती बरीचशी ओळखीचीही वाटत होती. त्यांनी बॅट्मॅन ह्यांना बोलावून घेतले. ते वाचून बॅट्मॅनचे डोळे पाणावले आणि तो तडक विजूभाऊंपाशी गेला. ते मोकलाया भाषेचे १०००वे वर्जन होते. त्यामुळे थोडा वेळ लागला. पण एक २/४ सेकंदातच त्यांना शोध लागला की नाडी संक्षी ह्यांची असून ती ओकांनाच मिळेल.

त्यात संक्षी ह्यांचे संक्षिप्त भविष्य होते. त्यात फक्त इतकेच लिहिले होते की ‘संक्षी आणि ओक आणि इतर पृथ्वीवासी इथे येतील आणि मग ते चालणार्‍या आमसुलांचा (http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5204332738114588355&Se...(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0) उपयोग करून ते परत पृथ्वीवर जातील.’ ही आमसुले म्हणजे काय, हे पुण्यातील बर्यारच जणांना माहीत होते. पण ही मिळतात कुठे, हे शोधून काढणे जास्त गरजेचे होते.
ते परत गुहेत गेले, तर तिथे हेमांगीताई हातात वही आणि पेन घेऊन बसलेल्या होत्या. त्यांनी एक बातमी दिली, की विंचवांचा उपयोग करून आपल्याला इंधन बनवायला लागेल.

त्या भित्तीचित्रांत करवंदे आणि विंचू एकत्र दाखवले आहेत, असाही एक शोध लावला गेला. ती सगळी मं. ‘विचू + करवंदे’ हे शोधण्यात गर्क असताना, प्रथम, स्पा वगैरे मं. इंधन टाकीची गळती नेमकी कुठून होत आहे, हे शोधण्यात दंग झाली. त्यांना शोधाअंती समजले की भारतातील इंधन ह्या टाकीला सोसत नाही.

आता नवीन टाकी बनवायची की काय, असा प्रश्न मनात आला न आला, तोच रामदासकाका म्हणाले, “आतून लेप देऊ या. तिथेच आसपास कुणाला लिंबासारखी झाडे मिळाली. जवळच वडासारखे चीक देणारेही झाड मिळाले. त्या चिकाचा आणि लिंबू रसाचा उपयोग करून एक प्रकारचा नवीन डिंक तयार झाला.

तोपर्यंत करवंदे आणि ती खाऊन माजलेले विंचू घेऊन काही मं. आली. विंचवाच्या नांग्या कशा ठेचायच्या, हे मिपाकरांना सांगावे लागत नाही. पण इथे मात्र नांग्या पिळून विष काढायला लागणार, असे समजले. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तसे विष काढले. विष काढल्यावर त्यांना करवंदे खायला दिली.

हे विष सोत्री आणि कं.कडे दिले. भट्टीतून त्यांनी इंधन जमा केले. त्या इंधनाची आणि टाकीची परीक्षा घेण्यात आली. ३ ते ४ मिनिटांतच समजले की इंधन उत्तम आहे.

त्या दिवशी सगळ्यांनी गणपाशेटने बनवलेल्या ‘पाया’ला मनसोक्त दाद दिली. मी त्यांच्या पाया पडलो आणि गुरू मानले. सोत्री मुनींनी करवंदाचे सरबत करून सगळ्यांना पाजले. (असे करून त्यांनी बर्याणच लोकांच्या तोंडाला पानेही पुसली... इति परा.) प्र.पे. ह्यांनी चिक्कू हलवा बनवला होता. त्यात सुक्या मेव्याचा वापर करण्यात त्यांनी अजिबात चिक्कूपणा केला नव्हता, हे वेगळे सांगणे नलगे. सानिका स्वप्नील ह्यांनी रताळ्याच्या तिखट पुर्यास केल्या होत्या, तर रेवतीआजींनी कांद्याचा भात आणि मेथी गोळ्यांचे सांबार केले होते. रात्री मस्त जेवण झाले. अन्न थोडे उरले होते. आता उरलेल्या अन्नाचे करायचे काय? हा प्रश्न मनात होताच.

जेडी लगेच त्यांच्या सर्पमित्राकडे (चुकलो.. मंगळाच्या भाषेत मानव-मित्राकडे) गेले. तो आणि त्यांचा कळप आला आणि त्यांनी सगळे अन्न संपवले. हे काय अघटित घडले, हे कुणासही कळेना. त्या सापानेही काही सांगितले नाही. पण इतकेच सांगितले की इथे मानव जमात कात टाकते.

दुसर्‍याच दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना सगळे जसे बसले होते, तसेच आता बसले होते.
संक्षी आणि ओक नाड्यांविषयी चर्चा करत होते. आपली नाडी निदान मंगळावर तरी का होईना, पण मिळाल्याने संक्षी खूष होते. हे काय अघटित घडले, असे बघून सुबोध खरे आपल्याच हाताची नाडी तपासून बघत होते.
मी, सोत्री आणि ब्रिटिश ह्यांना आंब्यापासून एक झकास मादक पेय कसे तयार करतात, ते शिकवले. अजूनही बरीच पेये तयार करता येतात, हेही सांगितले. त्याच्या सगळ्या रेसीपी सोत्रींकडे दिल्या असल्याने ते त्या योग्य वेळी सादर करतील.
अत्रुप्त आत्मा आणि बिरुटे सरांना विजुभाऊंनी श्रीस्थानक शहरात (सध्याच्या ठाणे शहरात) किती स्थळे आहेत, ते सांगितले.
पूजा पवार, पैसाताई ह्यांच्यामध्ये अपर्णा अक्षय बसल्या होत्या. ऑस्ट्रेलिया देशाबद्दल त्यांनी बरीच उपयुक्त माहिती दिली. अपर्णा अक्षय ह्या लवकरच ऑस्ट्रेलिया देशाबद्दल मिपावर लेख लिहितील, असे वाटते.
हेमांगी के ह्यांनी रेवतीआज्जी आणि कोमल ह्यांना मंगळावरील भित्तिचित्रे आणि मेसापोटेमिया इथली भित्तिचित्रे ह्यांतील साम्य आणि भेद दाखवला. अशा हुषार मुलीने अमेरिका सोडून परत भारतात जाऊ नये, ह्यासाठी रेवतीआज्जी अमेरिकन प्रेसिडेंटला स्वतः जाऊन भेटणार आहेत, असे समजते.
पल्लवी मिंड ह्यांनी मृणालिनी आणि सानिका स्वप्नील ह्यांना स्वैपाकघरातील विनोदी किस्से सांगितले. मृणालिनी आणि सानिका स्वप्नील ह्यांचा स्वैपाक कधीच बिघडत नसल्याने हे असेही स्वैपाकघरात होऊ शकते का? असा लेख ते मिपावर टाकणार आहेत, असे समजते.
गणपा, प्र.पे. (प्रभाकर पेठकर) आणि दीपक (कुवैत) हे थकूनभागून झोपले होते. आता ह्यापुढे मिपावर लेख टाकायचा की नाही, असाच विचार ते करत असतील असे वाटते.
जॅक डॅनियल, इ.ए. आणि वल्ली ह्यांच्या विषारी गांडुळांची चर्चा सुरू होती. जेडीच्या पुण्याईचे फळ सगळ्यांना मिळाले, असे वल्लीने मोठ्या मनाने सांगितले.
रामदासकाका, क्लिंटन आणि सर्वसाक्षी एकत्र बसून मिपाच्या पृथ्वीवरील इतर सं.मं.शी व्य.नि. आणि व्य.नि. करत बसले होते. चीनच्या पोलादी पडद्यापेक्षा मिपाचा सं.मं.चा पडदा फार भारी आहे. त्यामुळे ते नक्की काय करत असतील, ह्याचा अंदाज न घेता, मी तुकोबांचे नामस्मरण करत गप्प बसलो.
प्यारे१, धन्या आणि इरसाल ह्यांनी शांतपणे झोपणे पसंत केले.
बॅटमॅनने स्पा आणि प्रथमच्या दुरुस्तीच्या ज्ञानाचे कौतुक केले. खुद्द बॅटमॅनकडून प्रशस्तिपत्र मिळाल्याने स्पाच्या अंगावर रोम रोम फुलून उठले, तर प्रथमचा कंठ दाटून आला. बॅटमॅनने आपल्या बाईकच्या दुरुस्तीचे काम त्या दोघांना देऊन टाकले.
गवि आणि श्रीरंग जोशी ह्यांनी यानचालकाची जबाबदारी भटक्या खेडवाला यांच्यावर टाकून दिली. एकतर भटक्या खेडवाला हे कोकणातले आणि मग राहायला डोंबिवलीला आलेले. त्यामुळे त्यांच्या बुद्धी बळावर गविंचा विश्वास होता. यान जुहूला व्यवस्थित उतरले.
खुद्द अमेरिकेचे राजदूत आणि राष्ट्रपती हजर असल्याने, युनोची सगळी मंडळी तर हजर होतीच, पण त्याशिवाय इतर प्रत्येक देशाचे प्रमुखसुद्धा हजर होते. इतकी सगळी मंडळी हजर असल्याने मिपाकरांची मान ताठ झाली. सं.मं.तर्फे नीलकांत यांनी भाषण केले. समारोप करताना ते म्हणाले की, “भले मिपाचे संमेलन पृथ्वीवर होवो न होवो, आज आम्ही आमचे संमेलन मंगळावर व्यवस्थित पार पाडलेच आहे....
आम्ही आमचे पुढले संमेलन चंद्रावर करणारच.”

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

14 Nov 2013 - 11:15 am | दिपक.कुवेत

आता खरचं होउनच जाउदे एकदा मिपाचं संमेलन!

टवाळ कार्टा's picture

23 Aug 2014 - 3:33 pm | टवाळ कार्टा

आयला...हा हिरा बघितलाच नव्हता \m/