ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते.
गण :-
तमाशाची सुरुवात ही ईशस्तवन अर्थात गण म्हणून होते. आम्ही रसिकांची सेवा करायला सज्ज आहोत मात्र हे ईश्वरा तुझी साथ आणि तुझी आशीर्वाद रुपी सावली आम्हा कलाकारांच्या मस्तकी राहू दे म्हणून त्या नटवराचा धावा करणे हा प्रथम चरणाचा मुख्य हेतू असतो. उदा. रंगमंचाचं पूजन झाल्यानंतर सर्व कलाकार रंगमंचावर येऊन तमाशा रंगतदार व्हावा म्हणून श्रीगणेशाला साकडं घालतात.
आधी गणाला रणी आणा।
नाही तर रंग पुन्हा सुना-सुना ।।धृ।।
म्हणत गणरायाला प्रथम मान दिला जातो. ह्याचा आशीर्वाद नसेल, तर पुन्हा सारा रंग सुना होऊन जातो अशी धारणा या कलावंतांमध्ये आहे.
गवळण :-
गणानंतर गवळणींचा मेळा येतो. सार्या गवळणी सजून-धजून मथुरेच्या बाजारला निघालेल्या असतात.
"बाजार मोठा । लवकर गाठा
मथुरेच्या हाटा । चला निघा निघा
वरल्या आळीच्या । चंद्रावळीच्या
फळीला जाऊन ।। सांगा सांगा
यमुना नदीला । येईल भरती
नक्षत्र वरती । रोहिणी मघा
बाजाराला । विलंब झाला
सूर्यबिंब वर । आले बघा
धीटपणाने । माठ सांभाळुनी
घाट यमुनेचा । वेंघा वेंघा
रोकड अनुभवी । अवघड लाघवी
फक्कड भाऊची कवी । मागा मागा"
त्यांच्या बरोबर जुनी जाणती म्हणून एक मावशीही असते. मावशीचा वेश घेऊन वावरणारा हा कलावंत थोडीशी वेगळ्या धाटणीची भाषा बोलतो. त्यात तमाशाच्या मानाने ‘सभ्य’ वाटणारे विनोद साधले जातात. बाजाराला जाणार्या या गौळणींच्या (गवळणींच्या) वाटेत पेंद्या आणि कृष्ण आडवा येतो. ‘गवळण’ म्हणून देवाची भक्ती करा, मगच तुमची वाट सोडू म्हणत पेंद्या त्यांना दम देतो आणि गवळणी त्याच्यासमोर -
‘थाट करूनी माठ भरूनी
घ्या गं सगळय़ा शिरी,
माठ गोरसाचे शिरी,
आडवा आला तू गिरीधारी
सोड रस्ता हरी,
जाऊ दे बाजारी,’
अश्या प्रकारे विनवणीरुपी गवळण सादर करतात. "पिंजरा" या चित्रपटामध्ये जगदीश खेबुडकरांनी सुद्धा एक अप्रतिम गवळण "दे रे कान्हा, दे रे चोळी आणि लुगडी" लिहली आणि यावर शांताराम बापूंनी संध्या हिच्याकडून काय अप्रतिम नृत्य करून घेतले आहे, ते दृश्य डोळ्यासमोर घ्या ज्यामध्ये संध्या या गळ्याबरोबर पाण्यात सखींसोबत जलक्रीडा करतायत त्यांनी पाण्यातील गळ्याच्या वर केलेला मुद्रानृत्य, ते त्यांच्या चेहऱ्यावरील व्याकूळ भाव आणि ते नृत्य अहाहा ! किती सुरेख गवळण ! आणि त्यावर कढी म्हणजे लता दीदींचा आवाज ! क्या बात है ! राम कदमांनी या चित्रपटातील सर्व लावण्या उषा मंगेशकर यांच्या आवाजात गाऊन घेतल्या मात्र ही एकमेव गवळण त्यांनी लता दीदींकडून गाऊन घेतली होती.
बतावणी :–
तमाशातला हा सर्वात रंगतदार भाग. कुठल्यातरी गावचा मारखाऊ सरपंच गावच्या जत्रेसाठी तमाशा ठरवायला जातो. तिथं त्याची गाठ नायकीणीशी पडते आणि दोघांमधल्या संवादाने हास्याचा सागर उसळतो. त्यानंतर लावण्या सादर केल्या जातात. मध्ये मध्ये विनोदांची पेरणी, तमाशा ठरविण्यासाठी दरातली घासाघीस या सर्वांमध्ये प्रेक्षक दंग होऊन जातो. ख-या अर्थाने ‘बतावणी’ हा शब्द लोकाचारातून आलेला आहे. एखाद्या व्यक्तीला बनवण्यासाठी रचलेले सोंग म्हणजेच बतावणी होय. एक दुस-याला बनवाबनवीत हास्य आणि विनोद निर्माण होतो. म्हणून बतावणीला तमाशाचे एक अविभाज्य अंग म्हणून संबोधले आहे.
लावणी :–
गौळणीनंतरचा भाग लावण्यांचा असतो. प्रारंभीच्या तमाशात नाच्या पोऱ्याकडेच हे काम असे. यानंतर मात्र नाच्यापोराऐवजी नाची रंगमंचावर आली. गण गाताना सुरत्ये आपल्या सुरांनी वातावरण भारून टाकतात, मग काही वेळ नुसती ढोलकीच खणखणते. मग कडे- ढोलकीचा झगडा सुरू होतो. सवालाला जबाब मिळू लागतो. हळूहळू लय वाढू लागते. एवढ्यातच हा झगडा थांबून एकाएकी नाचीच्या पायांतील चाळांची छुमछुम सुरू होते. त्या छुमछुमाच्या नादातच ती मग आपला पदर उंच धरून पाठमोरी नाचत नाचत पुढे येते व पदराआडील आपल्या मुखवट्याने प्रेक्षकांचे कुतूहल चाळवीत एकदम वळून प्रेक्षकसन्मुख उभी राहते. याच वेळी ती आपला पदर कमरेला खोवते आणि डावा हात कमरेवर ठेवून व उजवा हात वर उभारून मंडलाकार नृत्य करते. नंतर पुन्हा उलट्या क्रिया करून दोन्ही हात कमरेवर ठेवून कमरेत लवून, हातांचे पंजे एकमेकांत अडकवून ते उलट-सुलट फिरवून, हवेत टाळी पिटून व उंच उडी मारून आपले नृत्य सादर करते. त्यांनतर तिचा तमाशातील रंगेल गड्याशी संवाद सुरू होतो. या संवादातूनच लावणीला प्रारंभ होतो. तमाशामध्ये गद्यभाग फार थोडा असतो. आणि बराच भाग पद्यामध्ये असतो. हा पद्य भाग लावण्यांच्या स्वरुपात असतो. या लावण्यांना 'कडे ढोलकीच्या लावण्या' असे म्हणतात.
‘सुंदरा मनामधि भरलि जरा नाहि ठरलि हवेलित शिरली
मोत्याचा भांग
रे गड्या हौस नाहि पुरली म्हणोनी विरली पुन्हा नाहि फिरली
कुणाची सांग’
अशी शाहीर रामजोशी यांनी लावणी लिहली. ग. दि. मा., शाहीर दादा कोंडके यांनीही मराठी मध्ये उत्कृष्ठ लावण्या लिहल्या आहेत. शांताराम बापूंच्या "पिंजरा" या तमाशापटासाठी जगदीश खेबुडकर यांनी इतक्या अप्रतिम गवळण आणि लावण्या लिहल्या आहेत कि ते तमाशा चे अलौकिक सौंदर्य मनाला आजही भारून टाकते. एका एका लावणीसाठी राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी कित्येक रात्री जागून काढल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. 'तुम्हा वर केली मी मर्जी बहाल' या लावणीचा मुखडा रात्री २ ते ३ च्या दरम्यान सुचल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. नृत्यप्रधान लावणी, गानप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी. प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. पंढरपुरीबाजाची लावणी ही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छकुड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी.
वग :-
बतावणी नंतर मध्यंतर होऊन तमाशा च मुख्य अंग म्हणजे वग किंवा आख्यान सुरु होत. वग हा शब्द ‘ओघ’ या शब्दावरून आला असावा, असे म्हटले जाते. ओघ म्हणजे कथानकाचा ओघ. म्हणजेच वगाचे स्वरूप हे सामान्यतः आधुनिक नाट्यसंहितेसारखे असते. अलीकडे वगनाट्य हे तमाशातील कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग बनला आहे. तमाशाच्या संविधानकात एखादे कथासूत्र घेऊन लावण्या गुंफल्या जातात आणि तमाशामध्ये कोणता वग सादर होणार यावरून त्याच श्रेष्ठत्व ठरवल जात. या वगनाट्याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असून १८६५ मध्ये उमा सावळजकर या तमासगिराने आपला सहकारी बाबा मांग याच्या साह्याने ‘मोहना बटाव’ हा वग रचला आणि तोच पहिला मराठी वग ठरला. त्यानंतर पठ्ठे बापूरावांनी बरीच वगरचना केली. त्यांचा ‘मिठ्ठाराणी’ हा वग प्रसिद्ध आहे. सौ. मंगला बनसोडे यांनी तर सद्यस्थितीवर भाष्य करणारे कितीतरी वग रसिकांच्या पुढे सादर केले आहेत. काळू - बाळू यांचा 'जहरी प्याला' हा वग खूप प्रसिद्धी मिळवून गेला होता. अर्जुना वाघोलीकर, दगडू साळी तांबे शिरोलीकर, भाऊ फक्कड, पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वसंत बापट, वसंत सबनीस इ. मान्यवर साहित्यिकांनीही वगनाट्ये लिहिली आहेत.
तमाशामधील काही मनस्वी आणि दिग्गज कलावंत :-
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आणि फुललेली "तमाशा" ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आली आहे. वेळोवेळी विविध संकटाशी सामना करीत आज ताठ मानेने समाजमनात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच काही आदराने नाव घ्यावे असे काही मनस्वी आणि दिग्गज कलावंत आणि त्यांचा परिचय :
श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर उर्फ शाहीर पठ्ठे बापूराव :-
मराठी साहित्यामध्ये ज्यांच्या साहित्यावर पी.एच.डी. केली जाते असे तमाशा क्षेत्रातील भूषण पठ्ठे बापूरावांचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष (तालुका - वाळवा, जिल्हा - सांगली) या गावी झाला. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद लागला. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला कविता करण्याचा छंद लागला. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` अशी लोकप्रियता मिळाली. श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्याच्या १६व्या वर्षी राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे तो संस्कृत भाषा शिकला. त्याबरोबरच त्याने कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचा असताना त्याचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आला.
गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन` हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. ` दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी बात बडी ` असा स्वतःच्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात पवळा भेटली. असे ऐकण्यात आहे कि, पठ्ठे बापुरावांनी सवाल जवाबामध्ये पवळाला जिंकले होते. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. ती आधीच ’नामचंद पवळा’ म्हणून प्रसिद्ध होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन् पवळाबाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर ’मिठाराणी'चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.
एकेकाळी मुंबईच्या एल्फिन्स्टन थिएटरवर पवळा - पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आल्याचा उल्लेख तमाशा इतिहासामध्ये सांगितला जातो. त्याकाळी दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असे नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पवळा आर्थिक कारणावरून निघून गेल्याची सल डोक्यात ठेऊन पठ्ठे बापुरावांनी 'पारूश्या (शिळ्या) पैश्याचे तोंड बघणार नाही' असा पण केला आणि आयुष्याच्या अंतापर्यंत जपला. शेवटी शेवटी तर ते खूपच विपन्न अवस्थेमध्ये होते.’कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर हलाखीत दिवस काढू लागला. त्यांच्याच तमाशात काम करणाऱ्या `ताई परिंचेकर' ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. या श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हा शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होता. आजही 'रात धुंदीत जागवा' म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात.
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर :-
लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या – पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली. आणि आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती सुरू झाली. याच सुमारस मामा वरेरकर – आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाटय़ाच्या माध्यमातून समाजजागृती करत होते.
भाऊ-बापूच्या तमाशात अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवित होत्या. ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली.
एकदा दरम्यान भाऊ-बापूंचा तमाशा कोळे या गावी मुक्कामाला होता. तिथं भाऊ अकेलकर यांनीही आपल्या तमाशाचा फड उभारला होता. दोन्ही फडांनी एकमेकांना आव्हान दिलं आणि त्या रात्री दोघांमध्ये `भेदीक’ सुरू झाली. सवाल-जबाब सुरू झाले. कुणीच कुणीच कुणाला हार जात नव्हतं. पण अकेलकरांच्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीने `अशी कोणती रूपाची खाण तुझ्या गाठीला आहे’, असा सवाल करत बापूंना निरुत्तर केलं. भाऊंना ही हार जिव्हारी लागली. या पराभवानं विठाबाईही पेटून उठल्या आणि लागलीच बाडबिस्तारा आवरून कराडच्या वाटेला लागल्या.
त्या रात्री पुन्हा एकदा दोन्ही तमाशात भेदीक जुंपली आणि ती जुगलबंदी जिंकून विठाबाईंनी आपल्या वडिलांना हरविल्याचा पुरेपूर बदला घेतला. त्या रात्री विठाबाईंचं बोर्डावर पाय ठेवणं ऐतिहासिक होतं. ती त्यांच्या पुढच्या देदिप्यमान प्रवासाची नांदी होती. त्या वेळी विठाबाई फक्त तेरा वर्षांच्या होत्या. तमाशा फडावरील सर्व अपरिहार्यतेचा स्वीकार करुन तमाशा कलावंताचं कलंदर जगणं काय असतं, ढोलकीच्या तालातून आणि घुंगराच्या बोलातून साकारणारी कलेची उर्जा कशी असते, हे विठाबाईंचा तमाशा पाहिलेल्या प्रत्येक रसिकाच्या आठवणीत आजही साठवलेले आहे. वयाच्या अकराव्या वर्षांपासून घुंगरांच्या तालावर नाचू लागलेल्या विठाबाई वयाच्या सत्तरीपर्यंत तमाशाफडात सम्राज्ञीच्या थाटात वावरल्या. आपल्या अदांनी तमाशा रसिकांना घायाळ करणारी ही नृत्यसमशेर लावण्यवती पोटामध्ये नऊ महिन्याचे बाळ घेऊन "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची ?" असे म्हणत स्टेजवर नाचली. तमाशा प्रकारात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिध्दी, मानसन्मान आणि पैसा मिळूनही उतारवयात त्यांच्या आयुष्यात लाचारीच आली. यांच्या जीवनावर नुकताच 'विठा' नावाचा मराठी चित्रपट निर्माण झाला आहे.
सौ. मंगला बनसोडे:-
गेली पाच दशक (५५ वर्षे) आपल्या जादुई अदकारीने अवघ्या महाराष्ट्राला रिझवत सौ. मंगला बनसोडे यांनी रसिकांच्या हृदय सिहांसनावर अढळ स्थान प्राप्त केले आहे.
कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे म्हटले की त्यामध्ये संकटे आणि संघर्ष आलचं. अशा अनेक समस्यांना धीराने तोंड देत मंगलाताईनी आपल्या कलेचे कोरीव लेणे तयार करून ठेवले आहे. हे यशोशिखर सर झाल्यानं त्यामागची प्रेरणा सांगताना त्या अवर्जून उल्लेख करतात त्या आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा व पती रामचंद्र बनसोडे यांचा. सौ मंगला बनसोडे यांना तसा तमाशाचा वारसा जूना आहे. नारायण खुडे तमाशा मंडळ आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ , आई विठाबाई भाऊ नारायणगावकर या त्यांच्या तमाशातील पिढ्या फार गाजल्या. आई विठाबाईचा तर भारत सरकारकडूनच गौरव झाला आहे. यानंतर त्यांनी स्वत: हा वारसा चालवीत तमाशाची पताका राज्यभर मिरविली. आजही ही सेवा अखंड सुरूच आहे. मुलगा नितीनकुमार बनसोडे यानेही आईच्या पावलावर पाऊल ठेवत ही पालखी खांद्यावर घेतली आहे. अल्पावधीतच आईच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या यशाचा वारू दौडत आहे.
वयाच्या सातव्या वर्षी पायात घुंगरू आल आणि आजतागायत त्याचा छनछनाट सुरूच आहे. सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर लहरत समाजमनाला आनंद देण्याचे काम मंगलाताईनी केले. आईची कलेची सेवा मंगलाताईंनी जवळून पहिली या कलेसाठी किती जीव तोडून काम करावे लागते याचा अनुभव सांगताना त्या म्हणतात , माझ्या आईने तमाशाच्या सेवेत सगळ आयुष्य वेचल माती व बैलगाडीच्या स्टेजपासून आतापर्यंतचा प्रवास तिने केला. हा प्रवास मंगलाबाईंनीही अनुभवला आहे. आणि अनुभवत आहेत. उदर निर्वाहाच साधन तमाशाच असल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागले. पोटात बाळ असतानाही नऊ महिने नऊ दिवस नाचतच राहायचं आणि बाळंतीन म्हणून झोपून न राहता प्रसुतीनंतर अर्ध्या तासातच स्टेज गाठायचं ताप , थंडी , खोकला काहीही न पाहता पाठीवर बिऱ्हाड घेऊन पोटाची खळगी भरायला आणि लोकांचे मनोरंजन करायला गावोगाव फिरायचे. मंगलाताई बनसोडे या तमाशा फडानेही असेच वादळ उठविले आणि रसिकांची सेवा केली. १९८३-८४ ला मंगलाताईनी पती रामचंद्र बनसोडे यांच्या पाठबळावर स्वतंत्र फड उभा केला. नृत्य आणि नाट्याच्या उत्तम गुंफणीमुळे रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद या फडात निर्माण झाली. मंगलाताईचे नृत्य आणि पती रामचंद्र बनसोडे यांचे वगनाठ्य हे समीकरण पक्के झाले. उडत्या चालींच्या गाण्यासह बैठकीच्या आणि खड्या भावमधुर लावण्यांनी मंगलाताईनी महाराष्ट्रातील जत्रा , यात्रा , उरूस आणि बाजार घायाळ केले. तितक्याच ताकदीने त्यांची भक्त प्रल्हाद , येथे नांदते मराठेशाही , जन्माला ये इंदिरा पुन्हा, विष्णू बाळा पाटील , बापू बिरू वाटेगावकर , कारगिलच्या युध्य ज्वाला , राजीव गांधी हत्याकांड , जन्मठेप कुंकवाची , चंदन तस्कर डाकू वीरप्पन , हर्षद मेहता , गाव तंटामुक्त झाला पाहिजे आदी पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक विषयावर भाष्य करणारी वगनाट्ये गाजली . धार्मिक आणि आध्यात्मिक वगही गावोगावी गाजविले.
मंगलताईनी तमाशा फड महाराष्ट्रात गाजवत असतानाच त्यांनी त्यासाठी आपल्या मुलाला नितीनलाही तयार करण्याचे काम केले या दोघा माय लेकांनी पुन्हा रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. ती आजही कायम आहे. बदलत्या रुची नुसार श्रोत्यांना काय हवे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मंगलताई म्हणतात " माझे शिक्षण चौथी इयत्तेपर्यंत झाले आहे. मात्र इतरांनी अधिक शिकावे असे वाटते. समाजाची सेवा करण्यासाठी स्वतः शिक्षण घेणे गरजेचे आहे. सामाजिक भान असल्यामुळे आणि त्याचा विकास व्हावा अशी भावना जपल्यामुळे राज्यातील पाच प्राथमिक व तीन माथ्यामिक तसेच कराड , सातारा , इगतपुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी , काही ठिकाणी मंदिरे उभारण्यासाठी माझ्या कार्यक्रमातून मी मदत करू शकले. याचे मला मोठे समाधान आहे ."
मंगलाताईचे सारेच काम नवचैतन्य आणि उर्मी देणारे आहे. त्याची कदर महाराष्ट्र राज्य शासनालाही करावी लागली. त्याचे फळीत म्हणजे ताईना २००१ साठी प्रथमत:च सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय शासनाने तमाशा कलावंतासाठी सुरु केलेला विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आईच्या मृत्यू आणि कार्यक्रम करून परतत असताना बसने पेट घेऊन झालेला अपघात हे मंगलाताईच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:खाचे क्षण. आयुष्यात इतर अनेक दु:खे पचाविणाऱ्या ताईचे मन आईच्या जाण्याच्या घटनेने आजही व्याकुळ होते. वयाच्या सातव्या वर्षापासून आज एकसष्ठ वर्षापर्यंत अखंड रसिक सेवा करीत आलेल्या या महान कलावंतीनीला मानाचा मुजरा !
रघुवीर खेडकर :-
तमाशातील सोंगाडया या बहुआयामी व्यक्तिरेखेबद्दल एक पूर्ण मालिका लोकप्रिय होऊ शकते. साधारणत: बाकेराव हा हजरजबाबी सोंगाडया प्रसिध्द होता. त्यानंतर दगडूबाबा साळी, दत्तोबा तांबे, काळू बाळू, दादू इंदुरीकर, शंकर शिवणेकर, किसन कुसगावकर, वसंत अवसरीकर, दत्ता महाडीक-पुणेकर, रघुवीर खेडकर आदी मान्यवर सोंगाडयांची नावे घेतली जातात.
राजकपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटासारखीच सोंगाडयांची अवस्था असते. बोर्डावर ते जनसामान्यांना पोटभरून हसवतात आणि बोर्डामागे मात्र त्यांच्या डोळयातील अश्रु पुसणारा कोणी नसतो. तुकाराम जाधव नावाच्या एका कवीच्या कवितेतील एक ओळ सोंगाडयाच्या आयुष्याशी अगदी मिळती-जुळती आहे. ती अशी-
'तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत`
१९९१ सालच्या नांदेड जिल्हयातील मालेगावच्या यात्रेतला एक प्रसंग. रघुवीर खेडकर यांचा तंबू यात्रेत लागला होता आणि राजीव गांधी हत्या प्रसंगावर वग सादर होणार होता. त्यासाठी एक हेलिकॉप्टर बनविण्यात आले होते आणि फटाक्यांची दारू आणि सुतळी बॉम्ब तयार ठेवण्यात आले होते. वामन लोहगावकर हा सोंगाडया आणि रघुवीर खेडकर यांचा मुलगा व भाचे मंडळी राजीव गांधींच्या स्वागताला तयार होती. असा प्रसंग त्या वगात दाखविण्यात आला होता.
आपटाबारच्या पेटीचे झाकण आदळल्याने मोठा स्फोट झाला. रघुवीरचा ५,६ वर्षाचा भाचा बबलू जबरदस्त भाजला तर वामनमामांच्या डोक्याचा एक भाग अक्षरश: फुटून बाजूला पटला. वामनमामा जागीच ठार, तर बबलू जबर जखमी.
हिंमतवान कांताबाई सातारकर , नातू बबलूला घेवून एकटया नांदेडला दवाखान्यात रवाना झाल्या. प्रेक्षकात गोंधळ उडाला. परंतु हे दु:ख बाजूला ठेवून वामनमामाचे प्रेत एका कपडयात झाकून ठेवलं व तमाशा पुन्हा सुरू झाला. रघुवीर खेडकर मधला जातीवंत सोंगाडया प्रेक्षकांना खळाळून हसवित होता. त्यावेळी रघुवीर नावाच्या सोंगाडयाच्या अंत:करणात काय वेदना होत्या याची कल्पना कुणीच करू शकणार नाही.
रघुवीर खेडकर म्हणाले माझी आई कांताबाई सातारकर ही माझी सर्वात मोठी गुरू असून जुने कलावंत दत्ता, दत्तोबा तांबे, दत्ता महाडीक, गुलाबराव बोरगावकर, लक्ष्मण टाकळीकर यांना ही मि माझ्या गुरू मानतो.
रघुवीर खेडकर या आदर्श सोंगाडयाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने दिल्लीला संगीत नाटक अकादमीच्या मेघदूत खुल्या रंगमंचावर आपला पारंपरिक ढोलकी फडाचा तमाशा सादर केला. चंदिगड येथे तमाशा सादर केला आणि अवघ्या भारतात आपली किर्ती पसरविली.
जयवंतराव सावळजकर :-
तमाशातील अतिशय हरहुन्नरी विनोदवीर म्हणजे जयवंतराव उर्फ तात्या सावळजकर ! सांगली जिल्ह्यातील सावळज हे यांचे गाव होते. विनोदाची अचूक वेळ आणि हजरजबाबीपणा हा त्यांच्या अंगी असणारा एक प्रमुख गुण होता. त्यांच्या नुसत्या प्रवेशाने लोकांमध्ये उत्साह यायचा. विनोदी द्वि अर्थी संवादाने आणि हजरजबाबाने तमाशातील राजाला जेरीस आणणाऱ्या या विनोद्विराला आजारपणाने त्यांच्या वृद्धावस्थेत अगदी मेटाकुटीस आणले होते. खूप वर्षापूर्वी सावळज येथील पाहुण्यांकडे गेलो असता मी जयंत सावळजकर यांना भेटण्यास गेलो होतो. त्यांचा तो थकलेला देह पाहताना माझ्या मनाला खूप यातना झाल्या होत्या.
दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर :
या जोडीने ढोलकी फडाच्या तमाशात सोंगाडयाची जोडगोळी म्हणून कारकीर्द गाजविली. गुलाब बोरगावकर यांचे मूळ नाव गुलाब मोहमंद जामदार. सांगली जिल्ह्यातील बोरगावच्या गुलाबने सातव्या इयत्तेत शाळेला रामराम ठोकला. काही काळ तालीम काही काळ उनाडक्या करणाऱ्या गुलाबकडे समय सूचकता मोठी होती. नाटक, भजन आणि तमाशा या तीनही प्रकाराकडे गुलाबचा ओढा होता. आमदभाई इस्लामपूरकर यांच्या तमाशात गुलाब सामील झाला. आमदभाई इस्लामपूरकर आणि माधव नगरकर यांचा तमाशा एकमेकांच्या समोर आला तेंव्हा नगरकरांच्या तमाशातील गणपत चव्हाण, साविंदणेकर, सीता येवलेकर आणि गोंधळी समाजाचे पेटीमास्तर बाबूराव बोरगावकर यांची कला पाहून गुलाब बोरगावकर प्रभावित झाले.
गुलाबराव बोरगावकरांनी माधव नगरकर आणि नंतर चंद्रकांत ढवळपूरीकर यांच्या तमाशात सोंगाडया म्हणून काम केले. गुलाबराव बोरगावकर आणि मास्टर दत्ता महाडीक यांची जोडी पुढे तमाशा सृष्टीत लोकप्रिय ठरली. या दोघांनी मिळून स्वतंत्र तमाशा काढला. गुलाबराव बोरगावकर आणि मास्टर दत्ता महाडीक यांनी सादर कलेले विनोद आणि त्यांनी गाजविलेले वग आणि त्यातील भूमिका पुढील प्रमाणे-
या दोघांनी मुंबईचा हमाल, गवळयाची रंभा, लडडू सिंग, सात पिढयाचं वैर, नायकिणीचा रंग महाल, इंदिरामठाचे गुपीत, शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेष्वर माझी माऊली, संत तुकाराम, असे पुढारी ठार करा, लग्नाआधी कुंकू पुसले, मानवत खून खटला इ.वगनाटयात गुलाबराव बोरगावकर व दत्ता महाडीक यांनी काम केले.
प्रल्हाद व राम मनवकर :-
कराड जवळील मनव या गावचा हा आताचा खूप प्रसिद्ध तमाशा आहे. आता याची धुरा प्रल्हाद यांचे चिरंजीव महादेव हे सांभाळतात. मात्र पूर्वी प्रल्हाद आणि राम हे दोन भाऊ या तमाशाचे एकत्रित संयोजन करायचे. नंतर त्यांच्यात फूट झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे आपापले तमाशा सुरु ठेवले. आणि काही वर्षांनी पुन्हा एकत्रित काम करू लागले. प्रल्हाद हे उत्कृष्ट सोंगाड्या आणि राम हे सुरत्ये म्हणून प्रसिध्द होते. राम यांच्या मृत्युनंतर प्रल्हाद यांचे चिरंजीव महादेव यांनी किसन मनवकर यांच्याबरोबर हा तमाशाचा प्रवास शंकर भुयाचीवाडीकर (उत्कृष्ठ ढोलकीपटू आणि उत्तम सोंगाड्या) यांच्या साथीने आजअखेर रसिकांची सेवा हाच धर्म समजून प्रतिकूल परिस्थितीतही सुरु ठेवला आहे.
तमाशा आणि कलाकारांच्या पुढील अडचणी :
पूर्वी तमाशाला राजाश्रय होता. राजा, महाराजा, गावचा प्रमुख जमीनदार, सरपंच, पाटील यांच्या आश्रयाने आणि त्या काळचे तमाशाप्रधान चित्रपटाच्या माध्यमातून तमाशा जिवंत राहिला. यावेळी लोकरंजनाच्या प्रकाराला बरे दिवस होते. मात्र नंतर त्याकडे लोकांकडून भडक कला म्हणून पाहिले गेले आणि तिच्या नशिबी वंचिताचे जीवन आले. आज तमाशाचा मालक सर्व कलाकारांना बरोबर घेऊन त्यांच्यात योग्य समन्वय साधून सगळ्यांच्या अडचणी सोडवत महिला कलाकारांची काळजी घेत खेळ करण्यासाठी सहा - सहा, आठ - आठ महिने गावोगाव भटकत असतो. ताफ्यातील या कलाकारांना दौरा करण्यासाठी जाण्या अगोदर उचल द्यावी लागते. त्यासाठी ठेकेदाराकडून कर्जाऊ किंवा आगावू रक्कम उचलली जाते. ज्यातून वाहन खर्च, कलाकार, वाद्य आणि जेवण यांचा खर्च करावा लागतो. नेहमी उपेक्षितांचे जीण नशिबी आलेला हा खेळातील राजा खेळ संपल्यानंतर लाचार आणि असहाय होऊन खऱ्या जगण्यासाठी संघर्ष करत असतो. खेळाची सुपारी मिळावी म्हणून धडपडत असतो. एखाद्या गावी हुल्लडबाज प्रेक्षकांकडून येणारा वाईट अनुभव, वाईट नजरा, समाजाची हेटाळणी सहन करूनही हे कलाकार रसिकांची सेवा करत असतात.
आज शासन दरबारी सुद्धा उपेक्षितपणाची वागणूक मिळत असल्यामुळे महाराष्ट्राची ही रांगडी गम्मत महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या प्रवासात अखेरच्या घटका मोजत आहे. यातील कित्येक कलाकारांचे नाव सरकार दरबारी नोंद नसल्यामुळे त्यांना मिळणारी पेन्शन, मोफत औषधोपचार, मोफत प्रवास यासारख्या जीवनावश्यक सोयी सुविधापासून त्यांना वंचित राहावे लागते आहे. नेहमी हेटाळणीच्या नजरा पाहत आलेल्या या लोकांना समाजामध्ये अजूनही मानाचे स्थान मिळाले नाही. भविष्यातील बदलत्या दिवसांची गरज ओळखून मुलांना उच्च शिक्षण - संस्कार दिले मात्र मुलींचे लग्न जमताना समाजाकडून मिळणारी हीन वागणूक त्यांनी आमचा स्वीकार न केल्याचा अनुभव देतो असे महादेवराव मनवकरांच्या सांगण्यातून आले.
अगदी सुरुवातीच्या काळात एका तमाशाफडात एक नाच्या पोऱ्या आणि दहा-बारा तमासगीर असत. खेड्यातील जत्रेच्या वेळी गावकरी त्यांच्याकडून रात्रभर तमाशा करून घेत व त्याबद्दल त्यांना पायली-दोन पायली दाणे देत असत. हेच त्यांचे मानधन. ही प्रथा साधारणपणे १९२० पर्यंत होती. पुढे १९२५ पासून तमाशामध्ये नाच्या पोऱ्याऐवजी कोल्हाटणी आणि इतर स्त्रिया आल्या. त्या काळी एका ढोलकीफडात पंधरा ते वीस तमासगीर व संगीतबारीत दहा ते बारा माणसे असत. त्यांचे खेळ तमाशागृहात (थिएटर) होत. तमाशागृहाच्या मालकाकडून वा ठेकेदाराकडून संगीतबारीला रोज पाच ते दहा रुपये आणि ढोलकीतमाशा- फडाला दहा ते पंधरा रुपये शिधा मिळे, त्यानंतर मात्र ही बिदागी अनुक्रमे पंधरा ते चाळीस व पंचवीस ते साठ रुपयांपर्यंत वाढत गेली.
पुढे १९५० नंतर बरेच तमासगीर आपापले स्वतंत्र फड गावोगावी नेऊन कनातीतून तमाशाचे खेळ करू लागले. त्यांच्या फडात आठ-दहा नाचणाऱ्या स्त्रिया, सोंगाड्या, चार ढोलकीवाले, हलगीवाले व इतर कामासाठी गडीमाणसे असा मोठा ताफा आणि तंबू, राहुट्या, लाईट, जनरेटर इ. सरंजाम असे. त्यामुळे या सर्वांचा मिळून त्यांना बराच खर्च येई. ते जत्रा-उरूस प्रसंगी गावकऱ्यांकडून सुपाऱ्या घेत. त्यात त्यांना एकावेळी पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत बिदागी मिळे. आज हा आकडा बाराशे ते तीन हजारांवर गेला आहे. या फडातील काही कलावंत रोजंदारीवर, तर काही मासिक पगारावर असतात.
मिळणाऱ्या तुटपुंज्या मेह्तान्यावर घर - संसार सांभाळण्याची कसरत हे लोक करत असतात. सर्व बाजूनी उपेक्षितांचे जगणे जगणाऱ्या या कलाकारांची शासकीय आणि माणुसकीच्या आश्रयासाठी चाललेली धडपड पाहून मन हेलावून जाते. महाराष्ट्राची ही अभिजात कला जर जोपासली नाही तर भविष्यात 'एक होता तमाशा' असं म्हणण्याची वेळ येईल. म्हणून महाराष्ट्राच्या या रांगड्या कलाप्रकाराला पूर्वीसारखा राजाश्रय (शासकीय) आणि लोकाश्रय मिळणे ही काळाची गरज आहे नाही तर ही लोककला अस्तंगत होवून फक्त इतिहासातील एक वाचनीय पान होवून राहील याची भीती मनाला राहून राहून वाटते.
** समाप्त **
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी
(पलूस, सांगली, महाराष्ट्र)
संदर्भ :
१. वगसम्राट श्री.महादेवराव मनवकर, विनोदवीर श्री. किसन मनवकर व श्री. शंकर भूयाचीवाडीकर यांची मुलाखत
२. अंतरजालावर प्रसिद्ध लेख
प्रतिक्रिया
2 Aug 2014 - 12:55 pm | झकासराव
अप्रतिम माहिती देणारा लेख.
तमाशा कलेची अत्यंभुत माहिती असलेला मी वाचलेला हा पहिलाच लेख.
खुप खुप धन्यवाद..
:)
2 Aug 2014 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर
फार मोठा लेख. एकाच भागात टाकल्याने वाचताना दमछाक होते. २-४ भागात विभागला असता तर बरे झाले असते.
संपूर्ण वाचून झालेला नाही. वाचून झाला की पुन्हा प्रतिक्रिया देईन.
4 Aug 2014 - 11:15 am | psajid
हा या लेखाचा दुसरा भाग आहे, लेख लिहताना वाचनाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुठे तोडावा आणि विभागून कुठून सुरुवात करावी हे लक्षात आले नाही. इथून पुढे त्याची दक्षता घेईन. गैरसोईबद्दल क्षमस्व: !
4 Aug 2014 - 11:45 am | एस
केवळ अप्रतीम लेख. ह्या लेखाची 'दखल' घेतली जावी अशी संमंला विनंती.
वाचनखूण साठवली आहे.
4 Aug 2014 - 11:50 am | सौंदाळा
+१
आधी कुस्ती आता तमाशा.
साजिद्शेठ अजुन येवु द्या.
4 Aug 2014 - 4:39 pm | एस
संपादक मंडळास धन्यवाद!
4 Aug 2014 - 12:25 pm | वटवट
'तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत`>>> आईगं …. खूप जोरात वेदना घुसली…
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख आहे हा... लिहायची शैली खिळवून ठेवते…. __/\__ धन्यवाद… :)
4 Aug 2014 - 1:47 pm | एसमाळी
दोन्ही भाग वाचले.एका लोककलेची संपुर्ण ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
4 Aug 2014 - 2:15 pm | पैसा
खूपच मेहनतीने लिहिलेला माहितीपूर्ण लेख! यातील एकेका भागावर तुम्ही एकेक लेख लिहू शकाल असं वाटतं. या कलाकारांव्यतिरिक्त सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर इ. कलाकारांची कला टीव्हीवर पाहिली आहे आणि त्यांच्याबद्दल काही काही वाचलेही आहे. पण तुम्ही लिहिलेले प्रकार वगैरे याबद्दल अजिबात काहीही माहिती नव्हती.
लेखासाठी धन्यवाद! असेच लिखाण तुम्ही कुस्तीबद्दल सुरू केले होते ना?
4 Aug 2014 - 2:57 pm | psajid
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कुस्ती बद्दल मी या अगोदर एक लेख लिहला होता ज्यामध्ये कुस्ती आणि कुस्तीतील डाव (प्रकार) यासंदर्भात लेखन केले होते. कुस्तीतील नामांकित पैलवान आणि त्यांनी यासाठी घेतलेली मेहनत याविषयी लवकरच लिहीन. सध्या महाराष्ट्रातील जुन्या संस्कृती, परंपरा आणि संस्कार याविषयी लिहण्याचा माझा मानस आहे. त्यावरती लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच याची एक लेख मालिका घेवून तुम्हा पुढे येतोय.
4 Aug 2014 - 3:03 pm | पैसा
वाट बघत आहे!
4 Aug 2014 - 3:06 pm | बॅटमॅन
साजिदभाऊ तुमचा लेख लयच आवडला. आधीचे लेखनही आवडले होतेच (हे आधीही सांगितले होते), पण हा लेख जरा जास्तच आवडला. अजून असेच लेखन येऊद्या!!!!
4 Aug 2014 - 4:09 pm | सूड
__/\__
तमाशावर इतका अभ्यासपूर्ण लेख पहिल्यांदाच वाचायला मिळालाय. हॅट्स ऑफ !! *yes3*
6 Aug 2014 - 9:40 am | सुबोध खरे
+ १००
सिनेमा आल्यापासून तमाशाच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. सिनेमाच्या पंच तारांकित भूलभुलैयाच्या पुढे नाट्यकलेची जशी होरपळ झाली तशीच तमाशाची झाली. परंतु सरकारने नाटकाला जशी नाट्यगृहे (किंवा इतर सोयी) उपलब्ध करून दिली तशा सोयी तमाशाला न मिळाल्याने तमाशाची वाताहत झाली. शिवाय तमाशा म्हणजे बायका नाचविणे एवढाच भाग मराठी सिनेमाने लोकांच्या मनात रुजवला त्यामुळे अगोदरच अपकीर्ती असलेला तमाशा अजूनच गाळात गेला.
या निमित्ताने आपण तमाशाचे मुळ रूप लोकांसमोर ठेवण्याचे अनमोल काम करीत आहात या बद्दल आपले अभिनंदन आणी धन्यवाद
हा समृद्ध आणी संपन्न लोक कलेचा वारसा जपून ठेवणे आपल्या सर्वांच्या हातात आहे
4 Aug 2014 - 4:12 pm | यशोधरा
लेख अतिशय आवडला. धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
4 Aug 2014 - 4:57 pm | मृत्युन्जय
उत्तम लेख.
4 Aug 2014 - 6:47 pm | आनन्दिता
खुप आवडला!!
4 Aug 2014 - 7:04 pm | अजया
लेख आवडला.
6 Aug 2014 - 7:54 am | आतिवास
आज दोन्ही भाग वाचले.
माहितीपूर्ण लेखन आहे. तुमची मांडणी अतिशय साधी-सोपी असल्याने वेगळा विषय वाचतानाही अडखळायला झालं नाही.
6 Aug 2014 - 8:52 am | पाषाणभेद
फारच छान लिखाण.
7 Aug 2014 - 12:53 am | प्यारे१
अभ्यासपूर्ण लेख.
11 Aug 2014 - 12:26 pm | psajid
उत्साह देणाऱ्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद !
17 Aug 2014 - 8:01 pm | प्रदीप
दोन्ही भाग सुंदर व अतिशय माहितीपूर्ण लिहीलेले आहेत. तसेच काही वर्णने --उदा. लावणीचे-- चित्रस्पर्शी आहेत. लेखात ह्या क्षेत्रातील महत्वाच्या कलाकारांच्या कार्याच घेतलेला सविस्तर आढावाही आवडला. प्रमुख कलावंतांप्रमाणेच काही ढोलकीवादकांविषयीही वाचावयास आवडले असते. मला व्यक्तिश: राजाभाऊ जामसांडेकर आणि लालाभाऊ गंगावणे ह्यांव्यतिरीक्त इतर कुणी ढोलकीवादक ठाऊक नाहीत, तेव्हा त्यांजविषयी काहीतरी येऊ द्या.
बतावणी व लावणी ह्यांच्या कार्यक्रमातील टप्प्यांविषयी मात्र लेख वाचून थोडा संभमात पडलो आहे. गण व गौळण ह्यांनतर बतावणी होते व नंतर लावण्या सादर होतात, का बतावणीनंतर लगोलग लावण्या सादर होतात?
तमाशातील कलावंतांच्या वाट्याला येणार्या हालअपेष्टा, समाजकडून होणारी अवहेलना, व आयुष्यभर जीवघेणी धडपड केल्यानंतरही अपरिहार्य असलेली विपन्नावस्था ह्यांविषयींची थोडक्यात केलेली टिपण्णीही समजली. ह्यांविषयी सविस्तर लेख काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातून वाचनात आला होता, मला वाटते तो 'युनिक फीचर्स' तर्फे संकलीत करण्यात आलेला होता. तेव्हा ह्या लेखातील कलावंतांच्या हलाखीच्या आयुषबद्दलच्या माहितीने आश्चर्य वाटले नाही. मात्र ह्याविषयी माझी मते इथे नमूद करतो.
बदलत्या काळाबरोबर समाजातील सर्वच घटकांना बदलणे अपरिहार्य आहे. त्यातून तमाशा का सुटावा? अगदी रोखठोक सांगायचे तर निव्वळ कलेच्या आवडीसाठी कुणीही एखाद्या व्यवसायात पडत नाही. तसे पडूही नये. कारणे शेवटी इतर व्यवसायांप्रमाणेच हाही एक व्यवसायच आहे, सदर व्यक्तिंचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. तेव्हा त्या व्यवसायास इतर मनोरंजक व्यवसायांची स्पर्धा होणार, त्यास त्या कलाकारांची तयारी असणे जरूरी आहे. काळ पूढे जात रहातो, समाजाच्या जडणघडणीत परिवर्तने अपरिहार्यपणे होत रहातात. त्यास व्यावसायिकांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवली नाही, तर शेवटी हालअपेष्टाच पदरी पडणार. वास्तविक थोडे तटस्थपणे पाहिले तर तमाशांतील अनेक व्यक्तिंच्या घराण्यातच तो व्यवसाय असतो. ही कुटुंबे गावोगावी हिंडत असतात. मुळातच व्यवहार बराचसा आतबट्याचा, त्यातून सर्वच कुटुंब वारंवार स्थलांतरीत होण्यामुळे मुलाबाळांना शिक्षण मिळणे दुरापास्त होते. मग चाळ/ढोलकी पायात/ हातात येणे हाच एक जगण्याचा उपाय रहातो. मग पुढील दुष्टचर्य सुरूच रहाते. हे कसे भेदणार? मुळात ते तसे भेदता येईल तरी का? ह्याचा विचार व्हावा.
साजिदभाई, लेख अत्यंत आवडला, हे पुन्हा नमूद करतो. असेच लेखन आपल्याकडून अजूनही येऊ द्या.
18 Aug 2014 - 11:35 am | psajid
लावणी ही गवळणी नंतर जो फार्स असतो ( उदा. एका गावातील चार इरसाल व्यक्ती (नमुने) तमाशा ठरवायला जातात तिथे त्यांची आणि त्या तमाशाची मालकीण यांच्यातील विनोदी संवाद होतो आणि ती तमाशा मालकीण त्यांच्यापुढे आपल्या नृत्यांगनाकडून गाणे आणि नाच सादर करते ) त्यामध्ये आणि वग सुरु झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यातील प्रसंगसमर्पक लावणी सादर केली जाते.
तमाशा ने काळानुरूप बदलावे म्हणण्यापेक्षा आताचा तमाशा तसा बदलला आहेच. त्याने नव्याचा स्वीकार केला आहे. मात्र पूर्वीचा जो अभिजात तमाशा ज्यांनी सादर केला आहे आणि ज्या लोकांनी तो सुवर्णकाळ अनुभवला आहे असे रसिक प्रेक्षक यांना आताचा तमाशा सादर करणे आणि पाहणे नको होते. तमाशा चा पूर्वीचा रुबाब आणि आताचे स्वरूप याविषयी स्वतः श्री. रघुवीर खेडकर आणि शांताबाई सातारकर यांनी दिलीली मुलाखत त्यांनी कथन केलेले त्यांचे आयुष्य आणि अनुभव याविषयीची विडीओ लिंक येथे देतो आहे. ज्यामधून या कलेची फरफट अजूनही थांबली नाही हेच सिद्ध होते.
http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=9XhjiL8RSIY
आणि
http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=1ZqEJQWP_ZE
2 Mar 2019 - 11:40 am | DRahul
साजीद भाई खुप खुप धन्यवाद .........................
........................तमाशाच्या रंगीबेरंगी व झगामगा दुनीयेतील पडद्यामागे ...असलेल्या ..अंधकारमय ..जीवनावर ...प्रकाश टाकणारा ...लेख ..............
...साजीद भाई .....तमाशा कलावंताच्या जीवनावर विशेषता ...पठ्ठे बापूराव ...याच्यां विषयी ...माहीती ...गोळा करण्यासाठी ...मी रेठरे हरणाक्श ला गेलो होतो ....पण ..खुप जुजबी ....माहीती ...मीळाली.....मला आणखी माहीती हवी आहे ....तुम्ही ...मला ...मदत कराल ...अशी आशा आहे.......माझ्या ...विनंतीला. मान देऊन ...माझ्याशी ..संपर्क कराल ...अशी आशा बाळगतो...मो.न. 8104176284.....