नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो.
नुकतीच पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभाग वाढवण्याचा एक प्रयत्न सुरु केला आहे. ‘myGov’ किंवा ‘मेरी सरकार’ हे संकेतस्थळ शनिवारी, २७ जुलै २०१४ ला सुरु करण्यात आलं असून त्यात कोणालाही सहभागी होता येईल.
सुरुवातीला सभासद होताना अडचण आली मला, पण ते 'खूप लोक एका वेळी संकेतस्थळावर आल्याने' झाल्याचे व्यवस्थापकांनी कळवले. नाव, पत्ता, ईमेल, फोन क्रमांक ही माहिती देऊन नाव नोंदणी करता येते. (अशी व्यक्तिगत माहिती देण्यात काहींना धोका वाटू शकतो.)
सध्या इथे सहा गट कार्यरत आहेत – स्वच्छ गंगा, मुलींचे शिक्षण, हरित भारत, कौशल्य विकास, स्वच्छ भारत, डिजीटल इंडिया.
सध्या तुम्हाला चार गट निवडता येतात – खरं तर तीन – कारण तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्याच्या गटात तुमचे नाव सामील होते. मी ‘मुलींचे शिक्षण’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘हरित भारत’ असे तीन कार्यगट निवडले आहेत. संबंधित मंत्रालय या गटात होणा-या चर्चेची नोंद घेईल असे अपेक्षित आहे. चांगले मुद्दे मांडणा-या सभासदांना प्रत्यक्ष पंतप्रधांनांना भेटण्याची संधी मिळेल अशी वृत्तपत्रात बातमी होती.
या गटात फक्त चर्चा नाहीत, तर काही कामंही करता येतील.
उदाहरणार्थ ‘स्वच्छ भारत’ गटात एक काम असं आहे: ‘मिड डे मिल’ (मध्यान्ह भोजन) पुरवणा-या कोणत्याही स्वयंपाकगृहात जा, तिथल्या स्वच्छतेची पडताळणी करा आणि त्यात काय सुधारणा करता येतील यावर अहवाल सादर करा. हे काम पूर्ण करण्यासाठी अजून २६ दिवस बाकी आहेत, कामाला लागणारा वेळ आहे २ तास.
‘मुलींचं शिक्षण’ या गटात ‘मुलींसाठी विशेष कोणती कौशल्य अभ्यासक्रमात असावीत की ज्यामुळे त्यांना पुढे चागंली उपजीविका करता येईल’ असा एक उपक्रम आहे. अजून २६ दिवस बाकी असलेल्या या कामासाठी मी नाव नोंदवलं आहे.
इतर सभासदांचे विचार, अहवाल वाचून त्यावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे.
यात सामील होणा-या लोकांनी ही सगळी कामं एक नागरिक या नात्याने करायची आहेत. ‘आम्हाला सरकारने नेमलंय’ अशी काही भानगड नाही. त्यामुळे जबरदस्ती, दडपण, खोटेपणा.. असणार नाही अशी अपेक्षा आहे. हे पूर्ण स्वयंसेवी काम आहे – आपल्या खर्चाने, आपला वेळ देऊन, आपलं डोकं चालवून करायचा उद्योग आहे. पक्षीय अभिनिवेशाविना ज्यांना देशाच्या वाटचालीत सक्रीय सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे असं प्रथमदर्शनी दिसतं. पुढे काय होईल ते कळेलच लवकर.
अर्थात माहिती तंत्रज्ञानाची माहिती नसणारे लोक, निरक्षर लोक यात सहभागी होऊ शकणार नाहीत ही याची मर्यादा आहे. केवळ ‘श्रीमंत’ अथवा ‘मध्यमवर्गीय’ लोकांसाठी हे व्यासपीठ आहे अशी त्याच्यावर रास्त टीका होऊ शकते. परंतु या मर्यादा नसणारा वर्ग, जो आंतरजालावर वावरतो, तो यात सहभागी होऊ शकतो – ज्यात आपण सर्वजण आहोत.
‘मेरी सरकार’ संकेतस्थळ उपक्रमांत आपल्यापैकी जे कोणी भाग घेतील, त्यांनी त्यांचे अनुभव इथे सांगावेत यासाठी हा धागा. एकदा माझा ‘उप्रकम’ पूर्ण झाला की ते विचार मी इथं मांडेन, तसेच अन्य सदस्यांनीही करावे. अनुभवांची देवाणघेवाण असं या धाग्याचं स्वरूप आहे.
आपले राजकीय विचार या धाग्यापासून आपण दूर ठेवावेत अशी सर्वांना विनंती, माझ्या दृष्टीने हा समाजकारणाचा उपक्रम आहे – त्या दृष्टिकोनातून मतमतांतरे आणि चर्चा यांचे स्वागत आहे.
प्रतिक्रिया
30 Jul 2014 - 2:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
वेबसाइट बघतोय..सध्या इतकेच
30 Jul 2014 - 2:44 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
संस्थळ पाहून प्रतिक्रिया देईनच.
30 Jul 2014 - 2:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक सूचना---तुम्ही दिलेल्या दुव्यात एक कंस जास्त पडल्याने ती चालत नाहीये...कंस काढावा
30 Jul 2014 - 2:44 pm | प्रचेतस
लिंक दुरुस्त केली आहे.
30 Jul 2014 - 2:47 pm | आतिवास
कृपया राजेंद्र मेहेंदळे यांनी लक्षात आणून दिलेला कंस काढून दुवा दुरुस्त करावा.
तसेच 'सहा गट कार्यरत आहेत' या वाक्यात 'डिजीटल इंडिया' हा सहावा गट जोडायचा आहे.
आभार.
धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे.
30 Jul 2014 - 2:53 pm | विअर्ड विक्स
वैयक्तिक माहिती द्यायची असल्यामुळे साशंक आहे.
30 Jul 2014 - 5:31 pm | पोटे
आपले राजकीय विचार या धाग्यापासून आपण दूर ठेवावेत अशी सर्वांना विनंती, माझ्या दृष्टीने हा समाजकारणाचा उपक्रम आहे
भाजपा विरोधी पक्षात होती तेंव्हा हे तत्व पाळत होती का ?