तमाशा : महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
25 Jul 2014 - 3:17 pm

नुकतेच जेष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश संभा खाडे यांचे वृद्धापकाळाने सांगलीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत ही जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला. तमाशातील त्यांची दोन हवालदारांची भूमिका आणि 'जहरी प्याला' हे वगनाट्य विशेष प्रसिध्द होते. पूर्वी गावी कोणत्याही समारंभामध्ये या वगनाट्याची कॅसेट वाजवली जायची. ते कलावंत म्हणून जसे मोठे होते तसेच माणूस म्हणूनही मोठे होते. आजच्या महागाईच्या काळात त्यांच्या फडावर भेटायला आलेले, कार्यक्रम ठरवण्यास आलेले, कलावंतांचे नातेवाईक यांना मोफत जेवण असे. फडावर रोज दोन्हीवेळा पाच-सात जण जेवायला हमखास असतातच. दर वर्षी पाच-सहा कार्यक्रम ते मदतीसाठी द्यायचे. कुठे शाळेची इमारत, कुठे मंदिराच्या उभारणीसाठी ते कार्यक्रम देत. रयतच्या अनेक शाळा-इमारतींसाठी त्यांनी कार्यक्रम दिले आहेत. कवलापूर त्यांचे गाव. तिथेही त्यांनी रयतच्या हायस्कूलला सभागृह बांधून दिले आहे. गावच्या यात्रेत दर वर्षी यांचा तमाशा व बॅ. पी. जी. पाटील यांचे व्याख्यान असा शिरस्ताच ठरून गेला होता. बॅ. पाटील प्रत्येक व्याख्यानात मी काळू-बाळूंच्या गावचा असे सांगायचे.
माझ्या गावापासून (दह्यारी) तमाशातील आराध्य दैवत पठ्ठे बापूराव यांचे गाव (रेठरे हरणाक्ष जि. सांगली) जेमतेम ५ ते ६ कि.मी. आहे आणि खेड्यातील हा रांगडा कलाप्रकार माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालत आलेला आहे. आज त्यांच्या आठवणीमध्ये बुडताना गावाकडचा तो तमाशा पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला.
वरवर पाहता तमाशा हा खेडवळांचा भडक शृंगार वाटत असला, तरी तमाशा-क्षेत्रातील सुप्रसिद्ध कवी पठ्ठे बापूराव यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लौकर यावे सिद्ध गणेशा । आतमध्ये कीर्तन वरून तमाशा ॥’ असा त्याचा मूळचा प्रकार आहे. भक्ती व शृंगार या दोहोंच्या संयोगातून तमाशाचा जन्म झाला आहे.
तमाशा म्हणजे तम + आशा = तमाशा !
म्हणजे अंधारामध्ये प्रकाशाची आशा देणारा ! थकल्या जीवाला थोडासा विरंगुळा देऊन सर्व दु:खाला विसरायला लावणारा तो म्हणजे तमाशा !
लोककलातून आध्यात्माची शिकवण देणारे आणि माणसाला दु:खापासून दूर नेणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत सांगितले जाते ती कला म्हणजे तमाशा !
हा रंजनाचा प्रकार महाराष्ट्राच्या कुशीत पोसला, या मातीतील दयाळू, कनवाळू रसिकांच्या आश्रयाने वाढला. म्हणूनच आजच्या विपरीत आणि संकटकालीन परिस्थिती मध्येही लोकांशी आणि मातीशी इमान राखून राहिलेला अस्सल रांगडा ग्रामीण मनोरंजनाचा खेळ म्हणजे तमाशा !
तांबड्या फेट्यांचा हलता-डुलता सागर, शिट्ट्यांचा आवाज, हवेत तरंगणारे रुमाल आणि या सार्‍या वातावरणाला आपल्या ठेक्यात बांधून ठेवणारी ढोलकी, ढोलकीच्या तालावर थरथरणारी घुंगरं आणि घुंगरू बांधून नर्तन करणारी कलावंत - ‘या बसा मंचकी राया’ असे म्हणत ही कला महाराष्ट्राच्या मनामनातून डोलते आहे. म्हणूनच तमाशा आपल्या अढळपदावरून हालत नाही. मराठी मन जसं अध्यात्माला आपल्या जीवनात अढळपद देतं, तसं ते रंगबाजीचे, मनोरंजनाचे दरवाजेही बंद करीत नाही. महाराष्ट्राच्या याच रंगेल मनाला उधाण येतं ते फक्त तमाशा - लावणीच्या फडासमोरच. शतकानुशतके चालत आलेली ही लोककला, लोकपरंपरा आजच्या पिढीलाही मोहविते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तमाशाने मराठी मनाची नेमकी गरज ओळखली आणि त्या पद्धतीनं या कलेची रचना केली गेली. माती व बैलगाडीच्या स्टेजला ओलांडून पारावरच्या कट्ट्यावरून आताच्या भव्यदिव्य स्टेज पर्यंतचा प्रवास करत तमाशा आजही महाराष्ट्रातील रसिकांना भुरळ घालतो आहे.
तमाशामध्ये फडाचा मुख्य हा सरदार किंवा नाईक म्हणून ओळखला जातो. पूर्वी हा सरदार बहुश्रुत, शीघ्रकवी व उत्तम संपादणी करणारा असे. हा बहुत करून या फडाचा मालक ही असे. ढोलकी व कड्याची हलगी वाजविण्यातही तो कुशल असे. या पात्रांबरोबरच नायक, नायिका, सोंगाडया, एक तुणतुणेवाला, एक मंजिरिवाला, एक ढोलकीवाला, एक कडेवाला सामान्यतः नाच्या किंवा नाची, व री ओढणारे सुरत्ये वा झीलकरी हे सर्व सरदाराचे साहाय्यक असतात. या लोकांच्या सहाय्याने तमशाला रंग भरला जातो. तमाशात 'सोंगाड्या'चे स्थान महत्त्वाचे असते. तमाशातील दोन लावण्यांचा संदर्भ दाखवणारे भाषण त्याला करायचे असते. यालाच संपादणी करणे असे म्हणतात. थोडक्यात तमाशामध्ये शाहीर तसेच नृत्यांगना यांच्याइतकेच महत्त्वाचे स्थान सोंगाड्याला असते. आपल्या विनोदाने तो प्रेक्षकांना खळाळून हसायला लावतो. ग्रामीण भाषा, द्वर्थी शब्द यांचा वापर करून विनोद निर्मिती करण्यात सोंगाड्या पटाईत असतो. तमाशात 'लावणी' या प्रकाराला विशेष महत्त्व आहे. या मध्ये नृत्यांगना पारंपारिक महाराष्ट्रीय वेशभूषेत नृत्य करताना स्वतः गातही असते. आणि आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते. लावणीमधील कवन रचणे हे शाहीराच काम. कधी कधी लावणीनुसार शाहीर ढोलकी गळ्यात अडकवून नृत्यांगनेच्या पायातील घुंगरूची आणि ढोलकीची जुगलबंदी करतो. तमाशामध्ये केवळ शृंगाराने भरलेली लावणीच सादर केली जाते असे नाही; तर स्वातंत्र्यप्रेमाने भारलेली कवने, पोवाडे, स्त्रियांची दु:ख, राजकीय सामाजिक स्थिती यांचेही वर्णन केले जाते. शृंगाररसाबरोबरच भक्तीरस व वीररसालाही तमाशात स्थान दिले जाते.

क्रमश:
(श्री. साजीद पठाण)

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

25 Jul 2014 - 4:05 pm | विजुभाऊ

दुर्दैवाने तमाशा याचा अर्थ केवल बाईचा नाच या पुरताच मर्यादित राहिला आहे.

एस's picture

25 Jul 2014 - 4:09 pm | एस

पुढील भाग जरा सविस्तर टाकावा अशी विनंती.

आवडला लेख. पुढील भागाची वाट बघत आहे.

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 4:54 pm | प्यारे१

क्रमशः ची वाट बघतोय.

तमाशामध्ये हिंदी चित्रपटां मधली गाणी आणि नाच आले तेव्हापासून तमाशा ची वाट लागली.

रेवती's picture

25 Jul 2014 - 5:40 pm | रेवती

लेखन आवडले.

बॅटमॅन's picture

25 Jul 2014 - 6:04 pm | बॅटमॅन

साजिद साहेबांचं लेखन खास आपल्या सांगलीकडचं असतं, ते वाचायला लय मज्जा येते. अशेस लिहीत रहा साहेब, आवर्जून वाचणारं लै लोक हैती इत्कं ध्यानात ठिवा मंजी झालं!

(मिरजकर) बॅटमॅन.

कपिलमुनी's picture

25 Jul 2014 - 7:33 pm | कपिलमुनी

कृष्णा-येरळेच्या काठाचं पाणी आहे ते :)

( बलवडीकर ) मुनी

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2014 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग... *i-m_so_happy* पु.भा.प्र...

एसमाळी's picture

25 Jul 2014 - 7:53 pm | एसमाळी

छान लेख.पुढील भागाच्यच प्रतिक्षेत.

psajid's picture

26 Jul 2014 - 11:07 am | psajid

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !