अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स
सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते. ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले.
टेलेफेरीक प्रवेशद्वार
फनीक्युलर रेल्वेतून जाताना
फनीक्युलर रेल्वे. वरिल चित्र आंजावरुन साभार
इथे जाण्यास तुम्ही लायकाबेट्टस रंगमंचापर्यंत टॅक्सी करु शकता व तिथून तुम्ही वर डोंगरावर पायी चढून ही जाऊ शकता.
लायकाबेट्टस डोंगर हा चुनखडीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून ९०८ फीट उंच असा हा डोंगर आहे ज्याचे अधम सर्व बाजुंनी पाईन झाडांनी वेढलेले आहे. ग्रीक पुराणानुसार अथेनादेवी जेव्हा अॅक्रोपोलिसवरच्या तिच्या मंदिराचा बांधकामासाठी शिळा घेऊन जात होती तेव्हा तिच्या हातून त्यातील जो दगड खाली पडला त्याचा हा डोंगर तयार झाला. एकेकाळी तिथे लांडगे वावरत असलेले अरण्य होते आणि ग्रीक भाषेत लांडग्याला लायकोस म्हणतात म्हणून ह्या डोंगराला लायकाबेट्टस असे नाव पडले.
ह्या डोंगरावर सेंट.जॉर्ज चे एक चर्च / चॅपल आहे. पांढर्या शुभ्र रंगाचे चर्च अत्यंत साधे पण तितकेच सुंदर दिसते. इथे आत फोटो काढायला मनाई आहे. असे मानले जाते की राणी ओल्गाला ह्या चर्चचे भग्नावशेष सापडले होते. तिने त्याचा जीर्णोद्धार केला. संपूर्ण परिसर संगमरवराने सजलेला आहे आणि तेथेच राणी ओल्गाने एक बेल टॉवर बांधला आहे.
सेंट.जॉर्ज चॅपल
बेल टॉवर
इथून संपूर्ण अथेन्स शहराचे मोहक दृश्य दिसते.
लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस.
अथेन्स शहराचे दृश्य.
खाली एक भले मोठे गार्डन रेस्टॉरंट आहे आणि थोडं खाली उतरून गेलं की लायकाबेट्टस रंगमंच आहे.
गार्डन रेस्टॉरंट
लायकाबेट्टस रंगमंच
लायकाबेट्टसवरून आम्ही खाली उतरलो व थेट ग्रीक पार्लमेंट बघायला गेलो. आम्ही सिंतागामा स्क्वेअरला पोहोचलो , पुरातन ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "आखणी", "करार" तर आधुनिक ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "राज्यघटना". ३ सप्टेंबर १८४३ मध्ये ऑट्टो राजाने मान्यता दिलेली ग्रीक राज्यघटना, म्हणजेच सिंतगामा. तर ह्या सिंतागामा स्क्वेअरला पोहोचताच त्याच्या मेट्रो स्टेशनाच्या पलीकडे आहे ग्रीक पार्लमेंट जिथे दर तासाला चेंज ऑफ गार्ड्स होतं Tomb of the Unknown Soldiers समोर.
Tomb of the Unknown Soldiers
ग्रीक सैनिकांना Evzones किंवा Evzoni असे म्हटले जाते. सैन्यात भरती होण्यासाठी ह्या सैनिकांची उंची कमीतकमी ६'१ फी. असावी लागते. त्यांचा पेहराव/ गणवेष ही खासचं असतो. भल्या मोठ्या बाह्यांचा पांढरा किंवा खाकी अंगरखा असतो, त्याखाली लोकरीची घट्ट विजार. डोक्यावर लाल टोपी आणि त्या टोपीला भला मोठा काळा रेशमी गोंडा. लाल चामडी बुट ज्याच्या सोलला बुटाच्या मापाप्रमाणे ६० ते १२० खिळे असतात ह्या बुटांना Tsarouhi असे म्हणतात.
Tsarouhi
त्यांची मार्च पास्ट करण्याची एक विशिष्ट पद्ध्त आहे. नेहमीप्रमाणे मार्चींग सुरु करुन हळु हळू एक-एक पाय उचलून मार्च पास्ट करायचे आणि मग उजवा पाय जोरात आपटत चालायचे. त्यांच्या बुटांवर काळ्या रंगाचा मोठ गोंडा असतो ज्याला पॉम पॉम म्हण्ट्ले जाते. हे एव्हझोन्स एकमेकांसोबत दर पंधरा मिनिटांनी जागा बदलतात व इतरवेळी नि:स्तब्ध उभे असतात.
चेंज ऑफ गार्ड्स
चेंज ऑफ गार्ड्स
अनेक पर्यटक त्यांच्याबरोबर फोटो काढायला उत्सुक असतात , फोटोग्राफीला परवानगी आहे देखील पण कुठल्याही प्रकारच्या खाणाखुणा उदा: व्हिक्टरीसाईन किंवा त्यांना हात लावायला मनाई आहे. एव्हझोन्स ना कुणी त्रास देत नाही ना ह्यावर लक्ष ठ्वणारे दुसरे सैनिक तेथे हजर असतात.
एव्हझोन्स
एव्हझोन्स
तेथून आम्ही प्लाका मार्केटला फिरायला गेलो. वेगवेगळ्या प्रकाराचे कॅफे, सोव्हेनियरची दुकाने , ग्रीक मिठाया - बकालावा, कतैफीची दुकाने, ऑलिव्ह ऑईलची दुकाने, ग्रीक हस्तकलेची दुकाने एक ना अनेक .
प्लाका
विविध उपहारगृह
दुकाने
दुकाने
गणपतींची चादर विकणारा स्टॉल
प्लाका मध्ये फिरता फिरता खरेदी करता करता वेळ कसा गेला समजले नाही. फिरता फिरता आम्ही Monastiraki ला येऊन पोहोचलो. तिथे आम्हाला अनेक दुकाने , उपहारगृह दिसली आता भुक ही लागली होती, वाटेत एक माणूस ओल्या नारळाचे तुकडे विकत होता, त्या उन्हात तो थंडगार नारळाचा तुकडा खाताना काय आनंद झाला म्हणून सांगू.
Monastiraki
तिथून पुढे एका दुकानात गेलो आणि तिथून अॅलेक्झँडर दी ग्रेटचा पुतळा खरेदी केला. त्या दुकानासमोर रोमन हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष दिसत होते.
हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष
हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष
आता भुक ही लागली होती म्हणून तिथल्याच स्केवरमधल्या एका उपहारगृहात आम्ही ग्रीक चिकन सुवालाकी खाल्लं. पिटामध्ये ग्रील्ड चिकन, सॅलॅड्स, त्झात्झिकि , चिली-मेयो, ऑलिव्ह्स, फ्रेंच फ्राईज असे रोल करुन देतात. त्याच बरोबर आम्ही लेमोनेड आणि पुरुषांनी तिकडची प्रसिद्ध मिथोस बियर आणि Courgette पॅटिस विथ त्झात्झिकी डिप मागवले.
ग्रीक सुवालाकी
बसल्या बसल्या तिकडच्या उपहारागृहात ठेवलेल्या तिळाचा ब्रेड दिसला :) त्याला Koulóuria म्हणतात .
Koulóuria
आता Monastiraki पर्यंत आलोच होतो म्हणून तसेच तेथून आम्ही पिराऊसला जाण्यासाठी मेट्रो पकडली. २०-२५ मिनिटांत आम्ही पिरऊसला पोहोचलो. पिराऊसला जाऊन आम्ही ब्ल्यु स्टार फेरीजच्या कार्यालयात जाऊन आमची नॅक्सोस व सॅंटोरीनीची बूक केलेली तिकिट कंफर्म केली.
पिराऊस बंदरावर दिसणारी नॅक्सोसची बोट.
उद्या आम्हाला सकाळी सातची बोट पकडायची होती नॅक्सोससाठी. आजचा दिवस पण मस्तं मजेत गेला होता. आम्ही पिराऊसवरुन ओमोनियाला जाणारी मेट्रो पकडली आणि हॉटेलला पोहोचलो. मस्तं हॉटेलवरच जेवण मागावले आणि कालसारखेच हॉटेलच्या गच्चीवर लायकाबेट्ट्सला न्याहाळत, गप्पा मारत मस्तं जेवलो :)
पहाटे ५:४५ ला हॉटेल सोडायचे होते म्हणून लवकर जेवणं आटोपून आम्ही रुममध्ये आलो आणि गादीवर पडल्या पडल्या गाढ झोपी गेलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Jun 2014 - 6:49 am | मुक्त विहारि
फोटो आणि व्रुत्तांत, दोन्ही मस्तच...
बाकी,
१. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे.
२. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार.
३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.
27 Jun 2014 - 7:12 am | सानिकास्वप्निल
हम्म्म
दुरुस्ती करण्यात आली आहे, गल्तीसे मिशेट्क हो गयी :)
बर्याच ठिकाणी असल्या ग्रफीटीचे दर्शन होते, त्यांच्या मेट्रो तर अख्ख्या ग्रफिटीने भरलेल्या आहेत :(
लेखमाला? हॅ हॅ हॅ पाकृ देईन एखाद दुसरी :)
27 Jun 2014 - 7:31 am | मुक्त विहारि
तुम्ही मस्त तिकडे ग्रीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि मिपाकरांची मात्र, एखाद्या पा.क्रु. वर बोळवण करा....
27 Jun 2014 - 6:59 am | यशोधरा
छान लिहिलं आहे. फोटोही सुरेख. प्राचीन बांधकामाच्या अवशेषांवरुन एके काळी हेच बांधाकम, इमारती, प्रासाद किती देखणे दिसत असतील, असे वाटले..
27 Jun 2014 - 8:11 am | अजया
टेकडीवरुन दिसणारे अक्रोपोलीस चा फोटो खूप आवडला. सगळं अॅक्रोपोलीस एका नजरेत सामवलं आहे !
वर्णन छानच . ग्रीक खाऊची वर्णनं आमच्या लाडक्या शेफ पा.कृ लिहायला विसरल्या नाहियेत याची खात्री करुन देत आहेत *wink*
27 Jun 2014 - 10:05 am | मधुरा देशपांडे
पुभाप्र
27 Jun 2014 - 6:00 pm | Mrunalini
मस्तच सानिका.. फोटो बघुन मला भुक लागली. आता सँतोरिनीच्या फोटोंची वाट बघतीये. लवकर टाक पुढचा भाग.
27 Jun 2014 - 6:08 pm | बॅटमॅन
फोटो मस्तच आहेत, पण ते थिएटर ऑफ डायोनिसिअस पाहिले नैत काय ओ तुम्ही? आधीच्याही भागात उल्लेख कुठे दिसला नै म्हणून म्हटलं. तिकडे अख्ख्या ग्रीसमध्ये जगप्रसिद्ध असलेले नाटकांचे प्रयोग व्हायचे.
बाकी खाद्यपदार्थ इ.इ. नेहमीप्रमाणेच झकास!!! कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल, उदा.
"पॉस ईस्ते?" कसे आहात?
"कालिमेऽरा!" गुड मॉर्निंग, "कालिनिख्ता", गुड नैट, "एफ्खारिस्तो पॉल्ला", थँक्यू व्हेरी मच, "ओला काला", ऑल राईट, इ.इ.
27 Jun 2014 - 8:45 pm | सानिकास्वप्निल
डायोनिसिअस चा रंगमंच नाही बघीतला कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की थिएटरात काही शोज होतात आणि त्यांचा त्यादिवशीचा शो रात्री होता त्यामुळे दुपारी आतून रंगमंच बघायला मनाई होती. आम्हाला रात्री जमणं शक्य नव्हतं म्हणून तो राहून गेला, पुन्हा केव्हातरी :)
हो मीसुद्धा काही बेसिक ग्रीक शब्द शिकून घेतले होते उदा: कॅलिस्पेऽर - गुड ईव्हनिंग, नॅ - येस, एफ्खारिस्तो - थँक्यू, सिम्फोनी- ओके, पोसो कानी- हाऊ मच इज ईट?, सिग्नोमी- सॉरी, कातालवा- आय गेट ईट, पॅरॅकॅएलो - एस्क्युज मी तालिमेएरागोतेरा - सी यू लेटर :)
धन्यवाद.
27 Jun 2014 - 11:35 pm | बॅटमॅन
ओह ओक्के :)
बाकी ग्रीक शिकून घेतलेत हे उत्तम केलेत. :)
अवांतरः मायसीनीला (ग्रीक उच्चार मिकेनाइ) गेलेलात काय? अॅटिकामध्ये नाही, पेलोपोनीसमध्ये आहे पण अथेन्सहून तसे जवळ आहे. कदाचित पुढच्या भागात येत असेलही त्याचे वर्णन पण शेवटी आगामेम्नॉनच्या घराबद्दल उत्सुकता मावत नाही म्हणून विचारले इतकेच. :)
27 Jun 2014 - 11:48 pm | सानिकास्वप्निल
आम्ही अथेन्समध्ये फक्त दोनच दिवस होतो आणि जे पाहिले त्याबद्दल वृत्तांत लिहिले आहेच :)
बाकी पुन्हा संधी कधी मिळाली तर नक्की हे सगळं बघु हाकानाका :)
धन्यवाद
28 Jun 2014 - 1:47 pm | बॅटमॅन
हम्म, रैट्ट.
बाकी खाद्यपदार्थांचे फटूही लैच आवडले हे पुनरेकवार नमूद करतो. :)
27 Jun 2014 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चाललीय सफर !
मस्त फोटो. "लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस" विषेश आवडला.
"ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले." यावरून ग्रीक आणि भारतीय संस्कृत्यांचे नाते किती अभेद्य आहे हे अधोरेखीत झाले ;)
पुभाप्र
27 Jun 2014 - 8:02 pm | रेवती
लायकाबेट्ट्स रंगमंच, अॅथेन्स शहराचा नजारा असे सगळेच फोटू आवडले. ते सैनिक मात्र विनोदी पेहरावात आहेत.
27 Jun 2014 - 8:36 pm | सूड
पुभाप्र !!
27 Jun 2014 - 11:02 pm | खटपट्या
सर्व चित्रे आणि वर्णन छान
27 Jun 2014 - 11:11 pm | प्यारे१
मस्तच!
(ह्यांचा कॅमेरा 'फार भारी' आहे एवढं नक्की. ;) )
29 Jun 2014 - 1:42 pm | दिपक.कुवेत
पहिला फोटो फार आवडला.
30 Jun 2014 - 10:40 am | पैसा
प्रवासवर्णन आणि फटु अप्रतिम आहेत. त्या ग्रीक सैनिकांचे कपडे अजून जुन्या स्टायलीतले दिसताहेत. असे घेराचे अंगरखे आपल्याकडेही मुघल काळात वापरात होते.
30 Jun 2014 - 4:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
काय काय बघायचंय अजुन देव जाणे...भारतच पुर्ण फिरलो नाहीयए म्हणा अजुन...
फोटोही सुंदरच आलेत..पुभाप्र