बागलाण भटकंती - भाग १

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in भटकंती
30 Apr 2014 - 7:28 pm

सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत. भाग १

३-४ महिने आधी पासून बागलाणात जायचे नक्की ठरले असले तरी परंपरेला अनुसरून, बरोबर येणारे सदस्य, भटकंतीच्या तारखा, जायचे किल्ले, वाहन इत्यादी बाबतीत आमचे नियोजन (?) शेवटच्या क्षणा पर्यंत चालू होते. शेवटी अनंतचतुर्दशी च्या दिवशी रात्री पुण्यातून निघायचे नक्की केले. मुंबईहून अनुप एकटाच येणारा उरला असल्याने त्याला पण पुण्यातच यायला सांगितले आणि ३ लोक झाल्यामुळे ST महामंडळाच्या सेवेचा लाभ घेण्याचा बेत रद्द करून प्रशांत ची (भरपूर ट्रेक्सचा अनुभव असणारी) ऐसपैस इंडिका घेण्याचे ठरले. संध्याकळी निघायच्या वेळेस पावसाने साथ दिल्याने विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फारसा त्रास न होता रात्री ९ च्या आत प्रशांत कडे पोहचलो. तिथे आनंद हा चौथा भिडू पण बरोबर येणार असल्याचे कळले. एकूण ट्रेक चा कोरम पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत बरोबरचे सामान डिकी मध्ये लोड केले आणि गाडीला स्टार्टर मारला. पावसाने लावलेल्या हजेरी मुळे नृत्यसेवेसाठी अधीर झालेल्या गणेशभक्तांचा जरी हिरेमोड झाला असला तरी त्यामुळेच आम्ही वाटेत आनंद आणि अनुपला घेऊन पटकन नाशिक रस्त्याला लागलो. तोपर्यंत पावसाने पण चांगलाच जोर धरला होत. चाकण च्या अलीकडे तर गाडी च्या काचेवर कोणी तरी बादल्यांनी पाणी ओतावे असा पाउस पडत होता. समोर १० फुटावरचे पण दिसणे मुश्किल झाले. तेव्हा एक बऱ्यापैकी हॉटेल बघून गाडी बाजूला घेतली आणि आत जाउन जेवणाची ऑर्डर दिलि. तेवढ्यात घरून आलेल्या फोन वर प्रशांत ने इकडे पावसाचा मागमूस नसल्याचे सांगून टाकले. ह्यामागे अर्थातच घरच्यांनी उगाचच काळजी करू नये हा उदात्त हेतू होता!!

जेवण करून बाहेर पडेपर्यंत पावसाचा जोर जरा उतरून त्याने संथ लय पकडली होति. तेथून गाडी हायवेला लागली आणि अपेक्षेप्रमाणे गप्पांची गाडी सह्याद्री, आधीचे ट्रेक, त्यांचे गमतीदार अनुभव, फोटोग्राफी ह्या track वर आली. ह्यात अनुप अर्थातच आघाडीवर होता. पुढील गप्पां मध्ये मग आजोबा, कात्राबाई, हरिश्चंद्र, नळीची वाट, कोकणकडा, बोटा, रतनगड, साम्रद, भैरव-प्रचित, AMK, चांदोली, बिबट्या, चोरवणे, कोयना, कास,exposure, light , composition , full frame, दृष्टीकोन असे अनेक उल्लेख येत राहिले. अशा रंगलेल्या गप्पांच्या नादात संगमनेर मागे पडले तसा पाउस एकदम कमी झाल्याचे जाणवले. लगेच imd ची website पाहून बागलाणावर फार ढग नसल्याचे पाहून समाधान व्यक्त केले आणि थकवा दूर करण्या साठी चहाचा ब्रेक घेतला. तेथील हॉटेलच्या मामांशी गप्पा मारून गेले १-२ दिवस तेथील हवामान कसे होते ते जाणून घेतले. तिथेच 'Please Tack Token' हा मनोरंजक बोर्ड पाहून भरपूर हसून घेतले. प्रशांत ने लगेच त्याचा फोटो काढून FB वर टाकून दिला.

पुढचा प्रवास हा नाशिक मधून मुंबई आग्रा महामार्गाने होणार होता. अनुपला ह्या भागात भटकंतीचा दांडगा अनुभव असल्याने मग त्याने ह्या भागातील एक एक किल्ला, त्याचे महत्व, तेथे जायच्या वाट, तेथील लढाया ह्याची माहिती उलगडायला सुरुवात केलि. गेल्या ३ महिन्यात हा प्राणी घरी कमी आणि बागलाणात जास्त राहिला आहे. इकडे यायची ही त्याची ह्या मौसमातील तिसरी कि चौथी वेळ होति. पण त्याचा उत्साह पहिल्या खेपे एवढाच किंबहुना जास्तच होता. आग्रा महामार्गाला गाडी लागल्यावर प्रशांतला थोडी विश्रांती म्हणून मी सुकाणू हातात घेतले. इथून पुढे जेमतेम ८०-९० किमी वर ताहाराबाद होते. मुंबई-आग्रा महामार्ग हा ४ लेन चा प्रशस्त आहे. त्यातून रात्रीची वेळ आणि NH-4 च्या तुलनेत बरेच कमी असलेले traffic त्यामुळे अंतर वेगाने कापले जात होते.

नाशिकहून बागलाणात जाण्यासाठी सातमाळा डोंगररांग ओलांडावी लागते. हि सह्याद्रीच्या पश्चिम-पूर्व धावणाऱ्या उपशाखा पैकी एक आहे. (हरिश्चंद्र-बालाघाट आणि शंभू महादेव ह्या इतर दोन). सप्तशृंगगड, मार्कंडेय, धोडप, रवळ्या-जवळ्या, राजधेर, कोळधेर हे ह्या रांगेतील काही प्रमुख किल्ले. आग्रा महामार्ग सोडून भावडबारीच्या (बारी=खिंड) दिशेने गाडी वळविली तेव्हा फक्त मी आणि अनुप जागे होतो.

पहाटे ५ च्या सुमारास मुल्हेर मध्ये पोहचलो. प्रशांतला आणि आनंदला जागे केले आणि पुढील plan बद्द्ल चर्चा केली. सकाळी उजाडल्यावर वातावरणाचे 'रंग' बघून पुढील प्लान नक्की करावा असे ठरवून सर्वजण थोडी विश्रांती मिळावी म्हणून गाडीतच बसल्या बसल्या झोपी गेलो. ६:३० -६:४५ च्या सुमारास जाग आली. मुल्हेर तसे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. गावाचे नित्याचे व्यवहार सुरु होत होते. बाहेर येउन वातावरणाचा अंदाज घेतला. पावासाची लक्षणे काही दिसत नव्हति. पण वातावरणात बऱ्यापैकी haze होति. जी फोटोग्राफी च्या दृष्टीने योग्य नव्हती. पण आता त्यात फार काही करता येण्या सारखे नव्हते. त्यामुळे गावातच चहा मारून मुल्हेरच्या पायथ्या कडे गाडी वळविली. सुरक्षित जागा बघून गाडी कडेला लावली आणि मोठ्या backpacks, tripod , कॅमेरा bags असे सामान पाठीवर लादून घेतले. प्रशांत ने नवीन घेतलेली backpack तर खच्चून भरली होती, त्यातून ३.५ kg चा tripod , 6D , 70 -200 F 2.8 lens अशी pro सामुग्री पण त्याच्या पाठीवर होती. त्याचा सगळा जामानिमा १५ kg च्या घरात होता. पण गेले काही महिने treadmill वर भरपूर अंगमेहनत करून त्याने fats कमी करून muscle मास कमावले असल्याने तो ह्या fitness test साठी उत्सुक होता.
प्रशान्त
गाडी लॉक करून चालायला सुरुवात केली तोवर ८ वाजून गेले असावेत. थेट मुल्हेर कडे जाण्या ऐवजी आधी हरगड करून यावे असे ठरले. त्यानुसार मग हरगड आणि मुल्हेर ह्यांच्या मधील खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली. हरगड ची वाट तशी पटकन सापडावी अशी नाहीये पण अनुप ने GPS वर मागच्या वेळेस तो हरगडला आला होता त्याचा पाथ मार्क करून आणला होता त्यामुळे त्या भरवशावर बिनधास्त मार्गक्रमण सुरु केले. वातावरण दमट होते आणि वारा अजिबात नव्हता त्यामुळे सकाळच्या उन्हाचाही थोडा त्रास होत होता. पहिल्या दांडा पर्यंत येताना दमछाक सुरु झाली. तेथे काही क्षण थांबून खिंडी पर्यंत च्या रस्त्याचे अवलोकन केले आणि खिंडीतून पुढे कसा रस्ता आहे ह्याची अनुप कडून माहिती घेतली आणि पुढे निघालो. खिंडीत पर्यंतच १ तास गेला. खिंडीत आल्यावर जरा गार वारा लागल्याने तिथे थोडा वेळ ब्रेक घेतला. पाणी पिऊन ताजेतवाने झाल्यावर पुढील वाटेचा अंदाज घेतला. खिंडीतून मागे जाऊन आडवा traverse आणि मग एकदम धबधब्यातून वर चढणारी खडी चढण असे वाटेचे स्वरूप लक्षात आले. तिथून गडाचा आडवा पसरलेला माथा पण दिसत होता. तिथे, निघताना आपण हरगडला छोटे टेकाड म्हणून 'underestimate' केल्याचे प्रशांत ने मान्य केले.

खिंडीतून निघून आडवा traverse पटकन पार केला. मुख्य चढाईला सुरुवात करण्या आधी पाठीवरचे अनावश्यक ओझे झाडीत ठेवून दिले, त्याचा GPS Point मार्क केला आणि मोकळ्या खांद्यानी (आणि मनाने ) मुख्य चढणीला सुरुवात केली. चढण चांगलीच खडी होती. त्यातून ह्या गडाच्या वाटेला फारसे कुणी जात नसल्याने वाटेत बरेचसे गचपण होते. त्यातील काही झाडांचे काटे टोचून खाज सुटत होति. त्यातून मी नेमकी half -pant घातली असल्याने अजूनच त्रास होत होत. त्यामुळे स्वतःला मनोमन शिव्या दिल्या. साधारण तासाभरात गडाचा पहिला दरवाजा लागला, पण माथा अजून वर होता. एक एक करत ३ दरवाजे पार करत पार करून माथ्यावर पोहचलो. माथ्यावर एक छोटेसे शंकराचे देऊळ दिसले, तिथून पुढे एका छोट्या तळ्याकाठी विश्रांती साठी बसलो. बरोबर आणलेली शिदोरी सोडली आणि पोटपूजा उरकून घेतलि आणि गड प्रदक्षिणेला निघलो. साधारण १ किमी पसरलेला माथा पार करून गडच्या मुल्हेर बाजू कडील टोकापाशी आलो, इथून मुल्हेर आणि मोरा समोरच दिसत होते. तेथेच एक पंचधातू पासून बनवलेली तोफ होती. भर उन्हात देखील ती अजिबात तापलेली नव्हति. तेथून उत्तरेला हरणबारी धरणाच्या पलीकडे पसरलेली सेलबारी रांग आणि त्यातील न्हावीगड, मांगी-तुंगी हे सुळके दिसत होते. न्हावीगडाचा सुळका तर आकाशात घुसल्या प्रमाणे दिसत होता. ह्याच टोकावरून एक वाट थेट खिंडीत उतरते पण वापरा अभावी ती आता बुजलेली आहे.
मोरा आणि मुल्हेर - हरगड वरून
चढता सूर्य आणि वेळ ह्याचे भान ठेवून टोकावरून मागे फिरलो. परत तळ्यापाशी येउन पाणी पिउन घेतले आणि उतरायला सुरुवात केलि. सूर्यास्ताच्या golden hour मध्ये चांगल्या frames मिळवायच्या तर सूर्यास्ताच्या आत मुल्हेर च्या माथ्यावर पोहचणे क्रमप्राप्त होते. पण त्या आधी खिंडीत उतरून आडवा traverse मारून तेथून मुल्हेर माचीत पोहचणे असा मोठा टप्पा पार करायचा होता. घड्याळाच्या काट्यांवर नजर ठेवून मग प्रशांतने पुश करायला सुरुवात केली.

खिंडी पर्यंत उतरून खाली गावात उतरणारी वाट सोडून मुल्हेर माचीच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात वाटेने चालणे सोडून रांगायला लागेल असे रूप धारण केले. माची वर माजलेली झाडीच एवढी होती . त्यातून ह्या वाटेने फारसे कोण येत नसल्याने काही ठिकाणी तर सरपटत जावे लागत होते. आमचे एक वेळ ठीक होते पण असाधारण उंची च्या अनुपला इथे फारच खालच्या पातळीला यावे लागत होते :-) शेवटी हा झाडी चा टप्पा पार करून बाहेर येउन उभे राहिलो आणि मोकळा श्वास घेतला. तिथून मग सरळ वाटेने जात आधी मोती तलाव आणि मग माचीवरील प्राचीन सोमेश्वर मंदिर गाठले तो पर्यंत २:३० वाजले होते. येथे थोडा वेळ (जेवणासाठी) थांबणे आवश्यक होते. येथून मुल्हेर आणि मोरा ह्यांच्या मध्ये चढणारी वाट दिसत होती. साधारण १ तासाचे अंतर दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळेस च्या golden hour चा फायदा होण्यासाठी त्यावेळेत मुल्हेर च्या माथ्याला (मुल्हेर चा माथा पश्चिमेला आहे) असणे गरजेचे होते पण गडावर पाणी आणि निवारा नसल्याने तिथे रात्रीचा मुक्काम करता येणार नव्हता. पण हातातील वेळेचा (आणि दमलेल्या लोकांचा) विचार करता सूर्यास्ताच्या आत मोरा वर जाऊन मुल्हेर माथा गाठणे आणि सूर्यास्ता नंतर मुक्कामाला परत माचीत येणे ह्यात बरीच धावपळ होणार होती. त्यातून रात्रीचे driving झाल्यामुळे कुणाचीच झोप नीट झाली नव्हती त्यामुळे मग प्रशांत ने सहानुभूती पूर्वक विचार करून माचीतच थांबण्याला अनुमोदन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुल्हेर माथ्यावर जाऊन यावे असे ठरले.

आता माचीतच मुक्काम करायचा म्हंटल्यावर सगळेच थोडे निवांत झाले. पोटपूजा झाल्यावर प्रत्येकाने थोडी डुलकी काढून घेतली. जरा फ्रेश झाल्यवर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली. मुल्हेर किल्ला म्हणजे बागलाण प्रदेशाची एकेकाळची राजधानी होती. त्यामुळे येथे बरेच जुने अवशेष दिसतात. बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती. त्यावरूनच बागलाण हे नाव पडले असावे. ह्या सत्तेच्या अस्ता नंतर तिथे मोगलांची सत्ता आली. पुढे सुरतेच्या दुसऱ्या स्वारी नंतर महाराजांनी साल्हेर, मुल्हेर हे किल्ले जिंकून तेथे आपला वचक निर्माण केला.

माचीवर सोमेश्वर मंदिर, मोती तलाव ह्या बरोबरच गणेश मंदिर आणि चंदनबाव (बाव=विहीर) ही पाहण्याची ठिकाणे आहेत. ही चंदनबाव सध्या माजलेल्या झुडुपांच्या गर्दीत लपल्या मुळे पटकन सापडत नाही. येथे पण अनुप चे GPS कामाला आले. ही बांधीव विहीर मूळ तीन माजली होती परंतु आता बुजल्या मुळे एकच मजला दिसू शकतो. विहिरीत प्रवेश करायला दगडी पायऱ्या आणि सुंदर महिरपी प्रवेशद्वार आहे पण झाडी मुळे वाट बुजली आहे.

चंदनबाव बघून सोमेश्वर मंदिरात परत आलो. हे मंदिर देखील प्राचीन असल्याचे त्याच्या बांधकामाच्या रचने वरून लक्षात येते. बाहेर प्रशस्त चौकोनी सभामंडप, महिरपी खांब अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात उतरायला अरुंद पायऱ्यांची वाट आहे. बाहेरील बाजूला एक गणेशमूर्ती आणि समोरच शिवलिंग आहे. ह्या बाहेरील शिवलिंगाचे प्रयोजन मात्र कळात नाही. गणेशमूर्तीच्या बाजूला मोतीटाक्या पासून आलेला पाण्याचा नळ आहे (हे काम अर्थातच अलीकडच्या काळातील आहे). मंदिराच्या बाजूलाच एका खोलीत एक साधूबाबा राह्तात. त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या तुम्ही मूळ कुठले हा प्रशांतचा प्रश्न त्यांनी सरळ धुडकावून लावला (नदी चे मूळ आणि ऋषि चे कुळ शोधू नये म्हणतात !!). तेथे त्यांनी पाळलेली एक मांजर फिरत होती तिला पाहून आनंदची फोटोग्राफी आणि भूतदया दोन्ही जागृत झाली आणि त्याने मांजरीचे विविध angles मधून फोटो घेण्याचा सपाटा लावला. शेवटी मांजरच जरा आक्रमक होऊन लेन्स च्या दिशेने पंजे मारू लागली तेव्हा तो जरा थांबला.
मुल्हेरमाची वरील सोमेश्वर मंदिर
सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती त्यामुळे मग माचीवारच एखादी चांगली उंच जागा मिळते का हे बघण्यास बाहेर पडलो पण बरेच फिरून देखील हवी तशी जागा काही मिळेना. तेव्हा मग परत मंदिरा कडे आलो. पण तोपर्यंत सूर्यास्ताचे रंग बघता उद्या वातावरण चांगले राहील ह्याची आशा वाटू लागली. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आत साल्हेरच्या परशुराम टोकावर गेल्यास नक्कीच काही खास मिळेल असे मत प्रशांतने मांडले. पण मुल्हेर-मोरा हे दोन्ही करून सूर्यास्ताच्या आता साल्हेर चे सर्वोच्च टोक गाठणे हे परत वेळेच्या गणितात बसेना. तेव्हा मग सार्वमताचे दान साल्हेरच्या पदरात टाकून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो.

सकाळी तसे निवांतच उठलो. सकाळची आन्हिके उरकली आणि आदल्या रात्रीची मुद्दामून उरवलेली खिचडी नाश्त्याला खाल्ली. कुठल्याही ट्रेकला स्वैपाकाचा वेळ वाचाविण्याचा हा नामी उपाय आहे. नाश्त्यानंतर परत जड bags पाठीवर चढविल्या आणि माचीवरून उतरणारी वाट धरली. ह्याच वाटेवर तळयाकाठी असलेले सुंदर असे गणेश मंदिर आहे तेथे थोडावेळ थांबून थेट खाली उतरलो.
मुल्हेरमाची वरील गणेश मंदिर
मुल्हेर बाजारपेठेतून साल्हेरवर रात्रीच्या जेवणात खायला जिलेबी घेतली आणि गाडी साल्हेर च्या दिशेने वळविली. थोडे पुढे आल्यावर उजवीकडे हरणबारी धरणाचा मस्त नजारा दिसला. वातावरण पण चांगले होते आणि light पण चांगला होता म्हणून मग तिथे एक 'फोटोग्राफिक ब्रेक' घेतला. नेहमीच इकडे येत असल्यामुळे अनुप कडे बरेच चांगले फोटो झाले होते त्यामुळे तो फोटो काढत नव्हता. थोड्या वेळाने प्रशांत ने pack-up जाहीर केले तेव्हा सगळे गाडीत बसलो आणि साल्हेरवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. साल्हेर किल्ल्यावर जायच्या दोन प्रमुख वाटा आहेत त्यातील एक वाघाम्बे गावातून साल्हेर आणि सालोटा ह्यांच्या मधल्या खिंडीतून जाते तर दुसरी साल्हेरवाडी कडून वर चढते. पहिल्या वाटेने गेल्यास साल्हेर आणि सालोटा दोन्ही करता येतात, पण पावसाळ्याचे दिवस असल्याने सालोटा वर जाणे शक्य नव्हते. तसेच अनुपच्या मते साल्हेरवाडी हून चढणारी वाट जास्त 'भारी' असल्याने वाघाम्बेत न थांबता गाडी साल्हेर वाडी कडे घातली.
क्रमशः
हरणबारी धरण

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

30 Apr 2014 - 8:27 pm | आयुर्हित

सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.

१)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते.
२)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे.
३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती
४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते.

अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत

सह्यमित्र's picture

30 Apr 2014 - 10:33 pm | सह्यमित्र

आयुर्हित अधिक माहिति बद्दल धन्यवाद!

इष्टुर फाकडा's picture

30 Apr 2014 - 8:38 pm | इष्टुर फाकडा

लेख आवडला :)

सुहास..'s picture

30 Apr 2014 - 8:54 pm | सुहास..

वॉव !!

आयडी ओळखीचा वाटतोय ?

सह्यमित्र's picture

30 Apr 2014 - 10:31 pm | सह्यमित्र

सुहस माझा मिपा वरचा हा पहिलाच लेख आहे.

शुचि's picture

30 Apr 2014 - 10:07 pm | शुचि

लेख व फोटो फार छान.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2014 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा

लेख तो लेख...फोटो..सुबानल्हा!!!

यशोधरा's picture

1 May 2014 - 10:52 am | यशोधरा

भन्नाट फोटो! मस्त वर्णन!
मिपावरचा पहिलाच लेख आहे तर मिपावर स्वागत! :) येऊदेत अजून भटकंतीचे लेख. आहोत आम्ही वाचायला.

सुहास झेले's picture

1 May 2014 - 11:00 am | सुहास झेले

सुरेख.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात....पण साहित्यात मला तरी चित्रांचा अडथळाच वाटतो. लेखक जे अनुभव संपूर्ण प्रवासात घेतो, ते सांगण्यासारखी छायाचित्रे त्याला(/तिला) मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग लेखक थोडी तडजोड करून त्याला सर्वात जास्त आवडलेली छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने येणारे वर्णन येथे देतो. किंवा त्या छायाचित्रांचे काहीच वर्णन देत नाही. ती छायाचित्रे त्याच्या अनुभवांशी सुसंगत असतील तर उत्तम, नाही तर मग छायाचित्रे आणि लेख यांना वेगवेगळे ठेवून त्यांचा आस्वाद घ्यावा लागतो. माझ्या मते ह्यात लेखकाच्या लेखन कौशल्यावर थोडा अन्याय होतो. कारण छायाचित्रे पटकन लक्ष वेधून घेतात. गप्पा मारल्यासारखं जाऊन आलो, हे फोटो बघा, असे असेल तर काय प्रश्नच नाही, पण प्रवासवर्णन ही स्वतंत्र कलाकृती होण्यात छायाचित्रे ही मर्यादा होतील असे वाटते.

आपला लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख आहेत. छायाचित्रे केवळ अप्रतिम आहेत. वर "आयुर्हित" यांनी लिहिल्याप्रमाणे निसर्गाची भव्यता जाणवून देणारी छायाचित्रे आहेत आपली!! आम्हाला घरबसल्या उत्तम सफर झाली. धन्यवाद.

पाषाणभेद's picture

2 May 2014 - 1:13 am | पाषाणभेद

छान. एक वेगळाच विचार.
सह्यमित्र तुमचा कालचा आयडी काही वेगळाच होता. आज बदलला का? अजुन लेख येवूद्या.

सह्यमित्र's picture

2 May 2014 - 10:59 am | सह्यमित्र

तुम्हाल बदललेला कसा काय दिसतोय काहि कल्पना नाहि.

किसन शिंदे's picture

1 May 2014 - 4:50 pm | किसन शिंदे

जबराट आहे लेख आणि फोटोही..

प्रचेतस's picture

1 May 2014 - 8:10 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती

हे बागूल राजे सुरुवातीपासूनच खिलजी. तुघलक, गुजरात, बहमनी, गुजरात अशा काळानुसार बदलत जाणार्‍या सुलतानाचे मांडलिक होत होते. नंतर शहाजहानच्या दख्खन स्वारीनंतर हा प्रदेश मुघलांकडे गेला.

सह्यमित्र's picture

2 May 2014 - 10:57 am | सह्यमित्र

अधिक माहिति बद्दल धन्यवाद!!

पैसा's picture

1 May 2014 - 8:23 pm | पैसा

अगदी तपशीलवार वर्णन, माहितीने परिपूर्ण आणि सुरेख निसर्गाची भव्यता दाखवणारे फोटो! मस्त लेख झाला आहे! क्रमशः लिहायचं राहिलं का?

सह्यमित्र's picture

2 May 2014 - 10:53 am | सह्यमित्र

धन्यवाद. क्रमशः लिहिले आत्ता.पुढचा भाग लवकरच टाकीन.

आदूबाळ's picture

1 May 2014 - 10:29 pm | आदूबाळ

काय जबरदस्त लेख आणि फोटो! पुभाप्र!

सह्यमित्र's picture

2 May 2014 - 10:56 am | सह्यमित्र

धन्यवाद!! हे पुभाप्र कशाचे सन्क्षिप्त रूप आहे हो? बरेच मिपाकर लिहितात. पण मी नविन असल्याने माहित नाहि म्हणुन विचारले.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

पुलेशु असंही म्हणतील - म्हणजे पुढील लेखनाला शुभेच्छा.

"चान चान", जिलबी, डायरी भेट देणे, विविध घटनांसाठी सुभेच्छा वगैरे एवंगुणविशिष्ट प्रतिक्रिया आल्या तर मात्र सांभाळून ;)

श्रीवेद's picture

2 May 2014 - 9:19 am | श्रीवेद

फोटो दिसत नाहित.?

सह्यमित्र's picture

2 May 2014 - 10:50 am | सह्यमित्र

मिपा वर नविन असल्याने तुम्हाला फोटो का दिसत नाहित हे कळत नाहिये. कोणी मदत करु शकेल का?