विमानाचे पाय जमिनीला आणि माझे हात आकाशाला एकाच वेळी टेकले. पॅरीस..पॅरीस जन्मभर ज्या बद्दल वाचलं होतं त्या शहराच्या भूमीवर उतरणे रोमांचकारी होते. ह्या वर्षी ३ मार्चला पॅरीस शहरी दिलेली भेट निवांत शिवाय सपत्निक होती त्यामुळे आनंद द्विगुणित करणारी आणि विशेष रोमांचकारी होती.
मिपा सदस्य इस्पिकचा॑ एक्का ह्यांचा 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' हा लेख वाचल्यापासून ते डोहाळे लागले होतेच त्यातच इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या लंडन शहरातील एका पुस्तक प्रकाशनाच्या जाहिरातीने लक्ष वेधून घेतले आणि विचार ठाम झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचीच. पुस्तक प्रकाशन आणि लंडन सफर ते ही बाबासाहेबांच्या सानिध्यात कोहिनुर हिरा पाहणे, शिवाजी महाराजांची एक तलवार (भवानी नाही) तसेच अफजलखान वधासाठी वापरलेली मूळ वाघनखं पाहणं ह्याचेही आकर्षण होतेच. त्या नुसार ठाण्याच्या ट्रॅव्हल पॅक्स कंपनीच्या सफरीत नांव नोंदणी केली. आता लंडन पर्यंत जातोच आहे तर युरोप दर्शनाचाही ला॑भ उठवावा ह्या विचाराने युरोप सफरीचे आयोजिले होते. दुर्दैवाने, भरमसाठ पाऊस, लंडनची पूर परिस्थिती आणि बिघडलेल्या हवामानामुळे लंडन सफर पुढे ढकलण्यात आली. म्हणजे तेंव्हा ती माझ्यासाठी रद्दच झाली. निदान आपली युरोपदर्शन योजना पार पाडूया ह्या विचाराने मी आमच्या युरोपिय सफरीची आखणी केली, युरेल पास (१५ दिवस अमर्यादित प्रवास), पॅरीस, स्विट्झर्लंड, जर्मनी, इटली ह्या देशांमधील वास्तव्याची सोय केली, स्विट्झर्लंड मधील 'इस्पिकचा एक्का' फेम 'ग्लेशिअर एक्सप्रेस' चे तिकीट आदी आरक्षणं, माझ्या मस्कतमधील गेल्या अनेक वर्षांचा मित्र आणि ट्रॅव्हल एजंट प्रमोद पुरोहितच्या साहाय्याने केली. नुसती तिकिटांची सोय न करता, संपूर्ण प्रवासाचा आराखडा अगदी बारीकसारीक माहितीसह, त्याने तारीखवार तयार केला. एक फाईलच बनवून दिली होती. त्यात दर तारखेचा काय कार्यक्रम आहे, दोन ठिकाणांची अंतरं (उदा. पॅरीस विमानतळ आणि पॅरीसचे माझे वास्तव्याचे ठिकाण) त्यासाठी लागणार्या टॅक्सीचे अंदाजी भाडे, निवासाचा खर्च आधीच भरलेला आहे की तिथे प्रत्यक्ष भरावयाचा आहे, शहरदर्शनाच्या बसचे भाडे (जे आगाऊ भरलेले असायचे), बस सुटण्याचे ठिकाण, माझ्या निवासापासून तिथ पोहोचण्याचा मार्ग (गुगल वरून) वगैरे वगैरे अनेक बाबींचा समावेश त्या तारीखवार आराखड्यात होता. विशेष म्हणजे ३ - ३ ठिकाणी गाड्या बदलून दूसर्या शहरात जातानाही कुठली गाडी कुठल्या फलाटावर किती वाजून किती मिनिटांनी येईल ह्याचाही तपशील होता.( ही तपशीलवार माहिती मला, १ मोठी बॅग, १ छोटी बॅग, १ लॅपटॉप, १ कॅमेरा हे सर्व घेऊन, मध्यम आकाराच्या बायको बरोबर धावपळ करण्यास अत्यंत उपयोगी पडली.) ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा. ११.३३ ची गाडी ११.३३ लाच सुटते ३२ किंवा ३४ ला नाही. फलाट क्रमांकही बदलले नाहीत. ऐन वेळेला, विरार लोकल ५ नंबर फलाटावर शिरत असताना केलेली, '३ नंबर प्लॅटफॉर्म पर आनेवाली विरार लोकल आज ५ नंबर पे आएगी' अशी जीवघेणी तारांबळ उडविणारी ध्वनीक्षेपकावरील निवेदनं नाहीत. ध्वनिक्षेपकच दिसले नाहीत मला कुठे.
पॅरीसला निवासस्थानी सर्व सामान टाकल्यावर लगेचच पर्यटन धर्म निभावण्यास बाहेर पडलो. सर्वात पहिली गरज होती वाफाळणारा चहा. पण तिथे आपला भारतिय चहा, जो मस्तपैकी मसाला वगैरे घालून खळखळून उकळलेला असतो तो मिळणे दूरापास्त होते त्यामुळे कॉफी नामक पेयावर समाधान मानले. कॉफी आणि क्रोसाँ नामक पावाची किंमत अदा करून बाहेर आलो आणि आयफेल टॉवरच्या रस्त्याला लागलो. सौ. साडेसात युरो म्हणजे किती रुपये ह्या हिशोबात बोटे मोडत होती. तिला म्हंटले, पर्यटनाची मजा लुटायची असेल तर हिशोब करणं विसरून जा. ह्या थंडीत कुडकुडताना गरमागरम कॉफी मिळाली त्याचा आनंद घ्यायचा, ती किती कडू की गोड होती ह्याचा नाही. पण हे समजवताना (बहुतेक्) मी हातातल्या गुगल मार्गदर्शकावरील एक रस्ता चुकलो आणि आम्ही पॅरीसात अर्धा तास भरकटलो. शेवटी एका वाहतूक पोलीसाला आयफेल टॉवरचा पत्ता विचारल्यावर त्याने त्याच्या मोटरसायकलला जोडलेल्या संगणकातून तपासून मला अगदी आत्मियतेने फ्रेंच भाषेत पत्ता समजविण्याचा प्रयत्न केला. मी त्याला धन्यवाद देऊन वळलो आणि बायकोला म्हणालो, 'एक अक्षर कळले नाही.' पोलीस पत्ता समजावून देत असताना, माझा, त्याचे बोलणे शब्द अन शब्द समजत असल्याचा 'अभिनय' पाहून सौ. मला 'फ्रेंचही समजते' ह्या गैरसमजाने अगदी कौतुकाने माझ्याकडे पाहात होती, तिचा भ्रमनिरास झाला. त्याच्या हातवार्याच्या भाषेत समजलेल्या दिशेने १५ मिनिटे चालल्यावर पुन्हा एका सभ्य दिसणार्या माणसाला पत्ता विचारला. त्याला इंग्रजी आणि फ्रेच दोन्ही भाषा जेमतेमच येत होत्या. पण पत्ता माहित होता आणि तो समजविण्याची दुर्दम्य इच्छा त्याचे ठायी होती. पण जेंव्हा ते जमेना तेंव्हा त्याने मला विचारले 'तुला अरेबिक समजते का?' तो बहुतेक जॉर्डेनियन होता. अगदी माहेरचा माणूस भेटावा अशी माझी अवस्था झाली. मी 'होSS समजते की!' असे म्हंटल्यावर त्याने अरेबिक मध्ये पत्ता सांगितला. तो अगदी साधा सोपा होता. 'इथून सरळ जा. नदी लागेल. त्याच्या कडेने रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ सरळ जात राहा अगदी आयफेल टॉवरच्या पायथ्याशीच पोहोचशील.' पत्ता समजला होता. मी त्याला अरेबिकमध्येच 'शुक्रन' (धन्यवाद) म्हणून वळलो आणि आयफेल टॉवरच्या दिशेने चालू लागलो..... बायकोच्या डोळ्यांत कौतुक पुन्हा परतले होते.
नदीरस्त्यावर वळल्यापासून आयफेल टॉवर दिसत होता. पण दिसत होता... दिसत होता... दिसत होता... जवळ कांही येत नव्हता. आम्हालाही तशी घाई नव्हतीच. आजूबाजूचे पॅरीस न्याहाळत चाललो होतो. कचेरीतून घरी लगबगीने परतणारे स्त्री-पुरुष, झगमगणार्या शोरुम्स, बिअर आणि वाईनची रेलचेल उडविणारी उपहारगृह, कुत्र्यांना फिरायला नेणारे 'डॉग वॉकर्स' रस्त्याला बर्यापैकी गर्दी होती. एवढ्या थंडीत फिरणार्या ललना पोटर्यांपर्यंत चामड्याचे, उंच टाचेचे बुट घालून, तोकडे उबदार कोट आणि जाळीदार स्लॅक्स सदृष वसने लेऊन चटचटीतपणे घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या जाळीदार स्लॅक्स कडे एक कटाक्ष टाकून पत्नीने प्रश्न केला, 'ह्या टवळ्यांना थंडी कशी नाही वाजत?' मी म्हंटलं,' त्यांना पुरुषांच्या नजरांची उब मिळत असते.' 'तुम्ही सरळ समोर बघत चाला.' असा आदेश मिळाल्यावर माझाही नाईलाज झाला.
(छायाचित्र आंतरजालावरून साभार.) मी काढलेले छायाचित्र चुकून खोडले गेले (डीलीट झाले).
आयफेल टॉवर.. आयफेल टॉवर म्हणतात तो हाच. सौ. हरखून गेली होती. 'कस्सला स्सही आहे, नाही?'
रॉट आयर्नच्या ३२४ मिटर उंचीच्या मनोर्यासमोर आम्ही उभे होतो. फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या जागतिक प्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून हा मनोरा उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराचा आराखडा कसा असावा ह्या बद्दल अनेकांकडून विविध आराखडे सरकार दरबारी सादर केले गेले त्यातील गुस्ताव आयफेल ह्या अभियंत्याच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पॅरीस मधल्या मान्यवर चित्रकार, शिल्पकारांनी आणि समाजधुरीणांनी ह्या आराखड्यास आक्षेप घेतला होता. पॅरीस हे सुंदरतेने नटलेले शहर आहे. तिथल्या, आर्च ऑफ ट्रँफ, नॉन्स्त्र दॅम चर्च, आणि अनेकविध ऐतिहासिक आणि सौंदर्यसंपन्न वास्तुंपुढे हा 'लोखंडाचा ढिग' शहराला विद्रुप करतो आहे असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, 'नुसत्या कागदावरील आराखडा पाहून टॉवरच्या सौंदर्यावर ताशेरे ओढणे गैर आहे. आणि इजिप्तच्या पिरॅमिड्सचे कौतुक फ्रान्स मध्ये होऊ शकते तर टॉवरला आक्षेप का?' ह्या गुस्तावच्या प्रतिवादाने सरकार समाधान पावले. परंतु, एकूण खर्चाच्या फक्त १/६ खर्च सरकारने केला बाकी गुस्ताव आयफेलने केला आणि टॉवर उभा ठाकला. प्रदर्शन समाप्तीला तो उतरवायचा होता परंतू पुन्हा आयफेलने सरकारला त्याची उपयुक्तता पटवून दिली. पुढे तो फ्रान्सच्या रेडिओ लहरी प्रक्षेपण करण्यात अग्रेसर ठरला. दुसर्या महायुद्धात जर्मनांची चढाई रोखण्यातही टॉवर वरील बिनतारी यंत्रणेने महत्त्वाची कामगिरी बजावली. आजही टॉवरवरुन फ्रान्सच्या आकाशवाणीच्या प्रक्षेपणाला मोलाची मदत होते. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर उपहारगृह आहे तर दुसर्या मजल्यावर गुस्ताव्ह आयफेलचे ऑफीस आणि महत्त्वाच्या पाहुण्यांचे स्वागतकक्ष आहे. इथे ह्या उपहारगृहात आयफेल टॉवरला कडाडून विरोध करणार्यांचा म्होरक्या रोज येऊन बसायचा. त्याला एकदा एका पत्रकाराने विचारले, 'तुमचा ह्या वास्तूला एव्हढा विरोध होता तर आता तुम्ही रोज इथे का येऊन बसता?' त्यावर तो म्हणाला, 'हा टॉवर मला आजही आवडत नाही. मला तो माझ्या नजरेसमोर नको असतो. पण संपूर्ण पॅरीस मधून तो दिसतो. मी त्याचे दर्शन टाळू शकत नाही. फक्त इथे येऊन बसल्यावर त्याचे दर्शन होत नाही. पण सुंदर पॅरीस शहर मला दिसते, मनाच्या वेदना कमी होतात.'
आयफेल टॉवर वरून पॅरीसचे विहंगम दृष्य...
दुसर्या महायुद्धात हिटलरचे सैन्य आता फ्रान्स काबिज करणार असा अंदाज आल्यावर फ्रेंच सरकारने हिटलरला आयफेल टॉवरच्या वर सहजी जाता येऊ नये म्हणून आयफेल टॉवरच्या उदवाहकाचे (लिफ्टचे) पोलादी दोर कापून टाकले. महायुद्धातील पोलादाची टंचाई पाहता हिटलरला तातडीने पोलादी दोर उपलब्ध झाले नाहीत आणि त्याचा नाईलाज झाला. (परंतू, आयफेल टॉवरला वरपर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत त्या हिटलरने का वापरल्या नाहीत? असा मला प्रश्न पडतो.) फ्रान्स सोडून जाता जाता हिटलरने आपल्या जनरलला आयफेल टॉवर पाडून टाकण्याची आज्ञा दिली. पण त्या जनरलला सुबुद्धी सुचली म्हणा किंवा कसे पण हिटलरचा तो आदेश पाळला गेला नाही, आणि आयफेल टॉवर शाबूत राहिला.
टॉवरला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे (त्यात मिपाचा सदस्य म्हणून मीही आहेच). १८८९ साली जेंव्हा हा टॉवर बांधला तेंव्हा गुस्ताव्ह आयफेलच्या भेटीला थॉमस अल्वा एडीसन हा अमेरीकन शास्त्रज्ञ आला होता. त्यावेळी त्याने गुस्ताव्ह आयफेलला त्याचे नविन संशोधन असलेले फोनोग्राम हे उपकरण भेट दिले. हे थॉमस एडिसन ह्यांचे संशोधन त्या प्रदर्शानात ठेवलेले होते. ह्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचे दृष्य सर्वात वरच्या मजल्यावरच्या 'महत्त्वाच्या पाहुण्यांच्या स्वागतकक्षात' पुतळ्यांच्या स्वरुपात जतन केलेले आहे.
थॉमस अल्वा एडिसन आणि गुस्ताव्ह आयफेल.
गुस्ताव आयफेल ह्याने ह्या टॉवर नंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेची उभारणीही केली आहे.
आयफेल टॉवरचे सौंदर्य दिवसा जसे भव्य-दिव्य आहे तसे ते रात्रीच्या अंधारात दिव्यांनी उजळल्यावर काळया मखमलीवर चमचमणार्या एखाद्या हिर्याप्रमाणे लखलखीत आहे आणि आपल्या तोंडून एकच उदगार येतो......'व्वा!'.
टॉवरच्या प्रांगणात ठग लोकांचा वावर आहे. पुरुषांच्या बरोबरीने सुंदर सुंदर तरूण मुली तुम्हाला ठगवायला टपलेल्या असतात. त्यांचे सावज म्हणजे आशियायी आणि त्यातल्या त्यात भारतिय पर्यटक. 'एका तान्या बाळाला कर्करोग आहे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भात फक्त एक सही करा' असे भावनिक आवाहन केले जाते. सही केली की २० युरोची मागणी होते. आपण चरफडत देतो आणि आपण ठगवले गेलो आहे हे जाणवतं. काय करणार कर्करोगाचे कारण पुढे केले की मी 'अजूनही' फसतो. ह्या मुली तुम्ही कांही खात असाल तर त्याचीही मागणी करतात. कांही जणी तर हातातील खाद्य पदार्थ हिसकावण्याचा प्रयत्नही करतात. पुरूष पाकिटमार आपली सावजं हेरत असतात. त्यांच्यापासून साभाळावे. पण ह्या सर्वातून आयफेल टॉवर अलिप्त आहे. त्याचे सौंदर्य, भव्यता, त्यामागील कल्पकता आपल्याला नि:शब्द करते. भारावल्या मनाने आम्ही आमच्या निवासाकडे परतलो.
दुसर्या दिवशी मोर्चा होता... लुव्ह्र संग्रहालय.
लुव्ह्र संग्रहालय हे एक जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. त्याचा पसारा पाहता २-४ दिवसांत 'उरकायचा' हा विषय नाही हे सहज लक्षात येतं. त्यातून तुम्ही चित्रकला आणि शिल्पकलेतील दर्दी जाणकार असाल तर संपलंच. कमीत कमी महिना तरी लागेल सर्व दालनं पाहून आणि जाणून घ्यायला. सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. दिवसभर तंगडतोड करून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे कांही अप्रतिम नमुने पाहायला मिळाले. त्यातील ह्या कांही निवडक कलाकृती:
ह्या वरील सर्व तैलचित्रांमधील खेडेगावातील किंचित मागे रेंगाळलेली संध्याकाळ, उन - सावलीचा खेळ आणि एकूणातीलच जिवंतपणा आपली नजर खिळवून ठेवतो. कितीतरी सूक्ष्म तपशील चित्रकाराने मोठ्या कौशल्याने चितारले आहेत.
तेच, ह्या चित्रातील खवळलेल्या समुद्राचे रौद्र रुप भयावह वाटते.
ह्या आपल्या 'मोनालीसा' काकू. का एवढ्या सर्वांना आवडतात कांही कळत नाही. यमीच्या चारपट गोर्याही नाहीएत.
तैलचित्रांमध्ये अजून बरेच कांही पाहण्या-सांगण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव जास्त लिहीत बसत नाही. येशूची, मेरीची आणि फ्रेंच राजघराण्यातील कर्तबगार योध्यांची अनेक चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. इंग्रजांची चित्र शैली, अरबस्थानातील तैलचित्रे वगैरे देशविदेशाचा मोठ्ठा खजिना आपल्या समोर मांडलेला असतो. काय पाहू, किती पाहू असं होऊन जातं.
ह्या शिल्पातील रेखीवता, सौष्ठव वाखाणण्याजोगे आहे. तर,
ह्या मोहक शिल्पाची निरागसता मला फार भावली.
सर्वात कठीण वाटले ते हे शिल्प..
शिकार, शिकारी आणि त्याचा कुत्रा, तिघांच्याही चेहर्यावरील वेगवेगळे भाव अगदी ठसठशीत आले आहेत. काळविटाला मृत्यू समोर दिसतो आहे, कुत्र्याच्या चेहर्यावर क्रौर्य आहे तर शिकार्याच्या चेहर्यावर विजयाचे भाव आहेत.
शिकार्याच्या हाताचे स्नायु, उभे राहण्याची पद्धत आणि उगारलेल्या सुर्यातील आवेश पाहता शिकार हातून सुटणं आता केवळ अशक्य आहे. कुत्रा सावजावर नजर खिळवून आहे. काळविटाचा कान आपल्या तिक्ष्ण दातांमध्ये करकचून पकडला आहे तरीपण स्वतः मात्र काळविटाच्या मार्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी शिकार्याच्या दोन पायांत सुरक्षित उभा आहे. अप्रतिम.
बाकी राजे रजवाड्यांची, सरदारांची, प्रेमिकांची अनेक शिल्पे आहेत. संग्रहालय अतिशय सुंदर पद्धतीने राखलेले आहे. थकलेल्या पर्यटकांसाठी बसण्याची सोय ठिकठिकाणी आहे. प्रसाधनगृह आहेत. उपहारगृह आहे. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवशी चिक्कार म्हणजे चिक्कार गर्दी होती. संध्याकाळच्या वेळी दादर स्टेशनवर धक्के चुकवत चालावं तसं चालावं लागत होतं. बसण्याच्या सर्व जागा व्यापलेल्या होत्या. उपहारगृहाच्या खुर्च्याही रिकाम्या नव्हत्या. मन भरत नव्हतं पण शरीर थकलं. संग्रहालयाच्या मुख्य कक्षात मोठे उपहारगृह आहे. तिथे बसण्यास जागा मिळाली. पण हा परिसर अत्यंत धोक्याचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणी त्रास वगैरे देत नाही पण इथे पर्यटक निवांत बसतो, क्षणभर बेसावध असतो. इथे बायकांची पर्स, सामानाची पिशवी उचलून पळण्याच्या घटना घडल्या आहेत. माझ्या एका मित्राचा, इथेच कॉफी पित निवांत बसले असता, सामानाची पिशवी चोरट्यांनी पळविली. त्यात रोकड रकमेबरोबरच दोघांचेही (नवरा-बायकोचे) पासपोर्ट चोरीला गेले. कफल्लक अवस्थेत राहयची वेळ आली. सुदैवाने त्याच्या साहेबांनी (अरब स्पॉन्सर) त्याची पॅरीस मध्येच राहायची व्यवस्था केली, पैशांची सोय केली आणि भारतिय दूतावासाने त्यांना भारतात पाठवायची सोय केली. भयंकर मनःस्ताप झाला. इथे आपले पाकिट, पर्स, प्रवासाच्या हलक्या बॅगा वगैरेची काळजी घ्यायची.
संग्रहालयानंतर शिन नदीतील नौकेची सफर केली. ही निव्वळ विश्रांतीची सफर होती. नौका चालत राहते आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत किनार्यावरील इमारतींचे सौंदर्य, रोषणाई न्याहाळत बसायचं. पावणेदोन तासांच्या विश्रांती नंतर पुन्हा किनार्याला पाय लागले. आमच्या निवासस्थानाजवळच एक गुजराथी उपहारगृह आम्हाला सापडलं होतं तिथे जाऊन उकळलेल्या मसाला चहाचा आस्वाद घेतला. आणि रात्री तिथेच जेवण घेतले.
आता पुढचे वेध लागले होते.....स्विट्झर्लंड.
प्रतिक्रिया
9 Apr 2014 - 2:51 pm | प्यारे१
सु रे ख.
नर्मविनोदाची सुंदर पखरण करीत लिहीलंय.
पटापट येऊ द्या.
9 Apr 2014 - 2:52 pm | पिलीयन रायडर
फटु दिसत नाहीत... :(
9 Apr 2014 - 3:02 pm | केदार-मिसळपाव
अजुन येवु दे....
9 Apr 2014 - 3:02 pm | सूड
मस्त !!
9 Apr 2014 - 3:07 pm | मधुरा देशपांडे
काका, तुमच्या लेखमालेची वाटच बघत होते. माहितीपूर्ण लेख. आवडलाच. उकळलेला मसाला चहा युरोपात कुठेही फिरताना किती हवाहवासा वाटतो हे अनुभवले आहे. त्या संग्रहालयात ज्यांना चित्रकला आणि तत्सम विषयात रस आहे त्यांना खरंच कितीही दिवस कमी पडतील. पण बरेचसे पर्यटक मोनालिसाच्या चित्राकडेच धाव घेतात आणि तिकडे अशक्य गर्दी होते. त्या चित्रासोबत फोटू काढण्याची काही जणांची धडपड मनोरंजक ठरते.
पुभाप्र.
9 Apr 2014 - 3:10 pm | vrushali n
रच्याकने मला मोनालीसाला भुवयाच नसल्याच कुठ्ल्यातरी लेखात वाचल्यावरच लक्श्यात आले होते
9 Apr 2014 - 3:11 pm | त्रिवेणी
स्विट्झर्लंड वरील लेख लवकरात लवकर खुप फोटोंसह येवु द्या.
9 Apr 2014 - 3:12 pm | शिद
मस्त सफर चालु झाली आहे काका... आता पटापट पुढचे भाग पण येऊ देत.
वाचणखुन साठवली आहे... २-३ महिन्यानंतर उपयोग होईलच अशी आशा बाळगतो. :)
9 Apr 2014 - 3:14 pm | शिद
घरोघरी मातीच्या चुली ;)
9 Apr 2014 - 3:16 pm | दिपक.कुवेत
झाली आहे काका.....आता थांबु नका...पटापट पुढिल भाग येउ द्या. वर्णन एकदम खुशखुशीत.
9 Apr 2014 - 3:41 pm | सफरचंद
वाटच बघत होतो ..
पुढचा वृतांत लवकर टाका, वाट लागे पर्यंत वाट बघायला लावू नका ..... :P
9 Apr 2014 - 3:42 pm | भाते
फोटो बघायच्या आधी तुम्ही लिहिलेली माहिती किमान ३-४ वेळा वाचुन घेतली. अप्रतिम!
हे असे काही वाचल्यावर मला असे सुरेख लिहायला कधी जमणार असा प्रश्न पडतो.
ध न्य वा द !
9 Apr 2014 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा
9 Apr 2014 - 4:11 pm | कंजूस
इथेच थांबा ,राहा ,हॉटेल टाका आणि गलल्यावरून निरीक्षणं लिहित जा "मी प्रभाकर पेठकर पैरिसहून लिहितो की - -".
आईफेलचा पत्ता मुद्दामहून चुकलात आणि फेरफटक्याचा सदुपयोग केलात .पैरिस तुमास्नी फारच भावलंय ते आमास्नी कळलंय राव .
9 Apr 2014 - 4:22 pm | ऋषिकेश
सुरेख!
9 Apr 2014 - 4:36 pm | मदनबाण
झकास !
9 Apr 2014 - 5:01 pm | गणपा
खुसखुशीत आणि माहितीने सजलेला सहल वृत्तांत आवडला.
पुभाप्र.
9 Apr 2014 - 5:12 pm | पैसा
खूपच छान लिहिलंत आणि फोटो आवडले हे काय सांगायला नकोच! पॅरिसमधे एवढे चोर भरलेत? कोण सांगत होतं ते, भारतातच असले प्रकार होतात म्हणून?
9 Apr 2014 - 5:29 pm | प्रचेतस
सुरेख लेख.
9 Apr 2014 - 5:53 pm | आतिवास
सुरेख लेख. प्रत्यक्षदर्शन झाल्यागत वाटलं वाचताना:-)
9 Apr 2014 - 6:02 pm | Anvita
छान लेख !
9 Apr 2014 - 6:10 pm | यशोधरा
मस्त लिहिले आहे काका! फोटो घरुन बघते.
9 Apr 2014 - 6:18 pm | शुचि
किती खिळवून टाकणारं लिहीलं आहेत. वर्णन अतिशय आवडलं. सर्वच छायाचित्रे अप्रतिम. निशेच्या मखमली पेटीतील, हिर्यासारखा आयफ़ेल Tower तर कळस आहे कळस.
9 Apr 2014 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर प्रकाशचित्रे आणि पेठकर शैलीतल्या खुसखुशीत टिप्पणींसह रोचक वर्णन !
पुभाप्र.
9 Apr 2014 - 6:42 pm | राही
तुमच्याबरोबर चालत चालत आम्हीही हे सर्व पहात आहोत असं वाटलं.
9 Apr 2014 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर
प्रशांत आवले, पिलियन रायडर, केदार-मिसळपाव, मधुरा देशपांडे, सूड, vrushali n, त्रिवेनि ,शिद, दिपक.कुवेत, सफरचंद, भाते, अत्रुप्त आत्मा, कंजूस, ऋषिकेश, मदनबाण, गणपा, पैसा, वल्ली, आतिवास, Anvita, यशोधरा, शुचि, इस्पीकचा एक्का आणि राही....सर्वांचे मनापासून आभार.
पिलियन रायडर - छायाचित्रं का बरं दिसेनांत? बाकी सर्वांना दिसत आहेत असे वाटते. आपल्या तांत्रीक समिती सदस्यास विचारून पाहा बरं.
vrushali n - भुवया नाहीत असं वाटतय पण त्या आहेत. अगदी धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळल्याने नाहीत असा भास होत असावा. युरोपात अशा अनेक म्हातार्या पाहिल्या ज्यांच्या भुवया धुरकट आणि त्वचेच्या रंगात मिसळून जातात. (जशा आपल्याकडे पांढर्या होतात) अशा म्हातार्या आय लायनर वापरून भुवयांच्या जागी एक जरा जाडसर काळी रेघ ओढतात. खर पाहता ते आणखिनच अनैसर्गिक आणि विद्रुप दिसतं. पण असो.
कंजूस - असा विचार प्रकर्षाने मनांत आला पण इथे नाही, जर्मनीत. त्यावर माझी आणि निनादची माफक चर्चाही झाली. जर्मनीत भारतिय जेवणाचे जर्मन पंखे खुप पाहिले. असो. पॅरीस हे प्रणयाचे शहर आहे असे म्हणतात. ह्याहून जास्त खाजगी गोष्टी उघड करण्यात हशील नाही.
पैसा - माझ्या दोन्ही भेटींमध्ये चोरांचा सुळसुळाट मला प्रकर्षाने जाणवला. पण, हतोत्साहीत होण्याचे कारण नाही. पोलीसही फिरत असतात. स्केट वापरणारे पोलीसही आहेत जे गर्दीतूनही चोरांचा पाठलाग वेगाने करू शकतात. पण आपण आपली काळजी घेतलेली बरी. आयफेल टॉवरच्या प्रांगणात आयफेलच्या प्रतिकृती असेलेले, फ्रिजवर लावायचे चुंबक, कि-चेन्स, भेटवस्तू, भेटकार्ड विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात. त्यांच्याकडे ह्या व्यवसायाचा परवाना नसतो. त्यांची, पोलीस दिसताच पळापळ होते. अगदी आपल्या दादरला फुटपाथवरच्या विक्रेत्यांची होते तशी. ह्यांच्याकडून कांही विकत घेताना घासघीस करायला लाजू नये. १/४ किमतीलाही शेवटी देतात.
9 Apr 2014 - 9:14 pm | मधुरा देशपांडे
+१११११
मला नुसते कल्पनेनेच किती छान वाटले की तुमचे उपहारगृह इथे जर्मनीत आणि मग तिथेच कट्टा. :) इकडच्या लोकांना प्रचंड आवडतात भारतीय खाद्यपदार्थ. खरंच हे घडू देत लवकर. जर्मनीतील सगळेच मिपाकर मदत करायला तयार असतील.
11 Apr 2014 - 9:35 am | vrushali n
अस आहे तर....धन्यवाद सर
11 Apr 2014 - 11:27 am | प्रभाकर पेठकर
विकिपिडियावर खालील माहिती सुद्धा मिळाली.....
Mona Lisa has no clearly visible eyebrows or eyelashes. Some researchers claim that it was common at this time for genteel women to pluck these hairs, as they were considered unsightly.[35][36] In 2007, French engineer Pascal Cotte announced that his ultra high resolution scans of the painting provide evidence that Mona Lisa was originally painted with eyelashes and with better visible eyebrows, but that these had gradually disappeared over time, perhaps as a result of over cleaning.
9 Apr 2014 - 8:35 pm | चौकटराजा
पेठकर काका पॅरिसला गेल्याने पॅरिसची काय मनस्थिती झाली पहा !
अजि ऐसा मोका फिर कहां मिलेगा
पेठकरजी जैसा गुल कहा मिलेगा
आओ तुमको दिखलाता हूं
पेठकर संग एक रंगीन शाम
देखो देखो देखो देखो देखो
ये रंगीला पेठकर !
पेठकर काका, ते पॅरिस रोज रसिकांची वाट पहात आपला दिनक्रम चालू करते. त्याची सफर आवडली. बाकी आपण
कोणत्या भागात उतरला होतात. जवळच्या गुजराथी भोजनालयाचे नाव काय? पुणेकर एरियलच्या दृष्टीने हे फार म्हत्वाचे आहे .
9 Apr 2014 - 8:36 pm | जातवेद
फारच छान. बराच बारिक-सारिक तपशील कळाला (जाळ्यांपासून ते चोरांपर्यंत, जाळीवाल्या चोरांकडून धोका जास्तच :) )
पुढच्या लेखांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे :)
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं
9 Apr 2014 - 8:41 pm | रेवती
छान वृत्तांत, आयफेल टॉवरचे फोटो व त्यावरून शहराचे फोटो जास्त आवडले. दिव्यांनी झगमगणारा टॉवर नेहमीच आवडतो. क्वीन सिनेमात आयफेल टॉवर नुकताच पाहिला असल्याने या योगायोगाची गंमत वाटली. म्यूझियममधील चित्रेही आवडली.
इस्पिक एक्कासाहेबांनी अनेकांना फिरण्यास मोटीवेट केलेले पाहून आनंद झाला. अर्थातच मी त्यातली एक नाही. प्रवासवर्णने वाचून तर अगदी जाउन आल्यासाएरखेच वाटते. पुन्हा जाण्याची गरज नाही. आयफेल परिसरात पाकिस्तानी, बांगला देशी लोकांच्या कहाण्या आधी वाचल्या होत्या पण चोरांबद्दल मात्र नवीनच समजले.
9 Apr 2014 - 8:42 pm | सौंदाळा
झक्कास.
अधलीमधली फटकेबाजी जास्त आवडली.
9 Apr 2014 - 8:46 pm | मराठे
खुमासदार प्रवासवर्णन. खूप आवडलं.
9 Apr 2014 - 8:51 pm | दिव्यश्री
काकाश्री मस्तच वृतांत . आवडला .
मीही प्यांटवाल्यांना असाच प्रश्न विचारला होता कि मोनालीसामध्ये नक्की काय आहे कि सगळे वेड्यासारखे त्या फोटो जवळच गर्दी करतात मला अस उत्तर मिळाल कि तीच स्मित एकदम योग्य आहे . आदर्श स्मित असे म्हणतात . असंही समजल कि त्यामध्ये हळूहळू फरक पडत आहे . खखोदेजा . आमच्याकडेही तिचा फोटू आहे एक शेपरेट आणि एक आमच्या मुखकमलांसह. :D सगळ्यात जास्त आशियाई लोकांची गर्दी असते तिथे .
9 Apr 2014 - 8:59 pm | शुचि
मी वाचलेलं की ते स्मित अतिशय गूढ आहे अन ती गरोदर असल्याचीही पुसट शक्यता ते चित्र दर्शविते
दुसरे वर्शन हे ऐकलेले की स्वतः दा विन्चिच मोनालिसा झालेला आहे.
पण या सर्व ऐकीव गोष्टी.
9 Apr 2014 - 9:51 pm | मुक्त विहारि
आता आम्ही पण स्वित्झर्लंडच्या लेखाच्या प्रतिक्षेत...
9 Apr 2014 - 9:55 pm | आरोही
खरेच खूप सुंदर वृत्तांत ...वाट बघत होतेच ..आता पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत ...एवढे सुंदर लिहिले आहे खरेच मनापासून आवडले ..थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+)
9 Apr 2014 - 10:15 pm | मनिष
मस्त वृत्तांत! पॅरीसला आणि युरोपला भेट द्यायची खूप इच्छा आहे, आणि तुमचे लेखन वाचून ती इच्छा परत वर आली. कधी योग येतोय काय माहित?
10 Apr 2014 - 12:04 pm | सानिकास्वप्निल
युरोप बघण्यासारखे आहे, नक्की विचार करा :)
9 Apr 2014 - 10:38 pm | खेडूत
लई भारी ओ काका! एकदम :)
लंडन पण त्याच फेरीत झालं असतं तर आपण भेटलो असतो.
>>विकणारे बरेच भारतिय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी दिसतात
हे सगळीकडे झालेत हल्ली. स्वित्झर्लंड आणि इटलीत पिसा ( पिजा) जवळ पण. आता काळे आफ्रिकी तर त्यांच्यावर कडी करतात! हिंदी गाणी वगैरे गातात! :) आणि आपल्याला पिसा प्रतिकृती आणि इतर वस्तू घ्यायला मागे लागतात.
आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दिशाना जगातल्या महत्वाच्या शहरांची नावे लिहिली आहेत, ज्यांची लोकसंख्या दहा लाखावर आहे. आता ते बंद केलेलं दिसतंय- नाहीतर भारत आणि चीन मधलीच गावं येतील. पण मुंबई, दिल्ली, हैदराबाद पाहिल्याचे आठवते.
आम्ही एका कोरियन मालकाच्या हॉटेलात रहात होतो, त्याने सांगितलं की तिथे निम्मी लोकसंख्या रोज बदलते इतके पर्यटक असतात! म्हणून इतकी अस्वछता आणि बेशिस्त दिसते.
9 Apr 2014 - 10:43 pm | पिवळा डांबिस
प्रभाकर इन पॅरीस!!! क्या बात है!! :)
काय पेठकरशेठ, मग तिथे गेला होतात तर आठवणीने बूयांबेस खाल्लं की नाही?
आणि टॉवरपासून नदीकडे निघाल्यावर नदीला लागून जो रस्ता आहे त्यावर डावीकडे वळलं की अंदाजे एक फर्लांगावर अंडरग्राउंड मेट्रोच्या स्टेशनजवळ एक फेमस दुकान/हाटेल आहे. अफलातून क्रेप मिळतात तिथे!! विविध चवींचे, गोड आणि मसालेदारसुद्धा! अगदी आऊट ऑफ धिस वर्ल्ड!!
10 Apr 2014 - 2:35 am | प्रभाकर पेठकर
हि माहिती जरा उशीरानेच मिळाली आहे. अन्यथा तो रस्ता माझ्या रोजच्या फिरण्यातला होता. नक्कीच आस्वाद घेतला असता.
10 Apr 2014 - 11:39 am | प्रशांत
+१
आणि falafel सुद्धा
त्या रस्त्याला खाऊगल्ली म्हटले तरी चालेल्
10 Apr 2014 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर
>>>>आणि falafel सुद्धा
फलाफेल तर इथे मस्कतात रोजच पाहायला आणि खायला मिळते. घरी सुद्धा बनवितो. त्यामुळे त्याचे आकर्षण उरलेले नाही.
पण, शाकाहारी लोकांसाठी तो एक चविष्ट पर्याय आहे हे मान्य.
9 Apr 2014 - 11:06 pm | जोशी 'ले'
खुमासदार प्रवास वर्णनाला खुसखुशीत विनोदाची चुरचुरीत फोडनी...व्वा बेत मस्तच जमलाय :-)
10 Apr 2014 - 1:15 am | खटपट्या
म स त ह !!!
10 Apr 2014 - 2:32 am | प्रभाकर पेठकर
चौकटराजा, जातवेद, रेवती, सौंदाळा, मराठे, दिव्यश्री, मुक्त विहारि, अद्वेय, मनिष, खेडूत, पिवळा डांबिस, जोशी 'ले' आणि खटपट्या मनःपूर्वक धन्यवाद.
चौकटराजा - माझा पॅरीस मधला राहण्याचा पत्ता होता 37, Rue Du Hameau, Porte De Versailles. टॉवर पासून दोनेक किलोमिटर अंतर असावे. दोन इमारती सोडून असलेल्या गुजराथी उपहारगृहाचे नांव आठवत नाही पण बाहेर इंडियन रेस्टॉरंट अशी पाटी आहे.
अद्वेय - >>>>थोडाफार वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न मीही करत आहे ..पण जमतोय कि नाही असेच वाटते ..पहिल्यांदाच असे काही लिहिण्याचा प्रयत्न चालला आहे ..बघूया जमतेय का ते ..+)
जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते.
खेडूत - स्विट्झर्लंड पेक्षा इटलीत पिसा आणि रोम इथे बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या जास्त जाणवली. पण बिचारे मदत करतात. भारतियांबद्दल त्यांना विशेष ओढा दिसला. कदाचित 'गिर्हाईकं' म्हणून असेल किंवा त्यांना युरोपियन्स चांगली वागणूक देत नसावेत त्यामुळे भारतिय पाहिल्यावर त्यांना आनंद होत असावा.
इतर देशांमधील मुख्य मुख्य शहरांची नांवे आणि त्यांचे आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलक टॉवरवर अजूनही आहे.
10 Apr 2014 - 8:16 am | चौकटराजा
37, Rue Du Hameau, Porte De Versaillesआता स्ट्रीट व्यू वर पाहून ठेवतो.
10 Apr 2014 - 8:27 am | अजया
वृत्तांत आवडलाच! गुजराथी उपाहारगृहाची नोंद घेउन ठेवते आहे!
10 Apr 2014 - 8:28 am | नंदन
खुसखुशीत, नर्मविनोदी प्रवासवर्णन!
>>> जमेल, नक्की जमेल. न जमायला काय झालं? प्रत्यक्ष घटना अनुभवताना जो संवाद स्वतःचा स्वतःशीच चाललेला असतो त्याचीच तर 'पटकथा' बनवायची असते.
--- मजबूत! (अरेबिकमध्ये 'बरोबर' या अर्थाने?)
10 Apr 2014 - 8:51 am | सुधीर कांदळकर
आवडले. शिकारीचे चित्र सुंदरच. धन्यवाद. पुभाप्र.
10 Apr 2014 - 9:22 am | स्पंदना
यमीच्या चारपट गोरी!!
ती मोनलीसा स्वतः उठुन पेठकर काकांचे पाय पकडुन माफी मागत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आले.
लै भारी पेठकर काका. मस्त मजा आली पॅरीस तुमच्या समवेत पहायला.
10 Apr 2014 - 11:33 am | प्रशांत
अगदी अगादी....
अहो चित्रगुप्त काका आता तुम्हिच काढा असले चित्र....
10 Apr 2014 - 12:10 pm | सानिकास्वप्निल
पॅरीस ट्रीप मस्तं झाली, प्रवासवर्णन आवडले :)
अरे वाह!! आयफेल पासूनचे अंतर दर्शविणारा फलकामध्ये आग्रा ही अॅड झाले तर काही वर्षापूर्वी कोलकाता आणी दिल्लीच होते.
स्विट्झर्लंड भागाच्या प्रतिक्षेत, मा.टिटलीसच्या पायथ्याशी वडा-पाव, चहा घेतला का?
10 Apr 2014 - 1:18 pm | इशा१२३
माहीती आणि वर्णन दोन्ही उपयुक्त आहे..मला माहीती हवीच होती.पुढचा भागाच्या प्रतिक्षेत...
10 Apr 2014 - 2:47 pm | यसवायजी
मस्त.
10 Apr 2014 - 2:57 pm | चित्रगुप्त
व्वा.
तुमचा हा लेख वाचून पॅरिसमधे काढलेल्या हजारो फोटोतून निवडून मिपावर देण्याच्या बेताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली.
10 Apr 2014 - 3:14 pm | झकासराव
वाह, काकानु मस्त सुरवात केलीत. :)
10 Apr 2014 - 5:44 pm | यसवायजी
युरेलचा पास सगळ्या शेंगेन देशात चालतो का?
पॅरीस मध्ये रहायची व्यवस्था कशी केलीत? कारण आम्ही हॉस्टेलवर रहायचा विचार करत होतो तरी बजेटच्या बाहेर चालल्याने अखेर पॅरीस कॅन्सल केलं होतं. त्यामुळे अजुनही फक्त गुगल अर्थ वर टॉवर, आणी टॉवरवरुन पॅरीस पाहणे चालालंय. ;)
@
ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा.
हा एकच अपवाद वगळता मलासुद्धा असाच अनुभव आला होता. फक्त रेल्वेच नाही तर बस सुद्धा अगदी वेळेवर. बसचा डायवर किंवा डायवरीन जेंव्हा गुड मॉर्नीन्ग म्हणतात, तेंव्हा फक्त क्या ब्बात.. क्या ब्बात.
रेल्वेमध्ये अपंग, सैकलिस्टस्, अंध आणी वॄद्ध व्यक्तींसाठी सोईसुद्धा उत्तम.
हा भाग उत्तमच. पु.भा.प्र.
10 Apr 2014 - 10:19 pm | शुचि
लहानपणी "रमेश मंत्री" यांचा मेनका मासिकात लेख वाचला होता. तोदेखील खूप छान होता. पण प्रपेंच्या लेखाने या सहलीत काय काय काळजी घेणे आवश्यक आहे ते कळले. खरं तर खूप वाटतं आहे की आयफेल टॉवर पहावा, नीळ्या नीळ्या रात्री पहावा :) रात्रीचा टॉवर चा फोटो निव्वळ जीवघेणा आहे.
10 Apr 2014 - 11:31 pm | तुमचा अभिषेक
पॅरीसच्या ठगांबद्दल ऐकून फार्रफार बरे वाटले. म्हणजे असा एखादा वृत्तांत वाचताना श्या आपण कधी जाणार इथे म्हणत एक हलकीशी जळजळ होते ती कमी होण्यास मदत झाली ;)
बाकी आपला आयफेल टॉवरचा फोटो डिलीटला गेला हे तर खूपच वाईट झाले, मला फार पूर्वी जेव्हा पहिल्यांदा गोव्याला गेलेलो तेव्हाचे माझे सारे फोटो उडाले होते ते आठवले, कसला शॉट लागला होता डोक्याला. पुढच्या वेळी गोव्याला जाईपर्यंत ती जखम भळभळत होती. आणि इथे पॅरीस अन आयफेल टॉवरचा फोटो उडला :(
असो, छान सूर गवसलाय वृत्तांताला, कुठेही पाल्हाळ न लावता, वा माहितीचा ओवरडोस न करता पुढे सरकतोय, आता स्वित्झर्लंडवारी साठी आम्हीही उत्सुक.
11 Apr 2014 - 12:22 am | वाटाड्या...
जबरी लिहीलयं. मजा आला वाचताना. बर्याच दिवसांनी आलात. बाकी तुमचे आणि आमचे सहचारीणी बरोबर असतानीचे अनुभव अगदी शेम टु शेम. आता पुढचा वृत्तांत कधी?
- वाट्या
11 Apr 2014 - 8:41 pm | सखी
सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. हे खुप आवडलं.
उत्तम माहीती मिळतेयं पेठकर काका. चोरांचा सुळसुळाट ऐकुन आश्चर्य वाटलं पण पोलिस स्केट लावुन तत्पर आहेत ऐकुन बरं वाटलं. युरोप सफरीचे आयोजन करण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या मित्राला कोणत्या खास वेबसाईटचा उपयोग झाला असेल तर तेही लिहाल का? पुभाशु.
11 Apr 2014 - 8:55 pm | Prajakta२१
मस्तच फोटो आणि छान लेख :-)
कृपया पुढचे भाग पण लवकर येऊ द्यात
11 Apr 2014 - 10:46 pm | अमीबा
अगदी पहिल्या वाक्यापासुन जोरदार सुरुवात झाली आहे :)
पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे.
11 Apr 2014 - 11:52 pm | साती
मस्तं मजा आली वाचायला.
जरा खर्चापाण्याचं पण लिहा ना.
आमची पसर् हलवून बघता येईल एक दोन वर्षात.
बाकी इस्पिकच्या एक्क्यांची प्रवासवर्णने वाचून (म्हणजे मी वाचून आणि घरच्यांना फोटो दाखवून) ट्रिपा पदरात पाडून घेतल्या आहेत मी सुद्धा.
14 Apr 2014 - 11:01 pm | अनिता ठाकूर
विनोदाचा हलका शिडकावा असलेलं, अजिबात कंटाळवाणं नसलेलं, सचित्र,सटीप प्रवासवर्णन! तुझी लिखाणाची शैली आकर्षक असल्यामुळे पुढील भाग वाचायची उत्कंठा लागून राहते.
19 Apr 2014 - 11:07 pm | आयुर्हित
पेठकर काका, अभिनंदन.
खूप छान सर्वांग सुंदर, खुसखुशीत विनोदी आणि मार्गदर्शक लेख!
आपण पॅरीसमध्ये फिरत असतांना, आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे, अगदी आपल्या आवडत्या मोनालिसा सकट! पहा आपल्यालाही नक्की आवडेल.
http://www.youtube.com/watch?v=KYYeG0Lo-G4
20 Apr 2014 - 2:36 am | प्रभाकर पेठकर
>>>>आपल्या पाठीमागे मी आपले वीडीओ शूटिंग करून ठेवले आहे
अच्छा! म्हणजे 'आयुर्हित' हा रणविर कपूरचा आयडी आहे तर.
वा..वा.. मोठ्या मोठ्या माणसांच स्वागत आहे मिपावर.
20 Apr 2014 - 2:25 pm | चाणक्य
मस्त हो काका