टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे.
मराठी विकिपीडियावर मागच्या वर्षाभरात (२०१३) जे काही लेखन मी केल त्यात गीतरामायण लेखाच ज्ञानकोशीय लेखन करण्यात समाधान मिळालं. (तो लेख मी येथे देत नाही, मिपाकरांनी लेख वाचनाचा आनंद मराठी विकिपीडियावरच घ्यावा असे वाटते. त्यात जरासा माझा स्वार्थ आहे :) )
ह्या धाग्याचा खरा हेतू नेहमी प्रमाणे मराठी विकिपीडियातील लेखासाठी अधिकची माहिती गोळा करणे हाच होय. खालील विषयासंबंधाने माहिती हवी आहे.
१) गीतरामायणातील रचनांमध्ये कोणकोणते छंद, वृत्त आणि अलंकार आहेत ?
२) गीतरामायणाची आतापर्यंत न चर्चिली गेलेली अथवा कमी चर्चेली गेलेल्या काही भाषिक वैशिष्ट्यांकडे तुम्हाला लक्ष नोंदवावेसे वाटते का ?
३अ) अलिकडे मिपावर सानेगुरुजींचे शामची आई कालबाह्य झाल्याची चर्चा वाचण्यात आली होती. गीतरामायणाचा सध्याच्या नवीन पिढ्यांच्या कितपत ऐकण्यात आहे ? ते त्यांना कितपत रुचते आहे ? गीतरामायण नवीन पिढीत टिकून आहे का कालबाह्य होते आहे, तुम्हाला काय वाटते ? ( हा प्रश्न जनरल चर्चेकरता आहे, विकिपीडियाशी संबंध नाही)
३ ब) आपण (भारतातील अथवा परदेशातील) इंग्रजी माध्यमातील पाल्यांचे पालक असाल तर आपण आपल्या पाल्यांना गीतरामायण ऐकवले आहे का ? गीतरामायण समजून घेण्यात आपल्या पाल्यांना काही भाषिक अडच्णी जाणवतात का ? कोणत्या आणि त्यावर मात कशी केलीत ( हा प्रश्न जनरल चर्चेकरता आहे, विकिपीडियाशी संबंध नाही)
३क) गीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये. अस एक मत मराठी विकिपीडियावरील चर्चेत मांडल गेल आहे. या बाबत तुम्हाला काय वाटतं ?
४) डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर, ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर आणि गीत रामायणाची गीते गायलेल्या गायक गायिकांची अधिक माहिती हवी आहे.
(विशेषतः ज्या गायकांबद्दल इंटरनेटवरील स्रोतात माहिती नाही पण तुम्हाला स्वतःला माहिती असल्यास त्यास प्राधान्य द्यावे.)
५) गीत रामायणच्या १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायक चंद्रकांत गोखले आणि अभिनेते चंद्रकांत गोखले या दोन व्यक्ती एकच आहेत का वेगव्गेळ्या ?
६) त्यातल्या मिश्र काफी , मिश्र जोगिया , भैरवी , भीमपलास, मिश्र मोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग, भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुध्द सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी ,तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुध्द कल्याण व मिश्र पहाडी या रागांबद्दल अधिक माहिती हवी आहे.
७) इच्छुक शुद्धलेखन प्रेमींनी मराठी विकिपीडियावरील गीतरामायण लेखात जाऊन शुद्धलेखन सुधारणा संपादने केल्यास स्वागत असेल.
शेवटी जाता जाता गीतरामायणाचे कॉपीराईट प्रताधिकार हक्क गदिमांच्या पुढील पिढ्या जपतात तरीही सुमित्र माडगूळकर यांनी मराठी विकिपीडियास यथाशक्ती साहाय्यपूर्ण भूमिका ठेवली याचा आदरपूर्ण उल्लेख केलाच पाहिजे.
या निमीत्ताने गीतरामायन विषयक इतर चर्चा करू शकताच सोबतच मराठी संकेतस्थळे ह्या संबंधाने वेगळी चर्चा करण्याचा प्रयास आहेच तर http://www.gadima.com/ संकेतस्थळ आपण पाहीले आहे का ? असेल तर आपल्याला ते कसे वाटले ?
(माझा स्वतःचा gadima.comश कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यक्तीगत संबंध नाही.)
* मराठी विकिपीडियावरील गीतरामायण लेखाचा दुवा
*धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद
प्रतिक्रिया
21 Mar 2014 - 4:56 pm | माहितगार
गीतरमायणाशी संबध आलेल्या सीताकांत लाड, अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे शिवाय रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर या व्यक्तींबद्दलही काही अधिक माहिती उपलब्ध असल्यास हवी आहे.
21 Mar 2014 - 5:09 pm | माहितगार
सॉरी, यातल प्रभाकर जोग हे एक मह्त्वाचच नाव राहील, त्यांच्या बद्दल सुद्धा अधिकची माहिती हवी आहे.
21 Mar 2014 - 5:22 pm | चौकटराजा
अभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. याचा उल्लेख त्यांच्या दूरदर्शन वरील
मुलाखतीत झालेला होता. शक्यता आहे की तेच गीत रामायणातील गायक असतील.
एक वाद्ग्रस्त विधान मांडतो. गहिमा हे माझे दैवत आहे. पण गीतरामायण घरा घरात पोहोचविण्यात जास्तीत जास्त वाटा बाबुजींच्या प्रासादिक चालीं चा . बाबुजीं म्हणत हे काळाचा महिमा म्हणून घडले. अशा चाली पुन्हा श्रीरामाला देखील लावता येतील की नाही शंका आहे. ( तंतोतंत शब्द हे नाहीत)
23 Mar 2014 - 9:18 am | अत्रन्गि पाउस
चंद्रकांत गोखले आहेत...
23 Mar 2014 - 2:40 pm | माहितगार
खात्री करुन दिल्या बद्दल धन्यवाद.
गंमत म्हणजे या नुसार मी मराठी विकिपीडियावर चंद्रकांत रघुनाथ गोखले लेखात उल्लेख केला खरा पण अजून लिखीत संदर्भ (पुस्तक वृत्तपत्रादी) उपलब्ध व्हावा म्हणून सोबत "दुजोरा हवा" असा साचा लावला. आणि धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हा प्रतिसाद टंकताना आपाल्या सहीतील Bertrand Russel यांच्या वाक्याचा 'The whole problem with the world is that .......wiser people so full of doubts." हा भाग वाचून माझेच मला हसू आले. :)
21 Mar 2014 - 5:35 pm | विकास
नेहमीप्रमाणे चांगला लेख आणि माहिती... माझ्याकडून काही उत्तरे. नंतर अधिक विचार करून.
गीतरामायणातील रचनांमध्ये कोणकोणते छंद, वृत्त आणि अलंकार आहेत ?
http://aathavanitli-gani.com/Geet_Ramayan या संस्थळावर प्रत्येक गाण्यावर टिचकी मारली तर किमान "राग" कुठला आहे हे गाण्याखालील माहितीत दिलेले आहे. http://aathavanitli-gani.com ह्या संस्थळाशी माझा व्यक्तीगत एक रसिक म्हणून सोडल्यास काही संबध नाही. त्यांनी खूप चांगले काम केले आहे असे मात्र मला कायम वाटते. (कोणी केले? - माहित नाही!)
अजून एक: या संस्थळावर आकाशवाणीवरील ओरीजिनल गाणी आहेत.
गीतरामायणाचा सध्याच्या नवीन पिढ्यांच्या कितपत ऐकण्यात आहे ? ते त्यांना कितपत रुचते आहे ? गीतरामायण नवीन पिढीत टिकून आहे का कालबाह्य होते आहे, तुम्हाला काय वाटते ?
परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत. आम्ही करायला लावलेल्या नाहीत. पण आम्ही जाता येता ऐकताना तिने ऐकल्या. लहानपणी झोपताना त्यातील कधी कधी ओळी म्हणल्या...आणि तिला आवडल्या म्हणून. मध्यंतरी येथे श्रीधर फडक्यांचा गीतरामायणावरील कार्यक्रम होणार हे कळले तेंव्हा ती आमच्या आधी जाण्यास तयार होती आणि संपूर्ण कार्यक्रम बसून ऐकला. एका कार्यक्रमात तीला तेंव्हा मराठी वाचता येयचे नाही तर ट्रान्सलिटरेशन करून एक गाणे लिहीले आणि गायले देखील होते... असो.
गीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये.
गीतरामायण हे नक्कीच पौराणिक साहीत्य नाही. (आणि शब्दच्छल करायचा तर रामायण हे पुराण देखील नाही. :) ) पण ती एक अॅडिशनल वर्गवारी/टॅग असेल आणि त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाऊ शकणार असेल तर तए केल्याने काही बिघडणार नाही असे वाटते.
या संदर्भात गीतरामायण कार्यक्रमाबाबतचा एक कायमस्वरूपी किस्सा: ५३ वे गाणे - "प्रभो मज एकच वर द्यावा" या गीतात. हनुमान रामास जे काही मागतो ते वाचण्या-ऐकण्यासारखे आहे. पण त्यातील शेवटच्या ओळी अशा आहेतः
सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनीं, फिरेन गगनी, स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा
थोडक्यात हनुमान जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तेथे उपस्थित असतो.... हे देखील इतर सर्व गाण्यातल्या प्रमाणे मूळ वाल्मिकी रामायणातल्या कथेवरच आधारीत आहे. बाबूजी त्यांच्य प्रत्येक गीतरामायणाच्या कार्यक्रमात म्हणून एक खुर्ची मोकळी सोडायचे. आम्ही जेंव्हा श्रीधरजींना विचारले तेंव्हा ते देखील एक खुर्ची मोकळी सोडतात असे म्हणाले. (आता इतर कुणा वाचकांनी यात अंधश्रद्धा वगैरे चिकटवू नये. हा केवळ एक भावनात्मक भाग आहे इतके समजून घ्यावे.)
असो.
22 Mar 2014 - 5:33 pm | माहितगार
22 Mar 2014 - 6:38 am | पाषाणभेद
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते.
त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो!
जय श्रीराम!
22 Mar 2014 - 5:40 pm | माहितगार
22 Mar 2014 - 9:12 am | चौकटराजा
१. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा == राग बसंत
२.दशरथा घे हे पायसदान== राग भीमपलास
३.चला राघवा चला == राग बिभास
४स्वये श्री == राग शुद्ध कल्याण
५ मज सांग लक्ष्मणा जाउ कुठे = राग जोगिया
६ मार ही त्राटिका = राग हिंडोल
७.दैव जात दु:खे भरता, == राग यमन
८. सूड घे त्याचा लंकापति == राग सोहनी
22 Mar 2014 - 5:49 pm | माहितगार
सध्या प्रतिसादांच वाचन आणि मनन करतो आहे. आपल्या मनमोकळ्या आणि माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
23 Mar 2014 - 3:07 pm | आदूबाळ
शरयू तीरावरी अयोध्या - भूप
पराधीन आहे जगती - यमन
अजून एक देस रागातलं गाणं (चाल) आठवतं आहे. शब्द पूर्णपणे विसरलो. [पूर्वी दूरदर्शनवर "गूंजे बन कर देस राग" असं गाणं लागायचं. त्याच्याबरोबर गोंधळ होतोय की काय देव जाणे...]
23 Mar 2014 - 8:36 pm | अत्रन्गि पाउस
उदास का तू आवर वेडे डोळ्या तील पाणी..
लाडके कौसल्ये राणी...
हा देस...
23 Mar 2014 - 10:49 pm | आदूबाळ
बरोबर! हेच!
धन्यवाद!
23 Mar 2014 - 5:43 pm | माहितगार
(मला स्वतःला संगीत-रागदारीची माहीती नाही, माझ्या अज्ञान मुलक प्रश्नांकरीता क्षमस्व)
चा राग इंग्रजी विकिपीडियावर (पुस्तक संदर्भ नमुद करून) भूप/भूपाळी दिला आहे. शुद्ध कल्याण = भूप का वेगवेगळे ? वेगळे असतील तर या गीतातील राग नेमका कोणता ह्याबद्दल/शुद्ध कल्याण/असल्या बद्दल पुन्हा खात्री करता येईल का ?
23 Mar 2014 - 6:11 pm | आदूबाळ
शुद्ध कल्याण आणि भूप हे जवळजवळचे राग आहेत.
अधिक माहितीसाठी हे पहा.
भावसंगीतामध्ये एका गाण्यावर एकेका रागाचं लेबल चिकटवणं जरा अन्यायकारक होईल. कारण संगीतकार देत असतो ते प्रॉडक्ट म्हणजे सुश्राव्य गाणं. "आता ऐका राग अमुकतमुक" हे त्याचं प्रॉडक्ट नाही.
कित्त्येक गाण्यांमध्ये जवळजवळच्या / एकाच वेळेच्या रागांच्या छटा जाणवतात. उदा. "सांज ढले, गगन तले" मध्ये मुलतानी, पूरियाधनाश्री आणि मारवा या तीन्हीच्या फ्रेजेस सापडतात. त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अॅण्ड ड्राय असू नये.
मी असं सुचवेन की भूप, शुद्ध कल्याण असं दोन्ही लिहा.
24 Mar 2014 - 12:15 am | माहितगार
हम्म.. बहुधा फजी लॉजीक लागू होत असाव, ओढून ताणून बायनरी नसावं असच का काही ? (काही तासांपुर्वी घरात लहानग्यांना कुकींग शिकवताना फजी लॉजीकच महत्व सांगत होतो) कलेची क्षेत्र म्हणजे गणित नव्हे हे बाकी खरच.
शुद्ध आणि मिश्र अशा दोन संकल्पना वाचण्यात येत आहेत. शुद्ध कल्याण ह्या शब्दाला संबंधीत रागाचा दुवा जोडायाचा असेल तर तो [[कल्याण (राग)]]ला जोडणे बरोबर असेल का ?
तुमची आणि अत्रन्गिंची चर्चा वाचून बाकी बदल करतोच आहे.
24 Mar 2014 - 8:29 pm | अत्रन्गि पाउस
जनरली कुठलाही राग हा शुद्धच असतो आणि म्हणून त्याचा उल्लेख करतांना (शुध्द + राग) असा करत नाहीत...
उदा : यमन, बिहाग, पुरिया इत्यादी ...
काही वेळा मूळ राग गातांना आजू बाजूचे स्वर घेऊन रंजकता वाढवतात तेव्हा तो रागस्वरूप नं बदलता एक वेगळा रंग जमवता येतो तेव्हा तो मिश्र राग ...परंतु हे फार मोजक्या रागांबाबत होते उदा. मिश्र काफी, मिश्र खमाज वगैरे..म्हणजे इथे काफी, खमाज वगैरे स्वतंत्र राग आहेतच परंतु अत्यंत मर्यादित स्वरुपात बाकीचे स्वर मिश्रण करता येतात (म्हणजे एखादा बिनमिशीवाल्या माणसाने मिशी लावून तात्पुरते येणे वाटावे तसे ..) ठुमरी,कजरी, टप्पा हे उपशास्त्रीय गातांना ह्याचा उपयोग होतो..
आणखीन एक अवघड प्रकार म्हणजे जोड-राग ... दोन संपूर्ण भिन्न रागातील स्वर एकत्र आणून दोन्ही रागातील वैशिष्ट्ये आलटून पालटून दाखवत आणखीन एक तिसरा रंगही दाखवतात...उदा ललत-भटियार, देसी तोडी, कला बसंत , मारवाश्री इत्यादी..(जसे कि श्रीखंड पुरी, जिलेबी रबडी) ह्यात काश्याबरोबर काय जाईल हे ठरवणे फार उच्च प्रतिभेचे काम आहे ..कुमारांनी सोहोनी भटियार हे एक अतर्क्य रसायन तयार केले होते ..तसाच भिमान्नांनी केलेला कलाश्री..रामभाऊंची ह्यावर मास्टरी होती..
राहिला मुद्दा 'शुध्द कल्याण', 'शुद्ध मालकंस', 'शुध्द बागेश्री' अशा अत्यंत मोजक्या नावांचा ... एखाद्या रागातील एक स्वर प्रोमीनंटली वेगळा किंवा जादा किंवा कमी लावून होणारा राग...उदा मालकंसात पंचम नाही पण शुध्द मालकंसात तो आहे..
आता एवढे सांगितले तर अजून २ गोष्टी
मूर्च्छना : एखादा राग गातांना मूळ षड्जापेक्षा अन्य स्वराला षड्ज कल्पून गायला लागले तर दुसरा राग ऐकू येतो (पहा : जसरंगी ह्याच्या क्लिप्स)आणि मग एका पट्टीत एक राग...आणि त्याचं वेळी दुसराही राग ..पण थोड्या वेगळ्या स्वरात..छोटा गंधर्व ह्यात अत्यंत माहीर होते..
वादी संवादी : एखाद्या रागाचे आरोह अवरोह तेच पण वादी संवादी बदलले कि स्वर तेच पण संपूर्ण वेगळा राग...
उदा : मारवा / पुरिया / सोहोनी ...ह्या रागांचे स्वर तेच पण वादी संवादी वेगळे ..तसेच पुरिया मंद्र सप्तकात खुलतो, मारवा मध्य आणि सोहोनी हा तार सप्तकात खुलतो......तसेच जौनपुरी आणि दरबारी (दरबारीत आंदोलित कोमल गांधार)
शेवटी काय रंजयते इति राग असे शास्त्रकारांनी म्हटलेले आहे ...
विशेष सूचना :वरील बहुतेक राग यु ट्यूब वर आहेतच:..एखादा नई सापडला तर सांगा एखादं उदाहरण सांगता येइल ..
24 Mar 2014 - 11:07 am | प्रमोद देर्देकर
अरे आदुबाळ जी लिंक तु दिलेली आहेस तिथे भुपाळी हा राग (शाम कालीन)संध्याकाळीचा राग असे काहीसे वर्णन आहे ते मला तरी बरोबर वाटत नाही. कारण भुपाळी ही सकाळी देवाधिदेवांना जागे करण्यासाठी गायली जाते ना. चुभुदेघ्या.
24 Mar 2014 - 11:31 am | विजुभाऊ
प्रमोदकाका
भूपाळी हा राग शामकालीनच आहे. भूप हा रात्रकालीन आहे.
अमर भूपाळी चित्रपटात देवाना जागे करण्यासाठी भूपळी गायचे असे संदर्भ आहेत.
मात्र भूपाळी हा सायंकालीन राग आहे.
टीपः अमर भूपाळी चित्रपटातील "घनश्याम सुंदरा श्रीधरा" हे गाणे भटियार रागातील आहे.
23 Mar 2014 - 8:38 pm | अत्रन्गि पाउस
वाटत आलाय ...
पण शुध्द कल्याण फार जवळचा असल्याने गुगली पडू शकतो..
आणि गाणे सुरु झाले कि 'हु केअर्स' ...
22 Mar 2014 - 3:50 pm | विनोद१८
सीताकांत लाड : हे 'ऑल इन्डीया रेडीओ' वर एक अधिकारी होते (पोझीशन आठ्वत नाही) तसेच बालगन्धर्वाचे एक स्नेही. आज हयात नाहीत.
अण्णा जोशी : हे 'तबलावाद्क' होते, बर्याच जुन्या मराठी भावगीताना (लता, आशा, बाबुजी व इतर ) व
चित्रपट्गीतना साथ केलेली आहे तसेच 'कट्यार काळजात घुसली'च्या रेकोर्ड्स त्यानी वाजविल्यात. आज हयात नाहीत.
सुरेश हळदणकर : हे जुन्या पिढीतले मराठी रन्गभूमीवरचे एक नामवन्त गायक नट, आजच्या भाषेत याना
'ज्यु. दिनानाथ मन्गेशकर' म्हणता येइल, तशीच आक्रमक गायकी व पल्लेदार आवाज होता यान्चा. अनेक मराठी सन्गीत नाटकात यानी भुमिका केल्यात, आज हयात नाहीत.
केशवराव बडगे : हे एक नामवन्त ढोलकीवाद्क होते लोकसन्गीत गायचे तसेच तबला सन्गतकार होते. आज हयात नाहीत.
प्रभाकर जोग : हे जेष्ठ व्हायोलिनवादक म्हणुन प्रसिद्ध, अनेक जुन्या मराठी भाव / चित्रगीताना, हिन्दी चित्रपट गीताना
यानी साथ केलेली आहे, याना 'सॉन्ग व्हायोलेनिस्ट' सुद्धा म्हणतात. 'गाणारे व्हायोलिन' नावाची यान्ची
गाजलेली ध्वनिमुद्रीका व त्याच नावाचा कार्यक्रम आजही होत असतो.
विनोद१८
22 Mar 2014 - 5:51 pm | माहितगार
छान माहिती दिलीत, अजूनही माहिती करता प्रतिक्षा आणि माहितीपूर्ण प्रतिसादांचे वाचन करतो आहे. प्रतिसादा करीता धन्यवाद
2 Apr 2014 - 11:16 am | llपुण्याचे पेशवेll
अण्णा जोशी नावाचे एक गीतकार (कवि) देखील होते. त्यांनी बरीच मराठी गाणि लिहीली आहेत. अर्थात हे अनि ते सारखेच का ते ठाउक नाही.
2 Apr 2014 - 11:09 pm | विनोद१८
.....ते आमचे डोंबीवलीकर 'श्री. मधुकर जोशी' यांनी बरीच लोकप्रीय सुंदर मराठी भावगीते रचलेली आहेत ती आजही रेडीयोवर लागतात. माझा आणी त्यांच्या मुलाचा परिचय आहे. तुम्ही म्हणता ते 'अण्णा जोशी' कोणी वेगळे असतील.
माझ्या वरच्या प्रतिसादातले 'अण्णा जोशी' हे तबलजीच ते कवि नव्हेत, सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी ( ढुंढते रह जाओगे ही सर्फ् पावडरची जाहिरात करणारी ) ही त्यांची सून.
विनोद१८
4 Apr 2014 - 8:12 am | माहितगार
llपुण्याचे पेशवेll आणि विनोद१८ अशा माहितीची विकिपीडियातील माहितीचे नि:संदीग्धीकरण करताना मोलाची भर पडते. माहितीपूर्ण प्रतिसादांकरीता धन्यवाद.
23 Mar 2014 - 9:29 am | अत्रन्गि पाउस
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे...
गीत रामायणातील प्रसंग, काव्य,चाल आणि सादरीकरण आणि त्याचा एकत्रित परिणाम हा तर व्याख्यानाचा विषय आहे
गदिमांची शब्दकळा, यमकांचे अफाट भांडार ...
रावणाचा उल्लेख 'पौलस्ती' असा काव्य्यात करणे...आणि ते चालीवर म्हणणे
आकाशाशी जडले नाते...सीतेचे वर्णन तिचे नाम उल्लेख ...
अलौकिक
23 Mar 2014 - 2:45 pm | माहितगार
अगदी सहमत.
24 Mar 2014 - 8:50 am | चौकटराजा
वेगवेगळ्या काव्य पंक्ती करताना आशय वृत्तात नीट बसावा यासाठी माडगूळकरानी अनेक युक्त्या केलेल्या दिसतात गदिमाना शब्दप्रभू म्हणतात ते उगीच नाही. श्री ,राम. राघव, श्रीराम, सीताकांत , दाशरथी, रघुनंदन, रघुकुलदीपक, ई विविध
नावाचा वापर त्यानी रामाचा उल्लेख करण्यासाठी वापरलेला आहे.यात एक अक्षरा पासून सात अक्षरापर्यंत शब्द आहेत.
24 Mar 2014 - 10:27 pm | अत्रन्गि पाउस
हे ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे ..
24 Mar 2014 - 9:30 am | सार्थबोध
गीत रामायण एक आलौकीक ठेवा. गदीमा आणि बाबूजी यांना साष्टांग दंडवत.
माहितगार तुम्ही उत्तम विषय मांडलात आणि काढलात याबबडल आभारी आहे
एक दुवा देत आहे इथे गीत रामायणातील गीते वाचता येतील
या दुव्यावर जाउन थेट "शोधा" हे बटण दाबा
http://www.marathiworld.com/geetramayan
-सार्थबोध
www.saarthbodh.com
24 Mar 2014 - 10:47 am | राजो
छान माहिती मिळतेय..
अवांतर : गीतरामायणातील माझे आवडते गीत
जय गंगे जय भागीरथी... जय जय राम दाशरथी..
24 Mar 2014 - 11:15 am | प्रमोद देर्देकर
रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम,
या ओळींचा अर्थ काय आहे?
पहीले तीन म्हणजे रघुपति, राघव, राजाराम ही रामाची नावे आहेत पण पतित पावन या शब्दाचा अर्थ काय आणि? कोण पतित जो पावन झाला/ झाली.
शिवाय याच ओळींचा एवढं महत्व का बरे आले? गांधींजींनी सुध्दा याला महत्व दिले.
चुभुदेघे.
24 Mar 2014 - 11:52 am | माहितगार
हि हिंदी भजनातील ओळ आहे. गीतरामायणात ही ओळ जशीच्या तशी नसावी
पण पतितपावन हा शब्द दोन गीतातील कडव्यात आला आहे. ४२. सेतू बांधा रे सागरी मध्ये
असा उल्लेख आहे. यातील लंकारी शब्दचा अर्थ नेमका कसा केला जातो
तत्पुर्वी ११. आज मी शापमुक्त जाहले या गीतात अहल्येच्या मुखी श्रीरामास उल्लेखून "पतितपावना श्रीरघुराजा" असा उल्लेख आला आहे.
या ओळीत पुनर्जात या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे अभिप्रेत आहे याची माहिती घेणे आवडेल.
24 Mar 2014 - 9:47 pm | विकास
"आनंद सांगू किती ग सखे मी" या गाण्यात सीतेच्या बहीणी आणि जावा तिला म्हणतातः
पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिहीं लोकी भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति
24 Mar 2014 - 11:35 am | विजुभाऊ
पतीत पावन = अहिल्येला पावन करून घेतले होते. ( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)
24 Mar 2014 - 11:58 am | माहितगार
वाल्मिकी रामायण म्हणजे जे स्वतः वाल्मिकींनी लिहिल. त्यात फक्त अहल्या असलेल्या आश्रमास श्रीरामांची भेट आणि अहल्येच्या व्यक्तीगत जीवनाचा अल्प परीचय एवढेच असावे. "शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली" हा चमत्कार वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात नसावा असे वाटते. चुकभूल देणे घेणे.
24 Mar 2014 - 12:01 pm | माहितगार
गीतरामायणात वरील प्रमाणे उल्लेख येतो. (चुभूदेघे)
24 Mar 2014 - 9:41 pm | विकास
मंगळवाल्या वर्तकांचा या संदर्भातील एक मुद्दा एकदा वाचनात आला होता आणि तो (मात्र) लॉजिकल वाटला: इंद्रप्रकरणानंतर गौतममुनींनी अहल्येस सांगितले की तू दु:शील झाली आहेस ते सुशील हो. त्यासाठी राम येई पर्यंत तिने तपश्चर्या केली. पण त्यातील शील जाऊन चमत्कार होणारे शिळाप्रकरण तयार झाले. असो.
24 Mar 2014 - 11:37 am | विजुभाऊ
बाकी रामाचा पतीताना पावन करण्याचा संबन्ध तेवढ्यापुरताच. उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने दलीत शंबूकाला त्याने वेद ऐकले म्हणून कानात शिसे ओतुन ठार करावे अशी शिक्षा दिली होती.
24 Mar 2014 - 12:10 pm | अत्रन्गि पाउस
खरंच?
नायकाचे /जेत्याचे -ve
खलनायकांचे /पराजीतांचे +ve
ह्या विषयावर एक वेगळा धागा काढावा एवं इप्सा !!
24 Mar 2014 - 9:45 pm | विकास
उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने...
उत्तर रामायण हे नंतर घातलेली भर आहे असे समजले जाते. ते मूळ रामायणाचा अर्थात रामचरीत्राचा भाग नाही. तो भाग जेंव्हा केंव्हा आणि ज्याने कोणी घुसडला असेल त्याने ते घातले असावे. पण त्या व्यक्तीस फारसे यश मिळाले नसावे असे वाटते. कारण, "रामाने असे केले म्हणून.." असे म्हणत नंतरच्या काळात संदर्भ वापरला गेला असे म्हणण्यासारखे नंतरच्या इतर धार्मिक ग्रंथात वगैरे दिसत नाही आणि त्याचे उदात्तीकरण केलेले पण दिसत नाही. असो.
25 Mar 2014 - 10:02 am | माहितगार
मिपा सदस्य विजुभाऊ यांनी उपस्थीत केलेल्या रामायण विषयक नेहमीच्या मतांतरे असलेल्या विषयांना न्याय देण्यास हा धागा कितपत पुरेसा आहे या बद्दल मी साशंक आहे. अपुर्या माहितीवर/ उणीवयुक्त मांडणीवर आधारीत त्याच त्या चर्चा उगाळले जाणे, नाही म्हटले तरी, सर्व उपलब्ध माहितीची ससंदर्भ समतोल आणि तर्कसुसंगत वाचन/लेखन करणार्यांना कंटाळवाणे होत असावे.
वस्तुतः माझ्या तर्कशास्त्र धागा मालिकेच्या पुढच्या टप्प्यांमधे विज्ञान निरिक्षणातील साधने, मिथक निर्मितीची प्रक्रीया, इतिहास लेखनाची साधने, आणि पुढे इतर तार्कीक उणीवांचे प्रकार इ आणि नंतर चिकित्सात्मक लेखन इत्यादी विषय येणार आहेत. त्यांनतरच अशा चर्चांमध्ये सहभाग घेणे थोडे फारतरी (मला स्वतःला) सुसह्य वाटू शकेल असे वाटते.
सध्या ह्या धाग्या करता महत्वाचा भाग म्हणजे "राम" या कथा नायकाची किमान पक्षी स्वतःच्या पिता-सावत्रआई-सावत्रभावाशी व्यवहार करताना सत्तालोलूपते पेक्षा त्यागाची भूमीका, कदाचित स्वतःच्या आईच्या अनुभवामुळे भूमिका असेल अथवा मिथक असेल पण एकपत्नीत्वाची प्रगतीशील प्रतिमा, पत्नीस पळवून नेल्या नंतर त्यासाठी युद्ध करणे आणि केवळ पतीच नाही तर काही वानरसेनेच्या रुपाने समाजसुद्धा स्त्रीच्या पाठीशी अंशतः का उभाकरता येतो हा विश्वास स्त्री मनांना देण्याच मह्त्वपुर्ण कार्य या कथा नायकाकडून, कथा काव्यातून होत.
व्यक्तीगत पातळीवर कोणत्याही व्यक्तीला केवळ ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पहाण्याचा आग्रह व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीद्वेषा कडे नेतो; तर स्खलनशील माणूस सुद्धा काही एक चांगले कर्तव्य बजावत असू शकतो त्याला समतोल परिपेक्षात बघणे, चांगले ते घेणे, माझा स्वतःचा समतोल जपणारे असते; हे लक्षात घेत गीतरामायण काव्यातील चांगल्या भावांचा रसास्वाद घेणे तो दुसर्यांना देणे आणि जाता जाता ज्ञानकोशीय कार्यही जमेल तेवढे करणे हा माझा हा धागा काढण्या मागचा उद्देश आहे.
2 Apr 2014 - 11:22 am | llपुण्याचे पेशवेll
झाली विजुभाऊंची गिरण चालू झाली.
3 Apr 2014 - 3:52 pm | बॅटमॅन
तपशिलात चूक आहे.
शंबूक नामक शूद्र तपश्चर्या करीत होता-वर्णाश्रमधर्म इ. सोडून म्हणून रामाने बाण मारून त्याचे डोके उडवले म्हंटात. बाकी ते शिसे ओतणे प्रकर्ण नक्की कुठे आहे पाहिले पाहिजे. मनुस्मृतीचे नाव वाचल्यागत आठवतेय पण कन्फर्म केले पाहिजे.
3 Apr 2014 - 4:10 pm | प्यारे१
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं.
रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना?
मात्र तसं केलेलं दिसत नाही.
रामानं काही डिस्क्रिमिनिशेनच केलेलं दिसत नाही :-/
3 Apr 2014 - 4:17 pm | बॅटमॅन
त्याचं काये, हे लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण भलते चावट होते. त्यांची स्पेशल केस होती म्हणून त्यांना मारणं भाग होतं.
पण या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही. शूद्र असून तप करतो म्हणून मारलं हे वरिजिनल रामायणात लिहिलं आहे ना? भले तो भाग प्रक्षिप्त इ. असला तरी लोकांनी त्याच्या नावावर खपवलंच ना? मग आक्षेप कसला आहे?
3 Apr 2014 - 4:21 pm | प्यारे१
'विद्रोही' साहित्य संमेलनाचं उद्घाटन शंबूकाचं शिर पुन्हा जाग्यावर वगैरे बसवून (दीपप्रज्वलनाऐवजी) करण्यात आलेलं वाचलं आहे.
रामानं शंबूक फक्त 'शूद्र होता' हा क्रायटेरिया पकडून मारलं असं वाटत नाही.
तो दुष्ट शक्ती वश करण्यासाठी अघोरी वगैरे तप करत होता असं वाचलं आहे.
वल्लीला विचारायला हवं.
3 Apr 2014 - 4:23 pm | प्रचेतस
लिहिलंय ना दादा खाली, वाचलं नाहीस का?
शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः ।
देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः|
मी शूद्रयोनीत जन्माला आलो असून सदेह स्वर्गाला जाण्यासाठी उग्र तप करीत आहे.
3 Apr 2014 - 4:26 pm | बॅटमॅन
अरेरेरे...सदेह स्वर्गाला जाणे, अन तेही शूद्र असून???? मग तर दुष्ट कर्मच आहे ते. राम पडला सालस, असले दुराचार कसे बरं चालू देईल तो? मारणं गरजेचंच होतं , होय किनै? भले मग वाल्मिकीरामायणात काही का लिहिलेलं असेना, त्याची फिकीर ती कुणाला? अन्कम्फर्टेबल तेवढं सगळं कार्पेटखाली सारावं. :)
3 Apr 2014 - 4:33 pm | प्यारे१
डिक्लेरेशन द्यायला हवं होतं खरं रामानं.
किमान काहीतरी प्रेस रीलिज तरी.
मे बी नेष्ट टैम! :)
3 Apr 2014 - 4:38 pm | बॅटमॅन
रामावर घाऊक टीका करण्याची इच्छा (अन गरजही) नाही, मात्र मोदीभक्तांसारखं प्रत्येक कृतीला ओरिजिनल पुरावा नजरेआड करूनही समर्थन देणं पाहून करमणूक झाली खरी.
बोला प्रभु रामचंद्रकी जै!
3 Apr 2014 - 4:45 pm | प्यारे१
आपली इच्छा!
बाकी त्याकाळची समाजरचना कशी होती हे ठाऊक आहे? अधिकार कोण ठरवणार एखाद्या माणसाचा? ज्याच्याकडं अधिकार आहे तोच ना? अधिकारापासून वंचित ठेवलं वगैरे मानवाधिकाराचा विषय तेव्हा नव्हताच ना. तसं नंतर मोर्चे वगैरे निघाले का? त्यांचा काही उल्लेख आहे का?
शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं? सरसकट कत्तल स्टाईल...
बळंच निष्कर्ष काढायचे असतील तर काढायला स्वतंत्र आहोतच की आपण सगळे. आम्ही आमच्या सोयीचा निष्कर्ष काढला. तुम्ही तुमच्या सोयीचा. :)
3 Apr 2014 - 4:52 pm | बॅटमॅन
शंबूक अनधिकारी शूद्र होता हे नक्की आहे का? अन अधिकार ठरवला तो तरी कशाच्या आधारावर? हे स्पष्ट होऊदे. हे नसेल स्पष्ट तर जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार.
वाल्मिकीरामायणात जे लिहिलंय ते समोर ठेवून बोलतो. फुका मखलाशी करणे आवडत नाही. समाजरचना वेगळी होती म्हणून प्रत्येक गोष्ट नजरेआड कशाला करावी? ती एक गोष्ट सांगितल्याने तुमच्या रामाचं महत्त्व कमी होणार अशी भीती आहे काय?
शंबूकाला तो शूद्र असूनही तप करतो म्हणून मारले हे वाल्मिकीरामायणात लिहिलेले वरिजिनल श्लोक तुमच्या समोर आहेत. यातलं संस्कृत कळायला व्यास असायची गरज नाही. तुमचा सोर्स सांगा अन मग पाहू बळंच निष्कर्ष कोण काढतंय ते. आमचा सोर्स स्वयं रामायण आहे. तुमचा सोर्स काय आहे? सेकंडरी की टर्शरी की अजून प्रायमरी?
3 Apr 2014 - 5:01 pm | प्यारे१
>>>जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार.
ओके. ठीक.
आमची माघार. :)
3 Apr 2014 - 4:12 pm | प्रचेतस
रामायणात शिशाचा कसलाही उल्लेख नाही. रामाने खङगाने शिर उडवले.
शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः ।
देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः||
न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया ।
शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥
भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् ।
निष्कृष्य कोशाद् विमलं शिरश्चिच्छेद राघवः ॥
बाकी समस्त उत्तरकाण्डच प्रक्षिप्त आहे.
3 Apr 2014 - 4:18 pm | बॅटमॅन
वरिजिनल उल्लेखाबद्दल धन्स रे. प्रक्षिप्त इ. असला तर नंतरच्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै.
3 Apr 2014 - 5:51 pm | प्रचेतस
सहमत आहे.
पुष्यमित्र शुंगापासून अशी मानसिकता जास्त गडद व्हायला लागली असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
3 Apr 2014 - 7:11 pm | विकास
वल्लींमुळे पहील्यांदाच वाचले, धन्यवाद! नंतर हा दुवा मिळाला... फार फाफटपसारा न करता ही कथा प्रक्षिप्त रामायणात दिलेली दिसते. त्यात नेहमीचा इंद्राचा पॉवर स्ट्रगल दिसतोय आणि त्याला रामाने केलेली मदत दिसते. पण स्पष्टपणे काहीच दिलेले नाही.
समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान नक्कीच करते. पण आज (म्हणजे किमान काही शतके अथवा नेहमीच) रामायण जेंव्हा राहीले, वाचले आणि गायले गेले तेंव्हा त्यातील राम हा नक्की कोणत्या गुणांमुळे लक्षात ठेवला गेला? शंबुकामुळे? विंदांचे शब्द आठवतात:
म्हणूनच, संपूर्ण रामायण झाले अथवा अगदी उद्या कोणी लिंकनायन लिहीले तर ते झाले, त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
3 Apr 2014 - 7:18 pm | प्यारे१
दुव्याबद्दल आभारी आहे.
3 Apr 2014 - 9:03 pm | बॅटमॅन
त्यापेक्षाही, एका प्रक्षिप्त कथेचेही समर्थन करावयास किती अन कशाला धावायचे हा प्रश्न आहे. अंधभक्ती करावी कशाला? शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. हे वैयक्तिक तुम्हांला उद्देशून नाही.
धार्मिक साहित्यात दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. जुन्या काळातील समाजाचं गुडी गुडी अन अवास्तव चित्र लोकांसमोर ठेवून कोणाचं हित होणारे ते कळत नाही. लोकांच्या सारासारविवेकावर इतका अविश्वास दाखवल्याने काय होणार? गुडी गुडी चित्र सुरुवातीला ठीके, त्या अवस्थेतून बाहेर आलो की जरा नुआन्स्ड चित्र दाखवले तर तेवढ्याने झाला तर फायदाच होईल.
अन शेवटी अंधभक्तांपुढे कितीही गीता वाचली तरी "न कश्चिच्छृणोति माम्" असे होणारे हे ठौकच आहे. पण असोच.
3 Apr 2014 - 9:22 pm | विकास
माझा प्रतिसाद देखील (खरेच) तुम्हाला उद्देशून नव्हता... गैरसमज नसावा.
शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही.
रामाचा कमीपणा सांगितल्याबद्दल भिती वाटण्यापेक्षा रामाचे नाव जरी आले तरी अनेकांना उगाच (स्युडो)सेक्यूलर भिती वाटते हे यातून जास्त मला जाणवले. म्हणून फक्त अधिक लिहीत गेलो.
गीतरामायणाच्या धाग्यात या अवांतराची सुरवात येथे झाली होती... ती देखील काही कारण नसताना. विषय काय आहे? गदीमांचे गीतरामायण. त्यात देखील आधी कुठेही रामाबद्दल देव/मर्यादापुरूषोत्तम म्हणून चर्चा झालेली नाही अथवा कोणी काही रामस्तुती आळवलेली नाही. केवळ रामाला कोणकोणत्या नावाने संबोधले जाते यात पतितपावन हा शब्द आला पण तेव्हढ्यापुरताच. मग त्यावर लगेच प्रक्षिप्त रामायणात देखील जे नाही असे शिसे ओतण्यापर्यंत लिहीण्याची आणि अवांतराची काय गरज होती? हे असे जेंव्हा होते तेंव्हा त्या विरुद्ध बोलणारे हे (या संदर्भात) रामाला कव्हर अप करण्यासाठी धडपडत असतात असे मला खरेच वाटत नाही.
असो. गैरसमज झाला असेल तर तो दूर झाला असेल असे समजून अवांतर संपवतो. :)
3 Apr 2014 - 9:28 pm | बॅटमॅन
ठीक. :)
बाकी सूडोसेकूलर इ. शब्दांची तुम्हांला जितकी अॅलर्जी आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त मला आहे. असो.
4 Apr 2014 - 8:28 am | माहितगार
शंबूक नाम उपचर्चा धाग्याच्या दृष्टीने अंशतः विषयांतर होते, विजुभाऊंकडून तपशिलात चूक होती; तरी एकुण तपशिलातल्या चूका दर्शवून संदर्भासहीत बर्यापैकी समतोल मनमोकळी चर्चा या निमीत्ताने झाली. मधेच मलाही माझे दोन शब्द लिहिण्याची इच्छा झाली होती पण खाली पै तैंचा छंद वृत्त बद्दल धाग्यातील मुख्य उद्देशास धरून प्रतिसाद देण्या बद्दल वाचले आणि माझा उपचर्चेतील सहभागाच्या मोहास तात्पुरता तरी आवर घातला.
विजुभाऊ, अत्रन्गि पाउस, llपुण्याचे पेशवेll, बॅटमॅन, प्रशांत आवले, वल्ली, विकास आपणा सर्वांना या उपचर्चेतील मनमोकळ्या सहभागा बद्दल धन्यवाद
24 Mar 2014 - 12:56 pm | पोटे
तरुनी जो जाईल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमाब
राग मुलतानी
24 Mar 2014 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण धागा.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2014 - 2:01 am | विकास
१ एप्रिल पासून (म्हणजे या प्रतिसादाच्या तारखेपासूनचे) वर्ष हे गीतरामायण निर्मितीचे हिरक महोत्सवी वर्ष आहे!
.. तोंवरि नूतन गीतरामायण!
3 Apr 2014 - 9:55 am | पैसा
अजून यातल्या छंदांबद्दल चर्चा झालेली दिसत नाही. जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.
4 Apr 2014 - 8:31 am | माहितगार
कृपया सवडीनुसार नक्की प्रयत्न करावा, आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल. चर्चेतील सहभागाकरीता आभारी आहे.
3 Apr 2014 - 3:48 pm | चौकटराजा
रामजन्माचे गीत काही केल्या गदिमाना सुचत नव्हते. रात्रीचे दोन वाजत आले तरी मुखडा काही मनासारखा होत नव्हता.
विद्याताई माडगूळकर त्याना म्हणाल्या " अहो आता पुरे ! झोपा आता ! काही जमतेय की नाही ? " अगं मंदे, प्रभु श्रीराम
जन्मायचेयत ते काय आण्णा माडगूळकर जन्माला यायचाय का ? चालू आहेत प्रसुतिवेदना !" " अहो पण आता दोन वाजले रात्रीचे......" झाले. गदिमांच्या रुसलेल्या प्रतिभेला मिळाली उभारी... मिळाला शब्द दोन ...दोन....दोन प्रहरी का ग सखी सूर्य थांबला.....राम जन्मला गं सखी राम जन्मला ...मुखड्याने पहिला वहिला हुंकार घेतला .
3 Apr 2014 - 5:34 pm | दिव्यश्री
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण धागा . धागाकर्त्याचे आणि प्रतिसाद देणार्यांचे खूप आभार . :) 'आठवणीतली गाणी' येथील गीतरामायण मी नेहमी ऐकत असते .
4 Apr 2014 - 8:38 am | माहितगार
चर्चा पुढे चालू राहीलच,तरीही चौकटराजा, दिव्यश्री, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, पोटे, प्रमोद देर्देकर, पाषाणभेद, आदूबाळ, अत्रन्गि पाउस, विकास चर्चेतील सहभागा बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद