आनंद मरते नहीं . . .

मन's picture
मन in काथ्याकूट
14 Jan 2014 - 11:21 am
गाभा: 

"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ..." हे गाणं आवडतं?
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....
कभी ये रुलाये...."
हे गाणं ऐकलत?
"कहीं दूर जब दिन ढल जाये...." ह्यातलं भावपूर्ण वातावरण भिडतं मनाला?
मग तुम्हाला "आनंद " माहिती नसणं कठीण आहे.
मुळात तुमच्यापैकी कुणी आनंद पाहिलेला नसणं हेच मुळी अवघड आहे. माझ्यासारखा एक ना एक आनंद प्रेमी तुमच्या परिचयाचा असेलच. त्यानं आग्रहानं आनंद दाखवला असेलच.
.
.
राजेश खन्नाचा "आनंद" माझा अत्यंत आवडता.
खरं तर त्यात राजेश खन्ना नाहिच. त्यात "आनंद"च आहे. राजेश खन्ना आणि आनंद हे पात्र वेगळं काढताच येणार नाही त्यात.
काहिंना आनंद फारच बडबडा, उथळ , अ-पोक्त वाटू शकतो. पण त्यानं अगदि प्रवाही ,free flow असणं हेच तर दाखवायचय.
पोक्त, विचारी ,कुटील अशा छटा तर इतरत्र प्रत्यक्ष आयुष्यात आणी पडद्यावर दिसतातच की.
असं मनमुराद "जगणं" दिलखुलास हसणं आणि क्वचित बालिश वाटेल अशा उचापत्या करणं हे काही जुळून येत नाही.
पण त्याहीपेक्षा महत्वाचं मल कुणी भावलं तर ते म्हणजे हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. वातावरण नावाचं हे पात्रं मला खूपच आवडलं.
हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही. अनेक सेल्फ्-हेल्प बुकात सांगितलेला संदेश चित्रपटाच्या गाभ्याशी आहे, पण प्रभावीपणं मांडलाय.
आपण खूप आशा अपेक्षा घेउन जगतो. खरं तर सतत जगायचा प्रयत्न करतो. खूप काही मिळावं म्हणून आपण धावपळ करतो, म्हणजे कसं की ते "खूप काही" मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून ही धडपड करतो. यश, ध्येय, साध्य अशा संज्ञा आपण आपल्यापुरत्या तयार करतो; कित्येकदा इतरांना स्वतःसाठी तयार करु देतो. मग सगळी कामं वर्षानुवर्ष, दशकानुदश्कं ह्या संज्ञा मिळवण्यासाठी खर्ची घालतो. दरम्यान कित्येकदा आपल्याच रगाड्यात रमल्यानं इतर जगाशी संपर्क तुटतो. कधी एकटॅपणा जाणवायला लागतो. त्याऐवजी आसपास आपल्याला जीव लावू शकणार्‍या लोकांसाठी वेळ दिला तर खूप काही आपण मिळवू शकतो. ते "खूप काही" असलं तरी भौतिकदृष्ट्या ते "काहीही नाही". मानसिक पातळीवर म्हटलं तर खरच खूप काही आहे.
खूपदा खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर "अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं की. आपली म्हणाविशी किती मंडळी आसपास आहेत" ही जाणीव माणसाला होते.
ही "आपली माणसं" काय भानगड असते, ते पहायचं तर हा आनंद पहावा.
.
आनंद ची भूमिका राजेश खन्ना नं धमाकेदार पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही.
अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा जॉनी वॉकर आहे. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी (रमेश देव), त्या डॉक्टरची पत्नीही(बहुतेक सीमा देव)
त्याला साथ देते. तिचा टुकिनं संसार सुरु आहे. रमेश देव चे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला.
.
.
आणि हो, बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. अमिताभ बच्चन नावाचा कुणीतरी एक त्याकाळातील नवोदित म्हणा स्ट्रगलर म्हणा एक कलाकार आहे.त्यानं ते काम "बरं" केलय म्हणतात.
.
.
चित्रपटात बह्रजरी, भव्य दिव्य काहिच नाही. रुढार्थानं म्हटला जाणारा संघर्ष नाही.(मालक्-कामगार, गरिब्-श्रीमंत, लव्ह स्टोरी व त्याबद्दल कुटुंबियांचे आक्षेप, "खानदान की इज्जत".)
म्हणजे चित्रपटातली बाबू मोशाय आणि आनंद, आनंद आणि नर्स वगैरे पात्र भांडतच नाहित असं नाही.
पण आपण हक्कानं घरच्यांशी भाम्डतो. घरच्यांचे रुसवे-फुगवे काढतो तितपतच. भांडलो, तरी माया कमी होत नाही, हे दिसतं.
.
.
हा पिक्चर इतका छान आहे की शब्दांत लिहिणं कठीण. जितकं लिहाल तितकं ते माप कमीच पडत जाणार. अचूक वर्णन शब्दांत अशक्यच.
ह्यापूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा.
खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद.

.
.

कोण कुठली नर्स, तिनं कशाला "क्लायंट"ची काळजी करावी आपल्या कामापलिकडे?
कारण तीसुद्धा "क्लायंट" नाही तर "पेशंट" म्हणून पाहते आनंद कडे.
नंतर तर पेशंट म्हणून नाही तर अजूनच कुणीतरी म्हणून पाहते. अजून कुणीतरी म्हणजे कोण?
तर ज्याच्याबद्दल भलतं सलतं ऐकलं तर आतडी पिळवतून यावीत असं कुणीतरी.
कोण कुठला तो जॉनी वॉकर्-मुरारीलाल? शब्दशः "रस्त्यात" भेटलेला एक कलंदर.
ही कलंदर माणसं एका भेटीतच एकमेकांना दाद देतात. शेवटी एकमेकांच्या जाण्यानं चटका लावून घेतात.
.
.
"माणूस" कसा असतो? बाय डिफॉल्ट तो स्वार्थी वगैरे असतो असं म्हणतात. पण त्याशिवायही तो काहीतरी असतो.
खाण्याचं आणि श्वास घेण्याचं मशीन ह्याशिवायही हा माणूस काहीतरी असतो.
तो एकमेकांसाठी काळजी करणारा, दुसर्‍याला आपलसं करुन घेणारा वगैरेही असतो.
माणसात आपसांत संघर्ष असतोच. पण जिव्हाळ्याची नातीही असतात. मायेचा ओलावा असतो.
मायेचा ओलावा हा शब्द फारच घिसापीटा झाला असला, तरी तोच इथे यथार्थ आहे,चपखल आहे.
त्याबद्दल दुसरा शब्दही बसणे कठीण.
तर माणूस असा तुमचा सख्खा जीवाचा असतो, तुमचा दोस्त असतो. ऐन लग्नाच्या वाढदिवशी तुमच्या लग्नापूर्वीच्या भानगडिंचा उल्लेख करत तुमची खेचणारा टग्याही असतो. ;)
आणि हो, विनाकरण लळा लावून नंतर मरणार नालायकही माणूस असतो.
नंतर जन्मभर असा आठवणींनी छळणारा असा तो असतो.
.
.
.
सरळ साधं घरगुती वातावरण. काहिसं उल्हासित करणारं. काहिसं ऊबदार.
तुमच्या आमच्या घरी कुटुंबासमवेत बसल्यावर एक जो निवांतपणा, समाधान मिळतं , तेच ते वातावरण.
घरात गप्पा टप्पा चालल्यात. कुणाचा तरी रिझल्ट चांगला लागलाय. आई कौतुकानं बोअल्तेय.
ताई डोक्याला मालिश करुन देतेय. तुम्ही बसल्याबसल्या काहीतरी खोबरं वगैरे खिसताय संध्याकाळी जो "खाऊ" बनणार आहे त्यात मदत म्हणून.
मस्त थट्टा मस्करी सुरु आहे. थोडक्यात तुमच्या कौटुंबिक आयुष्याच्या zenith वर तुम्ही आहात सर्वांना एकमेकांसाथी वेळ आणि आपुलकी आहे असं ते वातावरण.
.
.
.
.
१.सेन्टी मेन्टी झाल्याबद्दल सॉरी.
२.तांत्रिक बाजूंची मला जाण नाही. सॉरी. कथा वाचावी तसा मी चित्रपट/नाटक किंवा कुठलंही सादरीकरण पाहतो.
कधीमधी अधिक तपशील त्या कलेबद्दल शिकू शकलो, तर त्या नजरेतून लिहीन.

--मनोबा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Jan 2014 - 11:32 am | मुक्त विहारि

मला फारसे हिंदी सिनेमे आवडत नाहीत.पण जे काही मनापासून आवडतात त्यात आनंदचा नंबर बराच वर आहे.

प्रचेतस's picture

14 Jan 2014 - 1:33 pm | प्रचेतस

छान लिहिलंयंस बे मनोबा.
बाकी 'आनंद' चित्रपट काही फारसा आवडला नाही.

आयुर्हित's picture

14 Jan 2014 - 2:17 pm | आयुर्हित

आनंद ही गुलझार यांचे संवाद असलेली एक उत्कट व हृदय स्पर्शी कथा आहे जी खूप काही सांगून जाते. प्रत्येक पात्रात एक जिवंतपणा, उत्तम प्रतिभाशाली अभिनय ह्यामुळे ही फिल्म सर्वस्वी भावते.

आनंद आजारी आहे व फार थोडेच दिवस त्याच्या वाट्याला आहेत हे कळल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येणारे हावभाव व अनामिक हुरहूर, चिंता व काळजी यांचे उत्कृष्ट छायाचित्रण.

त्यापायी होणारी प्रार्थना, देवाचा प्रसाद आणायला जाणारे रामुकाका, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा डॉक्टर.

रुग्णाची अशा प्रसंगातही मानसिकता कशी आनंदी असावी, याचे उत्तम उदाहरण: हाताशी असलेला प्रत्येक दिवस चांगला घालवायची, दुसऱ्याच्या मनात डोकावून मनातील भावना शोधण्याची, आपल्यामुळे कोणालाही/डॉक्टरांनाही त्रास होऊ नये म्हणून (दिल्लीला) परत जायची तयारी, गुजराथी शिकण्याची तयारी, प्रसंगी मुक्कालाथ करून लोकांना धडा शिकवणे व जाता जाता रेणूचे डॉक्टर मुखर्जीशी लग्न जुळवून सर्वांना आनंदी करावयाचा प्रयत्न!

रुग्ण व डॉक्टर यांचे नाते कसे असावे हे सांगणारी ही उत्तम कथा. प्रसंगी homeopathy मध्येही काही उपचार आहेत का ह्याचा शोध.

भारतात असलेली झोपडपट्टी, त्यात राहणारे, औषधे/वीटॅमिंस तर सोडाच पण दोन वेळेला खायची मारामार असलेले गरिब व त्यातहि होणारा लोकसंख्येचा उद्रेक (एक मरा नही की दुसरा पैदा होने के लिये तैयार)
(ही परिस्थिती ४२ वर्षानंतरही काहीच बदलेली नाही!)

औषधाची गरज नसतांना गरज नाही असे स्पष्ट सांगणारा एक डॉक्टर व गरज नसतांना गरज आहे सांगणारा दुसरा एक डॉक्टर हा विराधाभास!

आजच्या घडीपुरते सांगायचे झाल्यास, दुर्धर आजारापायी होणारी सर्व समावेशक उपाययोजना (Holistic Approach) व Medical Tourism ची संधी ह्याकडे आपले असलेले दुर्लक्ष!

प्रत्येकाने परत एकदा बघावी अशी खूप काही अवार्ड्स मिळालेली हि फिल्म आहे.
1971: National Film Award for Best Feature Film in Hindi: Hrishikesh Mukherjee, N.C. Sippy
1972: Filmfare Best Movie Award: Hrishikesh Mukherjee, N.C. Sippy
1972: Filmfare Best Actor Award: Rajesh Khanna
1972: Filmfare Best Supporting Actor Award: Amitabh Bachchan
1972: Filmfare Best Dialogue Award: Gulzar
1972: Filmfare Best Editing Award: Hrishikesh Mukherjee
1972: Filmfare Best Story Award: Hrishikesh Mukherjee

कळावे, लोभ असावा
आपला लाडका: आयुर्हीत

मन१'s picture

14 Jan 2014 - 2:58 pm | मन१

परफेक्ट

मन१'s picture

14 Jan 2014 - 3:00 pm | मन१

परफेक्ट

पहाटवारा's picture

15 Jan 2014 - 7:23 am | पहाटवारा

बाकी काहि म्हणा 'आयुर्हित' साहेब !
तुमचा फोकस एकदम लाजवाब आहे ! साला पिक्चर असो , पाक्-कृती असो, काहि बेफाम लिहिलेले ललीत असो .. 'आरोग्या'विषयीची तुमची तळमळ अन फोकस्ड राहून सतत त्यातून काहितरी तत्सम शोधणे एखाद्या तपश्चर्येला बसलेल्या योग्यासमानच आहे !
-पहाटवारा

आयुर्हित's picture

15 Jan 2014 - 8:31 pm | आयुर्हित

मनापासून आवडला आपला प्रतिसाद. धन्यवाद!
याचा अर्थ आपले वाचन चांगले आहे व निरीक्षणही जबरदस्त चांगले आहे!

असे आरोग्यविषय शोधून काढणे मला आवडते. सध्यातरी हाच माझा छंद आहे!

कळावे, लोभ असावा.
आपला मिप्स्नेही: आयुर्हीत

मन१'s picture

15 Jan 2014 - 11:57 pm | मन१

सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

अर्धवटराव's picture

16 Jan 2014 - 1:31 am | अर्धवटराव

आणि ति फार उत्कटतेने मांडली आहे मुखर्जी साहेबांनी. मौनव्रत धारण केलेला साधुबाबा आनंदसाधनेची अंतर्मुखता दाखवतो तर आजारी आनंद बहिर्मुखता. दोघेही एकमेकांना मूकपणे दाद देतात. कसला भारी प्रसंग.

राजेश खन्नाचा बावर्ची पण थोड्याफार याच वळणाचा

लेख उत्तम झालाय हो मनोबा.

अवांतर - बहुतेक याच चित्रपटावरुन कुणीतरी राजेश खन्नाला सावध केलं होतं कि अमिताभ त्याला खाणार.

बर्फाळलांडगा's picture

16 Jan 2014 - 2:02 am | बर्फाळलांडगा

अन ते म्हणजे केमिकल लोच्या जाहलेला नसत्याना लिखाण करू नये.... अन्यथा आवश्यक त्या डेप्थ अभावी अस्वादाची मज्या किरकिरी होउन जाते रे|

मन१'s picture

16 Jan 2014 - 8:02 pm | मन१

अर्धवटराव, बर्फाळलांडगा ; दोघांचे आभार.
@बर्फाळलांडगा :- सूचना बहुमोल आहे. धन्यवाद.

बर्फाळलांडगा's picture

17 Jan 2014 - 3:02 pm | बर्फाळलांडगा

माझ्या धाग्याचा लेखक क्षमता विषय लिखाण यावरुन प्रतिसाद व प्रतिक्रिया मापनाच्या algorithm प्रमाणे या धाग्याचा टीआरपी विदाउट म्यानुपुलेशन किमान 16 व कमाल 24 प्रतिसाद असा आहे. आणि त्या बाबतीत धागा कमजोर पडलाय.

पैसा's picture

21 Jan 2014 - 8:58 pm | पैसा

आनंद आवडता सिनेमा. राजेश खन्नाच्या काही चांगल्या सिनेमांमधे एक. रूढार्थाने हे परीक्षण नाही पण सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले मनोगतही आवडले.