अलीकडेच कामरूप देशातील प्राग्ज्योतिषपूर ऊर्फ गुवाहाटी येथे जाणे झाले. नरकासुराच्या राजधानीत चारपाच दिवस होतो पण मोकळा वेळ दीडेक दिवस असेल नसेल. तस्मात बघावयास कमी वेळ मिळाला. तरी तेवढ्यात काही गोष्टी पाहता आल्या. कामाख्या मंदिर अन वसिष्ठ मंदिर पाहता आले नाही :( कारण वेळही मिळाला नै अन शिवाय कामाख्या मंदिरात गर्दी सोडूनही बळी देणे खुंदल खुंदल के चालू असते असे तेव्हाच तिकडे गेलेल्या एका प्राण्याकडून कळाले. मग म्हटले मरो तेच्यायला. एरवी एशी हाटलात बसून समोर मस्त सजवलेले, मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.
तर आसामदर्शनाची सुरुवात झाली ती ब्रह्मपुत्रा नदी पाहून. लैच मोठी नदी, पैलतीर दूर म्हणजे लैच दूर.
ते सर्व पाहता पाहता मुक्कामावर पोचलो आणि आन्हिके आटपल्यावर पोटाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. मग म्हटले जरा "अथातो मत्स्यजिज्ञासा" करूया. आधी पाहिल्याप्रमाणे फिश टेंगा नामक फिश करी मागवली. याचा फटू काढणे तेव्हा सुचले नाही, तस्मात हा जालावरून घेतलेला फटू इथे चिकटविला आहे. चव छान होती. मोहरी होती पण अंमळ आंबटपण असल्याने उत्तम लागली. बाकी मसालेदारपणा नव्हता फारसा. हे बंगाली आणि आसामी जेवणाचे वैशिष्ट्यच आहे. तेवढं ते भूत जलोकिया नामक मिर्चीचं काय करतात हे बघायला मिळालं नाही पण. असो, नेक्ष्ट टैम नक्की.
पोटपूजा आटपल्यावर शहरात जरा फिरलो. आपल्याला ठाऊक असलेला बंगाल घ्यावा, त्यात अधूनमधून दोनचार टेकड्या टाकाव्यात अन लोकांमधील मंगोलॉइड चेहर्याचे प्रमाण जरा वाढवावे की आसाम होतो. शहर बाकी फार काही मोठे वाटले नाही. पण जेवढे आहे त्यातला मुख्य भाग हा खचितच टुमदार म्हणवून घेण्यास पात्र आहे. फिरत फिरत गेलो, मेन रोडवर लायब्ररी, कॉटन कॉलेज,इ. अनेक इमारती एकमेकांना लागून आहेत त्यांची कंपाउंडची भिंत रस्त्याच्या बाजूने अतिशय सुंदरपणे सजवली आहे. तर्हेतर्हेची पॅनेल्स अन त्यांवर अनेक प्रकारची कलाकुसर. कुठे योद्धे दिसताहेत, कुठे ड्रॅगन्स तर कुठे आसामी लिपीत काही लिहिलेले. कुठेही रिपीटिशन नसलेले अन सुंदर कलाकुसरीने नटलेले हे पॅनेल्स पाहता पाहता रस्ता कधी संपला ते कळालेच नाही.
रस्ता संपल्यावर तिथे आसामचे स्टेट म्यूझियम लागले. आधी नेटवर पाहिले त्यात हे मुख्य आकर्षणांपैकी एक होते. तिथे गेलो तर अपेक्षेपेक्षा बरेच उत्तम निघाले. भरभक्कम १० रुपये फी घेऊन फोटोग्राफीला परवानगी दिली, मग अजून काय पाहिजे! मोग्यांबो खुष जाहला. पण प्रथमग्रासात मक्षिकापतन जाहले कारण वेळ थोडाच होता. वट्ट पाऊण तास शिल्लक होता म्यूझियम बंद व्हायला. तस्मात तपशीलवार जास्त काही पाहता आले नाही. पण मग हिय्या केला आणि धावतपळत जमेल तितक्या गोष्टींचे फटू काढलो. हे म्यूझियम सोमवारी बंद असते, बाकी कायम खुले असते एक्सेप्ट शासकीय हॉलिडेज. वेळ आहे सकाळी १० ते दुपारी ४.
मेन बिल्डिंगच्या आवारात आहोमकालीन काही तोफा ठेवल्या होत्या. ही तोफ इ.स. १७ व्या शतकातली.
आहोम राजसत्ता ही आसामातली एक प्रदीर्घ काळ चाललेली
(इ.स. १२२८ ते १८२६ पर्यंत जवळपास ६०० वर्षे) राजवट होती. या राजवटीशी संबंधित सर्वांत फेमस माणूस म्हणजे लाछित बडफुकन. औरंगजेबाच्या कारकीर्दीत याने मुघल-आहोम संघर्षात मोलाची कामगिरी बजावली. विशेषतः इ.स. १६७१ च्या सराईघाट येथील लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल याचे नाव गाजलेले आहे. खडकवासला येथील एनडीएच्या आवारात या साहेबांचा एक अर्धपुतळा देखील आहे. गुवाहाटीपासून १२ किमी दूर गडचुक नामक लाछित साहेबांच्या काळी बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आहेत असे कळाले होते पण तिथेही जाणे जमले नाही...असो आता अजून रडगाणे न गाता जेवढे बघायला मिळाले ते पाहू.
तोफा ओलांडून आत गेल्यावर एक दगडी खांब आपले स्वागत करतो. साधारण ६ फूट तरी उंची असावी याची. उभ्या खांबाला सापांनी वेटोळे घातल्यागत दिसते आहे. यावर एक शिलालेखही आहे-आहोम लिपीत. त्याचा अर्थ बाजूला लिहिला होता तो असा: "मिसिमी नामक टोळीने आहोमांना चार बुट्ट्या भरून सापाचे विष दिले तर त्या बदल्यात आहोम लोक मिसिमी टोळीवाल्यांना डोंगरांत सुखाने जगू देतील". विषाचे प्रोक्युअरमेंट अग्रीमेंटच हे. याआधी अशा प्रकारचे काही प्रत्यक्ष पाहिले मात्र नव्हते, फक्त ऐकले होते. खरेखोटे देव जाणे, च्यायला दर वर्षी चार बादल्या विष म्हणजे किती साप पकडावे लागत असतील अन तितके साप सापडणे शक्यतेच्या कोटीत तरी आहे की नाही कुणास ठाऊक. सर्पमित्र जॅक डॅनियल्स यांचे मत वाचण्यास उत्सुक.
पुढे गेलो तर तलवारी ठेवलेल्या होत्या. काहींची फिगर कामातून गेली होती पण बर्याच तलवारी अजून टकाटक होत्या.
दुसर्या महायुद्धात वापरलेले काही बाँब्स ठेवले होते. दणदणीत काम होते- ४-५ फूट तरी उंची असेल.
मग गेलो मॅन्युस्क्रिप्ट ग्यालरीत. पाऊल ठेवताक्षणी डोळे अंमळ पाणावले. आजवर इतकी म्यूझियम्स पाहिली पण अन्यत्र कुठेही असं बघायला मिळालं नव्हतं. भूर्जपत्र अन ताडपट्टी शेप्रेट ठेवले होते लोकांना दिसतात कसे आननी हे कळावे म्हणून.
ते एकदा नीट पाहिलं आणि पुढे पाहू लागलो. अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली रामायण-महाभारतादि ग्रंथांची कितीतरी हस्तलिखिते होती. कैक ठिकाणी चित्रेही होती. एक अमरकोशाचे हस्तलिखितही होते. पण बुरंजी नामक प्रकार कुठे दिसला नाही. आपल्याकडे जशा बखरी असतात तशा आसामात बुरंजी असतात.
ते झाल्यावर नाणी, ताम्रपट आणि शिलालेख विभागात गेलो. उत्तमोत्तम नाणी, कितीक ताम्रपट अन तितकेच अखंड शिलालेख ठेवले होते. त्यांपैकी एका शिलालेखाचाच फोटो काढता आला. काय सुंदर अक्षर होते पण त्यावरचे!! सगळीकडे हे नेटकेपण दिसले. म्यूझियमच्य व्यवस्थेतही एक क्वचित जाणवणारा नेटकेपणा होता.
नंतर आदिवासी विभागात गेलो. आसामातील आदिवासी लोकांशी संबंधित मोठे दालन होते. कोलकात्यातील इंडियन म्यूझियमची आठवण झाली अंमळ.
शेवटी मूर्ती विभागात पोचलो. इथेही बुद्धापासून विष्णूपर्यंत व्हाया तीर्थंकर अशा अनेक प्रकारच्या मूर्ती होत्या. विष्णुमूर्तींची व्हरायटी अन संख्या सर्वांत जास्त होती. खाली काही विशेष उल्लेखनीय विष्णुमूर्तीचा फोटो डकवत आहे. ज्या पाषाणातून घडवली तो पाषाणही नरम आहे असे जाणवत होते पाहून. त्याला बहुतेक शिस्ट का कायतरी म्हणतात. गुंतागुंतीची गिचमीड कलाकुसर करावयास हा दगड लै उपयोगी असतो असे दिसते.
पुढे म्यूझियम बंद झाल्यावर तिथून निघालो. वाटेत आर्ट ग्यालरी नामक प्रकार लागला. छोटीशी इमारत होती, आत कुणाच्या तरी चित्रांचे प्रदर्शन चालू होते. पिकासोचे बाप असल्याच्या थाटात आत गेलो खरा पण सुदैवाने डोक्शाला जास्त त्रास झाला नाही. बहुतेक चित्रे साधी सरळ होती, मला तरी आवडली.
चित्रांचे फटू काढून तिथून निघालो. दुसर्या महायुद्धात जे जपानी सैनिक भारतात कामी आले त्यांपैकी काहींची थडगी इथे गुवाहाटीत आहेत. अतिशय सुंदरपणे मेंटेन केलेले आहे. पुण्यात खडकी येथेही अशी थडगी आहेत. या दोहोंची अन अजून अनेक ठिकाणच्या थडग्यांची देखरेख करणारी एक कॉमन संस्था आहे इंग्लंडमधील- कॉमनवेल्थ ग्रेव्ह्ज असोसिएशन म्हणून. त्या संस्थेतर्फे याचे काम पाहिले जाते. अतिशय सुरेख प्रकार आहे. तितकाच गंभीर करणाराही. तिथे काही भारतीय शिपाईदेखील चिरनिद्रा घेत आहेत त्यांपैकी एकाचे हे थडगे.
या सर्व जागा एकमेकांपासून १-२ किमीच्या परिघात आहेत सबब लौकरच बघून झाल्या. आता मला वेध लागले होते गेंडा बघायचे! लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते की आसाम राज्यात काझीरंगा नामक अभयारण्यात टनावारी गेंडे सापडतात म्हणून. मेरे ब्रदर की दुल्हन मध्ये "यूपी आये और भांग नही पी तो क्या खाक यूपी आये?" प्रमाणे "आसाम आये और गेंडा नही देखा तो क्या खाक आसाम आये?" तस्मात गेंडे पाहणे तर होतेच. पण काझीरंगाला जाण्याइतका वेळ तर नव्हता-ते गुवाहाटीपासून दोनेकशे किमी दूर आहे. मग आली का पंचाईत? इथे कामानिमित्त भेटलेल्या एका मराठी माणसाने मदत केली. त्याने सुचविले, कि 'पोबितोरा' ऊर्फ 'पवित्रा' नामक अभयारण्य गुवाहाटीपासून वट्ट ४० किमी दूर आहे. मग हुरूप आला. टॅक्सी ठरवली, तिथल्या रेसॉर्टवाल्याला जीप राईडबद्दल फोन केला अन पोबितोरावर कूच केले.
जाताना ब्रह्मपुत्रा नदीचे दर्शन झाले म्हणण्यापेक्षा मोठ्या वाळवंटाचे दर्शन झाले.वाटेत पेट्रोल भरायला गाडी थांबली तिथला हा डूज अँड डोंट्स चा बोर्ड पहा. हा व अन्य बोर्ड पाहून एका मोठ्या गूढाचा उलगडा झाला. यात बॉक्समधील शब्द म्हणजे आपण वाचला तर "चुइच" असा वाचू. पण ते पूर्ण वाक्य पाहिले तर "मोबाईल फोनर चुइच बन्ध करिबो" असे आहे. म्हणजे तो शब्द स्विच असा आहे. बंगाली पद्धतीने "सुइच" असा लिहायचा होता पण लिहिताणा स चा च केलाय. त्यामुळे उच्चारताना सुतिया म्हणतात आणि लिहिताना....वेल, वेगळे सांगणे न लगे ;) तर मुद्दा असा की या 'सुतिया' आडनावाचे लोक आसामात लै आहेत. फेसबुकवर आपली अकौंट उघडताना स्पेलिंगच्या विशिष्ट पद्धतीमुळे फेसबुकला वाटले की ती शिवी आहे तस्मात त्यांना अकौंट उघडू देईना =)) मग त्यांनी निदर्शने केली, फेबुची प्रतिमा करून जाळली वैग्रे वैग्रे बरंच लडतर झालं होतं २०१२ साली. त्यासंबंधी इथे व इथे वाचता येईल. त्याचा निर्णय काय झाला हे ठाऊक नाही. असो.
तर तासाभरात पोबितोराला पोचलो. हे अभयारण्य टुमदार आहे, ४० स्क्वे.किमी क्षेत्रफळात १०० तरी गेंडे आहेत असे तिथला रेंजर म्हणाला. अन्यत्र कुठे गेंड्यांची पैदास करायची असेल तर इथून गेंडे नेले जातात ही नवीन माहितीही एका मित्राकडून पुढे कळाली. इथे १९ स्क्वे.किमी भागात जीप राईड अन हत्ती राईड होतात. उरलेल्या भागात जाणे अलाउड नाही. हत्ती राईड मला करायला आवडली असती पण तेव्हा हत्ती रविवार असल्याने बुक होते तस्मात जीपच केली झालं. मी, ड्रायव्हर अन आमच्याबरोबर एक हत्यारबंद रक्षक होता. तासभर हिंडलो अन तेवढ्यात ४-५ गेंडाबाई बघावयास मिळाल्या. मजा आ गया. गेंडास्वामी मात्र कुठे दिसले नाहीत. चाळिसेक फुटांवरून मी गेंडे पाहिले पण त्याच दिवशी सकाळी आमच्या रक्षकाने त्याहीपेक्षा जवळून गेंडे-नर गेंडे टु बी प्रिसाईज- पाहिले त्यांचाही फटू दिलेला आहे.
अभयारण्यात गेंडे पाहिले. काही हंस, एक लै मोठा पेलिकनसदृश पक्षी, हंस, अन गायीम्हशी अन बाहेर पर्यटनार्थ कल्ला करणारे मनुष्यप्राणी वगळता , अन्य प्राणी फारसे दिसले नाहीत. टूर खतम झाली मग त्यांचे आभार मानून परत निघालो. चारेक तासात आटोपलं सगळं. त्याच दिवशी संध्याकाळी गुवाहाटी सोडले नि ब्याक टु पॅव्हेलियन आलो. प्रवास सुफळ संपूर्ण :)
प्रतिक्रिया
27 Dec 2013 - 3:54 am | खटपट्या
लेखाच नाव आवडल, पुढे वाचतोय
27 Dec 2013 - 4:35 am | प्यारे१
शॉर्ट अॅण्ड स्वीट टुरचा छान वृत्तांत दिला गेलेला आहे.
बाकी ब्रह्मपुत्रा नदीला नदी न म्हणता 'नद' म्हणतात नि पुल्लिंगी उल्लेख होतो असं कुठंतरी वाचलं आहे.
फोटोवरुन प्रचंड पात्राची थोडीशीच कल्पना येते आहे.
भारतात देखील स्वच्छ परिसर आहे हे 'बघून' आनंद झाला.
(दोन तीन महिन्यांपूर्वी हा उल्लेख कुणाच्या तरी फिरस्तीमध्ये आला होता.)
27 Dec 2013 - 5:33 am | श्रीरंग_जोशी
सुरुवात आवडली. वर्णनशैली नेहमीप्रमाणेच परिणामकारक.
पुभाप्र.
27 Dec 2013 - 5:44 am | चित्रगुप्त
लेख आणि फोटो खूपच छान. लिहिण्याची ष्टैलही मस्त. नरकासुराचा प्रासाद म्हणून काही अवशेष आहेत का? (तसेच 'आप-वाह-द्रुत' यंत्रणा अद्याप आहे का?)
चार बादल्या विष हे शक्य आहेसे वाटते, कारण हल्ली आपण जो हिंग म्हणून बाजारातून आणतो, तो मुळात अतिशय शुद्ध स्वरुपात अफगाणीस्थानातून येतो. इकडे त्याच्यात कमिजास्त प्रमाणात अन्य पदार्थ मिसळून कमी-जास्त दराचा हिंग बनवला जातो. असे मिश्रित विषाचे चार बुधले देणे शक्य वाटते.
मुख्य प्रश्न असा, की या चार बुधले विषाचे ते लोक करत काय असतील ?
27 Dec 2013 - 9:16 am | तुषार काळभोर
युद्ध-युद्ध खेळत असतील..
27 Dec 2013 - 9:27 am | प्रभाकर पेठकर
>>>>या चार बुधले विषाचे ते लोक करत काय असतील ?
लढाईत वापरायला बाणाच्या टोकांना लावत असतील. (माझा आपला एक अंदाज)
27 Dec 2013 - 9:30 am | प्रभाकर पेठकर
किंवा कामदेवाच्या रेसिपीनुसार, कांही देशी औषधांमध्येही वापर करीत असतील.
27 Dec 2013 - 8:29 am | आतिवास
पुढच्या वेळी जास्त वेळ घेऊन जा ... म्हणजे आम्हाला आणखी वाचायला मिळेल :-)
27 Dec 2013 - 8:37 am | यसवायजी
सुप्पर लाईक्स रे.
27 Dec 2013 - 9:04 am | प्रचेतस
सिधम | इति वाल्गुदेवस्स कामरूपस्स राञे प्रागजोतिसपुरानगरेन उपाखानम समापेण |
शैली आवडली. इतक्या जवळ जाऊनही अट्टल मांसाहारी असलेल्या ब्याम्याने बळींच्या भितीने शिल्पसमृद्ध कामाख्या मंदिर न बघितल्याबद्दल तीव्र निषेध. म्युझियम भारीच दिसतेय.
आसामातला गेंडा पुण्यातल्या त्रिशुंड मंदिरात मंदिरात कोरलाय त्याची आठवण झाली.
27 Dec 2013 - 9:28 am | पैसा
खास ब्याटम्यान ष्टैल वर्णन! फोटो मस्त आहेतच. पण कामाख्या देवळात का गेला नाहीस? बळी काय सगळ्या देऊळभर नसतील. एखादा सेक्शन असेल बाजूला कुठेतरी. प्रवासवर्णन एका लेखात आटोपते घेतल्याबद्दल मात्र णिसेढ.
27 Dec 2013 - 9:28 am | नाखु
आवड्ला..बहुतेक आयत्यावेळी ठरलेल्या सहली / कट्टे जास्त "अनुभव" समृद्ध असतात असं दिसतय.
27 Dec 2013 - 9:31 am | प्रभाकर पेठकर
सुंदर वर्णन. पण आसाम पर्यटनाची भूक चाळवली. समाधान झालं नाही.
27 Dec 2013 - 10:01 am | किसन शिंदे
आटोपशीर वृत्तांत आवडला.
27 Dec 2013 - 10:03 am | सोत्रि
मस्त!
छोटीशीच पण झक्कास झालीयेय ट्रीप :)
- (भटक्या) सोकाजी
27 Dec 2013 - 10:10 am | सुज्ञ माणुस
ब हा री !
लेखाच्या नावापासूनच सगळे आवडले. :)
27 Dec 2013 - 10:19 am | धन्या
मस्त !! आवडले !!!
27 Dec 2013 - 10:53 am | स्पा
भन्नाट लिहिलेस रे एकदम खुसखुशीत
पण फारच आटोपते घेतलेस ब्वा :P
27 Dec 2013 - 10:57 am | अनुप ढेरे
आवडलं
27 Dec 2013 - 11:53 am | बॅटमॅन
@प्यारे: अन होय, ब्रह्मपुत्रेला नद म्हटल्या जाते. बाकी स्वच्छ भाग थोडा का होईना, आहे तिथे. :)
@चित्रगुप्तः नरकासुराच्या प्रासादाचे अवशेष अजून असले तर माहिती नाही. अंबारी उत्खनन नामक प्रकार आहे तिथेही दीडेक हजार वर्षांपूर्वीपर्यंतचे अवशेस। सापडले आहेत. त्याच्या आधीचे मला दिसले नाही, कुणाला सापडले असेल तर माहिती नाही. जरा बघून सांगतो. अन चार बुधले विषाचा उपयोग नि:संशय युद्धातच केला जात असणारे. तुम्ही म्हणताहात तसे हिंगाप्रमाणे इथेही होत असावे.
@आतिवासतै: अवश्य जाईन अजून वेळ काढून. :)
@पैसातै: सहमत आहे, पण वेळही अंमळ कमीच होता, सबब...असो.
@वल्ली: नेक्स्ट टैम कामाख्याच रे आता. व्हेनेव्हर द्याट माईट कम..
अन पेठकरकाका, खटपट्या, यसवायजी, स्पांडू, सोत्रिअण्णा, धनाजीराव, अनुप ढेरे, किसनदेव, आतिवासतै, श्रीरंग जोशी अन अन्य सर्वांनाही अनेक धन्यवाद!!
@
27 Dec 2013 - 12:06 pm | मृत्युन्जय
ब्रह्मपुत्रा हा खरोखरच एक नद आहे. अति प्रचंड वाढव्य असा तो नद एकदा बघितला आहे. छाती दडपुन येते.
बाकी लेख आवडेश. बॅट्याने बर्याच दिवसांनी काहितरी लिहिले. पुलेप्र.
27 Dec 2013 - 2:09 pm | प्यारे१
>>>बॅट्याने बर्याच दिवसांनी काहितरी लिहिले. पुलेप्र.
आँ? ;)
27 Dec 2013 - 12:33 pm | मदनबाण
छान लिहले आहेस रे वटवाघुळ मानवा...
बाकी जिवंत गेंडे ते देखील शिंगयुक्त पाहुन नवल आणि आश्चर्य वाटले.गेंड्यांच्या शिंगाना लयं किंमत बघा ! मनुष्य प्राण्याच्या कामक्रिडेला लागणार्या उत्तेजक औषध बनवण्यासाठी या प्राण्याचे शिंग वापरले जाते.
जाता जाता :--- मला वाटतं...बहुधा आसाम {की नागालँड ?}भागात स्त्रीयांचे विद्रुप केलेले चेहेरे आढळुन येता { वयस्क स्त्रीयांचे } याचे कारण चीनी आक्रमणा नंतर इथल्या स्त्रीयांवर त्यांनी बलात्कार केले...ते इतके केले की नंतर तिथल्या स्त्रीयांचे चेहरे विद्रुप करण्याची प्रथाच सुरु झाली.विद्रुप स्त्री कोणाला आवडणार नाही आणि त्यामुळे तिच्यावर बलात्कार केला जाणार नाही अशी या प्रथे मागची भावना होती.
27 Dec 2013 - 12:51 pm | बॅटमॅन
धन्स हो मदनबाण :)
बाकी इथे संरक्षित क्षेत्र असल्याने शिंगवाले गेंडे आहेत. त्या विद्रूप बायका मात्र कुठे दिसल्या नाहीत. अन न दिसोत पुढेही.
अवांतरः कामक्रीडेसाठी किंवा अजून कुठल्याही कारणासाठी असो, गेंड्याचे शिंग उपयोगी असते हा शोध पहिल्यांदा कसा लागला असेल??? कायपण कल्पना करा हे सालं अचाटच वाटतं.
27 Dec 2013 - 2:18 pm | मदनबाण
गेंड्याचे शिंग उपयोगी असते हा शोध पहिल्यांदा कसा लागला असेल??? कायपण कल्पना करा हे सालं अचाटच वाटतं.
हो... कसं काय बरं ह्याचा असा उपयोग {अंधश्रद्धा सुद्धा असेल का ?} होईल हे साला पहिल कोणाला समजत असेल ? आदिवासी लोकांना माहित असावं काय ? बाकी शीलाजीत चा उगम हा माकडांमुळे कळला असे ऐकले होते. ;) पाखरांच्या भाषेत सांगायच झालं तर हे खाल्ल की माकड डिंग-डाँग { हो, पाखरांच्या कोड लॅंग्वेज मधला हा शब्द आहे.}करते असे मनुष्य प्राण्याचे निरिक्षणास आले असे म्हणतात.
27 Dec 2013 - 2:44 pm | बॅटमॅन
हाहा, ते बाकी खरं. माणसाचं डोस्कं कुठं अन कधी कसं चालेल कै भरवसा नै ;)
28 Dec 2013 - 2:16 am | अभ्या..
ब्याट्या ते राज्याभिषेकाच्या वेळी पण सगळ्या नद्याचे अभिमंत्रित जल गेंड्याच्या शिंगाने शिंपडायचे असे वाचल्याचे स्मरते.
बाकी गेंडा फकस्त सिएट टायराच्या झैरातीत पाहून म्हैत. :)
बादवे ह्या शिक्रणकट्याच्या कालव्यात एवढा मस्त लिव्हलेला तुझा धागा आलेला कळालाच नाय बे. जरा वेळकाळ पाहून टाकत जा की. ;)
28 Dec 2013 - 2:23 am | बॅटमॅन
गेंड्याच्या शिंगाने जल शिंपडायचे???? धिसिज नवीन फॉर मी, पाहतो जरा इकडेतिकडे.
अन वेळकाळाबद्दल म्हणशील तर ल्ह्यायचा मूड झाला मग टाकलो झालं लेख. :)
27 Dec 2013 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त प्रवासवर्णन आणि फोटो. गडबडीत असूनही धावपळ करून बरंच बघितलंय. ब्याटम्यान स्टैल मधले वर्णन आवडलं पण जरा जास्त लिहिलं असतं तरी चाललं असतं ! गुवाहाटीला जाऊन कामाख्या मंदिर नाही पाहिलं? पण जौ दे नेक्ष्टैम कर्ता येइल ते.
27 Dec 2013 - 1:12 pm | बॅटमॅन
धन्यवाद सरजी. :)
नेक्ष्ट टैम कामाख्या प्रेफ्रन्स लिष्टेवर आहेच!
@मृत्युंजयः येस, बघून छाती दडपायला होते खरे. दख्खनमध्ये वाढलेल्या आपल्याला इतक्या मोठ्या नद्या बघायची सवय नसते.
27 Dec 2013 - 1:55 pm | दिपक.कुवेत
पण फोटो अंमळ सुस्पष्ट हवे होते. अर्थात ते ब्याटम्यान स्टैल असतील तर मग असु दे.
27 Dec 2013 - 2:17 pm | बॅटमॅन
धन्यवाद :) बाकी फटूंबद्दलची सूचना मान्य आहे. इतःपर प्रयत्न करेन नक्कीच.
27 Dec 2013 - 1:58 pm | गणपा
छोटेखानी आटोपशीर लेख असला तरी आवडला. :)
27 Dec 2013 - 2:18 pm | बॅटमॅन
धन्स गणपाशेठ. :)
27 Dec 2013 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा........ लैच छान!
आणी शेवटचे दोन फोटू =)) कुणाशी बरं साधर्म्य दाखवतात? =))
27 Dec 2013 - 2:38 pm | बॅटमॅन
गेंडा का लपविता ;) =))
27 Dec 2013 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा
@गेंडा का लपविता>>> =)) ( :-/ )
का रे हल्कता!? =))
27 Dec 2013 - 2:56 pm | बॅटमॅन
विडंबनाची सुर्सुरी आलेली आहे....योग्य ठिकाणी मोकळी करूच लौकरच ;)
27 Dec 2013 - 2:41 pm | भावना कल्लोळ
प्रवासवर्णन आणि फोटो छान.
27 Dec 2013 - 2:56 pm | सूड
मस्त वृत्तांत!! 'च' ला 'स' म्हणण्याची पद्धत आसाम्यांच्यात आहे हे मात्र नक्की. हापिसातला एक कलीग 'चार'ला 'सार' म्हणायचा ते आठवलं.
27 Dec 2013 - 3:06 pm | चित्रगुप्त
नेक्ष्ट टैम जाल तेंव्हा तिकडे मच्छरदाण्या उतम मिळतात, त्या आणा, आणि नंतर पूर्वी मेनका मासिकात होते, म्हणे (कारण आम्ही त्याकाळी पुरेसे याडल्ट नसल्याने वाचता आले नव्हते) तसले 'मच्छरदाणीतील कुजबुज' असे सदर मिपावर सुरु करा. त्यासाठी आत्तापासून शुभेच्छा.
27 Dec 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
पितामह रॉक्स =)) _/\_
तसे सदर सुरू करायचे तर मच्छरदाणी विभाग सुरू केला पाहिजे किंवा गेलाबाजार "मिचाक" तरी ;)
27 Dec 2013 - 3:09 pm | राही
अगदी ब्याटम्यान स्टाइल वर्णन. टाय्टलपासूनच सुरुवात झाली. आसामी लोकांचे वर्णन एखाद्या रेसिपीसारखे वाटले. 'शेवटी थोडी कोथिंबीर भुरभुरली की झाले' .
मिरचीचे प्रस्थ भुटान मध्ये खूपच पाहिले. तिथे बाजारात मिरच्यांचे ढीग असतात. घराच्या छपरांवरही मिरच्यांची वाळवणे असतात.
सिलिगुडीपासून पुढे भुटानच्या दिशेने परिसर थोडाथोडा स्वच्छ होत जातो. सीमेपल्याडच्या 'फुएंट-शोलिंग' (स्थानिक उच्चार फ़ुन्छोलिंग) मध्ये तर यूरोपसारखी स्वच्छता असते.राईचे तेल उत्तरेत सर्वत्रच. बंगाल. बिहार, आसाम, नेपाळ, भुटान सगळीकडे. तेव्हा स्वतःचे ठेपले स्वतःपाशी असावेत हे बरे.
प्रवासवर्णन थोडक्यात आटोपलेत ते मात्र काही आवडले नाही.
27 Dec 2013 - 3:15 pm | बॅटमॅन
धन्यवाद :)
दार्जीलिंग अन त्या बाजूस पुढे जायचे आहेच एकदा तरी नक्की.
अन प्रवासासाठी वेळ लैच कमी मिळाला सबब जास्त बघावयास मिळाले नाही. पण इतःपर बफर राखेन हे नक्कीच!
27 Dec 2013 - 3:35 pm | आदूबाळ
भारीच! मस्त आवडलं. परत गेलास की "कालिम्पॉङ्ग" नावचे गाव पाहून येणे. काही काही गावंच देखणी असतात* ना, तसं आहे ते.
(*सांगलीबद्दलही हेच मत्त आहे)
27 Dec 2013 - 3:37 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद!! हे लक्षात ठेवल्या जाईल. :)
27 Dec 2013 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
"कालिम्पॉङ्ग" नावचे गाव पाहून येणे. काही काही गावंच देखणी असतात
याला प्रचंड अनुमोदन ! हे गाव मला गंगटोक आणि दार्जिलिंगपेक्षा अनेक पटिंनी जास्त आवडले होते (सन १९८०). ते आवडीचे ठिकाण असल्यामुळे तेथे त्यांच्या काकांच्या (बहुतेक) वाड्यावर रंविंद्रनाथ टागोर नेहमी जात असत.याशिवाय दार्जिलिंगला गेल्यावर पहाटेच्या थंडीत कुडकुडत टायगर हिलवरून दिसणारी कांचनगंगा (कांचनजुंगा) शिखरावरची (८५८६ मीटर, जगातले तिसर्या उंचीचे शिखर) सुर्योदयाची स्वर्गिय रंगरंगोटी अवर्णनिय असते...
27 Dec 2013 - 8:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
"कालिम्पॉङ्ग" नावचे गाव पाहून येणे. काही काही गावंच देखणी असतात
याला प्रचंड अनुमोदन ! हे गाव मला गंगटोक आणि दार्जिलिंगपेक्षा अनेक पटिंनी जास्त आवडले होते (सन १९८०). ते आवडीचे ठिकाण असल्यामुळे तेथे त्यांच्या काकांच्या (बहुतेक) वाड्यावर रंविंद्रनाथ टागोर नेहमी जात असत.याशिवाय दार्जिलिंगला गेल्यावर पहाटेच्या थंडीत कुडकुडत टायगर हिलवरून दिसणारी कांचनगंगा (कांचनजुंगा) शिखरावरची (८५८६ मीटर, जगातले तिसर्या उंचीचे शिखर) सुर्योदयाची स्वर्गिय रंगरंगोटी अवर्णनिय असते...
(जालावरून साभार)
28 Dec 2013 - 2:04 am | बॅटमॅन
रोचक माहिती!!
27 Dec 2013 - 6:54 pm | रमेश आठवले
सुरेख प्रवास वर्णन
वर पेठकरांनी लिहिल्या प्रमाणे सापाच्या विषाचे औषधी उपयोग आहेत. मुंबईच्या हाफकीन संस्थेत साप पाळले आहेत आणि त्यांच्या विषाचा साठा करून ते प्रतिबंधक लस किंवा औषध म्हणून वापरतात.
28 Dec 2013 - 8:59 am | आनंदराव
कसले फिरता राव तुम्ही ! झकासच . आसाम ला जायची ओध निर्माण झाली आहे.
28 Dec 2013 - 7:23 pm | पिशी अबोली
छान लिहिलंयस... आता सुरु केलंच आहेस तर जरा परत लेखनमोहीम काढायचं मनावर घ्या...
29 Dec 2013 - 12:23 am | वाटाड्या...
अप्रतिम बॅट्शेठ...
असामला जाणे आले. तेवढं कामाक्षी मंदिराच मनावर घ्या...
- वाटया